शुभ वर्तमान - चांगल्या बातम्या

Submitted by हर्पेन on 23 January, 2013 - 07:40

माझ्या चेपू वरच्या एका मित्राने टाकलेले स्टेटस अपडेट " समाजातल्या सर्व थरांमधून एक मागणी होत आहे की सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी दररोज त्यांच्या पेपर सोबत अँटी-डिप्रेसंट गोळयांचा पुरवठा करावा"

खरोखरच आजकाल चांगल्या बातम्या ऐका-वाचायला मिळतात कुठे? टीव्हीवर जाऊद्यात पण वर्तमानपत्रात देखिल चांगल्या बातम्या शोधाव्या लागतात.

मनावर मळभ आणणार्‍या बातम्यांचे प्रमाण इतके जास्त असते की समज व्हावा या जगात चांगले काही घडतच नाहीये. खरेतर आपल्या अवती भवती अशा अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात, ज्या कधी वर्तमानपत्रात छापून पण येतात, पण बहुदा इतर बातम्यांच्या तुलनेत खमंगपणात कमी पडल्याने त्यांची जास्त चर्चा होत नाही. अशाच काही चांगल्या बातम्यांना आपण एकाच ठिकाणी धाग्यात ओवून ठेवल्या तर त्या घटनांचा घेतलेला मागोवा / धांडोळा हा येणार्‍या काळात अँटी-डिप्रेसंट म्हणून काम करेल असे वाटते. कवी सुधांशु कुलकर्णी यांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे "अंधार खूप झाला पणती जपायला हवी"

http://vishesh.maayboli.com/node/1120

चला तर मग अशा काही आनंददायी / सुखद घटनांबद्द्ल समस्त मायबोलीकरांना अवगत करवूयात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हर्पेन, खुप छान कल्पना आहे ही! सकारात्मक बातम्या ऐकायची खरोखर गरज आहे सध्या!

सी ए झालेल्या मुलींचे करावे तेव्हढे कौतुक कमी आहे! खुप मस्त वाटले त्या दोन मुलींचे यश बघुन! बाकीच्याही सगळ्याच बातम्या 'आजुबाजुला चांगले लोक आहेत/चांगल्या घटना घडताहेत!' असा दिलासा देणार्‍या आहेत. लिहीत रहा. मीही नवीन काही सकारात्मक/चांगले वाचले तर नक्कीच इथे शेयर करीन.

खरेच मस्त धागा आहे...

इस कदर खुश नजर आते हैं मेरे शहर के लोग
आज अखबार किसीने न पढा हो जैसे - नैयर मजिदी Happy

रच्याकने

एका कवीने म्हटल्या प्रमाणे "अंधार खूप झाला पणती जपायला हवी" >>> कवी हिमांशु कुलकर्णींची कविता आहे ही.

दुष्काळाला डॉक्‍टरांच्या मदतीचा हात

- सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना, आरोग्य विभागाच्या राज्यातल्या सर्व अधिकाऱ्यांनी एक दिवसाचा पगार दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे.

या एक दिवसाच्या पगारातून तब्बल अडीच कोटी रुपयांचा निधी सरकारला मिळणार असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने त्याबाबत निवेदन दिले. राज्यात यंदा दुष्काळाने जनतेसमोर मोठे संकट उभे असल्याने मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड यांनी सांगितले.

राज्यातल्या आरोग्य विभागातल्या स्थायी, अस्थायी, कंत्राटी तसेच वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांचा फेब्रुवारी महिन्यातला एक दिवसाचा पगार मदत म्हणून कपात करण्याची विनंती संघटनेने अर्थमंत्रालयाकडे केली आहे.

राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. राज्यातली सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, शालेय आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मानसेवी वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी एक दिवसाचा पगार देणार आहेत.

>>दुष्काळाला डॉक्‍टरांच्या मदतीचा हात
ही बातमी चांगली असली तरी पुर्णपणे चांगली म्हणता येणार नाही. कारण एकतर अनेक लोकांनी पैसे खाणे कमी केले, अनेक लोकांनी कर न चुकवता नियमित भरला, तर सरकार योग्य ती मदत सहज करू शकेल. त्यासाठी असा पुढाकार घेण्याची गरज लागणार नाही.
तसेच हे जे पैसे जमा होतील, ते नक्की गरजू लोकांपर्यंत पुर्णपणे पोहोचतीलच का ? Uhoh
माफ करा, चांगल्या धाग्यावर अशा शंका मांडल्याबद्दल, पण आपल्या मदतीने खरेच योग्य फरक पडणार आहे का हे पण पाहिले जावे असे वाटते.

मला आलेला सुखद अनुभव ..
मी नेहमीच हिंदु , मराठी , महाराष्ट्रीयन, या बद्दल आग्रही अन मुस्लीम इ. विषयी खुनशी होतो.
पण एक दोन घटना अश्या घडल्या की याच्या पलीकडेच माणुस माणवता हाच एक धर्म आहे असे मत होत चालले आहे,
माझ्या दुकानाच्या समोरच एका मुस्लीम अन युपी हून आलेल्या भैया चा भाजी चा गाळा आहे तोही माझ्या एका मराठी मित्राने भाड्याने दिलेला ( या साठी आम्ही त्याला लै शिव्या दिल्त्या) .एक दिवस सकाळी ८.३० ची घाइगडबडीची वेळ एक अजोबा त्यांच्या कडेवर एक ८ / १० महिन्याचे बाळ घेउन रस्ता ओलांडून शेजारील गणपती मंदीरात दर्शनासाठी आलेले मी दुकान आवरुन बाहेर येत होतो तेवढ्यात गाड्यांच्या वर्दळीत ब्रेकचा मोठा आवाज झाला , ते आजोबा पुन्हा त्या चिमुरड्या बाळाला घेउन रस्ता अओलांडत होते, पण एका हातात बाळाला घेतल्यामुळे त्यांचा उजव्या बाजुचा अंदाज चुकला आणि एका दुचाकी स्वाराने त्यांना धडक दिली अन ते बाळ चेंडू प्रमाणे क्षणात माझ्या डोळ्या देखत हवेत उसळल पण पलिकडे आसलेल्या त्या भैया च्या पोराने पळत येउन वरच्या वर ते झेलल अगदी जादुयी मला अक्षर्शः सेंकदात त्याच्यात गणपती बप्पा दिसला. ब्रेक च्या आवाजान तो सावध होण अन विजेच्या गतीन त्यान बाळाला धरन मी बघत राहिलो , आम्ही आजोबांना दवाखाण्यात हालवलं, त्यांच्या कडील मोबा वरून मुलास कळवल , आइ वडील रडतच बाळाजवळ दाखल झाले ते शांत होत भैइयाची बायको त्याला कवेत घेउन मस्त खेळवत होती.
आजोबाणा मुका मार लागल्यान तिरमीरी आलेली, त्यांना दिवसभर दवाखाण्यात ठेउन घेतलेल.
माझ्या विचारसरणीला थोडी कलाटणी मिळाली ......

फार छान दादाश्री, एक तर त्या बाळाचे प्राण वाचले म्हणुन आणि तुमचा गैरसमज दूर झाला म्हणून. मला सुद्धा आज एक आन्न्दाची बातमी कळली. इथे खूप काही शेअर करु शकत नाही, पण चान्गले वागणे हे चान्गलाच परीणाम देते, तो लगेचच असेल असे नाही, यावर माझा विश्वास बसला इतकेच सान्ग्ते.

एक प्रेरणादायी बाफ.
हर्पेन, तुमचे आभार मानावेत तितके कमीच. मायबोलीवर ही एक अशी जागा झाली की जिथे येऊन जगातल्या चांगुलपणावरचा डळमळीत होत असलेला विश्वास पुन्हा बळकट करून घेता यावा.
कुठेतरी कुंठले असतिल तर... आपल्या सकारात्मक विचारांना एक झक्कास धक्का देऊन चालना देण्याची शक्ती आहे ह्या बातम्यांमधे.
नुस्ता बाफ काढून उपयोग नाही... त्यात योगदान दिलेल्या सगळ्यांचे खूप आभार. माझ्यासाठी हा बाफं आवडलेल्या लेखांत!

दादाश्री,

विचारप्रवर्तक प्रसंग आहे तो. इतक्या चांगल्या लोकांना त्यांच्या जन्मभूमीत लुबाडणारे राज्यकर्ते निपजलेत. म्हणून बिचार्‍यांना पोटापाण्यासाठी स्थलांतर करावे लागते. भ्रष्ट राज्यकर्त्यांना सत्तेवरून हाकलून दिले गेल्याची बातमी सर्वात शुभ वर्तमान असेल.

तसेच ते विशिष्टपंथीय बघा ना किती मनमिळाऊ आहेत ते. पण अकबरुद्दिन ओवैसीसारखे समाजकंटक प्रक्षोभक भाषणे देऊन त्यांना भडकावतात. ओवैसीसारख्या तोंडाळांना चाप बसवल्याची बातमी किती शुभ असेल नाही!

आ.न.,
-गा.पै.

हर्पेन खूप छान धागा !

डिलीवरी च्या वेळेस जर मुलगी झाली तर पुण्यामधले हे डॉक्टर फ्री ट्रीट्मेंट करतात..हॉस्पिटल मध्ये मुलगी जन्माला आली कि मिठाई वाटली जाते Happy

इकडे वाचा..खूप छान वाटलं हे वाचून !

http://ibnlive.in.com/news/pune-doctor-stops-charging-fees-for-deliverin...

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18249413.cms

झटपट श्रीमंत होण्याच्या उद्देशाने एक १६ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडे पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या दोन तरुणांना देवनार पोलिसांनी अवघ्या पाच तासांतच अटक केली आहे .

शाळेच्या मैदानातून या मुलाचे अपहरण करण्यात आले होते . रामसिंग पाटील ( २४ ) आणि उमेश वर्टे ( २१ ) अशी या दोन आरोपींची नावे आहेत . दोघे पनवेलचे रहिवासी असून काही काळापूर्वी देवनार कत्तलखान्याजवळच्या एका इमारतीत ते वॉचमन म्हणून काम करत होते . त्यांना झटपट श्रीमंत होण्याच्या कल्पनेने पछाडल्यानंतर त्यांनी अपहरणाची योजना बनवली .

मंगळवारी सकाळच्या सुमारास गोवंडीतील आरबीके शाळेच्या मैदानावर खेळणाऱ्या छोट्या कुणालवर त्यांची नजर पडली . कपड्यांवरून तो श्रीमंत घरातला वाटत होता . तुझ्या वडिलांनी तुला आणण्यासाठी आम्हाला पाठवले आहे , अशी थाप मारून त्यांनी कुणालला सोबत नेले . कुणालकडून त्याचे वडील राजाराम डावरे यांचा मोबाइल नंबर घेऊन त्यावरून पाच लाखांची खंडणी मागण्यात आली . पैसे घेऊन त्यांना मानखुर्द रेल्वेस्थानकावर बोलावले . परंतु डावरे यांनी पोलिसांशी संपर्क साधल्याने पोलिसांनी सापळा रचून या दोघांना अटक केली . त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे . डावरे यांचे गोवंडीत छोटे हॉटेल आहे .

दाद - नुस्ता बाफ काढून उपयोग नाही... त्यात योगदान दिलेल्या सगळ्यांचे खूप आभार.>>> अगदी अगदी.

माझ्यातर्फेही ह्या बाफवर नवनवीन सकारात्मक बातम्या/घटना इथे शेअर करणार्‍या सगळ्यांचे मनःपुर्वक आभार!

नंदिनी +१.

(दुष्काळाला डॉक्टरांच्या मदतीचा हात >> ह्या बातमीतलं वास्तव माहीत असल्याने बातमी सुखद नाही वाटली. सरकारी नोकरीतील (बहुतांश) डॉक्टर्स स्वेच्छेने हे करत नाहीत, त्यांना करावं लागतं. पैसे नेमके कुठवर पोहोचतात हे वेगळंच.
पण ह्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. इतक्या छान धाग्यावर तर नाहीच :))

मुलगी झाल्यावर बिल न घेणार्‍या डॉक्टरांचं मात्र खूपच कौतुक वाटलं. मनात नोंद झाली आहे.

मी_पल्लवी..... यानी दिलेल्या इंग्लिश लिंकमधील त्या आगळ्यावेगळ्या बातमीचा थोडक्यात मराठी सारांश मी खाली देत आहे.......[ज्याना इंग्रजी मजकूर वाचून बातमीतील सविस्तर घटना समजून घेता येत नाही त्यांच्यासाठी.... माझ्या माहितीचे असे अनेक "वाचनमात्र" सदस्य आहेत, म्हणून.]

ADoc.jpg

डॉ. गणेश राख, मेडिकेअर मल्टिस्पेशियॅलिटी हॉस्पिटल, हडपसर [अमानोरा पार्क टाऊनशिप], पुणे.... हे त्या सामाजिक कृतज्ञता बाळगणार्‍या डॉक्टरचे आणि त्यांच्या हॉस्पिटलचे नावपत्ता.

डॉ. गणेश राख यांच्या या आदर्श उपक्रमाबाबत आकाशवाणीने त्यांची खास मुलाखत घेतली. त्यांचे वडील पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये हमाल म्हणून काम करीत, त्यामुळे अर्थातच गणेश यांच्या उच्च शिक्षणाच्या खर्चाचा प्रश्न नक्कीच उभा ठाकला होता. पण शिक्षणासोबतच पडेल ती कामे करीत, शासनाच्या शिष्यवृत्त्या मिळविण्यासाठी सातत्याने प्रत्येक वर्गात अव्वल येण्यासाठी केलेला अथक अभ्यास....या सार्‍यांचे फळ म्हणजे त्यानी प्रथम एम.बी.बी.एस. पूर्ण केले, इंटर्नशिप करतकरत एम.डी. मेडिसिनही झाले.....आणि स्वतःचे असे छोटेसे इस्पितळ उघडले. त्यांच्या लक्षात येऊ लागले की, बाळंतपणासाठी त्यांच्याकडे येणार्‍या स्त्रियाच नव्हे तर तिच्यासोबतीला आलेल्या जवळपास सर्वच महिला वर्ग 'पोरीला मुलगा होऊ दे रे देवा.....नवस फेडीन...' असाच धावा करत असत.... याचे डॉ.राख याना खूप नवल वाटत गेले. शिवाय त्या बाळंतिणीला जर मुलगी झालीच तर नातेवाईकांमध्ये आनंदापेक्षा वैताग निराशेचे भाव त्याना दिसत. नंतर दवाखान्याचे बिल भागवतानादेखील होणारी चिडचिड त्यानी टिपली.

त्यातच पुढे बीड जिल्ह्यात घडलेले ते स्त्री भ्रूणहत्येचे काळेकुट्ट प्रकरण तमाम महाराष्ट्राला माहीत झाल्यावर डॉ.गणेश राख यानी मनाशी एक निर्णय घेतला आणि सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दि. ३ जानेवारी २०१२ पासून आपल्या दवाखान्यात डिलिव्हरीसाठी आलेल्या स्त्रीला जर 'मुलगी' झाली तर तिचा हॉस्पिटलचा सारा खर्च माफ करायचा..... शिवाय ज्या दिवशी मुलगी जन्माला येईल त्यावेळी ते स्वतःच पालकाच्या भूमिकेत राहून झाडून सार्‍या इनमेट्सना, मुलीच्या नातेवाईंकाना, भेटायला आलेल्या, स्टाफला सर्वाना मिठाई वाटणे सुरू केले. हा अनोखा प्रकार पाहून त्या स्त्रीच्या नातेवाईकांनाही अर्थात आनंद होत असे आणि एक रुपयाही बिल नाही या आनंदात मुलीला घेऊन ते त्याच खुशीत आपल्या घरी जात.

३१ डिसेम्बर २०१२ म्हणजेच उपक्रम चालू केल्यापासून १ वर्षात डॉ.गणेश राख यांच्या हॉस्पिटलमध्ये अशा एकून १३५ मुली जन्माला आल्या असून यापैकी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती त्यांच्याकडूनही बिल घेण्यास डॉक्टरानी अगदी निक्षून नकार दिला आहे, हे विशेष.

डॉ.राख यांचे हे आदर्शवत कृत्य पाहून त्यांच्या अन्य डॉक्टरमित्रानाही आनंद झाला आणि मग डिलिव्हरीच्या वेळी सहाय्यक म्हणून हजर राहाणार्‍यांनी त्या गरोदर स्त्रीच्यासंदर्भात दिलेल्या सेवेचे बिल घेण्याचे थांबविले आहे. डॉ. इकबाल शेख [हे भूलतज्ज्ञ आहेत] आणि डॉ.अनिल चव्हाण.....मुलगी जन्माला आल्यास हे दोघेही सेवेबाबत एक रुपयाही घेत नाहीत.

.... खरोखरी अभिनंदनीय असे हे योगदान आहे डॉ. गणेश राख, डॉ.इक्बाल शेख आणि डॉ.अनिल चव्हाण यांचे.

पुणेस्थित मायबोलीकरांनी सुट्टीच्या दिवशी कधीतरी वेळ मिळालाच तर हडपसरच्या वर पत्ता दिलेल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन अगत्याने "मायबोली" च्या वतीने डॉ.गणेश राख यांचे प्रत्यक्ष अभिनंदन केल्यास तो एक चांगला पायंडा पडेल असे मला वाटते....त्यानाही आपल्या उपक्रमाचे असे जालीय जाहीर कौतुक होत आहे हे पाहून आनंदच होईल.

धागाकर्ते हर्पेन स्वत: पुणेकरच असल्याने [शिवाय अशा सामाजिक उपक्रमात त्यांचाही सहभाग असतोच] त्याना हे भावेल.

अशोक पाटील

हर्पेन, हार्दिक अभिनंदन....
धने, आगे बढो.... खुप अभिमान वाटतो तुझा....

डॉ. राख यांचे अभिनंदन तर आहेच. पण त्यांचे विचार त्या मुलीच्या पालकांतही रुजावेत, अशी आशाही करावीशी वाटते.
आणि हा बाफ कायम, मायबोलीच्या पहिल्या पानावर झळकत रहावा, अशी शुभेच्छा !

मन्डळी ....आजच्या सकाळ मधील ही बातमी वाचुन खरच अभिमान वाटला ....वाचा ......

बायकोच्या पीएच.डी.साठी तो बनला "वॉचमन'! मधुकर कांबळे - सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, हे सातत्याने कानावर पडते; मात्र आजकालच्या स्त्री अत्याचाराचा आगडोंब उसळलेल्या काळात एका यशस्वी स्त्रीच्या मागे तिचा पती पाय रोऊन उभा असल्याचे उदाहरण दुर्मिळच. पत्नीची पीएच.डी. व्हावी यासाठी, तिला संशोधनासाठी पैशाची कमतरता भासू नये यासाठी भीमराव गायकवाड यांनी विद्यापीठात चक्क वॉचमनची नोकरी पत्करली आणि पत्नीच्या शिक्षणाला हातभार लावला. आपल्यापेक्षा पत्नी काकणभर सरस ठरली, तर इगो दुखाऊन घेणाऱ्या पुरुषांच्या डोळ्यांत अंजन घालणारी ही सुखद घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील.

लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्‍यातील ममदापूर येथील भीमराव तुळशीराम गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागात पेपर छाननीचे काम करीत. हे करतानाच त्यांचे इतिहास विषयात एम. ए.चे शिक्षणही सुरू होते. याच वर्गात असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील वसमतच्या वंदना यादवराव कांबळे यांच्याशी त्यांचा परिचय आणि नंतर लग्न झाले. लग्नाच्या वेळी भीमरावला काही मित्रांनी नको ते सल्लेही दिले. मात्र, भीमरावने त्यांना ठणकावून सांगितले, की बायकोला "क्‍लास वन' करून दाखवीन; कारण भीमरावला होता आपल्या होणाऱ्या बायकोच्या बुद्धिमत्तेवर विश्‍वास. 2008 मध्ये लग्नानंतर एम.फील., सेट-नेटसाठी सतत दोन वर्ष प्रयत्न केले. मात्र, त्यात यश आले नाही. पुणे विद्यापीठातून पीएच.डी. करण्यासाठी दोघेही गेले. मात्र, पैशांची अडचण आल्याने औरंगाबादला परतले. पीएच.डी.च्या शोधप्रबंधाची कामे करणारे हसन इनामदार यांनी त्यांची तळमळ पाहून डॉ. झेड. ए. पठाण यांची भेट घालून दिली, तेव्हा त्यांनी भीमराव गायकवाड यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शविली, तर वंदना गायकवाड यांनाही पीएच.डी.साठी मार्गदर्शक मिळाले. मात्र, काही कारणास्तव त्यांचा या मार्गदर्शकाकडील प्रवेश रद्द झाला. या वेळी भीमरावने "माझ्याऐवजी माझी पत्नी वंदना हिला पीएच.डी.साठी प्रवेश द्यावा,' अशी विनंती डॉ. पठाण यांना केली आणि स्वत:चा पीएच.डी. करण्याचा विचार बाजूला ठेवला.

...आणि संघर्ष सुरू झाला!
दोघांच्याही घरची अतिशय प्रतिकूल परिस्थिती. भीमनगर भावसिंगपुरा येथे भाड्याने खोली घेऊन शिक्षण सुरू होते. याच काळात त्यांना कन्यारत्नही झाले. दरम्यान, या दोघांची धडपड पाहून इतिहास विभागाचे डॉ. भाऊसाहेब शिंदे यांनी वंदनाच्या संशोधनासाठी मदत व्हावी म्हणून मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळात शब्द टाकला. संस्थेचे सरचिटणीस मधुकरअण्णा मुळे यांनी तत्काळ लासूरस्टेशन येथील संस्थेच्या महाविद्यालयात वंदना गायकवाड यांना तासिका तत्त्वावर रुजू करून घेतले. मात्र, तेथेही अडचणींनी पाठ सोडली नाही. नोकरीच्या निमित्ताने लासूर येथेच राहावे लागायचे. याचा परिणाम पीएच.डी.च्या संशोधनावर व अभ्यासावर झाला. वंदनाला नाइलाजाने नोकरी सोडावी लागली. घरभाडे, लहान बाळाचा खर्च, पीएच.डी.च्या संशोधनासाठी लागणारा खर्च याचा ताळमेळ बसवताना दमछाक होऊ लागली. खूप प्रयत्न करूनही वंदना गायकवाड यांना कोणतीही फेलोशिप मिळाली नाही. यामुळे पत्नीची पीएच.डी. पूर्ण व्हावी म्हणून पैशाची गरज भागवण्यासाठी भीमराव गायकवाड यांनी सिक्‍युरिटी गार्ड म्हणून विद्यापीठात एजन्सीमार्फत काम सुरू केले. महिन्यातून किमान पंधरा दिवस अधिकची ड्युटी (ओव्हरटाईम) म्हणजे सोळा तास काम करूनही त्यांच्या हाती महिन्याला 2,850 रुपयेच पडायचे. या पगारातच तीन जणांच्या कुटुंबाचा गाडा हाकत पत्नीच्या पीएच.डी.संशोधनाचा खर्च भागविण्याची धडपड केली आणि अखेर चार वर्षांच्या संशोधनानंतर वंदना गायकवाड यांनी "भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील महाराष्ट्रीय स्त्रियांचे योगदान (1857-1947)' या विषयात शोधनिबंध सादर करून इतिहास विषयात पीएच.डी.ची पदवी संपादित केली. अर्थातच "सिक्‍युरीटी गार्ड' भीमराव गायकवाड यांच्या चेहऱ्यावर पत्नीचे पीएच.डी. पदवीचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे. इतिहास विषयात पीएच.डी. मिळविल्यानंतर वंदना गायकवाड यांनी असोसिएट प्रोफेसरची तयारी सुरू केली आहे.

पतीचे योगदान मोठे...!
""माझ्या यशात पती भीमराव गायकवाड यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी माझ्या पीएच.डी.साठी केवळ वॉचमनचेच नव्हे, तर पडेल ते काम केले. माझ्या शिक्षणासाठी मात्र त्यांनी कधीही पैसे कमी पडू दिले नाहीत. माझ्या अभ्यासाशी निगडित पुस्तके आवर्जून ते मला मिळवून द्यायचे. माझे सासरे तुळशीराम गायकवाड स्वतः अशिक्षित असूनही ते माझ्या शिक्षणाच्या आड आले नाही. त्यांनी नेहमीच शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. वेळोवेळी गावाकडून धान्य पुरवून मदत केली. मच्छिंद्र गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, घरमालक लक्ष्मण गायकवाड यांची खूप मदत झाली. घरमालकांनी तर दोन-तीन महिने झाले तरी कधी घरभाड्यासाठी तगादा लावला नाही,'' असे वंदना गायकवाड यांनी सांगितले.

अशोक जी , खरच अभिमाना स्पद आहे .....पुण्यात आल्या वर डॉ. गणेश राख, डॉ.इक्बाल शेख आणि डॉ.अनिल चव्हाण याना नक्की जाउ भेटायला .....

हर्पेन

आज माबोवर (बर्‍याच दिवसानंतर) चाळताना 'शुभ वर्तमान' चे शुभ वर्तमान कळले, अतिशय आनंद झाला. हा बाफ चालू झाल्याने एका नव्या प्रेरणेचा जन्म झाला आहे.

खुप खुप शुभेच्छा

सुनिर

हर्पेन.. हा धागा सुरू केल्याबद्दल अभिनंदन व धन्यवाद.मायबोली वर अशा छान संकल्पना राबवणारे तुमच्यासारखे उत्साही लोक आहेत..

वाचण्यासारखे बरेच काही असते मायबोलीवर. बरीच माहीती मिळते..ज्ञानांत भर पडते.

चांगल्या गोष्टी खुपच वाचनांत येऊ लागल्यात..मनाला समाधान मिळतंय.

पुण्याला भेटू...

रविवार दिनांक २७ जानेवारी रोजी आमच्या इनरव्हिल व रोटरी क्लब तर्फे आम्ही पिरकोण ह्या गावी महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजीत केले होते. त्यात आपले मायबोलीकर डॉ. कैलास गायकवाड यांच्या मेडीकल टिमने महिलांच्या आरोग्याची तपासणी केली. जनरल चेकअप डॉ. कैलास स्वतः व डॉ. रत्नेश म्हात्रे करत होते तर गर्भपिशवी व इतर समस्या असलेल्यांची तपासणी महिला रोग तज्ञ डॉ. सारीका म्हात्रे व डॉ. शबिना शेख ह्या करत होत्या. जवळ जवळ दिडशे महिलांनी ह्या तपासणीचा लाभ घेतला. पूर्ण वृत्तांत वेळ मिळताच लिहेन.

निंबकर ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (नारी) माध्यमातून डॉ. अनिल राजवंशी आणि शाश्‍वत ऊर्जा प्रा. लि.चे दीपक कान्हेरे यांचे इंधन- ऊर्जेबाबतचे प्रयोग फलटणमध्ये आकाराला आले, यशस्वी झाले. मात्र हे प्रयोग एका रात्रीत आकाराला आलेले नाहीत. ग्रामीण भागात सगळीकडे उपलब्ध असलेला जैवभार (बायोमास), इंधनपिकं आणि कोणालाही सहज वापरता येईल, असं तंत्रज्ञान ही या प्रयोगांची सामाईक वैशिष्ट्यं. ग्रामीण भागातील लोकांची जगण्याची प्रत उंचावण्याचा, त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा दोघांनाही ध्यास. त्यातूनच त्यांचे नवनवे प्रयोग सुरू आहेत.

सविस्तर बातमी,

http://online3.esakal.com/esakal/20130131/5362628202643501419.htm

तिसरी मुलगी झाल्याने गावात वाटली जिलेबी!

बीड- तिसरी मुलगी झाल्यानंतर एका पित्याने चक्क गावातील सर्वांना जिलेबी वाटून आनंद साजरा केला. मुलीच्या जन्माचे स्वागत करून या पित्याने समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.

बीड जिल्ह्यामध्ये नेकनूर गावात बाबूराव मारुती काळे (वय 30) व सारिका हे दांपत्य शेती व मजुरीचे काम करतात. या दांपत्याला वैष्णवी (वय साडेतीन वर्षे) व शिवानी (वय 2) अशा दोन मुली आहेत. मंगळवारी (ता. 29) त्यांना तिसरी मुलगी झाली. तिसरीही मुलगी झाल्याचा त्यांना आनंद झाला. गावामध्ये सर्वांना जिलेबी वाटून त्यांनी आनंद साजरा केला.

स्त्री जन्माचे स्वागत करून समाजापुढे एक आदर्श ठेवल्याने या दांपत्याचे गावामध्ये कौतुक करण्यात येत आहे.
-----

बीड मधूनच मागे स्त्रीभ्रूणहत्येच्या बर्‍याच बातम्या वाचण्यात आल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर ह्या शेतमजूर दांपत्याने किती चांगला आदर्श ठेवलाय.

धाग्यामागची भूमिका आवडली.

मो, बीडच्या त्या दांपत्याचं अभिनंदन, पण ही बातमी वाचून आनंद होण्याऐवजी आपण अजून २०१३ मधे या बातम्या सेलेब्रेट करतो आहे याचा विषादच वाटला. असो.

Pages