दिशाभूल आपली आणि तुकोबांचीही ???

Submitted by पुरंदरे शशांक on 28 December, 2014 - 22:09

दिशाभूल आपली आणि तुकोबांचीही ???

या जगात दिशाभूल कोणाची होत नाही - माझी, तुमची, सर्वांचीच - इतकेच काय प्रत्यक्ष तुकोबांचीही दिशाभूल झालेली ते या अभंगात सांगताहेत ...

तुम्हीं जावें निजमंदिरा । आम्ही जातों आपुल्या घरा ॥१॥
विठोबा लोभ असों देई । आम्ही असों तुमचें पाई ॥ध्रु.॥
चित्त करी सेवा । आम्ही जातों आपुल्या गावां ॥२॥
तुका म्हणे दिशा भुलों । फिरोन पायापाशीं आलों ॥३॥अभंगगाथा ५१०||

तुकोबांच्या वेगवेगळ्या अभंगातून त्यांच्या अंतरींचे जे विविध भाव प्रगट होतात ते सारेच्या सारे मोठे गोड, मधुर वाटतात. भगवंतावर इतके प्रेम कोणी करु शकेल का असे जर आजमितीला कोणाला वाटत असेल तर त्याने बुवांच्या अभंगांचा नीट अभ्यास करावा इतकेच म्हणू शकेन मी ..

संध्याकाळची वेळ असावी. बुवा त्यांच्या घराशेजारील विठ्ठल मंदीरात पंचपदीला आले असावेत. नित्याचे पठण वगैरे झाल्यावर ते पांडुरंगाला म्हणत असतील - देवा, आता रात्र होऊ घातलीये, तुम्ही तुमच्या मंदीरात विश्रांती घ्या आणि मीही आता घरला जातो कसा ... पण तिथून त्यांचा पाय निघत नाहीये - ते सगुण रुपडे डोळ्यात, ह्रदयात साठवताना त्यांची जरा उलघालच होतीये - उद्या सकाळपर्यंत आता दर्शन होणार नाही म्हणून परत परत ते देवाच्या पायी मस्तक ठेवत असावेत, म्हणत असावेत - तुमचा लोभ, प्रेम असू द्यावे - आता तुमचे सगुण दर्शन सकाळ पर्यंत नाही त्यामुळे माझे चित्तच तुमची आठवण काढेल, तुमची काही सेवा करेल ...- कशी ही आर्त विनवणी, कसे हे जगावेगळे प्रेम ...

असे म्हणून बुवा देवळाबाहेर पडले असतील ते विठ्ठलस्मरणातच ... मग घराकडे वळलेली पाऊले पुन्हा त्या विठ्ठल-मंदीराकडे कशी वळली हे त्यांचे त्यांनाच समजले नसावे - एखाद्याची दिशाभूल व्हावी तसे ते काही वेळाने पहातात तो काय - पुन्हा विठ्ठलासमोरच उभे !! - आणि आता तेच बुवा कौतुकाने म्हणताहेत (बहुतेक विठ्ठलही गालातल्या गालात हसत असेल..) - दिशाभूल झाली खरी पण परत तुमच्याच पायांपाशी आलो...

खरंच, किती मधुर भाव उमटतो हे सारे त्या भावात जाऊन वाचताना, चिंतन करताना - धन्य आहे बुवा तुमची आणि किती नावाजावे तुम्हाला - की हे सारे सारे अद्वितीय भावही शब्दबद्धही करुन ठेवलेत तुम्ही - माझ्यासारख्या संसाराच्या वेडात रमलेल्यांना हे कधीतरी कळेल का .....
(किती वेगवेगळ्या अडचणींमधे सापडलेला मी ....या जगासाठी/ऐहिकासाठी ठार वेडा झालेला मी - कधीतरी, अगदी कल्पनेत तरी जाणू शकणार का हे तुमचे हे जगावेगळे वेड ??)

दिशाभूल झालेले बुवा पुन्हा पुन्हा विठ्ठलचरणांशी ओढले जातात आणि दिशाभूल झालेले आपण सारे पुन्हा पुन्हा या निरर्थक संसारात ओढले जातो एवढाच काय तो आपल्यात आणि बुवांमधला फरक ,,,,,

या अभंगाकडे जरा वेगळ्या नजरेने पाहू गेलं तर - कधी देहभावावर असणारे बुवा, तर कधी आत्मभावावर असणारे कसे असतील याची चुणुक दाखवणारा हा अभंग आहे हे लक्षात यावे. कधी कधी बुवा देहभावात येऊन पूजा-अर्चा, नामस्मरण-किर्तन वगैरे करीत असतील तर कधी डोळे मिटून अंतरात त्या पांडुरंगाला पहात असतील.
भगवंताशी एकरुप होऊन (शिवो भूत्वा शिवं यजेत) त्याची भक्ति करणारा विरळा भक्त म्हणजे बुवा.
श्रवणं कीर्तनं विष्णोस्मरणं पासून सुरुवात करुन आत्मनिवेदनापर्यंत काय त्यापलिकडेही मजल गाठलेले बुवा - या नवविधा भक्तिच्या विविध पायर्‍या बुवा प्रत्यक्षात कशा लीलया चढ-उतर करीत असतील याची अपार जिज्ञासा मनात दाटून येते ...

-------------------------------------------------------------

कोण पर्वकाळ पहासील तीथ । होतें माझें चित्त कासावीस ॥१॥
पाठवीं भातुकें प्रेरीं झडकरी । नको राखों उरी पांडुरंगा ॥ध्रु.॥ ( भातुकें = खाऊ)
न धरावा कोप मजवरी कांहीं । अवगुणी अन्यायी म्हणोनियां ॥२॥
काय रडवीसी नेणतियां पोरां । जाणतियां थोरां याचिपरी ॥३॥
काय उभी कर ठेवुनियां कटीं । बुझावीं धाकुटीं लडिवाळें ॥४॥ (बुझावणे = समजूत काढणे)
तुका म्हणे आतां पदरासी पिळा । घालीन निराळा नव्हे मग ॥५॥५२८||

बुवांचे लहानगे मूल - काशी किंवा म्हादू -- त्यांच्या मायेपाशी काही हट्ट करीत असतील - आणि तो हट्ट ती माय पुरा करीत नाही हे लक्षात आल्यावर तिच्यापाशीच रडत-भेकत असतील - आणि ती माय तशीच पुढे चाललीये हे पाहून तिच्या पदराला पिळे देत तिच्यामागे रडत-ओरडत चालली आहेत हे पाहून का बुवांना हे स्फुरले असावे !!!

पांडुरंगाला कळवळून बुवा म्हणताहेत - अरे पांडुरंगा, आता कुठली तिथी पाहून वा कुठला पर्वकाळ पाहून मला दर्शन देणार आहेस बाबा ?? माझे चित्त कसे कासाविस झाले आहे तुझ्या दर्शनाशिवाय !!!
अरे, तू नाहीस तर निदान तुझ्या प्रेमाचे भातुके (खाऊ) तरी पाठव की रे...
माझ्यावर असा रागेजू नकोस रे, मान्य आहे की मी अतिशय अवगुणी आहे, अन्यायी आहे खरा (कारण तुझे दर्शन होण्याची माझी लायकी नाहीये हे मला माहित आहे - अनन्यशरण भक्ताला आपले दोष पूर्णपणे जाणवत असतात व यातून स्वप्रयत्नाने काही सुटका नाही म्हटल्यावर तो देवाला अनन्यशरण जाऊन हे म्हणत असतो).
जसे तू जाणत्या, थोर मंडळींना दूर ठेवतोस तसे मला का दूर लोटतोस ?? मी तर अगदीच नेणता आहे, लहानगे आहे - मला का रडवतो आहेस रे ?
तू तर माझी माय - मला जवळ घेऊन, कुरवाळून, लडिवाळपणे माझे सांत्वन करायचे सोडून तू आज हे नुसता कमरेवर हात ठेऊन का उभा आहेस रे ??
अरे, मी एवढा आकांत करतोय आणि तू तस्साच मला न विचारता चालू लागलास तर - तर तुझ्या पदराला पिळे देत देत मी तुझ्या मागे येईन हां ....

आपल्या ह्रदयाला जणू पीळ घालावा तसे हे आर्त लेवून उभे ठाकलेले अभंग - कशी उत्कटता होती बुवांच्या ठायी, कसे आळवत असतील, कसे अनन्यशरण होत असतील बुवा...

आणि असे आर्तभरले अभंग पहात असतानाच एकदम पुढे ठाकतात बुवांचे हे असे आवेशभरले अभंग - प्रत्यक्ष देवालाही सुनावणारे परखड बुवा, एक वेगळेच रुप धारण केलेले बुवा....
.
.
.

आम्ही मागों ऐसें नाहीं तुजपाशीं । जरीं तूं भीतोसि पांडुरंगा ॥१॥
पाहें विचारूनि आहे तुज ठावें । आम्ही धालों नावें तुझ्या एका ॥ध्रु.॥ ( धालों = आनंदलो )
ॠद्धिसिद्धि तुझें मुख्य भांडवल । हें तों आम्हां फोल भक्तीपुढें ॥२॥
तुका म्हणे जाऊं वैकुंठा चालत । बैसोनि निश्चिंत सुख भोगू ॥३॥५३१||

आता इथे दृष्टीसमोर येतात ते अतिशय निर्भिड, नि:स्पृह बुवा - देवालाही बजावायला कमी करीत नाहीत ....

अरे, तू मला का भितोस ते मला तरी पक्के ठावकी आहे -कारण मी जे मागणारे ते तुजपासी नाहीच्चे म्हटल्यावर तू मला भिणार हे ओघाने आलेच की ... हे तू स्वतःलाच विचारुन का पाहिनास !!
तुझ्या एका नामानेच मला आनंदाचे इतके भरते येते की त्यापुढे सारे ऐहिक आणि ॠद्धिसिद्धि तुच्छ आहेत रे.

(इथे एक लक्षात घ्यायला पाहिजे की बुवा नामस्मरण "करीत नव्हते" तर ते स्मरण त्यांना सहजच होत होते - अंतरात तो विठ्ठल इतका काठोकाठ भरलेला होता की मुखावाटे ते नाम हिंदकळून जणू बाहेर येत होते - असे विलक्षण नामस्मरण....)

तुझ्यापाशी मुख्य भांडवल आहे ते ॠद्धिसिद्धिंच्या स्वरुपातले - आणि मला तर ते ज्ञानोत्तर भक्तिपुढे अगदी फोल आहे रे ..
(जे बाकीचे 'सो कॉल्ड भक्त' मागत असतात ते एकतर ऐहिकातले किंवा फारच झाले तर ॠद्धिसिद्धिं या स्वरुपातले - पण बुवांना तर अद्वैत भक्तिमुळे यातील फोलपणा कळला आहे - हे ऐहिक तर सारेच्या सारे नाशिवंत आहे आणि केवळ भक्तिलाच अमरत्व आहे )

यातील शेवटचा भाग तर फारच बहारीचा आहे -

अरे, तुला म्हणून सांगतो हे ॠद्धिसिद्धिचे सोडूनच दे, त्या तुझ्या वैकुंठातही मला असा सरळ सरळ प्रवेश आहे, तो तर माझा हक्कच आहे - तिथे राहून अतिशय निश्चिंतपणे मी सुख भोगणार आहे .... काय शामत आहे या महापुरुषाची - थेट त्या ब्रह्मांडकर्त्यालाच सुनावताहेत हे बुवा - जे आधी अगदी हीन-दीन वाटणारे बुवा ते हेच की काय असा आपल्याही प्रश्न पडावा !!

एकदा का बुवांनी आपले मन-चित्त व्यापले तर मग काही खरे नाही - त्यांच्या त्या अमृतालाही फिक्या पाडणार्‍या वाणीत असे सामर्थ्य आहे की वाळून कोरड्या पडलेल्या आपल्या मनालाही या दिव्य भक्तिचा कोवळा अंकुर फुटावा ... बुवांएवढा जरी नाही तरी त्या लक्षांशाने का होईना आपल्या चित्तात काही पालट घडला तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच ..... एरव्ही या संसार-वाळवंटातील वाळू जन्मजन्म उकरुन काय मोठे लागणार आहे हाताला ???

---------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहा! फार छान वाटते तुमचे लेख वाचून! ह्या ओव्यांचे मर्म समजल्याने त्यांची अवीट गोडी अधिक कळून येते! शतशः आभार!

वाह अप्रतिम, सुंदर, काय जबरदस्त लिहिता !!! Happy _/\_
पण दुर्दैवाने अनेक लोक आजकाल गाभ्याकडे लक्ष न देता, फोलकटाचा चिवडा करण्यात दंग असतात. Sad

शशांक, खूप छान लिहिताय Happy बाळ होऊन विठूमाऊलीच्या अंगाखांद्यावर खेळणं हे संतमंडळीच जाणोत. जरा दूर जायला बघतील की पुन्हा उलटं फिरुन त्या विठ्ठलाच्या पायात पायात येणार Lol

बुवा त्यांच्या घराशेजारील विठ्ठल मंदीरात पंचपदीला आले असावेत.>>> हे मंदिर अजूनही आहे ना?

दिशाभूल झालेले बुवा पुन्हा पुन्हा विठ्ठलचरणांशी ओढले जातात आणि दिशाभूल झालेले आपण सारे पुन्हा पुन्हा या निरर्थक संसारात ओढले जातो एवढाच काय तो आपल्यात आणि बुवांमधला फरक ,,,,,>>>> फरक तर राहणारच. फक्त आपण हा संसारही त्या परमात्म्यानेच सोपवलेली जबाबदारी आहे ह्या भावनेने करावा. संसार म्हणजे नुसता कौटुंबिक प्रपंच नव्हे, तर जे काही अवती भवती आहे ते सर्वच. त्या संसारातले वेगवेगळे रोल भगवंताचे काम म्हणून केले की सगळं सोप्पं होतं.

शशांक....इतके सुंदर लिखाण वाचल्यावर मनी एकच भावना दाटते....ती म्हणजे अमृतालाही फिकी पाडू शकणारी ती वाणी....आणि ज्यांच्या नशिबी ती प्रत्यक्ष ऐकायला मिळणे लिहिले होते त्याना काही न करताही मोक्षप्राप्ती झाली असेल. बुवांच्या लेखणीचे आणि वाणीचे अमरत्व किती वादातीत आहे हे तुमच्या विचारातील प्रत्येक ओळीतून प्रकट झाले आहे आणि ते वाचण्याचे भाग्यही आम्हाला लाभले म्हणजे कुठलेतरी पूर्वसंचीत पुण्य पदरी असणार याची पावती मिळाली.

तुकोबारायांनी निर्वाणाचा शोध घेतला की नाही, ध्यानाचा, समाधीचा शोध त्यानी घेतला वा ना घेतला यावर कितीही मत झडोत पण त्या ईश्वराचा शोध आपल्या वाणीतून घेताना त्यानी केलेला मोक्षप्राप्तीचा प्रवास, त्याचा अभ्यास असा व्हावा असेच वाटते मला....चित्तात पालट होणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर संसाररुपी सागरातील वाळू उपसणेही....ते तर आपण करीत असतोच, पण त्याचवेळी बुवांचे स्मरण अशा लेखातून तुम्ही करत राहता त्याला अमूल्य असे महत्त्व आहे.

हे फार मोलाचे आहे म्हणून निवांत वाचू म्हणून राहूनच जात होते.आज योग आला अखेर . फारच प्रासादिक लिहिले आहे .ग्रेट