तिहेरी शतशब्दकथा - लाडका - लाडका - लाडकी

Submitted by अंड्या on 22 September, 2013 - 06:59

लाडका

तो सर्वांचाच लाडका होता.. तीन भावांत शेंडेफळ म्हणून आईचा लाडका.. आपले नाव हाच काढणार म्हणून बापाचा लाडका.. अभ्यासात हुशार म्हणून शिक्षकांचा लाडका.. आणि मित्रांच्या ग्रूपची, बोले तर जान होता.. शांत स्वभाव आणि लाघवी बोलणे, कामानिमित्त जिथे जाईल तिथे आपली छाप पाडणारच.. ऑफिसमधल्या बॉसचाही लाडका न झाल्यास नवलच..!!

एक दिवस पुढे आलेल्या पोटावरून हात फिरवत बायको म्हणाली, इथेही आईपेक्षा बाबाच जास्त लाडके होणार वाटते.. तो फक्त हसला, तशी पुढे म्हणाली, "आता माझ्या बाबांचाही लाडका जावई होणार आहेस, नातवंड देण्यात पहिला नंबर लावला म्हणून दिवाळीला तुला बाईक घेऊन देणार आहेत.."

बस्स...! त्याच बाईकने घात केला..!! एकच अपघात... आणि तो देवाचाही लाडका झाला..!!!

- अंड्या उर्फ आनंद

-------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------
.
.
.
.
.
.
.
.
.
.
-------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------

लाडका

तो सर्वांचाच लाडका होता.. तीन भावांत शेंडेफळ म्हणून आईचा लाडका.. आपले नाव हाच काढणार म्हणून बापाचा लाडका.. वर्गातला सिन्सिअर मुलगा म्हणून शिक्षकांचा लाडका.. आणि मित्रांच्या ग्रूपची बोले तर जान होता.. शांत स्वभाव आणि लाघवी बोलणे, कामानिमित्त जिथे जाईल तिथे आपली छाप पाडणारच.. ऑफिसमध्येही सर्वांचा लाडका न झाल्यास नवलच.. तिथल्याच एका सहकारीणीच्या प्रेमात पडला.. तिला आपली सहचारीणी बनवायची स्वप्ने रंगवू लागला.. पण सर्वांना आवडणारा तो.. नेमका तिलाच नाही आवडला.. पण तो हिंमत नाही हरला, ना तो खचला.. अखेर त्याने तिला दाखवूनच दिले.. तूच ती एक दुर्दैवी होतीस, अन्यथा मी होतो सर्वांचाच लाडका.. जेव्हा गळफास घेऊन लटकला, तेव्हा मैताला त्याच्या जनसागर लोटला..!!

- अंड्या उर्फ आनंद

-------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------
.
.
.
.
.
.
.
.
.
.
-------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------

लाडकी

ती घरात सर्वांचीच लाडकी होती.. एकुलती एक मुलगी तर होतीच पण तिचा स्वभावही लाघवी होता.. तळहाताच्या फोडापेक्षाही तिला जास्त जपले जायचे.. तिने साधी आंछी करताच वैद्य हकिमांची धावपळ उडायची.. तिच्या तोंडातून बाहेर पडलेला शब्द म्हणजे घरच्यांसाठी आदेशच जणू.. तिचे लाड करण्यात कोणी कधीही कसूर केली नव्हती..

एखाद्या राजकुमारीसारखीच ती वयात आली.. अन माया ममता वात्सल्य या व्यतिरीक्तही तिला आणखी कशाची तरी गरज भासू लागली.. पण आजवर तिचे सारे हट्ट पुरवणार्‍या बाबांनी एक हट्ट मात्र नाही पुरवला.. जेव्हा ती अगदीच हट्टाला पेटली तेव्हा तिला खेळवणार्‍या हातांनीच तिचा गळा घोटला.. अर्थात त्यांचाही नाईलाज होताच....... जमीनदाराची पोर असून वेशीबाहेरील पोराच्या प्रेमात पडली होती..!

- अंड्या उर्फ आनंद

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहीले आहेस रे! पण तिहेरी शशक म्हणवताना ह्यातल्या पहिल्या दोन कथाविचारात जो धागा आहे तोच पुढे तिसर्‍या कथेत नेता आला असता तर अधिक समर्पक झाले असते ना असा विचार मनात येऊन गेला. तिसरी कथा जरा ऑड वाटते या गोफामधे. आणि एकजात सगळे शेवट अपघात, आत्महत्या, खून असे शोकांत का रे? Sad

अर्थात तिन्ही कथां वेगवेगळ्याच म्हणूनपण नक्कीच मस्त आहेत.

आता अजून येऊदे Happy

सुपर्ब अंड्या............
एकदम सुरेख लिहल आहेस.................!

लाडका हे शीर्षकच दुखांत की शोकांत काय ते सुचवते.

कथा आवडल्याच ! शतशब्दकथांमधील वेगळा प्रयोग देखील !!

वेलकम टू शशक क्लब अंड्या... पदार्पण हॅट्रीक घेऊन केलेस !!!

धन्यवाद सर्वांचे.. Happy

या गणेशोत्सवात जरासा बिजीच होतो पण होतो इथेच आसपास, फकस्त आंतरजालापासून एक क्लिक दूर..

मध्यंतरी चक्कर टाकून गेलो तेव्हा जिथे तिथे हा शशक प्रकार बघितला अन म्हटले आपण भी एक डाव टाकून बघूया तर एक लिहिता तीन सुचल्या..

आता निदान या प्रकारात हा ट्रिप्लेट प्रयोग पहिल्यांदा करण्याचे क्रेडीट तरी मला घेता येईल Wink

ऋन्मेष, तु अ, अंड्या हे आयडी एकाचेच आहेत ते माहित झाले. कटप्पा पण तुमचाच आयडी आहे का ? घरासंबधी सल्ला विचारलेला ते?

लोकांना आधी असे वाटायचे, पण ते अमेरीकेचे आहेत.
अर्थात मी सुद्धा रात्र रात्रभर जागा असतो. अमेरीकेच्या टाईमवरच जगतो. ती गोष्ट वेगळी Happy