शेवभाजी

Submitted by दिनेश. on 22 June, 2015 - 04:41
shevabhaji
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१) शेव २ कप भरून
२) १ मोठा कांदा
३) अर्धी वाटी खोबर्‍याचा किस
४) ८/९ लसूण पाकळ्या
५) अर्धा इंच आले
६) आवडीप्रमाणे लाल तिखट किंवा लाल मिरच्या
७) १ टिस्पून जिरे
८) २ टिस्पून धणे
९) १ टिस्पून गरम मसाला ( हा ताजा केला तर चांगले. त्यासाठी मिरी, लवंगा, दालचिनी, वेलची, दगडफूल घ्या. )
१० ) तेल
११) फोडणीचे साहित्य ( हिंग, हळद, मोहरी )
१२) कोथिंबीर
१३) मीठ
मुख्य म्हणजे शेव २ कप भरून. हि शेव जाडी आणि तिखट पाहिजे. भावनगरी शक्यतो नको कारण ती लवकर विरघळते. याच कारणासाठी अगदी बारीक शेवही वापरता येत नाही. आपल्याकडच्या फरसाणच्या दुकानात हि असतेच. दिवाळीच्या पदार्थातली शेवही वापरता येईल. हि शेव ताजी व कुरकुरीत असावी.
Shevbhajee Shev.JPG

क्रमवार पाककृती: 

नाशिक, जळगाव भागात शेवभाजी फार लोकप्रिय आहे. तिथल्या धाब्यावरचा हा अगदी लोकप्रिय असा पदार्थ आहे.
धाब्यावर अर्थातच तेल व तिखट जास्त वापरलेले असते.
१) लाल मिरच्या घेतल्या असतील तर त्या आणि तर ताजे मसाले खमंग भाजून घ्या. व त्याची पूड करा
२) खोबर्‍याचा किसही भाजून घ्या
३) कांदा उभा चिरून तेलात लालसर परतून घ्या. ( हल्ली वाळवलेला कांदा मिळतो. तो वापरला तर पटकन भाजला जातो. तो २ टेबलस्पून पुरेल )
४) खोबरे, आले, लसूण व कांदा यांचे बारीक वाटण करा. ( मिक्सरमधे आधी खोबरे आणि मग कांदा, आले, लसूण वाटावे लागेल. )
५) या वाटणात मसाला मिसळा.
६) थोड्या तेलाची फोडणी करून त्यात मसाला परतून घ्या. त्यात हवे तेवढे पाणी घालून रस्सा उकळू द्या. बेताचे मीठ व कोथिंबीर घाला. ( शेवेत मीठ असतेच, त्या मानाने मीठ घाला. )

७) पाणी थोडे जास्तच घाला कारण शेव घातल्यावर रस्सा दाट होतो.

८) अगदी खायच्या वेळेला त्यात शेव टाका आणि २/३ मिनिटे उकळा.

९) भाकरी किंवा चपाती सोबत खा.

वाढणी/प्रमाण: 
२ जणांना पुरेल
अधिक टिपा: 

हा रस्सा तिखटच असतो. यात आंबटपणासाठी काहिही ( टोमॅटो, चिंच ) घालत नाहीत. तसेच गूळ वा साखरही घालत नाहीत. हवे तर सोबत कच्चा कांदा आणि लिंबू घ्या.

हा मसाला आधी करुन ठेवता येतो. पाणी न घालता वाटला तर हवाबंद डब्यात ठेवून फ्रिजमधे अगदी महिनाभरही टिकेल.

ह्याच मसाल्याचे पाणी उकळून त्यात कच्ची अंडी फोडून घातली तर अंड्याचा रस्सा तयार होईल.

कोथिंबीर फोडणीत, रस्सा उकळताना किंवा वरूनही घेता येईल.

माहितीचा स्रोत: 
माझाच अंदाज .. चव घेतल्यानंतरचा !
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवांतर
..
दॅट इज महाराष्ट्रीय शेवभाजी
..
जर हे वाक्य ईंग्लिश असेल तर महाराष्ट्रीयन हवे ना, माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रीय हा मराठी आणि महाराष्ट्रीयन हा ईंग्रजी शब्द आहे.
..
चुकत असेल तर करेक्टा !

------------

भावनगरी शक्यतो नको कारण ती लवकर विरघळते.
हो. मी केली होती पण शेव भावनगरी होती. मजा नाही आली.
>>>>>
कांद्याचे गरमागरम कालवण एका द्रोणात घ्यायचे आणि त्यावर खातानाच जाड भावनगरी गाठ्या थोड्या थोड्या टाकायच्या. वरचा भाग कालवणात विरघळतो, मधला भाग नरम पडतो, आणि एकदम आतला जरा घट्ट खुसखुशीत राहतो.
हे चपातीबरोबर खायचे असल्यास तिखट बनवायचे, आणि तांदळाच्या भाकरीबरोबर खायचे असल्यास कमी तिखट बनवून हिरवीटंच मिरची अधूनमधून चावायची.

उदय +१

खानदेशातले लोक आलेच आहेत गुजराथेतनं असं माझे आजोबा सांगायचे, फार पुर्वी तिकडे दुष्काळ पडला म्हणून हे लोक खानदेशात आले, तेच पुढे पटेल चे पाटील झाले. जळगावकडच्या भाषेतही काही हिंदी गुजराथी शब्द आहेत.

शेव भाजी कशी असावी आणि नसावी ही ज्याची त्याची आवड आहे, मी टोमॅटो घालून खाणार नाही म्हणून कुणी दुसर्‍याने ही खाऊ नये असं थोडीच आहे. Happy

दिनेशदांनी दिलेल्या मसाल्यासारखाच माझी आई करते, या मसाल्यात फ्लॉवर, टोमॅटो आणि मटार घालते, कधी अळूवड्याही घाल्ते, कधी तरी भजी किंवा पातोळ्या घाल्ते.

छान आहे. कृती माहिती नव्हती. भाजी माहितेय. धन्यवाद.

मला आवडते ही भाजी. आमच्याकडे खानदेशी स्वाद नावाचे पोळी-भाजी केंद्र आहे तिथून आणते कधीतरी.

पण नवऱ्याला ही भाजी नाही आवडत, मी घरी वेगळ्या पद्धतीने करते ती आवडते त्याला.

मी फोडणीत आले लसूण मिरची ठेचा किंवा तुकडे घालून पावभाजी मसाला थोडा आणि गरम मसाला थोडा असं घालून, परतते थोडा वेळ मग कांदा टोमाटो थोडा परतून पाणी घालून शिजवते, तिखट मीठ मग शेवटी शेव घालते आणि कोथिंबीर. भावनगरी गाठ्या घालूनपण करते सेम पद्धतीने फक्त कांदा- टोमाटो वाफेवर शिजला की मग पाणी न घालता भावनगरी घालते आणि gas बंद करते. झाकण ठेवते. जेवायला बसायच्या आधी हे करते.

भावनगरी गाठ्यांची अशी भाजी घालून मी तळणीचे मोदक किंवा करंज्यापण करते. आवडतात आमच्याकडे. (अवांतर).

एग्झॅक्ट खानदेशी पद्धत आहे ही, आमच्याकडे २ आठवड्यातून एखाद्या वेळेस होतेच. खानदेशात ह्या भाजीत टोमॅटो घालत नाहित. गुजराथी शेव टो. भाजीत घालत असावेत.
चवीत जमिन आस्मानाचा फरक पडतो त्याने.
वर कॄतीत गरम मसाला लिहिलाय, त्या एवजी शेवभाजी मसाला पडतो Happy आणि असा दरवळ सुटतो ना... Proud

एपिक चॅनेलवर परवा गुजरातचा एपिसोड होता त्यात ही भाजी दाखवली होती त्यात कांदा टॉमाटो वर शेव घातली होती. अंजू तुमची रेसीपी छान वाट्ते आहे. मी हे प्रकार कधीच केलेले नाहीत. पुण्यात असले काही कधी खाल्ले नव्हते व मग एकदम हैद्राबादच. आता करून बघेन. भावनगरी शेव १०० ग्राम घेउन जाईन घरी जाताना. ह्या हवेत खायला मस्त लागेल.

ते शिट्ट्या वाजतील इतके तिखट कसे काय खातात बाई? मला त्यातला काही पॉइन्ट समजत नाही. आम्ही मवाळ खाणार्‍यातले.

मस्त फोटो. तोंपासु.
मी शेवभाजी करते तेव्हा थोडा चिंचेचा कोळ आणि गूळ घालतेच, त्याशिवाय जीभेला आवडत नाही शेवभाजी.
हाच रस्सा जरा सौम्य करून त्यात मेथी मुठीया घालून केलेली भाजीही एकदम मस्त लागते. ओव्याचा मस्त स्वाद येतो.

शेवभाजी मला माझ्या नणंदेच्या हातचीच आवडते. अ फा ट सुंदर करते ती. आम्ही एकदा महाबळेश्वरला गेलो असताना तिने डब्यात मसाला वाटून आणला होता आणि शेव वगैरे वेगळं आणलं होतं. आमच्या हॉलिडे होम मध्ये प्रत्येक रुमला वेगळं स्वयंपाकघर असल्याने तिथे गरम गरम करुन घातली होती तिने. महाबळेश्वरचा गारठा आणि गरम गरम झणझणीत शेवभाजी..अहाहा!

नाशिक भागातहीअलीकडेच फेमस पावलेला हा प्रकार आहे... आमच्या लहानपणी नव्हता हां प्रकार एव्हढा लोकप्रिय... आजोळी नंदुरबारला कधी बघितली नाही!

मी साधारण अशाच पद्धतीने करते. पण अति जहाल तिखट करत नाही.

मजा येतेय वाचायला. मी पण लहानपणी नाशिकला जायचो तेव्हा ही भाजी फेमस नव्हती. ( मी खरं तर वर्ध्याला खाल्ली आहे ही ! )

समोसा, हा पदार्थ आणि शब्दही अरेबिक आहेत.

मी जेव्हा नाशिकला गेलेले तेव्हा याच मसाल्यात बेसनाच्या पोळ्यांचे तुकडे टाकुन पाटोड्या केलेल्या. अफलातुन सुंदर लागत होत्या. पण तिखट झेपले नाही. आता मी नाशिकच्याच मंडळींकडून करुन घेते ही भाजी, अर्थात मला सोसवेल एवढ्यात तिखटात. या भाजीवर निदान इंचभर तरी तेलाचा लाल तवंग पाहिजे आणि जिभ पोळली पाहिजे तिखटाने नाहीतर नाशिककरांच्या मते ती शेवभाजी नव्हेच!!!!

मी अर्थातच करुन पाहिनच. मला खुप आवडते ही भाजी.

गुजराती शेवभाजी म्हणजे शेव-टामेटा, खानदेशी ती झणझणीत शेवभाजी. शेवभाजी साठी खास अशी तुरकाठी शेव मिळते. भुसावळला बोंडेकडे आणी त्यासाठी लागणारा मसाला सुद्धा. तशी ही शेव आख्ख्या खानदेशात वर्ल्डफेमस आहे.
खानदेशात अक्षरशः शेवभाजीच्या पार्ट्या होतात शेतात, लोकांचा विश्वास बसत नाही. बरोबर बाजरीची गरमागरम फुललेली भाकरी, चिकनीचा भाजुन त्यावर तिखट नी तेल टाकलेला पापड, फोडलेला कांदा, पाहिजे असल्यास लिंबु मग साधारण जेवणारा सुद्धा ड्बल हात मारुनच उठतो.

काय दिनेशदा काय पण आठवण करुन दिलीत आता संध्याकाळी करावेच लागेल ना हे !

अमळनेर साईडला शेवकांदा सुकी भाजी पण करतात ना? मैत्रिणीच्या डब्यातली खाल्ल्यावर मी २-३ वेळा केली होती आणि नुसती वाटीत घेवून खाल्ली होती.

अर्थात दिनेशदा,
पावसाळ्याची सुरुवात किंवा गुलाबी थंडीचे दिवस मस्तपैकी एखादा बाप्याच शेवभाजी बनवतोय, शेतातल्या जागल्याच्या कुटुंबाकडुनच बाजरीच्या भाकर्‍या बडवुन घेतल्या जात आहेत, बाजुलाच शेकोटी पेटवुन जमलेले मित्रमंडळ हात शेकत शेकत सुख दुखःच्या गोष्टी करत शेवभाजीला दिलेला झणझणीत तडका अनुभवत आहेत, एखादा कामसु मित्र निखार्यावर पापड तर दुसरा कांदा चिरत आहे. मज्जा येते अश्या वातावरणात.

आज केली होती ही भाजी. मागच्या वेळी केली त्यापेक्षा भारी झाली. मी मूठभर शेवही मिक्सर मधे जरा फिरवून टाकल्याने मिळून आली भाजी. बाहेर पाऊस आणि हा झणका.. आहाहा.

मस्त!

९) १ टिस्पून गरम मसाला ( हा ताजा केला तर चांगले. त्यासाठी मिरी, लवंगा, दालचिनी, वेलची, दगडफूल घ्या. ) > किती प्रमाणात घ्यायचे प्रत्येक पदार्थ? आणि कृतीदेखील सांगा प्लिज?

यम्मी दिसतेय तुमची शेवभाजी. मस्तं. मसाला हा आधी करून ठेवता येतो ही तुमची टिप चांगली आहे म्हणजे वेळेवर मसाल्याची गडबड नको.

Pages