अनाकलनीय मराठी - १
====================================================
मराठी !!
महाराष्ट्राच्या नसानसातून धैर्याने आणि शौर्याने उसळणाऱ्या रक्ताचे आमरण विशेषण म्हणजे मराठी.
"गोल" पृथ्वीच्या कुठल्याही "कोपऱ्यात" अभिमानाने सांगायची गोष्ट म्हणजे मराठी.
मराठी भाषा आहेच तशी. सर्वात समृद्ध, संपन्न भाषा. "अमृतातेही पैजा जिंके" असं म्हणतात ते काही उगाच नाही. आता या मराठीचा वापर करून काहीजण निवडणुकाही जिंकतात ही गोष्ट निराळी. सोडा, तो आपला विषय नाही. तसा मी लहानपणापासूनच राजकारणापासून चार हात दूर. मी बाल असताना म्हणे, मला नुसतं खुर्चीवर बसवलं तरी मी भोंगा सुरु करायचो. असो ! समृद्ध आणि सर्वगुणसंपन्न अश्या या मातृभाषेबद्दल प्रचंड आदर असला तरी माझ्या निरागस मनाला पडलेल्या काही बाळबोध प्रश्नांना अजुनी उत्तरे मिळाली नाहीयेत.
उदा. मतदान करण्याचा अधिकार अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर मिळतो, हे मला कळून चुकले.
आता या वाक्यातील " कळून चुकणे " हा वाक्प्रचार मला जरासा खटकतो. जर मला कळलंय तर मग मी चुकतो कसा ? आणि जर मी चुकलोय तर मग मला कळलंय असं कसं म्हणता येईल ? बाकी मतदान करताना लोक " कळून " सुद्धा पुन्हापुन्हा " चुकतात ", ही गोष्ट मला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दर पाच वर्षांनी कळत आलेली आहे.
मराठी वांड़मयात असे द्विशाब्दिक वाक्प्रचार बरेच आहेत. त्यातल्या दोन शब्दांना दोन वेगळे अर्थ असतात. पण त्यातला नेमका कुठल्या शब्दाचा अर्थ वाक्यात लावायचा हे न कळल्याने मी सहसा वाक्यात असे वाक्प्रचार वापरतच नाही. जसे की, अन्न टाकून देणे म्हणजे अन्न टाकायचे का द्यायचे ? किंवा अन्न खाऊन टाकणे म्हणजे अन्न खायचे की टाकायचे ? कमाल आहे !!
ह्या द्विशाब्दिक प्रमाणे एक शाब्दिक वाक्प्रचार देखील फार गंमतशीर आहेत. वर्तमानपत्रात बातमी असते , चोरट्याने रस्त्यावरील बाईचे मंगळसूत्र लांबविले.(!) किंवा असे म्हणतात की देवासमोर नारळ वाढविला(!). छे छे वाढविला काय ..लांबविला काय ! यात आपण न अडकलेलच बरं.
ह्या मराठीबद्दल आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे मराठीला शब्दांचा तुटवडा नाही. अगणित शब्दसंग्रह असलेल्या या मराठीत मराठी भाषिक रोज नवीन नवीन शब्दांची भर टाकत असतात. तसेच त्यांचा वापर दैनंदिन जीवनातही बऱ्याचदा करतात. हे मराठी भाषिक आपल्या पोराबाळाची नावे काय ठेवतील हे सांगता येत नाही. तसेही मराठी भाषिक नावे ठेवण्यात पटाईत आहेत म्हणा ! एखाद्या मराठी भाषिकाकडे नामकरण करताना त्यांच्यातला मराठी भाषिक जागा होतो आणि मग बहिणभावंडांची नावे ही यमकच असावी या अलिखित नियमाचे ते पालन करू लागतात. आता बहिणभावंडांची नावे यमक कशाला हवीत ? मग यातून गमती सुरु होतात.
आमच्या एका मित्राचच उदाहरण घ्या. त्यांना जुळ्या मुली झाल्या. जुळ्यावरून आठवलं, मराठी भाषिक बोलतानापण इतक्या गावंढळ चुका करतात. वरचेच वाक्य घ्या. ते म्हणतात की, आमच्या मित्राला दोन जुळ्या मुली झाल्या. बाबा रे , दोन झाल्या म्हणूनच जुळ्या म्हणतात ना ! तीन असत्या तर त्यांना तिळे झाले असे म्हणाले नसते का ? "गाईच गोमुत्र" हादेखील त्यातलाच प्रकार.
तर विषय असा होता की आमच्या मित्राला जुळ्या मुली झाल्या तर त्यांनी त्यांची नावे "पूर्वा" आणि "दुर्वा"(!) ठेवली. ( अश्याने भविष्यात मुलांना वनस्पती आणि माणूस यातला फरक समजायचा नाही. )
हे तर काहीच नाही. एका जोडप्याने कमालच केली. त्यांच्या चार वर्षाच्या "दर्पण"ला भाऊ झाला तर त्याच नाव त्या जोडप्यांनी "दर्पण"ला यमक म्हणून "तर्पण" असं ठेवलं. बहुधा त्यांना तर्पणचा अर्थ माहित नसावा. आता तिसरा मुलगा झाल्यावर त्याच नाव "तर्पण"ला यमक म्हणून "सरपण" नाही ठेवलं म्हणजे मिळवलं.
मराठी भाषेत म्हणींचाही काही ( कमी ( रेफरन्स : गाईच गोमुत्र ) ) तुटवडा नाही. पण ह्या म्हणी आणि त्यातील तर्कविसंगती मला बर्याचदा बुचकळ्यात पाडते.
" अति शहाणा त्याचा बैल रिकामा ".
यातील " अति शहाणा" आणि " बैल" यांचा काय संबंध आहे हे मला आजतागायत कळलेले नाही. अतिशहाणे लोक बैल पाळतात का ? का बैल पाळणारे लोक अतिशहाणे असतात ? मुळातच अतिशहाणे लोक बैल पाळण्यापेक्षा अति नफा मिळवून देणारा व्यवसाय करतील ना ! किंबहुना माझ्यामते बैलच अति शहाणा असल्याने तो या अतिशहाण्यांकडे न जाता एखाद्या सुस्वरूप व सुलक्षणी गाईला घेऊन तिच्याच बापानी हुंड्यात दिलेल्या एखाद्या हिरव्यागार कुरणात संसार थाटेल.
काही म्हणी मात्र मला अमराठी प्रांतातून आल्यासारख्या वाटतात. " अंगापेक्षा बोंगा मोठा " ही म्हण दक्षिणात्य "कथकली" या नृत्यप्रकारातल्या पोशाखावरून आली असावी. "नाकापेक्षा मोती जड" हा साक्षात्कार आफ्रिका/इजिप्त किंवा कुठल्यातरी आदिवाश्यांना नाकपुड्यांच्या मधल्या जागी मोठ्या मोठ्याची नथ घालताना झाला असावा.
असो ! तूर्तास येथे मी लेखणीला स्वल्पविराम देतो. पुन्हा भेटूया मराठीतल्या नवीन गमती घेऊन.
रामराम मित्रांनो...
अमेरिकन इंग्रजी शिकण्यासाठी,
अमेरिकन इंग्रजी शिकण्यासाठी, तो का म्हणुन?
कारण ज्यांना ज्यांना खूप पैसे मिळवायचे आहेत, अगदी कुठल्याहि देशात, त्यांना अमेरिकन इंग्रजी शिकण्याने फायदा होईल. म्हणून.
तसे मराठी शिकून सध्या आर्थिक फायदा किती? नि एव्हढी मराठीची आवड असणारे लोकच किती? खुद्द पुण्यात जिथे हिंदी बोलले जाते, तिथे इतर ठिकाणांची काय कथा?
ही साईट (महाफलक) मराठी साठी आहे, इथे शक्यतो मराठी लिहा, असे मी पाच सहा वर्षांहून जास्त काळ इथे लिहीत आलो. सर्वांनी मा़झी टिंगलच केली. खुश्शाल इंग्रजी, मिंग्रजी, उर्दू, हिंदी यांना इथे मध्यंतरी ऊत आला होता. एकूण १५ कारणे सांगण्यात आली होती, मराठी न लिहीण्यासाठी.
माझ्या वैयक्तिक अनुभवातून अत्यंत विषादाने मी मराठी भाषेचा आग्रह सोडला. स्वतः मी चाळीस वर्षे अमेरिकेत राहून सुखाने जगलो, नाही कुणि मराठी बोलले तर मला काही फरक पडत नाही.
आता मी जवळ जवळ मराठी-विरोधीच झालो आहे.
झक्की, तुमचा विषाद मी समजू
झक्की, तुमचा विषाद मी समजू शकतो. पण अगदीच परिस्थिती हाताबाहेर गेलिय, असं मलातरी वाटत नाही. भलेही इंग्रजीच्या ओझ्याखाली आज सगळ्याच भाषा थोड्याफार फरकाने दबल्या असतीलही, पण मुळातच प्रवाही असणार्या मराठीसह अनेक भारतीय (खरं तर आशियाई म्हणावं का?) भाषांमधुन अशिच ओरड ऐकू येते, पण मुलाला इंग्रजी शाळेत पाठवले, तरी घरी मात्र मराठी वाहिन्या बघितल्या जातात. अजुनही चित्रपट (मराठी आणि इतर भाषिक) बघितले जातात.
मला २-४ दिवस कोरियन जेवण असेल तरी चालते, पण म्हणून मी रोजच कोरियन अन्न खाऊ शकत नाही तसच रोज (भांडुन का होईना) मराठी बोलणे, वाचणे, ऐकणे आणि लिहिणे मला गरजेचे वाटते.
चक्क मोघल- आणि इतर आक्रमणांनी मराठी भाषा नामशेष झाली नाही, तर उलट त्या त्या काळानुसार नविन बदल स्वीकारत ती अधिक समृद्ध झालीय. हा, आता पूर्वी संस्कृत शब्दांचं प्राबल्य होतं आता इंग्रजीचं म्हणा....
हे फक्त मराठीच नव्हे तर सर्वच भाषांत दिसतय. इथेही कोरियन भाषा मरतेय, त्यावर इंगेजीचं वर्चस्व वाढतय म्हणत आहेत, पण अजुनही सगळ्या कोरियन लोकांना इंग्रजी विंडोजसुद्धा जमत नाही
असो. प्रत्येक गोष्ट पोटापाण्यासाठीच करायची नसते. संगीत ऐकुन कुणाचं पोट भरत नाही, आणि पॉप आलं म्हणुन शास्त्रीय/ उपशास्त्रीय किंवा लोकसंगीत मरणाला लागलय असही नाही. तसच भाषेचं समजा...
मराठवाड्यात 'तो काय म्हणाला'
मराठवाड्यात 'तो काय म्हणाला' नाही 'ते काय म्हणलं', ते तिथं उभं राहिलयं, असचं बोलतात.
सातारा, कराडला, 'जावा की, राहावा की, खावा की'
आणि सगळ्यात height विदर्भात, 'तिथुन थोडं समोर ये'.
पुण्यातही मी असंच काही ऐकलं
पुण्यातही मी असंच काही ऐकलं आहे, उदा. ती मांजरी, चांभारवाला.
आमच्या ओळखीच्या एका
आमच्या ओळखीच्या एका कुटुंबातील लहान मुलगा (senior KG मधील) असंच अगम्य मराठी बोलतो. म्हणजे बरेच मराठी शब्द त्याचे कळत नाहीत. पण हिंदी मात्र उत्तम बोलतो!! छोटा भीम, हिंदी सास-बहू ((त्याच्या आईची कृपा) सिरीयल मधील डायलॉग फटाफट म्हणून दाखवतो. आणि त्याचे आईवडील त्याच्या हिंदी बोलण्यालाच प्रोत्साहन देतात. 'ए, तू हिंदीतूनच बोल बाबा. तुझं मराठी काही कळत नाही.'
नाशिक व आजूबाजूच्या
नाशिक व आजूबाजूच्या परिसरात्,अनेक मान्यवर लेखकांसहित एक विचित्र प्रकार प्रचलित आहे
" या कार्यक्रमास अनेक लोक उपस्थित आहे , त्यात बर्याचशा महिला आहे" ' त ' कुठे अन का गेला ??
पुण्यात " माला फोन कर.", "
पुण्यात " माला फोन कर.", " माला शिकवू नकोस"
हे 'मला' च्या ऐवजी 'माला' फार खटकते.
माझी शुद्ध पुणेरी ऐकून माझी
माझी शुद्ध पुणेरी ऐकून माझी मैत्रिण मला म्हणते.......तू बोलायला लागलीस की अगदी दूरदर्शनवरच्या मराठी बातम्या ऐकल्यासारखं वाटतं !
काय काय खटकतेय सर्वांना …
काय काय खटकतेय सर्वांना … अरे भाषा फक्त संवादासाठी आहे… उगाच चुका काढत बसू नका …
समोरच्याला कळतेय ना। मग पुरे आहे ते…
माझ्या ओळखीच्या एका बाईचा फोन
माझ्या ओळखीच्या एका बाईचा फोन आला होता. (हि बाई इंदोर ची आहे) मराठीच भाषा आहे हिची.
पण फोन वर मला विचारल तु ह्या वर्षी हरतालिका मनवल्यास का??
आधी मला कळेचना म्हणजे काय. नंतर वाटल रुसलेल्याना मनवतात अस ऐकल आहे, पण हरतालिका कश्या रुसतील्..
५ मिनिटाने माझ्या लक्षात आल तिला काय म्हणायच आहे ते.
मनवणे = रुसवा दूर करणे हा तरी
मनवणे = रुसवा दूर करणे हा तरी मराठी शब्द आहे का?
अलीकडे मायबोलीवर तरसणे हा शब्द हिंदीतल्या तरसना (एखाद्या वस्तूच्या अभावाने त्रस्त होणे) या अर्थी वारंवार वापरलेला दिसतो. मराठीत त्याचा अर्थ (थकव्याने)गळून जाणे असा आहे.
धागा अन् प्रतिसाद वाचून मज्जा
धागा अन् प्रतिसाद वाचून मज्जा आली...
'अति शहाणा त्याचा बैल रिकामा' यामधील बैल रिकामा होणे ही काय भानगड आहे...?
(माझ्या अगाध अञानामुळे पडलेला प्रश्न ..:डोमा:)
जनहो, बाकी कस्सही बोला
जनहो, बाकी कस्सही बोला तुम्ही !
पण नेहेमी दुसर्याला मदत करा. दुसर्याची मदत करू नका हो !
भरतदादा, ते मनवणे साजरे करणे
भरतदादा, ते मनवणे साजरे करणे या अर्थी वापरलय वरच्या पोस्टीत
रिया, ते कळलं. पण दोन्ही
रिया, ते कळलं. पण दोन्ही अर्थांनी (मनाना= मनधरणी करणे, साजरे करणे) शब्द हिंदीच आहे. इंदूरकरांनी वापरलेत त्यामुळे समजून घेता येईल.
(१)'दिनांक' १४ 'रोजी' सभा आहे
(१)'दिनांक' १४ 'रोजी' सभा आहे .'तमाम' मराठी बांधवांनी यावे (२)कानडीत 'कुळितकोळी' मराठीत बसून घे ,'तेगदुकोडु' घे की (३)टिव्हीवर घरसजावट कार्यक्रमातील आणि योगा दाखवणारे भयानक इंग्रजी मिश्रीत मराठी बोलतात .
ho na manavane haa shabada
ho na manavane haa shabada Marahti nahich aahe, pan to tyacha aarthane ikalycha (Hindi madye sudda ) aathavat hota mala.
(Marathi type hota nahiye :()
इंदुरकरांच्या (किंवा
इंदुरकरांच्या (किंवा कुठल्याही पिढ्यानपिढ्या महाराष्ट्राबाहेर रहाणार्यांच्या) मराठीत शिरु नका. प्लीजच. एकतर तुम्ही (म्हणजे तुमची आजी/माजी/पुढली पिढी मिळून) कमीतकमी ४-५ पिढ्या महाराष्ट्राबाहेर काढा अन बघा तुमचं/तुमच्या येणार्या पिढ्यांचं मराठी किती ठेवणीतलं रहातं ते.
इथे मागच्या सगळ्या पिढ्या महाराष्ट्रात राहून लोकं "धन्स", "पोस्टते", "एडिटलं", "वीकांत" वगैरे कैच्याकै मराठी बोलायला/ "टायपायला" लागलेत. अन काय ते "दिवा घ्या" अन "रच्याकने" वगैरे विनोदी भाषांतरं करुन अगदी "आम्ही फक्त शुध्द मराठीच्च बोलतो" वगैरे अभिमान बाळगायला लागलेत! अशा बिन्डोक भाषांतरांनी मराठी भाषा समृद्ध होण्याऐवजी भिकार होतेय. त्यापेक्षा सरळ थँक्स, विकेंड, बाय द वे म्हटलेलं अनेकपट बरं, असं माझं मत आहे.
अनु३, हे तुम्हालाच उद्देशून असं नाही.
हीहीहीही
हीहीहीही
अजून एक: जीटॉक ला गबोल्या,
अजून एक: जीटॉक ला गबोल्या, फायरफॉक्सला अग्निकोल्हा, जीमेलला गटपाल वगैरे बिनडोक भाषांतरं करुन ते वापरणं याचा अर्थ "आम्हाला बुवा मराठीचा फार अभिमान"किंवा "आम्ही बुवा अगदी शुद्धच मराठी बोलतो" असा नाही. त्यावरनं इतकंच कळतं की तुम्हाला व्याकरणाचे नियम माहीत नाहीत.
Proper noun should not be translated, हा तो नियम. मी इंग्लिशमध्ये शिकले म्हणून इंग्लिशमध्ये लिहिला. प्रॉपर नाउन ला मराठीत काय म्हणतात ते माहीत नाही. पण मी तरी त्याचं "योग्य नाम" असं बिनडोक भाषांतर करणार नाही, त्याऐवजी इंग्लिश वाक्य वापरलं तरी चालतं
नताशा - तुमचा मुद्दा बरोबर
नताशा - तुमचा मुद्दा बरोबर आहे। पण एक्स्प्लेनेशन पूर्णपणे चुकीचा आहे… इंग्रजी व्याकरणाचे नियम मराठीत कसे लागू होतील?
मराठीत असा काही नियम नाही आहे…
प्रॉपर नाऊन सुद्धा ट्रान्सलेत करतात । example : New Year's Day , Christmus ,Ganges River , Asia
तुमचा नियम मी दुरुस्त करतो - Organization, companies name and Product name should not be translated.
नताशा, केवळ तुमच्या
नताशा,
केवळ तुमच्या माहितीसाठी (=FYI) :
प्रॉपर नाउन = विशेषनाम
आ.न.,
-गा.पै.
मूळ मराठी शब्द म्हणजे कोणते?
मूळ मराठी शब्द म्हणजे कोणते? जे संस्कृतमधुन घेतले ते? भाषा काळानुसार बदलत जाते. शिवाजी महराजांच्या काळात फारसी (की उर्दू)चा मराठीवर प्रभाव होता. त्यावेळी 'जाहले' वगैरे शब्द बिनदिक्कत वापरत. इंदुर व नागपुर इथल्या मराठीत बरच साम्य आहे, कारण दोन्ही आधी सिपी अॅन्ड बेरारचा भाग होते. असो.
शिवाजी महाराजांनंतर कोल्हापुरची गादी किंवा नागपुरचे भोसल्यांनी सत्ता गाजवली असती तर आज कदाचित कोल्हापुरी किंवा वर्हाडी भाषा प्रमाणभाषेच्या जवळ राहिली असती, नाही का?
नताशा >>> अगदी मनातलं बोललात. आणि दुसर्यांच्या मराठीला हसणारे बघितले की आजकाल कीव येते. जे मराठी बोलतात, त्यांचे खरंतर आभार मानले पाहिजे. उलट इथे त्यांची टर उडचल्या जाते ? आश्चर्य आहे
करतीस, खातीस, येतीस, बसतीस
करतीस, खातीस, येतीस, बसतीस असं माझ्या सासरी बोललं जातं.
शुद्ध मराठी सांगितलं तर म्हणतात कानडी लोकं मराठी असंच बोलतात
तरी ३०-४० वर्ष इथेच पुण्यात राहिलेत.
बेफ़िकीर | 8 July, 2013 -
बेफ़िकीर | 8 July, 2013 - 16:07नवीन
आईचे नांव समर्पण आणि वडिलांचे अर्पण असावे.
<<
नावे ठेवतांना समर्पण, अर्पण या शब्दांचे लिंग विचारात घेण्याची जरूरी नसते का?
भाषेचा पुरेसा अभ्यास नसल्याने प्रश्न पडला.
इंदुरकरांच्या '...........
इंदुरकरांच्या '........... होण्याऐवजी भिकार होतेय. त्यापेक्षा सरळ थँक्स, विकेंड, बाय द वे म्हटलेलं अनेकपट बरं, असं माझं मत आहे.
+१००.
अगदी मनातलं बोललात. आणि दुसर्यांच्या मराठीला हसणारे बघितले की आजकाल कीव येते. जे मराठी बोलतात, त्यांचे खरंतर आभार मानले पाहिजे. उलट इथे त्यांची टर उडचल्या जाते ?आश्चर्य आहे
आपण शहाणे आहोत हे दाखवाण्याचा एव्हढा दुर्दम्य अट्टाहास की त्यापुढे आपआपासात दुही माजवून परकीयांच्या मागे लागणे अशी महाराष्ट्रातील पाचशेहून अधिक वर्षांची परंपरा आहे. शिवाय आजकाल स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा यांच्याबद्द्ल अभिमान असण्या ऐवजी परकीयांच्या कडे जास्त लक्ष देणे, त्यांचे कौतुक करणे, हे अधिक सुशिक्षितपणाचे, उदारमतवादी पणाचे लक्षण आहे. उलट स्वदेश, स्वभाषा, स्वधर्म यांचा अभिमान मात्र संकुचित वृत्तीचे लक्षण मानले जाते.
जीटॉक ला गबोल्या, फायरफॉक्सला अग्निकोल्हा, जीमेलला गटपाल
काय करणार? सगळी अक्कल आपआपसात भांडण्यात घालवायची, स्वतः असले काही शोधून काढायचे नाही, नि मग परक्यांच्या गोष्टी घेऊन फुक्कट काहीतरी फालतूपणात अक्कल घालवायची! दोन अर्थाने विनोद. आधी भाषांतर हा विनोद, नि असले करण्याची हौस हा दुसरा.
मुळात इथे कित्येकांना चुकीच
मुळात इथे कित्येकांना चुकीच बोलणं आणि सहज गंमत म्हणून एखादा शब्द बदलणं यातला फरक कळेना का?
मुद्दा हा आहे की-
माझ्या एका मैत्रिणीला मी जेवले ऐवजी मी ईटले म्हणायची सवय आहे.
तिला ते आवडत म्हणुन ती तशी बोलते.म्हणजे लिहिताना वगैरे इटले लिहित नाही हं ती... इनफॉर्मली मित्र- मैत्रिणींच्यात बोलताना ती अशी म्हणते....
तर इथे इटले हे कसं चुकीचं आहे हा विषय नाहीये तर अनेक जण जे 'जेवले' ऐवजी 'मी जेवली', 'मी आली' वगैरे बोलतात ना ते चुकीचं आहे असं चालू आहे.
रच्याकने वगैरे सहजच म्हणलं जातं पण लिहिताना एखाद्या कथेत किंवा पत्रात आपण रच्याकने लिहितो का?
माबोशिवाय दुसर्या लोकांच्यात बोलताना आपण रच्याकने वापरतो का?
असो!
कुठेही, कुठल्याही विषयावर काहीही वाद घालतात लोकं!
जेवण्यावरुन आठवलं, विदर्भातील
जेवण्यावरुन आठवलं, विदर्भातील काही ग्रामीण भागात स्त्रीया (व पुरुषही) जेवलो, आलो, गेलो, असच म्हणतात.
स्त्री-पुरुष समानता म्हणजे ही असावी का ?
आपण शहाणे आहोत हे दाखवाण्याचा एव्हढा दुर्दम्य अट्टाहास की त्यापुढे आपआपासात दुही माजवून परकीयांच्या मागे लागणे अशी महाराष्ट्रातील पाचशेहून अधिक वर्षांची परंपरा आहे. शिवाय आजकाल स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा यांच्याबद्द्ल अभिमान असण्या ऐवजी परकीयांच्या कडे जास्त लक्ष देणे, त्यांचे कौतुक करणे, हे अधिक सुशिक्षितपणाचे, उदारमतवादी पणाचे लक्षण आहे. उलट स्वदेश, स्वभाषा, स्वधर्म यांचा अभिमान मात्र संकुचित वृत्तीचे लक्षण मानले जाते.
झक्की, वाईट आहे पण खरं आहे.
नताशा, एकदम पटले
नताशा, एकदम पटले
नताशा, एकदम बरोबर.
नताशा, एकदम बरोबर.
Pages