पाळणाघर आणि वृध्दाश्रम

Submitted by सौ. वंदना बर्वे on 13 February, 2013 - 21:36

माझं लग्न होऊन मी नवी नवरी बर्वे कुंटुंबात आले तेंव्हा, खूप माणसांची वर्दळ होती. सुरवातीला वाटलं लग्नघर आहे म्हणून असेल. पण नंतर बरीच वर्षे ते तसच सुरू होतं. माणसं चर्चा करायला यायची. बाबांच्या हस्ताक्षराचं कौतुक करायची, त्यांचं लिखाण वाचायची. कधी अर्धा अर्धा दिवस बाबांची व आलेल्या पाहुण्यांची चर्चा चालायची. तेंव्हा मला आश्चर्य वाटायचं, काय ही माणसं बडाबडा करीत बसतात. लक्ष देत नसल्याने विषयही डोक्यावरून जायचे. बाबांचं वाचन दांडगं होतं. संदर्भही ते पटापट द्यायचे. आपले मुद्दे हिरहिरीने मांडायचे. मला, आईंना ते वितंडवाद वाटायचे. काय मिळतं हे सगळं करून असं वाटायचं.

आज जेंव्हा एखादा विचार माझ्या डोक्यातून सुटता सुटत नाही, चर्चा करून माझा मुद्दा कुणी खोडून प्रतिवाद करीत नाही तोपर्यंत मनाला चैन पडत नाही. उत्तरं सापडत नाहीशी झाली की बाबांची खूप आठवण येते. मला वाचायला आवडत नसे, बाबा सांगत खूप पुस्तके वाच. आताशा त्यांचं म्हणणं पटतं.

कुटुंब, नवरा बायकोचे नाते, बदलती समाजव्यवस्था ह्या विषयाला धरून असणारी पुस्तके वाचताना गोंधळून जायला होतं. परस्पर विरोधी, तर कधी कालविसंगत. बुध्दीला पटणारी पण मन आणि संस्कार यांच्याविरोधी जाणारी मते वाचली की संभ्रमावस्था निर्माण होते. कुणाचं म्हणणं योग्य कुणाचं अयोग्य. काय स्विकारावं काय त्याज्य मानावं. हे समजेनासं होतं. मुळात व्यक्ती व्यक्तीप्रमाणे वेगळे होत जाणारे विषय हे मतांतरे घडवतात. एखाद्या कौटुंबिक समस्येला एक असं प्रोटोटाइप उत्तर असू शकत नाही. व्यक्ती, कुटुंब ह्याप्रमाणे ते बदलत जातं.

पाळणाघर आणि वृध्दाश्रम हे दोनही निरोगी समाजव्यवस्थेचे लक्षण नाही हा विचार संस्कारक्षम मनाला पटतो पण त्याच बरोबर बुध्दीला त्याची अपरिहार्यताही विचार करायला भाग पाडते.

संजना आणि तिचे यजमान हे दोघे नोकरी करतात. ओल्ड गोवा येथे फ्लॅटमध्ये राहतात. दोघांना एक गोंडस मुलगी आहे. तिघांचं सुखी कुटुंब. मुलीला शाळेत न्यायला आणायला गाडी आहे. शाळेतून आल्याबरोबर इतर मुलांनाही सोबत घेऊन येणारा ड्रायव्हर संजनाच्या मुलीला पाळणाघरात सोडतो. मुलगी आई वडिल यापैकी जो कोणी संध्याकाळी लवकर पोहोचेल त्याच्याबरोबर पाळणाघरातून फ्लॅटवर येते. दोघही दमलेली असतात. मुलीसाठी द्यायला गुणात्मक वेळ आणि शारिरीक क्षमताही नसते. धकाधकी जास्तच झाली तर मानसिक क्षमताही उरत नाही.

पालक शिक्षक मेळाव्यात संजना बराच वेळ बोलायला भेटली. त्यांचं गावाकडे मूळ घर आहे. मोठं एकत्र कुटुंब आहे. संजनाचं जावांशी पटत नाही. एकत्र कुटुंबात देवाणघेवाण दोनही बाजुने झाली पाहिजे, पण तसं होत नाही. नेहमीची भांडणं आणि कटकटी. त्यातून होणारी चिडचिड. हे सगळं टाळण्यासाठी स्वतंत्र राहणं तिला भाग होतं. फ्लॅट कर्ज काढून घेतलाय. संजनाच्या यजमानाच्या पगारातून हफ्ते, टेलिफोन, लाईट, पाणी, अन्न, धान्य हे सगळे खर्च भागत नाहीत म्हणून संजनाने नोकरी धरली आहे.

शाळेतला वेळ सोडला तर शिल्लक राहणारा वेळ मुलीचं काय करायचं हा प्रश्न आ वासून उभा राहिला तेंव्हा "पाळणाघर" हा एकच पर्याय समोर होता. कर्ज फेडण्यासाठी खर्च मर्यादित ठेवायचे, दोघांनी काम करायचं. संजनाचं हे प्रातिनिधिक उदाहरण थोड्याफार फरकाने कित्येक कुटुंबांचं आहे. संसारवेलीवर उमलणारं फूलदेखिल दोघांच्या प्रेमाचं प्रतिक न होता आजकाल आर्थिक नियोजनाने दिलेल्या होकाराचा परिणाम होतय. पती पत्नीमधले नाते तणावपूर्ण होत चालले आहे.

पाळणाघरातून आणल्यावरही मुलीला कुणी संभाळायचं यावरून वाद होत आहेत. मुलीला आई बाबा दोघेही हवीत. लहान मुलांना त्यांना हवी तेंव्हा आई बाबा जवळ हवी असतात. केवळ तडजोड म्हणून चिमुरडी पोरं पाळणाघर स्विकारतात. संध्याकाळी तरी आई बाबा एकत्र आपल्यासोबत असतील म्हणून मुलं हपापलेली असतात. कामावरचे वाढते ताण, वाढत्या अपेक्षा यानी मेटाकुटीला आलेला जीव कधी एकदा अंथरुणावर घालतो असं दोघांना होऊन जातं. मुलीला खेळायला हवं असतं आणि आई वडिलांना विश्रांती हवी असते. पालकत्वाचं ओझं होतं.

ओळखीचे जोशी दांपत्य आहे. एकूलता एक मुलगा. उच्चशिक्षित. नोकरीनिमित्त अमेरिकेत. लग्न झाल्यावर सपत्नीक अमेरिकेत स्थायिक झालेला. इथे ही दोघे एकटीच. श्री. जोशींना मधुमेह व ब्लडप्रेशरचा त्रास तर सौ. जोशींचे संधीवाताने गुढगे दुखतात. त्यांच्याकडे पहायला शुश्रुषा करायला कुणीही नाही म्हणून त्यांनी वृध्दाश्रम जवळ केलाय. निदान तिथे औषधपाणी तरी वेळेवर होते. "असंख्य नवस सायास करून, व्रतवैकल्ये आचरून झालेला एकुलता एक मुलाचा फक्त आवाज ऐकू येतो. हल्ली कानाना ऐकूही कमी येतं" हे सांगताना जोशी दांपत्याच्या पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा साचलेलं प्रचंड दु:ख देवून जातात.

खरी समस्या खूप गंभीर आहे. प्रश्न केवळ आर्थिक समस्येचा नाही, त्याहूनही पुढचा येवू घातलेल्या सामाजिक, कौटुंबिक मुल्यांच्या ऱ्हासाचा आहे. ही सगळी परिस्थिती अस्थिरतेकडे निर्देश करते. आम्हाला आईवडिलही नको आहेत आणि मुलही नकोशी होऊ लागली आहेत. जुनाट, परंपरावादी, जोखडीची म्हणून आश्रमव्यवस्थेचा आम्ही त्याग केला. एकत्र कुटुंबातल्या अनेक दुष्परिणामावर बोट ठेवून त्यापासून आम्ही दूर झालो. परिणामी कुटुंबव्यवस्थेवरचा आमचा विश्वासच उडालाय. यातूनच सहजीवन म्हणजे लग्न न करताच एकत्र राहण्यासारखे प्रयोग होऊ लागले आहेत व यशस्वीही होत आहेत.

लग्न करून त्याच्यातल्या सगळ्या "कॉम्प्लिकेशन" पासून फारकत घेत, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यावर तोडगा म्हणून "लिव्ह इन रिलेशनशिप" म्हणजे लग्नाशिवाय सहजीवनाकडे लोकं वळू लागली आहेत. अशा सहजीवनामध्ये भावनिक गुंतागुंत नसते. पाळायला बंधने नसतात आणि टाळायला जवाबदारीही नसते. जोडीदार एकमेकावर अवलंबून नसतात. हॉस्टेलवर रूम शेअर करून राहणाऱ्या रूम पार्टनर सारखी ही संकल्पना आहे. पटेल तेवढावेळ एकत्र रहा, न पटेल तेंव्हा मार्ग मोकळा. या अशा सहजीवनाचं कायदेशीर स्वरूप अजून माझ्या वाचनात आलं नाही. दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे, यातून निर्माण होणाऱ्या संततीचे भविष्य काय हे देखिल कुठे वाचनात आले नाही.

आपल्याकडे सोळा संस्कारापैकी एक मानलेला गेलेला लग्न हा संस्कार, त्यातल्या गुण दोषांसकट स्विकारायचा की असं लिव्ह इन रिलेशनशिप स्विकारायची हा ज्याचा त्याचा पर्याय आहे. तौलनीक विचार करता, प्रस्थापित लग्न किंवा कुटुंबव्यवस्थेच्या दोषावर तोडगा म्हणून हा सहजीवनाचा मार्ग म्हणजे रोगापेक्षा इलाजच भयंकर असा आहे. नवराबायकोचं एकत्र राहणं म्हणजे दोन शरिरांचं एकत्र वास्तव्य असा अर्थ नाही. त्याला अनेक पदर असतात, अनेक पैलू असतात. भावनांची जिथे ओढ नाही आणि ज्याला संस्कारांची जोड नाही ते कसलं एकत्र राहणं?

पुढच्या पिढीवर संस्कार करणारी मागची पिढी दुरावली आहे. या दोन पिढ्यांच्यातली मधली पिढी हा खरा दोन पिढ्यांना सांधणारा दुवा आहे. नातवंडांचं बोट आजी आजोबांच्या थरथरणाऱ्या हातात देणारे आई वडिल हवे आहेत. पर्याय म्हणून लग्नाशिवाय सहजीवन स्विकारण्याऐवजी पिढ्यांच्यामधला हरवलेला दुवा सांधणं जास्त योग्य नाही का?

सौ. वंदना बर्वे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्यावसायीक पातळीवर पाळणाघर आणि वृध्दाश्रम एकत्र का करू नयेत?
लहानग्यांना आजी-आजोबांचे प्रेम मिळेल आणि त्यांची पूर्ण जबाबदारी न घेता झेपेल तसे आजी-आजोबा छोट्यांचे लाड करतील.
<<
व्हॉट अ‍ॅन आयडिया सरजी!

एक मोठ्ठा प्रतिसाद लिहायला घेतला होता पण जाऊदे तेच तेच काय लिहायचं म्हणून क्म्टाळून सोडून दिला.
Wink

सौ. वंदना बर्वे, तुम्हाला पुढिल लेखांसाठी शुभेच्छा!

व्यावसायीक पातळीवर पाळणाघर आणि वृध्दाश्रम एकत्र का करू नयेत?
लहानग्यांना आजी-आजोबांचे प्रेम मिळेल आणि त्यांची पूर्ण जबाबदारी न घेता झेपेल तसे आजी-आजोबा छोट्यांचे लाड करतील.
<<<<
सगळे आजी-आजोबा पब्लिक वात्सल्याचा झुळझुळ झरा, मायेने ओथंबलेले, वगैरेच असतात असा भाबडा समज आहे का? कशीही का होईना पण तथाकथित आदर्शवत संस्था उभारायचा अट्टाहास कशासाठी?

सगळे आजी-आजोबा पब्लिक वात्सल्याचा झुळझुळ झरा, मायेने ओथंबलेले, वगैरेच असतात असा भाबडा समज आहे का? कशीही का होईना पण तथाकथित आदर्शवत संस्था उभारायचा अट्टाहास कशासाठी?>>>

अट्टाहास नाही. त्या छोट्यांचे लाड करणे ही त्या आजी-आजोबांची जबाबदारीही नाही. पण आवड असेल, झेपत असेल तर हा एक पर्याय. कारण काही वेळा मुलांना पाळणाघरात ठेवणे आणि घरच्या जेष्ठांना वृध्दाश्रमात ठेवणे ह्याला पर्याय नसतो.

बर्वेवहिनी,
तुमच्या एका लेखावरचा प्रतिसाद इथेही जसाच्या तसा लागू पडतो. दोन वेगवेगळ्या दुनियेतल द्वंद्व आहे. तुमच्या ठिकाणी तुम्ही अजिबात चुकत नाही आहात. पण काय आहे, मी किंवा माझ्यासारखे अनेक लहानपणी मोठ्या कुटूंबात वाढलो. काही काही घरात कुरबुरी, खटके यातून ते एकत्र राहणं दाखवण्यापुरतंच राहीलं. जोपर्यंत घरात एकत्र बांधून ठेवणारा वटवृक्ष होता तोवर सगळ्या वेली नांदायच्या गुण्यागोविंदाने. पण वड कोसळला, ढासळला कि मग पहायलाच नको. आमच्याकडे आईवडील नोकरदार. मग नोकरीच्या ठिकाणी उप-यासारखे वाढलो. उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेल्यावर आजी आजोबांचं आनंदीत होणं अनुभवलेलं आहे. गावाकडे त्यांच्या वृद्धापकाळात काका-काकूंनी केलेल्या सेवेमुळे त्यांचे अखेरचे दिवस वेदनादायी झाले नाहीत. त्यांचे हे ऋण जाणून वडिलांनी सगळा खर्चाचा भार उचलला. म्हणून आज सर्वांचं एकमेकांकडे जाणं येणं आहे. आता थोडीफार कुरबूर चालायचीच. पण बेसिक अ‍ॅडजस्टमेंट नसेल तर एकत्रच काय कसलंच कुटूंब नाती धरून ठेवू शकत नाही.

आमच्या पिढीला आईवडिलांनी डॉक्टर किंवा इंजिनीयर किंवा अर्थार्जन होऊ शकेल असं शिक्षण पाहीलं. त्याच वेळी आमच्या आयुष्याची वाटचाल निश्चित झाली. नोकरीसाठी शिक्षण, त्याच नोकरीसाठी देशाटन आणि प्रतिष्ठेला साजेल असं राहणीमान, शाळा हे ओघाने आलं. तरीही जमलं असतं. पण २००३ नंतर तेजीची जी लाट आली त्यानंतर घर घेणं ही सर्वसामान्यच काय, पूर्वीच्या काळी चांगले लठ्ठ पगार समजल्या जाणा-यांच्याही क्षमतेच्या बाहेरची गोष्ट झाली. हा बदल धोरणाचा भाग आहे. रोजगार मिळवणे ही तर आपली गरज आहे. आणि त्यासाठी महागडी घरं घेणे ही देखील. मग आर्थिक गणितं जुळवण्यासाठी दोघांनी अर्थार्जन करणे हे ही भाग आहे. यातला नाईलाजाचा भाग समजून घेताना काहीच अडचण येत नाही. अशा दांपत्यांची संख्या शहरात लक्षणीय आहे असं वाटतं. या सर्वांची मुलं वायाच जातात असंही नाही.

पण आर्थिक स्थिती अतिउत्तम असतानाही दोघांपैकी एकालाही अपत्यासाठी वेळ देता न येणे हे समजून घ्यायला थोडं अवघड जातं. त्याचं करीयर महत्वाचं, दोघेही प्रागतिक विचारांचे. तिनं घराबाहेर पडणंही त्याला मान्य आहे. असायलाच हवं. पण एकीकडे वैचारीक दृष्ट्या प्रगत असताना मुलाला देण्याचा वेळ किती महत्वाचा असतो हे अशा बुद्धीजीवी दांपत्याला कळत नसेल हे उमजत नाही. तिला करीयर करू द्यावी, त्याने घरी रहावं. अशा एका बाबांचं मनोगत एक दोन महिन्यामागे सकाळमधे वाचलं होतं. माझ्या माहीतीत एक असं दांपत्य आहे, ज्यात आईला वर्षाचं पॅकेज एक कोटीच्या घरात जातं. बाबांचं मात्र ३० लाखाच्या आसपास आहे. घरी आलिशान गाड्या आहेत. ठिकठिकाणी इन्व्हेस्टमेंटस आहेत. मुलांसाठी एक दाई आणि एक ड्रायव्हर दिमतीला आहे. पण मोठ्या मुलीच्या शाळेतून ही शिव्या देते अशी तक्रार आल्यावर ते हबकलेच. टीचरने घरी शिव्या देणारे नोकर आहेत का हे विचारल्यावर त्यांनी लक्ष दिलं तेव्हां इतर वेळी सभ्यपणे वागणारे हे दोन नोकर एकमेकांशी भांडताना सतत अपशब्दांचा वापर करत असल्याचं आढळून आलं. आपल्या मुलांवर असे नोकरांचे संस्कार होणं हे कुठल्याही पालकांना क्लेषदायक असणार. माझ्या मते बाबांनी राजीनामा देऊन मुलांकडे लक्ष देणे हा चांगला उपाय होता. अर्थात ही एक विशिष्ट केस आहे. अशी उदाहरणंही दाखवता येतील. पण टक्केवारी जास्त नसेल तर पर्वा करण्याचं सध्या कारण नाही. अर्थात पुढे मागे हे उदाहरण आजूबाजूला दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. वृद्धाश्रम हा एकेकाळी नाटकातून टीकेचा विषय होता. आता नाही. पाळणाघरात संस्कार होतात असंही मानण्यात येतं. शेवटी एण्ड यूजर खूष असेल तर ति-हाईताला ऑब्केक्शन असण्याचं कामच नाही. समाजात प्रत्येकाची मतं शिरसावंद्य असतात यात शंका घेण्याचं कारण दिसत नाही.

रिक्षेवाले, फेरीवाले, दगडफोडे, ट्रेडसमन, धुणीभांडं करणा-या बायका हे कमी उत्पन्नातही पोरं आणि आईबाप दोघांचेही भार आणि कटकटी कसे पेलतात देव जाणे ! संध्याकाळी पावशेर अमृताने ब्रह्मानंदी टाळी लागणे हे त्यांच्या सुखी सद-याचं रहस्य असावं का ? पण मागेच म्हटल्याप्रमाणे या जीवनशैलीत वैयक्तिक विकासाला वाव कुठे आहे, हा मुद्दा यावेळीही नजरेआड झाल्याचं दिसून येतंय.

हुश्श !!

( कोकणात एक वाडी किंवा देशावर भरपूर शेती असावी, शंभर माणसांचं बडजात्या कुटूंब असावं, निसर्गाशी एकरूप जीवनशैली असावी, भला मोठ्ठाच्या मोठ्ठा असा टोलेजंग वाडा असावा, पुढे आंगण, चौक, बैठक, माजघर, स्वयंपाकाची स्वतंत्र खोली, पवनचक्की आणि मागे परसदार, निसर्गाची साद आणि त्या सादेला प्रतिसाद देण्यासाठी परसाकडे धावताना परसात एक आड असावा असं स्वप्न पाहणारा -
एप्र )

वरती वाचन वाढवा असा सल्ला तुम्हाला अनेकांनी दिलाच आहे, सुरुवात शाम मनोहरांच्या 'उत्सुकतेने मी झोपलो' या पुस्तकाने करा असा माझाही अनाहूत सल्ला. कुटूंबसंस्थेबद्दलच्या तुमच्या धारणा तपासून पहायला याची मदत होईल.

शेवटी ज्याची त्याची चॅलेंजेस आणि गरजा जो तो सांभाळतो आणि त्या गरजा पुर्ण करण्यासाठी कधी कधी ठेवावे लागते पोरांना पाळणाघरात. त्याने पोरांना सोशल होण्याचे शिक्षण मिळते, कुणालातरी रोजगार मिळतो. आपलीही सोय होते. नाहीतर कोणत्या आईला पोटचं पोर दुसरीकडे ठेवावं वाटेल दिवसच्या दिवस? नाईलाज असतो म्हणूनच हे केलं जातं. आत्ताच्या धावत्या युगात याकडे सोय म्हणून पाहिले पाहिजे हे माझं मत.
दुसरी गोष्ट मुलांनी अमेरिकेत किंवा बाहेरगावी राहण्याबद्दल... मुलांची स्वप्न असतात, त्यांना हवा तसा जॉब मिळालेला असतो पण तो अमेरिकेत. मुलं खुद्द तिथल्या कल्चरमध्ये स्वत:ला अकॉमोडेट करायचा प्रयत्न करत असतात. त्यात काही वृद्ध आईवडील जातातही, पण रमत नाहीत. मग इथे रहायचा निर्णय घेतात. त्यात काही गैर नाही. आयुष्या ज्या देशात, शहरात काढलं ते सोडून दुसर्‍या देशात स्वत:ला कसं सेटल करणार? आणि कोणतीही मुलं निव्वळ पैशाच्या हव्यासापोटीच परदेशी नोकरी धरतात हे चूक आहे. सगळीच मुलं तशी नसतात. उलट भारतात राहणारे आईवडील अभिमानाने माझा मुलगा यूएस मध्ये सेटल झालाय असं सांगतात.

आणि शेवटी काय तर दुराव्यात गोडी.. हे ही तितकंच खरं...

नताशा, तुमची कल्पना ऐकायला सुंदर वाटते पण तितकी प्रत्यक्षात उभारणे शक्य नाही. वृद्धाश्रम म्हटला की तिथे सतत मृत्यूची छाया असते, मी माझगावला ज्या वर्किंग वूमेन हॉस्टेलवर रहायचे तिथे ग्राऊंड फ्लोरला एक फक्त स्त्रियांसाठीचा वृद्धाश्रम होता, त्यामुळे हे माझ्या अनुभवांवर आधारित. अशा ठिकाणी मुलांना खेळायला पाठवणं मला वैयक्तिकरीत्या पटणार नाही.

त्याने पोरांना सोशल होण्याचे शिक्षण मिळते>>> खरं आहे मी पण लेकीला रोज ४ तास पाळणाघरात ठेवायचे (घरात तिला सांभाळायला माणसे असून) कारण आमच्या सोसायटीमधे कुणी लहान मुले नव्हती.

लग्न-मुलं-पाळणाघरं-मुलांसाठी द्यायला लागणारा वेळ-वृद्ध-वृद्धाश्रम या सर्वापलीकडे देखील एक जग आहे.

त्या जगाबद्दल वास्तववादी लिहिण्यासाठी शुभेच्छा!

नंदिनी म्हणते ते + वृद्ध म्हणल्यावर आधीच ते लोक पेशन्स ला कमी असतात. त्यात वृद्धाश्रमात म्हणल्यावर त्यांनी खुश असणं अतिशय दुर्मिळ आहे. त्यातूनही तिथे पाळणाघर उघडलंच तर ही वृद्ध जनता ४-८ किंवा फारतर १५ दिवस मुलांना नीट सांभाळतील, पण नंतर? मुलांना त्यांच्या वागण्यातून सतत हेट्रेट दिसलं तर? Uhoh ती मुलं पुढं जाऊन कसं वागतील?

१. पाळणाघर चालवणारेच (वयाने) आजी आजोबा असतील तर?
२. 'घरचे' आजी आजोबा दमत नाहीत, व त्यांची वागणूक नेहेमीच वत्सल व प्रेमळ असते का?
३. सर्वच आयांना(सुनांना) आपली मुले 'घरातील वृद्धांच्या' (सासू सासर्‍यांच्या) ताब्यात दिलेली चालतात का? (लाडावून ठेवतात. नुसताच टीव्ही लावून देतात. जेवण्याखाण्याच्या सवयी बिघडवून ठेवल्या आहेत. उलटसुलट शिकवतात.. इ. तक्रारी ऐकू येतात, असे ऐकण्या-वाचनात आहे.)

इ. शंका कमर्शिअल पाळणा-आश्रमाच्या काँबो पॅक निमित्ताने डोक्यात आल्या..
(अ‍ॅडमिनचा झाडू फिरून गेला तरी ४०शी क्रॉस केलिये धाग्याने ऑलरेडी..)

पाळणाघर आणि वृध्दाश्रमाचा यांचा लिव्ह-इनशी काय संबंध?

once upon a time भारतात सामाजिक, कौटुंबिक मुल्य आणि परंपरा (तुम्ही सांगितलेल्या) जपणारी लोकं अगदी सुखी समाधानी होती म्हणायची?
अगदी तुमच्या उदाहरणातलीच कुटुंब बघा... स्वतःला सांभाळणं शक्य नसताना मुलं कशाला पैदा करायची? आणि नवस बोलून मुलं पैदा केली ती म्हातारपणी आपला सांभाळ करतील म्हणून?
मलातर हे लोक पारंपरीक समाजव्यवस्था आणि आधुनिक व्यक्तिस्वातंत्र यांच्या कात्रीत सापडलेले वाटतात. दोन्ही हवय आणि दोन्ही नकोय पण.

पाळणाघर आणि वृद्धाश्रम नाही , पण वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम एका छताखाली, एका संस्थेच्या अधिपत्याखाली चालतात असे ऐकले वाचले आहे. बहुधा मुंबईतले वात्सल्य फाउंडेशन.

आपल मत असे आहे की हे सगळ एक चक्र आहे. आहे त्या सिस्टमचा जाच होऊ लागला की माणूस नवीन काहीतरी शोधतो. सध्या आपल्याकडे ह्या नवेपणाची नवलाई अजून संपली नाहीये. अजून २-३ पिढ्या ह्यातुने गेल्या की हे पण जुने होईल आणि परत वेगळे चालू होईल. पैसा आला की एकट्याच्या जीवावर राहू असे वाटते तो नसतो तोपर्यंत कुटुंब वगैरे ह्याची गरज असते. गरज सरो विद्या मारो. त्यात विशेष काय ते. सध्या सुबत्ता बऱ्यापैकी आली आहे त्यामुळे हे विचार फारसे कोणाला पचनी पडणार नाहीत. असो पण वारील काही प्रतिक्रियांना अनुमोदन आता हे दळण खूप दळून झाले आहे. अजून पीठ बारीक होईल असे वाटत नाही.

हे पलिकडचे मोठ जग म्हणजे काय बर....? (विचारात पडलेली बाहुली) Please! I am not writing this sarcastically I really want to know.

लेखिकेचा मुद्दा चूकीचा नाहिये, त्यान्न काय म्हणायचय ते maybe नीट पोहोचवता येत नसेल....

आधीच्या इतर लेखांच्या तुलनेमधे हा लेख अधिक वाचनीय व मुद्देसूद पण आहे.

काळाच्या प्रवाहामधे कुटुम्ब-व्यवस्थे मधे बदल होणे अपरिहार्य आहे. गेल्या शतकामधे हे बदल अधिक झपाट्याने झाले कारण स्त्री कमावती झाली. हे बदल अपरीवर्तनीय असतात व त्यातून वेगळी समाज रचना अस्तित्वात येत असते. त्याचे दु:ख्ख करणे हे स्मरण रंजन आहे. पण ते कुणी करु नये असे नाही.
जे घडते आहे ते सुसूत्रपणे मांडले आहे हे खरे..

इथले काही प्रतीसाद अकारण कुचेष्टा करणारे व लेखीकेची उगाचच बौध्दीक कीव करणारे आहेत असे वाटते.

पौर्णिमा +१! फक्त लेख लिहायला आधी बर्वेताईंनी अशीही "सुखी" कुटूंब असतात ह्या विचाराला आधी थारा द्यायला हवा. ह्या विचाराला थारा द्यायला, त्यांच्या वेळी होती तीच कुटूंबव्यवस्था किंवा सुखाची कल्पना फक्त योग्य होती ही विचारसरणी बदलली पाहिजे.

>>कंटाळा आला तेच तेच घिसेपिटे विषय वाचून...
कंटाळा आला या उपदेशपर लेखांचा..>>>>>>>>
अगदीच पोरकट प्रतिसाद आहेत.>>

सस्मित, पोरकट, वाह्यात प्रतिसादांकडे दुर्लक्ष करा. त्यावर आपला मौल्यवान वेळ वाया घालवण्यासारखं काsssssहीही नाही.

लग्न-मुलं-पाळणाघरं-मुलांसाठी द्यायला लागणारा वेळ-वृद्ध-वृद्धाश्रम या सर्वापलीकडे देखील एक जग आहे. >>>

इटॅलिक केलेला भाग बदलून ही लाईन प्रत्येक बाफवर वापरता यावी..

सगळे आजी-आजोबा पब्लिक वात्सल्याचा झुळझुळ झरा, मायेने ओथंबलेले, वगैरेच असतात असा भाबडा समज आहे का? >>>>>>>> Lol

^^^^^

आजी-आजोबा च्या जागी आई - वडील किंवा इतर कुठलेही नातेवाईक सुद्धा व्यवस्थित फिट्ट बसू शकतील. (या बाफवर अशा जोकर कार्डसची चलती आहे. किधरभी लगाओ... फिट्ट )

अंड्या,
सध्या पाळणाघराच्या दरांबद्दल चौकश्या करून ठेव. लगीन झालं, आन क्यालेंडर निघालं की मंग उपेगी यील. सोबत ओपन क्लोजची पन चौकशी करून ठेव. (अबे ते स्कूलींग आहे. मटका नै. लोकं मटका लावल्यागत पोरांना शाळंत धाडतात आजकाल ;))
**
असो.
अंडेराव,
माफ करा वर एकेरीवर लिहिलंय. वयाने लहान आहात म्हणून मोकळीक घेतली.

आधीच्या लेखांच्या तुलनेत हा लेख बराच नीट लिहीला आहे. मुद्देसूद असला तरी विषय, संदर्भ पुन्हा तेच ते प्रकारातील आहेत. पारंपरिक संस्थेचं उगीच उदात्तीकरण नका करू. त्यात खूप दोष होते त्याबद्दल देखील कधीतरी विचार व्हावा. तसंच पाळणाघरे-वृद्धाश्रम-लिव्ह इन रिलेशनशिप या कडे वेगळा चष्मा लावून पाहा. जग पूर्णपणे वेगळं आणि सुंदर दिसेल. अनेक शुभेच्छा.

अकु ला १००% अनुमोदन.
>>लग्न-मुलं-पाळणाघरं-मुलांसाठी द्यायला लागणारा वेळ-वृद्ध-वृद्धाश्रम या सर्वापलीकडे देखील एक जग आहे.>>>> या पलीकडे खरंच बघा. आणि जरा वळून फक्त स्वतःकडे देखील. बर्‍याचदा या नात्यांचे, सामाजिक चौकटीचे ओझे वागवताना आपण स्वतःलाच हरवून गेलेलो असतो. ते स्वतःला शोधून काढणं खूप आनंद देणारं असतं.

Pages