माझं लग्न होऊन मी नवी नवरी बर्वे कुंटुंबात आले तेंव्हा, खूप माणसांची वर्दळ होती. सुरवातीला वाटलं लग्नघर आहे म्हणून असेल. पण नंतर बरीच वर्षे ते तसच सुरू होतं. माणसं चर्चा करायला यायची. बाबांच्या हस्ताक्षराचं कौतुक करायची, त्यांचं लिखाण वाचायची. कधी अर्धा अर्धा दिवस बाबांची व आलेल्या पाहुण्यांची चर्चा चालायची. तेंव्हा मला आश्चर्य वाटायचं, काय ही माणसं बडाबडा करीत बसतात. लक्ष देत नसल्याने विषयही डोक्यावरून जायचे. बाबांचं वाचन दांडगं होतं. संदर्भही ते पटापट द्यायचे. आपले मुद्दे हिरहिरीने मांडायचे. मला, आईंना ते वितंडवाद वाटायचे. काय मिळतं हे सगळं करून असं वाटायचं.
आज जेंव्हा एखादा विचार माझ्या डोक्यातून सुटता सुटत नाही, चर्चा करून माझा मुद्दा कुणी खोडून प्रतिवाद करीत नाही तोपर्यंत मनाला चैन पडत नाही. उत्तरं सापडत नाहीशी झाली की बाबांची खूप आठवण येते. मला वाचायला आवडत नसे, बाबा सांगत खूप पुस्तके वाच. आताशा त्यांचं म्हणणं पटतं.
कुटुंब, नवरा बायकोचे नाते, बदलती समाजव्यवस्था ह्या विषयाला धरून असणारी पुस्तके वाचताना गोंधळून जायला होतं. परस्पर विरोधी, तर कधी कालविसंगत. बुध्दीला पटणारी पण मन आणि संस्कार यांच्याविरोधी जाणारी मते वाचली की संभ्रमावस्था निर्माण होते. कुणाचं म्हणणं योग्य कुणाचं अयोग्य. काय स्विकारावं काय त्याज्य मानावं. हे समजेनासं होतं. मुळात व्यक्ती व्यक्तीप्रमाणे वेगळे होत जाणारे विषय हे मतांतरे घडवतात. एखाद्या कौटुंबिक समस्येला एक असं प्रोटोटाइप उत्तर असू शकत नाही. व्यक्ती, कुटुंब ह्याप्रमाणे ते बदलत जातं.
पाळणाघर आणि वृध्दाश्रम हे दोनही निरोगी समाजव्यवस्थेचे लक्षण नाही हा विचार संस्कारक्षम मनाला पटतो पण त्याच बरोबर बुध्दीला त्याची अपरिहार्यताही विचार करायला भाग पाडते.
संजना आणि तिचे यजमान हे दोघे नोकरी करतात. ओल्ड गोवा येथे फ्लॅटमध्ये राहतात. दोघांना एक गोंडस मुलगी आहे. तिघांचं सुखी कुटुंब. मुलीला शाळेत न्यायला आणायला गाडी आहे. शाळेतून आल्याबरोबर इतर मुलांनाही सोबत घेऊन येणारा ड्रायव्हर संजनाच्या मुलीला पाळणाघरात सोडतो. मुलगी आई वडिल यापैकी जो कोणी संध्याकाळी लवकर पोहोचेल त्याच्याबरोबर पाळणाघरातून फ्लॅटवर येते. दोघही दमलेली असतात. मुलीसाठी द्यायला गुणात्मक वेळ आणि शारिरीक क्षमताही नसते. धकाधकी जास्तच झाली तर मानसिक क्षमताही उरत नाही.
पालक शिक्षक मेळाव्यात संजना बराच वेळ बोलायला भेटली. त्यांचं गावाकडे मूळ घर आहे. मोठं एकत्र कुटुंब आहे. संजनाचं जावांशी पटत नाही. एकत्र कुटुंबात देवाणघेवाण दोनही बाजुने झाली पाहिजे, पण तसं होत नाही. नेहमीची भांडणं आणि कटकटी. त्यातून होणारी चिडचिड. हे सगळं टाळण्यासाठी स्वतंत्र राहणं तिला भाग होतं. फ्लॅट कर्ज काढून घेतलाय. संजनाच्या यजमानाच्या पगारातून हफ्ते, टेलिफोन, लाईट, पाणी, अन्न, धान्य हे सगळे खर्च भागत नाहीत म्हणून संजनाने नोकरी धरली आहे.
शाळेतला वेळ सोडला तर शिल्लक राहणारा वेळ मुलीचं काय करायचं हा प्रश्न आ वासून उभा राहिला तेंव्हा "पाळणाघर" हा एकच पर्याय समोर होता. कर्ज फेडण्यासाठी खर्च मर्यादित ठेवायचे, दोघांनी काम करायचं. संजनाचं हे प्रातिनिधिक उदाहरण थोड्याफार फरकाने कित्येक कुटुंबांचं आहे. संसारवेलीवर उमलणारं फूलदेखिल दोघांच्या प्रेमाचं प्रतिक न होता आजकाल आर्थिक नियोजनाने दिलेल्या होकाराचा परिणाम होतय. पती पत्नीमधले नाते तणावपूर्ण होत चालले आहे.
पाळणाघरातून आणल्यावरही मुलीला कुणी संभाळायचं यावरून वाद होत आहेत. मुलीला आई बाबा दोघेही हवीत. लहान मुलांना त्यांना हवी तेंव्हा आई बाबा जवळ हवी असतात. केवळ तडजोड म्हणून चिमुरडी पोरं पाळणाघर स्विकारतात. संध्याकाळी तरी आई बाबा एकत्र आपल्यासोबत असतील म्हणून मुलं हपापलेली असतात. कामावरचे वाढते ताण, वाढत्या अपेक्षा यानी मेटाकुटीला आलेला जीव कधी एकदा अंथरुणावर घालतो असं दोघांना होऊन जातं. मुलीला खेळायला हवं असतं आणि आई वडिलांना विश्रांती हवी असते. पालकत्वाचं ओझं होतं.
ओळखीचे जोशी दांपत्य आहे. एकूलता एक मुलगा. उच्चशिक्षित. नोकरीनिमित्त अमेरिकेत. लग्न झाल्यावर सपत्नीक अमेरिकेत स्थायिक झालेला. इथे ही दोघे एकटीच. श्री. जोशींना मधुमेह व ब्लडप्रेशरचा त्रास तर सौ. जोशींचे संधीवाताने गुढगे दुखतात. त्यांच्याकडे पहायला शुश्रुषा करायला कुणीही नाही म्हणून त्यांनी वृध्दाश्रम जवळ केलाय. निदान तिथे औषधपाणी तरी वेळेवर होते. "असंख्य नवस सायास करून, व्रतवैकल्ये आचरून झालेला एकुलता एक मुलाचा फक्त आवाज ऐकू येतो. हल्ली कानाना ऐकूही कमी येतं" हे सांगताना जोशी दांपत्याच्या पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा साचलेलं प्रचंड दु:ख देवून जातात.
खरी समस्या खूप गंभीर आहे. प्रश्न केवळ आर्थिक समस्येचा नाही, त्याहूनही पुढचा येवू घातलेल्या सामाजिक, कौटुंबिक मुल्यांच्या ऱ्हासाचा आहे. ही सगळी परिस्थिती अस्थिरतेकडे निर्देश करते. आम्हाला आईवडिलही नको आहेत आणि मुलही नकोशी होऊ लागली आहेत. जुनाट, परंपरावादी, जोखडीची म्हणून आश्रमव्यवस्थेचा आम्ही त्याग केला. एकत्र कुटुंबातल्या अनेक दुष्परिणामावर बोट ठेवून त्यापासून आम्ही दूर झालो. परिणामी कुटुंबव्यवस्थेवरचा आमचा विश्वासच उडालाय. यातूनच सहजीवन म्हणजे लग्न न करताच एकत्र राहण्यासारखे प्रयोग होऊ लागले आहेत व यशस्वीही होत आहेत.
लग्न करून त्याच्यातल्या सगळ्या "कॉम्प्लिकेशन" पासून फारकत घेत, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यावर तोडगा म्हणून "लिव्ह इन रिलेशनशिप" म्हणजे लग्नाशिवाय सहजीवनाकडे लोकं वळू लागली आहेत. अशा सहजीवनामध्ये भावनिक गुंतागुंत नसते. पाळायला बंधने नसतात आणि टाळायला जवाबदारीही नसते. जोडीदार एकमेकावर अवलंबून नसतात. हॉस्टेलवर रूम शेअर करून राहणाऱ्या रूम पार्टनर सारखी ही संकल्पना आहे. पटेल तेवढावेळ एकत्र रहा, न पटेल तेंव्हा मार्ग मोकळा. या अशा सहजीवनाचं कायदेशीर स्वरूप अजून माझ्या वाचनात आलं नाही. दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे, यातून निर्माण होणाऱ्या संततीचे भविष्य काय हे देखिल कुठे वाचनात आले नाही.
आपल्याकडे सोळा संस्कारापैकी एक मानलेला गेलेला लग्न हा संस्कार, त्यातल्या गुण दोषांसकट स्विकारायचा की असं लिव्ह इन रिलेशनशिप स्विकारायची हा ज्याचा त्याचा पर्याय आहे. तौलनीक विचार करता, प्रस्थापित लग्न किंवा कुटुंबव्यवस्थेच्या दोषावर तोडगा म्हणून हा सहजीवनाचा मार्ग म्हणजे रोगापेक्षा इलाजच भयंकर असा आहे. नवराबायकोचं एकत्र राहणं म्हणजे दोन शरिरांचं एकत्र वास्तव्य असा अर्थ नाही. त्याला अनेक पदर असतात, अनेक पैलू असतात. भावनांची जिथे ओढ नाही आणि ज्याला संस्कारांची जोड नाही ते कसलं एकत्र राहणं?
पुढच्या पिढीवर संस्कार करणारी मागची पिढी दुरावली आहे. या दोन पिढ्यांच्यातली मधली पिढी हा खरा दोन पिढ्यांना सांधणारा दुवा आहे. नातवंडांचं बोट आजी आजोबांच्या थरथरणाऱ्या हातात देणारे आई वडिल हवे आहेत. पर्याय म्हणून लग्नाशिवाय सहजीवन स्विकारण्याऐवजी पिढ्यांच्यामधला हरवलेला दुवा सांधणं जास्त योग्य नाही का?
सौ. वंदना बर्वे
एकत्र कुटुंब म्हणजे काय ? हे
एकत्र कुटुंब म्हणजे काय ? हे समजून घेतले तर जीवन सुखाचे होईल. माझे तर चारही डोळे उघडले या भाषणाने.... अज्ञान दूर झाले.
https://www.youtube.com/watch?v=a4GWK2lu-5I
सुरुवातीला ९:१३ पर्यंत परिचय आहे. तो ही ऐकण्यासारखा.
डॉक्टर व्हा, वकील व्हा, इंजिनियर व्हा, विमानात जा, अंतराळात जा नाहीतर पाताळात जा, कुठेही जा..... भाकरी करता आली पाहीजे. मुलींनी सुगरण असायला पाहीजे.
शाळा शिकून करायचंय काय ? शाळा नंतर. शिक्षण महत्वाचं नाही, लग्न महत्वाचं.
चाळीस जणांच्या कुटुंबाचं सगळं करता आलं पाहीजे.
गॅसवरचा स्वैपाक चालत नाही. शेगडीवरचा करावा.
नव-याने मारलं, पावसाने झोडपलं, सांगू नये कुणाला.
Pages