माझं लग्न होऊन मी नवी नवरी बर्वे कुंटुंबात आले तेंव्हा, खूप माणसांची वर्दळ होती. सुरवातीला वाटलं लग्नघर आहे म्हणून असेल. पण नंतर बरीच वर्षे ते तसच सुरू होतं. माणसं चर्चा करायला यायची. बाबांच्या हस्ताक्षराचं कौतुक करायची, त्यांचं लिखाण वाचायची. कधी अर्धा अर्धा दिवस बाबांची व आलेल्या पाहुण्यांची चर्चा चालायची. तेंव्हा मला आश्चर्य वाटायचं, काय ही माणसं बडाबडा करीत बसतात. लक्ष देत नसल्याने विषयही डोक्यावरून जायचे. बाबांचं वाचन दांडगं होतं. संदर्भही ते पटापट द्यायचे. आपले मुद्दे हिरहिरीने मांडायचे. मला, आईंना ते वितंडवाद वाटायचे. काय मिळतं हे सगळं करून असं वाटायचं.
आज जेंव्हा एखादा विचार माझ्या डोक्यातून सुटता सुटत नाही, चर्चा करून माझा मुद्दा कुणी खोडून प्रतिवाद करीत नाही तोपर्यंत मनाला चैन पडत नाही. उत्तरं सापडत नाहीशी झाली की बाबांची खूप आठवण येते. मला वाचायला आवडत नसे, बाबा सांगत खूप पुस्तके वाच. आताशा त्यांचं म्हणणं पटतं.
कुटुंब, नवरा बायकोचे नाते, बदलती समाजव्यवस्था ह्या विषयाला धरून असणारी पुस्तके वाचताना गोंधळून जायला होतं. परस्पर विरोधी, तर कधी कालविसंगत. बुध्दीला पटणारी पण मन आणि संस्कार यांच्याविरोधी जाणारी मते वाचली की संभ्रमावस्था निर्माण होते. कुणाचं म्हणणं योग्य कुणाचं अयोग्य. काय स्विकारावं काय त्याज्य मानावं. हे समजेनासं होतं. मुळात व्यक्ती व्यक्तीप्रमाणे वेगळे होत जाणारे विषय हे मतांतरे घडवतात. एखाद्या कौटुंबिक समस्येला एक असं प्रोटोटाइप उत्तर असू शकत नाही. व्यक्ती, कुटुंब ह्याप्रमाणे ते बदलत जातं.
पाळणाघर आणि वृध्दाश्रम हे दोनही निरोगी समाजव्यवस्थेचे लक्षण नाही हा विचार संस्कारक्षम मनाला पटतो पण त्याच बरोबर बुध्दीला त्याची अपरिहार्यताही विचार करायला भाग पाडते.
संजना आणि तिचे यजमान हे दोघे नोकरी करतात. ओल्ड गोवा येथे फ्लॅटमध्ये राहतात. दोघांना एक गोंडस मुलगी आहे. तिघांचं सुखी कुटुंब. मुलीला शाळेत न्यायला आणायला गाडी आहे. शाळेतून आल्याबरोबर इतर मुलांनाही सोबत घेऊन येणारा ड्रायव्हर संजनाच्या मुलीला पाळणाघरात सोडतो. मुलगी आई वडिल यापैकी जो कोणी संध्याकाळी लवकर पोहोचेल त्याच्याबरोबर पाळणाघरातून फ्लॅटवर येते. दोघही दमलेली असतात. मुलीसाठी द्यायला गुणात्मक वेळ आणि शारिरीक क्षमताही नसते. धकाधकी जास्तच झाली तर मानसिक क्षमताही उरत नाही.
पालक शिक्षक मेळाव्यात संजना बराच वेळ बोलायला भेटली. त्यांचं गावाकडे मूळ घर आहे. मोठं एकत्र कुटुंब आहे. संजनाचं जावांशी पटत नाही. एकत्र कुटुंबात देवाणघेवाण दोनही बाजुने झाली पाहिजे, पण तसं होत नाही. नेहमीची भांडणं आणि कटकटी. त्यातून होणारी चिडचिड. हे सगळं टाळण्यासाठी स्वतंत्र राहणं तिला भाग होतं. फ्लॅट कर्ज काढून घेतलाय. संजनाच्या यजमानाच्या पगारातून हफ्ते, टेलिफोन, लाईट, पाणी, अन्न, धान्य हे सगळे खर्च भागत नाहीत म्हणून संजनाने नोकरी धरली आहे.
शाळेतला वेळ सोडला तर शिल्लक राहणारा वेळ मुलीचं काय करायचं हा प्रश्न आ वासून उभा राहिला तेंव्हा "पाळणाघर" हा एकच पर्याय समोर होता. कर्ज फेडण्यासाठी खर्च मर्यादित ठेवायचे, दोघांनी काम करायचं. संजनाचं हे प्रातिनिधिक उदाहरण थोड्याफार फरकाने कित्येक कुटुंबांचं आहे. संसारवेलीवर उमलणारं फूलदेखिल दोघांच्या प्रेमाचं प्रतिक न होता आजकाल आर्थिक नियोजनाने दिलेल्या होकाराचा परिणाम होतय. पती पत्नीमधले नाते तणावपूर्ण होत चालले आहे.
पाळणाघरातून आणल्यावरही मुलीला कुणी संभाळायचं यावरून वाद होत आहेत. मुलीला आई बाबा दोघेही हवीत. लहान मुलांना त्यांना हवी तेंव्हा आई बाबा जवळ हवी असतात. केवळ तडजोड म्हणून चिमुरडी पोरं पाळणाघर स्विकारतात. संध्याकाळी तरी आई बाबा एकत्र आपल्यासोबत असतील म्हणून मुलं हपापलेली असतात. कामावरचे वाढते ताण, वाढत्या अपेक्षा यानी मेटाकुटीला आलेला जीव कधी एकदा अंथरुणावर घालतो असं दोघांना होऊन जातं. मुलीला खेळायला हवं असतं आणि आई वडिलांना विश्रांती हवी असते. पालकत्वाचं ओझं होतं.
ओळखीचे जोशी दांपत्य आहे. एकूलता एक मुलगा. उच्चशिक्षित. नोकरीनिमित्त अमेरिकेत. लग्न झाल्यावर सपत्नीक अमेरिकेत स्थायिक झालेला. इथे ही दोघे एकटीच. श्री. जोशींना मधुमेह व ब्लडप्रेशरचा त्रास तर सौ. जोशींचे संधीवाताने गुढगे दुखतात. त्यांच्याकडे पहायला शुश्रुषा करायला कुणीही नाही म्हणून त्यांनी वृध्दाश्रम जवळ केलाय. निदान तिथे औषधपाणी तरी वेळेवर होते. "असंख्य नवस सायास करून, व्रतवैकल्ये आचरून झालेला एकुलता एक मुलाचा फक्त आवाज ऐकू येतो. हल्ली कानाना ऐकूही कमी येतं" हे सांगताना जोशी दांपत्याच्या पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा साचलेलं प्रचंड दु:ख देवून जातात.
खरी समस्या खूप गंभीर आहे. प्रश्न केवळ आर्थिक समस्येचा नाही, त्याहूनही पुढचा येवू घातलेल्या सामाजिक, कौटुंबिक मुल्यांच्या ऱ्हासाचा आहे. ही सगळी परिस्थिती अस्थिरतेकडे निर्देश करते. आम्हाला आईवडिलही नको आहेत आणि मुलही नकोशी होऊ लागली आहेत. जुनाट, परंपरावादी, जोखडीची म्हणून आश्रमव्यवस्थेचा आम्ही त्याग केला. एकत्र कुटुंबातल्या अनेक दुष्परिणामावर बोट ठेवून त्यापासून आम्ही दूर झालो. परिणामी कुटुंबव्यवस्थेवरचा आमचा विश्वासच उडालाय. यातूनच सहजीवन म्हणजे लग्न न करताच एकत्र राहण्यासारखे प्रयोग होऊ लागले आहेत व यशस्वीही होत आहेत.
लग्न करून त्याच्यातल्या सगळ्या "कॉम्प्लिकेशन" पासून फारकत घेत, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यावर तोडगा म्हणून "लिव्ह इन रिलेशनशिप" म्हणजे लग्नाशिवाय सहजीवनाकडे लोकं वळू लागली आहेत. अशा सहजीवनामध्ये भावनिक गुंतागुंत नसते. पाळायला बंधने नसतात आणि टाळायला जवाबदारीही नसते. जोडीदार एकमेकावर अवलंबून नसतात. हॉस्टेलवर रूम शेअर करून राहणाऱ्या रूम पार्टनर सारखी ही संकल्पना आहे. पटेल तेवढावेळ एकत्र रहा, न पटेल तेंव्हा मार्ग मोकळा. या अशा सहजीवनाचं कायदेशीर स्वरूप अजून माझ्या वाचनात आलं नाही. दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे, यातून निर्माण होणाऱ्या संततीचे भविष्य काय हे देखिल कुठे वाचनात आले नाही.
आपल्याकडे सोळा संस्कारापैकी एक मानलेला गेलेला लग्न हा संस्कार, त्यातल्या गुण दोषांसकट स्विकारायचा की असं लिव्ह इन रिलेशनशिप स्विकारायची हा ज्याचा त्याचा पर्याय आहे. तौलनीक विचार करता, प्रस्थापित लग्न किंवा कुटुंबव्यवस्थेच्या दोषावर तोडगा म्हणून हा सहजीवनाचा मार्ग म्हणजे रोगापेक्षा इलाजच भयंकर असा आहे. नवराबायकोचं एकत्र राहणं म्हणजे दोन शरिरांचं एकत्र वास्तव्य असा अर्थ नाही. त्याला अनेक पदर असतात, अनेक पैलू असतात. भावनांची जिथे ओढ नाही आणि ज्याला संस्कारांची जोड नाही ते कसलं एकत्र राहणं?
पुढच्या पिढीवर संस्कार करणारी मागची पिढी दुरावली आहे. या दोन पिढ्यांच्यातली मधली पिढी हा खरा दोन पिढ्यांना सांधणारा दुवा आहे. नातवंडांचं बोट आजी आजोबांच्या थरथरणाऱ्या हातात देणारे आई वडिल हवे आहेत. पर्याय म्हणून लग्नाशिवाय सहजीवन स्विकारण्याऐवजी पिढ्यांच्यामधला हरवलेला दुवा सांधणं जास्त योग्य नाही का?
सौ. वंदना बर्वे
कंटाळा आला तेच तेच घिसेपिटे
कंटाळा आला तेच तेच घिसेपिटे विषय वाचून...
लग्न करून त्याच्यातल्या
लग्न करून त्याच्यातल्या सगळ्या "कॉम्प्लिकेशन" पासून फारकत घेत, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यावर तोडगा म्हणून "लिव्ह इन रिलेशनशिप" म्हणजे लग्नाशिवाय सहजीवनाकडे लोकं वळू लागली आहेत. अशा सहजीवनामध्ये भावनिक गुंतागुंत नसते. पाळायला बंधने नसतात आणि टाळायला जवाबदारीही नसते. जोडीदार एकमेकावर अवलंबून नसतात. हॉस्टेलवर रूम शेअर करून राहणाऱ्या रूम पार्टनर सारखी ही संकल्पना आहे. >> मला वाटतंय इथे थोडी गल्लत होतेय. जबाबदार्या टाळता याव्यात किंवा कोणत्याही वैवाहिक समस्येवरचा तोडगा म्हणून ही संज्ञा अस्तित्वात आली आहे असं मला वाटत नाही. आणि लग्न न करता राहणार्या जोडप्यांमध्ये जबाबदारी आणि कमिटमेंट जास्ती असते. तुम्हाला वाटतं तितकं फ्री लाईफ हे लोक जगत नाहीत. इतर जोडपी राहतात तशीच राहतात. उलट जास्ती जबाबदारीने आणि आदराने.
असो या विषयावर लिहिण्याजोगे बरेच आहे, पण आता इतकेच.
मुळात आजी आजोबाना नातवंडाच
मुळात आजी आजोबाना नातवंडाच करायचं आहे का?? हल्ली कितीतरी आजी आजोबाच आपली मध्ये मध्ये लुडबुड नको म्हणून वेगळे राहतात. आणि जर आजी किंवा आजोबा एकटे असतील तर तेच स्वताला चांगला जोडीदार बघून सहजीवन हा पर्याय निवडतात.
रच्याकने
पुस्तके वाचायला आवडत नसतील तर चित्रपट बघा - लिसन अमाया नावाचा एक चित्रपट आला आहे.
कंटाळा आला तेच तेच घिसेपिटे
कंटाळा आला तेच तेच घिसेपिटे विषय वाचून... >>> +१११११११११११११११
चांगलं लिहिलयं, तरीपण बदलत्या
चांगलं लिहिलयं, तरीपण बदलत्या काळाबरोबर बदलायला हवं , नेहमीच जुनं ते सोनं म्हणुन नाही चालत.
वावा. समयोचित व सामाजिक
वावा. समयोचित व सामाजिक संदर्भ असलेला लेख. यावर भरपूर चर्चा घडणे अपेक्षित आहे.
मला भारतीय संस्कृतीमधील एक
मला भारतीय संस्कृतीमधील एक व्यवस्था फार आवडते. त्यानुसार वयाच्या पन्नासाव्या वर्षी घरदार सोडून वानप्रस्थाश्रम घ्यायचा आहे, आणि पंचाहत्ताराव्या वर्षी संन्यासाश्रम. भारतीय संस्कृतीचे गोडवे गाणारे लोक वृद्धाश्रम हा वानप्रस्थाश्रम म्हणून का स्विकारत नाहीत?
नवराबायकोचं एकत्र राहणं म्हणजे दोन शरिरांचं एकत्र वास्तव्य असा अर्थ नाही. त्याला अनेक पदर असतात, अनेक पैलू असतात. भावनांची जिथे ओढ नाही आणि ज्याला संस्कारांची जोड नाही ते कसलं एकत्र राहणं?>> याला माझं जोरदार ऑब्जेक्शन. कशावरून लिव्ह इनमधे भावनांची जोड नसते? हे अनुमान नक्की कशावरून काढलंय?
पुन्हा एकदा, संजना, जोशी दांपत्य यासारख्या आजूबाजूच्या उदाहरणांवरून संपूर्ण समाजाचे चित्रीकरण करण्याचा हव्यास सोडा. सतत सतत सतत सतत लग्नसंस्थेचे फायदे हाच तुमच्या लेखांचा विषय का असतो कुणास ठाऊक???
कंटाळा आला या उपदेशपर
कंटाळा आला या उपदेशपर लेखांचा..
कंटाळा आला या उपदेशपर
कंटाळा आला या उपदेशपर लेखांचा..>>>> +१११
तेच ते आणि तेच ते..... ग्रो अप.... मी आज चाळीस वर्षांची आहे... माझी आई आणि सासु दोघीही नोकरी करायच्या त्या मुळे मी आणि नवरा दोघेही असेच पाळणाघरां मधे रहायचो.
याचाच अर्थ ही व्यवस्था नवी किंवा हल्लीची नाही..... वृद्धाश्रम, पोळीभाजी केंद्र, पाळणा घरं, रीटायर्मेंट होम्स ही काळाची गरज आहे. त्यात काही मुल्य वगैरे ढासळत नाहीत... पूर्वी आपण घासलेट्चे दिवे लावायचो आज विजेचे लावतो. पुर्वी पाटावरवंटा वापरायचो, आज मिक्सर वापरतो...पुर्वी बैल गाडीतुन फिरायचो, आज विमानाने जातो... टाइम टाइम की बात है...
आज नवर्याचे मामा मामी खुप आजारी असतानाही दोन्ही मुलगे अमेरिकेत असल्याने एकटेच रहातात... मी असते तर वृद्धाश्रमात गेले असते. तिकडे नीदान छान कंपनी तरी मिळते.... आज मला एकच मुलगी आहे. ती पुढे कुठे राहिल काय माहिती? आम्ही दोन तीन मित्र कुटुंबांनी आजच एका शांत स्थळी एका इमारती मध्ये घरं घेवुन ठेवली आहेत... सगळ्यांना आजकाल एकेकटी मुलं असतात... आमच्या पीढीला हा प्रश्न भेडसावणार आहेच... मग आजच व्यवस्था करायला नको का? कोणी कोणाला सांभाळणे ही संकलपना मोडीत निघत आहे
रच्याकने.....
मी ही एकत्र कुटूंबातच अगदी आनंदात रहाते हो अगदी आम्ही तिघं, सासु, सासरे व शेजारी आई.... आणि माहेरी पण दोन काका, काकु, भावंडं, आजी आजोबा असं १५ माणसांचं एकत्रच कुटूंबं होतं...... त्या मुळे सगळ्या कुटूंब व्यवस्थेचे फायदे तोटे माहित आहेत....
वावा. समयोचित व सामाजिक
वावा. समयोचित व सामाजिक संदर्भ असलेला लेख. यावर भरपूर चर्चा घडणे अपेक्षित आहे.
>>
फिर भी मै देखता हूं ऐसी सारी पिक्चरे क्यूं..
(क्यू मे दर्द है)
~ इन्द्रवदन साराभाई
मला वाचायला आवडत नसे, बाबा
मला वाचायला आवडत नसे, बाबा सांगत खूप पुस्तके वाच.>>> बाबांना अनुमोदन, आजच सुरुवात करा, मायबोलीवरच http://www.maayboli.com/node/2685 हा धागा आहे, बर्याच पुस्तकांची नावे कळतील.
(No subject)
हो, नानबा. लेखिकेने किती
हो, नानबा.
लेखिकेने किती उत्तम मुद्दे मांडले आहेत ते बघा :
>>
पाळणाघर आणि वृध्दाश्रम हे दोनही निरोगी समाजव्यवस्थेचे लक्षण नाही हा विचार संस्कारक्षम मनाला पटतो पण त्याच बरोबर बुध्दीला त्याची अपरिहार्यताही विचार करायला भाग पाडते.
<<
घडणारे बदल हे अपरिहार्य असले तरी संस्कारक्षम मनांना ते खटकतात, असे त्यांना म्हणायचे आहे. दमून भागून घरी येणार्या संजनाच्या घरात पाळणाघर ही अपरिहार्यता आहे. व त्यातून संध्याकाळी मुलीला 'क्वालिटी टाईम' देता येत नाही. आता हे संजनाच्या व लेखिकेच्या मनाला खटकते. कारण त्या संस्कारक्षम आहेत.
आता त्या मुलीवर 'संस्कार' करण्यासाठी या दोघांजवळ वेळच नाहीये मग ती मोठी झाल्यावर तिला खटकणार नाही.
तर असे हे बदलत्या समाजाचे चित्र लेखिका हलक्याफुलक्या उदाहरणांसह ओघवत्या भाषेत लिहीत आहेत.
पुढील चर्चेच्या प्रतिक्षेत .. इब्लिस
वंदनाताई, छान लिहिले आहेत. पण
वंदनाताई, छान लिहिले आहेत. पण मुद्दे मांडतांना अनेक मुद्द्यांची सरमिसळ झाल्याने तुम्हाला काय म्हणायचेय ते पोहचत नाहीये.
सहसा तुमच्या लेखांचे विषय सध्याच्या जमान्याच्या मानाने आऊट डेटेड आहेत आणि शिवाय अनेक मुद्दे एकाच लेखात मांडल्याने साहजिकच प्रतिकुल प्रतिसाद येतात. तुम्ही ललित म्हणुन न लिहिता चर्चेचा धागा उघडलात तर कदाचित दोन्ही बाजुची मते तुम्हाला ऐकायला मिळतील.
आता लेखा बद्दल तुम्ही म्हणताय तसे आर्थिक गणित जमले तरच मूल असे आमचे अनेक मित्र आहेत. त्यामुळे लेखाचा थोडा भाग पटला. शिवाय घरी आल्यावर आमचे एक मित्र - मैत्रिण (नवरा अन बायको) एकमेकांच्या अंगावर बाळांची जबाबदारी ढकलतांनाही पाहिलेय आणि खरेच त्यादिवशी मला खूप वाईट वाटले होते - फक्त त्या बाळाबद्दल नव्हे तर या बदलत्या काळाबद्दल पण, त्याच्या थकलेल्या आई बाबा बद्दल पण्...असो.
काही मुद्दे पटताय पण मग त्याचा संबंध पाळणाघरे, वृद्धाश्रम याच्याशी जोडणे पटले नाही. त्याहुनही अधेक म्हणजे या सगळ्याच गोष्टींचा संबंध लिव इनशी जोडणे हे तर नीट कळलेच नाही. तुम्ही पुन्हा एकदा चर्चेच्या स्वरुपात तुमचे मुद्दे (एकावेळी एक) मांडुन पाहा - एक वैयक्तिक सल्ला. न पटल्यास सोडुन द्यावा.
>>आणि लग्न न करता राहणार्या
>>आणि लग्न न करता राहणार्या जोडप्यांमध्ये जबाबदारी आणि कमिटमेंट जास्ती असते. तुम्हाला वाटतं तितकं फ्री लाईफ हे लोक जगत नाहीत. इतर जोडपी राहतात तशीच राहतात. उलट जास्ती जबाबदारीने आणि आदराने. <<
प्रचंड मोठा घोटाळा. मग लग्न करायला काय हरकत आहे? उगाच आपली थेरं.
जगी सर्व सुखी असा कोण आहे,
जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधोनी पाहे|
कुठलीच व्यवस्था ही सर्व काळ आदर्श वा परिपूर्ण असू शकत नाही.
वंदनाताई: तुमचा हेतू स्तुत्य
वंदनाताई: तुमचा हेतू स्तुत्य आहे. पण विषयांची सरमिसळ आणि गल्लत होते आहे. न्युक्लिअर संसार ते एकटे पडलेले पालक ते लिव्ह इन- तीन पॅरात तीन विषय संपले
जिथे आजी-आजोबा आणि नातवंडं हा पूल बांधलेला आहे, लिव्ह इन मधली सुखी जोडपी आहेत, मुलांवर हेक्टिक शेड्यूलमधूनही प्रेम करणारे कुटुंब आहे- असा एखादा पॉझिटिव्ह लेख लिहा ना!
श्र, इथे तुलनाच होऊ शकत नाही,
श्र, इथे तुलनाच होऊ शकत नाही, किमान एकातरी लग्नाचा अनुभव मस्ट आहे.
त्यापेक्षा ट्विंकल-अक्षय-रवीना आणि सैफ-करीना-शाहिद या त्रिकोणबंधांचा तुलनात्मक शोध (शिल्पा-विद्या टँजंट्सच्या पुरवणी अभ्यासासह) जास्त गरजेचा आहे
पौर्णिमा शी सहमत. पण यांच्या
पौर्णिमा शी सहमत.
पण यांच्या लेखातील मते त्यांची स्वतःची आहेत की सर्व्हेतून आलेली ते मला नीट कळालेले नाही.
नेहमीप्रमाणेच काही ठराविकच
नेहमीप्रमाणेच काही ठराविकच उदाहरणं घेऊन, हवी तशी गृहितकं मांडून लिहिलेला लेख आहे हा.
वंदनाजी , तुमचे विचार तुमच्या
वंदनाजी ,
तुमचे विचार तुमच्या ठिकाणी बरोबर असतील (आहेतही) , पण होतय काय की जाणते/अजाणतेपणी तुम्ही इतराना आरोपीच्या पिंजर्यात उभे करताय .
पाळणाघर आणि वृध्दाश्रम या दोन्ही गोष्टी आयडीयल नाहीत या गोष्टीबद्द्ल फारस दुमत नसेल . पण सध्याची आपली समाजव्यवस्था पाहता याला पर्याय आहे का ? जे लोक मुलाना पाळणाघरात ठेवतात त्याना मुलाबद्द्ल माया नसते किंवा जे लोक आपल्या आईवडिलाना वृध्दाश्रमात ठेवतात त्याना त्यांच्याबद्दल आदर नाही असे नाही ना ? जे पालक आपल्या मुलाला पाळणाघरात ठेऊन जातात , ते त्याच्याच भविष्यासाठी ते करत असतात ना (कदाचित तुमच्या मते त्यांची Priority चुकत असेल , पण त्या मागची भावना ही लक्षात घ्यायला पाहिजे ना )
तुम्ही वर जी उदाहरणे दिलीत तसच माझ स्वतःच उदाहरण . माझी आई दूरसंचार (सध्याच BSNL ) मध्ये आहे . जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझ्या वडिलांच्या आईने आणी भावानी तिला नोकरी सोड , आम्हाला काही मुलाला सांभाळायला मदत करता येणार नाही असे सांगितले . माझी आई मात्र आपल्या निर्णयावर ठाम होती . शेवटी मी ३ महिन्याचा असल्यापासून माझ्या आजोळी सांगलीला राहिलो . माझे आई वडील ७ वर्षे रोज माझ्यासाठी सांगली इचलकरंजी अपडाऊन करायचे . त्यावेळी माझ्या आईला "तुझे काळीज दगडाचे आहे , तुला मायाच नाही" हे टोमणे नेहमीचेच .
आज २७ वर्षानंतर मी आणी माझी बहिण इंजिनियर झालोय , आर्थिकद्रुष्ट्या बरेच सक्षम झालोय , तेव्हा तेच सगळे तिचे कौतुक करतायत (माझे सगळे चुलत्/आतेभाऊ मागावर किंवा दुसर्याच्या शेतात मजुरी करतायत), तेव्हा फार आश्चर्य वाटत (आणी अर्थातच माझ्या आईवडिलाबद्दल प्रंचड अभिमानही)
व्यावसायीक पातळीवर पाळणाघर
व्यावसायीक पातळीवर पाळणाघर आणि वृध्दाश्रम एकत्र का करू नयेत?
लहानग्यांना आजी-आजोबांचे प्रेम मिळेल आणि त्यांची पूर्ण जबाबदारी न घेता झेपेल तसे आजी-आजोबा छोट्यांचे लाड करतील.
अगदीच वाह्यात प्रतिसाद आहेत
अगदीच वाह्यात प्रतिसाद आहेत काही.
लेख आवडला नाही. लेखिकेचे विचार पटले नाहीत. तर तसं व्यवस्थित प्रतिसाद लिहुन सांगु शकता. स्वतःची मतं मांडु शकता. असे हास्यास्पद , थट्टा- मस्करीचे प्रतिसाद इतर विषयांवर हिरहिरीने आणि योग्य तर्हेने चर्चा करणार्आ आय्डींचेच आहेत हे पाहुन सखेद आश्चर्य वाटलं. राहावलं नाही म्हणून लिहिलं. ह्यातुन दुसरा कसा मुर्ख आणि चुकीचा आणि आपणच कसे बरोबर आणि शहाणे हेच दाखवलं जातय.
कंटाळा आला तेच तेच घिसेपिटे विषय वाचून...
कंटाळा आला या उपदेशपर लेखांचा..>>>>>>>>
अगदीच पोरकट प्रतिसाद आहेत.
जे लोक मुलाना पाळणाघरात
जे लोक मुलाना पाळणाघरात ठेवतात त्याना मुलाबद्द्ल माया नसते किंवा जे लोक आपल्या आईवडिलाना वृध्दाश्रमात ठेवतात त्याना त्यांच्याबद्दल आदर नाही असे नाही ना ? >>>>>>>>>>> केदार, अस तर लेखिकेने ही लिहिलेलं नाहीये.
वंदना बर्वे, तुमचे स्वत:चे जे
वंदना बर्वे, तुमचे स्वत:चे जे विचार आहेत ते तुम्ही प्रामाणिकपणे आणि ठामपणे मांडत आहात त्याबद्दल अभिनंदन. मात्र याबरोबरच मायबोलीवर या आणि अशा विषयांवरच्या ज्या अनेक चर्चा झाल्या आहेत त्या वाचल्यात तर तुमच्या विचारांनाही नविन खाद्य मिळेल आणि चालना मिळेल.
सस्मित, तुम्ही या लेखिकेचे
सस्मित, तुम्ही या लेखिकेचे आधीचे सगळे लेख एकदा नजरेखालून घालाल का? आणि त्यावर योग्य तर्हेने झालेल्या मुद्देसूद, तपशीलातल्या चर्चापण? मग कदाचित तुम्हाला इथले पोरकट प्रतिसाद का आलेत त्याचा अंदाज येईल.
इथे मी पोरकट प्रतिसादांची बाजू घेत नाहीये पण खरंच अति झालं..... असं बर्याच जणांना वाटलेलं दिसतंय म्हणून असे प्रतिसाद आलेत
अगदीच पोरकट प्रतिसाद आहेत.>>>
अगदीच पोरकट प्रतिसाद आहेत.>>> पोरकट काय याच्यात? तुम्ही लेखावर प्रतिक्रिया द्या. प्रतिसादांवर कशाला?
इथे मी पोरकट प्रतिसादांची
इथे मी पोरकट प्रतिसादांची बाजू घेत नाहीये >>>>>>>>>> प्रतिसाद खरंच पोरकट आहेत हे तुम्हाला पटलं तर.
तुम्ही या लेखिकेचे आधीचे सगळे लेख एकदा नजरेखालून घालाल का?>>>>>>> सगळेच लेख वाचले नसले तरी काही वाचलेत. म्हणुन तर म्हटल ना मी लेख आवडला नाही. लेखिकेचे विचार पटले नाहीत. तर तसं व्यवस्थित प्रतिसाद लिहुन सांगु शकता. टिंगल-टवाळ्या नाही पटल्या. असो. इथे लेखनसीमा.
पाळणाघर आणि वृध्दाश्रम हे
पाळणाघर आणि वृध्दाश्रम हे दोनही निरोगी समाजव्यवस्थेचे लक्षण नाही हा विचार संस्कारक्षम मनाला पटतो पण त्याच बरोबर बुध्दीला त्याची अपरिहार्यताही विचार करायला भाग पाडते.>>>
गुड गोइंग ताई. नेटाने लेख लिहिता, उत्तम. असेच लिहीत जा व प्रतिसाद वाचत जा. कधीतरी या संजना नी जोशींच्या जागी तुम्ही प्रतिसादातील लोकांची मतेही ' पटायला लागलीत ' म्हणून लेखात मांडू लागाल. तुम्हाला जर तुमच्या आजुबाजूला तुमच्याच मतांना पूरक उदाहरणे मिळत असतील तर त्यात तुमचा काय दोष? कदाचित तशीच सर्व उदाहरणे असतील किंवा दूसरी असतात हे माहीत नसल्याने तुमचे लक्ष गेले नसेल. पण इथल्या चर्चेने तुम्हाला दुसर्या उदाहरणांचे अस्तित्व कळू शकेल, ती जवळपास पहाण्याची शोधक नजर मिळू शकेल. त्यासाठी शुभेच्छा.
सहजीवनाचे प्रयोग यशस्वी होऊ लागले आहेत असे तुम्ही म्हटले़य म्हणजे तुमच्या पाहण्यात अशी उदाहरणे आहेत हे नक्की. मग अशांबद्दल माहिती मिळवाल का? त्यांच्यातील प्रेम, जबाबदारी इत्यादिंबद्दल तर्क करण्यापेक्षा खरे काय ते जाणून घेणे जास्त चांगले होईल व त्याने तुमची मते बनायला मदत होईल.
पुस्तके वाचणे, चित्रपट पाहणे हे देखिल उपयोगी ठरेल. परंतु जर माहेरची साडी नी घर एक मंदिर प्रकारातील चित्रपटच पाहत राहिलात तर फायदा होणार नाही. वर कुणीतरी उदाहरणे दिलीत. आपल्या मतांहून वेगळे काहीतरी वाचा व पहा आणि त्यावर विचार करा की खरेच असेही असते का. मग ते आजुबाजूला शोधू शकाल व त्यातील तथ्य समजू शकाल.
पुढील लेख सकारात्मक, अभ्यासपूर्ण व सर्वबाजूंनी विचार केलेला व्हावा यासाठी शुभेच्छा.
एक मोठ्ठा प्रतिसाद लिहायला
एक मोठ्ठा प्रतिसाद लिहायला घेतला होता पण जाऊदे तेच तेच काय लिहायचं म्हणून क्म्टाळून सोडून दिला.
सौ. वंदना बर्वे, तुम्हाला पुढिल लेखांसाठी शुभेच्छा!
Pages