मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

द हंगर गेम्स सिरीज तिन्ही पुस्तके वाचली
१ हंगर गेम्स
२ क्याचींग फायर
३ मॉकीगजेय
पहिली दोन अप्रतिम
तिसरे अतिसामान्य , उगाच फापड पसारा

’Wilhelm Von Humboldt. यांचा ''On the Historian's task'' असा एक उतारा ''History and theory'‘ या त्यांच्या पेपरमधून घेतलेला- अलिकडे वाचनात आला. दोन आवडलेली निरीक्षणे -
’Historian’s task is to undertake impartial investigation with intuitive understanding of events to ascertain the inner truth of events,in order to awaken and stimulate a sensibility for reality .For this he should have freedom and subtlety of approach.’’
‘’Eruption of art is a result of creation of energies in a given culture ‘’-
मग या संदर्भात, या निकषांवर थोडेसे श.श्री.पुराणिक यांचे ‘’वि.का.राजवाडे : व्यक्तित्व, कर्तृत्व व विचार’’- ( रविराज प्रकाशन पुणे ) हे पुस्तक पुन: हाताळले.राजवाडे यांच्या व्यक्तिमत्वाला पुन: उजाळा देण्यासाठी त्यातले हे काही उतारे -
‘’सातवळेकर म्हणतात – राजवाडे यांची आकलनशक्ती इतकी विलक्षण असे की कागदांच्या ढीगामधून हवा तो कागद ते काही मिनिटांत शोधून काढीत व त्यातले अमुक वाक्य महत्वाचे आहे असे तत्काळ दाखवीत.. साधनांचे वैपुल्य आणि आकलनशक्तीची तीव्रता यामुळे सत्कृतदर्शनी अस्ताव्यस्त वाटलेल्या ऐतिहासिक लेखातून व पत्रातून ते तत्वज्ञानाचे अखंड सूत्र निर्माण करू शकले..’’
‘’Grant Duff सारख्या परकीय इतिहासकारांनी भौतिक पद्धतीने मराठयांचा इतिहास लिहिल्याने या प्रेरणेकडे, आत्म्याकडे सर्वस्वी दुर्लक्ष्य करून त्यांनी मराठ्यांना दरोडेखोर किंवा लुटारू यापलीकडे किंमत दिली नव्हती ती राजवाडे यांनी सप्रमाण निर्मूल करून मराठयांच्या इतिहासातील प्राणभूत सूत्र म्हणजे ‘महाराष्ट्र धर्मा’ची स्थापना व प्रसार हे होते, त्यांचा पराभव आळशीपणामुळे नाही तर शस्त्रांच्या निकृष्टतेमुळे इंग्रजांनी केला.त्यांच्या काळात भौतिक शास्त्रांचा न झालेला विकास व त्याजागी वारकरी संतांनी रुजवलेल्या तात्त्विक परमार्थपर विचारांनी हे नुकसान झाले असे मानून राजवाडे यांनी अशा प्रपंचविन्मुख अध्यात्मपरतेवर धार धरली होती..पण त्याचवेळी ते जडवादी नव्हते.रामदासांची व गीतेतील कर्मप्रवणता त्यांना आशास्पद वाटत होती.
‘’ सर्वांना परमार्थ मिळाल्यावर कोणालाच काही मिळावयाचे राहत नाही पण या उद्धाराची जी धडपड,खळबळ,प्रयत्न आहे तोच मानवजातीचा इतिहास आहे, जो हजारो वर्षे चालत आला आहे व पुढेही परमार्थाची प्राप्ती यच्चयावत मनुष्यांना होईपर्यंत अव्याहत चालू राहील ‘’ असा ऐतिहासिक घडामोडीतील त्यांचा अध्यात्म-अर्थ होता.
वैयक्तिक रागद्वेषांपासून अलिप्त शास्त्रीय वस्तुनिष्ठ दृष्टी हा त्यांच्या लेखनाचा आत्मा होता . कालगणन ( अरबी, ख्रिस्ती कालगणन व शालिवाहन शकाची तुलना व त्याची श्रेष्ठता ) , महाराष्ट्रातील कर्त्या पुरुषांची मोजदाद ( सप्रमाण- तत्कालीन महाराष्ट्रात २ कोटींमध्ये २५ -वर्ष १९१३, जेव्हा ब्रिटनमध्ये ४ कोटीमध्ये ५०० म्हणून कर्तृत्व -गुणोत्तर २५:१ , तेही रसायनशास्त्र , अर्थशास्त्र अशा विषयात आपले कुणी नाही!)
राजवाडे यांचा ‘’कादंबरी ‘’ हा निबंध एखाद्या कादंबरीकारापेक्षा मर्मग्राही,लालित्यपूर्ण आहे..त्यात जर्मन, ब्रिटीश, रशियन व मराठी कादंबरी यांची तुलना आहे. तौलनिक दुर्दशा आहे. ‘’बक्षिसांनी प्रासादिक ग्रंथ निर्माण होते तर बाळाजी बाजीरावांनी म्हटल्याप्रमाणे चुटक्यांनी पोरेही झाली असती !’’ हे विधान त्यांनी केले आहे.
बाकी मग त्यांच्या विद्वत्ता व विक्षिप्तपणाची, त्यातल्याही स्वस्त व उपलब्ध नसलेल्या निरपेक्ष प्रेमळपणाची उदाहरणे..

भारती, राजवाड्यांच्या मोठेपणाबद्दल शंका नाहीच. पण त्यांचे स्वतःचे लेखन मात्र वैयक्तिक रागदोष, पूर्वग्रह, ज्ञातीनिष्ठा यांपासून अजिबातच अलिप्त नव्हते Happy

महाराष्ट्राच्या इतिहासलेखनामधे तीन लोकांनी कुठल्याही पूर्वसूरींचा आधार न घेता स्वबळावर नव्या कार्यपद्धती तयार केल्या व नवे पायंडे पाडले. इतिहासलेखनाची पूर्ण दिशा बदलून नवीनवी दालने उघडली - ते म्हणजे राजवाडे, दामोदर धर्मानंद कोसंबी आणि रा.चिं ढेरे.... बाकीचे संशोधक कमी दर्जाचे, महत्वाचे होते/आहेत असे नव्हे पण यांच्या प्रतिभेची, ओरिजिनॅलिटीची झेप आणखी कुणातच नव्हती, नाही हे ढळढळीत सत्य आहे.

टण्या - समग्र राजवाडे खंडांमधे उपलब्ध आहे. गेली अनेक वर्षे.

सध्या पिटर राइटने लिहिलेले 'स्पायकॅचर' (आत्मचरित्र) वाचत आहे, तो स्वतः MI5 ह्या संस्थेत काम करत होता, तेंव्हाचे त्याचे अनुभव ह्यात आहेत. पुस्तक वादग्रस्त झालं होतं, ब्रिटिश सरकारने ह्यावर बंदी आणायचा प्रयतन केला होता, पण ते स्कॉटलँड, ऑस्ट्रेलिया इथे उपलब्ध होतं. ब्रिटिश सरकार ने तिथे खटला दाखल केला पण तो ते हरले. जे काही नुकसान होणार होतं ते झालेलं आहे आता बंदी घालण्यात काही अर्थ नाही, असं म्हणुन शेवटी ब्रिटिश सरकारने बंदी उठवली.
(२५% वाचुन झालं आहे त्यावरुन), ज्या वाचकांना गुप्तहेरांचे काम, त्यांच्या कारवाया, राजकारण ह्याबद्द्ल आवड आहे त्यांच्यासाठी हे चांगलं पुस्तक आहे. कादंबरी सारख खिळवुन ठेवत नाही मात्र काही पानं उत्कंठा वाढवतात. जस की रशियन एंबसी मध्ये बग बसवतानाचं वर्णन, डबल एजंटस इ इ.
सध्या एवढच, बाकी पुर्ण वाचुन झाल्यावर!! Happy

(पिटरने लिहिलय, हे पुस्तक लिहिण्यासाठी कारणीभूत असलेली प्रेरणा,"त्याला मिळत असलेलं अपुर्ण निवृत्तीवेतन वसुल करणे")

कविता महाजन लिखित -
ग्राफिटी वॉल
--- ( यात कादम्बरी लिहीताना त्याचा अभ्यास करताना आलेले अनुभव लेख स्वरुपात लिहिलेले आहे)
- ब्र
- भिन्न

अमिता नायडू लिखित - प्लॅटफॉर्म नम्बर झिरो

‘दृश्यकला आणि साहित्य’ – वसंत आबाजी डहाके,लोकवाङ्मय प्रकाशन .डहाकेंनी केलेला कलाकृतीच्या आकलनाचा होलिस्टिक विचार.. त्यांना भावलेल्या अनेक दृश्य कलाकृती त्यांनी पुस्तकाच्या कक्षेत अभ्यासून मांडल्या आहेत.(अनेकानेक सुंदर चित्रेही आहेत - पर्वणी !) - मग ते सुधीर पटवर्धनांचे मुंबईचं नितळपणे ओबडधोबड वास्तव चितारणारे कॅनव्हासेस असोत ज्यावर ते अत्यंत तपशीलात जाऊन भाष्य करतात , वा संदेश भंडारे यांच्या कॅमेऱ्यात बद्ध झालेला कष्टकरी निम्नस्तरीय लहान लहान समूहांत विखुरलेला महाराष्ट्र असो किंवा त्यापलिकडचं दादरावाला यांच्या ‘प्रतिमा प्रचीती ‘ या पंचवीस युरो-अमेरिकी छायाचित्रकारांच्या कामाचं समीक्षण करणाऱ्या ग्रंथावर केलेलं विवेचन असो.डहाके कलाकृतीच्या तपशीलात जाताजाता आत्म्यात प्रवेश करतात आणि ते कसब आपल्याही लक्षात आणून देतात.
डहाके आपल्याला पाहणे आणि वाटणे या क्रियांबद्दल साक्षर करतात.'काही चित्रकृतींचे वाचन' या नावाचे एक प्रकरण आहे.ते या दिशेने आपल्याला अधिक अमूर्तात नेते.जसे की रेनी माग्रीटच्या प्रसिद्ध पाईपच्या चित्राचा ( ज्याखाली हा पाईप नव्हे असे लिहिलेय )अर्थ लावणे. ‘गव्हाच्या शेतावरचे कावळे ‘ या व्हिंसेंट व्हान गॉगच्या प्रसिद्ध चित्राचे व त्याच्या शेवटच्या दिवसांचे एकात्म आकलन आहे.त्याच्या potato eaters या व इतरही चित्रांची समीक्षा आहे. या चित्रांमधील व्यक्ती/ निसर्ग ही चिन्हके आहेत असे मानले तर ती चिन्हितांचा म्हणजे संकल्पित अर्थाचा कसा बोध करून देतात आणि त्यासाठी चित्रे पुन;पुन: कशी पहावी हे डहाके ठसवतात..
कथात्म साहित्याचे चित्रपट रुपांतर हा असाच एक महत्वाचा विषय जो आपण अनेकदा अनुभवतो आणि एखादा शेरा मारून मोकळे होतो. डहाके असे माध्यमांतर होताना विनाश पावणारे साहित्यकृतीतील एकएक अर्थबोध आणि नव्याने प्रत्ययास येणारे नवे दृकप्रत्ययबोध याचे logistic नीट समजावतात.’’दृक वाक्यांनी लिहिलेल्या कलाकृती वाचता आल्या की त्यांचा प्रत्यय येतो जसे की डॉ झिवागो चित्रपटातील डॉ झिवागो आणि लारा यांच्या भेटीतील अविरत पानगळ ..’’
शेवटी, असे बरेच काही ,Spanish लेखक बोर्हेसचा 'दुसरा बोर्हेस' ( जो आपल्या पुशि रेगेंच्या कवितेतील दुसऱ्या पक्ष्यासारखा आहे, जो पक्षी मुंडकोपनिषदातही आहे ) म्हणजेच लिहिणारा आणि लिहिला गेलेला असे द्वैत आणि इतरही बरेच बरेच.ज्यात मराठी कादंबरी , रहस्यकथा , एकूण डहाकेंचा 'माझा कलाविचार'.. एका लहानशा वाटणाऱ्या पुस्तकात ( फक्त २०० पाने ) बराच समृद्ध करणारा ऐवज.
समीक्षेची त्रासदायक भाषा न वापरता .
मुळातच वाचावं असं पुस्तक.मजा आली.

महाभारताच्या बाफ वर कर्णासंबंधी चर्चा वाचून दोन पुस्तकांचा उल्लेख करावासा वाटतो :

१. PALACE OF ILLUSIONS by Chitra Banerjee Divakaruni

द्रौपदीला मध्यवर्ती ठेवून लिहिलेली कादंबरी.
बरीचशी फिल्मी आहे .
द्रौपदीचे कुंतीबद्दलचे विचार टिपिकल सासू-सून ड्रामा आहेत .
पण काही काही भाग खासच -
कर्ण आणि द्रौपदीच राजसूय यज्ञाच्यावेळी एकमेकासमोर येणं
द्रौपदीच्या ईन्द्रप्रस्थाबद्दलच्या भावना
कर्ण आणि भीश्म यान्चा शेवटचा संवाद

२.Karna's Wife: The Outcast's Queen by Kavita Kane.

कर्णाची दूसरी पत्नी उर्वी हीची कथा.
कुंतीच्या मैत्रिणीची क्षत्रिय राजक्न्या सूतपूत्राच्या अतोनात प्रेमात पडते.
स्वयंवराच्या वेळी सर्वाची अपेक्षा असते की ती अर्जुनाच्या गळ्यात माळ घालणार.
पण तीचा निर्णय कर्णाला ही धक्का देउन जातो.
उर्वी अतिशय विचारी . प्रत्येक घटनेचा वेगळ्या पद्दतीने विचार करते आणि कर्णाची मार्गदर्शक ठरते.

( इन्द्रप्रस्थचा माया महाल बघून ती कुंतीला विचरते : या सगळ्या जादूची काय गरज होती . हे घर आहे वस्तुसन्ग्राह्लाय नाही)

कर्ण वस्त्रहरणाच्या वेळी तसा का वागला याच वेगळ स्पस्टिकरण, युद्धात कौरावाना का सामील झाला याबद्दल त्याचे विचार ....

अजून वाचतयेच आहे , संपले नाही ... आणी कर्णाच्या प्रेमात अधिकाधिक गुंतण चालूच आहे.

हर्षा भोगलेचं 'आऊट ऑफ बॉक्स' वाचलं.
त्याच्या इंडीयन एक्सप्रेसमध्ये येणार्‍या स्तंभलेखनाचां संकलन आहे. त्याकाळात क्रिकेट बर्‍यापैकी बघितलेलं असल्याने वाचायला छान वाटलं.
प्रत्येक लेखाखाली पार्श्वभुमी दिलेली आहे.. म्हणजे अमुक मालिका, तमुक सामना वगैरे. त्यामुळे सगळे संदर्भ माहित नसले तरी चालतं. अनुवादही ओके आहे. काही काही ठिकाणी खटकतं पण ठिक आहे.
खेळाडूंच्या व्यक्तिमत्त्वांबद्दलचे लेख जास्त आवडले...

केदार, असामी, फारेंड, भाऊ वगैरे मंडळींनी अजून वाचलं नसेल तर नक्की वाचा.. Happy

पर्यटन - एक संजीवनी, हे डॉ लिली जोशी यांचे गेल्याच वर्षी प्रकाशित झालेले छोटेखानी पुस्तक आवडले.
१९७८ पासून सातत्याने त्या प्रवास करत आहेत. भारतात आणि भारताबाहेरच्या अनेक स्थळांबद्दल त्यांनी लिहिलेय.
हार्वर्ड बिझिनेस स्कूल आणि गूगल च्या ऑफिस वरचे लेखही छान आहेत. अन्नपूर्णा बेस कँप वरच्या लेखात, अश्या
हाय अल्टीट्यूड प्रवासात काय काळजी घ्यावी, सामान कसे भरावे, त्यात काय घ्यावे याचे सविस्तर मार्गदर्शन आहे.

दक्षिण आफ्रिकेवरचा लेख, आणि खास करून नेल्सन मंडेला यांचे उद्गार माझ्यासाठी धक्कादायक आहेत.

भटकंतीची आवड असलेल्यांनी अवश्य वाचावे.

वि स वाळिम्ब्यांचं ' हिटलर " कितव्यांदा तरी पुन्हा विकत घेतलय... मजकूर सगळाच माहीत आहे. पारायण आता... त्याची पहिली आवृत्ती मी ७५ रु ला घेतली होती. आताची ५०० रु ला घेतली Happy

फार पूर्वी वाचले होते हिटलर. तो कोठेतरी उभा असतो व त्याने नियतीशी केलेला करार वगैरे काहीतरी सुरूवात होती एवढेच आठवते Happy तेव्हा ते पुस्तक वाचनीय वाटले होते पण.

त्यामानाने वॉर्सा ते हिरोशिमा बोअर झाले.

वॉर्सा ते हिरोशिमा हे ललित पुस्तक म्हनता येनार नाही ती सलग घटनांची जंत्री आहे . पूर्ण युद्धाचा आवाका येण्यासाठी.
हिटलरमध्ये सर्व घटना हिटलरला केंद्रस्थानी ठेवून युद्धाचा पट रेखला आहे. तसे ते हिटलरचे चरित्रही म्हणता येणार नाही....

हो मलाही ती पुढचे पान वाचताना मागचे विसरायला लावणारी जंत्री वाटली. अनेक शहरे, गावे ई. चा उल्लेख करताना अनेक ठिकाणी नकाशे, इतर चित्रे काढून रेडी रेफरन्स द्यायला हवा होता - कारण बर्‍याच वेळा 'बिग पिक्चर' मधे हे सगळे स्थळ व काळ यासंदर्भात कोठे चालले आहे हे आपल्याला लक्षात राहात नाही. पुस्तकाचा जडपणा ही कमी झाला असता. पानांची संख्या वाढली असती पण जास्त वाचनीय झाले असते. अर्थात त्याने किंमत वाढली असती व खप कमी झाला असता. तसेच ते जेव्हा प्रकाशित झाले तेव्हा तसे तंत्रज्ञान आपल्याकडे किती सहज उपलब्ध होते माहीत नाही.

ही पुस्तके जेव्हा निघाली तेव्हा अधिकृत संदर्भांची प्रचंड वानवा होती. तांत्रिक गोष्टी तर आजही न परवडण्यासारख्याच आहेत . आजही एखादे चित्र नकाशा फोटो ,रंगीत फोटो पुस्तकात टाकायला दहा वेळा विचार करावा लागतो, हे प्रकाशनक्षेत्राशी संबंधित लोकाना माहीत आहे... त्या काळी तर ब्लॉक बनवणे नावाचा एक हॉर्र्र्रिबल प्रकार असे...

ते ही बरोबर आहे. आताच्या सहज उपलब्ध असणारे संदर्भ (गूगल, विकीपीडिया), डिजिटल तंत्रज्ञान या निकषांवर जुन्या पुस्तकांचे मूल्यमापन करणे अन्यायकारक आहे.

मात्र यापुढे प्रकाशित होणार्‍या प्रतींमधे थोडे वेगळे काही करायला हवे.

पण ते करण्याचे हक्क कोणाकडे तरी असतील म्हणून तसे लिहीले.

यावरून आठवले (पण या पुस्तकाशी संबंधित नाही). "...ते पत्र वाचताना त्यांच्या चेहर्‍यावर मंद स्मित झळकले..." टाईप वाक्यरचना इतिहासप्रसिद्ध व्यक्तींबद्दल त्या प्रसंगात प्रत्यक्ष उपस्थित नसलेले लेखक का करतात? लेखनात लालित्य यावे म्हणून का? Happy

थॅन्क्स पराग. माझ्याकडे आहे. मला आवडलेले. फक्त भोगलेचे लिखाण वरणभातासारखे वाटते Happy पण्णीकर वगैरे वाचले कि हे अधिकच जाणवते. पण भोगलेच्या लिखाणात जी सच्चाई जाणवते तिला तोड नाही.

Rise and Fall of Third Riech हा दुसर्‍या महायुद्धावरचा नेमके संदर्भ देणारा ग्रंथ वाटतो (अर्थात त्याचे स्वरुप दुसर्‍या महायुद्धापुरतेच नसून १९२० पासून सुरू होते). वाचायला किचकट असला तरी माहिती शोधण्यासाठी घेतलेले कष्ट जाणवतात. भले मग त्याच्या interpretation वर controversay झाली असो :). बहुधा नाझी भस्मासूराचा उदयास्त ह्याचाच अनुवाद होता (नक्की माहित नाही कारण मी वाचलेले नाही)

हो अशीच वाढत जाते यादी. मी याच धाग्यावरून आवडलेली पुस्तक नाव लिहून ठेवते ( मोठी लिस्ट च तयार झालेय) आणि नंतर म्याजेस्तिक च्या दुकानात यादी घेऊन जाते आणि हे पुस्तक दाखवा / ते पुस्तक दाखवा अस चालत . ती चाळते/बराच वेळ वाचते पण तिथल्या स्टुलावर बसून आणि आवडलं कि विकत घेते Happy

मी पण हेच करतो. फरक इतकाच की वेळ कमी असल्याने इंग्रजी पुस्तकांसाठी फ्लिपकार्टवर तर मराठी पुस्तकांसाठी बुकगंगावर चक्कर टाकतो.

वाचायला हवीतच अशा पुस्तकांची यादी मारुतीच्या शेपटासारखी वाढतच जाणार हा धागा वाचून>>
हा बाफ वाचायच्या आधी पु.ल., शेरलॉक, अ‍ॅगाथा, ओ हेन्री, सिडनी शेल्डन, अब्दुल कलाम, सायकल वाल्या आर्मस्ट्रॉगच पुस्तक, स्टिव्ह जोब्स, मॅनेजमेंट - सेल्फ हेल्प वाली भंपक पुस्तकं, असलं काहिबाही वाचुन झालं होतं
हा बाफ वाचल्यानंतर, बरेच लेखक माहिती झाले, काहींचे नाव माहिती होते पण वाचेबल असतिल असं वाटलं नव्हतं, आता इंटरेस्ट निर्माण झालाय, मग epub डालो केले.
आता माझ्या टॅब वर पुस्तकांची संख्या ३०० झाली.. Wink , त्यातली २० पर्यंत आधी वाचली होती. आता बाकी वाचतोय Wink

फक्त भोगलेचे लिखाण वरणभातासारखे वाटते स्मित पण्णीकर वगैरे वाचले कि हे अधिकच जाणवते. पण भोगलेच्या लिखाणात जी सच्चाई जाणवते तिला तोड नाही. >>>>> Happy तू सुनंदन लेल्यांचं लिखाण वाचलस का? अत्यंत सपक आणि उथळ असतं.. मी एक 'बारागावचं पाणी' नावाचं पुस्तक आणलं त्यांच.. क्रिकेट बाफवरच्या अनेकांच्या पोष्टी त्यापेक्षा चांगल्या असतात !

क्रिकेटबद्दलची इंडीयन समर्स आणि आऊट ऑफ कम्फर्ट झोन ही पुस्तक वाचायचीच आहेत.. दोन्ही मिळत नाहीयेत Sad

नाझी भस्मासुराचा उदयास्त मला आवडलं होतं.. हिटलर पण वाचेन आता.

क्रिकेटबद्दलची इंडीयन समर्स आणि आऊट ऑफ कम्फर्ट झोन ही पुस्तक वाचायचीच आहेत.. दोन्ही मिळत नाहीयेत >> माझ्याकडे पहिले आहे, इथे आलास तर देईन :). आकाश चोप्राचे 'आऊट ऑफ द ब्ल्यू' वाचच. लेले वाचलेले नही. मूळात नावच माहित नाहिये तेंव्हा Happy

'प्रतिभा आणि प्रतिमा'

एखादी कादंबरी वाचताना आपल्या डोळ्यासमोर हळूहळू पात्रांचा चेहरा आकार घेत जातो, पण बर्‍याचदा ती प्रतिमा संपूर्ण स्पष्ट नसते. कथानकाच्या ओघात लेखक अनेकदा शारीरिक वैशिष्ट्यांचा उल्लेख करत असला तरी त्यातल्या रिकाम्या जागा वाचकाची कल्पनाशक्ती आपापल्या अनुभव आणि कुवतीप्रमाणे भरून काढत असते.

ही प्रक्रिया बव्हंशी अजाणता होत असली, तरी काही काळाने/पुनर्वाचनात तिच्याकडे त्रयस्थपणे पाहता येऊ शकतं. (विशेषतः कादंबर्‍यांच्या बाबतीत - कवितांच्या बाबतीत व्यक्तिगणिक आणि वाचनागणिक पडत जाणारा फरक फार अधिक असावा आणि एका अर्थी, ते कवितांचं व्यवच्छेदक लक्षणही म्हणता येऊ शकेल.)

या प्रक्रियेचा मागोवा घेणारे 'What We See When We Read' अलीकडे प्रसिद्ध झाले. त्यातला काही भाग येथे वाचता येईल. (लेखातली उदाहरणं जरी इंग्रजी/रशियन 'क्लासिक्स'मधली असली, तरी त्यांच्याजागी मराठीतली उदाहरणं योजून पाहणं फारसं अवघड नसावं.)

Parenting without Borders या नावाचे एक पुस्तक वाचते आहे. Surprising lessons parents around the world can teach us. विविध संस्कृतींमधील बालसंगोपनाबाबतच्या धारणांचा व्यवस्थित तौलनिक मागोवा घेतला आहे. मला आवडले.
-मुलांना सतत व्यक्त व्हायला प्राधान्य देणे
-मुलांना स्वतंत्र खोलीत एकट्याने/पालकांनी स्वतःसोबत झोपवणे
-मुलांना एकट्याने वाढवणे आणि एका समुहाने वाढवणे
-मुलांच्या निमित्ताने अवाढव्य खर्च करुन, सतत नवनवीन वस्तु/खेळण्यांची रास उभी करणे
अशा अनेक बाबींचा व्यवस्थित उहापोह केला आहे. संस्कृतीच्या आवरणाखाली आपल्या किती भाबड्या समजूती असतात आणि मुख्यतः मुलांना वाढवताना जाणता-अजाणता आपण भोवती जे पहात आलो, त्याचा एकत्रित परिणाम आणि त्याचेच काहीसे श्रेष्ठत्व उराशी बाळगणे याची चपखल उदाहरणे ठिकठिकाणी वाचून हसू आले.
शिवाय अमेरिकी पालकत्त्वाचे बा़ळकडु कसे श्रेष्ठ असे पटविणार्‍या अनेक लोकांची आठवण येऊन जरा गंमत वाटली.
इकडे आशियात प्रतीमाणशी चौरस फूट उपलब्ध घरगुती जागा कमी, तुलनेने लोकसंख्या जास्त, याचा परिणाम बालसंगोपनावर, सोयींवर होणारच. मग स्वतंत्र क्रीब, स्वतंत्र खोली, खेळण्यांच्या राशी याची खरंच गरज आहे ? त्याउलट लोकसंख्येमुळे स्पर्धा आणि त्यासाठी शिक्षणासाठी, जागा मिळवण्यासाठी हाय हाय.याचे पालकांवर, मुलांवर येणारे दडपण, आणि शिक्षणपद्धती.- एकुण विचारांना चालना देणारे पुस्तक.

Pages