शेवभाजी

Submitted by दिनेश. on 22 June, 2015 - 04:41
shevabhaji
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१) शेव २ कप भरून
२) १ मोठा कांदा
३) अर्धी वाटी खोबर्‍याचा किस
४) ८/९ लसूण पाकळ्या
५) अर्धा इंच आले
६) आवडीप्रमाणे लाल तिखट किंवा लाल मिरच्या
७) १ टिस्पून जिरे
८) २ टिस्पून धणे
९) १ टिस्पून गरम मसाला ( हा ताजा केला तर चांगले. त्यासाठी मिरी, लवंगा, दालचिनी, वेलची, दगडफूल घ्या. )
१० ) तेल
११) फोडणीचे साहित्य ( हिंग, हळद, मोहरी )
१२) कोथिंबीर
१३) मीठ
मुख्य म्हणजे शेव २ कप भरून. हि शेव जाडी आणि तिखट पाहिजे. भावनगरी शक्यतो नको कारण ती लवकर विरघळते. याच कारणासाठी अगदी बारीक शेवही वापरता येत नाही. आपल्याकडच्या फरसाणच्या दुकानात हि असतेच. दिवाळीच्या पदार्थातली शेवही वापरता येईल. हि शेव ताजी व कुरकुरीत असावी.
Shevbhajee Shev.JPG

क्रमवार पाककृती: 

नाशिक, जळगाव भागात शेवभाजी फार लोकप्रिय आहे. तिथल्या धाब्यावरचा हा अगदी लोकप्रिय असा पदार्थ आहे.
धाब्यावर अर्थातच तेल व तिखट जास्त वापरलेले असते.
१) लाल मिरच्या घेतल्या असतील तर त्या आणि तर ताजे मसाले खमंग भाजून घ्या. व त्याची पूड करा
२) खोबर्‍याचा किसही भाजून घ्या
३) कांदा उभा चिरून तेलात लालसर परतून घ्या. ( हल्ली वाळवलेला कांदा मिळतो. तो वापरला तर पटकन भाजला जातो. तो २ टेबलस्पून पुरेल )
४) खोबरे, आले, लसूण व कांदा यांचे बारीक वाटण करा. ( मिक्सरमधे आधी खोबरे आणि मग कांदा, आले, लसूण वाटावे लागेल. )
५) या वाटणात मसाला मिसळा.
६) थोड्या तेलाची फोडणी करून त्यात मसाला परतून घ्या. त्यात हवे तेवढे पाणी घालून रस्सा उकळू द्या. बेताचे मीठ व कोथिंबीर घाला. ( शेवेत मीठ असतेच, त्या मानाने मीठ घाला. )

७) पाणी थोडे जास्तच घाला कारण शेव घातल्यावर रस्सा दाट होतो.

८) अगदी खायच्या वेळेला त्यात शेव टाका आणि २/३ मिनिटे उकळा.

९) भाकरी किंवा चपाती सोबत खा.

वाढणी/प्रमाण: 
२ जणांना पुरेल
अधिक टिपा: 

हा रस्सा तिखटच असतो. यात आंबटपणासाठी काहिही ( टोमॅटो, चिंच ) घालत नाहीत. तसेच गूळ वा साखरही घालत नाहीत. हवे तर सोबत कच्चा कांदा आणि लिंबू घ्या.

हा मसाला आधी करुन ठेवता येतो. पाणी न घालता वाटला तर हवाबंद डब्यात ठेवून फ्रिजमधे अगदी महिनाभरही टिकेल.

ह्याच मसाल्याचे पाणी उकळून त्यात कच्ची अंडी फोडून घातली तर अंड्याचा रस्सा तयार होईल.

कोथिंबीर फोडणीत, रस्सा उकळताना किंवा वरूनही घेता येईल.

माहितीचा स्रोत: 
माझाच अंदाज .. चव घेतल्यानंतरचा !
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कियोमी, गरम मसाला तयार करुन ठेवला तर कालांतराने त्याचा वास उडून जातो. म्हणून मी प्रत्येकवेळी हा ताजा करून छोट्या खलात कुटून घेतो. पण मग तो एक टीस्पून वगैरे करणे जमत नाही. थोडा जास्तच होतो आणि मग नालेसाठी घोडा या न्यायाने दुसरा एखादा पदार्थ केला जातो.

माझे प्रमाण साधारण असे.. १ टिस्पून मिरी, दोन लवंगा, १ इंच दालचिनी, ४ हिरव्या वेलच्या, एका मसाला वेलचीचे दाणे, १ चौ इंच दगडफूल... सगळे थोडेसे भाजून कुटायचे.

धन्यवाद दिनेशदा :-).

आणि मग नालेसाठी घोडा या न्यायाने दुसरा एखादा पदार्थ केला जातो. >> हा हा चांगलचय की मग! आम्हाला अजून वेगवेगळ्या पाककृती शिकायला मिळतील तुमच्याकडून!

>>>जेम्स बॉन्ड.. या पदार्थाना ते वातावरणही हवे ना ! त्याचीच तर खुमारी असते. सोबत मित्रमंडळी पण हवीत !<<<

+१

खोबरं सुकच.. महाराष्ट्रात कोकण किनार्‍यापासून दूर ओल्या नारळाचा वापर फार मर्यादीत आहे.

बेफि... मला विचारा ! इथे असे सगळ्यांशी शेअर केल्याशिवाय मला कुठलाच पदार्थ गोड लागत नाही !!!

>>>बेफि... मला विचारा ! इथे असे सगळ्यांशी शेअर केल्याशिवाय मला कुठलाच पदार्थ गोड लागत नाही !!!<<<

महोदय, हे सगळ्यांशी शेअर करणे नसून सगळ्यांना फोटो दाखवून काही अतृप्त आत्मे तयार करणे आहे. हे असेच अतृप्त आत्मे मग इतर धाग्यांवर जाऊन हल्लकल्लोळ करतात बहुधा.

कोणत्याही तिखटाच्या भाजीत टोम्याटो, चिंच, साखर घालणे महत्पाप आहे महत्पाप ... कविवर्य सुरेश भट जातिवन्त खवय्ये होते त्यानी एका लेखात हे टोम्याटो घालणारांचा चांगलाच समाचार घेत्ला होता. त्यांच्या मते टमाट्यामुळे मूळ भाजीची चव मारली जाते व ती भाजी तमाट्याचीच होऊन जाते. तसेच पोह्यात साखर घालणे. बेडेकर तर मिसळीत साखर घालतात हरी हरी... ते बेडेकराचे दुकान कुठल्या तरी कायद्याखाली सील केले पाहिजे. असा कायदा नसला तरब्विधानसभेत बील आणून करा तसा कायदा... मिसळीत साखर म्हणे ::राग:

रॉबीनहूड, हा बायस्ड विचार वाटतो .. Wink

तिखट पदार्थांत अगदी प्रमाणात साखर्/गूळ आणि/किंवा चिंच/टोमॅटो/आमसूल्/कैरी इत्यादी पदार्थ घातल्याने मूळ चव एन्हान्स् होते .. जसं आपण गोड पदार्थांत जायफळ, वेलची ह्याबरोबरच किंचीतसं मीठ ही घालतो अगदी तसंच ..

पर्सनली मलाही सगळीकडेच कांदा-टोमॅटो परतून केलेली ग्रेव्ही नाही आवडत. प्रत्येक पदार्थाची त्याची अशी चव असते ती त्या त्या पदार्थात जाणवायला हवी.
अगदी रोजच्या भाज्यांना कांदा-टोमॅटो-लसूण-आलं-धणेजिरेपूड याची ग्रेव्ही/मसाला खाणारे लोक्स पाहिलेत.

कधीतरी म्हणून, चवीत बदल म्हणून वेगळी ग्रेवी मस्त लागते, पण नेहेमी तीच चव असेल तर जेवण बोअरिंग होतं.

उदा
मटार उसळीला कांदा-खोबरं-काळा मसाला- गूळ यांची चव जास्त छान लागते
फ्लॉवर, भेंडी, कारलं, शेंगभाज्या यांच्या भाज्या तेलावर परतून जास्त छान लागतात
छोले मात्र या कां टो ल आ च्या ग्रेव्हीतले मस्त लागतात.

योकु, बरोबर आहे ..

मी कांदा टोमॅटो ग्रेव्ही चं कौतुक करत नाहीये तर तिखट /गोड पदार्थांत इतर चवीचे (आंबट , तुरट, खारट वगैरे वगैरे ) पदार्थ घातल्याने चव कशी एन्हान्स् होते ह्याचं कौतुक करतेय ..

जेम्स बॉन्ड छान वर्णन.... Happy

सुटीच्या दिवसात शेवेची भाजी करण्याचा प्रयत्न राहिल.... भाजीची शेव कशी तयार करायची याचा विचार करतो आहे (येथे मिळणार नाही).

रोजच्या जेवणात विविधता हवीच. एकाच मसाल्याचे जेवण मला रोज नाही चालणार.
बाय द वे, हि कांदा टोमॅटोची ग्रेव्ही राणी नूरजहाँ ने प्रचलित केली असे म्हणतात. ( ती कुठली जाणार मुदपाकखान्यात, कुणा खानसाम्यानेच बनवली असणार. )

अतृप्त आत्म्यानो तृप्त व्हा बघू.. !

( पण एवढी कुणाला पुरली नसेलच. परत मागितली असणारच !! )<<<<< दिनेशदा, तेवढी खूप आहे एका माणसाला. आणि अजून उरली होती ती मी पुन्हा संध्याकाळी खाल्ली. मि.पा. चा रस्सा छान होईल ह्या रेसिपीने. मी दोन टी. स्पून तिखट घातल होत. खूप तिखट, मस्त झाली होती.

अतृप्त आत्म्यानो तृप्त व्हा बघू.. ! <<<<< वरच्या रेसिपीमधला फोटो ४-५ वेळा बघून शेवटी बनवली आणि अतृप्त आत्माराम तृप्त केला. Lol

ल-प्री, धन्स.

खानदेशी शेवभाजी Happy माझी फेव्ह आहे ही. दिनेशदा परफेक्ट झालीये. अशीच असते आमच्या घरी.

उदय, शेव मिळत नसेल तर झार्‍यावर शेव बनवु शकता. उकळत्या आमटीत शेव झारावी लागेल. अशी शेवभाजी पण छान लागते.

बेसनात जिरा पावडर, ओवा पावडर, मीठ, तिखट घालुन घट्ट भिजवुन घ्यायचे. आमटी उकळली की कढई वर झारा पकडायचा आणि भिजवलेल्या बेसनाचा छोटा छोटा गोळा घेऊन झार्‍यावर घासायचा.
अशी इंस्टंट शेव भाजी पण मस्त लागते.

जेम्स बाँड मस्त पोस्ट्स.

@दिनेश दा भाजी मस्त पण तेलाचा तवंग नसेल तर मज्जा नाय.
@मंजुडी तै नका हो नका टाकु शेव भाजीत चिंच गुळ्(रड्णारी बाहुली).
शेव भाजी आणि खान्देशी भरीत प्रेमींना आनंदाने खावु घालण्यात येईल. अधीही या.
रच्याकने- इथे अमळनेर चा उल्लेख झालाय. कोण आहे का इथे?

दिनेशदा... पर्फेक्ट! आठवड्यातुन एकदा तरी होतेच ही भाजी आमच्यात.
यात टोमॅटो नकोच. झणका अनुभवता येणार नाही.

हा धागा वर बघून रहावत न्हवते म्हणून लंच मधे भगत ताराचंद मधे जावून आज शेव टॉमेटो भाजी खाऊन आलो.
आता या रेसिपी ने उद्द्या घरी करणार.

Pages