अवघी विठाई माझी (३) - वेलवांगे - Chayote
या वरच्या फ़ोटोतल्या भाजीबद्दल जरा गंमतच आहे.
हि भाजी, मुंबईत अनेक भाजीवाल्यांकडे असते. पण मराठी लोक ती घेताना वा खाताना दिसत नाहीत.
तशा, टिंडे, (ढेमसे), लसोडे( भोकरे) परवर याही भाज्या मुंबईत विकायला असतात, पण त्यादेखील
मराठी लोकांत फ़ारशा खाल्या जात नाहीत.
आमच्या शेजारच्या दाक्षिणात्य मामींनी ही भाजी आणलेली मी बघितली होती. त्यांनी अर्थातच तिचे
सांबार केले. नाव विचारले, तर त्यांनी चक्क वांगे म्हणून सांगितले. सांबारातच घातल्याने, भाजीची
वेगळी अशी काही चव लागली नव्हती.
मग बर्याच वर्षांनी हि भाजी एका गुजराथी, भाभी कडे खाल्ली, भाजीचे नाव विचारल्यावर, त्या
म्हणाल्या, हम तो इसको छोटा दुधी बोलते है ना दिनेसभाय !!, थोडक्यात या भाजीच्या मराठी नावाबद्दल माझा संभ्रम कायम आहे. (इथे कुणाला माहीत असेल, अवश्य कळवा, मी शीर्षक बदलीन. आभार मेघा !)
मग शेवटी मीच प्रयोग करायचे ठरवले. साधारण इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर आणि प्रयोगानंतर,
कुठल्या भाजीचे काय करता येईल, याबद्दलचे माझे अंदाज सहसा चुकत नाहीत.
तर ही भाजी बघून घेताना, शक्यतो मध्यम आकाराचे फ़ळ घ्यावे. ते पोपटी रंगाचे असावे, पांढरट वा पिवळसर पडलेले नसावे. पण याच भाजीची पिवळसर फ़ळांची पण जात असते. पण ती भारतात
बघितल्याचे आठवत नाहि.
हिचे साल थोडे चामट असते व ते काढावे लागते.(अगदी कोवळे फळ असेल तर सालासकट खाता येते) त्यावर थोडे केसदेखील दिसतात. ते काढल्यावर भाजी उभी कापावी. आत चक्क कोय असते. (या भाजीची आणखी एक मजा म्हणजे हेच फ़ळ आणि हेच बी. भाजी घरी ठेवली तर याला चक्क कोंब येतो. हि अख्खीच पेरतात. शिराळ्या दोडक्याप्रमाणे याचा वेल असतो. पांढरी फ़ूले गुच्छात लागतात. ती चांदणीसारखी दिसतात. पण प्रत्येक पेरात सहसा एकच फ़ळ धरते. फ़ळे लागलेला वेल, याच्या चमकदार रंगामूळे, शोभिवंत दिसतो. याची चव आवडली तर घराच्या बाल्कनीत अवश्य लावा. शोभेपरी शोभा आणि शिवाय दारची भाजी मिळेल. नर आणि मादी वेल वेगवेगळे असतात.)
तर हे फ़ळ कापल्यानंतर कोयीचा भाग वगळून, याच्या फ़ोडी करा. (कोय खाल्ली तरी चालते, मऊ असली तर ती पण वापरता येते.)
तूपाची हिंग, जिर्याची फ़ोडणी करा, त्यात लाल मिरच्या व आंबटपणासाठी टोमॅटो टाका. तो शिजला
कि या भजीच्या फ़ोडी टाका. झाकण ठेवून भाजी शिजू द्या. हवे असतील तर दाणे वा काजू टाका,
मीठ व ओले खोबरे टाका. (मी नारळाचे दूध वापरले आहे)
याची चव थोडीफ़ार कोहळ्यासारखी लागते आणि या पद्धतीने केली तर चवदार लागते. मला वाटते
मोडाच्या कडधान्याबरोबर (जसे मटकी, मूग ) हिचा संयोग चांगला लागेल. किसून पिठ पेरुन पण भाजी होईल. हलवा पण चांगला लागेल (भाजीला स्वत:ची गोडसर चव असते. कडवट्पणा वा तूरटपणा नसतो.)
या भाजीचे मूळ मध्य अमेरिकेत मानतात, पण जगभर तिचा प्रसार झालेला आहे. वर उल्लेख केला
आहे त्याप्रमाणे दक्षिण भारतात ती खाल्ली जातेच. तेलगू मधे वांगेकाई, कन्नड मधे सीमेबदेनकाई आणि
तामिळ मधे चोचो अशी नावे आहेत. उत्तर भारतात, लंकू किंवा इश्कूस अशी नावे आहेत. पण
आपल्याकडे तिचा प्रसार का झाला नाही ते कळत नाही. पण अगदी अरब जगत सोडले तर जगभर
ही भाजी खातात. (चायोट हा शब्द स्पेनमधला. मध्य व दक्षिण अमेरिकेतून त्यांनीच तो बाहेर नेला.)
पेअर सारखी दिसते म्हणून त्यावरुन पण काहि नावे आहेत. सेश्यूयम एड्य़ुल असे हिचे शास्त्रीय नाव. इंग्लीशमधे क्रिस्तोफ़ेन असे पण नाव आहे.
ही भाजी कच्ची पण सलाद मधे वापरता येते, या वेलाची मूळे मांसल असतात आणि ती पण
खातात. वेलीच्या कोवळ्या पानांची पण भाजी करतात.
या भाजीत अमिनो आम्ल व क, ब६ जीवनस्त्व असतेच, हृदयासाठी, किडनीसाठी भाजी चांगली, पानांचा
काढा, किडनी स्टोनवर वापरतात. सोडीयमची मात्रा खुपच कमी, तांबे, मँगनीज, पोटॅशियम सारखी
खनिजे असतात.
एकंदर फायदेशीर भाजी आहे. बघा एकदा खाऊन.
आमच्या इथे कधी दिसली नाही अशी
आमच्या इथे कधी दिसली नाही अशी दिसणारी भाजी . आत्ता जरा शोधक नजरेन बघायला पाहिजे.
तयार भाजी दिसायला मात्र बर्यापैकी दुधी भोपळ्यासारखी दिसतेय
आज त्याची भाजी केली. किसुन
आज त्याची भाजी केली.
किसुन परतले व त्यात बेसन पीठ घातले.
जरा उग्र वास येतो. घट्ट पिठल्यासारखे झाले.
दुसरे आहे ते नुसतेच कापुन खाणार आहे.. फोडी करुन काकडीसारखे खाणे. किंचित गोडसर चव असते.
त्याचा मोठा भाग आहे त्यात कोय निघाली
ही भाजी हुबळीला खाल्लीय. मटकी
ही भाजी हुबळीला खाल्लीय. मटकी घालून केलेली होती. भाजीची म्हणून विशेष काही चव जाणवली नाही - मसाला अणि मटकीचाच स्वाद जास्त जाणवला! कितीही खडबडीत असलं तरी अगदी सगळं साल तासून काढलेलं होतं तिथे. साल काढतांना चिकट रसही निघाला. वर म्हटलंय तसं "सीमेबदनेकाय" म्हणतात याला तिथे.
Pages