Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पहिल्या काही पानांमधे पहिली
पहिल्या काही पानांमधे पहिली गोष्ट तुमच्या समोर येते ती कथानकाची अवाढव्य व्याप्ती. प्रत्येक पुस्तकाच्या सुरूवातीला नि शेवटी त्या भागामधे होणार्या घटना कुठे होताहेत ते कळावे म्हणून नकाशे दिलेले आहेत. (मी सुरूवातीचे काहि दिवस हि त्यांची फोटो कॉपी बाजूला ठेवून बसत असे.)प्रत्येक भागाच्या शेवटी मुख्य राज घराणी नि त्यांची वंशावळ - Who's who नि घटनावळी दिलेली आहे. हे मध्ये मध्ये बघितल्याशिवाय सुरुवातीला संगती लागणे अतिशय कठीण आहे.
>> हा पॅरा वाचून "ये अपने बस की बात नही" हे नक्की झालं. पण तुला ती सिरीज किती आवडली आहे ते लगेच लक्षात येतय मस्त लिहिलं आहे परिचय/परिक्षण.
सिरीज आधी सुरु करावी का?
सिरीज आधी सुरु करावी का? वंशावळ आणि नकाशा घेऊन सुरुवातीला कंटाळवाण होईल असं इथे बसून वाटतंय. धन्यवाद.
अत्रे हॉल समोरचे दुकान>> फा ला अनुमोदन.
'रसिक'चा माझा ही अनुभव बरा आहे. ठाण्याच्या म्याजेस्टिकचा पण चांगला आहे.
शूंपी,अमित एव्हढेही कठीण जात
शूंपी,अमित एव्हढेही कठीण जात नाहि ग. पहिले पुस्तक अर्धे अधिक झाले कि लक्षात राहते बर्यापैकी कुठे काय आहे ते. नेटवर पण बरेच interactive maps आहेत अगदीच हरवलो तर.
अमोल, अमित मी पुस्तकासाठी partial आहे.
असामी, बाकी सगळं राहू द्या,
असामी,
बाकी सगळं राहू द्या, ४५ दिवसांत ५५०० पानं वाचून संपवणं म्हणजे अमानवी कार्य आहे. रोज सरासरी १२५ पानं वाचणं खरोखरंच कठीण काम आहे.
आ.न.,
-गा.पै.
अहो पुस्तकाला फ्लो असा आहे कि
अहो पुस्तकाला फ्लो असा आहे कि सुरू केले कि थांबवत नाही. सुरूवातीची १०० एक पाने मेहनत करावी लागते पण एकदा नजर बसली कि थांबणे कठीण होते. प्रयत्न करून बघा. त्या वैद्य बुवांनी तर टॅबलेट वर वाचलय, आत्ता बोला.
@ असामी - उत्तम परिचय! बरंच
@ असामी - उत्तम परिचय!
बरंच ऐकलं आहे 'गेम ऑफ थ्रोन्स'बद्दल पण अजून वाचण्याचा/पाहण्याचा योग नाही आला. हाती घेतलेली पुस्तकं वाचून झाली की मिळवून वाचेन ही मालिका.
>>पण तुला ती सिरीज किती आवडली
>>पण तुला ती सिरीज किती आवडली आहे ते लगेच लक्षात येतय मस्त लिहिलं आहे परिचय/परिक्षण.>> सहमत शूम्पी. एकूण कथानकावद्दल वाचून मला पुस्तक्/सिरियल आवडेल असं वाटत नाहीये.
अरे, हे गेम ऑफ थ्रोन्स
अरे, हे गेम ऑफ थ्रोन्स वाचायचं फार दिवसापासून लिस्टमध्ये आहे. माझा अगदी आवडता जॉनर. आता मागवतेच...
असामी, सॉलीड परिचय; मिनी लेखच
असामी, सॉलीड परिचय; मिनी लेखच झालाय!
रॉबीनहूड, तुम्हांला हवी
रॉबीनहूड,
तुम्हांला हवी असलेली दोन्ही पुस्तकं मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहेत.
हिटलर - https://kharedi.maayboli.com/shop/Hitalar.html
कामाची किमया - https://kharedi.maayboli.com/shop/Kamachi-Kimaya.html
अजूनही काही पुस्तकं विकत घ्यायची असल्यास नक्की सांगा. खरेदीविभागात उपलब्ध करून देऊ.
रुपये तीनशेहून अधिक खरेदीवर भारतात शिपिंग मोफत.
कॅश ऑन डीलीव्ह्री चालू करा..
कॅश ऑन डीलीव्ह्री चालू करा.. प्लीज प्लीज प्लीज!!!
असामी, मस्तच परिचय दिलायस.
असामी, मस्तच परिचय दिलायस. थँक्स.
प्रचंड इंटरेस्टिंग वाटतंय. हा खाऊ बराच काळ पुरेल
अ.ब. चौकातले 'रसिक'? तेथे तर
अ.ब. चौकातले 'रसिक'? तेथे तर कायमच चांगला अनुभव आलेला आहे. काउंटरवरचेच लोक नव्हे, तर दुकानात जी काही छोटी 'आईल्स' आहेत तेथे फिरणारे एक दोन लोक असतात त्यांचाही. रसिक वाले सहसा पुस्तक नसेल तर नाव व आपला फोन नं लिहून घेतात >>>>>> माझाही असाच अनुभव आहे. त्यांची २ दुकाने आहेत. शिवाय त्यांच्या नंबरवर आधी फोन करून आपल्याला हवी ती पुस्तके मिळतील का, याची चौकशी पण करू शकतो. उगाच 'इथे येऊन बघा काय ते' असले शेरे मिळत नाहीत.
नंतर पुन्हा कधीही त्यांनी फॉलो अप केला नाही हे ही खरे >>>> मला त्यांनी फोन करून आधी न मिळालेले पुस्तक आता आलंय, असे कळवले. मला तेव्हा ते पुस्तक विकत घेता आले नाही तर माझ्या मेंबरशिप नंबरसकट ते जपून ठेवले. २ महिन्यांनी मी ते(माझा नंबर मागच्या पानावर लिहिलेले) पुस्तक विकत घेतले. तेव्हापासून आम्ही रसिकचे एकदम फॅन झालो आहोत, हे सांगणे न लगे.
माझाही रसिक दुकानाबद्दल
माझाही रसिक दुकानाबद्दल चांगला अनुभव आहे. अमोल, धारा +१
चिनूक्स , माझा ठिय्या एका
चिनूक्स , माझा ठिय्या एका जागेवर नसतो ना ! त्यामुळे काही मागवायचे म्हतले की पोटात गोळा येतो. चेन्नाई च्या हॉटेलात विसरलेला फोन कुरीअरने त्याणी पाठवला त्याला एक महिना झाला अजून त्या फोनची आणि माझी भेट होईना....
रुपये तीनशेहून अधिक खरेदीवर
रुपये तीनशेहून अधिक खरेदीवर भारतात शिपिंग मोफत >>>> हे कधी झालं? आधी सगळ्या खरेदीवर शिपिंग फ्री होतं ना भारतात?
<आधी सगळ्या खरेदीवर शिपिंग
<आधी सगळ्या खरेदीवर शिपिंग फ्री होतं ना भारतात?>
नाही.
रॉबीनहूड,
हरकत नाही. पुन्हा एखादं पुस्तक मिळालं नाही, तर नक्की सांगा.
क्सा, युएसमध्ये शिपिंगचा खर्च
क्सा, युएसमध्ये शिपिंगचा खर्च काय आहे माबो खरेदी पुस्तकांचा?
शैलजा अरण्येर अधिकार
शैलजा
अरण्येर अधिकार >>>
महाश्वेता देवींच मस्त पुस्तकं आहे …
त्यांच्या एका पुस्तकावर म्हादू नावाचा चित्रपट आलाय न आत्ता .. पुस्तक कसं आहे कुणी सांगू शकाल का प्लीज
" Have you not heard that
" Have you not heard that when two brothers fight a stranger reaps the harvest? How many white men went in the party that destroyed Abame? Do you know? Five… Five. Now have you ever heard that five people – even if their heads reached the sky – could overrun a whole clan? Impossible. With all their power and magic white men would not have overrun entire Olu and Igbo if we did not help them. Who showed them the way to Abame? They were not born there, how then did they find the way? We showed them and we are still showing them.”
अॅरो ऑफ गॉड -Chinua Achebe
काही काही पुस्तकं वाचताना असे वाटते की आपण आपला (भारताचा) इतिहास पुनश्च वाचत आहोत. अॅऱो ऑफ गॉड (किंवा Chinua Achebe ह्यांची पूर्ण अफ्रिकन ट्रिलजी) वाचताना ते सारखे वाटत राहते.
ही कथा आहे Ezeulu ची. इझिउलू हा ६ गावांत वसणार्या एका नायजेरियन क्लॅनचा मुख्य पुजारी. पुस्तकाचा कालावधी साधारण १९२० च्या आसपास आहे. ह्या काळात पूर्ण जगातच खूप घडामोडी झाल्या, नायजेरिया तरी अपवाद कसा असेल. नायजेरियात तेंव्हा कॉलनायझेशन येऊ घातलं होतं. काही ठिकाणी ब्रिटिशांच्या वसावतवादाने पक्कं स्थान निर्माण केलं होतं तर काही ठिकाणी तो रूजू पाहत होता. वसाहतींच्या सोबत त्याअनुषंगाने येणारे ख्रिश्चनायझेशन आणि त्यासर्वांच्या पूर्वापार चालत आलेल्या रुढी परंपरावर होणारा परिणाम व त्यातून निर्माण होणारे द्वद्वं हे पुस्तक मांडते. हे द्वंद्व इतके प्रभावी आहे की बरेचदा Ezeuluचे कॅरेक्टर खूप रिलेट होत राहते. संस्कृतीत होणारे बदल हे सामावून घेताना निर्माण होणारा खडखडाट अप्रतिम रितीने उतरला आहे.
Ezeulu चा परिवार खूप मोठा आहे. त्याला तीन बायका (त्यातील एक दिवंगत) आणि खंडीभर मुलं आहेत. त्याचे त्याचा बायकांशी वागणे हे पुरूषप्रधाण आहे. जे की त्यावेळेस बहुतेक सर्वच संस्कृतीत होते.
Ezeulu हा धोरणी आहे, ख्रिश्चन मिशन मध्ये आपल्या एका मुलाला तिथे नक्की काय शिकवतात / काय चालू आहे ते पाहायला तो पाठवतो. पण मुलगा मुख्य उद्देश विसरून स्वतः बदलतो, तो बदलल्यावर होणारा परिणाम लेखक खूप चांगल्या रितीने मांडतो.
दोन क्लॅनमध्ये एका रानावरून वाद होतो. परंपरेने Ezeulu ची क्लॅन ते रान वापरते, पण ते असे ओकपेरींचे. Ezeulu म्हणतो की, हे रान त्यांचे आहे, पण त्याच्या क्लॅनला हे मान्य होत नाही म्हणून ते ब्रिटिंशांकडे जाते. तेथील अधिकारी विन्टबॉटा Ezeulu च्या क्लॅनच्या विरोधी निर्णय देतात कारण Ezeulu च त्यांना तसे द्यायला सांगतो. (खर्याची बाजू)
कॉलनाझेशन करायला अलेले विन्टबॉटा (विन्टरबॉटम) हे गृहस्थ चांगले असतात, त्यांना लंडनवरून आलेले सर्व आदेश मान्य नसतात, पण त्यापुढे त्यांचे काही चालत नाही त्यातच एक पॉलिसी येते की कुणाला तरी नावापुरता राजा करावं आणि विन्टबॉटाला वाटतं की Ezeulu हा रॅशनल माणूस आहे आणि तसाही तो त्या क्लॅनचा मुख्य पुजारी असल्यामुळे पुढारी आहे, तर त्याला आपण राजा करू आणि ह्या क्लॅनवर त्याच्यातर्फे कंट्रोल करू. पण Ezeulu त्याला बधत नाही. आणि त्यातून अनेक घटना घडत जातात. त्या कशा घडतात, पुढे काय होते हे पुस्तकात वाचणेच उचित.
हे पुस्तक वाचणे म्हणजे जणू, नायजेरिय इबो कल्चरचा एक अभ्यासच. मध्ये मध्ये अनेक गोष्टी भारतीय संस्कृतीशी रिलेट होतात, उदा. त्या क्लॅनचा पवित्र प्राणी म्हणजे अजगर. पूर्ण पृथ्वी अजगरानेच डोक्यावर घेतली आहे ही त्यांची समजूत आहे. (आठवा शेषनाग) किंवा मग लग्नानंतर त्यांच्या एक विधी आहे, तो म्हणजे वर, वधूने जाऊन चौरस्त्यावर अन्न सोडून येणे. (अश्याच पद्धतीचा विधी आपल्याकडेही आहे).
पुस्तकाचा क्लायमेक्स पूर्ण पुस्तक वाचून होईपर्यंत कळत नाही. रादर जो क्लायमॅक्स आपण अॅन्टिसिपेट करत राहतो, तसा अजिबात होत नाही. (मी इथे क्लायमॅक्स देत नाही) आणि पुस्तक हे काही लुझ एन्ड सोडून समाप्त होतं. ते शेवटचं पान सटल लेवलवर समजून घ्यावे लागते. पण त्याची संस्कृती नाश होताना वाटणारे नैराश्य हे Ezeulu चे कॅरेक्टर पूर्ण ताकदीने उभे करते.
लेखक कॉलनाझेशन होताना कुणालाही दोष देत नाही, त्याची स्वतःची मत पुस्तकात अजिबात दिसत नाहीत.
एक मस्ट रिड पुस्तक !
सर्व बोलतात छाने छाने म्हणुन
सर्व बोलतात छाने छाने म्हणुन श्रीमान योगी वाचायला घेतलय तर रणजीत देसाईंनी अर्धा माल चोरीचाच टाकलाय की....बाबासाहेब पुरंदरे आणि शिवाजी सावंताच्या पुस्तकातुन......
वरील दोन लेखकांची पुस्तके श्रीमान योगी च्या आधी प्रकाशित झालेली आहेत... आणि इतक्या मोठ्या पुस्तकात बरेचसे प्रसंग इथुन तिथुन ढापलेलेच आहेत अगदी सेम वाक्यात.....
नवीन पुस्तकाचा परिचय करून
नवीन पुस्तकाचा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद केजो.. चिनुआ अचेबेचे थिन्ग्ज फॉल अपार्ट हे अपार आवडले होते. ते एका त्रयीचा भाग आहे हे माहितीच नव्हते. इथल्या ग्रंथालयात तिन्ही पुस्तके एकाच पुस्तकात समाविष्ट आहेत. आता पुढल्या वेळी आणतोच.
तू, नंदन, रैना व इथे लिहिणार्या इतर अनेक जणांच्या वाचनाला सलाम!
टण्या, धन्यवाद थिन्ग्ज फॉल
टण्या, धन्यवाद
थिन्ग्ज फॉल अपार्ट हे फर्स्ट ऑफ थ्री. तुला ते आवडले असेल तर हे त्याहून जास्त आवडेल. ह्या माणसाच्या लेखणीत अफाट ताकद आहे.
केदार, जबरी. वाचायला हवे.
केदार, जबरी. वाचायला हवे.
टीना, हो, मला आवडले ते
टीना, हो, मला आवडले ते पुस्तक.
केदार, भारी
कालच अत्रे सभागृहातून बरीच
कालच अत्रे सभागृहातून बरीच पुस्तके विकत घेतली.
१. घरी गेल्यावर समजलं...काही पुस्तकांचे प्रिंट फिसकटल्यासारखे आहे...म्हणजे हे पायरेटेड आहे की काय? कसे समजणार ?
२. पूर्वरंग - किंमत २५०? पु.लं ची पुस्तके १५० पेक्षा महाग कधीच नव्हती? ही किंमत कशी वाढली एवढी?
पूर्वरंग - किंमत २५०? पु.लं
पूर्वरंग - किंमत २५०? पु.लं ची पुस्तके १५० पेक्षा महाग कधीच नव्हती? ही किंमत कशी वाढली एवढी?
>>> make the hay while the Sun shines
मंगला गोडबोले यांचे
मंगला गोडबोले यांचे 'सुनीताबाई....' वाचलं अप्रतिम आहे.
गेल्या तीन महिन्यांत वाचलेली
गेल्या तीन महिन्यांत वाचलेली पुस्तकं -
१. नेहमीचे यशस्वी (मार्केस, मुराकामी):
एखादा नामवंत साहित्यिक दिवंगत झाल्यानंतर किंवा त्याला/तिला एखादा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्यानंतर अचानक त्याच्या पुस्तकांची मागणी वाढते. स्नॉबिशपणा म्हणा हवं तर, पण एकंदर अशा तात्पुरत्या zeitgeist-y लाटेकडे मुद्दाम दुर्लक्ष करण्याचं आजवर धोरण होतं. मात्र स्थानिक लायब्ररीत अगदी दर्शनी भागात मार्केसची पुस्तकं मांडलेली पाहून, ते धोरण बासनात गुंडाळलं आणि 'Love in the Time of Cholera' व 'The Autumn of the Patriarch' घेऊन घरी आलो.
साठीकडे झुकलेल्या, नोबेल मिळाल्यानंतर आता यापुढची कारकीर्द उताराचीच की काय अशा शंकांनी किंचित ग्रस्त असणार्या मार्केसने आपल्या लेखणीची ताकद 'Love in the Time of Cholera' मध्ये पुन्हा जोखून पाहिली, असं म्हणतात. पण कादंबरीत त्याचा तो बुलंद, 'लार्जर दॅन लाईफ' आवाज जसा जाणवत राहतो; तसाच आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवरच्या नैतिक/अनैतिक/ननैतिक प्रेम-आकर्षण-शरीरसंबंध-दैनंदिन रुटीनमधल्या बारक्या-सारक्या बाबी यांचं वर्णन करताना समजूतदार, प्रगल्भ, काहीसा तटस्थही. 1Q84 ही मुराकामीची कादंबरी साधारण याच सुमारास वाचली होती. त्यातल्या शारीर गोष्टींच्या वर्णनांच्या पुनरुक्तीच्या पार्श्वभूमीवर '...Cholera' मधला हा बहुरंगी स्पेक्ट्रम अधिक उठून दिसतो. 'वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड'ची भव्यता नसली आणि 'मॅजिकल रिअॅलिझम'ची दिव्यता अगदी तुरळक जागी डोकावत असली; तरी अगदी मार्केसपरंपरेत शोभावी अशी कादंबरी.
The Autumn of the Patriarch वाचणं म्हणजे थकवून टाकणारा मामला आहे. अडीचशे पानांच्या ह्या कादंबरीत जेमतेम साठ-सत्तर वाक्यं असावीत. एक वाक्य जे सुरू होतं, ते सर्वनामं - विरामचिन्हं - संवाद किंवा वक्ताबदल दर्शवणारे संकेत या कशाचीही तमा न बाळगता 'वाहत-येईल-पूर-अनावर' मोडमध्ये तुम्हांला बुडवून टाकतं. दक्षिण अमेरिकेतल्या अनेक हुकुमशहांच्या जीवनाचे आणि त्यांच्या कारकीर्दीचे संदर्भ ह्या अद्भुत, पॅनोरॅमिक वर्णनात जागोजागी येतात आणि प्रसंगी अस्वस्थ करून जातात. तुकड्या-तुकड्याने वाचण्याचे हे पुस्तकच नोहे. इतर व्यवधानं दूर ठेवून, अडखळत - पुन्हा वाक्याच्या सुरूवातीपासून वाचायला लागून - वाचनाची लय सापडतेय तोवर पुन्हा अनपेक्षित जागी थबकायला होऊनही वाचत रहावं असं.
मुराकामीच्या आधीच्या पुस्तकांच्या तुलनेत 1Q84ने काहीशी निराशाच केली. चंद्र, पाश्चिमात्य क्लासिकल संगीत, कडवे धार्मिक पंथ ह्या नेहमीच्या गोष्टी यात आहेत, पण कथानक काबुकी नृत्यासारखं संथ, फारसं काहीच न 'घडणारं' आणि प्रसंगी पुनरुक्ती असणारं वाटलं. असं असलं तरी कादंबरी अर्ध्यावर सोडून द्यावी असं वाटलं नाही. (मुराकामीची इतर पुस्तकं वाचली नसतील आणि हेच जर प्रथम हाती पडलं तर मात्र कदाचित वाचकाचं मत प्रतिकूल होऊ शकतं, असं वाटतं. त्यापेक्षा 'काफ्का ऑन द शोअर' किंवा अन्य कथासंग्रह हे अधिक श्रेयस्कर ठरावेत.)
२. युद्धविरोधी - सटायर इत्यादी:
* Slaughterhouse-Five वाचताना 'हे पुस्तक इतके दिवस का वाचलं नाही?' असं वेळोवेळी वाटत राहिलं. १९६९ साली, म्हणजे ऐन व्हिएतनाम युद्धाच्या धामधुमीत - आणि पर्यायाने अमेरिकन समाजात घडून येत असणार्या मंथनाच्या काळात हे पुस्तक प्रसिद्ध झालं. दुसर्या महायुद्धातल्या, ड्रेस्डेनच्या त्या अनावश्यक बॉम्बिंगपासून सुदैवाने बचावलेल्या वॉनेगटने त्याच पार्श्वभूमीवर लिहिलेल्या ह्या पुस्तकाला केवळ 'युद्धविरोधी' हे लेबल लावणं अन्याय्य ठरेल, पण 'Catch 22' meets 'The Hitchhiker's Guide to Galaxy' असं म्हटलं तर ते अधिक योग्य ठरावं. 'कॅच-२२' मधली गंमत एकदा कळली की काही वेळाने ती थोडी रिपिटेटिव्ह होते, पण या पुस्तकाबद्दल तसं होत नाही कारण विसंगती आणि वैय्यर्थासोबतच युद्धविरोधी कादंबर्यांच्या मर्यादांची असलेली self-referential जाणीव, टाईम-ट्रॅव्हलची धमाल, येशू ख्रिस्ताचा चलनी नाण्यासारखा उपयोग करणार्या कन्झर्व्हेटिव्ह विचारसरणीत 'गरीब लोकांच्या गरिबीला तेच कारणीभूत आहेत' ह्या ठाम मतातला विरोधाभास इ. निरनिराळ्या गोष्टी या पुस्तकात येऊन जातात.
* A Case of Exploding Mangoes हे २००९ साली प्रकाशित झालेलं, जनरल झियांच्या विमान अपघातात (विमान - 'पाक वन') झालेल्या रहस्यमय मृत्यूभवती गुंफलेलं पुस्तक. या अपघातानंतर नेहमीप्रमाणे कॉन्स्पिरसी थिअरीजना आलेला ऊत, भारतीय उपखंडातल्या इंग्लिशची ती विशिष्ट लकब, लष्करातली नोकरशाही आणि तत्कालीन समाज या सार्यांवरती irreverent म्हणता येईल असं भाष्य आहे. लष्कर, झिया आणि सरंजमशाही मनोवृत्ती यांची मनसोक्त रेवडी उडवणारा bisexual नायक असणारं हे पुस्तक पाकिस्तानातही लोकप्रिय आहे.
* Our Man in Havana हे ग्रॅहम ग्रीनचं पुस्तक तत्कालीन 'स्पाय थ्रिलर' पुस्तकांपेक्षा बरंच निराळं आहे. बायकोपासून विभक्त झालेला एक वत्सल पिता आपल्या मुलीच्या भविष्यासाठी तरतूद म्हणून ब्रिटिश सिक्रेट सर्व्हिसला कसं बेमालूम (पण फसवणुकीचा वाईट हेतू नसताना) गंडवतो; असं याच ढोबळ कथानक आहे. पण त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे १९५९ साली प्रसिद्ध झालेल्या ह्या पुस्तकाचं क्युबात घडणारं कथानक आणि १९६२ साली क्युबन मिसाईल क्रायसिसच्या दरम्यान घडलेल्या घटना यांच्यातलं काही बाबतीतलं विलक्षण साम्य. (ग्रॅहम ग्रीनचंच १९५५ साली प्रसिद्ध झालेलं 'The Quiet American' मागे वाचलं होतं. त्याच्या कथानकाचे पडसादही पुढच्या दशकातल्या व्हिएतनाम युद्धातल्या घडामोडींत दिसून येतात. येथे त्याचा काही भाग वाचता येईल.) दूरदृष्टीचा भाग बाजूला ठेवला तरी ग्रीनची खास ब्रिटिश पॅट्रिशियन शैली हे अजून एक वैशिष्ट्य.
* Coroner's Lunch - Colin Cotterill
व्हिएतनाम युद्धात ओढल्या गेलेल्या लाओसमध्ये १९७६ साली कम्युनिस्टांची सत्ता आली आहे. बहुतांश सुशिक्षित वर्गाने नदीपलीकडच्या थायलंडमध्ये आश्रय घेतला आहे. अशा वेळी वयाच्या सत्तरीतल्या, केवळ सोयीपुरत्या कम्युनिस्ट असणार्या विधुर, एकट्या डॉक्टरची संपूर्ण देशाच्या Coroner (शवविच्छेदनविभागप्रमुख?) पदी नेमणूक होते. हलाखीचं जगणं, कामाकरता अपुरी साधनं, टिपिकल कम्युनिस्ट 'लाल' फीत आणि अधूनमधून वेगळ्या मितीतून भेटीस येणारे अनाहूत पाहुणे यातून डॉ. सिरी त्याच्याकडे आलेल्या केसेसमधून 'मर्डर मिस्टरी'ची उकल करत जातो. मात्र अनेक वर्षं आग्नेय आशियात राहणार्या आणि पेशाने व्यंगचित्रकार(देखील) असणार्या लेखकाची नेमकी विसंगती टिपण्याची दृष्टी आणि बारकाव्यांनिशी उभं राहणारं लाओसचं चित्र ह्या बाबी रहस्यउकलीपेक्षाही अधिक रोचक. हे पुस्तक सुचवल्याबद्दल अनेक आभार, रैना!
३. इतर:
* Home (2012) - Toni Morrison
दुसर्या महायुद्धात अमेरिकेतर्फे अनेक कृष्णवर्णीय सैनिक लढले. एका बाजूला फॅसिझम, वंशद्वेष याविरूद्ध लढण्याचा दावा करत असताना दुसरीकडे अमेरिकन समाजात मात्र उघड वर्णभेद होता. हा अंतर्विरोध जगासमोर येणं, ही बाब सिव्हिल राईट्स चळवळीला मिळालेल्या पाठिंब्यामागचा एक महत्त्वाचा घटक म्हणता येईल. अर्थात हे घडून यायलाही दीड-दोन दशकांचा काळ जावा लागला. 'होम' ही टोनी मॉरिसनची छोटेखानी कादंबरी नेमक्या याच काळात - म्हणजे पन्नाशीच्या दशकात - कोरियन युद्धावरून परतलेल्या एका कृष्णवर्णीय सैनिकाची कहाणी सांगते. वर्णभेदाच्या अनुभवांच्या जोडीला तोवर निदान न झालेली 'पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर' नायकाला असणे, ही आणखी एक मिती. पण इतका कच्चा माल असूनही पुस्तक थोडी निराशाच पदरी टाकतं. टोनी मॉरिसनच्या त्या खास वाचनीय शैलीत कुठे गुंततो न गुंततो, तोच जेमतेम दीडशे पानांत कादंबरी संपते.
* I Shall Not Be Moved: Poems (1990) - by Maya Angelou
एक स्त्री, एक कृष्णवर्णीय, एक कृष्णवर्णीय स्त्री आणि निव्वळ एक व्यक्ती - अशा भूमिकांतून येणार्या निरनिराळ्या अनुभवांचं संकलन या कवितासंग्रहात आहे. मुक्तछंदातल्या कवितांसोबतच काही पारंपरिक यमकबांधणीच्याही आहेत. फार ग्रेट नसला तरी वाचनीय संग्रह. पुस्तकाचं शीर्षक या कवितेतून.
* Double Down (2013) - Mark Halperin, John Heilemann
'युद्धस्य कथा रम्या' असं म्हणतात ते निवडणुकांनाही लागू पडावं. २०१२ सालच्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीवरच हे पुस्तक रिपब्लिकन प्रायमरीज् - जो रिकेट ह्या उद्योगपतीची फसलेली महागडी, महत्त्वाकांक्षी ओबामाविरोधी मोहीम - रॉमनीचं अनेक मुद्द्यांवरचं फ्लिप-फ्लॉप आणि ४७ टक्क्यांची ती कुप्रसिद्ध कॉमेंट - बिल क्लिंटनचं शार्लट कन्व्हेन्शनमधलं दणदणीत भाषण - पहिल्या डिबेटमधली ओबामाची निरुत्साही कामगिरी - बॉस्टन बंदरात विजयानिमित्त फटाक्यांची आतषबाजी करण्याचे रॉमनीचं मनोरथ इ. परिचित घटना अगदी ओघवत्या शैलीत, अधूनमधून पडद्याआडचे किस्से पेरत मांडल्या आहेत; पण त्याव्यतिरिक्त खास रेकमेंड करावं असं विशेष काही नाही.
* The Omnivore's Dilemma (2006) - Michael Pollan
अमेरिकेतल्या खुल्या अर्थव्यवस्थेला न जुमानता उभे राहिलेले मक्याचे साम्राज्य, त्याच्या घसरत्या किंमती आणि वाढतं उत्पादन, परिणामी सामान्य जनतेच्या खाण्याच्या सवयींवर आणि आरोग्यावर होणारा परिणाम इ. बाबी आणि 'ऑर्गॅनिक' ह्या लेबलची मर्यादा या गोष्टी मायकल पोलनचेच निवेदन असणार्या Food, Inc. व तत्सम काही डॉक्युमेंटरीजमुळे परिचित होत्या - पण आपल्या चार निरनिराळ्या जेवणातल्या पदार्थांचा स्रोतापर्यंत (किंवा शब्दशः मुळापर्यंत) जाऊन घेतलेला शोध आणि मांसाहारी व्यक्तीला पडू शकणारे काही नैतिक प्रश्न, हे भाग वाचायला हवेत असेच.
* This Is Not a Pipe - Michel Foucault
René Magritte ह्या चित्रकाराचं हे चित्र जेव्हा मी प्रथम पाहिलं, तेव्हा मॉडर्न आर्टवाल्यांचं हे नेहमीसारखं काहीतरी गिमिक आहे अशीच प्रतिक्रिया होती. "उद्या आमच्या बंटीने काढली एखादी विडीसारखी विडी आणि दिलं ठोकून त्याच्याखाली की 'ही-विडी-नाही'; तर लावणार का ते चित्र तुम्ही प्रदर्शनात? देणार का त्याचे कोटी कोटी रुपये?"- छापाचे आक्षेपही तेव्हा सकृद्दर्शनी सयुक्तिक वाटत.
अजूनही जॅक्सन पोलॉक किंवा पॉल क्लीची चित्रं 'समजतात' असं नव्हे; पण माझ्यापुरते मी काही आडाखे बांधले आहेत. एक म्हणजे, या चित्राची किंमत इतकी का? हा प्रश्न दूर ठेवणे. दुसरं म्हणजे समोरचं चित्र हे दर वेळी अंतिम साध्य असेलच असं नाही, पण काही एक विचार/विसंगती/भावना मांडण्याचं साधन (वा उत्प्रेरक) म्हणूनही ह्या माध्यमाचा वापर होऊ शकतो; हे ध्यानी ठेवणं. (अर्थात यानंतरही काहीच न समजण्याची शक्यता बाकी उरतेच. अशा वेळी 'तू न पहचाने तो ये है तेरी नजरों का कसूर' किंवा 'नेति नेति' म्हणून स्वतःची समजूत तरी काढावी किंवा 'हॅ:, ह्यांच्यापेक्षा दशावतारी बरे'ची पिंक तरी टाकावी!))
तर यातल्या दुसर्या ठोकताळ्यासाठी त्या चित्राच्या निर्मितीचा कालखंड, चित्रकलेतले तेव्हाचे प्रवाह आणि त्या चित्राचे इतरांनी लावलेले निरनिराळे अन्वयार्थ या गोष्टींची संदर्भचौकट अतिशय उपयोगी पडते. अर्थात, 'पुस्तक वाचलं - ते आवडलं/ मॅच पाहिली - फेडरर क्लासच/गझल ऐकली - क्या बात है, गुलाम अली!' अशी जी थेट, एफर्टलेस आस्वादाची सवय आपल्याला झालेली असते, त्याच्या हे विपरीतच.
त्यामुळे एखादी नवीन भाषा शिकताना जशी बिचकत्या उत्साहाने सुरूवात करावी तसं या संदर्भात काही वाचायला मिळतंय का म्हणून शोधत असताना फुकोचं हे पुस्तक सापडलं. जेमतेम पन्नास पानांचं. सौंदर्यशास्त्राच्या जार्गन्सखाली वाचकाला गुदमरवून टाकणं नाही की उगाच भारदस्तपणा आणण्यासाठी फाफटपसारा वा पुनरूक्ती नाही. संदर्भासाठी उल्लेख केलेल्या चित्रांच्या प्लेट्स छापलेल्या. Magritte, Klee, Kandinsky यांच्या चित्रांमागचे विचार (उदा. एखादी गोष्ट आणि तिचा निर्देश करणारा शब्द यांच्यातलं द्वैत), ठरवून मोडलेले संकेत आणि या सार्यांपलीकडे उरणार्या शक्यता इत्यादी गोष्टी अजिबात बोजड वाटणार नाही, अशा शैलीत स्पष्ट केलेल्या. (तरी मूळ फ्रेंचमधल्या कोट्या आणि काही संदर्भ इंग्रजीत तळटीपांशिवाय समजत नाहीत.) या क्षेत्रातले जाणकार अधिक पुस्तकं सुचवू शकतीलच, पण अगदी नवशिक्यांनाही धीर यावा असं हे पुस्तक आहे. तेव्हा ह्या क्षेत्रात रस असेल, तर जरूर वाचा असं सुचवेन.
नंदन, उत्तम पोस्ट. धन्यवाद
नंदन, उत्तम पोस्ट. धन्यवाद
बरेच दिवसांनी अशी दणदणीत यादी दिसली. त्यातली बरीच पुस्तकं वाचायच्या यादीवर कित्येक दिवस आहेत आणि ती कधीतरी बैठक मारून वाचली पाहिजेतच ही जाणीव परत एकदा झाली.
तू वरती लिहिलेल्या कारणामुळेच 'ऑटम..' पूर्ण करू शकले नाही. ते सलग, शांतपणे वाचायला हवंय त्यामुळे सध्या काही काळासाठी कपाटात परत गेलंय.
Pages