अव्यक्त...

Submitted by मुग्धमानसी on 21 March, 2013 - 02:38

रुमचा दरवाज धाडकन् उघडून स्नेहा आत शिरली अन् रुममधली भयाण शांतता तिच्यातल्या मुर्तिमंत कल्लोळाला भेटून क्षणभर भांबावून गेली! उघड्या दारात तीही क्षणभर थबकलीच. अशी शांतता तशी तिला काही नवीन नव्हती. पण तरिही ती थबकायचीच! आणि तोही. बिछान्यावर पडल्यापडल्याच सागरनेही किंचित दचकून तिच्याकडे पाहिले. पण क्षणभरातच सगळं स्थिरावलं. रूमचं दार लावून ती आत शिरली आणि पर्स तिथल्या टेबलवर फेकून बाथरूममध्ये गेली. सागरची नजर पुन्हा भिंतीवरल्या टिव्हीत गुंतली. कुणीतरी टकल्या आकड्यांच्या भाषेत बोलत होता... स्टॉक मार्केट, शेरर्स वगैरे वगैरे.... भयाण.... खरंच भयाण!

स्नेहा बाथरूममधून बाहेर आली तरी सागर त्या टिव्हीतल्या आकडेमोडितच गुंतला होता. तिनं घाईघाईतच खोलीभर नजर फ़िरवल्यासारखं केलं. भिंती... चादरी... टेबल... उशा... औषधं.... सलाईन.... टिव्हीतला माणूस... त्याचं बोलणं... पलंगावर पसरलेला सागर... सगळं सगळं अपेक्षेप्रमाणेच... स्वच्छ.... एकही सुरकुती न उमटलेलं... रंगहीन!

पर्समधला टॉवेल काढून तिनं चेहरा स्वच्छ पुसला. टेबलावरची औषधं, फळं वगैरे सगळं उगाच आवरल्यासारखं केलं. इथं आलं की काय करायचं हा नेहमीचा प्रश्न! पण आज ती उत्तर घेऊनच आली होती. पर्समधून वसंत पोतदारांचं ’योद्धा संन्यासी’ काढलं आणि सागरशेजारच्या कॉटवर ती मांडी ठोकून वाचायला बसली.

इतका वेळ सागर तिला फक्त निरखत होता. खोलितल्या इतर वस्तूंप्रमाणेच तिची नजर आपल्यावरूनही फिरून गेली हे त्याला जाणवलं होतं. एरवी हे जाणवलं नसतंच... आज का जाणवलं? आणि बोचलं सुद्धा? माझ्यापेक्षा जास्तवेळ हिची नजर त्या टिव्हीतल्या टकल्यावर टिकली होती. च्यायला... रागाने त्याने टिव्ही बंद करून टाकला. खोलीतल्या शांततेत अजूनच भर पडली. एवढी की वाचनात रमलेल्या तिनंही मान वर काढून टिव्हीकडे आणि नंतर त्याच्याकडे पाहिलंच.

"काय झालं? टिव्ही का बंद केला?"
"कंटाळा आला. तुला बघायचाय का?"
"छे. मला कधी टिव्ही बघताना पाहिलंयस का तू? जरा जागतेपण राहतं खोलीत म्हणून बरं वाटतं इतकंच!"
"मी आहे ना जिवंत... जागा इथे! जागतेपणासाठी तो टकल्या कशाला हवाय?"
"काय? बरा आहेस ना? काय बरळतोयस?"
"हं.... ’बरा आहेस ना’ असं साधंच विचारायचं असतं खरंतर गेले दोन दिवस हॉस्पिटलात पडलेल्या माणसाला."
"तु बराच आहेस. तुझे रिपोर्टस् दाखवून आलेय आत्ता डॉक्टरांना. त्यांच्याशी प्रत्यक्ष बोललेय. ’मी कसा आहे?’ हे खरंतर तुच विचारायला हवं होतंस मला."
"तरिही... आत्ता, याक्षणी मला काही त्रास होत असेल तर?"
"तर? तर आत्तापर्यंत हॉस्पिटल डोक्यावर घेतलं असतंस तू... मला माहित नाही का?"
"तुला चेष्टाच वाटते ना माझं आजारपण म्हणजे... याहीवेळी विश्वास नव्हताच तुला कि मला खरंच दुखतंय. मी नाटकं करतोय असं वाटत होतं. हो ना?"
"अगदी तसंच काही नाही... दुखत असणारच तुला हे माहित होतं... पण जेवढया मोठयानं तु ओरडत होतास... त्याचं आणि दुखण्याच्या प्रमाणाचं नातं लक्षात येत नव्हतं!" ती खुद्कन् हसली.

हसल्यावर हिच्या डाव्या गालावर हलकिशी खळी पडते... आज बर्‍याच दिवसांनी ही खळी दिसली! की हिच आज बर्‍याच दिवसांनी हसली?

"बघ... आणि मला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करायची पाळी आली ना?"
"हं... हौस भागली ना?"
"हौस????"
तो रागाने लालबुंद झाला आणि ती खळाळून हसली.

ही हसताना खरंच छान दिसते. चक्क हिला सांगावंसं वाटतंय! सांगावं का? तेही नाटकच वाटेल म्हणा हिला...

तोवर तीनं पुन्हा पुस्तकात डोकं घातलं होतं. त्याला इरिटेट झालं.

"स्नेहा..."
"हं..."
"समीर घरी गेला का?"
"हो. मला खालीच भेटला. त्याला तसंच घरी पाठवलं. दुपारी तुझ्यासाठी डबा घेऊन येईल."
"आणि.... शुभम काय करत होता? कुठे आहे आत्ता?"
"त्याला आईकडे ठेऊन आलेय आज. दुपारी समीर इथं आला की थोडावेळ ऑफिसला जायचंय मला."
"बरं. पण घरी आई-बाबा आहेत ना? तुझ्या आईला का..."
"....तिला त्रास काहिही नाहिये. तुला आहे का काही त्रास? तसं सांग."
"चिडतीयेस का उगाच?"
एक लांब श्वास घेऊन स्नेहा म्हणाली, "हे बघ. बाबांना मी नसताना कदाचित इथे येऊन थांबावं लागेल. समीरला रिपोर्ट्स आणायला जायचंय. आणि तुझ्या... म्हणजे आईंना एकटीला नाही जमणार शुभमकडे बघणं... असं मला वाटलं... म्हणून त्याला आजच्यादिवस आईकडे ठेवलं. आईंना विचारलं होतं. त्या आनंदानं हो म्हणाल्या. ठिक आहे आता?"
"ठिक आहे... पण शांतपणे सांगितलंस तरी कळतं गं मला. फार लवकर चिडायला लागलीयेस हल्ली."
"हं... एवढं तरी निरिक्षण केलंयस म्हणायचं माझं. आनंद आहे."
"म्हणजे?"
"काही नाही. आराम कर."
"......."
.
.
.
"स्नेहा...."
"काय?"
"मी टिव्ही बंद केलाय ना..."
"मग?"
"तुही पुस्तक बंद कर ना..."
"आणि काय करुयात?"
"गप्पा मारुयात. बघ ना... किती दिवसांनी आपण दोघेच असे निवांत आहोत इथे... जरा माझ्याशी बोल ना!"

तिनं पुस्तकातून नजर वर काढून त्याच्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत भयंकर आश्चर्य दिसलं त्याला आणि क्षणभर शरमल्यासारखं झालं. तिनं पुस्तक मात्र मिटलं नव्हतंच!

"आपण दोघं बर्याच दिवसांनी इथं निवांत एकत्र आहोत हे तुझ्या लक्षात आलंय? तुझ्या लक्षात आलंय? तुझ्या लक्षात आलंय?"
"स्नेहा... आज खोचक नको ना बोलुयात एकमेकांशी.... ’हमखास भांडण’ या यादिअंतर्गत असलेले विषय शक्यतो टाळून बोलुयात? प्लीज?"
"हं... तुला माझ्याशी बोलायचंय हेच नविन आहे माझ्यासाठी. जरा सावरू देत मला. मग रिअॅक्ट होते."
"रिअॅक्ट असं विचार करुन व्हायचं असतं का? काल रात्रभर विचार केला मी..."
"असं एका पाठोपाठ एक धक्के देऊ नकोस रे.... काल रात्रभर तू जागा होतास? आणि विचार करत होतास? तोही माझा?"
"परत खोचक बोलतीयेस तू. असो. हो... मी रात्री बराच वेळ जागा होतो. हॉस्पिटलची ही भयंकर रूम... सलाईनच्या नळ्या... औषधांचे वास... हे एवढं भयंकर आहे ना की माझ्यासारख्या निद्रानिष्ठाचीही निष्ठा भंग पावली. त्यातून..."
"त्यातून काय? दुखत वगैरे नव्हतं ना काही?"
तो हसला.... छोटंसंच हासू... त्यांच्यातलं काही क्षणांपुर्वीचं मैलोगणिक अंतर पार करून तिच्यापर्यंत पोचलं... तेंव्हा तीनं गोंधळून नजर वळवली.
"दुखत नव्हतं काहीच... पण काल कुशीत तू नव्हतीस ना...."
तीनं चमकून त्याच्याकडे पाहिलं. आपण लाजत वगैरे नाही आहोत ना... हे तपासण्यात क्षणभर गोंधळ उडाला तिचा. तो आता आपल्याकडे पाहून मिष्किलपणे हसत असेल असे वाटले तिला. पण... पण तो तर अगदी गंभीर होता! ’आपली अमुक अमुक एफ.डी. मॅच्युअर झालीये’ हे सांगताना जे भाव चेहर्‍यावर असतात अगदी तेच भाव इथंही!
"बरं..." - स्नेहा उद्गारली.
"बरं काय?"
"उद्यापर्यंत सोडतील तुला घरी. मग घरी शांत झोप." तीनं पुन्हा नजर पुस्तकात वळवली.

"स्नेहा...."
"हं..."
"एवढं महत्वाचं आहे का गं ते पुस्तक?"
"तू बोल नं.... मी ऐकतीये..."
"मी काल रात्रभर विचार करत होतो..."
"हं...."
"गेली कित्येक वर्षे असा निवांत वेळच नव्हता मिळालेला गं मला... म्हणजे कायम अशांतच असतो मी तसा... कधी ऑफीसचं टेन्शन, कधी कुण्या क्लायंटचं... कधी घरातली भांडणं... जवाबदार्‍या... पिल्लूच्या भविष्याची तरतूद... तुझं हल्लीचं तोडून वागणं... काहीना काही यातलं मनात खळबळ माजवत असतंच. पण... पण काल रात्रीची अशांतता... छान होती... वेगळीच होती... हवीहवीशी वाटत होती..."
अखेर तिनं पुस्तकातून डोकं वर काढलंच...
"सागर... तू जरासं साहित्यिक वगैरे बोलतोयस... बरं वाटतंय ना रे? त्यांनी काही वेगळंच औषध वगैरे नाही ना दिलेलं तुला? मी विचारुन येऊ का?"
"मला बोलायचंय तुझ्याशी. तुला इंटरेस्ट आहे की नाही ते सांग."
"नाही. मला काहीही इंटरेस्ट नाही! मुळात आपल्यात इतक्या वर्षांत ’हमखास भांडण’ या यादित येत नसलेला आणि आपल्या दोघांनाही आवडेल असा एकही विषय चर्चेसाठी आता उरलेला आहे असं मला वाटतच नाही. आपल्या आर्थिक अडचणी... भविष्यासाठी तरतूदी... वगैरे विषयांवर बोलण्याची माझी या क्षणी इच्छा नाही. त्यामुळे सोड. तू टिव्ही बघ आणि मला वाचू देत."
"ठिक आहे."
पण टिव्ही काही लागला नाही. ती वाचू लागली... पण अक्षरे काही जुळेनात! त्याची नजर वाचत होती... चक्क तिला! काय बोलायचंय याला? उशीर झाला नाहीये का आता?
.
.
.
"स्नेहा..."
"का..........य़?"
"त्या दिवशी दवाखान्यात गेलो होतो ना आपण?"
"हं?’
"तिथं मी बाहेर एक मासिक सहज चाळत होतो."
"मग?"
"त्यात एक सुंदर चारोळी दिसली गं मला... लागलीच पाठही झाली. सांगू तुला?"
मोठ्ठे टप्पोरे डोळे वर करून तिनं सागरकडे पाहीलं. तो स्वतःशीच बोलत होता...
"ओंजळीत स्वर तुझे... अन् स्वरात श्वास तुझा... क्षितिजाच्या कठड्यावर... कललेला भास तुझा..."
"ग्रेस....."
"हं... त्यांच्यावरच आर्टिकल होतं ते. अजून एक कविता होती... ’मी खरेच दूर निघालो... तू येऊ नको ना मागे..."
"’पाऊस कुठेतरी वाजे... हृदयाचे तुटती धागे... सागर... तू सागरच आहेस ना?" तिच्या हातातले पुस्तक मिटले होते आता तिच्याच नकळत!
"तू ब्लॉगवर लिहितेस ना? तुझ्याही कविता छान असतात गं. आणि आर्टिकल्सही भन्नाट असतात. सगळं नाही वाचलेलं मी... आणि फारसं समजतही नाही त्यातलं. पण छान असतं जे काही असतं ते... ती तुझी कविता नाही का... ’पुन्हा एकदा भेटू...’ असं काहितरी... आपल्यावर लिहिलीयेस ना ती?"
"तू.... तू कधी वाचलंस?"
"काल रात्री... लॅपटॉपवर."
"तुला माझा ब्लॉग कसा कळला?"
"तुझ्या नावाने सर्च केलं..."
"अरे देवा...."
"तुला आवडलं नाही?"
"आवडलं? तू... तू खरंच माझ्या नावाने ब्लॉग सर्च वगैरे केलास?..... का?"

तिचे डोळे मोठ्ठे झाले आहेत. चेहर्याचा गुलाबीसर रंग लालसरपणाकडे झुकायला लागला आहे... कपाळावरची ती बट थरथरते आहे किंचित! ती... ती चक्क सुंदर दिसते आहे!

"स्नेहा... इथं येऊन बस नं... माझ्या शेजारी..."
तीनं पुन्हा एकदा त्याला मोठ्ठाल्या डोळ्यांनी न्याहाळलं. आणि मग ती मंतरल्यासारखी उठून त्याच्याजवळ आली. त्याच्या शेजारी बसली. तिला कळण्याच्या आधीच... तिचा हात त्याच्या हातांत होता.

सात वर्षांच्या संसारानंतर.... एका मुलाचे आई-बाप झाल्यानंतर... कित्येक रात्री याच्यावर उधळल्यानंतर... अजूनही असे का वाटते आहे...? कि हाच तो स्पर्श... ज्याची कमी कायम सलत होती आयुष्यात!

"तुझ्याशी बोलावंसं वाटतंय. तुला वाटत असेल फार उशीर झाला या गोष्टिला म्हणून.... पण मला वाटतं... अजून उशीर होण्याआधी... बोलुयात! तूही बोल. सुरुवात मी करतो. ऐकशील?"
"सागर... एवढ्या गंभीरपणे काय बोलणारेस? मला भीती वाटतीये."
"भीती? माझी?"
"नाही... ज्याची खूप आतुरतेने वाट पाहून शेवटी सोडून दिलं, जे सूख आपलं नाहीच असं प्रयत्नपूर्वक मनाला पटवून दिलं, स्वतःला बदललं... पुन्हा नको रे.... पुन्हा सगळं नीट होईल आपल्यात अशी आशा आता नको दाखवूस मला. तुला कल्पना करता येणार नाही अशा घनघोर निराशेतून बाहेर आले आहे मी अलिकडेच... जो त्रास झाला आहे ते माझं मला माहित!!! आता पुन्हा आपण एकमेकांना संधी देऊ... वगैरे भानगडीच नको आहेत मला... प्लीज..."
"असा संवादच संपवल्याने काय होईल स्नेहा? माझं प्रेम आहे तुझ्यावर हे मान्यच नाही का तुला?"
"प्रेम?" ती हासली. "हा शब्द फार वर्षांनी ऐकला तुझ्या तोंडून. प्रेम असेलच रे तुझं... जसं तुझं शुभम् वर आहे... तुझ्या आईवर आहे... फक्त माझ्या बाबतीत ते आजवर कधी तू मला कळू दिलं नाहीस एवढंच."
"एवढं महत्त्वाचं असतं का गं व्यक्त होणं?"
ती छान हसली... ती छानच हसते!!!
"पुरुष फक्त एक व्यक्त होणं शिकला ना... तर बायकांचे निम्म्याहून जास्त प्रश्न सुटतील!"
"हो? एवढे काय प्रश्न असतात गं बायकांना?"
"प्रश्न पुरुष काय... बाई काय... दोघांनाही सारखेच असतात रे. पण फरक एवढाच असतो की पुरुषाला आपले प्रश्न सोडवण्यात रस असतो. पण बाईला त्या प्रश्नांविषयी बोलण्यात जास्त रस असतो. नुसते मनमोकळे बोलता जरी आले ना... तरी तिला प्रश्न सुटल्यासारखे वाटतात!"
"बापरे!!! फार अभ्यास केलेला दिसतोयस तू..."
तिनं मान खाली घातली. "हं.. केलाय खरा खूप अभ्यास. तुझ्याशी नातं बिनसत जात होतं तेंव्हा वाटायचं आपलं तर काही चुकत नाहिये ना? ते चाचपडून पहाताना घडलेला हा अभ्यास! तेंव्हा वाटायचं तुला समजून घेण्यात मीच कमी पडत असेन तर? माझ्या मुर्खपणाने मी तुलाच गमवून बसले तर?"
"स्नेहा.... फार विचार केलास नै माझा? आणि माझं लक्षही नव्हतं या सगळ्याकडे. आणि लक्ष गेलं तेंव्हा... सगळं बदललं होतं... तू बदलली होतीस..."
"बदलले नसते तर... तर संसार टिकला नसता आपला. खूप विचार केला मी... म्हटलं हे नातं टिकवायला हवं. शुभम् साठी, तुझ्या माझ्या घरच्यांसाठी..."
"आणि माझ्यासाठी? स्नेहा... शुभम् एवढीच मलाही गरज आहे गं तुझी... हे तुला खुप आधी सांगायला हवं होतं. पण व्यक्त होणं... जमलंच नाही कधी..."

तिनं पहिल्यांदाच पाहिलं त्याच्या डोळ्यांत. त्याचे लालसर डोळे भरभरून काहितरी बोलत होते. खरंच... व्यक्त होण्याची एवढी गरज असते?

किती क्षण गेले असेच... किती युगांचे आयुष्य जगून झाले त्या क्षणांत! भूतकाळाने चोरलेल्या अनेक मोरपंखी क्षणांची जणू वर्तमानातल्या एका क्षणाने सव्याज परतफेड केली! हा क्षण.... असाच इथे रेंगाळत रहावा... जन्मभर!!!
_______

"वहिनी.... वहिनी.... व... ही... नी..."
"हं...! काय? काय रे?"
"एवढं काय गढलाय वाचनात? काय वाचताय असं? कधीचा आलोय मी..."
स्नेहाने आजुबाजूला पाहिले. सगळं तसंच... अपेक्षेप्रमाणेच... स्वच्छ.... एकही सुरकुती न उमटलेलं... रंगहीन!
टिव्ही चालू होता. त्यात कुणी टकल्या शेअर्स वगैरेविषयी बोलत होता. आणि सागर... बेडवर शांत निजला होता.
"वैनी..."
"हं... समीर... डबा आणलास?"
"हो. तेच सांगतोय. तुम्हाला ऑफिसला जायचंय ना? उठवू का दादाला? कधी झोपला?"
"मला.. माहित नाही रे. पण उठव. वेळ झालीये जेवायची. भूक लागली असेल."

जेवणं आटोपून सगळं आवरल्यावर स्नेहा जायला निघाली. सागर तिच्या हालचाली निरखत होता.
"समीर... मी निघते. संध्याकाळी रिपॉर्ट्स घेऊन ये आणि मिळाल्यावर मला फोन कर. डोक्टर येऊन गेले तर त्यांना विचार कि उद्या डिसचार्ज मिळेल ना...?"
"मी विचारतो वैनी सगळं..."
"बरं मग मी निघते..."

ती रुमच्या दाराकडे वळली. दारापाशी पोचतानाच हलकेच वळून तिनं सागरकडे पाहिलं.
"सागर... मी निघतेय..."
"बरं. सावकाश जा."
ती पुन्हा वळली. दार उघडतानाच सागरचे शब्द तिच्या कानांवर पडले. झाडाच्या सावलीत उभं असताना एखादं गळालेलं पान भिरभिरत हलकेच अंगावर पडावं तसे....
"स्नेहा... ग्रेसच्या कविता अजिबात समजत नाहीत गं मला."
तीनं क्षणभर चमकून पाहिलं त्याच्याकडे...
श्रावणातल्या कोवळ्या उन्हासारखं मंद सुंदर हास्य सगळीकडे सांडलं होतं. आणि ऋतुच्या पहिल्या पावसाची गंधित हळवी सर... डोळ्यांवाटे! त्या दोघांमध्ये तेंव्हा दुव्यासारखं पसरलं होतं एक रंगीत नात्याचं इंद्रधनुष्य!!!

तीनं रूमचा दरवाजा उघडला. बाहेरचा कल्लोळ आता तिच्यातल्या शांततेला स्पर्षही करू शकणार नव्हता! कधीच....

तिचा मोबाईल वाजला... सागरचा मॅसेज... "तू हसताना छान दिसतेस... सांगायचेच राहून गेले..."

उद्यापासून ते दोघेही देणार होते त्यांच्या नात्याला बहरण्याची अजून एक संधी. व्यक्त होण्याची खरंच... एवढी गरज असते?
___________

- मुग्धमानसी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

मस्त

असं लेखन वाचायला मिळणंही एक भाग्यच म्हणावं लागेल. नेमक्या शब्दात, अगदी कुठेही पाल्हाळ न लावता आणि मुख्य म्हणजे उथळ, भडक किंवा मेलोड्रामॅटिक (बरोबर आहे न शब्द) न होऊ देता, भावना पोचवल्यात.

बाकी बेफिकिर यांनी लिहिलच आहे.

<<किती क्षण गेले असेच... किती युगांचे आयुष्य जगून झाले त्या क्षणांत! भूतकाळाने चोरलेल्या अनेक मोरपंखी क्षणांची जणू वर्तमानातल्या एका क्षणाने सव्याज परतफेड केली! हा क्षण.... असाच इथे रेंगाळत रहावा... जन्मभर!!!
_______

"वहिनी.... वहिनी.... व... ही... नी..."
"हं...! काय? काय रे?"
"एवढं काय गढलाय वाचनात? काय वाचताय असं? कधीचा आलोय मी..."
स्नेहाने आजुबाजूला पाहिले. सगळं तसंच... अपेक्षेप्रमाणेच... स्वच्छ.... एकही सुरकुती न उमटलेलं... रंगहीन!
टिव्ही चालू होता. त्यात कुणी टकल्या शेअर्स वगैरेविषयी बोलत होता. आणि सागर... बेडवर शांत निजला होता>>

मग हे सगळं तिच्या कल्पनेत घडलं का..? पण मग शेवट असा कसा ...

थोडं कन्फ्यूझन झालंय.

बाकी लेखन ++++++++++++1

Pages