अनाकलनीय मराठी - १

Submitted by यःकश्चित on 8 July, 2013 - 03:27

अनाकलनीय मराठी - १
====================================================

मराठी !!

महाराष्ट्राच्या नसानसातून धैर्याने आणि शौर्याने उसळणाऱ्या रक्ताचे आमरण विशेषण म्हणजे मराठी.

"गोल" पृथ्वीच्या कुठल्याही "कोपऱ्यात" अभिमानाने सांगायची गोष्ट म्हणजे मराठी.

मराठी भाषा आहेच तशी. सर्वात समृद्ध, संपन्न भाषा. "अमृतातेही पैजा जिंके" असं म्हणतात ते काही उगाच नाही. आता या मराठीचा वापर करून काहीजण निवडणुकाही जिंकतात ही गोष्ट निराळी. सोडा, तो आपला विषय नाही. तसा मी लहानपणापासूनच राजकारणापासून चार हात दूर. मी बाल असताना म्हणे, मला नुसतं खुर्चीवर बसवलं तरी मी भोंगा सुरु करायचो. असो ! समृद्ध आणि सर्वगुणसंपन्न अश्या या मातृभाषेबद्दल प्रचंड आदर असला तरी माझ्या निरागस मनाला पडलेल्या काही बाळबोध प्रश्नांना अजुनी उत्तरे मिळाली नाहीयेत.

उदा. मतदान करण्याचा अधिकार अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर मिळतो, हे मला कळून चुकले.

आता या वाक्यातील " कळून चुकणे " हा वाक्प्रचार मला जरासा खटकतो. जर मला कळलंय तर मग मी चुकतो कसा ? आणि जर मी चुकलोय तर मग मला कळलंय असं कसं म्हणता येईल ? बाकी मतदान करताना लोक " कळून " सुद्धा पुन्हापुन्हा " चुकतात ", ही गोष्ट मला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दर पाच वर्षांनी कळत आलेली आहे.

मराठी वांड़मयात असे द्विशाब्दिक वाक्प्रचार बरेच आहेत. त्यातल्या दोन शब्दांना दोन वेगळे अर्थ असतात. पण त्यातला नेमका कुठल्या शब्दाचा अर्थ वाक्यात लावायचा हे न कळल्याने मी सहसा वाक्यात असे वाक्प्रचार वापरतच नाही. जसे की, अन्न टाकून देणे म्हणजे अन्न टाकायचे का द्यायचे ? किंवा अन्न खाऊन टाकणे म्हणजे अन्न खायचे की टाकायचे ? कमाल आहे !!

ह्या द्विशाब्दिक प्रमाणे एक शाब्दिक वाक्प्रचार देखील फार गंमतशीर आहेत. वर्तमानपत्रात बातमी असते , चोरट्याने रस्त्यावरील बाईचे मंगळसूत्र लांबविले.(!) किंवा असे म्हणतात की देवासमोर नारळ वाढविला(!). छे छे वाढविला काय ..लांबविला काय ! यात आपण न अडकलेलच बरं.

ह्या मराठीबद्दल आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे मराठीला शब्दांचा तुटवडा नाही. अगणित शब्दसंग्रह असलेल्या या मराठीत मराठी भाषिक रोज नवीन नवीन शब्दांची भर टाकत असतात. तसेच त्यांचा वापर दैनंदिन जीवनातही बऱ्याचदा करतात. हे मराठी भाषिक आपल्या पोराबाळाची नावे काय ठेवतील हे सांगता येत नाही. तसेही मराठी भाषिक नावे ठेवण्यात पटाईत आहेत म्हणा ! एखाद्या मराठी भाषिकाकडे नामकरण करताना त्यांच्यातला मराठी भाषिक जागा होतो आणि मग बहिणभावंडांची नावे ही यमकच असावी या अलिखित नियमाचे ते पालन करू लागतात. आता बहिणभावंडांची नावे यमक कशाला हवीत ? मग यातून गमती सुरु होतात.

आमच्या एका मित्राचच उदाहरण घ्या. त्यांना जुळ्या मुली झाल्या. जुळ्यावरून आठवलं, मराठी भाषिक बोलतानापण इतक्या गावंढळ चुका करतात. वरचेच वाक्य घ्या. ते म्हणतात की, आमच्या मित्राला दोन जुळ्या मुली झाल्या. बाबा रे , दोन झाल्या म्हणूनच जुळ्या म्हणतात ना ! तीन असत्या तर त्यांना तिळे झाले असे म्हणाले नसते का ? "गाईच गोमुत्र" हादेखील त्यातलाच प्रकार.

तर विषय असा होता की आमच्या मित्राला जुळ्या मुली झाल्या तर त्यांनी त्यांची नावे "पूर्वा" आणि "दुर्वा"(!) ठेवली. ( अश्याने भविष्यात मुलांना वनस्पती आणि माणूस यातला फरक समजायचा नाही. )

हे तर काहीच नाही. एका जोडप्याने कमालच केली. त्यांच्या चार वर्षाच्या "दर्पण"ला भाऊ झाला तर त्याच नाव त्या जोडप्यांनी "दर्पण"ला यमक म्हणून "तर्पण" असं ठेवलं. बहुधा त्यांना तर्पणचा अर्थ माहित नसावा. आता तिसरा मुलगा झाल्यावर त्याच नाव "तर्पण"ला यमक म्हणून "सरपण" नाही ठेवलं म्हणजे मिळवलं.

मराठी भाषेत म्हणींचाही काही ( कमी ( रेफरन्स : गाईच गोमुत्र ) ) तुटवडा नाही. पण ह्या म्हणी आणि त्यातील तर्कविसंगती मला बर्याचदा बुचकळ्यात पाडते.

" अति शहाणा त्याचा बैल रिकामा ".

यातील " अति शहाणा" आणि " बैल" यांचा काय संबंध आहे हे मला आजतागायत कळलेले नाही. अतिशहाणे लोक बैल पाळतात का ? का बैल पाळणारे लोक अतिशहाणे असतात ? मुळातच अतिशहाणे लोक बैल पाळण्यापेक्षा अति नफा मिळवून देणारा व्यवसाय करतील ना ! किंबहुना माझ्यामते बैलच अति शहाणा असल्याने तो या अतिशहाण्यांकडे न जाता एखाद्या सुस्वरूप व सुलक्षणी गाईला घेऊन तिच्याच बापानी हुंड्यात दिलेल्या एखाद्या हिरव्यागार कुरणात संसार थाटेल.

काही म्हणी मात्र मला अमराठी प्रांतातून आल्यासारख्या वाटतात. " अंगापेक्षा बोंगा मोठा " ही म्हण दक्षिणात्य "कथकली" या नृत्यप्रकारातल्या पोशाखावरून आली असावी. "नाकापेक्षा मोती जड" हा साक्षात्कार आफ्रिका/इजिप्त किंवा कुठल्यातरी आदिवाश्यांना नाकपुड्यांच्या मधल्या जागी मोठ्या मोठ्याची नथ घालताना झाला असावा.

असो ! तूर्तास येथे मी लेखणीला स्वल्पविराम देतो. पुन्हा भेटूया मराठीतल्या नवीन गमती घेऊन.

रामराम मित्रांनो...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तूर्तास येथे मी लेखणीला स्वल्पविराम देतो. पुन्हा भेटूया मराठीतल्या नवीन गमती घेऊन. >>>

ते जाउ द्या आधीची कथा पुर्ण करा..

नाही ना अजून Sad

कॉलेज चालू असताना लेक्चर मध्ये लिहिलेला लेख जुनी वही चाळताना सापडला म्हणून पोस्टला Lol

पोटापाण्याची व्यवस्था या "मंथेंड" परेंत होईल...२-३ ठिकाणी अप्लाय केलाय..

विचारपूस केल्याबद्दल धन्यवाद भानुप्रियाजी Happy

हे तर काहीच नाही. एका जोडप्याने कमालच केली. त्यांच्या चार वर्षाच्या "दर्पण"ला भाऊ झाला तर त्याच नाव त्या जोडप्यांनी "दर्पण"ला यमक म्हणून "तर्पण" असं ठेवलं. बहुधा त्यांना तर्पणचा अर्थ माहित नसावा. आता तिसरा मुलगा झाल्यावर त्याच नाव "तर्पण"ला यमक म्हणून "सरपण" नाही ठेवलं म्हणजे मिळवलं. >> Proud

छान आहे लेख ...
"कळून चुकणे" मलाही खटकतो, असं तर नाहीना की कळलय हीच चूक झाली. Happy

अजून एक हल्लीच्या मराठीत खटकणारं म्हणजे "ल्या" जसकी बोलल्या जातं, केल्या गेलं .....

आणि जाहिरातींमधलं मराठी तर दुर्लक्षीलेलच चांगलं

अजून एक हल्लीच्या मराठीत खटकणारं म्हणजे "ल्या" जसकी बोलल्या जातं, केल्या गेलं .....<<<

+१००००००००००००००००००००००००००००

मला हे लईच दिवसांपासून कोणालातरी विचारायचे होते. हे हल्लीच का सुरू झालेले आहे, तेही समजत नाही!

हे हल्लीच का सुरू झालेले आहे, तेही समजत नाही!>>>

काही माहित नाही पण जुन्या लिखाणात असं अढळत नाही आणि बरेचदा एखादं लेखन चांगलं असतं पण त्यात हा "ल्या" मस्त जेवणात खडा लागावा तसा वाटतो.

जो एस , आबासाहेब : धन्यवाद...

हे "ल्या" अजून माझ्या वाचनात आले नाही....

बहुतेक ते वऱ्हाडी मराठीतून आले असावे....

<<<<बाकी मतदान करताना लोक " कळून " सुद्धा पुन्हापुन्हा " चुकतात ", ही गोष्ट मला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दर पाच वर्षांनी कळत आलेली आहे. >>>>

अगदी खरे.

Happy
छान!
अजुनही एक दोन गोष्टीत माझा मित्र नेहमी माझी चुक काढतो.

"मला आवडलं म्हणून मी ते सगळं सरबत पिऊन टाकलं" त्याचं म्हणणं ते शब्दशः टाकायला बराच वेळ आहे मग आत्तापासुनच का सांगतेयेस? Wink
असो!

अजून एक हल्लीच्या मराठीत खटकणारं म्हणजे "ल्या" जसकी बोलल्या जातं, केल्या गेलं .....<<<
मी नाही ऐकलय अजुन तरी हे असलं Uhoh

मला खटकणारं हल्लीच वाक्य म्हणजे "आपण हे करुया नकोत"

रिया : तुझा मित्र >> Lol

झकासराव : पुढच्या भागात हा वाक्प्रचार टाकण्याचा प्रयत्न करेन... Happy

भानुप्रिया : तुमच्या वयाचा अंदाज नसल्याने जी लावलं...नुसतं भानुप्रिया म्हणालं की एकेरी वाटतं..म्हणून हे 'जी' Happy

"दर्पण"ला यमक म्हणून "तर्पण" असं ठेवलं. >>>>> Wink तसेही अशी नावे ठेऊ नयेत, हाक मारताना द किंवा त चा उच्चार स्पष्ट नसल्यास कोणी `ओ' द्यायचा या बाबतीत ते बिचारे दर्पण-तर्पण कन्फ्यूज होतील..

अति शहाणा त्याचा बैल रिकामा >>>>>> यामागे कदाचित एखादी दंतकथा बोधकथा की काय म्हणतात ना ते असावे.. ज्यात कोणीतरी अतिशहाणपणा करून आपल्या बैलाकडून काम काढून न घेता किंवा त्याला दावणीला बांधून न ठेवता, त्याला रिकामाच ठेवला.

असो, छान लेख.. येऊद्या Happy

यःकश्चित...

कळून चुकले वगैरे हे शब्दप्रयोग त्या त्या प्रांताप्रमाणे योग्य आहेत असं मला वाटतं.
उदा. ज्या प्रांतांवर हिंदी भाषेचा पगडा असतो तिथे 'देउन दिल' (दे दिया चं सरळ सरळ भाषांतर) केलं जातं. ही एक प्रकारची नजाकत आहे भाषेची...

खाऊन टाकणे/पिऊन टाकणे यातल्या टाकणे या शब्दाचा अर्थ सरळ सरळ वेगळा असला तरिही अशा काही क्रियांबाबत वापरला असता त्याचा अर्थ एकदा करून मोकळे झालो असा होतो. अर्थात असं कुठेही लिहिलेलं नाही पण ते पुर्वापार चालत आलेलं आहे.

आणि यमक जुळवण्याच्या पॅराला अनुमोदन Lol हसले खूप.

बाकी अति शहाणा त्याचा बैल रिकामा... या म्हणीचा अर्थ असा आहे की...
काही ग्रामिण भागात स्वतःचा बैल नसला तर इतरांचे बैल भाड्याने वापरतात. तर अशा एखाद्या बैलाचा मालक अति शहाणा असेल. म्हणजेच कोणत्याही कामासाठी मागितला असेल (भाडेतत्वावर) तर प्रचंड चिकित्सा करून बैल तसाच घरी रिकामा बसवून ठेवेल, उदा. नांगरणी साठी बैल देत नाही, गाडी ओढायला देणार नाही इ. नाटके केली तर कामाविना बैल घरी 'रिकामा'च राहणार ना? त्यातून कमाई काहीच होणार नाही.

मला एक वाक्य खटकते

तू येण्या आधी मला फोन करशिल !!!!
तू उद्या सकाळी ऑफिसला लवकर येशिल !!!!!!
(???? नाही !!!!)
अरे काय धमकी बिमकी आहे काय .????? येशिल , करशिल.... नाहीतर बघ !!!! अशी?

बहुतेक हे इंग्रजाळल्याचे लक्षण आहे will you come ...will you do ऐवजी YOU SALL असे म्हणायचे असेल तर तू ये . तू कर असे म्हणायला हवे

नाहीतर येशिल का ,करशिल का ,येशिल ना , करशिल ना असे सरळ आर्जवी बोलायला हवे

येशिल करशिल ही मलातरी धमकी वाटते ....निदान ताकीद वगैरे

टीप : म्हणीच्या बाबतीत इब्लिस याना विचारा त्यांच्या कडे मराथी म्हणीचे ई-पुस्तक आहे ते लिंक देतील

आई समर्पण बाबा अर्पण मुले दर्पण तर्पण ...वा काय घरपण असेल नै घराला

बाय दे वे आडनावासाठी एक योग्य शब्द सुचला की मस्त कवाफी होईल अगदी गझल ऐकल्यासारखे वाटेल

वैवकु मला ही काही गोष्टी खटकतात
उदा. मी करिन च्या ऐवजी मी करेल, खाईल, जाईल.
आणि एखादी गोष्ट मिळाली असं आपण म्हणतो त्याऐवजी काही लोक भेटली म्हणतात Uhoh

परवा बस मधली मुलगी म्हणाली इथे मला डे शिफ्ट भेटली म्हणून मी अजून इथे आहे, नाहीतर नसते Uhoh

डे शिफ्ट भेटली?

शिवाय विचारलं... या शब्दातला चा तो च नाही. म्हणजे विचरलं असं म्हणतात.. किंवा विचरून सांगतो.. Uhoh

मराठवाड्यात लोक चालत ऐवजी चलत आलो मी असे म्हणतात
सोलापुर अक्कलकोटला पेन ह्या शब्दाला ती पेन म्हणणारे लोक आहेत... ते पेन नव्हे ती पेन !!
पँट्स पेन्स याला पँटी , पेनी म्हणतात

हे 'कथा/कादंबरी'मध्ये का आहे?
कळून चुकणे, जेऊन घेणे, देऊन टाकणे, चालू लागणे याबद्दल विनोदाने लिहिले आहे की खरेच प्रश्न पडला आहे?

आलबेल हा शब्द इन्ग्लिश aLL weLL वरून आलाय म्हणे

आमचे इन्ग्लिशचे शिक्षक होते एक ते म्हणाले नीट(नेटके ) हा शब्द ही इन्ग्लिशच आहे=neat !!! आणि तो ज्ञानेश्वरानेही ज्ञानेश्वरीत वापरला म्हणे म्हणजे ज्ञानेश्वराना इन्ग्लिश यायची म्हणे ...आता बोला !!!!!! Uhoh

नामदेव्राय म्हणाले ज्ञानोबाने "५६ भषांचा केलासे गौरव !!!" लोकाना ८-९ दिसल्यात
म्हणजे ज्ञानदेवाने मराठी समृद्ध करायला किती मदत केली असेल बघा आणि अभ्यासकाना अजून ७-८ भाषांचेच हब्द ओळखता आलेत ज्ञानेश्वरीत

आजच्यापिढीची मराठी त्याचाच पुढचा भाग समजावा तेही मराठीला वेगळ्या अर्थाने का होईना समृद्ध करताय्त Wink

अरे हे पहा ..... करत आहेत ला करताय्त
केले आहेला केलेय असे म्हणतोच की आपण

अजून एक नकोस करूस जाऊस या साठी नको येवू जाऊ असे शब्द आपण वापरू लागलो आहोत गझलेत तर हे लगेच दिसून येते (अर्थात त्यालाही "स अव्यक्त राखणे " असे म्हणतात असे देवपूरकर स्वता:च्या समर्थनाकरता म्हणाले होते हेही आठवते )

वैवकु : तुमच्याच पोस्ट मध्ये आडनाव आहे

चि. दर्पण अर्पण घरपण Lol

किंवा

चि. सरपण अर्पण घरपण Lol

अवांतर : मी पण सोलापुरचाच आहे पण मी ते पेन असंच म्हणतो Happy

सोलापुरात ....वा !!
१८ पगड जाती म्हणजे काय ते पाहावे तर सोलापुरात खरेतर हा १८ पगड शब्दप्र्योग ज्याने काढला त्याने आधी सोलापुरात जायला हवे होते मग १७६० पगड जाती असा शब्दप्रयोग रूढ झला असता
तेलगु मरा ठी भाशिकांचे उच्छार तर बाप रे बाप हसावे की रडावे कळत नाही कधीकधी
त्यामानाने कानडी समाजाचे मराठी चांगले आहे सोलापुरातले

Lol Lol Lol Lol Lol

Pages