Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नंदन, तुमचा वरचा प्रतिसाद
नंदन,
तुमचा वरचा प्रतिसाद वाचला. भारी आहे!
तुम्ही दिलेला उतारा वाचला. छानपैकी डोक्यावरून गेला. मग परत तुमचा प्रतिसाद वाचला. त्यातल्या कादंबरी आणि कवितेतील फरकावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. आणि तो पुस्तकातला उतारा परत वाचला.
तेव्हा उताऱ्यातलं एक वाक्य विशेष महत्त्वाचं वाटलं :
>> Audition requires different neurological processes than vision, or smell. And I would suggest
>> that we hear more than we see while we are reading.
यावर जाणवलं की आपण (=मी स्वत:) कविता 'ऐकतो', तर कादंबरी 'वाचतो'. अर्थात हे गणित रसिकागणिक बदलत जाणार. तुमची (आणि बाकीच्यांच्याही) आस्वादपद्धती समजून घ्यायला आवडेल. तसेच मराठी कवितेत पात्रांचं बाह्य वर्णन फारसं आढळून येत नाही/नसावं. या दोन कारणांमुळे, व्यक्तिगणिक आणि वाचनागणिक पडत जाणारा फरक हे कवितांच्या बाबतीत व्यवच्छेदक लक्षण मानणे कितपत सुसंगत आहे?
आ.न.,
-गा.पै.
@ रैना - परवाच वाचलेला हा लेख
@ रैना - परवाच वाचलेला हा लेख आठवला:
http://www.npr.org/blogs/parallels/2014/08/12/339825261/global-parenting...
@ गा. पै. -
कवितांबद्दलचा मुद्दा मी अधिक विस्ताराने लिहायला हवा होता. मराठी कवितांत पात्रांचं बाह्य वर्णन फारसं आढळून येत नाही, या निरीक्षणाशी सहमत आहे. माझा निर्देश एकंदरीतच शब्द आणि ते वाचून मनात उमटणार्या प्रतिमा (कवितेच्या संदर्भात) यांच्या नात्याशी होता. उदाहरणादाखल ग्रेसच्या कविता घेता येतील.
कविता 'वाचणे' आणि कविता 'ऐकणे' हीदेखील अर्थात वैयक्तिक आवड. 'आहे मनोहर तरी'मध्ये सुनीताबाईंनी त्यांच्या सहजीवनातल्या कवितांच्या आवडीबद्दल लिहिताना पुलंचा कल चालीवर म्हणता येणार्या कवितांकडे अधिक होता, असं नोंदवलं आहे, ते आठवून गेलं. ['विशाखाचे दिवस' या लेखातही पुलंनी - "माझे तारुण्य जन्माला आले ते कुसुमाग्रजांनी मराठी साहित्याच्या आकाशात सोडलेल्या 'विशाखा' नक्षत्रावर. कवितेने सुरांशी घटस्फोट घेतला नव्हता; त्या जमान्यात माझी कवितेशी मैत्री झाली." अशी टिप्पणी केली आहे.] अगदी बोरकरांच्या कवितावाचनातही दोघांच्या कवितानिवडीतला हा फरक दिसून येतो.
या गोष्टींमुळे (कवितेची नादमयता आणि कादंबरीच्या तुलनेत कमी शब्द असूनही प्रतिमा जागवण्याचे सामर्थ्य + त्या प्रतिमा व्यक्तीप्रमाणे व वयाप्रमाणे/मूडप्रमाणे बदलत जाणे) वर उल्लेख केलेल्या पुस्तकात घेतला आहे तसा शब्द आणि प्रतिमा यांच्यातल्या परस्परसंबंधांचा मागोवा कवितांबद्दल (व्यापक प्रमाणात, केवळ पात्रवर्णनाबद्दल नव्हे) घेणे अशक्यप्राय आहे - पण त्याचवेळी ते ह्या साहित्यप्रकाराचे बलस्थानही ठरावे.
या संदर्भात (कविता - दर वाचकाची खाजगी, स्वतंत्र प्रतिमा) एक आवडता हायकू इथे देण्याचा मोह आवरत नाही -
Ten thousand poets
have viewed ten thousand moons.
This moon, just one.
नंदन ... ग्रेट . तुम्ही सतत
नंदन ... ग्रेट .
तुम्ही सतत लिहीत रहा हो इथे. तुमच्या सारखी फार थोडी ओअॅसिस राहिलीत इथे .. या वाळवंटात....
नंदन ,गापै , कविता वाचणे ऐकणे
नंदन ,गापै , कविता वाचणे ऐकणे याबद्दलचा तुमचा संवाद वाचताना मला एक आठवले अलिकडेच 'नजरेखालून गेलेले' - कविता/संकल्पना आधी पाहाणे मनात.
अभिव्यक्तीची तुलना मुक्तनृत्याशी करणाऱ्या एका महान फ्रेंच कवीचे हे विचार इंग्लीशमध्ये अनुवादलेले.
निर्मितीप्रक्रियेबद्दल फ्रेंच कवी Paul Valery- येल फ्रेंच स्टडीज मधून -
'''-My friend, I have just made a great and profound discovery.
-Go on.
-But ... I can't express it.
-You don't say!
–You must be aware that words and commonly used languages are, so to speak, incommensurable among themselves, and can't communicate the idea of a given curve.... My secret lies in an image that would be easier to draw than to describe-but I can hardly draw it either, because it is not just lines and color nor a well- known object. It doesn't resemble anything-that is why it is so powerful. An inside glance at this vision-enlightens me.''
(Le feu plein d'id6es- Paul Valery )
नंदन, >> ... वर उल्लेख
नंदन,
>> ... वर उल्लेख केलेल्या पुस्तकात घेतला आहे तसा शब्द आणि प्रतिमा यांच्यातल्या परस्परसंबंधांचा मागोवा
>> कवितांबद्दल (व्यापक प्रमाणात, केवळ पात्रवर्णनाबद्दल नव्हे) घेणे अशक्यप्राय आहे - पण त्याचवेळी ते ह्या
>> साहित्यप्रकाराचे बलस्थानही ठरावे.
एकदम बरोबर! पुस्तकातल्या उताऱ्यात केवळ दृश्य (=समूर्त) प्रतिमेचा विचार केला आहे. तर कवितेबाबत अमूर्त प्रतिमेचाच विचार करावा लागतो. समूर्तापेक्षा अमूर्त फारच व्यापक असते हा नियमच आहे. त्यानुसार ते कवितेचे बलस्थान आहे, हे नि:संशय!
तर प्रतिमा उठावदार (impressive) आहे याचा निकष काय असावा? लेखकाने रंगवलेली समूर्त प्रतिमा अचूकतेकडे झुकत असेल तर ती उठावदार होते. (हे बरोबर ना?) त्याच धर्तीवर अमूर्त प्रतिमेच्या कवीने रंगवलेले अमूर्त जग किती वेगवेगळे नि:संदिग्ध व सुसंगत पर्याय धारण करू शकते यावर कवितेचा उठावदारपणा ठरेल. (हेही बरोबर बोललो का?)
तुमचं मत वाचायला आवडेल.
आ.न.,
-गा.पै.
भारतीताई, >> it is not just
भारतीताई,
>> it is not just lines and color nor a well- known object. It doesn't resemble anything-that is why it is
>> so powerful.
हे विधान वाचून सायनेस्थेशिया नामक प्रतिभास्फुल्लिंगाची आठवण झाली. चित्र बघितल्यावर मनात संगीत वाजणे, आवाज ऐकल्यावर मनात वास वा चित्र उमटणे असे जेव्हा होते तेव्हा त्यास सायनेस्थेशिया म्हणतात.
पॉल व्हॅलरीस अमूर्त स्वरूपाच्या सायनेस्थेशियाचा अनुभव आला असावा, असं माझं मन सांगतंय!
आ.न.,
-गा.पै.
नंदन यांनी सुरु केलेली
नंदन यांनी सुरु केलेली साहित्यिक चर्चा मला आवडते आहे. काही बोलावसं वाटते पण वाटणारे सारे अचूक शब्दात मांडण्याइतकी माझी प्रतिभा नाही. केवळ एक अनुभव नमूद करावासा वाटतो. कदाचित थोडा अवांतर आहे.
हॅरी पॉटर पुस्तक मला खूप आवडलं होतं पण सिनेमा बघताना माझी फार निराशा झाली होती. पुस्तक वाचताना त्या रहस्यमय जादुई दुनियेचं माझ्या कल्पनाशक्तीप्रमाणे एक चित्र निर्माण झालेलं. वरच्या चर्चेत म्हटल्याप्रमाणे कुणी मला ते रेखाटायला किवा वर्णन करण्यास सांगितलं असतं तर मला जमलं नसतं. पण चित्रपटात उभी केलेली दुनिया त्या कल्पनेतल्या चित्रापेक्षा खूपच खुजी अशक्य वाटली. पुस्तक न वाचता मी जर चित्रपट बघितला असता तर कदाचित मला तो आवडलासुद्धा असता. मी नंतरचे भाग वाचले पण त्यावर आधारित चित्रपट बघितले नाहीत.
ह्या उलट डॉ. झिवागो पुस्तकात मैलोन् मैल पसरलेल्या रशियाचं वर्णन आहे. खूप खूप वर्षापूर्वी त्या सिनेमाला क्लासिक मध्ये गणले जाते म्हणून कॉलेजच्या वाचनालयातून पुस्तक आणलं. पण वाचायला जमलं नाही. पण अनेक वर्षांनी तो सिनेमा पाहताना त्याच सृष्टीसौदर्याने मोहून गेले.
पॉटर पूर्ण काल्पनिक होता त्यामुळे मनात उमटलेलं चित्र काल्पनिक होतं आणि आवडलं. पण रशियाचं वर्णन वास्तविक होतं आणि तसं तोपर्यंतच्या जीवनात काही न बघितल्यामुळे कल्पना करणं कठीण गेलं. शिवाय पुस्तकात कथा संथ गतीने पुढे जाते त्यामुळे पुस्तक वाचणे कठीण गेले असावे.
गा पै तसेही असेल. तो
गा पै तसेही असेल. तो सायनेस्थेशियाचा अनुभव असेल किंवा तीव्र संवेदनांचा/ प्रतिमांचा मनातला साठा असेल.चांगली रचना वाचताना ''इंद्रिया लागे कळंभा | येकमेका ||'' हे आपण इये मराठीचिये नगरी वाचलं आहेच.
Le Cimetière marin ही Paul Valéry यांची सुंदर दीर्घकविता वाचकाच्या मनात असाच संमिश्र प्रतिमांचा कल्लोळ उमटवते , ती ( अर्थात इंग्लिश अनुवाद- मला फ्रेंच येत नाही ) वाचल्यावर त्यांच्या निर्मितीवरील विविध प्रदीर्घ निबंधांचं वाचन तितक्याच आनंददायी पण अनाकलनीय अबोध अशा प्रदेशाकडे आपल्याला नेतं असा अनुभव आला .
@ vt220 , अगदी खरंय, मनोमंचावर पहाण्यासारखं सुख नाही. कितीही तंत्रशुद्ध आविष्कार असो पडद्यावर किंवा रंगभूमीवर , मनात आपण जे अनुभवतो साहित्यकृती वाचताना ,' तो रस येथे नाही '!( विवाद्य विधान, काही थोडे लोक सहमत असतील पण .)
सद्ध्या केविन माऊरर अन मार्क
सद्ध्या केविन माऊरर अन मार्क ओवेन ह्यांनी लिहिलेले , ओसामा बिन लादेन ला मारायच्या "ऑपरेशन नेप्च्युन्स स्पियर" चा फर्स्ट हँड अकाऊंट वाचतोय, अतिशय मस्त पुस्तक, ह्यात सील्स कसे सिलेक्ट होतात कसे ट्रेन होतात इत्यादी फार छान दिले आहे, "डेवग्रु" उर्फ "सील टीम ६" ची जडणघडण! फारच उत्तम!!!!
नुकतच 'अनिमल फार्म' हे जॉर्ज
नुकतच 'अनिमल फार्म' हे जॉर्ज ऑर्वेलच पुस्तक वाचलं, सगळे प्राणी (फार्म मधले) शेतकर्याविरुद्ध बंड करुन, लोकशाही आणायचा प्रयत्न करतात, पण शेवटी ते एका गुलामगिरीतुन दुसर्या गुलामगिरीत जातात.
का ते माहित नाही पण वाचताना नकळत भारतातील लोकशाहीशी तुलना करत गेलो आणि खेद करावासा वाटतो की त्या गोष्टीत जे लिहिलय त्यातल्या बर्याच गोष्टी इथे चपखल बसल्या.
म्हणूनच ऑर्वेल कालातीत आहे,
म्हणूनच ऑर्वेल कालातीत आहे, अग्निपंख त्याचं १९८४ पण वाचा
लोकशाहीतच काय येथे माबोवरील
लोकशाहीतच काय येथे माबोवरील विविध बाफांवरही ते लागू पडते
फा, स्पॉट ऑन
फा, स्पॉट ऑन
ऑर्वेलोच्छिष्टम् जगत् सर्वम्
ऑर्वेलोच्छिष्टम् जगत् सर्वम्
vt220 यांनी व्यक्त
vt220 यांनी व्यक्त केल्याप्रमाणे मलासुद्धा म्रीत्युन्जय वाचल्यानंतर टीवी वरचे महाभारत एकदम सपक वाटले होते. एखादे उत्कृष्ट पुस्तक वाचताना वाचकाने त्याच्या मनात तयार केलेल्या कल्पनेपेक्षा जर चित्रपट खुजा वाटला तर निराशा होते. माझ्या ज्या मित्रांनी दुनियादारी पुस्तक वाचले होते त्यांना सिनेमा विशेष आवडला नाही. मी मात्र ते वाचले नसल्याने मला आवडला.
डॉक्टर झिवागो पुस्तक वाचले आहे. आवडले. आता चित्रपट पाहायचा आहे. कोणी अंतरर्जालावरची लिंक देवू शकेल काय?
वरदा धन्स, १९८४ पण वाचायच्या
वरदा धन्स, १९८४ पण वाचायच्या यादित आहे, जसा वेळ मिळेल तसा वाचतोय.
फा आणि टण्या
डॉ झिवागो चांगला पेलला आहे.
डॉ झिवागो चांगला पेलला आहे. क्लासिक्स मध्येच मोडतो... मी पुस्तक वाचलेले नाही
http://www.imdb.com/title/tt0059113/?ref_=fn_al_tt_1
ऑर्वेलसंबंधी अजून थोडे: जॉर्ज
ऑर्वेलसंबंधी अजून थोडे:
जॉर्ज ऑर्वेलनं लिहिलेलं 'माईन काम्फ'चं परीक्षणः
विशेषतः हा भाग मननीय -
...human beings don’t only want comfort, safety, short working-hours, hygiene, birth-control and, in general, common sense; they also, at least intermittently, want struggle and self-sacrifice, not to mention drums, flags and loyalty-parades.
दुसरी गोष्ट म्हणजे मार्च १९४०मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखातलं भाकीत (करार मोडून हिटलरचे रशियावर आक्रमण) पुढील वर्षीच (जून १९४१) खरं ठरलं.
>>> ऑर्वेलोच्छिष्टम् जगत् सर्वम्!
अगदी, अगदी!
अलीकडेच वाचलेलं हे वाक्य आठवलं:
Christopher Hitchens once wrote that there were three major issues of the twentieth century — imperialism, fascism, and Stalinism — and George Orwell proved to be right about all of them.
नंदन, मस्त
नंदन, मस्त
तारा वनारसे यांची श्यामिनी ही
तारा वनारसे यांची श्यामिनी ही लघुकादंबरी पुन्हा एकदा वाचली. झपाटून गेले नव्याने.
तारा वनारसे यांची श्यामिनी म्हणजे राक्षस राजकन्या, रावणाची बहीण शूर्पणखा .
रामायण आपण सतत रामाच्या म्हणजे आर्यांच्या परिप्रेक्ष्यातून वाचतो हे काही आता नवीन नाही आपल्यालाही. तरी सुद्धा मनात आदिबंध तयार झाले असतात.त्यांना प्रश्न विचारणं आपल्याला सुचत नाही.
तारा वनारसे म्हणजे इरावती कर्वे नव्हेत . पण शूर्पणखेबद्दल पडलेल्या प्रश्नांनी नुकतीच काळाच्या पडद्याआड गेलेली गेल्या पिढीतील ही व्युत्पन्न सिद्धहस्त लेखिका अगदी खोलवर ढवळून निघाली होती हे नक्की , म्हणूनच २००० साली मौज प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘श्यामिनी ‘ या कादंबरीतून त्यांनी आर्य-द्रविडांच्या संघर्षात ससेहोलपट झालेली आणि मरणानंतरही विपर्यस्त चित्रणाची शिकार झालेली कलासक्त , सुंदर, मुक्त प्रेमाविष्कार हाच जिचा गुन्हा होता अशी मनस्वी द्रविड राजकन्या श्यामिनी उभी केली आहे. रामायण हे एक महाकाव्य आहे तसाच आर्य द्रविड संघर्षाचा इतिहासही, त्याचं पुनर्लेखन करणं हे काम असामान्य प्रतिभेचं आहे. हे शिवधनुष्य त्यांनी पेललं आहे. कादंबरी काव्य आणि इतिहास या दोन्ही पातळ्यांवर वाचताना झपाटून टाकते, सुन्न करते.
श्यामिनीमध्ये चित्रित झालेली संपन्न सुसंस्कृत शिष्टाचारी द्रविड संस्कृती आपल्याला स्तिमित करून टाकते. आर्यांच्या विजीगिषु वृत्तीमुळे संघर्ष अटळ झाला, तरीही दक्षिणेतले हे राजवंश खऱ्या अर्थाने दाक्षिण्य आणि स्त्रीदाक्षिण्य म्हणजे काय हे ओळखत होते, म्हणून रावणाने आपल्या दुर्दैवी आहत बहिणीचा बदला म्हणून सीतेला अपहृत केले, रामाला तशीच जखम त्याला द्यायची होती जशी रामाने त्याला दिली होती, पण तिचा मर्यादाभंग केला नाही..
अनेक बारकावे, तपशील चित्रकाराच्या आणि कवीच्या प्रतिभेने रंगवत ताराबाई पंचवटी, दंडकारण्य, राम -सीता-लक्ष्मणाचं जग, व्यक्ती म्हणून ( देव म्हणून नाही ) त्यांची स्वभाववैशिष्ट्ये एकीकडे रंगवतात तेवढ्याच उत्कटतेने त्या राजकन्या श्यामिनीची मोहमयी मूर्ती , तिचं अकलंक जीवन , द्रविड राजांच्या रीतीभाती रंगवतात .कथानकाच्या पटावर त्या सीता आणि श्यामिनी - दोन भिन्नवंशी अभागी राजकन्यांना एकमेकीसमोर उभ्या करतात. एकतर्फी का असेना,प्रेमाचा चिरंतन त्रिकोण आश्चर्यकारकपणे कथानकात उमटतो आणि नियतीला सोपा रस्ता सापडतो सर्वनाश करण्यासाठी.
Epic dimensions असलेला हा वाचनानुभव आहेच, शिवाय आपल्याला अंतर्बाह्य घुसळून काढणारा .
भारतीजी काय उत्तम परिचय करून
भारतीजी काय उत्तम परिचय करून दिला आहे तुम्ही ! त्यावरूनच पुस्तक किती जबरदस्त असले पाहिजे याचा प्रत्यय येतो...
मिवापु वर एकदम ११ नवीन
मिवापु वर एकदम ११ नवीन पोस्ट्स म्हटल्यावर वाटलंच की त्यातली एक तरी नंदनची असणार.
मी मागे एकदा डॉ.झिवागो सिनेमा पहायला सुरूवात केली. सिनेमाबद्दल चांगलं/वाईट काहीही मत बनण्याआधीच मला वाटलं, की आधी सिनेमा नको, पुस्तकच वाचायला हवं, जे मी अजूनही केलेलं नाही. त्यादिवशी सिनेमा जो अर्धवट सोडून दिला, तो ही पहायचा राहून गेलाच.
भारती, मस्त लिहिलं आहेत!
डॉ> झिवागो दोन तीनदा पाहिलाय.
डॉ> झिवागो दोन तीनदा पाहिलाय. पुस्तक वाचायचे धाडस अजून झाले नाही.
गुलझार चे ढ्योडी वाचले. एकतर
गुलझार चे ढ्योडी वाचले.
एकतर त्याची पुस्तके मला त्याच्या आवाजात 'ऐकू' येतात, नुसती वाचता येतच नाहीत (वरती झालेल्या चर्चेत हा अनुभव कुठे बसतो का?!). आणि लिखाणही त्याच्या कवितांसारखेच क्षणात एकदम चित्रदर्शी क्षणात एकदम गूढ. अगदी सहज उर्दूत शिरणारी भाषाशैली आणि खांद्यावर हात ठेउन कोणी गप्पा मारते आहे असा सगळा मामला! मजा आली.
आगावा गुलझारची एक मुलाखत ची
आगावा गुलझारची एक मुलाखत ची नन्तर लिन्क देतो. त्यात मुलाखत घेणारा चांगला आहे की देनारा असा प्रश्न पडावा अशी अपवादात्मक स्थिती आहे. त्या मुलाखतीतून गुलजार बरेच उलगडतात ...
धन्यवाद रॉबिनहूड ,
धन्यवाद रॉबिनहूड , ललिता-प्रीती, ''श्यामिनी '' आहेच तसे जबरदस्त ,आकलनाची झापडं उघडणारं, खूप तळमळीने आणि अभ्यासाने लिहिलेलं पुस्तक.
जॉर्ज ऑरवेलबद्दल आणखी काही..त्याची आणखी एक कादंबरी जी कॉलेजच्या वयात वाचली होती, आठवते आहे.आजही तितकीच अर्थपूर्ण वाटेल अशी थीम.पैसा हाच देव हे नाकारून .फक्त कवितेवर जगू पाहाणाऱ्या, एका कवीची दुर्दशा आणि मग अर्थातच यू टर्न- कादंबरीचं नाव होतं Keep the Aspidistra flying.
त्याचा Inside the Whale हा लेखसंग्रह नेटवर उपलब्ध आहे. लघुनिबंधाच्या शैलीने सहज वाटणारे पण मूलभूत विचार ओर्वेलने मांडले आहेत..
नंदन, मस्त पोस्टी. भारतीताई,
नंदन, मस्त पोस्टी.
भारतीताई, पुस्तक परिचय आवडला.
रॉहू, प्लीज इथेच लिंक द्याल का? मुलाखत ऐकायला आवडेल.
शैलजा .. ये रही
शैलजा ..
ये रही लिंक
https://www.youtube.com/watch?v=eJQ0sh-BU_8
एक तासाची मेजवानी आहे...
गुलजार यांची मुलाखत बाय इरफान ...
केवळ अप्रतिम
अर्रे थ्यांक्स रॉबिनहुड!
अर्रे थ्यांक्स रॉबिनहुड! बुकमार्क केली आहे. ऐकते आता.
शैलजा लिन्क देता देता सगळी
शैलजा लिन्क देता देता सगळी मुलाखत परत पाहिली/ ऐकली
Pages