महिलादिनानिमित्त फॅशन डिझायनर शीतल बानावळकर कोलवाळकर यांची मुलाखत

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 8 March, 2015 - 00:15

फॅशनची झगमगती दुनिया डोळे दिपवणारी एक जादूमयी सृष्टी असते. पण या सुंदर, नेत्रदीपक आविष्कारामागे व झगमगाटामागे असते अपार मेहनत, कष्ट, चिकाटी आणि अशक्य वाटणार्‍या कल्पनांना वास्तवात आणण्याचे कसब. आपल्या स्वप्नांना व्यवहाराची जोड देत जवळपास गेली तीस वर्षे फॅशन डिझायनिंग करणार्‍या व व्ही. बी. बानावळकर बूटिकच्या संचालिका शीतल बानावळकर कोलवाळकर यांच्याशी संवाद साधताना जाणवतात ते त्यांनी आपल्या व्यवसायासाठी घेतलेले उदंड कष्ट, जिद्द, मेहनत आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची त्यांची आकांक्षा. मायबोलीच्या वाचकांसाठी घेतलेली ही त्यांची खास मुलाखत.

SBI_sheetal profile pic.jpg
फॅशन डिझायनर शीतल बानावळकर कोलवाळकर

नमस्कार! पुण्यातल्या सुप्रसिद्ध व्ही. बी. बानावळकर टेलर्स मधील व्ही. बी. बानावळकर हे तुमचे आजोबा. त्यांची नात म्हटल्यावर या करीयरचीच निवड तुम्ही करणार असे वाटले होते?

हो, माझे आजोबा-आजी, वडील याच व्यवसायातले होते. आजोबांनी पुण्यात १९४८ साली व्ही. बी. बानावळकर टेलर्सचे दुकान नेहरू चौकात सुरू केले. वडिलांनीही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून बाजीराव रोडला १९७८मध्ये स्वतःचे दुकान चालू केले. आजोबा व वडिलांनी आमचा व्यवसाय खूप भरभराटीला आणला. मी इयत्ता सहावीत असताना, १९८२ साली माझ्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले. आमच्या सर्व कुटुंबासाठी हा खूप मोठा धक्का होता. वडिलांच्या माघारी माझे आजी-आजोबा, माझी आई, मी व माझी दोन भावंडे एवढा मोठा परिवार होता. माझा धाकटा भाऊ तर जेमतेम एक-दीड वर्षांचा होता. आजोबांनी तेव्हा वडिलांचा व्यवसाय व त्यांचे दुकान स्वतःच्या हातात घेतले. त्याचबरोबर त्यांनी मला ट्रेन करायला सुरुवात केली. माझ्या करियरची दिशा तेव्हाच जवळपास ठरून गेली.

इयत्ता सहावीत असल्यापासून ट्रेनिंग? म्हणजे नक्की कसे?

सांगते ना! त्या अगोदर माझ्या आजोबांबद्दलही थोडेसे सांगते. माझे आजोबा खूप शिस्तप्रिय होते. १९४८मध्ये या व्यवसायाची कोणतीही परंपरागत पार्श्वभूमी नसताना त्यांनी यात उडी घेतली. चित्रपटांमधील वैजयंतीमाला यांसारख्या अभिनेत्रींचे कपडे पाहून, त्यांचा अभ्यास करून त्यांनी ब्लाऊजेस शिवण्याची खास पद्धत शिकून घेतली, विकसित केली व त्यात नैपुण्य मिळविले. त्या काळी आपल्या दुकानासमोर 'ब्लाऊज स्पेशालिस्ट' अशी पाटी लावणारे त्यांच्यासारखे व्यावसायिक विरळच असतील! त्यांनी आमचा व्यवसाय एवढा नावारूपाला आणला की लोक चितळ्यांच्या दुकानातील गर्दीशी आमच्या दुकानातील गर्दीची तुलना करायचे! आजोबांनी दुकानात गर्दीमुळे त्या काळी टोकन सिस्टिमही सुरू केली होती.

SBI_VBBanavalkar.jpg
आजोबा व्ही. बी. बानावळकर

माझे वडील वारल्यानंतर आजोबांनी मला आमच्या बाजीराव रोडच्या दुकानात त्यांच्या हाताखाली घेतले. मी रोज शाळा सुटली की सायकलवरून आमच्या दुकानात जायचे. समोरच्या भेळवाल्याकडे भेळ खायची आणि मग आजोबा जी सांगतील ती कामे करायची. त्यात दुकानात झाडू-पोछा करण्यापासून ते ग्राहकांना टोकन देणे, काउंटर सांभाळणे वगैरे सर्व प्रकारची व सर्व स्तरांवरची कामे असायची. इतर मुलेमुली ज्या वयात शाळेनंतर क्लास, खेळ, छंद, अभ्यास करत असायचे तेव्हा मी आजोबांबरोबर दुकानात काम करत असायचे, त्यांच्याकडून या व्यवसायाचे धडे प्रत्यक्ष घेत असायचे. रात्री साडेआठ-नवाच्या सुमारास आजोबा दुकान बंद करायचे. मग त्यांच्याबरोबर गाडीच्या डिकीत माझी सायकल घालून मी घरी परत यायचे. हे रूटीन अगदी माझी शाळा संपेपर्यंत चालू होते.

फॅशन डिझायनिंग क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली?

खरेतर लहानपणी याच क्षेत्रात जायचे असे काहीच मनात नव्हते. पण इतर भावंडांसोबत भातुकली खेळताना माझी भूमिका ठरलेली असायची. मी दुकानातल्या छान छान चिंध्या आणून त्यांचे कपडे शिवायचे काम करायचे. मला त्यात खूप आनंद मिळायचा. आजोबांनी माझ्यातली ही आवड जोखली असावी. आमच्या घरातली मीच मोठी. माझे वडील गेल्यावर आजोबांनी माझ्यातली आवड पाहून मला भविष्यासाठी तयार करायचे ठरविले. १९८२साली माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर आजोबांनी नेहरू चौकातल्या त्यांच्या दुकानाची जबाबदारी माझ्या आत्याकडे सोपविली आणि ते स्वतः माझ्या वडिलांचे दुकान बघू लागले. त्यांनी खरेतर इच्छाशक्तीच्या जोरावर पुढची काही वर्षे हे काम केले व मुख्य म्हणजे मला तयार केले. मी दहावीत जाईपर्यंत त्यांच्या तालमीत पुरेशी तयार झाले होते. चित्रकला, कलाप्रकारांमध्ये मी रमायचे. डोक्यात सारख्या नवनव्या कल्पना येत असायच्या. वेगवेगळे प्रयोग करून पाहायला हात शिवशिवत असायचे. आणि या सार्‍याचा उपयोग मला माझ्या कामात करता यायचा. त्यामुळे हा करियर चॉइस माझ्यासाठी चांगलाच ठरला.

आजोबांच्या हाताखाली प्रशिक्षण घेण्याखेरीज तुम्ही या क्षेत्रातील औपचारिक शिक्षण घेतलेत का?

हो, हो. तेही आवश्यकच होते. मी अकरावीत असताना माझे आजोबा वारले. तोवर त्यांनी मला या व्यवसायात खूप तयार केले होते. पण तरी त्यांचा मोठा आधार होता. ते गेल्यावर सार्‍या घराची व व्यवसायाची जबाबदारी माझ्या खांद्यांवर येऊन पडली. मला घरही सांभाळायचे होते, व्यवसायही बघायचा होता आणि माझे शिक्षणही पूर्ण करायचे होते. मी अ‍ॅडमिशन घेतलेल्या एस. पी. कॉलेजच्या अनेक प्राध्यापिका किंवा प्राध्यापकांच्या पत्नी आमच्या दुकानाच्या नियमित क्लाएंट होत्या. त्यांच्या सल्ल्यानुसार मी बारावीची परीक्षा बाहेरून दिली. खूप काही ग्रेट मार्क्स मिळाले नाहीत आणि माझी तशी अपेक्षाही नव्हती. मुळात शाळेत असल्यापासून मी अभ्यासात फार काही ग्रेट नव्हते आणि माझे लक्ष तर खेळ, कला वगैरेंमध्येच जास्त असायचे. नंतरही वेगळी स्थिती नव्हती. पण तेवढे मार्क्स मला आय. आय. टी. सी. चा फॅशन डिझायनिंग डिप्लोमा करण्यासाठी पुरेसे होते. मी तिथे प्रवेश घेतला आणि माझ्या लक्षात आले की दुकानातील हँड्स ऑन अनुभवामुळे मला इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत प्रॅक्टिकल उत्तम जमत होते.

पुढे मी मुंबईच्या एस एन डी टी मध्ये व पुण्याच्या एस एन डी टीत याच क्षेत्रातील कोर्स केले परंतु परीक्षा काही दिल्या नाहीत. याशिवाय जिथे जशी संधी मिळेल तशी कपड्यावरची वेगवेगळ्या प्रकारची कलाकुसर, कशिदा, पेंटिंग्ज हे मी शिकत गेले. कांथा वर्क, फुलकारी, कच्छी काम, काश्मिरी कशिदाकाम, आरी वर्क, जर्दोसी, बादला वर्क, बांधणी, कर्नाटकी कशिदा वगैरे प्रकार तर मी शिकलेच; त्याचबरोबर मधुबनी, वारली पेंटिंगही करायला शिकले. जिथे मिळेल तसे हे ट्रेनिंग घेतले. एकदा मी आणि नवरा टिळक स्मारक येथे भरलेल्या प्रदर्शनाला भेट द्यायला गेलो तेव्हा तिथल्या स्टॉलवर एक वयस्कर गुजराती कारागीर जरा वेगळ्या प्रकारचा कच्छी टाका घालताना दिसला. त्याला विचारले की शिकवणार का, तर तो लगेच तयारही झाला. मग काय! मी नवर्‍याला दिले परत धाडून आणि तिथेच बसकण ठोकून पुढचे ३-४ तास मी त्या कारागिराकडून ते काम शिकून घेतले! मी अनेकांकडे खाजगी प्रशिक्षणही घेतले. या कला आत्मसात करण्याबरोबरच फॅशनच्या जगातील नवे काही शिकायची संधीही मी सोडत नाही.

फॅशन ही खरेतर तुमच्या डोक्यात तयार होते. इन्स्टिट्यूटमध्ये त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी शिकवतात. ते तुम्हांला बाजारपेठ, कच्चा माल आणि शिवणकामाच्या पद्धती उपलब्ध करून देतात. यातील सर्वात प्राथमिक व अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे माप घेण्यातील अचूकपणा, कपडा नेमका बेतणे आणि शिवणकामातील धारदार सफाई. ती तर मी आजोबांकडेच शिकले. ही अगदी बेसिक गोष्ट त्यांच्या तालमीत पक्की झालीच होती. कागदावरची डिझाईन्स प्रत्यक्षात कशी उतरणार हेही आजोबांनीच शिकवले. माझ्या डोक्यात एखादे नवीन डिझाईन घोळत असेल तर मी त्याबद्दल त्यांना बोलून दाखवायचे, स्केच करून दाखवायचे. त्यांनीही मला कधी नाउमेद केले नाही. ते लगेच मला उत्तेजन द्यायचे, कापड आणून ते डिझाईन प्रत्यक्षात कसे आणता येईल हे करून बघायला सांगायचे. मीही वेळ न दवडता माझ्या डोक्यातल्या डिझाईननुसार कापड आणून त्यावर तो प्रयोग करायला जायचे. कटिंग करतानाच डोक्यात घोळणारी कल्पना प्रत्यक्षात वर्क आऊट करणे हे किती कौशल्याचे काम आहे हे जाणवायचे. त्यातले काही प्रयोग जमायचे, काही फसायचे. पण आजोबांचा मला सतत पाठिंबा असायचा. माझी कल्पना कितीही अव्यवहारी असली तरी त्यांनी मला तसे कधी जाणवू दिले नाही. उलट माझ्या चुका माझ्याच मला कशा उलगडतील हे पाहिले. त्यांनी आपले सारे ज्ञान माझ्यावर अक्षरशः ओतले.

आजोबा गेल्यानंतरचा काळ तुमच्यासाठी व्यावसायिक दृष्ट्या बराच संघर्षाचा व आव्हानाचा होता. त्याला कशा सामोर्‍या गेलात? तिथून एका स्वतंत्र बूटिकची संचालिका हा प्रवास कसा झाला?

१९९० साली माझे वय फार काही नव्हते. माझ्याबरोबरची मुलेमुली कॉलेजातले रंगीबेरंगी, फुलपाखरी दिवस अनुभवत होते आणि त्यावेळी मी आजोबांच्या मृत्यूने आणि अंगावर येऊन पडलेल्या बिझनेसच्या जबाबदारीने हबकलेच होते. पण ती वेळ खचून जाण्याची नव्हती. आजोबांनी त्यांच्या ज्ञानाची पुंजी देऊन माझ्यावर एक अतूट विश्वास दाखवला होता. मला त्यांनी स्वतः ट्रेन केले होते. आता त्या विश्वासाची कसोटी होती. माझी भावंडे लहान होती. आई आमचा बिझनेस पेलू शकेल अशा स्थितीत नव्हती. तेव्हा मीच कंबर कसली आणि आमच्या बाजीराव रोडच्या दुकानाचा व व्यवसायाचा चार्ज घेतला.

त्या वयात जास्त कळत नव्हते. काऊंटरच्या पलीकडचे लोक काम देतात, आपण काम घ्यायचे, त्या कामाचे पैसे घ्यायचे, चांगले काम करायचे, घर आणि बिझनेस चालवायचे एवढेच कळत होते. अनेक प्रश्न यायचे. पण त्या वेळी तिथे ते प्रश्न सोडवायला किंवा निर्णय घेण्यात मदत करायला इतर कोणी नसायचे. अडचणी आल्या तर त्यातून मार्ग आपला आपण शोधायला लागत होता. घरी मला सल्ला देणार्‍या आई, आजी, आत्या होत्या. पण प्रत्येक अडचण त्यांच्यापर्यंत घेऊन जाणेही शक्य नसायचे. काही निर्णय जिथल्या तिथे, ताबडतोब घ्यायला लागायचे. मग ते चूक, बरोबर कसेही असोत. त्यांची संपूर्ण जबाबदारी घ्यायला लागायची. आमच्या दुकानाचे जे नियमित ग्राहक होते ते आजोबा गेल्यावरही आमच्याकडेच त्यांची कामे देत होते. पण ते पहिले सहा महिने! आजोबा व वडिलांची खूप मोठी गुडविल असली तरी त्यांच्या कामाचा दर्जा, गुणवत्ता, सफाई व वक्तशीरपणा मलाही जमवता येणे आवश्यक होते. ग्राहकांचे समाधान होणे, त्यांना उत्कृष्ट सेवा पुरविता येणे यासाठी मी झगडत होते. त्याचबरोबर मार्केटच्या चालीरीतीही शिकत होते. हाताखालचे काही कारागीर खूप जुने, अगदी आजोबांच्या वेळचे होते. त्यांच्यापैकी काहींनी मला खूप सांभाळून घेतले. त्यांच्यासाठी मी छोटी मुलगीच होते. त्यांचा आधारही त्या काळात महत्त्वाचा होता. मला या काळात व्यावसायिक पातळीवर स्वतःला वारंवार सिद्ध करावे लागले. चुकत-माकत, सावरत आणि अडचणींमधून मार्ग काढत मला बरेच काही शिकायलाही मिळाले.
१९९४-९५च्या दरम्यान मला रोटरी क्लबच्या पर्वती पुणे शाखेतर्फे 'यंगेस्ट बिझनेसवूमन अवॉर्ड' मिळाले. माझा हुरूप वाढला. आपले स्वतःचे एक स्वतंत्र बूटिक काढावे असे तीव्रतेने वाटू लागले. आपल्या कल्पनेतील वस्त्रांना तिथे साकार रूप देऊन त्यांची विक्री करावी, स्वतः निर्माण केलेल्या कपड्यांची प्रदर्शने मांडावीत, लोकांपर्यंत आपल्या कल्पनेला व कलेला न्यावे असे वाटू लागले. त्या काळी लक्ष्मी रोडला त्याच त्या टिपीकल प्रकारच्या साड्या मिळायच्या. आपण स्त्रियांसाठी कस्टमाईझ्ड वस्त्रे, साड्या तयार करून त्या विकाव्यात असे मला खूप वाटायचे. घरच्यांना माझी स्वप्ने बोलून दाखवली तर 'अगोदर तुझ्या लग्नाचं पाहू, मग नंतर विचार करू' अशी टिपीकल उत्तरे मिळायची. पण माझ्या डोक्यात आता हेच करियर करायचे आणि यातच पुढे जायचे हे पक्के झाले होते. सुदैवाने मला नवरा माझ्या या विचारांना पूर्णपणे सपोर्ट करणारा मिळाला. त्याला माझ्यावरच्या जबाबदारीबद्दल माहीत होते व ते मान्यही होते. तसेच मी या क्षेत्रात जे काही करेन त्याला त्याचा सुजाण पाठिंबा होता. त्यासाठी आमच्या आयुष्यात ज्या काही तडजोडी आम्हांला कराव्या लागल्या त्यात त्याने खूप सपोर्ट केला. हे खूप महत्त्वाचे होते.

SBI_sheetalshop.jpg
धाकट्या भावासोबत शीतल

कालांतराने माझा धाकटा भाऊ याच क्षेत्रात उतरला तेव्हा वडिलांचे दुकान मी त्याला सोपविले आणि स्वतःच्या बूटिकचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी कर्वेनगर भागात गिरिजाशंकर विहार येथे २००९मध्ये जागा घेतली. तेव्हा मला त्या भागातली जागाच परवडणार होती. आता तो भागही चांगला डेव्हलप झाला आहे. पण १९९५ साली पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात यायला २००९ साल उजाडले. 'व्ही. बी. बानावळकर टेलर्स'ची पाटी माझ्या बूटिकवर लावली, पण इथे मी निर्मिलेली, शिवलेली एक्सक्लुझिव वस्त्रप्रावरणे ठेवायचा जो निर्णय घेतला तोच आजही कायम आहे. आजोबांचा व वडिलांचा उत्तम ब्लाऊज शिवण्याचा वारसा मी चालूच ठेवला आहे. परंतु त्याचबरोबर मी कस्टमाईझ्ड कपडे शिवते, शिवून देते, डिझाईन करते. डिझायनर साड्यांपासून ते फॉर्मल्स, पार्टी वेअर, कॅज्युअल वेअर, लेहेंगे, शरारा, पंजाबी सूट्स, ब्लाऊज या सर्व प्रकारच्या कपड्यांची डिझाईन्स बनवणे व त्या त्या व्यक्तीच्या गरजेनुसार, कम्फर्ट लेव्हलनुसार आणि बजेटनुसार त्यांना प्रत्यक्षात आणणे हे काम करायला मला खूप आवडते. माझी खासियत इंडो-वेस्टर्न वेअर किंवा फ्यूजन वेअर ही आहे. या प्रकारात मी बरेच प्रयोग करत असते आणि ते कस्टमर्सनाही खूप आवडतात. डिझायनर ब्लाऊज आणि वेडिंग स्पेशल ब्लाऊज यांसाठीही माझ्याकडे ग्राहकांची गर्दी असते.

मी आजोबांकडे साडीवरचे ब्लाऊज शिवायला शिकले, परंतु साड्यांचे डिझायनिंग, सूट्स, साड्या शिवणे, इंडो वेस्टर्न वेअर, फ्यूजन वेअर हे सर्व मी स्वतः शिकले. पुढे त्यातच स्वतःला डेव्हलप करत गेले.

SBI_inaug3.jpg
बूटिकच्या उद्घाटनप्रसंगी

नव्या बूटिकसाठी तुम्ही भांडवल कसे उभारलेत?

मी अनेक वर्षे या व्यवसायात असले तरी हा आमच्या 'कुटुंबा'चा व्यवसाय होता. मला व्यवसायातून मिळणारे उत्पन्न हे माझे एकटीचे नव्हतेच. शिवाय मी स्वतःला वेगळा पगारही घेत नव्हते. त्यामुळे जेव्हा बूटिक सुरू करायचे ठरविले तेव्हा त्यासाठी लागणारा पैसा कोठून उभा करायचा हा मोठा प्रश्नच होता. व्यवसायातून पैसे उचलण्याचा प्रश्नच येत नव्हता. पण मी व माझ्या नवर्‍याने मिळून एका फ्लॅटमध्ये गुंतवणूक केली होती, शिवाय माझी थोडीफार बचत होती, दागिने होते. आम्ही फ्लॅट विकला, बँकेतून कर्ज काढले, बचत - दागिने वगैरेंच्या बळावर बूटिकची जागा खरेदी केली. नंतरही मी गरजेप्रमाणे पैसा उभा करत गेले. पण हे सर्व मी स्वतंत्र बूटिक सुरू केले म्हणून! या व्यवसायात तुम्ही जेव्हा सुरुवात करता तेव्हा खरे तर खूप मोठे भांडवल नसले तरी चालते. तुमचा अनुभव हाच तुमचा गुरू असतो.

या काळात पुण्याच्या फॅशन संस्कृतीतही बरेच बदल झालेले तुम्ही पाहिले असतील ना?

अगदी! मी एकटीने व्यवसाय सांभाळू लागले त्या काळी, म्हणजे १९८९-९०च्या दरम्यान पुण्यात, खास करून शहर भागात साडी संस्कृती ही सर्वात जास्त प्रमाणात दिसून यायची. साहजिकच वेगवेगळ्या फॅशनच्या किंवा डिझाईनच्या ब्लाऊजना बरीच मागणी होती. तशी ती आताही आहे. पण आता रोज साड्या नेसण्याचे प्रमाण तसे जरा कमीच दिसून येते. आजच्या काळातल्या बायका तर्‍हेतर्‍हेच्या फॅशनचे पंजाबी सूट्स, जीन्स, हिपस्टर्स पासून लाँग स्कर्ट, फॉर्मल वेअर, पार्टी वेअर, फ्यूजन क्लोथ्स सर्रास वापरताना दिसतात. तेव्हा ते तसे नक्कीच दिसायचे नाहीत. फॅशनवर खर्च करण्याच्या मानसिकतेतही बराच बदल झाला आहे. आताच्या जमान्यात मुलींकडे पैसा आहे, तो खर्च करायची ताकद आणि परिस्थिती आहे आणि फॅशनेबल राहणे, स्मार्ट दिसणे किंवा अप-टू-डेट राहणे ही त्यांच्यासाठी एक गरज बनलेली आहे. त्यामुळे आपले व्यक्तिमत्त्व उठून दिसेल असे कपडे वापरण्याबद्दल मुली-स्त्रिया जास्त सजग झालेल्या दिसतात. त्यात इंटरनेट, ग्लोबलायझेशनचाही प्रभाव आहे. कदाचित त्यामुळे त्यांची कपड्यांमध्ये नवनवे प्रयोग करून बघण्याची, किंवा थोडा बोल्ड लूक कॅरी करण्याची मानसिक तयारी आहे. या सर्वाचा आमच्या व्यवसायावर निश्चितच प्रभाव पडत असतो. पण तरी एक सांगते, तेव्हाही जितके महत्त्व साड्यांना होते तेवढेच आजही आहे. साड्यांमध्येही प्रचंड व्हरायटी आहे. या सर्व व्हरायटीज वापरू इच्छिणाराही एक वर्ग आहे. साड्यांप्रमाणेच ब्लाऊजच्या फॅशन्सबद्दलही स्त्रिया खूप चोखंदळ आहेत.
एके काळी आमच्याकडे लग्नाच्या सीझनला एका विशिष्ट समाजाच्या मुली लग्नासाठीचे ब्लाऊजेस शिवायला - डिझायनिंग करायला यायच्या. एकेक मुलगी एका वेळेस साठ-साठ ब्लाऊज शिवून घ्यायची. आणि प्रत्येक ब्लाऊजचा लूक, फॅशन, रंग, पोत, त्यावरील कलाकुसर ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारची हवी असायची. आमच्याकडे प्रोफेशनल्सही एका वेळी डझनाच्या संख्येत ब्लाऊज शिवून घ्यायच्या. आता वस्त्रांचे इतर पर्याय उपलब्ध झाल्यावर ते पर्याय वापरण्याकडे जास्त कल दिसतो.

माझ्याकडे कपडे शिवून घेण्यासाठी सर्व प्रकारचे, सर्व तर्‍हेचे कस्टमर्स येतात. ८९-९०च्या काळात कोणी 'मला ब्लाऊजची जरा खास फॅशन करून द्या' म्हणून सांगितल्यावर मी त्यांना नेहमीपेक्षा पन्नास रुपये जास्त आकारले जातील असे सांगायचा अवकाश, की ती व्यक्ती, 'नको बाई एवढी महागाची फॅशन! वीस रुपयांमध्ये जेवढी फॅशन होईल तेवढीच करा,'' अशी घासाघीस करताना सहज दिसून यायची. आता लोकांची आपल्याला हव्या त्या लूकसाठी पैसा खर्च करायची तयारी असते. हां, पूर्वीच्या अशा अनुभवांवरून मीही बरेच काही शिकले. समोर आलेली व्यक्ती 'वाचायला' शिकले. त्यांची खर्च करायची तयारी आहे का, याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे त्यांना प्रपोझल द्यायला शिकले.

सध्या पाहायला गेलात तर पुण्यात फॅशनबद्दलचा अवेअरनेस आधीपेक्षा बराच वाढला आहे. या इंडस्ट्रीत होणारी पैशांची उलाढालही खूप वाढली आहे. पुणे फॅशन हब बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि हे अतिशय उत्साहवर्धक आहे.

या प्रवासात ग्राहकांचेही बरेच अनुभव तुमच्या गाठीशी जमा झाले असतील...

हो तर! प्रत्येकाला आपला संघर्ष स्वतःच करावा लागतो. मी खूप भाग्यवान आहे की मला माझ्या आजोबांचे व वडिलांचे आशीर्वाद आणि त्यांचे नाव पुढे नेण्याची संधी मिळाली. पण तिथेही मला स्वतःला सिद्ध करावे लागले. आजोबांचे व वडिलांचे अनेक कस्टमर्स नंतर माझ्याकडेही कपडे डिझाईन करायला, शिवून घ्यायला यायचे. सुरुवातीला ते त्यांच्या नावामुळे यायचे, पण आता त्यांना मी करत असलेले काम आवडल्यामुळे ते येतात. आणि काहीजण नव्याने माझे नाव ऐकून येतात. मी स्वतःचे वेगळे बूटिक जरी सुरू केले असले तरी आमच्या बाजीराव रोडच्या दुकानातही मी नियमित जात असते, कारण तिथे जोडलेले अनेक कस्टमर्स माझ्याकडे काम द्यायला त्या जागी येत असतात. अनेकदा मला काही कारणाने तिथे पोचायला उशीर झाला तर थांबून राहणारे किंवा मला माझ्या गिरिजाशंकर विहारच्या बूटिकवर गाठणारेही अनेक कस्टमर्स आहेत. कस्टमरच्या मनाप्रमाणे काम झाले नाही तर साहजिकच ते तक्रार करतात, पण मनासारखे काम झाल्यावर प्रशंसा करणारे, माझ्या कामाची दाद देणारे लोकही भेटतात.
बाहेरगावावरून येणारे, परदेशातून भारतवारीसाठी आलेले आणि माझ्याकडून आवर्जून मोठ्या प्रमाणात कपडे डिझाईन करून शिवून घेऊन जाणारे अनेक कस्टमर्स आहेत. अगदी कोल्हापूर, सांगली, कराड, लातूर, नाशिकसारख्या शहरांपासून ते अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी वगैरे देशांमधून नियमितपणे माझ्याकडे येणारे कस्टमर्स आहेत.

काही गमतीदार किस्सेही आहेत कस्टमर्सचे!

माझ्या मुलाच्या मुंजीत भिक्षावळीत नेसायला मी स्वतःसाठी एक पांढरी साडी डिझाईन करत होते. तेव्हा माझी एक लॉस अँजेलीसला राहणारी व नेहमी माझ्याकडून कपडे डिझाईन करून घेणारी कस्टमर आली. तिला ती पांढरी साडी एवढी आवडली की तिने ती हक्काने स्वतःसाठीच ठेवून घेतली. त्यानंतरही मी अशा दोन साड्या बनवल्या, पण त्याही कस्टमर्सनी उचलल्या. शेवटी स्वतःसाठी मी कशीबशी एक साडी डिझाईन केली आणि आता ही साडी कोणी नेऊ नये म्हणून चक्क प्रार्थना केली!!

असाच एक गमतीदार किस्सा एका अमेरिकेत राहाणार्‍या वधूचा. तिचे लग्न ३१ डिसेंबरला भारतात होणार होते आणि ती इथे २८ डिसेंबरला येणार होती. तोवर आम्ही फोन, ईमेल, तिच्या आईशी भेटीगाठी वगैरेंच्या आधारे तिची मेझरमेन्ट्स, पसंती इत्यादी घेऊन अगदी बारक्यातले बारके तपशील लक्षात ठेवून तिचे लग्नासाठीचे कपडे तयार केले होते. ही मुलगी २८ डिसेंबरला मुंबई एअरपोर्टला उतरली. तिथे तिने कोण्या मुलीचा शरारा पाहिला आणि तो तिला प्रचंड आवडला. झाले! तिने तिच्या 'संगीत' समारंभासाठी तसाच शरारा घालायचे ठरविले. त्यासाठी तिने लगोलग मुंबईहून कापडही घेतले आणि माझ्याकडे आली! शरार्‍यावर ज्या प्रकारची कलाकुसर व भरतकाम तिला हवे होते ते पूर्ण करायला मला फक्त एक रात्र व अर्धा दिवस मिळाला! मी सारी रात्र जागून ते काम पूर्ण केले. पण तो शरारा जेव्हा पूर्ण झाला व त्या वधूने पाहिला तेव्हा तिच्या चेहर्‍यावरचा आनंद मी विसरू शकत नाही.

अशा सर्व कस्टमर्समुळे मला समाधान वाटते, पॉझिटिव्हिटी व हुरूप वाढतो आणि त्याचबरोबर स्वतःची जबाबदारी वाढल्याचीही जाणीव होते. त्यांचा विश्वास टिकवून ठेवणे ही माझी जबाबदारी असते. त्यासाठी आपले पाय जमिनीत घट्ट रोवलेले हवेत.

तुम्ही आतापर्यंत अनेक सेलिब्रिटीज आणि वलयांकित, मान्यवर व्यक्तींसाठी फॅशन डिझायनिंग केले आहेत. त्याबद्दल सांगाल का?

हो, नक्कीच. सेलिब्रिटीजबद्दल तर मी निश्चित सांगू शकते. बाकीच्यांची नावे मी त्यांच्या परवानगीशिवाय देऊ शकणार नाही. अभिनेत्री अमृता सुभाषच्या पोर्टफोलियोसाठी मी डिझाईन्स केली आहेत. तिच्या सुरुवातीच्या काळात ती नियमितपणे माझ्याकडून कपडे डिझाईन करून घ्यायची. एकदा तर तिच्या चित्रपटाचे महाबळेश्वरला शूटिंग होते. आदल्या रात्री तिने माझ्याकडून दुसर्‍या दिवशीच्या क्लायमॅक्स सीनला तिला लागणारे खास कपडे शिवून घेतले होते. त्या चित्रपटाच्या कॉस्च्यूम डिझायनरने बनवलेले कपडे तिला अजिबात आवडले नव्हते. मग आमची आयत्या वेळची धावपळ, रात्री जागून शिवलेले तिचे कपडे, ते घेऊन लगोलग दुसर्‍या दिवशी शूटिंग... मजा आली होती खूप!

SBI_AmrutaSubhash.jpg
अभिनेत्री अमृता सुभाषबरोबर

SBI_poonam.jpg
अभिनेत्री पूनम धिल्लाँसोबत

मिस युनिव्हर्स किताब जिंकणार्‍या युक्ता मुखीसाठी मी कपडे डिझाईन केले आहेत. मूनमून सेनची मुलगी व अभिनेत्री रिया सेन हिच्या १-२ इव्हेंट्ससाठी मी काम केले आहे.

SBI_yukta1.jpg
मिस युनिव्हर्स युक्ता मुखीसोबत एका इव्हेंटमध्ये

मंगेशकर परिवारातील अनेक सदस्यांसाठी मी काम केले आहे. तसेच लतादीदींसाठीही मी काम केले आहे. त्याबद्दलचा एक मजेदार किस्सा आहे. मी पहिल्यांदा जेव्हा कामासाठी लतादीदींना भेटले तेव्हा खूप एक्सायटेड होते. एक तर मी त्यांची जबरदस्त चाहती आहे. त्यात माझी त्यांना भेटायची ती पहिलीच खेप होती आणि त्यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वासाठी आपल्याला काम करायला मिळते आहे याची प्रचंड एक्साइटमेंट होती. तर, त्यांच्या खोलीत मी जेव्हा त्यांची मेझरमेन्ट्स घ्यायला गेले तेव्हा एरवी फटाफट मेझरमेन्ट्स घेणारी मी, पाच मिनिटे झाली तरी मेझरमेन्ट्स घेतच बसले होते. लतादीदींना माझी ही अवस्था लगेच लक्षात आली असावी. त्यांनी मला सोफ्यावर बसायला सांगितले, माझ्याशी छान गप्पा मारल्या आणि मग मी जरा कम्फर्टेबल झाल्यावर काही वेळाने पुन्हा मेझरमेन्ट्स घ्यायला सांगितले. मला आयुष्यात तो प्रसंग विसरता येत नाही. आजही त्या आठवणीने हसू येते आणि त्याचबरोबर लतादीदींनी किती मोठेपणाने मला सांभाळून घेतले हे जाणवते.

भारतीताई मंगेशकर व राधा मंगेशकर यांच्यासाठीही मी अनेकदा कपडे डिझाईन केले आहेत. भारतीताई तर माझ्या लग्नालाही आल्या होत्या. त्या आमच्या नियमित ग्राहक आहेत. भारतीताई व राधा यांच्या शुभहस्तेच माझ्या बूटिकचे उद्घाटन झाले आहे.

SBI_inaug1.jpg
बूटिकचे उद्घाटन करताना मा. भारतीताई मंगेशकर व राधा मंगेशकर

SBI_inaug2.jpg

अनेक परदेशी लोकांसाठी मी कपडे डिझाईन केले आहेत. एक जर्मन चित्रकार अनेक वर्षे माझ्याकडून वेगवेगळे कपडे डिझाईन करून घेत असे. याखेरीज मी काही शोजसाठी, फॅशन शोजसाठी काम केले आहे. लक्ष्मी रोडवरील काही शोरूम्सच्या जाहिरातींसाठी आणि साडी शोजसाठी काम केले आहे. शामक दावरच्या महर्षीनगर येथील युनिटच्या नृत्यपथकासाठी मी अनेक वर्षे कपडे डिझाईन केले आहेत. मी ६-७ वर्षे रोहिणीताईंच्या शिष्या रोशनी दाते यांच्याकडे कथ्थक शिकले आहे. त्यानंतर कथ्थकशी संपर्क तुटला तरी पुण्यामुंबईच्या काही कथ्थक पथकांच्या कार्यक्रमांसाठी मी नियमितपणे कपडे डिझाईन केले आहेत व करत असते. तसेच युनिफॉर्म्ससाठीही मी काम केले आहे. इ.स. २००३च्या मिसेस पुणे इव्हेंटसाठी मी जजचेही काम केले आहे.

SBI_judge1.jpg
मिसेस पुणे इव्हेंट जज करताना

SBI_memento1.jpg
पुणे फेस्टिव्हलमध्ये स्मृतिचिन्ह स्वीकारताना

कोणकोणत्या प्रकारचे कपडे तुम्ही डिझाईन करता?

मी 'रेडीमेड' प्रकारातील काहीच शिवत नाही किंवा डिझाईनही करत नाही. तसेच स्वतःची डिझाईन्सही रिपीट करत नाही. साड्या, लेहंगे, सूट्स, डिझायनर ब्लाऊज, फॉर्मल्स, वेस्टर्न वेअर, फ्यूजन वेअर या आणि अशा प्रकारच्या कपड्यांची माझी डिझाईन्स ही कस्टमाईझ्ड व पर्सनलाईझ्ड असतात. याशिवाय माझ्या बूटिकमध्ये मी वेगवेगळ्या तर्‍हेच्या कापडांचे तागे ठेवले आहेत. माझ्याकडे अनेक प्रकारच्या कपड्यांची सँपल्स असतात, निरनिराळ्या रंगसंगतीची किंवा डिझाईन्सची सँपल्स असतात. त्यांमुळे गिर्‍हाईकाला तयार कपडा कसा दिसेल हे डोळ्यांसमोर आणायला मदत होते. वेडिंग किंवा लग्नासाठी खास बनवलेल्या डिझायनर साड्या, डिझायनर वेडिंग ब्लाऊज व डिझायनर वेडिंग ड्रेसेस, ज्यांत शरारा, लेहंगा, घागरा चोली वगैरे अनेक प्रकार येतात, ते सर्व प्रकार ही माझी खासियत आहे. दरवर्षी त्यांसाठी माझ्याकडे बर्‍याच ऑर्डर्स असतात.

माझ्या बूटिकमध्ये मी कॉटन कापड सर्वात जास्त प्रमाणात ठेवले आहे, कारण आपल्याकडे कॉटनमध्ये तुफान व्हरायटी आहे आणि आपल्या हवामानाला, वातावरणाला ते सर्वात जास्त सूटही होते. खास कलाकारी केलेली कापडे, डिझाईन केलेले सूट्सही मी बूटिकमध्ये ठेवत असते. बूटिकचे युनिट तसे छोटे असल्यामुळे चोखंदळ ग्राहकांच्या पसंतीस उतरतील अशी व्हरायटी असलेली वैशिष्ट्यपूर्ण कापडे ठेवण्याकडे माझा कल असतो. एकदा आलेला ग्राहक परत परत येत राहावा हे आमचे उद्दिष्ट असते. त्याला इथे जर विशेष काही गवसले, गुणवत्तेची व सेवेची खात्री पटली की तो पुन्हा पुन्हा येत राहतो. आता मी स्वतः डिझाईन केलेले परंतु न शिवलेले सूट्सही बूटिकमध्ये ठेवायला सुरुवात केली आहे. त्यांना कसा प्रतिसाद मिळतो ते पाहून मला पुढेही आणखी काही प्लॅन्स प्रत्यक्षात आणायचे आहेत.

शीतल यांनी डिझाईन केलेली काही वस्त्रप्रावरणे

SBI_coll4dress.jpg
SBI_coll3dress.jpg
SBI_coll4blouse.jpg
डिझायनर साडी शोज्

SBI_sareecoll2.jpg
SBI_sareecoll1.jpgकापडांची खरेदी तुम्ही स्वतः करता का?

सुरुवातीच्या काळात मी भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये बरीच भटकंती करून कापडांची, कच्च्या मालाची निवड व खरेदी करायचे. हैदराबाद, कोलकाता, दिल्ली, गुजरात वगैरे ठिकाणी खास मिळणार्‍या कापडांचे खात्रीशीर विक्रेते शोधणे, त्यांच्याकडून होलसेल भावात खरेदी असे सर्व प्रकार केले. आता माझ्याकडे विश्वासू अशा एजंट्सचे जाळे आहे. त्यांच्याकडून मला अगदी वेळेत, रास्त भावात आणि चांगल्या दर्जाचा माल मिळेल याची खात्री असते. शिवाय बाजारात काही नवीन आले तरी ते असा माल दाखवायला घेऊन येतात.

तुम्ही काही स्वतंत्र प्रदर्शनेही केलीत, तसेच इतरही काही उपक्रमांमध्ये तुम्ही सामील झालात त्यांबद्दल सांगाल का?

मी आतापर्यंत तीन-चार छोटी प्रदर्शने आणि दोन-तीन मोठ्या प्रमाणावरची प्रदर्शने भरवली आहेत. ही प्रदर्शने माझी एकटीची होती. त्यात मी बनवलेली डिझाईन्स, सूट्स, कपडे, कलाकुसर केलेले कपडे वगैरे बरीच व्हरायटी ठेवली होती. हितचिंतकांनी आणि आमच्या नेहमीच्या ग्राहकांनी या प्रदर्शनांना गर्दी तर केलीच शिवाय इतर लोकांनीही खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे माझाही बिझनेस वाढला. नेटवर्किंगसाठी खूप मदत झाली.

प्रदर्शनाचे काही फोटोग्राफ्स

SBI_banner1.jpg
SBI_coll1exhb.jpg
SBI_coll2exhb.jpg

याखेरीज मी सहभाग घेतलेले उपक्रम तसे खूप काही नाहीत. पण तरी माझ्या परीने मी समाजातल्या चांगल्या कामांमध्ये खारीचा वाटा उचलायचा प्रयत्न करते. माझ्याकडून अनेक सेवाभावी संस्था शिवणकामात उरलेल्या चिंध्या, कापडांचे तुकडे घेऊन जातात. त्यांपासून ते वेगवेगळ्या वस्तू, स्टफ्ड टॉईज, कपडे बनवून त्यांची विक्री करतात व त्यांतून निधी गोळा करतात. कामायनीचे लोकही माझ्याकडून अशा चिंध्या घेऊन जायचे. काही वर्षांपूर्वी मी ग्रामीण भागातील एका बचतगटाला चिंध्यांपासून गोधड्या बनवायचे प्रशिक्षण दिले होते आणि त्यांनी बनवलेल्या गोधड्यां मी विकायलाही ठेवायचे. पण दुर्दैवाने काही कारणामुळे तो उपक्रम पुढे चालू राहिला नाही. तरी माझ्याकडे गरजू, होतकरू, कष्ट करायची व शिकायची तयारी असलेल्या मुलामुलींना मी नोकरी देण्यासाठी कायम प्रयत्नशील असते. माझी फक्त एकच अपेक्षा असते ती म्हणजे त्यांनी मन लावून काम करावे आणि तीन-चार महिने काम करून नोकरी सोडून जाऊ नये. जेव्हा मी कोणाला माझ्या हाताखाली तयार करते तेव्हा त्यांना माझ्याकडची कौशल्ये शिकवत असते, त्यांच्यावर मेहनत घेत असते, त्यांचे ग्रूमिंग करत असते. त्यामुळे त्यांनीही मला चांगली साथ द्यावी अशी माझी अपेक्षा असते.

या क्षेत्रात काम करताना तुम्ही स्वतःला अपडेटेड कसे ठेवता?

फॅशनच्या जगात सार्‍या गोष्टी खूप झपाट्याने बदलतात. त्यासाठी तुमचे ट्रेंड्सवर बारीक लक्ष हवे, त्यांचा अभ्यास हवा. तुम्ही अ‍ॅक्टिव्ह राहिलं पाहिजे. चालू फॅशनवर तुम्ही काम करत राहणे जसे महत्त्वाचे आहे तसेच बदलणार्‍या फॅशनवरही तुम्हांला काम करता येणे आवश्यक आहे. त्यात पुन्हा तुमचा स्वतःचा वेगळा ठसा उमटवता आला पाहिजे, इंप्रोव्हायझेशन करता आले पाहिजे. त्याशिवाय तुम्ही वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन्स बनवू शकणार नाही. या सगळ्या गोष्टींसाठी बाहेर डोळे उघडे ठेवून वावरायला लागते. नवीन गोष्टींचा अभ्यास करायला लागतो. स्वतःची वेगळी डिझाईन्स बनवत राहायला लागतात. हे खूप चॅलेंजिंग आहे आणि मला ते करायला जाम आवडते.
याशिवाय या क्षेत्राशी संबंधित ग्रूप्समध्ये सामील होणे, नेटवर्किंग करणे, त्या त्या वर्तुळांत फिरणे याचाही फायदा होतो.

तुमच्या कामात तुम्हांला आव्हानात्मक अशी कोणती बाब वाटते?

एक व्यवसाय म्हटले की त्यात रिस्क ही आलीच! मी आजवर अशा अनेक रिस्क्स् घेतल्या आहेत आणि अडचणींवर यशस्वीपणे मातही केली आहे. नवे प्रयोग करताना काही प्रयोग फसतात. तुमच्या काही कल्पनांना म्हणावी तशी दाद मिळत नाही किंवा त्या ग्राहकांच्या पसंतीस उतरत नाहीत. जर दिलेली वेळ तुमच्या पुरवठादाराने किंवा कारागिराने, हाताखालच्या कर्मचार्‍याने पाळली नाही तरी खूप गोंधळ होऊ शकतात. यांतून मार्ग काढत व्यवसाय करणे हे खरोखरी कौशल्याचे काम आहे.
माझ्या कामात मला जाणवणारे आव्हान म्हणजे येणारा ग्राहक स्वतःच्या डोक्यात एक डिझाईन घेऊन आलेला असतो. कित्येकदा ते डिझाईन त्याने निवडलेल्या कापडाला, किंवा त्याच्या व्यक्तिमत्त्वाला, ज्या कारणासाठी कपडा डिझाईन करून घेत आहे त्या कारणाला अनुरूप असतेच असे नाही. अशा वेळी त्यांना ते स्किलफुली सांगणे किंवा त्यांना सूटेबल अशा डिझाईनचा कपडा शिवण्यास त्यांना पटविणे हे माझ्यासाठी चॅलेंजिंग असते. माझ्याकडे अनेक सेलिब्रिटीज्, अ‍ॅकॅडमिक क्षेत्रातील किंवा पॉवर सर्कलमधील मंडळी आपले कपडे डिझाईन करून घेण्यासाठी येतात. समाजातील प्रसिद्धीच्या वलयात वावरणार्‍या काही मंडळींचे इगोही सांभाळावे लागतात. माझ्यासाठी हे खूप चॅलेंजिंग आहे, कारण माझा स्वभाव खूप सरळसोट आहे. मी थेट बोलते. मनात एक, ओठांत एक हे मला जमत नाही. पण व्यवसायात टिकायचे असेल तर तसे करून चालत नाही. तुम्हांला लोकांशी गोडीत, सभ्यपणे, त्यांना रुचेल - पटेल अशा भाषेतच बोलावे लागते. कोणी उपेक्षा केली किंवा भावनेच्या भरात काही बोलले तरी तुम्हांला तुमचे डोके शांत ठेवून, जिभेवर साखर ठेवूनच वावरावे लागते.

आमच्या व्यवसायात तारखा पाळण्यालाही खूप महत्त्व आहे. त्याबद्दल आम्ही पक्के आहोत. आणि हे माझ्या आजोबांच्या काळापासून आहे. त्यांनी आम्हांला लावलेली ही शिस्तच आहे. तारखांच्या बाबतीत त्या पाळण्यात मी नव्वद टक्के यशस्वी होते. फिटिंग ट्रायल्स, त्या त्या कपड्याचे खास डिझाईन यामुळे कधी अंदाजापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. डिझायनर कपड्याच्या बाबतीत तारखांचे अदमास कोलमडू शकतात. पण तरी जर उशीर होतोय असे आमच्या लक्षात आले तर त्याप्रमाणे आम्हीही क्लाएंटला फोन करून तशी पूर्वकल्पना देतो. त्यामुळे त्यांचाही मनस्ताप व वेळ वाचतो.

याशिवाय नैमित्तिक किंवा व्यवसायाच्या स्वरूपामुळे येणारे तर अनेक चॅलेंजेस असतात. दीड-दोन वर्षांपूर्वी झालेल्या वाहतूकदारांच्या संपामुळे मी वेगवेगळ्या ठिकाणांहून एजंट्सकरवी मागविलेला माल रस्त्यातच अडकला होता. त्यावर माझ्या अनेक ऑर्डर्स अवलंबून होत्या. क्लाएंट्सचे महत्त्वाचे इव्हेंट्स होते. त्यावेळी मी अक्षरशः जंग जंग पछाडून, व्यक्तिशः जाऊन माल सोडवून आणला होता. या अशा अनेक गोष्टी व्यवसायात दैनंदिन स्वरूपात घडत असतात.

आर्थिक नियोजन व व्यवस्थापन कसे करता?

आर्थिक व्यवस्थापन हे मला आजोबांनी शिकविले आणि आजही मी तेच, पण थोड्या वेगळ्या स्वरूपात अमलात आणते. आजोबांच्या वेळच्या आणि आता मी विकसित केलेल्या व्यवसायाच्या रूपात बराच फरक आहे. मूळ साचा तसाच आहे, पण त्यात कालानुरूप मी काही बदल केले आहेत. तरी सणवार, लग्नाचा सीझन, बदलणारे फॅशन ट्रेन्ड्स हे सर्व डोळ्यांसमोर ठेवून त्याप्रमाणे व्यवसायाचे आर्थिक नियोजन करावे लागते.

फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात तुम्हांला जाणवणार्‍या स्पर्धेविषयी काही सांगाल का?

या क्षेत्रात चिक्कार स्पर्धा आहे. पण तुम्ही प्रॉम्प्ट राहिलात तर या स्पर्धेत पुढे निघून जाता. माझ्या क्षेत्रात मी स्वतःची एक खास ओळख, एक खासियत निर्माण करू शकते. आज माझी खासियत ही इंडो वेस्टर्न, इंडो फ्यूजन वेअर अशी आहे. त्यातही मी कस्टमाईझ्ड डिझाईन्स करते. म्हणजे त्या त्या व्यक्तीचे प्रोफेशन, वय, अंगयष्टी, ते कोणत्या वर्तुळात वावरतात, किंवा तो कपडा ते कोठे घालू इच्छितात, या सर्व गोष्टी ध्यानात घेऊन मी त्यांच्यासाठी डिझाईन बनविते. मी शक्यतो डिझाईन्स रिपीट करत नाही. तसेच ते कोणती फॅशन कॅरी करू शकतात, त्यांना कशा प्रकारच्या कपड्यात कंफर्टेबल वाटेल हे पाहून त्यानुसार मी डिझाईन्स सुचविते. आपला कंफर्ट झोन आणि त्यापलीकडे जाऊन एखादी फॅशन कॅरी करता येणे यात एक सूक्ष्म रेषा असते. ती सूक्ष्म रेषा ओळखून त्या क्लाएंटला त्यानुसार डिझाईन करून देणे हे चॅलेंजिंग असते. तसेच इथे तुम्हांला लवचिकही राहावे लागते. तुमचे डिझाईन, पॅटर्न गरजेनुसार बदलायची तयारी हवी. ट्रेंडनुसार बदलायची, बदलत्या ट्रेंडवर स्वतः मेहनत घ्यायची तयारी हवी. तुम्ही स्वतःही ट्रेंड सेट करू शकता. कधी असा ट्रेंड तुम्हांला प्रसिद्धी, मान्यता, पैसा मिळवून देतो तर कधी नाही. यश-अपयश दोन्ही पचवून पुढे जायची तयारी हवी. या व्यवसायात खूप काही लाटा येत-जात असतात, अनेक नवे लोक येत असतात, नव्या कल्पना येत असतात. त्यांना खुलेपणाने सामोरे गेले पाहिजे. स्वतःची वेगळी ओळख बनवता आली पाहिजे. तर मग स्पर्धेचा तितका त्रास होत नाही. आता माझ्याच माहितीतील एक बाई फक्त वेगवेगळ्या फॅशनच्या क्लचेस बनवतात. एकजण फक्त जर्किन्स डिझाईन करतात. एकजण भारतीय बायकांसाठी जीन्स डिझाईन करतात. ही त्यांची खासियत आहे.

नवीन पिढीतील फॅशन डिझायनर्समध्ये काय फरक दिसून येतो?

नव्या पिढीचे मला एक आवडते ते म्हणजे ही अतिशय स्मार्ट, तरतरीत आणि टेक्नो-सॅव्ही मंडळी आहे. त्यांच्यात भरपूर ऊर्जा आणि उत्साह आहे. काहीतरी करून दाखवायची खुमखुमी आहे. इंटरनेटमुळे आता बर्‍याच गोष्टी लोकांना खूप व्यापक प्रमाणात माहिती झाल्या आहेत. या पिढीला आज माहितीचे मोठे भांडार उपलब्ध आहे. पण आम्ही ज्या अनेक गोष्टी प्रॅक्टिकली केल्या आहेत, त्यांचे खुद्द अनुभव घेतले आहेत त्या अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या किंवा अनुभवलेल्या नाहीत. प्रसिद्ध, वलयांकित संस्थांमधून प्रशस्तिपत्रके व पदव्या घेऊन बाहेर पडणार्‍या अनेकजणांना कितीतरी गोष्टी फक्त कागदावर ठाऊक असतात, प्रत्यक्षात त्यांनी त्या आमच्याकडून करून घेतलेल्या असतात. त्यांची बेसिक्सच पक्की नसतात. त्याच वेळी त्यांच्याबरोबरचे इतर काहीजण खूप मेहनत घेऊन, खोलात शिरून काम शिकणारे, अनुभव घेणारेही असतात. वरवर थोडासा अनुभव घेऊन, जास्त खोलात न शिरता कागदोपत्री ज्ञान कमावणार्‍या मुलामुलींना मला कळकळीने सांगावेसे वाटते की तुम्हांला या क्षेत्रात खर्‍या अर्थाने यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाची, मेहनतीची तयारी ठेवा. हँड्स ऑन अनुभव घ्या. इथे थोड्या कालावधीत सगळ्या गोष्टी तुम्हांला येणार नाहीत. या कलेसोबत जरा वेळ घालवा. स्वतःची कला व कसब विकसित करण्याची स्वतःला संधी द्या.

तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स कसा काय ठेवता? काही विशेष रूटीन पाळता का?

माझ्या कामावर माझे अतिशय प्रेम आहे. त्यामुळे कित्येकदा खूप बिझी स्केड्यूल असले तरी मला मनासारखे काम हातात असेल तर वेळेचे भानही उरत नाही. तरी काही पथ्ये मी आवर्जून पाळते. एकतर स्वतःच्या आरोग्याबद्दल आणि जीवनशैलीबद्दल गेल्या काही वर्षांमध्ये मी खूपच सजग झाले. त्यानुसार खूपसे बदल मी ऑलरेडी रोजच्या रूटीनमध्ये केले आहेत. घरी माझ्या हाताखाली काम करायला मदतनीस आहे, त्याचा खूप फायदा होतो. घरात आम्ही कामे शेअर करतो. मला स्वतःला वेगवेगळे पदार्थ बनवायला खूप आवडतात. मी कुकिंग खूप एन्जॉय करते. वेगवेगळी डेझर्ट्स बनवणे हा माझा छंद आहे. त्यात मी निरनिराळे प्रयोग करून बघत असते. माझ्या घरचे लोकही माझे हे सर्व प्रयोग अतिशय आवडीने खातात! मी घरातून बाहेर पडायची वेळ ठराविक असली तरी घरी परतायची वेळ कधीच ठरलेली नसते. दुपारी जेवणासाठी मात्र मी आवर्जून घरी येते व लेकासोबत जेवण करते. रात्री परत यायला कधी नऊ, कधी दहा, कधी त्यापेक्षा उशीर होतो. तरी कौटुंबिक कार्यक्रम, लेकाच्या परीक्षा वगैरेंसाठी मी जरूर वेळ काढते. आमच्या परिवारात सर्वांचे वाढदिवस कुटुंबात साजरे करायची प्रथा आहे. त्यासाठी आम्ही सगळे एकत्र जमतो. माहेरी व सासरी गोतावळा भरपूर असल्यामुळे महिन्यातून एकदा तरी कोणत्या ना कोणत्या वाढदिवसासाठी एकत्र भेटणे होते, गप्पा-टप्पा, ख्यालीखुशाली होते. मुले एन्जॉय करतात. मीही रिलॅक्स होते.

मोकळा वेळ तुम्हांला कशा प्रकारे घालवायला आवडतो?

मला वाचन करायला खूप आवडते. वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके मी वाचत असते. वेगवेगळ्या उद्योजकांची चरित्रे, त्यांचे अनुभव वाचते, त्यांतून शिकायचा प्रयत्न करते. शिवाजीमहाराजांवरची पुस्तके माझी विशेष आवडती आहेत. त्यांचे चरित्र वाचताना कधीही नवा हुरूप येतो. जेव्हा मला मरगळल्यासारखे, थकल्यासारखे वाटते तेव्हा तर मी त्यांच्यावरील पुस्तके आवर्जून वाचते.
मला ट्रेकिंगचाही छंद आहे. विशेष करून हिमालयात ट्रेक्स करायला मला खूप आवडते. त्याचबरोबर माझ्या कुटुंबियांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी मनसोक्त भटकंती करायला आवडते. त्यांच्याबरोबर बाहेरगावी जायचे, टोटल चिल आऊट व्हायचे, ताजेतवाने होऊन परत यायचे हे फारच आवडते. आमची भटकंती म्हणजे बजेटमध्ये बसवलेले व काळजीपूर्वक आखलेले प्रवास, भरपूर ठिकाणे पालथी घालणे आणि सगळ्यांनी मिळून धमाल करणे अशी असते.

तुम्हांला स्वतःला कोणत्या प्रकारची फॅशन करायला आवडते?

मला आवड सगळ्याच प्रकारांची आहे. पण रोजच्या धावपळीसाठी मी जीन्स, टीशर्ट, स्पोर्ट्स शूज असा कॅज्युअल लूकच पसंत करते. कधी टीशर्ट ऐवजी कुर्ती किंवा काही नक्षीकाम केलेला टॉप वगैरे असतो. पण रोजचा प्रवास, बूटिकमध्ये किंवा बूटिकबाहेर सर्व प्रकारच्या ग्राहकांसोबत काम करायला लागणे, हाताखाली काम करणारे कर्मचारी, खरेदीसाठी बाजारात फेरी अशा अनेक तर्‍हेच्या प्रसंगांसाठी जीन्स हे माझे कंफर्ट वेअर आहे. पण अगदी पारंपरिक नऊवारी साडीपासून ते वेस्टर्न गाऊन्स, फ्यूजन वेअर, पार्टी वेअरपर्यंत अनेक तर्‍हेचे कपडे प्रसंगानुसार वापरणे, त्यानुसार सजणे मला आवडते. मी ते मस्त कॅरी ऑफही करू शकते.

या व्यवसायात मिळालेल्या अनुभवाचा तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात उपयोग झाला का? कसा झाला?

हो, मला या व्यवसायाने एक व्यक्ती म्हणून खूप काही दिले आहे. मी अगोदर स्वतःच्याच कोशात राहणारी, रमणारी होते. फक्त ओळखीच्या लोकांमध्ये मिसळायचे, गप्पा मारायचे. परंतु या व्यवसायामुळे मी लोकांशी संवाद साधायला शिकले. त्यांना बोलते करायला शिकले. आज मी कोणाशीही बोलू शकते. तो आत्मविश्वास व कौशल्य मला या व्यवसायातून मिळाले. तसेच माझा स्वभाव सरळसोट आहे. जे आहे ते फटकन बोलणार असा! पण इथे या क्षेत्रात तसे बोलून चालत नाही. त्यामुळे आपला मुद्दा नम्रपणे, गोड बोलून मांडायचे कौशल्यही मला इथेच आत्मसात करावे लागले. ग्राहकांसोबत काम करताना अनेकजण त्यांच्या आयुष्यातील प्रसंग, घटना, किस्से सांगतात. मी त्यामुळे एक चांगली श्रोती झाले आहे. त्यांच्यातील काहींच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल ऐकले की मला माझ्या आयुष्यातला संघर्ष अगदीच क्षुल्लक वाटू लागतो.

फॅशन डिझायनिंग क्षेत्रात येणार्‍या नवोदितांना काय सल्ला द्याल?

तुम्हांला या क्षेत्रात भरपूर संधी आहे. अवश्य या. इथे अनुभव महत्त्वाचा आहे. संयम, धीर महत्त्वाचा आहे. यश टप्प्याटप्प्यानेच मिळत असते. त्यासाठी मेहनतीची तयारी ठेवा. इथे टिकून राहायचे असेल तर स्वतःला डेव्हलप करत राहा. तुम्ही स्वतःला जेवढे डेव्हलप कराल तेवढ्या नवनव्या संधी तुमच्या समोर येत जातील. आपल्याकडे खूप सार्‍या कलांचा खजिना आहे. काही कला लोप व्हायच्या मार्गावर आहेत. शक्य असेल तर या कला शिकून घ्या. कल्पनाशक्तीला भरपूर वाव द्या. भविष्याबद्दल जरूर स्वप्ने बघा. उघड्या डोळ्यांनी स्वप्ने बघा. म्हणजे ती बघताना प्रॅक्टिकलीही विचार करा. प्रॅक्टिकली विचार करताना स्वप्ने बघणे थांबवू नका.

**********************************************************************************

(सर्व प्रकाशचित्रे शीतल बानावळकर यांच्या संग्रहातून साभार.
डिझायनर साडी शो फोटोग्राफर - अतुल सिधये)

मुद्रितशोधन साहाय्य - बिल्वा

(समाप्त)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त झालीय मुलाखत. एका वेगळ्या क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलेची सुंदर ओळख.

छान मुलाखत व व्यक्तिमत्व. धन्यवाद अकु. त्या भारतीय स्त्रियांसाठी जीन्स डिजा इन करणार्‍या बाईंची पण माहिती मिळेल का? माझे काका हरिभाउ घाटे पण साधारण ह्यांच्या आजोबांच्य काळातच टेलरिंगचे दुकान
चालवत. पुण्यात शगुनच्या समोरील बोळात ते दुकान होते. त्या़ंची आठव्ण झाली.

छान मुलाखत.
इतक्या लहान वयात आयुष्यात काय करायचे ते सापडले व त्याचबरोबर त्यावेळेस ऊत्तम मार्गदर्शनही मिळाले.

स्फुर्तीदायक प्रवास आणि व्यक्तिमत्व! शीतल यांना अनेक शुभेच्छा.
अकु, सुरेख घेतलीयेस मुलाखत.

मुलाखत छानच झालीये कारण अशा मुलाखती घेण्यात आणि त्या मुद्देसूद लिहिण्यात तुझा हातखंडा आहे अकु :). शीतल बानावळकर कोलवाळकरांचं व्यक्तिमत्व, एकूण प्रवास आणि कामाची पद्धत प्रेरणादायी आहे!

मस्त मुलाखत अकु Happy महिला दिनासाठी अगदी सुयोग्य मुलाखत!!
शीतल यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे.त्यांना खूप खूप शुभेच्छा!!

मुलाखत आणि शब्दांकन अतिशय आवडलं.
शितल बानावळकर किती डाउन टू अर्थ आहेत ते मुलाखतीवरून समजलं.
अकु थँक्स, ग्रेट व्यक्तिची इथे ओळख करून दिल्याबद्दल.

त्यांचं बुटिक नक्की कुठे आहे त्याची महिती मिळेल का?

सर्वांचे प्रतिसादासाठी मन:पूर्वक आभार!

दक्षिणा, मुलाखतीत लिहिलंय तसं त्यांचं बूटिक कर्वेनगर (हिंगणे बुद्रुक) येथे गिरिजाशंकर विहार काँप्लेक्समध्ये आहे. मेन रोडला लागूनच आहे. लगेच सापडेल. कुमार पार्क सोसायटीजवळ आहे.

अनेकांनी व्यक्तिश: संदेश पाठवून मुलाखत आवडल्याचे कळवले आहे. त्या सर्व मडळींचे आभार!

अकु, इतक्या धडाडीच्या, छान व्यक्तीमत्वा ची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद तुझे..

खरंच किती डाऊन टू अर्थ आहे शीतल, खूप कौतुक वाटलं !!

तिचा प्रवास खडतरच झाला असणार पण तरीही फ्रेश , हसतमुख असल्यामुळे शीतल, फार आवडली.

अकु, मुलाखत मस्तच झाली आहे.
मुलाखती घेण्यात आणि त्या मुद्देसूद लिहिण्यात तुझा हातखंडा आहे अकु >> +१ Happy

Pages

Back to top