अनाकलनीय मराठी - १
====================================================
मराठी !!
महाराष्ट्राच्या नसानसातून धैर्याने आणि शौर्याने उसळणाऱ्या रक्ताचे आमरण विशेषण म्हणजे मराठी.
"गोल" पृथ्वीच्या कुठल्याही "कोपऱ्यात" अभिमानाने सांगायची गोष्ट म्हणजे मराठी.
मराठी भाषा आहेच तशी. सर्वात समृद्ध, संपन्न भाषा. "अमृतातेही पैजा जिंके" असं म्हणतात ते काही उगाच नाही. आता या मराठीचा वापर करून काहीजण निवडणुकाही जिंकतात ही गोष्ट निराळी. सोडा, तो आपला विषय नाही. तसा मी लहानपणापासूनच राजकारणापासून चार हात दूर. मी बाल असताना म्हणे, मला नुसतं खुर्चीवर बसवलं तरी मी भोंगा सुरु करायचो. असो ! समृद्ध आणि सर्वगुणसंपन्न अश्या या मातृभाषेबद्दल प्रचंड आदर असला तरी माझ्या निरागस मनाला पडलेल्या काही बाळबोध प्रश्नांना अजुनी उत्तरे मिळाली नाहीयेत.
उदा. मतदान करण्याचा अधिकार अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर मिळतो, हे मला कळून चुकले.
आता या वाक्यातील " कळून चुकणे " हा वाक्प्रचार मला जरासा खटकतो. जर मला कळलंय तर मग मी चुकतो कसा ? आणि जर मी चुकलोय तर मग मला कळलंय असं कसं म्हणता येईल ? बाकी मतदान करताना लोक " कळून " सुद्धा पुन्हापुन्हा " चुकतात ", ही गोष्ट मला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दर पाच वर्षांनी कळत आलेली आहे.
मराठी वांड़मयात असे द्विशाब्दिक वाक्प्रचार बरेच आहेत. त्यातल्या दोन शब्दांना दोन वेगळे अर्थ असतात. पण त्यातला नेमका कुठल्या शब्दाचा अर्थ वाक्यात लावायचा हे न कळल्याने मी सहसा वाक्यात असे वाक्प्रचार वापरतच नाही. जसे की, अन्न टाकून देणे म्हणजे अन्न टाकायचे का द्यायचे ? किंवा अन्न खाऊन टाकणे म्हणजे अन्न खायचे की टाकायचे ? कमाल आहे !!
ह्या द्विशाब्दिक प्रमाणे एक शाब्दिक वाक्प्रचार देखील फार गंमतशीर आहेत. वर्तमानपत्रात बातमी असते , चोरट्याने रस्त्यावरील बाईचे मंगळसूत्र लांबविले.(!) किंवा असे म्हणतात की देवासमोर नारळ वाढविला(!). छे छे वाढविला काय ..लांबविला काय ! यात आपण न अडकलेलच बरं.
ह्या मराठीबद्दल आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे मराठीला शब्दांचा तुटवडा नाही. अगणित शब्दसंग्रह असलेल्या या मराठीत मराठी भाषिक रोज नवीन नवीन शब्दांची भर टाकत असतात. तसेच त्यांचा वापर दैनंदिन जीवनातही बऱ्याचदा करतात. हे मराठी भाषिक आपल्या पोराबाळाची नावे काय ठेवतील हे सांगता येत नाही. तसेही मराठी भाषिक नावे ठेवण्यात पटाईत आहेत म्हणा ! एखाद्या मराठी भाषिकाकडे नामकरण करताना त्यांच्यातला मराठी भाषिक जागा होतो आणि मग बहिणभावंडांची नावे ही यमकच असावी या अलिखित नियमाचे ते पालन करू लागतात. आता बहिणभावंडांची नावे यमक कशाला हवीत ? मग यातून गमती सुरु होतात.
आमच्या एका मित्राचच उदाहरण घ्या. त्यांना जुळ्या मुली झाल्या. जुळ्यावरून आठवलं, मराठी भाषिक बोलतानापण इतक्या गावंढळ चुका करतात. वरचेच वाक्य घ्या. ते म्हणतात की, आमच्या मित्राला दोन जुळ्या मुली झाल्या. बाबा रे , दोन झाल्या म्हणूनच जुळ्या म्हणतात ना ! तीन असत्या तर त्यांना तिळे झाले असे म्हणाले नसते का ? "गाईच गोमुत्र" हादेखील त्यातलाच प्रकार.
तर विषय असा होता की आमच्या मित्राला जुळ्या मुली झाल्या तर त्यांनी त्यांची नावे "पूर्वा" आणि "दुर्वा"(!) ठेवली. ( अश्याने भविष्यात मुलांना वनस्पती आणि माणूस यातला फरक समजायचा नाही. )
हे तर काहीच नाही. एका जोडप्याने कमालच केली. त्यांच्या चार वर्षाच्या "दर्पण"ला भाऊ झाला तर त्याच नाव त्या जोडप्यांनी "दर्पण"ला यमक म्हणून "तर्पण" असं ठेवलं. बहुधा त्यांना तर्पणचा अर्थ माहित नसावा. आता तिसरा मुलगा झाल्यावर त्याच नाव "तर्पण"ला यमक म्हणून "सरपण" नाही ठेवलं म्हणजे मिळवलं.
मराठी भाषेत म्हणींचाही काही ( कमी ( रेफरन्स : गाईच गोमुत्र ) ) तुटवडा नाही. पण ह्या म्हणी आणि त्यातील तर्कविसंगती मला बर्याचदा बुचकळ्यात पाडते.
" अति शहाणा त्याचा बैल रिकामा ".
यातील " अति शहाणा" आणि " बैल" यांचा काय संबंध आहे हे मला आजतागायत कळलेले नाही. अतिशहाणे लोक बैल पाळतात का ? का बैल पाळणारे लोक अतिशहाणे असतात ? मुळातच अतिशहाणे लोक बैल पाळण्यापेक्षा अति नफा मिळवून देणारा व्यवसाय करतील ना ! किंबहुना माझ्यामते बैलच अति शहाणा असल्याने तो या अतिशहाण्यांकडे न जाता एखाद्या सुस्वरूप व सुलक्षणी गाईला घेऊन तिच्याच बापानी हुंड्यात दिलेल्या एखाद्या हिरव्यागार कुरणात संसार थाटेल.
काही म्हणी मात्र मला अमराठी प्रांतातून आल्यासारख्या वाटतात. " अंगापेक्षा बोंगा मोठा " ही म्हण दक्षिणात्य "कथकली" या नृत्यप्रकारातल्या पोशाखावरून आली असावी. "नाकापेक्षा मोती जड" हा साक्षात्कार आफ्रिका/इजिप्त किंवा कुठल्यातरी आदिवाश्यांना नाकपुड्यांच्या मधल्या जागी मोठ्या मोठ्याची नथ घालताना झाला असावा.
असो ! तूर्तास येथे मी लेखणीला स्वल्पविराम देतो. पुन्हा भेटूया मराठीतल्या नवीन गमती घेऊन.
रामराम मित्रांनो...
मी आली/गेली होती; हे पण
मी आली/गेली होती; हे पण अलिकडे वाढू लागलं आहे.
टुणटुण लाईट आली गेली म्हणायचं
टुणटुण लाईट आली गेली म्हणायचं नाही तर काय म्हणायचं?
खेडेगावात लाईन आली म्हणतात.
एकदा अशीच मामींच्या गावी गेलेले तेव्हा त्यांचा कॉलेजवयीन भाऊ 'लाईन आली' म्हणाला मी लग्गेच रस्त्याकडे नजर टाकली, पण एकही पोरगी येताना दिसली नाही...
तर तो म्हणाला आहो, लाईन म्हणजे लाईट.... पोरगी नव्हे
टुणटुण लाईट आली गेली म्हणायचं
टुणटुण लाईट आली गेली म्हणायचं नाही तर काय म्हणायचं?..
लाईट आले/गेले.
माझी एक मैत्रिण... 'ए दक्शे
माझी एक मैत्रिण... 'ए दक्शे गाणं बोल की एखादं' असं म्हणते
प्रत्येक भागाची भाषा वेगळी
प्रत्येक भागाची भाषा वेगळी असते, प्रत्येक धर्माची, जातीची, कामाची भाषा वेगळी असते.
आमच्या कोकणात ब्राह्मणाची भाषा वेगळी (त्यातही कराडे/देशस्थ/चित्पावन) हा भेद आहेच. मराठ्यांची वेगळी, कुणब्याची वेगळी आणि मुसलमानांची वेगळी (त्यात परत दालद्याची वेगळी आणि काझीची वेगळी). या प्रत्येक भाषेला म्हटलं तर एक गोडवा असतो आणि नाहीतर ते "अशुद्ध" आहे म्हणून वैताग तरी येतो- तुमचा जसा दृष्टीकोन असेल तसं.... मला स्वतःला हे भाषावैविध्य प्रचंड प्रमाणात आवडतं. जितकं ऐकू शकेल तितकं ऐकून मी समजून घेत असते, यामुळे मला नवीन भाषा शिकायलादेखील मदत होतेच.
मायबोलीवर एका मभादिसाठी मराठीच्या वेगवेगळ्या बोलीभाषा असा एक उपक्रम केला होता. काय मस्त संवाद होते त्यामधे. लिन्क शोधून देते इथे..
लाईटच नाही स्वत:लाही "मी आली
लाईटच नाही स्वत:लाही "मी आली / गेली " म्हणतात.
प्रत्येक भागाची भाषा वेगळी असते, प्रत्येक धर्माची, जातीची, कामाची भाषा वेगळी असते. बरोबर आहे आणि त्या भाषा समजल्या तर ऐकायलाही मजा येते.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/33091 लिंक मिळाली.
म्हणालेलो , आलेलो - हे
म्हणालेलो , आलेलो - हे कोणाला खटकत नाही का?
>> मला खटकत बुवा. बोली भाषेपेक्षा लेखनात जास्त खटकत. वाक्य अपूर्ण आहे असं वाटत रहातं. मधे माबोवर एका कथेत लेखकानी तसं इतके वेळा वापरलं कि मी प्रतिसादात तसं लिहिलं पण होतं.
अरूण दातेंच गाणं आठवलं,
अरूण दातेंच गाणं आठवलं, "येशील येशील येशील राणी, पहाटे पहाटे....":-)
आयला! हे गाणे कधी हो आले? एखादया नागपुरच्या मुलीला म्हंटले असते तीस चाळीस वर्षांपूर्वी!!
चप्पल पडली असती पाच दहा वेळी, पण एकदा तरी जमले असते!!!
तू काल आलेला हे असले मी
तू काल आलेला
हे असले मी मुंबईत प्रथम १९९१ साली ऐकले. त्यापूर्वी १९८० मधे आलो होतो तेंव्हा नाही ऐकले. माझ्या अहमदाबादमधे रहाणार्या भावाने सांगितले की तसे गुजरातीत असते, त्यावरून मुंबईत आले असावे.
आता चिनी लोक आले की लवकरच मराठीत चिंग चाँग यूं असले शब्दहि येतील.
हल्ली हिंदीभाषेच्या
हल्ली हिंदीभाषेच्या परिणामामुळे अमुकतमुकला ढमुकचमुकप्रित्यर्थ खूप सार्या शुभेच्छा देतात. ढेर सारी शुभकामनाएं च्या चालीवर.
मराठीत 'भरपूर शुभेच्छा' म्हणणं योग्य आहे.
उभारलाय हे सोलापूरकडचे शब्द
उभारलाय हे सोलापूरकडचे शब्द आहेत.<<<<<< बरोब्बर ......
मी स्वतः एका शेरात वापरलय एकदा
तू स्वतःला असे माण्ड की वैभवा ;
......विठ्ठलाने विटेवर उभारू नये
म्हणालेलो , आलेलो...हे ही चालतय आपल्याला बर्का
बसल्याबसल्या काल तिच्या मी आठवणी काढत बसलेलो
त्यांच्या मोरपिशी स्पर्शाने मी 'लाजाळू' झालो आहे
मला चालतं बुवा !!!
आल्ते गेल्ते पण वापरतात आमच्यात ग्रामीण भागात काही जण त्यामुळे खटकत नाही अनेकदा
आता चिनी लोक आले की लवकरच मराठीत चिंग चाँग यूं असले शब्दहि येतील.<<<
रिया खरच ते कानाला विचीत्र
रिया खरच ते कानाला विचीत्र वाटते.:फिदी:
दक्षिणा लहानपणापासुन तरी मी लाईट आले/ गेले असेच ऐकलेय/ वापरलेय. वीज चमकली असे आपण म्हणतो पण लाईट लागली हे गंमतशीर वाटते ऐकायला.:स्मित:
आमच्या ओळखीतले एक जण मध खाल्ला का च्या ऐवजी मध खाल्ली का? असे बोलतात.:फिदी:
मास्तर विद्यार्थ्यास: स्त्री, पुरुष आणी नपुसकलिंगाचे उदाहरण दे पाहु.
विद्यार्थी : सांगतो, ती शाळा, तो फळा आणी ते मास्तर्...
विद्यार्थ्याच्या कानाखाली जाळ होतो.:खोखो:
<<<@झक्की : या प्रकाराला भाषा
<<<@झक्की : या प्रकाराला भाषा समृद्ध झाली म्हणायचे का भाषा भ्रष्ट झाली असे म्हणायचे ? :O
<<<
समृद्ध झाली असेच म्हणायचे. जास्त शब्द भाषेत आले. एका शब्दाला अनेक पर्याय. कुठे कुठले शब्द वापरायचे यावरून भाषेतील प्रभुत्व जाणवते. उदा.
आजकाल पुण्या मुंबईत स्वतःला सॉफिस्टिकेटेड म्हणणारे लोक असेच बोलतात. एका मराठी सिनेमात एका बाजूचा वकील न्यायाधीशास म्हणतो. न्यायाधीश महाराजांनी मला......साठी परवानगी द्यावी. लगेच दुसर्या मराठी वकील बाईने म्हंटले, युवर ऑनर, मला पण ..... साठी परमिशन द्यावी. आता तो न्यायाधीश पुण्या मुंबईतला असेल तर म्हणेल बाई वकील जास्त शिकलेली दिसते आहे. भाषेवर प्रभुत्व आहे. सॉफिस्टिकेटेड आहे. या उलट पहिला वकील तसा वाटत नाही. दुसर्या वकीलाचेच खरे असावे.
>>>मला लाईट आली / गेली असे
>>>मला लाईट आली / गेली असे ऐकले की जाम पिसाळायला होते. तसेच चाय प्यायली ...
१००% अनुमोदन!!! (च्याय पिली चालेल?)
हे सर्व प्रतिसाद वाचतांना अत्यंत आनंद झाला. का? कारण असे मराठी शब्द ऐकण्याचे दुःख खूप भोगले आहे म्हणून.
माझ्या ऑफिसमध्ये सर्वजण "भेटणारे" आहेत. त्यांना खायला भेटते, फिरायला भेटते, गाडी भेटते आणि हरवलेली वस्तू भेटते. फक्त मराठी भाषा तेवढी फारशी कधी भेटत नसावी.
हल्ली नवरात्री येते. पूर्वी नवरात्र यायचे. लोकं योगा शिकतात. पूर्वी योगासनं करायचे. लोक जय कृष्णा म्हणतात. पूर्वी कृष्णा म्हणजे द्रौपदी समजायचे.
(संस्कृतची ह्यापेक्षा दुर्दशा आहे - उदा: माताय नमः , पिताय नमः , सर्वजनाय नम: .. हे रोज एके (का एका?) ठिकाणी ऐकतो. आर्ष प्रयोग असावेत!!!)
भाषा समृद्ध होते आहे !!! (सकारात्मक पोसिटिव्ह view वगैरे वगैरे ...)
नशीब अजुन कोणी संतवाङमयावर
नशीब अजुन कोणी संतवाङमयावर काही लिहिलं नाही...
नाही चुक आपली नाहिच, ती शिक्षण मंडळाची आहे, की या सगळ्या बोलीभाषा आपल्याला शिकवल्याच गेल्या नाही, त्यामुळे माझी भाषा ती श्रेष्ठ वगैरे वाद होतात, किंवा किमानपक्षी मस्तकी तिडीक उठते.
नंदिनी :- +१०००
प्रत्येक भाषेतला गोडवा बघितला तर मजा येईल. लाईन येणे/जाणे हे लाईनमन किंवा इंग्रजी लाईन वरुन आलेलं व्याकरण. लाईट (काही लोकांसाठी बल्ब) कसा येतो/ येते, हे हास्यास्पद असते. त्यामुळे उगाच मस्तकशुळ वगैरे न होऊ देता मजा घ्या.
अवांतर :- अशोक सराफ आणि सुबोध भावे (एक डाव धोबीपछाड) - मजेदार नाही वाटत ?
अधिक :- शिकवताना जो मूळ हेल असतो, तो वाचुन कळत नाही, तो ऐकूनच कळतो, त्यामुळे बरेचदा मला असं वाटते की आपलं श्रवणकौशल्य विकसितच होत नाही इंग्रजी (अमेरिकन, ब्रिटिश, ऑस्ट्रेलिअन, आफ्रिकन) माहीती असणे आज आवश्यक झाले आहे, उदा. IELTS परिक्षा, तशिच मराठीतही परिक्षा का असु नये ?
मस्त निरिक्षण पँट्स पेन्स
मस्त निरिक्षण
पँट्स पेन्स याला पँटी >>>
http://www.marhati.com/?p=101
http://www.marhati.com/?p=10183
हे घ्या येशील येशील....
कसलं भयंकर गीत आहे ते
कसलं भयंकर गीत आहे ते
मी पूर्वी दिवा मालवला किंवा
मी पूर्वी दिवा मालवला किंवा बंद केलाच्या ऐवजी दिवा काढला म्हणायचे
एखाद्या घडलेल्या गोष्टी बद्दल
एखाद्या घडलेल्या गोष्टी बद्दल / प्रसंगा बद्दल सांगताना
"...अस अस झाल आणि मग तो तिथे गेला.." च्या ऐवजि
"...अस अस झाल आणि मग तो तिथे जातो .." अस म्हणतात..
थोडं आवांतर आहे पण भाषेशी
थोडं आवांतर आहे पण भाषेशी रिलेटेड आहे म्हणून लिहितेय इथे.
पूण्यात मी ज्या कंपनीत काम करते तिथे एकूणच हिंदी भाषेचा पगडा जबरदस्त जाणवतोय. मॅनेजमेंट सध्या बरेच मराठी कॅण्डिडेट हायर करत असूनही कँटीनमध्ये अगदी लक्षात येईल इतपत मराठी असलेला ग्रुप सुद्धा हिंदीच बोलतो. ते का?
उलट माझी एक साऊथ इंडियन मैत्रिण मात्रं सतत माझ्याशी मराठी बोलण्याचा प्रयत्न करत असते. मराठी लोकांनाच मराठी बोलायची लाज वाटते का? हिंदी बोलणे वाईट नाही पण गटात सर्व लोकांना जर मराठी समजत असेल तर बोलायला हरकत काय आहे?
आता दुसरं निरिक्षण सध्या रेडिओवर (चॅनल आठवत नाही) एक रेडिओ जॉकी आहे. मराठी मूळ नाव सोनाली असं असलं तरिही ती स्वतःच्या नावाचा उल्लेख शोनाली शोनाली असा करते. (फॅशन सिनेमात कंगनाचे नाव शोनाली दाखवलेय तेव्हापासून हे फॅड मी पाहिलंय) त्या आधी मी सोनालीच ऐकलंय. आई बोबडे बोलताना स्वतःच्या पोराला एकवेळ सोन्या ऐवजी माझ्या शोन्या म्हणणं रास्त आहे.
हिच सोनाली एखादा प्रश्न टाकते आणि तुम्ही एसएमएस करू शकता आणि अमूक ढमूक जिंकू शकता च्या ऐवजी एसएमएस करू शकतात, व बक्षिस जिंकू शकतात असं लिहिते..
शकतात?
करू शकतात, जिंकू शकतात मधील
करू शकतात, जिंकू शकतात मधील शकतात ऐकले की चाबकाने बडवावेसे वाटते.
बटाटी .... मी ऐकलाय. तसेच
बटाटी .... मी ऐकलाय. तसेच टमाटी पण ऐकलाय. खूप विचित्र वाटते ते.
वरच्या बहुतेक सगळ्याच पोस्ट्स ना अनुमोदन ....
कदाचीत माझ्या या वाक्यावर अनेक जण तुटून पडतील पण मायबोली वर सुद्धा मला धन्स , धन्यु , पोस्ट्ले, मेलले असले शब्द वाचताना खटकतात.
शकतात?>>> हे नवीनच सुरु झालय
शकतात?>>>
हे नवीनच सुरु झालय का?
बेळगावात बटाटे आणा ऐवजी बटाटी
बेळगावात बटाटे आणा ऐवजी बटाटी आणा असे सांगितले जाते कारण कानडीत बटाटी हे एकवचन अन बहुवचनही आहे . हा कन्नड भाषेचा प्रभाव आहे.!!!
<<बटाटी .... मी ऐकलाय. तसेच
<<बटाटी .... मी ऐकलाय. तसेच टमाटी पण ऐकलाय << आमच्याकडे पण खेड्यात लोकं असच बोलतात. मी टमाटे हा पण शब्द ऐकला आहे अनेकवचन म्हणून!
ऑफिसमध्ये बर्याच जणाच्या तोंडी "पुढं गेली" च्या ऐवजी "फुडं गेली" असं ऐकलं आहे.
कदाचीत माझ्या या वाक्यावर
कदाचीत माझ्या या वाक्यावर अनेक जण तुटून पडतील पण मायबोली वर सुद्धा मला धन्स , धन्यु , पोस्ट्ले, मेलले असले शब्द वाचताना खटकतात. >> अनुमोदन
धन्स हा शब्द तर माझ्या डोक्याच्या पार आतच घुसतो.
बिझले होते, गुगलले, मिसले,
बिझले होते, गुगलले, मिसले, वगैरे! हे शब्द वापरून मराठी समृद्ध होण्याऐवजी भिकार होईल असे वाटते.
काही दिवसांनी पारंपारीक लग्नाचे वर्णन रेडिओवर असेही ऐकू येऊ शकेल.
========
नवरी गर्लला तिचा अंकल घेऊन अंतरपाटपाशी आला. ऑन द अदर साईड ऑफ अंतरपाट मुलगा म्हणजे भावी नवरा मीन्स 'वर बॉय' उभा होता. क्राऊड वॉज सो एक्सायटेड यू नो? अॅन्ड देन भटजी मॅन्गलॅष्टक्स सिंगू लागला. दो हिज व्हॉईस वॉज नॉट सो श्रवणीय, बट, चलता है! सो दोस्तो, फायनली द अंतरपाट गॉट रिमूव्ह्ड अॅन्ड द हिस्टॉरिक नजरानजर टूक प्लेस. माय माय! काय क्षण होता तो म्हणून सांगू. वधू तो इतनी खूबसूरत होती की एव्हरीवन वॉज स्टन्ड यू नो? आणि मग तिने ती वर्माला 'वर बॉय'च्या गळ्यात डकवली और बाहरसे पटाकोंकी माला बजने लगी. अॅट द सेम टाईम, शहनाईके सुरोंने पूरा अॅटमोस्फिअर यू नो, एक पूरा माहौल जैसा बना डाला. आणि मग टाळ्यांच्या कडकडाटात शादी हो गयी.
========
मी काही मुलींना देतीय (देत
मी काही मुलींना देतीय (देत आहे) , खातीय (खात आहे) असे बोलताना ऐकले आहे. म्हणजे मुलगी असेल तर खातीय आणि मुलगा असेल तर खातोय असे. हे चुकीचे आहे कि खरोखर काही ठिकाणी असे बोलतात?
बोलताना आपण पण 'ती जातेय (जात आहे)' असे बोलतो पण 'जातीय' (ईकारान्त) हे बरोबर आहे का?
Pages