शुद्ध देसी ट्रेक !!!

Submitted by Discoverसह्याद्री on 18 August, 2013 - 15:42

रसाळगड – सुमारगड – महीपतगड – हातलोट घाट

बहुदा कधीतरी २-३ दिवसांपूर्वी ट्रेक सुरू केलेला असावा...
जीवाभावाच्या मोजक्या ट्रेकमित्रांसोबत दणकट चढ-उतार करत, सह्याद्रीमध्ये कुठेतरी खोलवर दुर्गम भागात पोहोचलेलो..
चेहरा रापलेला-कपडे घामेजलेले-सॅक मळलेली, कुठून आलो-कुठे चाललोय असल्या शुल्लक गोष्टींचं भान असायची गरज नाही..
मध्येच एखाद्या खट्याळ रानपाखराच्या शीळेचा आवाज मोहवून टाकतोय..
आता, जांभूळ-गेळा-हिरडा अश्या दाटीमधून आणि कारवीच्या उंचच उंच झुडुपांमधून वळणं-वळणं घेत वाट जलद धावतीये..
दाट झाडीतून वाट अवचितंच धारेपाशी येते, अन् सामोरा येतो एक स-ण-स-णी-त पॅनोरमा..
अस्ताव्यस्त पसरलेल्या डोंगररांगा, लांबवर पसरलेल्या काहीश्या गूढ द-या, भर्राट वारा अन् त्याच्यावर लांबंच-लांब घिरट्या घालणारा एखादा शिक्रा पक्षी...
काही न बोलता, कितीतरी वेळ आम्ही असे क्षण ‘अनुभवत’ राहतो..

‘शुद्ध देसी ट्रेक’, अजून काय!!!
000A_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

---------------------------------------------------------------------------------------------------------------

सह्याद्रीत ट्रेकर्सना परिचित, पण तरीही (खरंच) ‘ऑफबीट’ राहिलेल्या ‘रसाळ–सुमार–महीपत’ गडांची सलग डोंगरयात्रा अन् जवळच्या घाटवाटा करायच्यात, असा ‘भुंगा’ कित्येक दिवसांपासून आमचा पिच्छा पुरवत होता. दुर्गम-अवघड कातळ-दमवणारा-दाट रानाचा.. वगैरे बर्रच काही ऐकलं होतं.
000B_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

ट्रेकरूट ठरवणं अन् प्रवासासाठीचे पर्याय ह्याच्यावर चिक्क्क्कार ‘मेला-मेली’ (म्हणजे शेकडो ई-मेल्स, अगदी मतदान सुद्धा) आणि अशक्य प्रमाणात काथ्याकूट झाली. “ओन्ली बेनेफिट, रीअलिस्टिक प्लान आणि ट्रेकच्या टेरेनचे फंडे टोटल क्लिअर”!! डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ट्रेकर दोस्तांच्या सुट्या, खूप सारी तयारी अन् मुख्य म्हणजे होममिनिस्टरकडून ‘अप्रूवल’ - असं सग्गळं काही जुळवून आणलं.
000C_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

आणि दणक्यात घोषणा झाल्या - ‘गणपती बाप्पा.. मोरया.... हर..हर.. महादेव!!!’ पुण्यातून वरंधा घाटातून उतरून, मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातलं ‘खेड’ नावाचं ‘गाव’ गाठलं. गावात काळकाई देवीचं थोरलं प्रशस्थ राउळ आहे. काळकाई देवीच्या गड-कोटांवर, डोंगर-द-यात आम्ही जाणार होतो, म्हणून सुरक्षित अन् आनंददायी ट्रेकसाठी देवीला दंडवत घातलं.

पल्ला लांबचा होता..
‘रसाळ–सुमार–महीपत’ ह्या किल्ल्यांची रांग सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर अशी दक्षिणोत्तर, पण स्वतंत्रपणे धावते. खरी मज्जा आहे, जर हे ३ किल्ले सुट्टे-सुट्टे न बघता, एका सलग डोंगरयात्रेमध्ये धुंडाळायचे, पुढे ‘जगबुडी’ नावाच्या भीतीदायक नावाच्या नदीच्या चिंचोळ्या खो-यात उतरायचं, अन् मधु-मकरंदगडाजवळच्या हातलोट घाटानं सह्याद्री माथा गाठायचा. ३-४ दिवसांचा ‘क्रॉसकंट्री’ ट्रेक मारायचा बेत आखला.
001_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpgनावाप्रमाणे अत्यंत रसाळ अनुभूती देणारा रसाळगड
खेड गावापाशी मुंबई-गोवा हायवे सोडून गाडीरस्त्यानं २० कि.मी. अंतरावर रसाळगडाचा पायथा आहे. दूरवर सह्याद्रीची मुख्य रांग निळसर धुरकट दिसू लागली. गुगल मॅप्स आणि गावक-यांच्या मदतीनं योग्य ठिकाणी वळणं घेतली. पण, दाट झाडीतून जाणा-या वळणां-वळणांच्या चढ-उताराच्या रस्त्यावरून ‘रसाळ–सुमार–महीपत’ किल्ल्यांची रांग कुठेच दिसेना. शेवटी दिसला एक झाडीभरला डोंगर अन् माथ्यावर थोडकी तटबंदी. ‘अरे, हाच रसाळगड!!!’ ओळख पटली.
002_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

उभ्या चढावरून गाडीवाट चढून वाट अगदी रसाळगडाच्या जवळ पायथ्याशी घेऊन गेली. गाडीला अलविदा केला.
003_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

४ दिवसांच्या ट्रेकच्या सामानानं लादलेल्या बोजड सॅक्स पाठीवर चढवल्या. अगदी पायथ्यापासून गड चढण्याचे कष्ट नक्कीच वाचणार होते. गडाचा माथा उजवीकडे ठेवून १० मिनिटं आडवं जातानाही हृदयाचे ठोके वाढले, म्हणजे चला - झाला ट्रेकचा श्रीगणेशा!!! थोडक्या चढणीनंतर धारेवर पाण्याच्या सिंटेक्स टाकीपाशी पोहोचलो. धारेपासून हाकेच्या अंतरावर खाली रसाळवाडी अन् उजवीकडे वर गडाचं द्वार दिसलं.

दुस-या दिवसाच्या भटकंतीसाठी रसाळगड ते महीपतगड ही वाट लांबची अन् फसवी.. बरेचश्या ट्रेकर्सना सुमारगडच्या कातळारोहण वाटेमुळे म्हणा; किंवा खूप दमल्यामुळे असेल; किंवा वाटाड्यानंच घाबरवल्यामुळे सुमारगड सोडून द्यावा लागतो. त्यामुळे आम्ही वाटाड्या आवर्जून घ्यायचं ठरवलं होतं. रसाळवाडीत वाटाड्या मिळायला एक तास विनवण्या कराव्या लागतील, असं अज्जिबात वाटलं नव्हतं. झालंय असं, की गावात फक्त पोरं-बाया-वयस्क उरलेले. बाकी तरणी पोरं-पुरुष पोटा-पाण्यासाठी मोठ्या गावात-शहरात. वाटा मोडत चाललेल्या, अन् गावक-यांच्या गरजांसाठी जुन्या रानवाटा वापरायची गरज उरली नाहीये.... शेवटी, कसाबसा ‘दगडू’ नावाचा वाटाड्या ठरला, आणि आम्हांला हुश्श वाटलं.

आता, रसाळगडाच्या चढावर कूच केलं. गडाच्या पहिल्या द्वारापाशी वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक बुरुज खुणावतो.
004_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

मारुतीबाप्पाचं दर्शन घेऊन उभ्या पाय-या चढून, उत्तम बांधणीच्या दुस-या द्वारापाशी पोहोचलो.
005_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

रसाळगडावरून लांबवर का होईना, पण सुमारगड अन् महिपतगड दर्शन तरी देतील, हा अंदाज साफ फसला. उद्याचा सुमारगडाकडचा प्रवास खडतर असणार, याची नांदी दिली उत्तरेकडच्या उत्तुंग धारेनं. असू दे, याचा नंतर विचार करू, असा विचार करून पुढे निघालो.
006_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
माथ्यावरच्या गवताळ पठारावरून ५ मिनिटात झोलाई देवीचं कौलारू राउळ गाठलं. कौलारू मंदिर, जवळची पाण्याची टाकी, दीपमाळ अन् पाठीमागची सुमारगडाकडे झेपावलेली डोंगररांग असं सुरेख दृश्य!
007_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

झोलाई देवीचं कौलारू राउळ मुक्कामास अतिशय उत्तम!
008_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
गाभा-यात झोलाई देवीचं दर्शन घेतलं. वीज आहे. देवीची त्रैवार्षिक यात्रा असते.
009_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
मंदिरामागे किंचित उंचवट्यावर राजवाडा अन् बुरुजांची महिरप आहे.
010_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
देवळाजवळ पिण्याच्या पाण्याची २ तळी अन् पल्याड एक धान्याचं कोठार आहे. पावसा-पाण्यात गावकरी गुरं बांधत असल्यानं, राहण्याच्या दृष्टीनं यां वास्तूचा फारसा उपयोग नाही.
011_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
गडाच्या पाच एकर माथ्यावर भरपूर अवशेष आहेत. रसाळगड तेराव्या शतकात बहामनी राजवटीत बांधला अन् १६६० च्या कोकण मोहिमेत रसाळ-सुमार-महीपत हे दुर्गत्रिकुट शिवरायांनी स्वराज्यात आणलं. (संदर्भ: सांगती सह्याद्रीचा)
दक्षिण टोकापर्यंत हुंदडून आलो. गडापासून सुटावलेल्या टेपाडापलिकडे जगबुडी नदीच्या खोरं अन् मागे सह्याद्रीच्या मुख्य रांगेत पर्वत अन् महिमंडणगडाची टोकं खुणावत होती.
012_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
तर उत्तरेला पहिल्यांदाच झाडीभरल्या उभ्या डोंगररांगेमागे सुमारगडाचा कातळमाथा डोकावला. महिपतगड त्याच्याही मागे आडवा-तिडवा पसरला असावा. वैशिष्ट्यपूर्ण आकार काही जाणवला नाही.
013_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
रसाळगडाच्या दूरवरच्या दक्षिण टोकापासूनंच फक्त सुमारगडाचा माथा दिसतो, त्याच्या हा क्लोज-अप. उद्याच्या चढाईचे वेध लागू लागले होते...
014_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
परत मंदिराकडे येताना एका लवणात काही समाध्या दिसल्या. कोण-कुठल्या आयुष्यांच्या कथा इथल्या हवेत रुंजी घालत असतील, असं वाटून गेलं.
015_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
उघड्यावर झिजलेलं गजलक्ष्मी शिल्प विखुरलेलं, तर पल्याड शंकराची पिंड उघड्यावर तापत होती..
016_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
विखुरलेले अवशेष बघून थोडं उदास वाटू लागलं, पण सभोवतालच्या रानव्यानं दिठी सुखावली.
018_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
गडावर शोधत गेल्यावर तब्बल १६ तोफा मोजल्या. काहींवर पोर्तुगीज/ इंग्रजी अक्षरे चिन्हे आहेत.
022_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpgसंध्याकाळचा गार वारा सुटला, अन् सूर्य पश्चिमेला कलला. रसाळगडानं थोडक्या वेळात आपलंसं करून टाकलं होतं. गडावर आज माजलीये फुटकळ झुडुपांची दाटी, अस्ताव्यस्त विखुरलेले दगड अन् भणाणणारं मोकाट वावटळ.. पण, गडावरची जोती, दरवाजे, समाध्या, तोफा, बुरुज, टाकी यांच्या पोटात दडलीयेत इतिहासाचे चढ-उतार, आनंद-उल्हास, जय-पराजयाची कित्येक हसू अन् आसवं.. आज मौनात गेलेल्या या भग्न अवशेषांचे पोवाडे गायचं कवित्व मात्र आपल्याकडे नाही, याची ‘हुरहूर’ वाटते... कधीतरी अलगद सूर्यास्त झाला..
023_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
पहाटेच्या थंडीत आलं-वाल्या स्पेशल चहाचे घुटके घेताना, पूर्वेला सह्याद्रीच्या धारेनं लक्ष वेधलं. तलम ढगांची पुसट रांगोळी कोवळ्या सूर्यकिरणांच्या चाहुलीनं लाजून रक्तवर्ण होवू लागली.
024_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

सह्याद्रीत भटकताना गड-किल्ल्यांवर मुक्काम नेहेमीच आनंद देणारा, पण ‘रसाळगडा’वर काहीतरी वेगळी जादू आहे. इथला मुक्काम नितांत सुंदर, उच्चकोटीचा, प्रसन्न अन् अवश्य अनुभवावा असा!!!
025_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpgसुमारगडाकडे दमदार चढाई
रसाळवाडीतून रसाळगडाला ‘अलविदा’ करताना खूपंच जीवावर आलं. पण चाहूल लागली होती ट्रेकच्या पुढच्या आव्हानात्मक टप्प्यांची.
026_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
रसाळवाडीतून शेताडीतून उत्तरेला निघाल्यावर, धारेवरून वरचं पठार गाठण्याच्या ऐवजी, डावीकडून (बाण बघा) आडवं गेलो.
027_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
२०-२५ मिनिटं आडवं गेल्यावर उजवीकडे उभं चढून धारेवर पोहोचलो.
028_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
गवताळलेल्या धारेवरून मागं बघताना रसाळगड मागे दूर जाऊ लागला.
029_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
धारेवरची उभी वाट घामटं काढू पाहत होती.
030_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
वाटाड्या ‘दगडूभाऊ’ हा फारंच अवली माणूस निघाला. आम्ही २ मिनिटं विश्रांती घ्यायला लागलो किंवा चौकसपणे एखादा प्रश्न विचारायला गेलो, की संपलंच... पुढची १० मिनिटं दगडू-महाराजांचं भाषण सुरू.. अन् ते घसरणार मूल्यशिक्षण अन् जगात कशी वाईट लोकं आहेत, याच विषयावर.. फूल करमणूक!!! दगडू चलाख आहेच, पण गंमतीचा भाग सोडला तर या भागाची उत्तम माहिती असलेला वाटाड्या आहे.
031_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
वाट घसरड्या अरुंद आडव्या वाटेवरून जाऊ लागली. दरी खोलावत जात होती, तर रसाळगड झपाट्यानं मागे पडत होता.
032_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg033_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

शांतपणे दम टिकवून एक-एक पाऊल टाकत आम्ही अधिकाधिक उंची गाठत होतो.
034_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

गवताळ मुरमाड घसरडे डोंगरउतार चढत होतो, म्हणून बरे होते. हाच ट्रेक उलट्या दिशेनं केला असता, तर उतरायला जास्त त्रास झाला असता हे नक्की.
035_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

माथ्यापर्यंत न चढता अखेरीस वाट उजवीकडे पदरातल्या झाडीत लपलेल्या धनगरवाड्यापाशी आली. रसाळवाडीपासून इथं पोहोचायला १.५ तास लागले होते. अश्या दुर्गम जागी धनगर त्यांच्या गायी-म्हसरांबरोबर कसे टिकून राहत असतील, ही खरंच कमाल आहे... धनगरवाड्यापासून पहिल्यांदा जवळून दिसला ‘सुमारगडा’चा कातळमाथा.
036_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

धनगरवाड्यापासून झाडीतून आडवं जात सुमारगडाच्या जवळ जावू लागलो. सुमारगडाची वाट दुर्गम, गचपणीची अन् सहज सापडत नाही. त्यातंच शेवटच्या टप्प्यांत दृष्टीभय असलेलं कातळारोहण करावं लागतं, म्हणून बरेचसे ट्रेकर्स सुमारगड चढायचा प्रयत्न करत नाहीत. अर्थात, सुमारगड चढण्याचा प्रयत्न न करणं किंवा चढायला न जमणं, यात फार वाईट वाटून घ्यायचं कारण नाही.
037_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpgसुमारगडाची थ-रा-र-क चढाई
मोकळवनात सुमारगडासमोर आल्यावर इथून गडावर जायला दोन वाटा आहेत.
पहिली वाट म्हणजे, थेट गडाच्या कातळमाथ्याच्या दिशेने घसा-यावरून चढत, कातळमाथा डावीकडे ठेवून आडवं जाणे व गडाचा कातळारोहण मार्ग गाठणे. (सूचना: ही वाट अजिबात घेऊ नये)
038_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

दुसरी वाट थोडी लांबची आहे. पण गडाचा माथा गाठण्याच्या यशाची शक्यता अन् सुरक्षितता नक्कीच वाढते. म्हणूनंच आम्ही घेतली दुसरी वाट. मोकळवनातून डावीकडील दाट झाडीत शिरणारी वाट घेतली. सुमारगडाचा माथा उजवीकडे उंच वर ठेवत हळूहळू वर चढू लागली.
039_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

आडवं वर चढत चढत सहज मागं वळून पाहिलं, तर सुमारगड पूर्ण मागे पडला होता.
040_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg041_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
शेवटी आम्ही पोहोचलो दाट झाडीभरल्या खिंडीत, म्हणजे मोकळवनातून दिसलेल्या सुमारगडाच्या बरोब्बर मागच्या बाजूस आम्ही पोहोचलो होतो. ही खिंड आमच्या भटकंतीतला एक महत्त्वाचा माईलस्टोन होता. कारण, आता खिंडीतून सरळ उतरणारी वाट महीपतगडाकडे जाणार होती, तर उजवीकडे दक्षिणेला जाणारी वाट सुमारगडाकडे जाणार होती. सकाळी लागलेल्या धनगरवाड्यापासून सुमारगडाची ही खिंड गाठायला आम्हांला १ तास लागला होता.

सुमारगडावर जायचंच आहे, असं म्हणल्यावर दगडूभाऊंनी थोडा भाव खाल्ला, “पोरंहो, वाईच अडचन हाय रानात.. बगा, जमणारे कां तुम्हांस्नि..”. अर्थात, दगडूभाऊंकडे दुर्लक्ष करून चिक्की, गुळपोळी अन् ग्लुकोन-डी चा मारा करून ५ मिनिटांत सुमारगडाकडे कूच केलं. कारवीच्या दाट रानात सॅक दडवून ठेवल्या. अन्, उभा छातीवरचा ५ मिनिटं चढ चढल्यावर पाठीमागे प्रथमंच महीपतगडानं दर्शन दिलं.
042_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

आडवी वाट झाडीतून सुमारगडाकडे निघाली.
043_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

मधल्या मोकळ्या धारेवरून समोर खोल दरी अन् उजवीकडे सुमारगडाचा कातळमाथा असं पॅनोरमा दृश्य समोर होतं.
044_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

सुमारगडाच्या अगदी पायथ्याच्या धारेवरून चढून कातळमाथ्याच्या पायथ्याशी पोहोचलो. फारशी मळलेली नसली, तरी एकंच एक वाट आहे. सुमारगडाच्या उत्सुकतेमुळे अन् वा-याच्या झोतांमुळे दम लागला, तरी आम्ही ताडताड पुढे जात होतो.
045_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg046_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

कातळमाथ्याला डावीकडून वळसा घालत घुसलो. डावीकडच्या दरडावणा-या दरीकडे काणाडोळा करून पुढे गेलो.
047_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

वाट खूपंच बारीक अन् गचपणाची-अडचणीची होती. थेट दृष्टीभय नसलं, तरी ती जाणवत होतीच ना... अश्या ठिकाणी, पुरेशी विश्रांती घेणं अन् मग शांतपणे एक-एक पाऊल टाकणं महत्त्वाचं.
048_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
अखेरीस पोहोचलो सुमारगडाच्या सुप्रसिद्ध कातळारोहण टप्प्यापाशी.
049_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
अंदाजे ६० फुटांचा हा कातळारोहण टप्पा. कसलेल्या ट्रेकर्सना अवघड अजिबात नाही.
050_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
कातळ अवघड कुठेच नाहीत. आम्ही दोर वापरला नाही अन् दोर वापरायची गरज सुद्धा वाटली नाही. (माथ्याजवळच्या एका झाडाला दोर बांधता येऊ शकेल.)
051_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
पण ट्रेकर्सना सुमारगड आव्हानात्मक वाटत असावं, याची कारणं म्हणजे एकतर आपण खूपंच अडचणीच्या वाटेनं इथे पोहोचतो. दुसरं म्हणजे दमलेल्या अवस्थेत दृष्टीभय असलेल्या द-या बाजूला असताना हा कातळ चढणं मानसिकदृष्ट्या अवघड होत असावं.
052_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
अखेर आम्ही पोहोचलो सुमारगडाच्या माथ्यावर!
रसाळ-महीपत मार्गावरच्या खिंडीपासून निघाल्यापासून पाऊण तास लागला होता, तर रसाळगडापासून सुमारगडाच्या माथ्यावर पोहोचायला साडेचार तास लागले होते. माथ्यावर रानटी झुडुपं माजलेली. एका देवतेची मूर्ती दिसली.
053_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
पाण्याची एकाजवळ एक खोदलेली थोरली ४-५ टाकी.
054_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
डावीकडे कातळकोरीव गुहा दिसली.
055_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
गुहेत अर्थातंच होती शंकराची पिंड. ‘शंभो शंकरा’च्या स्वरांनी दुर्गम दुर्गावरील शिवशक्तीस आळवलं. शंकराच्या पिंडीवरील अभिषेक व्हावा, म्हणून तांब्यात पाणी घालायला गेलो तर त्यातून बाहेर पडला एक विंचू!!!
056_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
भीती नाही, पण (सॉरी) किळस वाटून गुहेबाहेर आलो, तर इकडे दगडूभाउंनी ‘पोरंहो, परत लवकर चला ना’, असं तुणतुणं वाजवायला सुरुवात केली होती. एव्हाना त्याच्याकडे दुर्लक्ष करायला आम्ही सरावलो होतो. गचपणातून पुढं वाट काढत गेल्यावर एक खांब सोडून कातळाच्या आत कोरत नेलेलं टाकं दिसलं.
057_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
दक्षिणेला बघितल्यावर समोरचं दृश्य वेडावणारं होतं, कारण याच बंबाळ्या रानातून अन् डोंगररांगांमधून आपण रसाळगडापासून चालत आलोय, यावर विश्वासंच बसेना.
058_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
तर उत्तरेला होतं अस्ताव्यस्त पसरलेल्या महीपतगडाचं दृश्य!
059_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
पूर्वेकडे जगबुडी नदीच्या खो-यापलीकडे सह्याद्रीची निळसर रंगाची भिंत अन् त्यावरचा मानाचा तुरा – मधु-मकरंदगडाची जोड-शिखरं!
060_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
बाकी ३ एकर क्षेत्रफळात पसरलेल्या गडावर तुरळक जोती अन् तटबंदी दिसते. अर्ध्या तासांत गडफेरी अन् विश्रांती घेऊन वेळ आली सुमारगडाला अलविदा म्हणायची. परतीच्या मार्गावर परत एकदा ६० फुटी कातळाचं कोडं सोडवणं आलं. सुमारगडाचा कातळ उतरायची सुरुवात होते इथून... थरारक!!!
061_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
सावकाश कातळटप्पा उतरल्यावर हुश्श केलं. उजवीकडे २० पावलांवर कातळकोरीव थंड पाण्याचं टाकं आहे. सुमारगडाची दक्षिणेकडून चढणारी घसा-याची वाट याच टाक्यापाशी पोहोचते. पाण्याचा मारा करून, तापलेली इंजिनं गार केली.
062_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
आल्यावाटेनं परत उत्तरेला महीपतगडाच्या दिशेनं निघालो. परत एकदा अशक्य गचपण, अरुंद वाट अन् दृष्टीभय!!!
063_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg064_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

थोडं मोकळ्यात आल्यावर बरं वाटलं. पाठीमागे सुमारगडाचा कातळमाथा अन् टोकावरचा बुरुज उन्हांत तळपत होते.
065_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
रसाळ-महीपत मार्गावरच्या खिंडीपासून निघून सुमारगड बघून परत यायला २ तास लागले. तासाभराची थंडगार सावलीत विश्रांती, रुचकर जेवण अन् ताक पिऊन तुकडी ताजीतवानी झाली.

घनदाट जंगलात मळलेल्या वाटेवरून आमचं आजचं गंतव्य ‘महीपतगड’ समोर दिसू लागलं.
066_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
दगडूभाऊंच्या कृपेनं जवळच्या वाटेनं महीपतगडाच्या पायथ्याजवळ आलो. सकाळी निघाल्यापासून ७ तास झाले होते. माहितगार व्यक्ती सोबत नसताना रसाळ-सुमार-महीपत अशी वाट शोधणं अशक्य नसलं, तरी अवघड नक्कीच आहे. डोंगररचना क्लिष्ट आहे अन् पल्ला खूप लांबचा आहे. वाट समजा चुकली तर दुप्पट वेळ जाणार... दगडूभाऊंना उजेडात परत रसाळवाडीला पोहोचता यावं, म्हणून त्यांच्या आभारप्रदर्शनाचा कार्यक्रम पार पाडला. मानधन, फळं अन् पाणी सोबत देवून निरोप घेतला.
067_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

दांडावरचा उतार उतरून ओढ्यापाशी पोहोचलो. महीपतगडावर येणारे बरेचसे ट्रेकर्स पायथ्याच्या दहिवली गावातून ४-५ तास चढाई करून इथे पोहोचतात. समोर बेलदारवाडीची घरटी दिसू लागली. वाडीत अगत्यानं स्वागत अन् कोरा चहा पुढे आला. तिस-या दिवशीच्या वाटचालीसाठी परत एकदा वाटाड्या ठरवला. महिपतगडाच्या वाटेवरून, उतरंडीला लागलेल्या उन्हांतला सुमारगड, त्यांच्या डोंगरवळया अन् पायथ्याची बेलदारवाडी हे दृश्य देखणं होतं.
068_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

अजून झूम करून बघितल्यावर, आव्हानात्मक अश्या सुमारगडाच्या चरणी नतमस्तक झाल्याचं मनोमन समाधान वाटून गेलं.
069_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

उभ्या दांडावरची मळलेली वाट विजेच्या तारांसोबत महीपतगडाचा चढ चढू लागली. थोडके बुरुज खुणावत होते. अर्थात, संरक्षणासाठी गडाचं दुर्गमत्व हेच खरं अस्त्र!
070_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

१२० एकर क्षेत्रफळाच्या विस्तृत गडाच्या भेटीसाठी स्वतंत्र दिवस अन् वाटाड्या हवा. गडावर ६ दरवाजे – उत्तरेला कोतवाल दरवाजा, ईशान्येला लाल देवडी, पूर्वेला पुसाटी दरवाजा, आग्नेय यशवंत दरवाजा, दक्षिणेला खेड दरवाजा, पश्चिमेला शिवगंगा दरवाजा. (संदर्भ: महाराष्ट्र शासन गॅझेटिअर) माथ्यावरचं तुडुंब दाट रान बघून, ठाणे जिल्ह्यातल्या माहुली गडाची आठवण आली. पुढच्या वाटेची खूण म्हणजे विजेच्या तारांसोबत उजवीकडे जायचं. अन्यथा, इथे रानात हरवणं, ही सगळ्यात सोप्पी गोष्ट आहे. जुन्या बंधा-यापाशी आलो. जवळ मारुती अन् गणपतीचं ठाणं आहे म्हणे. (जे आम्ही बघायचं विसरलो.)
071_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

१५ मिनिटात वाट ‘पारेश्वर’ महादेवाच्या राउळापाशी पोहोचली. आख्ख्या दिवसात रसाळगडावरून सुमारगड करून महीपतगडावर पोहोचायला ९.५ तास लागले होते, पुरेशी विश्रांती घेत, धावधाव न करता पण उगाच वेळ वाया न घालवता...
.
072_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
घनदाट रानातलं गडावरचं रोज पूजा होणारं शिवमंदिर – पत्र्याची शेड अन् फरश्या घातलेल्या - आसपासची मोकळी जागा - विजेची सोय – समोर पाण्याची विहीर अशी ही मुक्कामास झ्याक जागा!!!
073_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg075_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

पोहोचलो असू-नसू तोच, हळूहळू अंधार दाटू लागला. थंडी दणदण वाढू लागली. विहिरीवरून पाणी भरून आणलं. सूप-खिचडी रटरटू लागली. मिट्ट काळोखात आसपासचं रान अजूनंच गूढ वाटू लागलं. शेकोटीच्या उबेवर हात शेकताना, पलीकडच्या झाडांवर आमच्या थरथरणा-या सावल्या उमटू लागल्या.. दिवसभरात भटकलेल्या वाटा, डोंगरद-या, घसारा-कातळ, रानफुलं-पाखरांच्या शीळा मनी रुंजी घालत होत्या...

जगबुडी खो-याची अनवट वाट
दिवस तिसरा उजाडला. आजचा पल्ला अजून मोठा होता. महीपतगड बघून जगबुडी नदीच्या खो-यात उतरायचं. पुढे हातलोट घाटाच्या पायथ्याशी बिरमणी गाव गाठायचं. अन् जमलंच तर हातलोट घाट चढून सह्याद्री घाटमाथ्यावर पोहोचायचं असा ताकदीचा बेत होता. सकाळी बघतो तर काय, आमची टीम डाऊन!!! रात्री टीममधल्या ब-याच लोकांना आम्ही कधीच ट्रेकला अनुभवला नव्हता, असा उलट्यांचा त्रास झाला. दिवसाभराच्या उन्हां-तान्हात दगदगीचा, रानोमाळचं पाणी पिण्याचा अन् अपचनाचा परिणाम असावा, असं वाटलं. अश्या परिस्थितीत ट्रेकचा खूप ताण झेपणार नव्हता. आपण ट्रेकचा जोपर्यंत आनंद लुटू शकतोय, तोपर्यंत ताण अन् कष्ट घेण्यात अर्थ असतो. शेवटी महिपतगड दर्शन न करता निघण्याचा निर्णय घेतला.

पोरं मात्र मोठ्ठ्या जिद्दीची. ठरल्या वेळेला निघायला तय्यार. शरीरं शिणली होती, पण इरादे पक्के होते. पारेश्वर महादेवाला वंदन करून यशवंती दरवाज्याच्या अनवट वाटेनं महिपतगड उतरून, जगबुडी नदीच्या खो-यात वडगावला पोहोचणे, हे पहिलं ध्येय होतं. गडाच्या दाट झाडीपासून आग्नेयेच्या यशवंती दरवाज्याच्या दिशेनं निघालो.
076_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

यशवंती बुरुजापाशी चुन्याचे ५-६ बुरुज/ संरक्षक आडोसे वैशिष्ट्यपूर्ण होते.
077_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
पल्याडच्या दरीचं खोलवर दर्शन थरारक होतंच, पण खरंतर टीमचा फिटनेस बघता ते टेन्शनंच वाढवणारं होतं.
078_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

यशवंती बुरुजाखालचा घसारा अन् त्याखालचा उभा उतार उतरलो.
080_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

कातळाचे टेपाड असलेल्या माथ्याला डावीकडे ठेवून आडवं जात राहिलो. महिपतगड मागे मागे पडू लागला.
082_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

अचानक लक्षात आलं, आपण सुमारगड अन् महिपतगड यांना समांतर धावणा-या रांगेवर आहोत आपण, समोर लांब दिसते ती सुमारगडाची रांग अन् उजवीकडे महिपतगड!!! एक झ्याक पॅनोरमा घेऊन टाकला
083_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

यशवंती बुरुजापासून उतरणा-या रांगेपासून डावीकडे दरीत उतरणा-या सोंडांपैकी तिस-यां सोंडेवरून वाट उतरणार होती. त्याच्या अलीकडच्या घळीत पोहोचण्यासाठी आम्ही आडवं-आडवं जात राहिलो.
084_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

नैऋत्येला समोर सुमारगडाचा उभार अन् त्याचा कोसळलेला कडा थरारक होता.
085_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg086_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

आमची टीम थकव्यानं सारखी सारखी विश्रांती घेत असूनही त्रागा न करता, आमच्या सोबत येणारा वाटाड्या – राया. मोजकंच पण मोलाचं बोलणा-या बुद्धिमान रायानं आम्हांला कधीच मनोमन जिंकलं होतं. वाटाड्या ‘राया’ यांना जड अंत:करणानं निरोप दिला. थोडक्या वेळात जुळलेले आमचे मैत्र – कारण एकंच ‘सह्याद्रीप्रेम’.
087_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

महीपतगडाच्या पारेश्वराच्या राउळापासून निघाल्यावर, अडीच तासांच्या चालीनंतर खो-यात उतरणा-या सोंडेच्या घळीपाशी आलो. घळीच्या दाट झाडीतून घसरड्या वाटेवरून १०० मी उतार उतरलो.
088_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

सह्याद्रीच्या दुर्गम भागाचं वैभवाचं कवतिक डोळ्यांत साठवत होती.
089_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

थोडका अशक्तपणा जाणवत असल्यानं, उभ्या सोंडेवरून दाट रानातून ४०० मी. उतरणं, खूपंच जड गेलं. पण, कोणीही हार मानली नाही.
090_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

रानात झाडाखाली काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण दिसलं. काटक्या अन् पानं रचून ‘हे’ काय अन् कश्यासाठी बनवलं होतं, कुणास ठावूक!
091_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

नदीच्या काठावरून शेताडीतून वडगाव खुर्दकडे निघालो, तर उभ्या डोंगररांगांनी पिंगा घातला होता.
092_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

कोण्या एक्या खोडाची पानं वठलेली, पण आख्खं खोड मश्रूम्सनी लगडलेलं..
093_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

वडगाव खुर्द हे कोकणातलं टिपिकल देखणं निवांत गाव, सह्याद्रीच्या अगदी कुशीत वसलंय.
094_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

दमलेल्या ट्रेकर्सच्या मदतीला सह्याद्रीनंच बहुदा पाठवली असावी, एसटीची लाल बस. वडगाव खुर्द ते बिरमणी प्रवासातले ४ कि.मी. चाल वाचली होती.
095_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg096_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

एसटी सोडल्यावर बिरमणी गाव अजून ४ कि.मी. दूर होतं. डांबरी सडकेवरून चालणं, नेहेमीप्रमाणे जीवावर आलं. पण, समोर उठावलेले सह्याद्रीचे जब-यां पहाड उत्साह संचारला.
097_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

सह्याद्रीमाथ्याची उंची जिथे सर्वात कमी, अश्या डावीकडच्या खिंडीतून हातलोट घाटाची वाट असणार होती.
098_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

मधु-मकरंदगडाचे पश्चिम कडे उन्हांत तळपत होते.
099_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

अखेर आलं हातलोट नावाचं छानंसं गाव. ट्रेकच्या तिस-या दिवशी टीम आजारी असताना मर्यादित ५-६ तासांची चाल करून, दिवसासाठी ठरलेलं लक्ष्य साध्य केलं होतं अन् हातलोट गावात मारुती मंदिरात मुक्काम करायचं ठरलं.
100_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

गावातल्या जबाबदार माणसांनी आपुलकीनं चौकशी केली. त्यातल्या प्रेमळ आज्जींना विसरणं अवघड आहे.
101_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

लवकर जेवणं करून लख्ख चांदण्यात शतपावली मारून झाली. अन् लवकरच मारुती मंदिरात घोरण्याचे आवाज विविध सूर-ताल-लयीत घुमू लागले.

नितांतसुंदर हातलोट घाट
आणि उजाडला ट्रेकचा चौथा दिवस. पहाटे उजाडायच्या आत कूच केलं. सह्याद्रीत दिवसोंदिवस ट्रेक करण्याची मज्जा आम्ही चाखत होतो. गावाबाहेरच्या सह्याद्रीच्या उंच भिंती आमच्या तीनही बाजूंनी उठवल्या होत्या. पायथ्याचं टुमदार राउळ होतं – भैरी कुंबलजाई देवीचं.
102_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

मधु-मकरंदगडाचे पश्चिम कडे अशक्य उंच दिसत होते.
103_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

१० मिनिटात नदीचं पात्र पार करून, हातलोट घाटाची वळणं सुरू झाली. घाटाची सुरुवात दाखवायला इथंपर्यंत बिरमणी गावातले गुरव हातलोट सोबत आले. त्यांना निरोप दिला.
104_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

पूर्वेला उगवतीच्या नानाविध छटा मधु-मकरंदगडाच्या धारेवर उमटत होते.
105_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

मंद चढणीचा, वळणां-वळणांचा असल्यानं हातलोट घाट अर्थातच लांबचा मार्ग. पण आहे मात्र नितांत सुंदर!!! एखाद्या खट्याळ पाखराची मोहक शीळ सतत घुमत होती, अन् सोबतीला रानफुलांचे ताटवे.
106_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

मधु-मकरंदगडाच्या धारेवरून आता सूर्यकिरणं मंदपणे उतरू लागली.
107_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

चार दिवसांच्या दमदार चालीमुळे ट्रेकर्स जब-या ‘ह्रीदम’ मध्ये आलेले. त्यामुळे चढाईचा थकवा कोणालाच नाही.
108_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

आता घळीतून चढणा-या वाटेसोबत उंच कातळभिंती सोबतीस आल्या, म्हणजेच सह्याद्री माथा जवळ आलेला.
109_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg110_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

जगबुडीचं खोरं आपल्याच मस्तीत धुकटात हरवलं होतं.
111_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

हातलोट घाटाच्या माथ्यावर पोहोचतोय, तर ‘फडफड फडफड’ अश्या जोरात आवाजानं दचकलो. विशाल आकाराच्या धनेश पक्ष्यानं (Great Indian Hornbill) स्वागत केलं होतं.
118_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg
(प्र.चि. साभार - विकिपीडिया)

सह्याद्री माथ्यावर पाण्याच्या कोरीव टाक्यानं अन् सदाहरित अरण्याच्या दर्शनानं सुखावलो. टाक्याचं पाणी मात्र वन्यजीव वापरत असावेत, त्यामुळे पिण्यायोग्य नाही.
112_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg113_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

सह्याद्री माथ्यावर आल्यावर देखील मधु-मकरंदगड अजून जास्त आभाळात घुसल्यासारखा वाटू लागला.
114_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

सदाहरित रान - खळाळणारे झरे – कुठे शेताडीत लावलेलं पीक – हवेत सुखद गारवा.. – सह्याद्रीच्या कुशीतल्या हातलोट गावच्या आम्ही प्रेमात पडलो.
115_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

ठरवलेली गाडी आम्हांला परत न्यायला अगदी वेळेवर इतक्या दुर्गम जागी पोहोचली होती.
116_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpgलांबच लांब पसरलेल्या दुर्गम रांगांमधून;
हरवत-हरपत चाललेल्या रानवाटा तुडवून;
काट्यांमधून – घसा-यावरून – कातळावरून;
दिवसेंदिवस टिकून राहून खडतर ट्रेक करणं,
स्वतःच्या क्षमतांना पुढे ढकलून बघणं;
सह्याद्रीच्या राकट सौंदर्यापुढे नतमस्तक होणं;
जुन्या-जाणत्या गिरिजनांबरोबर जीवाचं मैत्र जोडणं...
- हे कसलं खूळ आम्ही डोक्यात घेतलं कोणास ठावूक.

हा होता एक ‘शुद्ध देसी ट्रेक’ - अजून काय!!!
117_RasalSumarMahipat_DiscoverSahyadri.jpg

- © Discoverसह्याद्री (साईप्रकाश बेलसरे)
- प्र.चि. श्रेय: साकेत गुडी, Discoverसह्याद्री

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Discoverसह्याद्री, मावळ्यांनी केलेल्या जावळीच्या खोर्‍याची भ्रमणगाथा काही औरच! असेच अनेक किल्ले पालथे घाला! Happy
आ.न.,
-गा.पै.

जबरदस्त ट्रेक, वाचताना मजा पण आली आणि थरारही अनुभवला.

धन्यवाद आम्हालाही सर्व ठिकाणी फिरवुन आणल्या बद्दल Happy

पु.ले.शु. आणि भटकंतीला सुद्धा Happy

रसाळ-सुमार-महीपत-हातलोट घाट ट्रेकचे अतिशय अप्रतिम असे वर्णन..अगदी बारीक-सारीक गोष्टींपासून सोप्या पदधतीने ट्रेकचा मार्ग समजावून सांगितल्यामुळे इतर ट्रेकर्सनाही याचा मोठा फायदा होईल.आतापर्यत वाचलेल्या ट्रेक वर्णनामध्ये या लेखाचा खुप वरचा क्रमांक लागेल.

एक नंबर … नेहमीप्रमाणे उत्तम लिखाण आणि जबरदस्त तपशीलवर माहिती… येत्या हिवाळ्यात तिकडे गेल्यावर तुला फोन करेनच … आणि ह्या लेखाची Print-Out सुद्धा घेऊन जाणार …

अतिशय सुंदर लेख व प्रचि ! परवाच मनोज (स्वच्छंदी) सोबत या ट्रेकबद्दल बोलणे झाले होते नि तुझा हा लेख समोर आला.. प्रत्यक्षात ट्रेक डोळ्यासमोर उभा राहीला.. शुद्ध देसी ट्रेक ! शिर्षक भारीच !

भारी वर्णन लिहले आहे. इत्यंभुत माहिती आणि सोबतीला तितकीच देखणी प्र.चि. नावाप्रमाणेच शोध घेताय डोंगररांगांचा ....

फारच सुंदर रे..वर्णन अगदी ओघवते आणि डोळ्यासमोर चित्र उभे करणारे....
बाकी फोटोंमध्ये बाण आणि नावे दिल्यामुळे या ट्रेकला जाताना या लेखाची प्रिंट घेऊन जाणार एवढे मात्र निश्चित..

बाकी हॉर्नबिलचा कसला कडक फोटो आलाय असे म्हणणार तोच खालची ओळ वाचली..

मस्त झालाय ट्रेक. काळकाई आणि झोलाईच्या मंदिरांचे फोटो पाहून मजा वाटली. आम्ही खेडमधूनच जाऊन एकदा रसाळगड केला होता. नवर्‍याचं बालपण याच परिसरात गेल्याने त्याला इथे भटकायला फार मजा येते.

अवांतर: खेडची काळकाई ही सासुरवाशिणींची देवी आहे. या देवीसमोर जाऊन सासुरवाशिणीने सासरचा जाच सांगितला तर देवी मंदिरातून त्या सासरी जाते (आणि सासरच्यांना ईंगा दाखवते) अशी श्रद्धा आहे.

वाचतांना तुझ्याबरोबर हा ट्रेक आम्हीही अनुभवत होतो.. सुमारगडाच्या मागल्या दाराच्या वाटेची गंमत माहित नव्हती, मीही सुमार आपला नाय होऊ शकत असेच धरुन चाललो होतो.. आता या लेखाने हुरुप वाढला.. बंकापुरे-यो-आशु ठरवायचा कां जानेवारीत हा क्रॉस-कंट्री??? .. (डिसेंबरात चक्रम हायकर्सचं सह्यांकन आहे, तोही जबरा रुट आहे)

@ हेम

क्यू नही क्यू नही

हिवाळ्यात ह्या जंगी ट्रेक चे (बऱ्याच वर्षांपासून रखडलेले) नियोजन झाले आहे… तारीख तपशीलवार ठरवूयात …

जबराट…. फोटोंच्या बरोबरीने वर्णन ही स्टाईल झकासच… आनंद पाळंदें काकांच्या डोंगरमैत्री / गिरीदुर्गांच्या पहा-यात मध्ये याच धाटणीचं लेखन असल्याने लेख अजूनच जवळचा वाटला !!!! सुमारगड इतकाही अवघड नाही याचाही उलगडा तुझ्या लेखाने केला. महीपतगडानंतरचे खास सह्याद्रीच्या खो-यातले फोटो बघताना इथेच पायाला भिंगरी लागल्यासारखं झालं होतं. टायटल मस्तच !!!

Pages