स्वयंपाकघरातील फुलं

Submitted by मामी on 20 November, 2013 - 23:12

मध्यंतरी दार्जिंलिंगच्या एका टी- इस्टेट वर सॅलड खाल्लं त्यात नॅस्टरशियम (Nasturtium) या झाडाची पानं आणि फुलं देखिल होती. आजूबाजूला बागेतच उगवलेली ती सुंदर रंगित फुलं अशी सॅलडमध्ये सजून धजून समोर आली आणि मी त्या कल्पनेच्या प्रेमातच पडले.

आता सध्या बागकाम करायला घेतली तर लगेच जाऊन त्याच्या बिया आणल्या आहेत. दिसायलाही सुरेख आणि सॅलडलाही उपयोगी. भारीच उत्सुक आहे आता की केव्हा एकदा घरी ती फुलं फुलताहेत आणि मी ती सॅलडमध्ये वापरतेय ......

त्यावरून मनात विचार आला की आपण फारच कमी फुलं खातो. आजूबाजूला इतकी प्रचंड प्रमाणात विविध प्रकारची फुलं असताना आपल्या स्वयंपाकात मात्र त्यांचा वापर अगदी मर्यादित आहे. असं का?

गुलाबाच्या पाकळ्या, शेवग्याची आणि कुड्याची फुलं, केळफूल आणि भोपळ्याची फुलं ... मला तरी इतकीच माहित आहेत / आठवताहेत.

केशराच्या फुलांच्या मधल्या काड्या वापरल्या जातात. शिवाय गुलाब, केवडा अशा फुलांच्या पासून बनवलेले गुलाबजल, केवडाजल स्वयंपाकात वापरले जाते. गुलकंद तर सगळ्यांना माहित आहेच.

माझ्या या वरच्या यादीत आता नॅस्टरशियमच्या फुलांची भर पडली. मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया मध्ये झुकिनीच्या फुलं आतमध्ये काही स्टफिंग भरून ग्रिल करून वापरताना दिसतात. शिवाय इतरही अनेक फुलं सजवण्यासाठी आणि मग अर्थात खाण्यासाठी वापरताना दिसतात. मी घरी आता भोपळ्याचा वेलही लावलाय केवळ त्याची फुलं वापरण्याकरता. Happy

याव्यतिरिक्त अजून काही फुलं आपल्याकडे अथवा इतर देशांत वापरली जात असल्यास इथे कृपया नमुद करा. याच धाग्यावर त्यांच्या पाककृतीही शेअर केल्या तरी चालतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशी सगळी मस्त मस्त वासाची झाडं आजूबाजूने असलेलं घर पाहिजे. नाहीतर आमच्या आजूबाजूला पार्ले जी भाजला जाण्याचा, ट्रॅफिक वाढला की फ्युएल जळण्याचा नैतर मग कचर्‍याचा असलेच वास.. Wink

हर्मायनी, ती फुले नव्हेत फळे असतात. फुले भेंडीच्या फुलासारखीच असतात. मायबोलीवर फोटो आहेत.
इब्लिस, मोहाची फुले पहाटे खाल्ली तर चढत नाहीत.( मी खाल्ली आहेत.) नंतर जसजसे ऊन वाढत जाते तसतशी ती फर्मेंट होत जातात. एका दुष्काळात या झाडांच्या फुलानींच मध्य भारतातील जनतेला जगवले होते.

आमच्याकडे वडील पूर्वी अगस्तीची फुले आणायचे भाजी करण्यासाठी. तिच कदाचित हादग्याची फुलं असावीत असं बघून वाटतय.

मागे चर्चेत आलेली हि प्याजकली >>>>>>

परवा कांदा पातीच्या जुडीत या प्याजकली होत्या. देठ फार जाड होते. पाती बरोबर शिजतील असे वाटले नाही. याचा काही उपयोग माहीत नाही. म्हणून टाकून दिली. प्याजकली काय करतात ते कुणाला माहीत असेल तर सांगा.

हादग्याच्या फुलालाच हेट्याची फुल म्हणतात का? >> हो आम्ही ह्याला हेटाची फुले म्हणत असु ... आई ह्याची डाळीचे पीट पेरुन भाजी करायची.. खुप आवडीचि असायची.. ईथे उसगावात मीळेल का ही फुले ?

माझा जन्म मुंबईतला. माझ्या लहानपणी, ७०च्या दशकात माझे वडील गावाहून (पिरंगूट, पुणे) आंबेमोहोर तांदूळ आणायचे. तसे गाव फक्त नावालाच. शेत जमिन कुळकायद्यात गेली, घर भाउबंदकीत गेले. पण तांदूळ मात्र तिथूनच आणायचे. भात शिजतानाचा वास खुप आवडायचा. मनात साठून रहायचा.

फेब्रुवारी २००७ ला पहिला कासव महोत्सव, वेळास येथे झाला. त्याला गेले होते. मुंबई -मंडणगड असा प्रवास करुन मध्यरात्री मंडणगडला पोहचले. पहाटे वेळासला जाण्याची दुसरी बस मिळाली. एक-दिड तासांचा प्रवास झाला. पहाटेचा गार वारा, फटफट्णारी सकाळ आणि सोबतीला तोच मनात साठलेला भात शिजण्याचा वास! खुप छान वाटत होते. बरोबर १२ वर्षांचा मुलगा. त्याल म्हटले, "बघ भात शिजण्याचा वास येतो." त्याला पटलेच नाही. (अताशा, तांदूळ तेवढे सुवासिक येत नाहीत). बरोबरचे सहप्रवासी काका आमचे बोलणे ऐकत होते. ते म्हणाले, "अगं हा आंबेमोहोराचा वास. बघ सगळ्या आंब्यांना मोहोर फुलला आहे."

आंबेमोहोर तांदूळला आंबेमोहोर का म्हणायचे हे मला तेव्हा कळले. एकाप्रकारच्या फुलाचा हा स्वयंपाकघरातील वास!!!

आंबेमोहोर हे नाव का पडले कळत नाही कारण जो काही सुगंध दरवळतो तो फार वेगळा असतो. आंब्याच्या मोहराचा आणि त्या सुगंधाचा काहीएक संबंध वाटत नाही. तो आणि हा गंध दोन्ही निराळे. तसे पाहू गेले तर भाता शिजायला आला की दुरवरुन गंध दरवळतोच. मग तो कुठलाही भात असो. मागे मी भंडारा येथे पिकलेले हातसळीचे तांदुळ विकत घेतले. आधी अर्धा किलो घेतले. पुर्वी कधी हातसळीचे तांदूळ घरी आणले नव्हते. एकदा खाऊन बघावे म्हणून विकत आणलेत. आईने भात केला त्याची चव इतकी अविट होती की नुस्ता भात आणि वर जरासे तुप इतके छान रुचकर जेवण झाले ना.

आठवते तुला...गुलमोहराच्या पाकळ्यांची चव
चिंचेचा फुलांचा सांडलेला बहर
हादग्याच्या फुलांवर तुटुन पडलेले पोपट
काशीकोहळ्याच्या एखाद्या हळदपिवळ्या फुलाला धरलेले फळ
अंबाडीच्या फुलापासून बनवलेल्या शरबताचा गुलाबी रंग
तव्यावर अरतपरत केलेले करडे दगडफुल
केळीच्या पानावर वाढलेली केळफुलांची भाजी
कोंथींबीरीच्या फुलांना आलेली हिरवे ओले धणे
हिवाळ्यात वालाच्या वेलीवरचे जांभळ्या फुलांचे पांघरुन
गगनजाईच्या फुलांच्या देठामधील चाखलेले मध
महादेवाच्या पिंडीवर गळून पडलेले तुळशीच्या मंजिरीतील निळेसावळे कण
तळहातावर घेऊन चाखलेला गुलकंद
आंघोळीच्या पाण्यात उकळून काढलेल्या कडूनिंबाचा मोहर
ओठांना जपत भीत भीत खाल्लेली बिब्ब्याची फुले
आणि कधी खायला मिळाली नाही अशी मोहाची फुले?
कालपरवा हे सर्व पाच पावलांवर उपलब्ध होतं
आज पंचक्रोशीत.. दशक्रोशीतही नाही!

bee

काल वाशीच्या भाजी मार्केट मधे शेवग्याची नुसतीच फुले विकायला होती. विचारल्यावर कळले की त्याची भाजी करतात. ती फुले बघून या बाफ ची आठवण झाली.
कोणाला भाजीची रेसिपी माहित आहे का?

बी, मोहाची फुले नाही चाखलीस.. खुप मस्त लागतात. खरं तर तू स्वतंत्र कविता करशील त्यावर. पुण्यातही झाडे आहेत, फक्त सिझन गाठायला हवास.

सामी,

हि फुले पाण्यात उकडून ते पाणी फेकायचे. फुले अलगद पिळायची. मग कांदा मिरचीवर परतायची. हवे तर वर थोडे बेसन पेरायचे.

आमच्याकडे गावी शेवग्याच्या फुलांची भाजी करतात जवळा घालून. हि भाजी आणि तांदळाची भाकरी येकदम ब्येष्ट.

तसेच काही ठिकाणी ह्या फुलांच्या जस आपण कोथिंबीरीच्या वड्या बनवतो तश्याच वड्या बनवतात.

मस्त धागा!
उत्तराखंड -हिमाचल प्रदेशात र्होडोडेंड्रॉनच्या लालबुंद फुलांची चटणी करतात. त्या फुलांना तिकडे बुरांस म्हणतात. त्याचे सरबतही मिळते.

अदीजो, हो ह्या फुलांना बुरांस असेही म्हणतात. ह्या फुलांपासून सरबत बनवतात आणि हृदयरोगींसाठी ते खूप लाभदायक असते. ह्या फुलांपासून वारुणी सुद्धा बनवतात.

Pages