पाळणाघर आणि वृध्दाश्रम

Submitted by सौ. वंदना बर्वे on 13 February, 2013 - 21:36

माझं लग्न होऊन मी नवी नवरी बर्वे कुंटुंबात आले तेंव्हा, खूप माणसांची वर्दळ होती. सुरवातीला वाटलं लग्नघर आहे म्हणून असेल. पण नंतर बरीच वर्षे ते तसच सुरू होतं. माणसं चर्चा करायला यायची. बाबांच्या हस्ताक्षराचं कौतुक करायची, त्यांचं लिखाण वाचायची. कधी अर्धा अर्धा दिवस बाबांची व आलेल्या पाहुण्यांची चर्चा चालायची. तेंव्हा मला आश्चर्य वाटायचं, काय ही माणसं बडाबडा करीत बसतात. लक्ष देत नसल्याने विषयही डोक्यावरून जायचे. बाबांचं वाचन दांडगं होतं. संदर्भही ते पटापट द्यायचे. आपले मुद्दे हिरहिरीने मांडायचे. मला, आईंना ते वितंडवाद वाटायचे. काय मिळतं हे सगळं करून असं वाटायचं.

आज जेंव्हा एखादा विचार माझ्या डोक्यातून सुटता सुटत नाही, चर्चा करून माझा मुद्दा कुणी खोडून प्रतिवाद करीत नाही तोपर्यंत मनाला चैन पडत नाही. उत्तरं सापडत नाहीशी झाली की बाबांची खूप आठवण येते. मला वाचायला आवडत नसे, बाबा सांगत खूप पुस्तके वाच. आताशा त्यांचं म्हणणं पटतं.

कुटुंब, नवरा बायकोचे नाते, बदलती समाजव्यवस्था ह्या विषयाला धरून असणारी पुस्तके वाचताना गोंधळून जायला होतं. परस्पर विरोधी, तर कधी कालविसंगत. बुध्दीला पटणारी पण मन आणि संस्कार यांच्याविरोधी जाणारी मते वाचली की संभ्रमावस्था निर्माण होते. कुणाचं म्हणणं योग्य कुणाचं अयोग्य. काय स्विकारावं काय त्याज्य मानावं. हे समजेनासं होतं. मुळात व्यक्ती व्यक्तीप्रमाणे वेगळे होत जाणारे विषय हे मतांतरे घडवतात. एखाद्या कौटुंबिक समस्येला एक असं प्रोटोटाइप उत्तर असू शकत नाही. व्यक्ती, कुटुंब ह्याप्रमाणे ते बदलत जातं.

पाळणाघर आणि वृध्दाश्रम हे दोनही निरोगी समाजव्यवस्थेचे लक्षण नाही हा विचार संस्कारक्षम मनाला पटतो पण त्याच बरोबर बुध्दीला त्याची अपरिहार्यताही विचार करायला भाग पाडते.

संजना आणि तिचे यजमान हे दोघे नोकरी करतात. ओल्ड गोवा येथे फ्लॅटमध्ये राहतात. दोघांना एक गोंडस मुलगी आहे. तिघांचं सुखी कुटुंब. मुलीला शाळेत न्यायला आणायला गाडी आहे. शाळेतून आल्याबरोबर इतर मुलांनाही सोबत घेऊन येणारा ड्रायव्हर संजनाच्या मुलीला पाळणाघरात सोडतो. मुलगी आई वडिल यापैकी जो कोणी संध्याकाळी लवकर पोहोचेल त्याच्याबरोबर पाळणाघरातून फ्लॅटवर येते. दोघही दमलेली असतात. मुलीसाठी द्यायला गुणात्मक वेळ आणि शारिरीक क्षमताही नसते. धकाधकी जास्तच झाली तर मानसिक क्षमताही उरत नाही.

पालक शिक्षक मेळाव्यात संजना बराच वेळ बोलायला भेटली. त्यांचं गावाकडे मूळ घर आहे. मोठं एकत्र कुटुंब आहे. संजनाचं जावांशी पटत नाही. एकत्र कुटुंबात देवाणघेवाण दोनही बाजुने झाली पाहिजे, पण तसं होत नाही. नेहमीची भांडणं आणि कटकटी. त्यातून होणारी चिडचिड. हे सगळं टाळण्यासाठी स्वतंत्र राहणं तिला भाग होतं. फ्लॅट कर्ज काढून घेतलाय. संजनाच्या यजमानाच्या पगारातून हफ्ते, टेलिफोन, लाईट, पाणी, अन्न, धान्य हे सगळे खर्च भागत नाहीत म्हणून संजनाने नोकरी धरली आहे.

शाळेतला वेळ सोडला तर शिल्लक राहणारा वेळ मुलीचं काय करायचं हा प्रश्न आ वासून उभा राहिला तेंव्हा "पाळणाघर" हा एकच पर्याय समोर होता. कर्ज फेडण्यासाठी खर्च मर्यादित ठेवायचे, दोघांनी काम करायचं. संजनाचं हे प्रातिनिधिक उदाहरण थोड्याफार फरकाने कित्येक कुटुंबांचं आहे. संसारवेलीवर उमलणारं फूलदेखिल दोघांच्या प्रेमाचं प्रतिक न होता आजकाल आर्थिक नियोजनाने दिलेल्या होकाराचा परिणाम होतय. पती पत्नीमधले नाते तणावपूर्ण होत चालले आहे.

पाळणाघरातून आणल्यावरही मुलीला कुणी संभाळायचं यावरून वाद होत आहेत. मुलीला आई बाबा दोघेही हवीत. लहान मुलांना त्यांना हवी तेंव्हा आई बाबा जवळ हवी असतात. केवळ तडजोड म्हणून चिमुरडी पोरं पाळणाघर स्विकारतात. संध्याकाळी तरी आई बाबा एकत्र आपल्यासोबत असतील म्हणून मुलं हपापलेली असतात. कामावरचे वाढते ताण, वाढत्या अपेक्षा यानी मेटाकुटीला आलेला जीव कधी एकदा अंथरुणावर घालतो असं दोघांना होऊन जातं. मुलीला खेळायला हवं असतं आणि आई वडिलांना विश्रांती हवी असते. पालकत्वाचं ओझं होतं.

ओळखीचे जोशी दांपत्य आहे. एकूलता एक मुलगा. उच्चशिक्षित. नोकरीनिमित्त अमेरिकेत. लग्न झाल्यावर सपत्नीक अमेरिकेत स्थायिक झालेला. इथे ही दोघे एकटीच. श्री. जोशींना मधुमेह व ब्लडप्रेशरचा त्रास तर सौ. जोशींचे संधीवाताने गुढगे दुखतात. त्यांच्याकडे पहायला शुश्रुषा करायला कुणीही नाही म्हणून त्यांनी वृध्दाश्रम जवळ केलाय. निदान तिथे औषधपाणी तरी वेळेवर होते. "असंख्य नवस सायास करून, व्रतवैकल्ये आचरून झालेला एकुलता एक मुलाचा फक्त आवाज ऐकू येतो. हल्ली कानाना ऐकूही कमी येतं" हे सांगताना जोशी दांपत्याच्या पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा साचलेलं प्रचंड दु:ख देवून जातात.

खरी समस्या खूप गंभीर आहे. प्रश्न केवळ आर्थिक समस्येचा नाही, त्याहूनही पुढचा येवू घातलेल्या सामाजिक, कौटुंबिक मुल्यांच्या ऱ्हासाचा आहे. ही सगळी परिस्थिती अस्थिरतेकडे निर्देश करते. आम्हाला आईवडिलही नको आहेत आणि मुलही नकोशी होऊ लागली आहेत. जुनाट, परंपरावादी, जोखडीची म्हणून आश्रमव्यवस्थेचा आम्ही त्याग केला. एकत्र कुटुंबातल्या अनेक दुष्परिणामावर बोट ठेवून त्यापासून आम्ही दूर झालो. परिणामी कुटुंबव्यवस्थेवरचा आमचा विश्वासच उडालाय. यातूनच सहजीवन म्हणजे लग्न न करताच एकत्र राहण्यासारखे प्रयोग होऊ लागले आहेत व यशस्वीही होत आहेत.

लग्न करून त्याच्यातल्या सगळ्या "कॉम्प्लिकेशन" पासून फारकत घेत, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यावर तोडगा म्हणून "लिव्ह इन रिलेशनशिप" म्हणजे लग्नाशिवाय सहजीवनाकडे लोकं वळू लागली आहेत. अशा सहजीवनामध्ये भावनिक गुंतागुंत नसते. पाळायला बंधने नसतात आणि टाळायला जवाबदारीही नसते. जोडीदार एकमेकावर अवलंबून नसतात. हॉस्टेलवर रूम शेअर करून राहणाऱ्या रूम पार्टनर सारखी ही संकल्पना आहे. पटेल तेवढावेळ एकत्र रहा, न पटेल तेंव्हा मार्ग मोकळा. या अशा सहजीवनाचं कायदेशीर स्वरूप अजून माझ्या वाचनात आलं नाही. दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे, यातून निर्माण होणाऱ्या संततीचे भविष्य काय हे देखिल कुठे वाचनात आले नाही.

आपल्याकडे सोळा संस्कारापैकी एक मानलेला गेलेला लग्न हा संस्कार, त्यातल्या गुण दोषांसकट स्विकारायचा की असं लिव्ह इन रिलेशनशिप स्विकारायची हा ज्याचा त्याचा पर्याय आहे. तौलनीक विचार करता, प्रस्थापित लग्न किंवा कुटुंबव्यवस्थेच्या दोषावर तोडगा म्हणून हा सहजीवनाचा मार्ग म्हणजे रोगापेक्षा इलाजच भयंकर असा आहे. नवराबायकोचं एकत्र राहणं म्हणजे दोन शरिरांचं एकत्र वास्तव्य असा अर्थ नाही. त्याला अनेक पदर असतात, अनेक पैलू असतात. भावनांची जिथे ओढ नाही आणि ज्याला संस्कारांची जोड नाही ते कसलं एकत्र राहणं?

पुढच्या पिढीवर संस्कार करणारी मागची पिढी दुरावली आहे. या दोन पिढ्यांच्यातली मधली पिढी हा खरा दोन पिढ्यांना सांधणारा दुवा आहे. नातवंडांचं बोट आजी आजोबांच्या थरथरणाऱ्या हातात देणारे आई वडिल हवे आहेत. पर्याय म्हणून लग्नाशिवाय सहजीवन स्विकारण्याऐवजी पिढ्यांच्यामधला हरवलेला दुवा सांधणं जास्त योग्य नाही का?

सौ. वंदना बर्वे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाळणाघर च्या बाबतीत केवळ आर्थिक समस्येसाठीच नौकरी केली जाते असं नाही आहे. काम करण्याचं समाधान हा एक खूप मोठा फॅक्टर असू शकतो. आपल्या आवड्त्या क्षेत्रात झोकून काम करण्याची वेगळी मजा असते आणि ह्यानी सामाजिक उन्न्तीही होत असते.. हे करत असताना तणाव कमी करणे, मुलाला वेळ देणे, संस्कार करणे ही वेगळी जबाबदारी आहे...नौकरी आई-बाबां जिथे रहातात तिथेच असेल असे नाही आणि मला असं वाटत की जोपर्यंत त्यांना स्वतःच सगळ करता येत आहे, तोपर्यंत वेगळे रहाण्यात काही प्रॉब्लेम नाहीये शिवाय यामुळे कधीकधी संबध अधिक चांगले राहू शकतात.
माझी आई नौकरी करत असताना आज्जी मुळे माझे बालपण खूप सुखात गेले..अर्थात आईला काही गोष्टी जुळवुन घ्याव्या लागल्या असतील... "नातवंडांचं बोट आजी आजोबांच्या थरथरणाऱ्या हातात देणारे आई वडिल हवे आहेत" हे खरंच आयडियल आहे पण हल्ली सगळ्यांना आपआपली स्पेस हवी असते आणि यात आई-वडिलही आले..शुश्रुषा करायला कुणीही नाही म्हणून वृध्दाश्रम म्ह्णजे त्यांची इच्छा नसताना तसे करणे ही थोडी चुकीची गोष्ट वाटते..बदलती समाजव्यवस्थावस्थेमध्ये प्रेम नाहीसे नको व्हायला..
लेखातल्या काही गोष्टी खरंच विचार करायला लावत आहेत...

बर्वेवहिनींचा लेख पुन्हा वाचला. मुलांना सांभाळणे म्हणजे स्वतःकडे दुर्लक्ष करा असं त्यांनी कुठे सुचवलंय का हे शोधलं. त्यांच्या लेखातल्या त्रुटींबद्दल बरेचदा बोलून झालेलं आहे. त्यांनी ते मान्य केलेलं आहे. पण त्यांच्या लेखात जे सुचवण्यात आलेलं नाही त्याबद्दल त्यांना दोष देता येईल का ही शंका आहे. माणसाच्या आयुष्यात अनेक टप्पे येत जातात तसतसे तडजोडी अपरिहार्य होत जातात. सर्वात मोठी तडजोड आपल्या आयुष्याचा भाग नोकरीसाठी कुणाच्या तरी हवाली करणे हा आहे. तिथे आपल्याला चॉईस नाही. ती जबाबदारी म्हणून आपण स्विकारतो.

पण मुलांची देखील जबाबदारी/ कर्तव्य असते, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही असं सुचवणं म्हणजे स्पेसवर अतिक्रमण असं कुणाला का वाटावं ? खरंच, असं कुणाला वाटत असेल असंही नाही. आपल्या आपल्या स्पेससाठी माणूस वेळ काढतोच कि ! काहींच्या बाबतीत घरी आल्यानंतर टीव्ही, वाचन यात मूलाच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला वेळ मिळत नाही हे देखील वास्तव आहेच. मूल सांभाळणे हा देखील आनंदाचा भाग आहे. तसं वाटत नसल्यास मूल जन्माला घालण्याआधीच गंभीरपणे विचार केलेला बरा. एकदा मूल जन्माला घातल्यावर त्या पलिकडचं जग आणि जबाबदा-या यातून थोडा थोडा वेळ काढणे अपरिहार्य आहे. इतकाही वेळ मिळत नसल्यास त्या जीवनशैलीबद्दल बर्वेवहिनी म्हणतात तसा गंभीरपणे विचार करणे गरजेचे झाले आहे.

प्रिंसेस, केदार जाधव, सस्मित, सोनु, एक प्रतिसाद्क, धन्यवाद, लेखिकेचे मुद्दे समजुन घेउन, सकारात्मक चर्चेकडे बाफ वळवल्याबद्द्ल. दक्शिणा यांनी देखिल पहिल्या आणि दुसर्या (दुराव्यात गोडी - अगदी अगदी) प्रतीसादात अतिशय संयतपणे आपले मुद्दे मांडले आहे.

मी त्यांचे सगळे लेख सुरुवातीपासुन वाचते आहे आणि त्यावरचे प्रतिसाद सुद्दा. मान्य आहे कि काही मुद्दे वारंवार येत आहेत. तरी सुद्दा खिल्ली उडवणारे प्रतिसाद डोळ्यांना आणी मनालादेखिल खटकतात.

लेखिकेचे जे अनुभवविश्व आहे, त्यावरुन त्या निष्कर्ष काढुन लिहितात. जर एवढे डिप्रेसींग प्रतिसाद आले तर कदाचित त्या लिहिणारच नाहित. इथे मायबोलीचा मुळ उद्देश (चर्चा घडवणे) बाजुला राहील. किंवा असे काहि आहे का की फक्त एक्स्पर्टीज असणार्यांनीच इकडे लिहायचे आहे.

>>>>>मूल सांभाळणे हा देखील आनंदाचा भाग आहे. तसं वाटत नसल्यास मूल जन्माला घालण्याआधीच गंभीरपणे विचार केलेला बरा. एकदा मूल जन्माला घातल्यावर त्या पलिकडचं जग आणि जबाबदा-या यातून थोडा थोडा वेळ काढणे अपरिहार्य आहे. इतकाही वेळ मिळत नसल्यास त्या जीवनशैलीबद्दल बर्वेवहिनी म्हणतात तसा गंभीरपणे विचार करणे गरजेचे झाले आहे.<<<<<< अगदी अगदी.

आपल्यापुरतं बोलायचं तर मला दोन मुलांचं करुन नोकरी करणं जमलं नाहि (गरज असतेच, ती केव्हा नसते?). पण आजुबाजुला आणि माझ्या कुटुंबातसुद्धा कितीतरी जणींनी समर्थपणे दोन्हि केलं आहे - करत आहेत. त्यामुळे एक ठोस अनुमान आपण नाहि काढु शकत की हे योग्य कि अयोग्य ते. प्रत्येकाने आपला कंफर्ट झोन बघुन ठरवायचं. चुक कोणीच नसतं बरेच वेळा, फक्त वेगवेगळी व्यक्तिमत्व, अनुभवविश्व असु शकतात.

>> एखाद्या कौटुंबिक समस्येला एक असं प्रोटोटाइप उत्तर असू शकत नाही. व्यक्ती, कुटुंब ह्याप्रमाणे ते बदलत जातं. >><<

इथे हे वाक्य लिहून पुन्हा पुढच्या पॅरात गोंधळ उडालेला दिसतोय.

मूळात, आपली मूलं ही आपलीच जबाबदारी असते/असावी हे माझे मत. जर आजी आजोबांचे सहवास मिळालाच तर नातवंड नशिबवान समजावीत. आजी आजोबा मुळे एक वेगळाच फायदा असो शकतो असतो(इथे परत व्यक्ती व्यक्तीवर अवलंबून आहे)

पण पाळणाघर हे समाजाची समस्या नाही आहे, गरज असू शकते.

मायबोलीत लेखक/लेखिका कोण हा कॉलम दिसत नाही का? Wink

लेखिका वंदना बर्वे म्हटल्यावर व त्यांचे आधीचे लेख इतके वाचले आहेत तर उघडायचे सुद्धा कष्ट घेतले नाही तर तेच ते वाचायचे कष्ट होणार नाहीत पण तरी का उघडतात व वाचतात मग? असे वाटले काही प्रतिसाद वाचून.

हां, पण वंदना ताई तुमचा टीरपी वाढतो हा अश्या प्रतिसादांनी .. तेव्हा तुम्ही खुष व्हा. Wink

लेखिका वंदना बर्वे म्हटल्यावर व त्यांचे आधीचे लेख इतके वाचले आहेत तर उघडायचे सुद्धा कष्ट घेतले नाही तर तेच ते वाचायचे कष्ट होणार नाहीत पण तरी का उघडतात व वाचतात मग? असे वाटले काही प्रतिसाद वाचून.>>>>>>>>>>>+१

"भावनांची जिथे ओढ नाही आणि ज्याला संस्कारांची जोड नाही ते कसलं एकत्र राहणं?" - लग्न केलेल्या लोकन्मधे भावना असतात? आधिच्या पिढीतील ही कितीतरी लोक संसार असेच रेटत असतात - भावन्अन्शिवाय... ते काय निरोगी सन्सार म्हणावेत का??

कल्पा अनुमोदन.
जिथे भावना तिथे नातं, मग संस्कार असोत वा नसोत. काय फरक पडतो?
सर्व काही मानण्यावर आहे.

आधिच्या पिढीतील ही कितीतरी लोक संसार असेच रेटत असतात
<<
आत्ताच्या पिढीत वेगळं चित्रं आहे का? (की आजकाल संसार मोडून एकमेकांनाच रेटणे सुरू झाले आहे? की रेटारेटी बंद होऊन गोड गोड संसार होऊ लागलेत?)
वेगळं चित्र असेल तर आत्ताच्या पिढीवर वेगळे संस्कार आहेत का?
असलेत तर कुणी केले असतील ते संस्कार?

(प्रश्नांकित) इब्लिस.

आपण आहोत त्या परिस्थितीचं (भौगोलिक / सांस्कृतिक इ.) तटस्थपणे अवलोकन करणं, त्यातल्या त्रुटी शोधणं, मान्य करणं हे त्यावर मात करण्याकडे टाकलेलं पहिलं पाऊल असतं. आपलं तेच योग्य किंवा दुस-याचं तेच योग्य असा दृष्टीकोण सारासार विचारासाठी मारक आहे.

असो.
अंडेराव,
माफ करा वर एकेरीवर लिहिलंय. वयाने लहान आहात म्हणून मोकळीक घेतली.
>>>>>>>>
बस काय इब्लिसभाऊ, लाजवाल का आता... अंड्या वयानेच नाही तर अकलेने ही बराच लहान आहे तुमच्यापेक्षा...

अबाऊट टॉपिक,
विषय घासून गुळगुळीत झालेला असला तरी प्रश्न काही सुटला नाहिये.

मागे एक फेसबूक शेअर पाहिले होते की वृद्धाश्रमात तुम्हाला फक्त सुशिक्षित अन संपन्न घरातील लोकांचे आईबाप दिसतील मात्र गरीबांचे नाही, कसे का असेना पोसतात ते आपल्या आईवडीलांना...

म्हणूनच मी वर प्रश्न विचारला की वृद्धाश्रम हे फ्री असतात की त्याची काही फी असते????

झंपी, तुझ्या या वाक्याला हजारो मोदक.
>>मूळात, आपली मूलं ही आपलीच जबाबदारी असते/असावी हे माझे मत. >>
Happy

फुकट नसते @ अण्डेराव .
भरपूर फी असते नॉर्मली.
दुसरं म्हणजे, फुकट प्रकारचे 'मातोश्री' वृद्धाश्रम देखिल आहेत. हे महाराष्ट्राला युति सरकारने दिलेलं देणं आहे, झुणका भाकर सारखं. तिथे गरीबांचे आईबापच असतात, अन कित्येकदा संपन्न घरातल्या कोडग्या पोरांनी पैसे हिसकावून घेतलेले निराधार म्हातारे. त्यांच्या नावाने अनुदानं लाटणार्‍या गांवगुंडांनी त्यांचे काय हाल करून ठेवलेले असतात ते एकदा पाहिले तर समजेल.
असो. फेसबुकावरचा फेस किती गांभीर्याने घ्यायचा हे प्रत्येकाने आपले आपण पहावे.

पुरुष,
अहो, गरीबांसाठी तयार केलेली चांगली योजना आहे ती. दुसरी चांगली योजना म्हणजे संजयगांधी निराधार योजना. खेड्यापाड्यांत, लहान शहरांत गरीबाच्या म्हातार्‍यांना घरात जगता येत नाही, ना वृद्धाश्रमात जाता येत.

या योजनेबद्दल युती सरकारला दोष दिला कुणी? चोच्यामचां का? Wink

"आपण आहोत त्या परिस्थितीचं (भौगोलिक / सांस्कृतिक इ.) तटस्थपणे अवलोकन करणं, त्यातल्या त्रुटी शोधणं, मान्य करणं हे त्यावर मात करण्याकडे टाकलेलं पहिलं पाऊल असतं. आपलं तेच योग्य किंवा दुस-याचं तेच योग्य असा दृष्टीकोण सारासार विचारासाठी मारक आहे." >>>>

माझ्याकडून एक भर ..

वेगळा विचार करता येणं हे आवश्यक आहे. पण प्रत्येकवेळी वेगळा विचार योग्य(च) असेल असं नाही हा विचार त्याला जोडून करता येणे हे देखील आवश्यक.
सोप्या शब्दात सांगायचं तर..
"जो काम चल रहा है चंगा
उसमे ना कर पंगा, कह गया गंगा"
( एका मेकॅनिककडून ऐकलेलं )
थांबावं. नाहीतर टिंब प्रवचनकार म्हणून टिंब (नोंद) होईल कुठेतरी Lol Wink

आत्ताच्या पिढीत वेगळं चित्रं आहे का? (की आजकाल संसार मोडून एकमेकांनाच रेटणे सुरू झाले आहे? की रेटारेटी बंद होऊन गोड गोड संसार होऊ लागलेत?)
वेगळं चित्र असेल तर आत्ताच्या पिढीवर वेगळे संस्कार आहेत का?
असलेत तर कुणी केले असतील ते संस्कार?
>> प्रत्येक गोष्ट संस्कारांवर नसते. माणूस काही गोष्टी (ओपन असल्यास, विचार करायच्या अ‍ॅबिलिटीचा उपयोग करत असल्यास) स्वतःहून शिकतो.
आत्ताच्या पिढीत वेगळं चित्रं आहे का? >> काही प्रमाणात हो. आर्थिक स्वातंत्र्यांमुळे (पूर्ण स्त्री समूह पातळीवर) नको त्या गोष्टी सहन करायची गरज नाही हे बाईला जसं कळलं तसंच काहीही सहन केलं जाणार नाही हे नवर्‍यालाही कळलं. त्याचीच पुढची पायरी म्हणून विचार करणारे नवरा बायको जिथे असतील तिथे पारंपारिक भूमिका निभवाव्यातच अशी अवास्तव अपेक्षा न धरणं आणि अशा भूमिकेच्या पलिकडे जाऊन व्यक्ती म्हणून एकमेकांचा आदर करणं - एकमेकांची स्पेस एकमेकांना देणं, हे झालं, होतय.
मतभेद होऊच नयेत असं काही नाही - पण ते अ‍ॅक्सेप्ट करून एकमेकांचा आदर करणं हे आताच्या पिढीत जास्त होतं असं मला मी पाहिलेल्या उदाहरणांवरून वाटतं (सँपल साईजमधे शक्यतो सुशिक्षित, शहरी आणि स्वतःच्या स्वातंत्र्याबद्दलच्या कल्पना स्पष्ट असलेल्या बायका, बायकांच्या स्वातंत्र्याबद्दल (स्वतंत्र माणूस असण्याबद्दल) जाणीव असलेले पुरुष आहेत हे मान्य करून)
हे होत रहावं आणि त्याकरता प्रत्येक समंजस, विचारी माणसानं आग्रही रहावं अशी प्रामाणिक इच्छा!

अहो इब्लिस चाचा , आता युती सरकार वर का गाडी आणलीत?
त्याच्या आधी काय वृद्धाश्रम नव्हते का? प्राचीन काळातले वानप्रस्थाश्रम काय होते?
आधीच बर्वे काकूंनी डोक्याला शॉट दिलाय. त्यात तुम्ही आता अजून भर घाला.
बर्वे काकू, आता काहीतरी नवीन(आणि वेगळं) येऊ द्या हो. गोव्यात राहता ना तुम्ही?
नानबा + १००००००.....

अंड्या, गरीबांचे आईवडिल पोरं वेगळी झाल्यावर झोपड्यात औषध पाणी अन्न याशिवाय झिजत झिजत मरतात, पंढरपूरच्या जत्रेत आपसूक हरवतात, ट्रेन मध्ये बसवून मुंबई पुण्यात स्टेशनवर हरवतात. असे काहिही होऊ शकते.
सोलापूरला तर अश्या पंढरपूरच्या यात्रेत 'चुकून'हरवलेल्या बेवारस म्हातार्यांवर त्यांच्या मृत्यु पश्चात अंतिम संस्कार करणारी सेवाभावी मंडळे आहेत.
जर हे लोक त्यांच्या गावातच असतील तर ऑन पेपर त्याना मुले असल्याने संजय गांधी निराधार योजनेचा फायदाही मिळत नाही.

Pages