अनाकलनीय मराठी - १

Submitted by यःकश्चित on 8 July, 2013 - 03:27

अनाकलनीय मराठी - १
====================================================

मराठी !!

महाराष्ट्राच्या नसानसातून धैर्याने आणि शौर्याने उसळणाऱ्या रक्ताचे आमरण विशेषण म्हणजे मराठी.

"गोल" पृथ्वीच्या कुठल्याही "कोपऱ्यात" अभिमानाने सांगायची गोष्ट म्हणजे मराठी.

मराठी भाषा आहेच तशी. सर्वात समृद्ध, संपन्न भाषा. "अमृतातेही पैजा जिंके" असं म्हणतात ते काही उगाच नाही. आता या मराठीचा वापर करून काहीजण निवडणुकाही जिंकतात ही गोष्ट निराळी. सोडा, तो आपला विषय नाही. तसा मी लहानपणापासूनच राजकारणापासून चार हात दूर. मी बाल असताना म्हणे, मला नुसतं खुर्चीवर बसवलं तरी मी भोंगा सुरु करायचो. असो ! समृद्ध आणि सर्वगुणसंपन्न अश्या या मातृभाषेबद्दल प्रचंड आदर असला तरी माझ्या निरागस मनाला पडलेल्या काही बाळबोध प्रश्नांना अजुनी उत्तरे मिळाली नाहीयेत.

उदा. मतदान करण्याचा अधिकार अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर मिळतो, हे मला कळून चुकले.

आता या वाक्यातील " कळून चुकणे " हा वाक्प्रचार मला जरासा खटकतो. जर मला कळलंय तर मग मी चुकतो कसा ? आणि जर मी चुकलोय तर मग मला कळलंय असं कसं म्हणता येईल ? बाकी मतदान करताना लोक " कळून " सुद्धा पुन्हापुन्हा " चुकतात ", ही गोष्ट मला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दर पाच वर्षांनी कळत आलेली आहे.

मराठी वांड़मयात असे द्विशाब्दिक वाक्प्रचार बरेच आहेत. त्यातल्या दोन शब्दांना दोन वेगळे अर्थ असतात. पण त्यातला नेमका कुठल्या शब्दाचा अर्थ वाक्यात लावायचा हे न कळल्याने मी सहसा वाक्यात असे वाक्प्रचार वापरतच नाही. जसे की, अन्न टाकून देणे म्हणजे अन्न टाकायचे का द्यायचे ? किंवा अन्न खाऊन टाकणे म्हणजे अन्न खायचे की टाकायचे ? कमाल आहे !!

ह्या द्विशाब्दिक प्रमाणे एक शाब्दिक वाक्प्रचार देखील फार गंमतशीर आहेत. वर्तमानपत्रात बातमी असते , चोरट्याने रस्त्यावरील बाईचे मंगळसूत्र लांबविले.(!) किंवा असे म्हणतात की देवासमोर नारळ वाढविला(!). छे छे वाढविला काय ..लांबविला काय ! यात आपण न अडकलेलच बरं.

ह्या मराठीबद्दल आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे मराठीला शब्दांचा तुटवडा नाही. अगणित शब्दसंग्रह असलेल्या या मराठीत मराठी भाषिक रोज नवीन नवीन शब्दांची भर टाकत असतात. तसेच त्यांचा वापर दैनंदिन जीवनातही बऱ्याचदा करतात. हे मराठी भाषिक आपल्या पोराबाळाची नावे काय ठेवतील हे सांगता येत नाही. तसेही मराठी भाषिक नावे ठेवण्यात पटाईत आहेत म्हणा ! एखाद्या मराठी भाषिकाकडे नामकरण करताना त्यांच्यातला मराठी भाषिक जागा होतो आणि मग बहिणभावंडांची नावे ही यमकच असावी या अलिखित नियमाचे ते पालन करू लागतात. आता बहिणभावंडांची नावे यमक कशाला हवीत ? मग यातून गमती सुरु होतात.

आमच्या एका मित्राचच उदाहरण घ्या. त्यांना जुळ्या मुली झाल्या. जुळ्यावरून आठवलं, मराठी भाषिक बोलतानापण इतक्या गावंढळ चुका करतात. वरचेच वाक्य घ्या. ते म्हणतात की, आमच्या मित्राला दोन जुळ्या मुली झाल्या. बाबा रे , दोन झाल्या म्हणूनच जुळ्या म्हणतात ना ! तीन असत्या तर त्यांना तिळे झाले असे म्हणाले नसते का ? "गाईच गोमुत्र" हादेखील त्यातलाच प्रकार.

तर विषय असा होता की आमच्या मित्राला जुळ्या मुली झाल्या तर त्यांनी त्यांची नावे "पूर्वा" आणि "दुर्वा"(!) ठेवली. ( अश्याने भविष्यात मुलांना वनस्पती आणि माणूस यातला फरक समजायचा नाही. )

हे तर काहीच नाही. एका जोडप्याने कमालच केली. त्यांच्या चार वर्षाच्या "दर्पण"ला भाऊ झाला तर त्याच नाव त्या जोडप्यांनी "दर्पण"ला यमक म्हणून "तर्पण" असं ठेवलं. बहुधा त्यांना तर्पणचा अर्थ माहित नसावा. आता तिसरा मुलगा झाल्यावर त्याच नाव "तर्पण"ला यमक म्हणून "सरपण" नाही ठेवलं म्हणजे मिळवलं.

मराठी भाषेत म्हणींचाही काही ( कमी ( रेफरन्स : गाईच गोमुत्र ) ) तुटवडा नाही. पण ह्या म्हणी आणि त्यातील तर्कविसंगती मला बर्याचदा बुचकळ्यात पाडते.

" अति शहाणा त्याचा बैल रिकामा ".

यातील " अति शहाणा" आणि " बैल" यांचा काय संबंध आहे हे मला आजतागायत कळलेले नाही. अतिशहाणे लोक बैल पाळतात का ? का बैल पाळणारे लोक अतिशहाणे असतात ? मुळातच अतिशहाणे लोक बैल पाळण्यापेक्षा अति नफा मिळवून देणारा व्यवसाय करतील ना ! किंबहुना माझ्यामते बैलच अति शहाणा असल्याने तो या अतिशहाण्यांकडे न जाता एखाद्या सुस्वरूप व सुलक्षणी गाईला घेऊन तिच्याच बापानी हुंड्यात दिलेल्या एखाद्या हिरव्यागार कुरणात संसार थाटेल.

काही म्हणी मात्र मला अमराठी प्रांतातून आल्यासारख्या वाटतात. " अंगापेक्षा बोंगा मोठा " ही म्हण दक्षिणात्य "कथकली" या नृत्यप्रकारातल्या पोशाखावरून आली असावी. "नाकापेक्षा मोती जड" हा साक्षात्कार आफ्रिका/इजिप्त किंवा कुठल्यातरी आदिवाश्यांना नाकपुड्यांच्या मधल्या जागी मोठ्या मोठ्याची नथ घालताना झाला असावा.

असो ! तूर्तास येथे मी लेखणीला स्वल्पविराम देतो. पुन्हा भेटूया मराठीतल्या नवीन गमती घेऊन.

रामराम मित्रांनो...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसर्‍यांच्या मराठीला हसणारे बघितले की आजकाल कीव येते.>>>>>>+१
आपण बोलतोय तेच बरोबर आणि दुसरा चुकीचा हाच सुर दिसतो. साडी नेसली- घातली, जेवण केलं- बनवलं इइ.
अरे तुमच्यात साडी नेसत असतीलच पण तिच्या कितीतरी आधीच्या पिढ्यात साडी घालतच असतील, जेवण बनवतच असतील. केवळ तुम्ही म्हणताय म्हणुन ते चुकीचं का??

भाषा फक्त संवादासाठी आहे. आणि मराठी तर प्रत्येक मैलावर-कोसावर बदलते. त्यामुळे मी जी मराठी बोलतेय तीच शुद्ध असा कोणीही गैरसमज करुन घेउ नये.

"गोल" पृथ्वीच्या कुठल्याही "कोपऱ्यात" अभिमानाने सांगायची गोष्ट म्हणजे मराठी.>>>>>> हे उगीच वाटलं.
अंटार्टीका-अमेरीकेच्या कोपर्‍यात जाउन तुम्ही मराठीचा काय अभिमान सांगता/सांगाल- दाखवता/दाखवाल ते वाचायला आवडेल.

सस्मित :- जेवण /झालं-बनवलं वरुन आठवलं.

एक बाई संध्याकाळी अंगणात बसल्या होत्या. शेजारुन जाणारे गृहस्थ सहज म्हणाले,"काय झालं का जेवण" [जेवण=स्वयंपाक]
बाई :- नाही हो, आता साहेब येतील आणि मग करु...
तो गृहस्थ (मनात) :- म्हणजे बाई नवर्‍याला जेवण (स्वयंपाक) करायला लावते की काय. Happy

नेसणे हा शब्द मराठी साहित्यात गेल्या दोन-अडीजशे वर्षात जास्त दिसतो. त्या आधीही तो होताच पण त्या काळी 'लेणे' ह्या क्रियापदाचा वापर अधिक आढळतो. सध्या लेणे म्हणजे अलंकार, आभूषण. पण एके काळी लेणे म्हणजे वस्त्र-प्रावरणे नेसणे, पांघरणे इ. बाळलेणे म्हणजे बाळाचे केवळ दागिनेच नव्हेत तर कुंची, अंगडी-टोपडी इ.बाळवस्त्रेही. ल्याले, ल्याली, लेईन, लेवुनी अशी रूपे आपल्या परिचयाची आहेतच. 'जीर्ण शाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे' हे तर सर्वांनाच माहीत असेल.
तसेच दुसरे एक क्रियापद म्हणजे 'माळणे'. पूर्वी फुले,गजरे, हार हे 'माळीतच असत, 'घालीत' नसत. हे एकेकाळचे प्रमाणित भाषेतले शब्द आज ग्रामीण बोलीत, तेही कधीतरीच ऐकू येतात. चिरणे हा शब्दही फारसा दिसत नाही. त्याऐवजी कापणे हा शब्द वापरला जातो. 'तू टाक चिरुनी ही मान, नको अनमान' हे फक्त आता नाट्यगीतातच ऐकावयाचे. 'गमणे'चेही तेच.
माझे अवलोकन : आजच्या ग्रामीण (मराठी) बोली ह्या जुन्या प्रमाण मराठीतले kiत्येक शब्द अजूनही अंगाखांद्यावर मिरवीत आहेत. सध्याच्या 'शुद्ध' मराठीने मात्र ते केव्हाच अंगाबाहेर करून त्यांना अशुद्ध ठरवले आहे. या मुद्द्यापुरत्या ग्रामीण बोली ह्या जुन्या मराठीस अधिक जवळच्या आहेत.
तृतीया विभक्तीचा 'ने' हा एकवचनी प्रत्यय असाच दुर्मीळ झाला आहे. त्याजागी 'नी' हा अनेकवचनी प्रत्यय दिमाखात वावरतो आहे .त्याचवेळी 'एं' 'ईं' हे तृतीयेचे प्रत्यय काही बोलींमधून टिकून आहेत, प्रमाण मराठीतून मात्र हद्दपार आहेत. अशी अनेक उदाहरणे देता येतील.. पुसणे, दावणे.ठाकणे,फेडणे इ.
तात्पर्य, दर वीस-पंचवीस वर्षांनी भाषा बदलते. शुद्धाशुद्ध हे स्थलकालसापेक्ष असते. तेव्हा त्याचा फार बाऊ करू नये. करतीये, आलीये ही रूपे मलाही आवडत नाहीत, पण पुष्कळ बायकामुली वापरतात. ठीकच्चै,(ठीकच आहे). फारसे बिघडत नाहीए....

अनेक वर्षांपूर्वी पासून मराठी भाषेत उर्दू, फारशी किंवा जी काय भाषा मुसलमान बोलत, त्यातले शब्द मराठीत आले. कित्येक मराठी शब्दांचे मूळ हे परकीय भाषांतून आलेले आहे. ते आपण मान्य केले आहे. टेबल, पेन या अस्सल इंग्रजी शब्दांबद्दलहि कुणाचा आक्षेप नाही.

मग आता मिसणे, धन्स, रच्याकने इ. शब्द मराठीत आले तर मला असे वाटते की काही हरकत नसावी. शेवटी लोकांना जे आवडतील ते शब्द टिकून रहातील, बाकीचे आपोआप गळून पडतील. तशीच भाषा बदलते. शब्दांचे अर्थहि कालांतराने बदलतात. इंग्रजीचे उदाहरण म्हणजे गे हा शब्द.

व्याकरणाचे हि तसेच. हळू हळू नवीन व्याकरण मान्य होईल.
याबद्दल एक आठवणः १९५५ ते १९६० च्या दरम्यान एकदा केंव्हातरी श्री. सणस हे पुणे महपालिकेचे मेयर झाले. ते स्वतःला सनस म्हणवून घेत, नि लोकांनी त्यांना तसेच म्हणावे असे त्यांना वाटे. त्यांच्या मते बहुजन बोलतील ती भाषा तर कनिक, लोनि, पानी हे शब्द ग्राह्य व योग्य मानले पाहिजेत कारण महाराष्ट्रात बहुजन समाज तसेच बोलतो!

तर सांगायचे कारण, वस्तुस्थिती सध्या कुणाला मान्य नसली, विचित्र वाटत असली तरी ती बदलणे हे आपल्या हातात नाही. तेंव्हा तक्रार करून काय फायदा? तर तक्रार नसावी, पण गंमत म्हणून लिहीण्यास हरकत नसावी. म्हणजे वादविवाद होऊ नयेत.

किंवा आमचे बरोबर, तुमचे चूक म्हणण्यात अर्थ नाही.

भाषा, व्याकरण म्हणजे प्रेम नव्हे, जे तुमचे नि आमचे अगदी सेम असते! ( Happy )

नताशा, तुमच्या पोस्ट ला अनुमोदन.

मूळ शब्द म्हणून पार बाबा आदम च्या काळापर्यंत मागे जायची गरज नसते. तत्कालीन लोकमान्य भाषा हे प्रमाण मानलं तरी चालतं.

झक्की, अर्धवट माहिती सांगून थांबलेला दिसताय आपण! ट्रकमधून गावगुंड आणून शनिवार, नारायण, सदाशिव जाळू पाहणार्‍यांचा डाव उधळून टाकण्यासाठी स गो बर्वेंनी अकस्मात मिल्ट्री बोलावली होती गांधीहत्येच्यावेळी! अन्यथा लोनि, पानि आ'नि' कनिक या शब्दांचे भ्रष्ट रूप लोणी, पाणी आ'णि' कणीक ठरले असते, नाही का?

मुळात एक 'मराठी' म्हणून, मराठी या नावाची, एक मराठी भाषा आहे, जी पाठ्यपुस्तकात आहे. (किंवा असावी अशी इच्छा, वगैरे)!

तेव्हा दर काही कोसांवर भाषा बदलते आणि आम्ही जे म्हणू ते आमच्यापुरते 'ओक्केच' म्हणणार्‍यांसाठी माझे आवडते मतः

'तेच ओक्के असे सांगावे का लागते का तुम्हाला? असे का वाटते की काहीतरी 'इतरच' ओक्के मानले जात आहे? याचाच अर्थ निर्मीतीच्यावेळी त्या भाषेचे एक स्वरूप होते (जे कदाचित गढूळ झालेही असेल, तरीही कोणत्यातरी स्केलनुसार आजही ते शिकवण्यास योग्य समजले जाते)! पाठ्यपुस्तकात आनि पानि का नसते म्हणे?

झक्की, उत्तर द्या! Happy

हो ..मला समजल ! पण वेळ निघून गे ली होती
जेन्हां मला समजले ! आणि! मी ते सुधारण्याचा प्रयत्न केला ! तेव्हां माझी कॉमेंट सिलेक्ट झाली होती !

तृतीया विभक्तीचा 'ने' हा एकवचनी प्रत्यय असाच दुर्मीळ झाला आहे. त्याजागी 'नी' हा अनेकवचनी प्रत्यय दिमाखात वावरतो आहे

हाही प्रत्यय योग्यच आहे. तो अनेकवचनी नाही.

अनेकवचनी वापरताना प्रत्येक वेळी आधीचे अक्षर आकारान्त(बर्‍याच वेळा) होउन त्यावर अनुस्वार येतो.

तो- त्याने, त्यानं, त्यानी
ते- त्यांनी

आपल्या इतर पोस्टशी आणि नताषा व झक्कींशी (तृतियेचे अनेकवचन- इथे अर्थात आदरार्थी बहुवचन) सहमत. फक्त प्रमाण भाषेचे बंधन कधी, कुठे व कुठल्या साहित्य आणि वाङमयात काटेकोरपणे पाळले जावे याचे काही संकेत आहेत, नियम आहेत आणि ते तर्कसंगत आहेत. एरवी बोली भाषेत अथवा त्या त्या साहित्यकृतीची गरज म्हणुन किंवा इथे लिहिताना आपापल्या सवयीप्रमाणे लिहिण्यास हरकत असण्याचे कारण नाही. त्यात कुठलाही कमीपणा नाही किंवा कुणाला शुद्धतेच्या जवळ असण्याची शेखी मिरवण्याचीही गरज नाही. कुठलीही भाषा प्रवाही आणि समावेषक सहिष्णू असेल तरच टिकते, टिकेल. पण तरीही बोली भाषेचा अभिमान बाळगतांना तसेच तीच्यातील अंगभूत लय आणि लहजाचा आनंद घेतांनाच प्रमाण भाषेचे ज्ञान परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असणेही वाईट नाही. नव्हे, तसे ते प्रत्येकाने असावे असे आग्रहाने म्हणावेसे वाटते.

'नी' हा तृतीया विभक्तीचा प्रत्यय एकवचनी आहे हे खरेच ठाऊक नव्हते. आम्ही शाळेत पाठ केल्याप्रमाने "नें,एं,शीं" हे एकवचनी तर "नीं, ईं, हीं, शीं" हे अनेक वचनी प्रत्यय होते.(आता अनुस्वार उडाले आहेत.) उदा. नोकराने काम केले, नोकरांनी काम केले. माझा हेतू एकवचनामध्ये 'ने' ऐवजी 'नी' वापरला जातो हे दर्शवण्याचा होता. उदा. तिने सांगितले--तिनी सांगितले. आईने खाऊ दिला---आईनी खाऊ दिला इ.इ. पण 'नी' प्रत्यय एकवचनी म्हणता तर अलीकडे तो तसा झाला असेलही बापडा.

पाठ्यपुस्तकात आनि पानि का नसते म्हणे?

कारण फक्त प्रमाण भाषेचे बंधन कधी, कुठे व कुठल्या साहित्य आणि वाङमयात काटेकोरपणे पाळले जावे याचे काही संकेत आहेत, नियम आहेत आणि ते तर्कसंगत आहेत. अश्या मताच्या लोकांचे बहुमत झाले म्हणून तसे झाले नाही, असा माझा अंदाज आहे.

आता तुम्ही मान्यवर साहित्यिक, कदाचित् तुमच्या सारखे लोक ठरवतील बरोबर मराठी कोणते नि कोणते नाही. नि लोक त्याकडे नेहेमीसारखेच दुर्लक्ष करून धन्स, मिसले सारखे नवीन शब्द प्रचलित करतीलच. हळू हळू लिखाणातहि येतील. वास्तविकता दर्शवण्यासाठी बोली भाषेचा वापर साहित्यातहि होतो.
टेबल,पेन, किंवा कानडी, फारशी इ. शब्दांपासून तयार झालेले शब्द, मराठीत मान्य आहेतच.

ट्रकमधून गावगुंड आणून शनिवार, नारायण, सदाशिव जाळू पाहणार्‍यांचा डाव उधळून टाकण्यासाठी स गो बर्वेंनी अकस्मात मिल्ट्री बोलावली होती गांधीहत्येच्यावेळी!
ते १९४८ साल. त्याचा भाषा बदलण्याशी काही संबंध नव्हता.
शिवाय श्री. सनस यांचा मुद्दा बहुजन समाज कोणती भाषा बोलतो एव्हढाच होता. त्यांनी फक्त मुद्दा मांडला याचा अर्थ सर्वांनी तो लगेच मान्य केला पाहिजे, किंवा मला मान्य होता असे नव्हे. उद्या मी म्हंटले पूर्वी युरोपातले लोक समजत की पृथ्वी सपाट होती, तर त्याचा अर्थ असा नव्हे की मी पण ते मान्य करतो.

झक्की
भाषा, व्याकरण म्हणजे प्रेम नव्हे, जे तुमचे नि आमचे अगदी सेम असते! ( स्मित )<<<<<<

काहीच्या काही बोलताय तुम्ही
आता तुम्ही जरा अगदीच विनोदी होताय ...... हसण्यावारी नेताय .... तसे करू नका झक्की !!!!
____________________________________________________________________
प्रमाण भाषा हा प्रकार देशाला कशी एक कॉमन भाषा असावी लागते तसा आपल्या प्रांतात एक कॉमन भाषा असावी या करिता महत्त्वाचा आहे पण इतर बोली भाषांना अशुद्ध / तृटीपूर्ण म्हणणे चुकीचे आहे त्यांच्याबद्दल आकस बाळगणे बरोबर नाही
वेगवेगळ्य मराठीच्या मुलखातून बोलली जाणारी पारंपारिक भाषा व आज जागोजागी बदलत चाललेली त्यांची रूपे हे मुद्दे वेगवेगळे आहेत खरेतर या दोनही बाबींचा गांभीर्याने अभ्यास व्हायला हवा जे लोक इथे चर्चेस उस्तुक आहेत त्यांनी इतर शब्दांची टर उडवणे हसणे असे प्रकार करू नयेत आपण जेव्हा बाहेर राज्यात मराठी बोलत असू व तिथले लोक आपले बोलणे ऐकून हसले खिल्ली उडवू लागले तर कसे वाटेल?? तद्वतच आहे हे !!!

मराठी ही मुळातच प्राकृत भाषा !!!!! संस्कृत ही भाषा (एकेकाळी व अजूनही अनेक भारतीय भाषाना जी अनुजा मानली जाते ती )अश्या बोलीभाषाना एक संस्कारित रूप हवे अश्या उद्देशाने घडवली गेली अहे तिचे व्याकरण पाणिनीने खासकरून तयार केले त्यानंतर तिचा खरा विकास झाला प्रसार झाला प्रचार झाला त्या अधी ती मोजक्या लोकांची भाषा होती अधिकतम (शब्दशः "बहु"जन ! जातीचा वगैरे उल्लेख नाही करतय मी )लोक जी भाषा वापरत त्यात अनेक वेगवेगळया भाषा असत

आज आपण जी मराठी बोलतो ती मुळातच कैक देशी परदेशी भाषांमधील शब्दांचा समुच्चय आहे माझ्या मते इतक्या भाषांना सामावून घेणारी अशी प्राकृत भाषा भारतात दुसरी नाही

आपण लोकानीही ही बाब ध्यानात घेवून प्रमाण भाषा हीच खरी असा हट्ट न धरता ह्या प्रमाण भाषेत अधिकाधिक बोली शब्द समाविष्ट करून ते सार्वत्रिक कसे करता येतील हा विचार करायला हवा

जसे इंग्रजी भाषा आजही अनेक प्रांतातील शब्द सामावून घेते परवाचेच उदाहरण "अवतार" हा शब्द आता अधिकृत रित्या प्रमाण शब्द बनला आहे असे ऐकले ... अशी भाषेच्या प्रसरणाची गोष्ट आपण गांभीर्याने न घेता उगाच ह्यावर हसा त्यावर हसा असे योग्य नाही

भाषा टिकवणे वाढवणे रुजवणे हे अतीशय सजगपणे केले पाहिजे

मुळात मराठी भाषा अनेक भाषाना शब्दाना सहज सामावून घेईल अश्या स्ट्रक्चर्ची आहे आपण आपली मनेही तशी सर्व समावेषक बनवायला हवीत म्हणजे दिसला शब्द की घुसडा असे नाही तर जे जे शब्द आज भाषेत प्रमाण व बोली मध्ये आहेत त्यांचा आदर करायला हवा ..वापर ज्याना करायचा आहे त्याना प्रोस्ताहन दिले पाहिजे खिजवले नाही पाहिजे

प्रमाण विरुद्ध बोली असे वर्गीकरण तर अगदीच चुकीचे व आपापल्या मुद्द्याना घेवून वाद घालणे मूर्खपणाचे
मुळात मराठी हीच प्राकृत भाषा आहे हे विसरू नये त्यात पुन्हा प्रमाण भाषा श्रेष्ठ बाकीचे लोक बोलतात ते कमी प्र तीचे असे म्हणणे तद्वतच जे लोक आपापल्या बभागातील बोली भाषाच बोलतात त्यांनी प्रमाण भाषेला वर्चस्वाची भाषा म्हणणे व तिला नेहमी विरोधकाच्या भूमेकेतून पाहणे हेही तितकेच चुकीचे

मी बोलतो वापरतो तीच खरी भाशा असे भाषेबाबत कटटर वगैरे असणे केवळ भाषांध असणे आहे

५६ भाषांचा केलासे गौरव असे नामदेवाने ज्ञानदेवाच्या ज्ञानेश्वरी बद्दल म्हटले आहे म्हणजे ५६ भाषांचे शब्द ज्ञानेश्वरीत ज्ञानदेवाने स्वीकारले ... अमृतातेही पैजा जिंकायचे होते न् त्याला ...ज्ञानदेवाने मराठी भाषा ह्या साठी जे केलय त्याचा आदर्श आपण ठेवायला हवा

वैभव व. कु.
अत्यंत योग्य प्रतिसाद.
आपण लोकानीही ही बाब ध्यानात घेवून प्रमाण भाषा हीच खरी असा हट्ट न धरता ह्या प्रमाण भाषेत अधिकाधिक बोली शब्द समाविष्ट करून ते सार्वत्रिक कसे करता येतील हा विचार करायला हवा
+ १०००.
गुजरातीत कसब आणि हुनर कामातले अनेक शब्द सार्वत्रिक आहेत. म्हणजे सुतारकाम,फर्निशिंग्,गवंडीकाम, भरतकाम, विणकाम,हिरेपॉलिशिंग-कटिंग्,शेअर-बाजार आणि गुंतवणूकसंबंधी अनेक व्यवसाय ,मंदिरस्थापत्य वगैरे. आपल्या मराठीत अशा शब्दांची वानवा आहे. कदाचित त्या समाजात श्रमप्रतिष्ठा आहे आणि आपल्याकडे नाही हे कारण यामागे असावे का? व्यावसायिकांना प्रतिष्ठा लाभली तर कदाचित त्यांची भाषाही प्रतिष्ठित बनू शकेल असा एक दृष्टिकोन.

@हीरा, तसेच असेल असा अट्टाहास नाही. माझी माहीती चुकीचीही असु शकेल. शोधले पाहिजे.
पण 'नी' हा प्रत्यय पण वादग्रस्त होतोय ही गम्मतच आहे. Proud

नतद्रष्ट, 'नी' वादग्रस्त मुळीच नाही. या धाग्यात चुकीचे मराठी लिहिले/बोलले जाण्याविषयी चर्चा आणि उदाहरणे दिली जात होती त्यात मीही एक उदाहरणाची भर घातली इतकेच. ही चूक आता सर्वमान्य झालीच आहे(कारण ती चूक आहे हेच लक्षात येईनसे झाले आहे) तर होऊ दे की. तसेही आजकाल शब्दांच्या रूपापेक्षा आशयाला अधिक महत्त्व येऊ लागले आहे. बातमीदारांनी घाईघाईत कसातरी टंकून पाठवलेला मजकूर सुधारून घेण्यासाठी मोठ्या वर्तमानपत्रात वेगळी माणसे असतात, तसेच मुद्रितशोधक, संकलक,असे व्यावसायिक प्रकाशनक्षेत्रातही असतात. ते शुद्धलेखनाच्या, शब्दमांडणीच्या सर्व चुका सुधारून घेतात. दिवाळीअंकासाठी आलेल्या साहित्याची भाषिक अवस्था काय असते ते जवळून पाहिले आहे. तो जवळपास कच्चा खर्डाच असतो. कार्यकारी संपादकाला ते सर्व सोपस्कारित (रीफाइन्ड) करून घ्यावे लागते. या व्यावसायिकांना मात्र सर्व नियम, व्याकरण माहीत असणे गरजेचे असते. त्यांना मदतीसाठी पुस्तके, नियमावल्या वगैरे असतात. अलीकडे जालावर आणि इतरत्रही शुद्धिचिकित्सक असतो. त्यामुळे मूळ अशुद्ध साहित्य शुद्ध स्वरूपात सादर करणे फारसे कठिण राहिलेले नाही.

...... हसण्यावारी नेताय .... तसे करू नका झक्की !!!!

क्षमस्व.
अहो सुंभ जळला तरी पीळ जळत नाही. नि माझा सुंभ तर अजून थंडच आहे!

आता तुम्ही जे काही म्हणता ते मला मान्य आहे, पण आम्ही सर्वसामान्य लोक आम्हाला जे वाटते ते लिहीतो. त्यातले चूक काय, बरोबर काय हे तुमच्या सारख्या मराठी भाषेचा नि कदाचित् भाषाशास्त्राचा अभ्यास केलेल्या दिग्गजांनी (सरकारी अनुदान घेऊन) ठरवायचे.
(सरकारी पाठिंबा असेल तर काय वाट्टेल ते नियम चालतात - उदा. अर्थाचा कितीहि घोटाळा होत असला तरी अनुच्चारित अनुस्वार वापरायचे नाहीत हा नियम. नाहीतर कोण माणतो ते नियम?)

नि त्याकडे दुर्लक्ष करून लोक शेवटी वाट्टेल तसे बोलतच रहातील नि शेवटी अनेक लोक जे बोलतील ते मान्य समजले जाईल.

पाठ्यपुस्तकात आनि पानि का नसते म्हणे?
<<
कारण "बालभारती" पुण्यात आहे म्हणे?
अन बालभारतीवाले देखिल Wink

वैवकु,
उत्तम प्रतिसाद. छान लिहिले आहे.

समावेषक ऐवजी समावेशक हवे का? समान वेष असलेले समावेषक असे काहीसे वाटते आहे.

पुलंचा विनोद आठवला
"मुंबईबाहेरच्या लोकांनी मुंबईची मराठी बिघडवली.. चाय पिली च्या ऐवजी चहा घेतला म्हणायला लागले.. काय हे?"
Happy

असो..

वैभव,
चांगले लिहिले आहे.

प्रमाण मराठी नक्की कुठे बोलतात......... ज्येष्ठ समीक्षक गं .त्र्यं. एदलाबादकर वगैर लांबलचक नाव असलेल्या समिक्षकाच्या घरात. Proud

प्रमाण मराठी नक्की कुठे बोलतात......... ज्येष्ठ समीक्षक गं .त्र्यं. एदलाबादकर वगैर लांबलचक नाव असलेल्या समिक्षकाच्या घरात.>>

ह्या प्रश्नाचं नक्की उत्तर माहित नाही, पण अशी प्रमाण मराठी कुठे लिहितात त्याचं उत्तर मात्र मिळालय....... 'अँटीमॅटर' अशा आटोपशीर आयडी च्या प्रतिक्रियेत. :):)

एकाच वेळी वेगवेगळ्या प्रतलांवरचे विषय चालले आहेत की काय, असं वाटत असतानाच "व्यावसायिकांना प्रतिष्ठा लाभली तर कदाचित त्यांची भाषाही प्रतिष्ठित बनू शकेल असा एक दृष्टिकोन" - इथं थबकायला झालं. पुन्हा पुन्हा वाचलं. तो विचार मग व्यावसायिकांचं व्यावसायिक, वैचारिक आणि सामाजिक पुढारपण पासून ते थेट १२ बलुतेदारांपर्यंत गेला. यावर नीट, नव्याने विचार करायला हवा. (हा मुद्दा एखादेवेळेस या बाफाच्या विषयाशी संबंधित नसेलही).

बरेच शब्द हिंदी मधून जसेच्या तसे भाषांतर केल्यामुळे पण झाले असतील जसे कि - समझ चुका - कळून चुकले. ले डाल - घेऊन टाक. बडोद्याचे मराठी लोक सुद्धा 'देऊन दे ना' असं म्हणतात (हिंदी- दे दो ).
नागपुरच्या लोकांचे मराठी ऐकले तर याचा जास्त अनुभव येतो. तिथे हिंदीचा खूपच प्रभाव आहे मराठीवर. नागपूरची एक मुलगी पहिल्यांदा जेवायला गेलो तेव्हा म्हणाली होती की भूक लागली असेल तर जेवण मांडते ! काय भयंकर हसलो होतो. आता स्वत:ला हसतो. भाषा व्यक्त करण्यासाठी आहे आणि प्रदेशानुसार बदलत जाते. कोणतीही एक बोली (उदा. पुण्याची) प्रमाण नसते. ब्रिटीश इंग्रजी आणि अमेरिकन इंग्रजी जशी वेगळी तशीच मराठी पण ठिकठिकाणी वेगळी असणारच - आणि असावी पण. मजा येते दुसऱ्या लोकांचा शब्दांचा आणि भाषेचा वापर पाहून

Pages