भक्त - सकाम आणि निष्काम - श्री ज्ञानेश्वरी अभ्यास भाग ११.
अन्तवत्तु फलं तेषां तद्भ्वत्यल्पमेधसाम् |
देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि ||अ. ७ - २३||
(अल्प बुद्धीमुळे त्यांस मिळे फळ अशाश्वत । देवांचे भक्त देवांस माझे ते मज पावती ॥ गीताई ॥)
देवाकडे कोण काय मागेल हे काही सांगता येत नाही. अगदी छोट्याशा गोष्टी मागणार्यांपासून ते मला तुझ्याशिवाय काहीही नको असे म्हणणारे - अशा विविध मंडळींबद्दल स्वतः भगवंत, माऊली काय म्हणाताहेत ते पाहूयात.
सर्वसाधारणतः संसारात काही अडचण आली व तिचे निवारण करण्याचे सर्व मार्ग खुंटले की मग माणूस देवाकडे धाव घेताना दिसतो. या भक्तिलाच सकाम (काही तरी कामना मनात ठेऊन केलेली) भक्ति म्हटले जाते. मनात काही तरी ऐहिकाची इच्छा ठेऊन - मी अमुक एक मंत्र, जप करेन असे तरी म्हणतो वा अमुक अमुक तुला अर्पण करीन असे हा भक्त म्हणतो.
अशा या सकाम भक्तिबद्दल स्वतः भगवंत आणि माऊली काय म्हणताहेत ते पहाणे फार रोचक होईल.
परी ते भक्त मातें नेणती| जे कल्पनेबाहेरी न निघती| म्हणौनि कल्पित फळ पावती| अंतवंत ||१४७||
(जाणती ना माते | सर्वथा ते भक्त | गेले कल्पनेत | गुंतोनी जे ||
म्हणोनिया फळ | पाविती कल्पित | जे का नाशिवंत | स्वभावेचि ||)
जे अल्प(छोट्या) कल्पनेचे भक्त असतात ते त्या कल्पनेच्या बाहेर निघूच शकत नाहीत. हे भक्त मला जाणू शकत नाहीत. त्यांची जी (थिटी) कल्पना असते तेच फळ शेवटी त्यांना मिळते.
किंबहुना ऐसें जें भजन| तें संसाराचेंचि साधन| येर फळभोग तो स्वप्न| नावभरी दिसे ||१४८||
(काय सांगू फार | ऐसे जे भजन | होय ते साधन | भवाचेचि ||
आणि फळभोग | तयांचा संपूर्ण | दिसे जैसे स्वप्न | क्षणमात्र ||)
अशा भक्तांची भक्ति (भजन) हे वस्तुतः संसाराचेच साधन असते. आणि अशा फळभोगाचे काय वर्णन करावे -ते तर एखाद्या स्वप्नासारखे क्षणभंगुरच असायचे.
हें असो परौंते| मग हो कां आवडे तें| परी यजी जो देवतांतें| तो देवत्वासीचि ये ||१४९||
(राहो उहापोह | असो कोणाचेही | दैवत कैसेही | पंडुसुता ||
परी देवतांचे | करी जो पूजन | देवत्वचि जाण | लाभे तया ||)
तर आता हे असो. कोणाचे काही का दैवत असे ना का, जो ज्या देवताचे पूजन करतो त्याला त्या देवत्वाची प्राप्ती होते.
येर तनुमनुप्राणी| जे अनुसरले माझेयाचि वाहणीं| ते देहाच्या निर्वाणीं| मीचि होती ||१५०||
(आणि जे मद्भक्त | तन मन प्राण | भावे समर्पून | माझ्या ठायी ||
चालविती नित्य | माझेचि भजन | मी चि होती जाण | देहान्ती ते ||)
बाकीचे जे कोणी तन-मन-प्राण सर्वकाही माझ्याठिकाणी समर्पण करतात ते देहान्तसमयी मत्स्वरुपच होतात.
इथे देव म्हणजे देवता असा एक छोटासा फरक आहे. आणि मुख्य देव म्हणजे परब्रह्म ज्याचा उल्लेख भगवंतांनी "मी" असा केलेला आहे - जे अनुसरले माझेयाचि वाहणीं |
या परब्रह्मापासून बाकी सार्या काही गोष्टी निर्माण झाल्यात ज्यात या देवता ही आल्या (गणेश, शिव, देवी, वा इतरही सर्व )
इथे एक लक्षात घ्यायला पाहिजे की हे सर्व भक्तच आहेत. पण ते अनेक पातळ्यांवरचे भक्त आहेत. जे काही आपल्याला हवे आहे ते देवाकडेच मागावे असे ज्यांना वाटते त्यांच्याकरताच हे सारे आहे.
आता यात जे अगदी प्राथमिक अवस्थेत आहे - ज्यांची कल्पनाशक्तिच अतिशय अल्प/ छोटी/ थिटी आहे ते संसारातले काहीबाही मागत असतात - जसे पैसा-अडका, मान-सन्मान, आरोग्य, इ.
इथे प्रत्यक्ष भगवंतच अशा मंडळींकडे अल्प कल्पना आहेत असे जे म्हणताहेत हे नीट समजून घ्यायला पाहिजे. कारण सुख तर सर्वांनाच हवे असते. त्यामुळे सुख-साधने भगवंताकडे मागितली तर काय बिघडले असे अनेकांना वाटेल - पण आपण हे देखील लक्षात घ्यायला पाहिजे की अशी किती सुख-साधने आपण देवाकडे मागणार - त्याला काहीही मर्यादाच नाहीत. दुसरे असे की अनेक सुख-साधने समोर असतील पण ती भोगण्याकरता आपला देह तेवढा सक्षम नसेल तर काय उपयोग ?
अजून एक महत्वाची गोष्ट अशी की आपल्याला जे काही हवे आहे त्याकरता मनुष्य किती अपार कष्ट करतो - उदा. - बहुतांपरी संकटे साधनाची
व्रते दान उद्यापने ती धनाची || मनोबोध
किती ते उपवास, किती यज्ञ-याग आणखीनही काही काही... हे सारे किती कष्ट सोसून माणसे करीत असतात - आणि याबदल्यात काय मागतात तर अतिशय क्षुल्लक ऐहिक गोष्टी. ज्या गोष्टी केव्हातरी संपणार्या आहेत.
मागील शतकात सुप्रसिद्ध काशीक्षेत्री त्रैलंग्यस्वामी म्हणून एक सिद्धपुरुष होऊन गेले. परमार्थातील फार उच्च अवस्था प्राप्त केलेले ते अवलिया वृत्तीचे होते. त्यांच्या मर्जीने कुठेही पडून असत. त्यांचा पारमार्थिक अधिकार इतका मोठा होता की प्रत्यक्ष रामकृष्ण परमहंसही या महाराजांचे दर्शन घेण्याला उत्सुक होते. अशा या स्वामींच्या कडून आपल्याला काही मिळावे म्हणून एक महाराष्ट्रीय गृहस्थ फार प्रयत्न करीत होते. स्वामी तर अशा कोणालाही थारा देखील देत नसत. पण या गृहस्थांनी चिकाटी सोडली नाही तेव्हा एकदा ते स्वामी वैतागून त्यांना म्हणाले - क्यूं मेरे पीछे पडे हो ?? क्या चाहिए आखिर तुम्हें ?? - या गृहस्थाने काय मागावे ?? - "मी प्रसिद्ध कीर्तनकार व्हावे !!" त्यावर स्वामींनी तिटकार्याने का होईना - हां, हो जाएगा !! असे शब्द उच्चारले.
जेव्हा पूजनीय श्री. गोंदवलेकर महाराजांना याबद्दल कळले तेव्हा ते म्हणाले - हे तर स्वतःजवळची कामधेनू देऊन त्याबदल्यात गाढव घेण्यासारखे झाले की ..... (कारण वस्तुस्थिती अशी होती की जर या गृहस्थांनी मुक्ति(मोक्ष) जरी मागितली असती तरी त्या स्वामींनी तशी कृपा केली असती - पण हा दुर्दैवी गृहस्थ !!)
जिथे साधनेचे विविध कष्ट करुन प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती करुन घेता येते तिथे जर आपण साध्या -क्षुल्लक संसारी गोष्टी मागू लागलो तर आपली कल्पनाशक्ति किती खुजी, किती अल्प म्हणायची !! - भगवंतांनी, माऊलींनी आणि सार्याच संतांनी याबद्दल अतिशय तीव्र नाराजीच व्यक्त केलीये. इथे भगवंताची प्राप्ती म्हणजे काय हे देखील समजून घेणे आवश्यक आहे - कारण सर्वसामान्यांची अशी समजूत असते (गैरसमजूतच ही...) की आपण रस्त्याने चाललो आहोत आणि समोरुन डोक्यावर मुगुट, हातात गदा-चक्र असलेली एक व्यक्ति येणार - झाले भगवंताचे दर्शन...
वस्तुतः भगवंताची प्राप्ती म्हणजे अखंड समाधान, अखंड शांती .... संसाराच्या कोणत्याही परिस्थितीत जी ढळत नाही ती असीम शांती ... सदा सर्वदा संतुष्ट चित्त.
अशा परमशांत व्यक्तिवर कितीही शारिरीक, सांपत्तिक संकटे आली तरी त्यातही त्या व्यक्तिची प्रसन्नता ढळत नाही.
भक्तीचें ते वर्म जयाचिये हातीं । तया घरी शांति दया ॥१॥
अष्टमासिद्धि वोळगती द्वारीं । न वजती दुरी दवडितां॥ध्रु.॥
तेथें दुष्ट गुण न मिळे नि:शेष । चैतन्याचा वास जयामाजी ॥२॥
संतुष्ट हे चित्त सदा सर्वकाळ । तुटली हळहळ त्रिगुणाची ॥३॥
तुका म्हणे येथें काय तो संदेह । आमचें गौरव आम्ही करूं ॥४॥४११४||
या अभंगात बुवांनी भक्तिचे वर्मच उलगडून सांगितले आहे. सदा सर्वकाळ संतुष्ट चित्त असे खर्या नि:काम भक्ताचे लक्षण बुवांनी आवर्जून सांगितले आहे.
या सगळ्याचा अंतर्मुख होऊन आपण विचार आणि त्याप्रमाणे आचरण करणे अतिशय गरजेचे आहे ....
हरि ॐ ||
-----------------------------------------------------------------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/46338 श्री ज्ञानेश्वरी अभ्यास -भाग १
http://www.maayboli.com/node/46384 श्री ज्ञानेश्वरी अभ्यास -भाग २
http://www.maayboli.com/node/46475 श्री ज्ञानेश्वरी अभ्यास -भाग ३
http://www.maayboli.com/node/46591 श्री ज्ञानेश्वरी अभ्यास -भाग ४
http://www.maayboli.com/node/46666 श्री ज्ञानेश्वरी अभ्यास -भाग ५
http://www.maayboli.com/node/46874 श्री ज्ञानेश्वरी अभ्यास -भाग ६
http://www.maayboli.com/node/46911 श्री ज्ञानेश्वरी अभ्यास -भाग ७
http://www.maayboli.com/node/46959 श्री ज्ञानेश्वरी अभ्यास -भाग ८
http://www.maayboli.com/node/48725 श्री ज्ञानेश्वरी अभ्यास -भाग ९
http://www.maayboli.com/node/49241 श्री ज्ञानेश्वरी अभ्यास -भाग १०
--------------------------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ -
१] http://abhangdnyaneshwari.org/
२] http://sanskritdocuments.org/marathi/
३] http://www.gharogharidnyaneshwari.com/
-------------------------------------------------------------------------------------------------------------
खूप आवडलं. हेमाडपंत विरचित
खूप आवडलं.
हेमाडपंत विरचित साईसच्चरितात या संबंधी साईनाथांचे शब्द आहेत, ते असे:-
उतू चालला आहे खजिना | एकही कोणी गाड्या आणिना | खणा म्हणता कोणी खणीना | प्रयत्न कुणाही करवेना ||
कळंतय पण वळत नाही, असे मला
कळंतय पण वळत नाही, असे मला झालेय.
मला स्वतःला माऊलींबद्दल जास्त आदर आणि भक्ती आहे.
खुप छान शब्दात
खुप छान शब्दात मांडलत.
शशांकजी तुमच्या सल्ल्यानुसार मी ज्ञानेश्वरी काकांकडून मागून आणली खरी पण पहिले २-३ अध्याय वाचून ती तशीच आहे. तुमच्या ह्या धाग्याच्या माध्यमातूनच माझे ज्ञानेश्वरी वाचन होईल बहुतेक.
>>> भगवंताची प्राप्ती म्हणजे
>>> भगवंताची प्राप्ती म्हणजे अखंड समाधान, अखंड शांती .... संसाराच्या कोणत्याही परिस्थितीत जी ढळत नाही ती असीम शांती ... सदा सर्वदा संतुष्ट चित्त.>>> किती सोपा करून सांगितलय तुम्ही.पण आचरणात आणायला तितकेच कठीण
सुंदर! संतांचे अनुकरण
सुंदर!
संतांचे अनुकरण करण्याबद्दल सतत आपल्याला सांगितले जाते. बहुतेक वेळा तसे करणे अशक्यप्राय असते आपल्याला कारण आपण संसारात आकंठ बुडालेले असतो. पण आपल्या साधनेचे ध्येय ठरवताना तरी निदान संतांचे अनुकरण करावे. अर्थात तो खरा संत आहे याची खात्री पटल्यावरच.
पण आपल्या साधनेचे ध्येय
पण आपल्या साधनेचे ध्येय ठरवताना तरी निदान संतांचे अनुकरण करावे. अर्थात तो खरा संत आहे याची खात्री पटल्यावरच. >>>>>> अगदी खरे आहे माधवराव .....
सर्वांचे मनापासून आभार ....
आपले ज्ञानेश्वरीवरील काही
आपले ज्ञानेश्वरीवरील काही धागे वाचले आज , छान लिखाण ....