अवघी विठाई माझी (४) - स्नो पीज / शुगर स्नॅप्स

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

snow peas.jpg

सध्या भारतात बाजारात हिरवे वाटाणे (पूणेकरांसाठी मटार ) यायला लागले असतील.
हिरव्या वाटाण्याची उसळ म्हणजे आपली खासियत. झालेच तर पॅटीस, करंज्या, वड्या,
गुपचूप बटाटे.. नूसत्या यादीनेच तोंडाला पाणी सुटते.

आपल्याकडे बाजारात दोन प्रकारचे वाटाणे दिसतात. एक पुणेरी आणि दुसरे दिल्लीचे.
दिल्लीचे जरा जास्तच गोड लागतात. सोलता सोलता कोवळे दाणे तोंडात टाकायचा
मोह होतोच. या जातीच्या साली पण मांसल असतात आणि त्याची भाजी पण करतात.
पण ही भाजी करताना, त्याचा चामट पातळ पापुद्रा काढणे, अत्यंत जिकिरीचे होऊन
बसते, आणि त्यात बराच वेळ जातो.

साली पण खाता याव्यात अशा जातिचा विकास करण्यात आला, आणि स्नो पीज
निर्माण झाल्या. या मटाराच्या शेंगाच, पण यातले दाणे अगदीच छोटे असतात. आकाराने
पुर्ण वाढल्या तरी त्यात चोथा (फ़ायबर) निर्माणच होऊ नये, अशा रितीने या जातीचा
विकास करण्यात आला आहे. आतील दाण्यांचा फ़ुगवटा दिसू लागल्याबरोबर या खुडल्या
जातात. या नीट करताना, असलाच तर (आणि तो सहसा नसतोच) दोर काढावा लागतो,
बाकी काही टाकायची गरज नसते, पूर्णपणे या खातात. सोलायची पण गरज नसते. या
शेंगा जवळ जवळ सपाटच असतात. शिजायला अगदी थोडा वेळ पूरतो. स्टर फ़्राय, सूपमधे
आणि बाकि अनेक पदार्थात वापरता येतात.

snow peasa.jpg

इथे मी त्या बुश बीन्स सोबत ऑलिव्ह तेलात परतल्या आहेत. वरुन थोडी मिरपुड शिवरली
आहे.

sugar snaps.jpg

स्नो पीज ने पण समाधान न झाल्याने, शुगर स्नॅप्स विकसित केल्या गेल्या. या अगदी आपल्या
शेंगांप्रमाणे फ़ुगीर असतात, पण यांचा फ़ुगीरपणा, दाण्यांपेक्षा सालींमूळेच आलेला असतो.
या साली नावाप्रमाणेच खूप गोड लागतात. अगदी कच्च्याही खाता येतात. तशाही त्या गोड
लागतात. अगदी कुरकुरीत (क्रंची) असतात.(या शेंगा पण अगदी कोवळ्या असतानाच खुडतात.
पुढे त्यांचा गोडवा कमी होतो. सालीतील साखरेचे पिष्टमय पदार्थात रुपांतर होत जाते.)
शिजवल्या तर अगदी थोडा वेळ शिजवाव्यात. पाण्यात शिजवल्या तर दोन तीन मिनिटात
शिजतात. तेलात परतल्या तरी तेवढ्याच वेळात शिजतात.

sugar snapsa.jpg

वरच्या डिशसाठी मी त्यांचे तिरपे तूकडे करुन घेतले आहेत. पाण्यात शेल पास्ता शिजवत ठेवला.
तो पुर्ण शिजायला दोन तीन मिनिटे असताना, वरील शेंगाचे तूकडे घातले, मीठ घातले.
मग त्याच पाण्यात व्हाईट सॉस करुन घेतला. (खाली त्याचीही कृति देतोय.) खायच्या आधी वरून मिरपुड शिवरली. सजावटीसाठी नट्स, क्रॅनबेरीज आणि ब्लॅक करंट्स (मनुका) वापरल्या. थोड्या
मिक्स्ड हर्बज वापरल्या.

sugar snapsb.jpg

या शेंगाचे तूकडेही करायचे नसतील तर त्या, तश्याच चीज सॉसमधे शिजवता येतात. (हव्या तर
आधी थोड्या वाफ़वून घ्या.) मग वरुन केचप, ऑलिव्ह बटर, मिरपूड आणि हर्बज टाका. यावरच
वरुन थोडे चीज टाकून थोडे ग्रील पण करता येईल.
शुगर स्नॅप्स च्या पदार्थात, त्यांचाच स्वाद जास्त खुलून येतो.
(व्हाईट सॉस आवडत असेल, आणि वारंवार वापरायचा असेल, तर त्याचे ड्राय मिक्स करता येते.
एक टेबलस्पून बटर गरम करुन त्यात दोन टेबलस्पून मैदा वा कणीक परतून रवाळ करुन घ्या.
मूळ फ़्रेंच पद्धतीत, मैदा पांढराच ठेवायचा असतो, पण मला स्वत:ला तो जरा खमंग आवडतो.
मग त्यात दोन टेबलस्पून मिल्क पावडर टाकून, किंचीत परतून सगळे नीट मिसळून घ्या.
आवडीप्रमाणे मिरपुड व जायफ़ळ पुड टाका. आणि हे कोरडे मिश्रण घट्ट झाकणाच्या डब्यात, फ़्रिजमधे ठेवा. आयत्यावेळी, हे मिश्रण, थोड्या पाण्यात नीट घोळून घ्या आणि उकळत्या पाण्यात टाका.)

आपल्याकडे मटार सोलताना सालींचा कचरा किती होतो ते आपण बघतोच. वजनाचा आणि
आकारमानाचा बराचसा भाग हा सालीचाच असतो. आपल्याकडे या दोन्ही भाज्यांची लागवड
व्हायला हवी. त्या नक्कीच लोकप्रिय होतील. (भारतात मिळायला लागल्या का?)
साधारण थंड हवामानात यांचे उत्पन्न चांगले होते. यांचे फ़्रेंच नाव अर्थपूर्ण आहे. मॅन्गेटाऊट
(उच्चाराबद्दल खात्री नाही. ) म्हणजे "सगळेच खा" !! यांचे शास्त्रीय नाव पिसम सॅटिवम.
ही जात विकसित करण्याचे श्रेय डॉ लॅम्बर्न आणि डॉ पार्क यांना आहे.

विषय: 
प्रकार: 

सही!
मी आत्ता टाकलेल्या, म्हणजे मायबोलीवर रेसीपी टाकलेल्या, थाई स्टर फ्राय मध्ये शुगर स्नॅप्सच वापरले होते. मस्त लागतात!

मस्त दिसतेय. पास्ता नक्की करून बघणार. व्हाइट सॉस च्या कोरड्या पावडरीचे पेटंट घ्यावे. तो ही करून बघणार.