मनी वाहे भरुनी आनंद ....

Submitted by पुरंदरे शशांक on 15 May, 2014 - 00:08

मनी वाहे भरुनी आनंद ....

आज सकाळचीच गोष्ट. सकाळी सकाळीच कंपनीची बस पकडावी लागते. बसमधे जरा स्थिर-स्थावर झाल्यावर सवयीने मोबाईलला इअर फोन लाऊन कधी आकाशवाणी वरचे संगीत -सरिता इ. कार्यक्रम तर कधी मस्त मोबाईलवर डाऊन लोड केलेली गाणी ऐकणे असा कार्यक्रम असतो. कोणी हातात पेपर(वर्तमानपत्र) दिलाच तर जरा त्यातील बातम्यांवर नजर फिरत असते पण कानांवर काय पडतंय याची जास्त उत्सुकता असते. कारण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर सकाळी आठच्या सुमारास जी २-३ भक्तिगीते लागतात त्यात कधी कधी लॉटरीच लागते अगदी ...
अचानक (नशीब जोरावर असेल तर) खूप जुनी पण मधुरशी भक्तिगीते, अभंग, भावगीते या कार्यक्रमातून ऐकण्याचा योग येतो.
आज सकाळी एकाने पेपर हातात दिल्यावर मोदी का राहुल गांधी अशा घमासान बातम्यांमधे मी अगदी रंगून गेलो होतो ...
आणि एकदम मोबाईलच्या इअरफोन मधून "नाम घेता तुझे गोविंद"चे मधुर सूर कानावर पडले .... हातातला पेपर हातातच राह्यला आणि आपोआप डोळे मिटले गेले

आशाबाईंचा अतिशय गोड आवाज, रमेश आणावकरांचे ताकदीचे शब्द आणि वसंत प्रभूंचे सुरेल संगीत.... काय मेळ जमून आलाय या गाण्यात व्वा !!
मनी वाहे भरुनि आनंद या ओळीत "नंद" वर जे काय मींडकाम केलंय आशाबाईंनी त्याला तोडच नाहीये ....
किती लडिवाळ, आर्जवी आवाज आणि काय गाण्यातली सहजता आहे ....

लतादीदी, आशाजी आणि सुमनजी यांनी मराठीतील जी अति सुमधुर भावगीते, भक्तिगीते गायली आहेत त्यांची गोडी केवळ अवीट आहे .... आणि संगीतकारांमधे वसंत प्रभू नामक व्यक्तिने जे काय संगीत दिलंय त्यांना माझा शिरसाष्टांग दंडवतच आहे ... बहुतेक वेळा पी. सावळाराम हे गीतकार, गायिका - लताजी किंवा आशाजी आणि संगीतकार वसंत प्रभू दि ग्रेट - अशा काँबिनेशनचे कुठलेही गाणे इतके वेड लावणारे असते की काय सांगावे !!

माझे लहानपण तर वसंत प्रभूंच्या संगीताने भरुन गेले आहे. पुढे मोठेपणी इतर अनेक संगीतकारांची जादू लक्षात येऊ लागली पण प्रभूंच्या संगीताचा जो काही ठसा मनात, अंतःकरणात उमटून राहिलाय तो काही वेगळाच...
आता बरेच दिवसांनी त्यांची गाणी ऐकताना बर्‍याच सुरावटींमधे असलेले साधर्म्यही लक्षात येते पण मनाला कायम भुरळ घालणारी अशी गाणी (मराठी भावगीते, भक्तिगीते) सतत देणारा असा कोणी संगीतकार असेल तर माझ्या मनात तरी वसंत प्रभूच .....

नाम घेता तुझे गोविंद
मनी वाहे भरुनि आनंद

हृषिकेशी बन्सिबिहारी
गोकुळिचा कुंजविहारी
कुणि म्हणती कृष्ण-मुरारी
कुणि मिलिंद आणि मुकुंद

विश्वाचा नाथ म्हणोनी
हासते विश्व तव वदनी
तव नामे तुझिया चरणी
नाचते यमुनाजळ धुंद

तू शब्द ओळिओळीत
तू अर्थ मधुर गीतेत
तू ताल भक्तिगीतांत
तू सुरासुरांत सुगंध
-----------------------------------------------------------------------------------------

मला आवडणारी वसंत प्रभूंची ही गाणी ....
१] अनाम वीरा जिथे जाहला
२] आली हासत पहिली रात
३] उठा उठा सकल जन
४] उठि गोविंदा उठि गोपाला
५] कल्पवृक्ष कन्येसाठी
६] कळा ज्या लागल्या जीवा
७] कोकिळ कुहुकुहु बोले
८] गा रे कोकिळा गा
९] घट डोईवर घट कमरेवर
१०] घरात हसरे तारे असता
११] चाफा बोलेना
१२] चांद मोहरे चांदणे
१३] जन पळभर म्हणतील
१४] जिथे सागरा धरणी मिळते
१५] जीर्ण पाचोळा पडे तो
१६] जो आवडतो सर्वांला
१७] जो तो सांगे ज्याला त्याला
१८] डोळे हे जुलमि गडे
१९] तुझ्या गळा माझ्या गळा
२०] तूच कर्ता आणि करविता
२१] ते दूध तुझ्या त्या
२२] दर्पणी बघते मी गोपाळा
२३] दिव्यत्वाची जेथ प्रतीती
२४] देवरूप होऊ सगळे
२५] धागा धागा अखंड
२६] नाम घेता तुझे गोविंद
२७] निजल्या तान्ह्यावरी माउली
२८] पिवळीपिवळी हळद लागली
२९] पंढरीनाथा झडकरी
३०] प्रतिमा उरी धरोनी
३१] प्रभाती सूर नभी रंगती
३२] प्रेमा काय देऊ तुला
३३] प्रेमास्वरूप आई
३४] मजवरी माधव रुसला बाई
३५] मधु मागशी माझ्या
३६] माझिया नयनांच्या कोंदणी
३७] मानसीचा चित्रकार तो
३८] मी मनात हसता प्रीत
३९] मूर्त रूप जेथे ध्यान
४०] यश हे अमृत झाले
४१] येग येग विठाबाई
४२] रघुनंदन आले आले
४३] रघुपति राघव गजरी गजरी
४४] राधा कृष्णावरी भाळली
४५] राधा गौळण करिते
४६] रिमझिम पाऊस पडे
४७] लाजली सीता स्वयंवराला
४८] लेक लाडकी या घरची
४९] विठु माझा लेकुरवाळा
५०] विठ्ठल तो आला आला
५१] विठ्ठल रखुमाईपरी
५२] विठ्ठला समचरण तुझे
५३] सखी शेजारिणी
५४] सप्तपदी हे रोज चालते
५५] सुख येता माझ्या दारी
५६] हरि उच्‍चारणीं अनंत
५७] हले हा नंदाघरी पाळणा
५८] ज्ञानदेव बाळ माझा
५९] हृदयी जागा तू अनुरागा
-----------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सुंदर लिहिलेय. आशाची मराठी गाणी खुपच गोड आहेत.

हे गाणे आता आठवत नाही.. घरी गेले की शोधते आणि ऐकते. Happy

याला म्हणतात "आठवणीतील गाणी" संकेतस्थळाचा खराखुरा उपयोग. शशांकजी तुमचा हा अनुभव वाचल्याक्षणी मी त्या संकेतस्थळाकडे गेलो आणि ऐकत बसलो आहे ह्या गाण्याचा आनंद...."नाम घेता तुझे गोविंद...."

बागेश्री रागातील रचना आहे ही जादाची माहितीही तिथे मिळाली.....तुम्हाला धन्यवाद.

वसंत प्रभू काय, वसंत पवार काय किंवा वसंत देसाई, आणि वसंत देशपांडे.....या चार वसंतरावांनी हे मराठी गाण्यांचे विश्व अजरामर करून टाकले आहे.

वसंत प्रभू काय, वसंत पवार काय किंवा वसंत देसाई, आणि वसंत देशपांडे.....या चार वसंतरावांनी हे मराठी गाण्यांचे विश्व अजरामर करून टाकले आहे. >>>>> अग्दी खरे आहे अशोकराव ... Happy

सगळी गाणी ओठांवर आहेत. अशी गाणी जतन करून आकाशवाणीने खुप छान काम केलेले आहे.
आम्ही आकाशवाणीला पारखे झालेले लोक. पण ईप्रसारणवर देखील असेच उत्तम कार्यक्रम सादर केले जातात.
दुर्मिळ गाणी आणि अभ्यासपूर्ण निवेदन असा छान संयोग असतो. आपल्या सोयीप्रमाणे त्यांचे कार्यक्रम ऐकता येतात. eprasaran.com

सुरेख लिहिलंय. Happy

लतादीदी, आशाजी आणि सुमनजी यांनी मराठीतील जी अति सुमधुर भावगीते, भक्तिगीते गायली आहेत त्यांची गोडी केवळ अवीट आहे .... आणि संगीतकारांमधे वसंत प्रभू नामक व्यक्तिने जे काय संगीत दिलंय त्यांना माझा शिरसाष्टांग दंडवतच आहे ... बहुतेक वेळा पी. सावळाराम हे गीतकार, गायिका - लताजी किंवा आशाजी आणि संगीतकार वसंत प्रभू दि ग्रेट - अशा काँबिनेशनचे कुठलेही गाणे इतके वेड लावणारे असते की काय सांगावे !!>>>>>> मनभरून अनुमोदन. Happy

मी गेले दोन-तीन दिवस सारखा आशाताईंचेच "सखी ग, मुरली मोहन मोही मना" ऐकतोय. कितीदा ऐकलं तरी समाधान होत नाही आहे. "चंदनाचा गंध येतसे पंचप्राणा" या आणि पुढच्या ओळींवर/स्वरांवर जीव अडकतोय. Happy

वरील गाणी सुंदर आहेतच पण भक्तिगीतात गानसरस्वती किशोरीताईंचे मराठी अभंग शब्दातीत अवर्णनीय. ते यु ट्युब वर पण ऐकता येतात. विशेष करुन कानडा विठ्ठलु, माझे माहेर पंढरी(भीमसेनजींच्या पेक्षा खूप निराळी चाल ) जनी म्हणे पांडुरंगा, जनी जाय पाणियासी, अवचिता परिमलु ( लतादीदींपेक्षा वेगळी चाल) पहातोसी काय आता पुढे करी पाय इ.
मनाला शांती देणारे, मनावर हळूवारपणे फुंकर घालणारे, आपण उदास, निराश असलो तर आपल्याला सकारात्मक उर्जा देणारे, ह्र्दयाच्या गाभर्‍यातून येणारे त्यांचे स्वर थेट मनाला जाऊन भिडतात. त्यांचे अभंग मनाला अध्यात्मिक आनंद देतात. ऐकले नसतील तर एकदा ऐकून बघा आणि त्या स्वर्गीय अनुभूतीचा आनंद घ्या. थोड विषयांतर आहे पण लिहिल्याशिवाय रहावलं नाही.

सुंदर निवळशंख लिखाण. सकाळच्या ५.५५ बातम्यांपासून रेडिओ सुरू व्हायचा आणि ही सगळी गाणी ऐकत ऐकत शाळेची तयारी व्हायची. गीत संगीतातील दिग्गज तिथेच परिचित झाले. कानडा वो विठ्ठलू फार आवडायचे तेव्हा, वेगळ्या मुखड्यामुळे (ज्ञानेश्वरांच्या लेखणीचे तेज आणि अर्थ फार पुढे उमजले पण अभंग आधीच पाठ झाला रेडिओमुळे). कानडा राजा पंढरीचा आणि भक्तिवाचून मुक्तिची... सुद्धा, अजित कडकडेंच्या आवाजातील.
दिवस प्रसन्न निरागसतेचे होते आणि जगही तसेच भासायचे !

वा अमेय, काय आठवण काढलीस. सेम हियर. शाळेत जायच्या आधी रेडियो ऐकतानाची गाणी. खूपच गाणी एकेक करून आठवायला लागली. मागे दिनेशदानी पण निग वर गाण्यासंदर्भात पोस्ट टाकली असंच ते रेडियोचे दिवस आठवले.

शशांकजी धन्यवाद.

आहा हा... सकाळी सकाळी किती सुरेख आठवण करून दिलीस शशांक. वसंत प्रभूंच्य सुरावटींची मोहिनी ... न उतरणारी आहे.
छान जमलाय लेख. अत्यंत प्रामाणिक लेखन.

वा !
आजची सकाळ 'गोविंदस्मरणाने' झाली तुमच्यामुळे.
लेख वाचता वाचता ते गाणंही कानात घुमू लागलं.

धन्यवाद Happy