अनाकलनीय मराठी - १

Submitted by यःकश्चित on 8 July, 2013 - 03:27

अनाकलनीय मराठी - १
====================================================

मराठी !!

महाराष्ट्राच्या नसानसातून धैर्याने आणि शौर्याने उसळणाऱ्या रक्ताचे आमरण विशेषण म्हणजे मराठी.

"गोल" पृथ्वीच्या कुठल्याही "कोपऱ्यात" अभिमानाने सांगायची गोष्ट म्हणजे मराठी.

मराठी भाषा आहेच तशी. सर्वात समृद्ध, संपन्न भाषा. "अमृतातेही पैजा जिंके" असं म्हणतात ते काही उगाच नाही. आता या मराठीचा वापर करून काहीजण निवडणुकाही जिंकतात ही गोष्ट निराळी. सोडा, तो आपला विषय नाही. तसा मी लहानपणापासूनच राजकारणापासून चार हात दूर. मी बाल असताना म्हणे, मला नुसतं खुर्चीवर बसवलं तरी मी भोंगा सुरु करायचो. असो ! समृद्ध आणि सर्वगुणसंपन्न अश्या या मातृभाषेबद्दल प्रचंड आदर असला तरी माझ्या निरागस मनाला पडलेल्या काही बाळबोध प्रश्नांना अजुनी उत्तरे मिळाली नाहीयेत.

उदा. मतदान करण्याचा अधिकार अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर मिळतो, हे मला कळून चुकले.

आता या वाक्यातील " कळून चुकणे " हा वाक्प्रचार मला जरासा खटकतो. जर मला कळलंय तर मग मी चुकतो कसा ? आणि जर मी चुकलोय तर मग मला कळलंय असं कसं म्हणता येईल ? बाकी मतदान करताना लोक " कळून " सुद्धा पुन्हापुन्हा " चुकतात ", ही गोष्ट मला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दर पाच वर्षांनी कळत आलेली आहे.

मराठी वांड़मयात असे द्विशाब्दिक वाक्प्रचार बरेच आहेत. त्यातल्या दोन शब्दांना दोन वेगळे अर्थ असतात. पण त्यातला नेमका कुठल्या शब्दाचा अर्थ वाक्यात लावायचा हे न कळल्याने मी सहसा वाक्यात असे वाक्प्रचार वापरतच नाही. जसे की, अन्न टाकून देणे म्हणजे अन्न टाकायचे का द्यायचे ? किंवा अन्न खाऊन टाकणे म्हणजे अन्न खायचे की टाकायचे ? कमाल आहे !!

ह्या द्विशाब्दिक प्रमाणे एक शाब्दिक वाक्प्रचार देखील फार गंमतशीर आहेत. वर्तमानपत्रात बातमी असते , चोरट्याने रस्त्यावरील बाईचे मंगळसूत्र लांबविले.(!) किंवा असे म्हणतात की देवासमोर नारळ वाढविला(!). छे छे वाढविला काय ..लांबविला काय ! यात आपण न अडकलेलच बरं.

ह्या मराठीबद्दल आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे मराठीला शब्दांचा तुटवडा नाही. अगणित शब्दसंग्रह असलेल्या या मराठीत मराठी भाषिक रोज नवीन नवीन शब्दांची भर टाकत असतात. तसेच त्यांचा वापर दैनंदिन जीवनातही बऱ्याचदा करतात. हे मराठी भाषिक आपल्या पोराबाळाची नावे काय ठेवतील हे सांगता येत नाही. तसेही मराठी भाषिक नावे ठेवण्यात पटाईत आहेत म्हणा ! एखाद्या मराठी भाषिकाकडे नामकरण करताना त्यांच्यातला मराठी भाषिक जागा होतो आणि मग बहिणभावंडांची नावे ही यमकच असावी या अलिखित नियमाचे ते पालन करू लागतात. आता बहिणभावंडांची नावे यमक कशाला हवीत ? मग यातून गमती सुरु होतात.

आमच्या एका मित्राचच उदाहरण घ्या. त्यांना जुळ्या मुली झाल्या. जुळ्यावरून आठवलं, मराठी भाषिक बोलतानापण इतक्या गावंढळ चुका करतात. वरचेच वाक्य घ्या. ते म्हणतात की, आमच्या मित्राला दोन जुळ्या मुली झाल्या. बाबा रे , दोन झाल्या म्हणूनच जुळ्या म्हणतात ना ! तीन असत्या तर त्यांना तिळे झाले असे म्हणाले नसते का ? "गाईच गोमुत्र" हादेखील त्यातलाच प्रकार.

तर विषय असा होता की आमच्या मित्राला जुळ्या मुली झाल्या तर त्यांनी त्यांची नावे "पूर्वा" आणि "दुर्वा"(!) ठेवली. ( अश्याने भविष्यात मुलांना वनस्पती आणि माणूस यातला फरक समजायचा नाही. )

हे तर काहीच नाही. एका जोडप्याने कमालच केली. त्यांच्या चार वर्षाच्या "दर्पण"ला भाऊ झाला तर त्याच नाव त्या जोडप्यांनी "दर्पण"ला यमक म्हणून "तर्पण" असं ठेवलं. बहुधा त्यांना तर्पणचा अर्थ माहित नसावा. आता तिसरा मुलगा झाल्यावर त्याच नाव "तर्पण"ला यमक म्हणून "सरपण" नाही ठेवलं म्हणजे मिळवलं.

मराठी भाषेत म्हणींचाही काही ( कमी ( रेफरन्स : गाईच गोमुत्र ) ) तुटवडा नाही. पण ह्या म्हणी आणि त्यातील तर्कविसंगती मला बर्याचदा बुचकळ्यात पाडते.

" अति शहाणा त्याचा बैल रिकामा ".

यातील " अति शहाणा" आणि " बैल" यांचा काय संबंध आहे हे मला आजतागायत कळलेले नाही. अतिशहाणे लोक बैल पाळतात का ? का बैल पाळणारे लोक अतिशहाणे असतात ? मुळातच अतिशहाणे लोक बैल पाळण्यापेक्षा अति नफा मिळवून देणारा व्यवसाय करतील ना ! किंबहुना माझ्यामते बैलच अति शहाणा असल्याने तो या अतिशहाण्यांकडे न जाता एखाद्या सुस्वरूप व सुलक्षणी गाईला घेऊन तिच्याच बापानी हुंड्यात दिलेल्या एखाद्या हिरव्यागार कुरणात संसार थाटेल.

काही म्हणी मात्र मला अमराठी प्रांतातून आल्यासारख्या वाटतात. " अंगापेक्षा बोंगा मोठा " ही म्हण दक्षिणात्य "कथकली" या नृत्यप्रकारातल्या पोशाखावरून आली असावी. "नाकापेक्षा मोती जड" हा साक्षात्कार आफ्रिका/इजिप्त किंवा कुठल्यातरी आदिवाश्यांना नाकपुड्यांच्या मधल्या जागी मोठ्या मोठ्याची नथ घालताना झाला असावा.

असो ! तूर्तास येथे मी लेखणीला स्वल्पविराम देतो. पुन्हा भेटूया मराठीतल्या नवीन गमती घेऊन.

रामराम मित्रांनो...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरपण अर्पण घरपण>>> तुमच्यासाठी कायपण/// Biggrin

थवा = तवा
ढग = डग

हे प्रा दिपक देशपांडे यानी फेमस केलेले

>>वैवकु मला ही काही गोष्टी खटकतात
उदा. मी करिन च्या ऐवजी मी करेल, खाईल, जाईल.>>

हल्ली 'सकाळ' च्या बातम्यांमधे पण हेच वाचायला मिळते.

आणि एखादी गोष्ट मिळाली असं आपण म्हणतो त्याऐवजी काही लोक भेटली म्हणत>>
अनुमोदन.

अहो लोकांना हल्ली नोकरी पण "भेटते"!!

हल्ली 'सकाळ' च्या बातम्यांमधे पण हेच वाचायला मिळते.<<<

अजुनतरी सकाळमध्ये असे वाचलेले नाही. असे होत असल्यास कमाल म्हणायची.

रिया <<< Proud अगदी अगदी

साडी घातली म्हंटले की 'हवेतच साडीच्या निर्‍या वगैरे घालून' वरून साडी घातल्या'गत' वाटते. Proud

साडी घालणे बद्दल... खरेच गमतीशीर आहे ते
शिवाय चप्पल पायात घालणे शर्ट अंगात घालणे हेही मजेशीर आहे

हल्ली 'सकाळ' च्या बातम्यांमधे पण हेच वाचायला मिळते.<<<काय सांगता !!! मग पुढारी बिढारी तर वाचायलाच नको मग ....तसेही मी हल्ली म.टा. वाचतो लोकसत्ता व सकाळ फक्त रविवारीच तेही पुरवण्यांसाठी .....
"रद्दी"साठी 'टाईम्स' सुरू करावा म्हणतोय Wink

ती ई मेल का तो <<<< तो ....तो ईमेल !!! आमच्याकडे तर बुवा असेच म्हणतात

सरपण अर्पण घरपण>>> तुमच्यासाठी कायपण>>>> एकदम रिक्श्याच्या मागे लिहिल्यासारखं

केसाचं अनेकवचन केसं आणि बटाट्याच बटाटी Angry

मला पण ही सवय आहे...ऑफीसमध्ये एक काकू होत्या...त्यांचे मोबाईल कुठला घ्यावा यावरून बराच काळ दळण चालले होते..शेवटी मी म्हणालो की जास्त विचार करू नका घेऊन टाका कुठला पण...
त्यावर त्या म्हणे....अय्या घ्यायचा आणि टाकायचा पण..मग घ्यायचाच कशाला...

आता बोला...:(

बोट आणि बोटं --> केस आणि केसं....

इथे केस हा अकारांत पुल्लिंगी शब्द अकारांत नपुसकलिंगी बोट प्रमाणे चालवला जातो म्हणून असं होतं Happy

बटाटीची मात्र काही कल्पना नाही ...

काही घरात पानात पदार्थ 'वाढ' म्हणण्याऐवजी 'घाल' म्हणतात.

एका मित्राच्या बायकोच्या माहेरी "घाल" म्हणायची पद्धत होती. त्यावर हा तिला सारखा म्हणायचा "कुत्र्याला खायला घालतात आणि माणसाला जेवायला वाढतात!"

यःकश्चित, लेख आवडला.?

पण तुम्ही मायबोलीवरील इतर ठिकाणचे मराठी वाचत नाही का?

मराठी आता इतकी समृद्ध, संपन्न भाषा झाली आहे की त्यात इंग्रजी, हिंदी असे सगळे शब्द, वाक्प्रयोग येत असतात. उदा. कोपर्‍यात ऐवजी कॉर्नरमधे, जुळ्या मुली ऐवजी ट्विन गर्ल्स, भाषा ऐवजी लॅन्ग्वेज वगैरे.

असो.

येशिल करशिल ही मलातरी धमकी वाटते ....निदान ताकीद वगैरे

नागपूरला हे शब्द प्रयोग नेहेमीच ऐकले. ही धमकी नव्हे, किंवा येशील का असे विचारणेहि नव्हे. पुण्यात आम्ही ये, कर म्हणत असू. नागपुरला येशील, करशील असे म्हणण्याची पद्धत होती.

नागपूरला हे शब्द प्रयोग नेहेमीच ऐकले. ही धमकी नव्हे, किंवा येशील का असे विचारणेहि नव्हे. पुण्यात आम्ही ये, कर म्हणत असू. नागपुरला येशील, करशील असे म्हणण्याची पद्धत होती.>>>

अरूण दातेंच गाणं आठवलं, "येशील येशील येशील राणी, पहाटे पहाटे....":-)

महाराष्ट्रात बरेच ठीकाणी (गाव आणि शहरे दोन्ही) फिरलो, भटकलो.... तेव्हापासुन फारसे शब्द खटकत नाही. प्रत्येक बोलीभाषेची ती नजाकत आहे. तिथल्या मराठी भाषेचं व्याकरण त्या प्रांताच्या शेजारी असलेल्या दुसर्‍या भाषेनुसार चालत असावं. उदा. विदर्भात हिंदी, चंद्रपुर/ गडचिरोली - तेलुगु तर कोल्हापुर - कन्नड, इ. चुभुदेघे.

अर्थात या सगळ्या भाषा कर्ता कर्म क्रियापद अश्याच वापरल्या जातात, त्यामुळे क्रियापदं बदलतात इतकच. पण त्याच धर्तीवर इंग्रजी वापरणे थोडसं विचित्र वाटते, पण होइल सवय हळूहळू....

जरा जास्तच गंभीर झालं की काय ?

मस्त लेख.... पोटापाण्याच्या सोयीसाठी शुभेच्छा... कोरियात येणे (पुढच्या शिक्षणासाठी) असल्यास कळवावे.

अधिक - एक नवराबायको होते (!)

दर्पण अर्पण सोमण.. कायपण... Happy

अजून एक खटकतं ... देऊसपर्यंत, खाऊसपर्यंत. (देईपर्यंत)

वरती कुणीतरी लिहिलय बहुतेक... मला पण खटकतं - करुयात, घेऊयात (करूया, घेऊया). आणि हो..
मी करील... मी खाईल Sad

बटाटी .... मी ऐकलाय. कोकणात, घाटावर.. मुंबईतही.

करुयात, घेऊयात मला नाही बाई खटकत. (मी तसच म्हणते Proud ) मला केल्ते,गेल्ते जाम खटकतं
बाकी सगळ्याच पोस्टींना अनुमोदन Happy

मी तुला म्हणालेलो (मी तुला म्हणालो होतो ऐवजी)

तू काल आलेला (तू काल आला होतास ऐवजी)

ती तिथे दिसलेली (ती तिथे दिसली होती ऐवजी)

===============

हे कोणाला खटकत नाही का?

काहीजण "तो तिथे उभा राहिलाय" ला "तो तिथे उभारलाय" असं म्हणताना ऐकलय.<<<

नशीबवान आहात, 'काहीच जणांना' असे म्हणताना ऐकले आहेत. ती कोल्हापुरी शैली आहे. मला घरी रोज ऐकायला मिळते.

बाथरूममध्ये - ह्या ऐवजी 'बाथरुमात' असेही म्हणतात कोल्हापूरमध्ये!

उभारलाय हे सोलापूरकडचे शब्द आहेत. माझ्या मामाचा मित्र सोलापूरचा त्यामुळे त्याच्या बोलण्यात कायम असे शब्द असायचे. आणी मराठीचे शॉर्टकट आणी हिंदीकरण करण्याचा मान मुंबईकरांकडे जातो. आलेला, गेलेला हे मुंबईचे लोकच वापरतात. तु गाणे म्हणशील का ऐवजी तू गाणे बोलशील का असे वारंवार ऐकायला मिळते.

मला लाईट आली / गेली असे ऐकले की जाम पिसाळायला होते. तसेच चाय प्यायली.:अओ:

यःकश्चित मस्त लेख आहे हो.

Pages