अवघी विठाई माझी (३) - वेलवांगे - Chayote
या वरच्या फ़ोटोतल्या भाजीबद्दल जरा गंमतच आहे.
हि भाजी, मुंबईत अनेक भाजीवाल्यांकडे असते. पण मराठी लोक ती घेताना वा खाताना दिसत नाहीत.
तशा, टिंडे, (ढेमसे), लसोडे( भोकरे) परवर याही भाज्या मुंबईत विकायला असतात, पण त्यादेखील
मराठी लोकांत फ़ारशा खाल्या जात नाहीत.
आमच्या शेजारच्या दाक्षिणात्य मामींनी ही भाजी आणलेली मी बघितली होती. त्यांनी अर्थातच तिचे
सांबार केले. नाव विचारले, तर त्यांनी चक्क वांगे म्हणून सांगितले. सांबारातच घातल्याने, भाजीची
वेगळी अशी काही चव लागली नव्हती.
मग बर्याच वर्षांनी हि भाजी एका गुजराथी, भाभी कडे खाल्ली, भाजीचे नाव विचारल्यावर, त्या
म्हणाल्या, हम तो इसको छोटा दुधी बोलते है ना दिनेसभाय !!, थोडक्यात या भाजीच्या मराठी नावाबद्दल माझा संभ्रम कायम आहे. (इथे कुणाला माहीत असेल, अवश्य कळवा, मी शीर्षक बदलीन. आभार मेघा !)
मग शेवटी मीच प्रयोग करायचे ठरवले. साधारण इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर आणि प्रयोगानंतर,
कुठल्या भाजीचे काय करता येईल, याबद्दलचे माझे अंदाज सहसा चुकत नाहीत.
तर ही भाजी बघून घेताना, शक्यतो मध्यम आकाराचे फ़ळ घ्यावे. ते पोपटी रंगाचे असावे, पांढरट वा पिवळसर पडलेले नसावे. पण याच भाजीची पिवळसर फ़ळांची पण जात असते. पण ती भारतात
बघितल्याचे आठवत नाहि.
हिचे साल थोडे चामट असते व ते काढावे लागते.(अगदी कोवळे फळ असेल तर सालासकट खाता येते) त्यावर थोडे केसदेखील दिसतात. ते काढल्यावर भाजी उभी कापावी. आत चक्क कोय असते. (या भाजीची आणखी एक मजा म्हणजे हेच फ़ळ आणि हेच बी. भाजी घरी ठेवली तर याला चक्क कोंब येतो. हि अख्खीच पेरतात. शिराळ्या दोडक्याप्रमाणे याचा वेल असतो. पांढरी फ़ूले गुच्छात लागतात. ती चांदणीसारखी दिसतात. पण प्रत्येक पेरात सहसा एकच फ़ळ धरते. फ़ळे लागलेला वेल, याच्या चमकदार रंगामूळे, शोभिवंत दिसतो. याची चव आवडली तर घराच्या बाल्कनीत अवश्य लावा. शोभेपरी शोभा आणि शिवाय दारची भाजी मिळेल. नर आणि मादी वेल वेगवेगळे असतात.)
तर हे फ़ळ कापल्यानंतर कोयीचा भाग वगळून, याच्या फ़ोडी करा. (कोय खाल्ली तरी चालते, मऊ असली तर ती पण वापरता येते.)
तूपाची हिंग, जिर्याची फ़ोडणी करा, त्यात लाल मिरच्या व आंबटपणासाठी टोमॅटो टाका. तो शिजला
कि या भजीच्या फ़ोडी टाका. झाकण ठेवून भाजी शिजू द्या. हवे असतील तर दाणे वा काजू टाका,
मीठ व ओले खोबरे टाका. (मी नारळाचे दूध वापरले आहे)
याची चव थोडीफ़ार कोहळ्यासारखी लागते आणि या पद्धतीने केली तर चवदार लागते. मला वाटते
मोडाच्या कडधान्याबरोबर (जसे मटकी, मूग ) हिचा संयोग चांगला लागेल. किसून पिठ पेरुन पण भाजी होईल. हलवा पण चांगला लागेल (भाजीला स्वत:ची गोडसर चव असते. कडवट्पणा वा तूरटपणा नसतो.)
या भाजीचे मूळ मध्य अमेरिकेत मानतात, पण जगभर तिचा प्रसार झालेला आहे. वर उल्लेख केला
आहे त्याप्रमाणे दक्षिण भारतात ती खाल्ली जातेच. तेलगू मधे वांगेकाई, कन्नड मधे सीमेबदेनकाई आणि
तामिळ मधे चोचो अशी नावे आहेत. उत्तर भारतात, लंकू किंवा इश्कूस अशी नावे आहेत. पण
आपल्याकडे तिचा प्रसार का झाला नाही ते कळत नाही. पण अगदी अरब जगत सोडले तर जगभर
ही भाजी खातात. (चायोट हा शब्द स्पेनमधला. मध्य व दक्षिण अमेरिकेतून त्यांनीच तो बाहेर नेला.)
पेअर सारखी दिसते म्हणून त्यावरुन पण काहि नावे आहेत. सेश्यूयम एड्य़ुल असे हिचे शास्त्रीय नाव. इंग्लीशमधे क्रिस्तोफ़ेन असे पण नाव आहे.
ही भाजी कच्ची पण सलाद मधे वापरता येते, या वेलाची मूळे मांसल असतात आणि ती पण
खातात. वेलीच्या कोवळ्या पानांची पण भाजी करतात.
या भाजीत अमिनो आम्ल व क, ब६ जीवनस्त्व असतेच, हृदयासाठी, किडनीसाठी भाजी चांगली, पानांचा
काढा, किडनी स्टोनवर वापरतात. सोडीयमची मात्रा खुपच कमी, तांबे, मँगनीज, पोटॅशियम सारखी
खनिजे असतात.
एकंदर फायदेशीर भाजी आहे. बघा एकदा खाऊन.
मला ईतके दिवस हा पेरूचा एखादा
मला ईतके दिवस हा पेरूचा एखादा प्रकार असेल असं वाटायचं.
रंग रूप तसंच दिसतं.घेऊन बघायची हिंमत नाही झाली.
इथे मिळतं. दाक्षिणात्य
इथे मिळतं. दाक्षिणात्य मैत्रिणीने सांबारात घातलेलं बघून मी आणलं. चांगली लागते चव. चणाडाळ आणि सांबार मसाला घालून भाजी करतात.
बदनेकायी म्हणजे वांगं. या
बदनेकायी म्हणजे वांगं. या कायोटे स्क्वाश ला कानडीत सीमेबदनेकायी म्हणतात. मराठीत मी वेलवांगं उल्लेख ऐकलाय.
आभार मेघा, शीर्षक बदलतो आता.
आभार मेघा, शीर्षक बदलतो आता.
दिनेशदा मस्तच आहे ....मलाहि
दिनेशदा मस्तच आहे ....मलाहि वाट्ले एखादे फळ आहे .::)
मि करेल आता याचि भाजि.
दिनेशदा, सुरेख माहिती! मी
दिनेशदा, सुरेख माहिती!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी तुम्ही दिलेली माहिती व फोटो पाहिल्यावर कुतुहलाने विकीपीडिया चाळले, त्यात ही माहिती मिळाली :
ह्या फळाला जसे कन्नडमधे बदेनकायी म्हणतात तसे तेलुगु मधे सीमे वांगकाया म्हणतात. Seemae VangaKaaya
तमिळमधे चो चो. "chocho" or "Chow Chow" किंवा bengaluru katharikkai असेही म्हणतात.
दार्जिलिंगमधे Ishkus, हिमाचलमधे Lanku, मणिपूरमधे DasGoos म्हणतात.
अधिक माहितीसाठी ही लिंक : http://en.wikipedia.org/wiki/Chayote
आम्हि याला 'चिवचिव' असे
आम्हि याला 'चिवचिव' असे म्हणतो!!
ओह... मी कित्येक दिवस ह्या
ओह... मी कित्येक दिवस ह्या भाजीला काय म्हणतात, ते शोधायचा प्रयत्न करत होते.
एका भाजीवाल्याने मला चिवचिव हे नाव सांगितले होते, पण जेव्हा मी एका दाक्षिणात्य सहकारीणीला हे नाव सांगून आणखी माहीती मिळवायचा प्रयत्न केला तेव्हा तिने अशा नावाची भाजीच नाही, असे सांगितले.
धन्यवात, मी आत्ताच तिला सांगते. मला चिव चिव म्हणून ति चिडवत होती![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा दिनेशदा खरच उपयुकत माहिती
वा दिनेशदा खरच उपयुकत माहिती दिली तुम्ही
मी पण बाजारात ही भाजी बघायची पण ही कुठली ते माहीत नव्हते. आता करुन बघायला पाहिजे.
दिनेशदा खुप छान. अजुन
दिनेशदा खुप छान. अजुन वेगळ्या भाजीची माहीती दिलीत.
ही भाजी मी लहान असताना,
ही भाजी मी लहान असताना, सातारा, सांगली या भागात खुप प्रमाणात बाजारात असायची. मी आजोळी सातार्यात खुप वेळा कच्चीच खाल्लीये (खरं तर याला फळाचाच दर्जा होता, पण भाजी सुधा करायची आजी). छान लागते. याला "चीव्-चीव" म्हणतात तीकडे. याची भाजी खोबरं / कोथींबीर टाकुन सुधा छान लागते. पुण्यात कुठे मीळतं?? मला कधीच नाही मीळालं.
दिनेश, इथे सिंगापुरात देखील
दिनेश, इथे सिंगापुरात देखील ही फळभाजी मिळते. मी तर रोज बघतो पण घेत नाही. आता एकदा करुन पाहिन.
हे थोडं महाळुंगासारख दिसत न?
हे थोडं महाळुंगासारख दिसत न?
आर्च, महाळुंग म्हणजे काय ?
आर्च, महाळुंग म्हणजे काय ? मला प्रचंड कुतूहल आहे. माझ्याकडच्या जून्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे.
महाळुंगाची साल काढावी, त्यातला पातळ पापुद्रा काढावा, तो कडू असतो, अशा सूचना आहेत. वर्णनावरून ते संत्रा वर्गातले फ़ळ, पपनस किंवा बंपर वाटते.
पण हे तसे नसते.
दिनेश, बरोबर. महाळुंग सिट्रस
दिनेश, बरोबर. महाळुंग सिट्रस फॅमिलीतलं आहे. रंगाने पिवळं असतं. आकार साधारण तुमच्या ह्या वांग्यासारखा पण मोठं असतं. आमच्याकडे (कोकणात) गणपतीत देवाजवळ जी फळं ठेवतो न त्यात ते असतच.
हो, म्हणजे ते पपनसच. (महाळुंग
हो, म्हणजे ते पपनसच. (महाळुंग हा शब्दच आता वापरत नाही कुणी ) गणपतिला ते हवच. पण त्याच्या मानाने हे अगदी छोटे असते.
दिनेश, नाही पपनस गोल असतो
दिनेश, नाही पपनस गोल असतो ग्रेपफ्रुटसारखा असतो चवीला. महाळुंग असच वेडवाकडं असत.
हा लेख वाचून प्रथमच वेलवांगे
हा लेख वाचून प्रथमच वेलवांगे आणले. काल भाजी केली होती. वर दिलेली कृती जरा माइल्ड वाटली म्हणुन वेगळी केली. तेलावर जिरे-हिंगाची फोडणी केली. गोडा मसाला, थोडे ओले खोबरे, गुळ घालुन कमी पाणी घालुन शिजवली. फार रस्सा केला नाही. खूप आवडली. आता नियमित आणत जाईन.
धन्यवाद दिनेशदा!
ज्ञाती, या भाजीला, कुठलीही
ज्ञाती, या भाजीला, कुठलीही ट्रीटमेंट (मसाल्याची) चालेल असे वाटते.
आर्च,
आता आठवले महाळुंग. गोव्याला गणपतिच्या माटोळी ला लावण्यासाठी मिळायचे.
आमच्या घरी (म्हणजे अर्थात
आमच्या घरी (म्हणजे अर्थात मझ्या माहेरी) केळीची झाडे होती. केळीला घड पडला की तो काढल्या नंतर आजीची एक मैत्रीण केळीचा बुंधा (म्हणजे पाने सोडुन मुळापर्यंतचा सगळा भाग) भाजी करायला घेऊन जायच्या. मला याची भाजी कशी करतात ते शीकायचंय. कुणाला माहीती आहे का?? आणी हो ते "ढेमसे" मीळतात ईकडे त्याचं काय करतात????
हां.. या भाजीला इंडोनेशिया
हां.. या भाजीला इंडोनेशिया मधे 'लाबू सियांग' म्हणतात. नुसत्या लाल मिर्च्या,लसणावर स्टर फ्राय करून खातात ही भाजी तिकडे. भात,सांबल आणी ही भाजी कि झालं छान जेवण तयार. या भाजीचे इतर खूप प्रकार खाल्ले तिकडे. सूप मधेही छान लागते .
कालच घाबरत घाबरत ही भाजी
कालच घाबरत घाबरत ही भाजी आणली. घाबरत अशासाठी की भाजी दुधीशी साधर्म्य असलेली आहे आणि मला दुधीची भाजी मुळीच आवडत नाही. रस्साभाजी तर बिलकूल नाही. जरा चटपटीत केली. धने, सुकं खोबरं आणि लसूण भाजून घेऊन वाटलं. हिंग, जिर्याची फोडणी करुन त्यात वेलवांग्याचे तुकडे परतले. मग तिखट,मीठ आणि पाणी घालून झाकण ठेवून शिजवून घेतले. शेवटी वाटण आणि गूळ घालून ढवळून उतरवली. वरुन कोथिंबीर पेरली. इतकी मस्त झाली होती की बस ! दुधीसारखी असली तरी दुधीपेक्षा ह्याचे टेक्श्चर आवडले. आता वरचेवर आणणार ही भाजी. खूप खूप धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सालं काढल्यावर हाताला चीक लागला थोडा. असं नेहेमीच होतं का ? अगदी कोवळी होती भाजी. कोय तर पेअर कापल्यावर मध्ये जेवढा दांडा असतो तेवढीच होती.
आताच केली ही भाजी. हिला
आताच केली ही भाजी. हिला स्वतःची काही चव नाही. कच्ची नवलकोलसारखी लागते जरा. जीरे, हिंग मोहरी, कढीपत्ता, मिरचीवर फोडणीला टाकून गोडा मसाला, चींच गूळ आणि दाण्याचा कूट घालून केली त्यामुळे चवीला चांगली लागली.
परत आणली तर दुधीहलव्यासारखा हलवा करून पहाणार आहे.![Bhaaji1.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u140/Bhaaji1.jpg)
ह्याची कोशिंबीर पण छान लागते.
ह्याची कोशिंबीर पण छान लागते. वेलवांग जरास वाफवून घ्यायच. किसून त्यात दाण्याच कुट मिरची हवी असल्यास हिंग जि-याची फोडणी. म्हैसुरमधे एका मराठी घरामध्ये खाल्ली.
हो अगो सालं काढली की हाताला
हो अगो सालं काढली की हाताला चीक लागतो. याची बटाट्यासारखी पण करतात भाजी. आपण पिवळी भाजी करतो ना तशी. भाजील स्वताची विशेष चव नाही. बाकी जे मसाले घालू तशी भाजी लागते. पण खूप पौष्टीक असते असं मैत्रीणीने सांगितल्यापासून मी आणायला लागले. दिनेशदा नारळाच्या दुधाची आयडिया चंगली आहे. एकदा ट्राय करेन.
आम्हि याला 'चिवचिव' असे
आम्हि याला 'चिवचिव' असे म्हणतो!
>> अनुमोदन
माझी आज्जी याच भरीत करायची.
मी हा बीबी आत्ताच बघितला.
मी हा बीबी आत्ताच बघितला. पूर्व भारतात याला स्क्वाश्/स्क्वॉश याच नावाने ओळखले जाते. हिवाळ्यात मिळते. आम्ही याची रस्साभाजी करतो. पण वरती लिहिलेली कोशिंबीर किंवा भरीत करायची आयडिया आवडली. आता परत आणला की करून बघेन
माझ्या डोक्यात दोन योजना
माझ्या डोक्यात दोन योजना आहेत.
१. किसुन बेसन पीठ लावणे.
२. वांग्याचे काप करतो तसे शॅलो फ्राय काप करणे
दूधी सारखी भाजी मस्त लागते.
दूधी सारखी भाजी मस्त लागते. डाळ वगैरे घालून.
दिनेशदा - हे फळ पहिल्यांदाच
दिनेशदा - हे फळ पहिल्यांदाच पहातो आहे - भाजी वगैरे लांबची बात ..:)
एखाद्या भाजीचे / फळाचे / पानांचे / फुलांचे/ कंदाचे गुणधर्म ओळखून ते 'खाणेबल' करायचे तुमचे जे कसब आहे त्याला सलामच ..
Pages