माझ्या चेपू वरच्या एका मित्राने टाकलेले स्टेटस अपडेट " समाजातल्या सर्व थरांमधून एक मागणी होत आहे की सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी दररोज त्यांच्या पेपर सोबत अँटी-डिप्रेसंट गोळयांचा पुरवठा करावा"
खरोखरच आजकाल चांगल्या बातम्या ऐका-वाचायला मिळतात कुठे? टीव्हीवर जाऊद्यात पण वर्तमानपत्रात देखिल चांगल्या बातम्या शोधाव्या लागतात.
मनावर मळभ आणणार्या बातम्यांचे प्रमाण इतके जास्त असते की समज व्हावा या जगात चांगले काही घडतच नाहीये. खरेतर आपल्या अवती भवती अशा अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात, ज्या कधी वर्तमानपत्रात छापून पण येतात, पण बहुदा इतर बातम्यांच्या तुलनेत खमंगपणात कमी पडल्याने त्यांची जास्त चर्चा होत नाही. अशाच काही चांगल्या बातम्यांना आपण एकाच ठिकाणी धाग्यात ओवून ठेवल्या तर त्या घटनांचा घेतलेला मागोवा / धांडोळा हा येणार्या काळात अँटी-डिप्रेसंट म्हणून काम करेल असे वाटते. कवी सुधांशु कुलकर्णी यांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे "अंधार खूप झाला पणती जपायला हवी"
http://vishesh.maayboli.com/node/1120
चला तर मग अशा काही आनंददायी / सुखद घटनांबद्द्ल समस्त मायबोलीकरांना अवगत करवूयात.
अल्पभूधारक शेतकऱ्याने शोधला
अल्पभूधारक शेतकऱ्याने शोधला शेळीपालनातून रोजगार
चांगले शिक्षण घेऊनही नोकरीचा लाभ मिळाला नाही. त्यात शेती केवळ एक एकर. त्यातून समाधानकारक उत्पन्न घेणे व कुटुंबाची गुजराण करणे अवघड होते. तरीही हताश न होता वडप (ता. मालेगाव, जि. वाशीम) येथील श्रीराम महाजन या युवकाने शेळीपालनासारख्या शेतीपूरक व्यवसायातून नवी उभारी घेतली आहे.
ही बातमी आली आहे 'अॅग्रोवन' मधे ...
श्रीराम भीमराव महाजन यांचा जन्म गोपालक समाजात झाला. या समाजात शिक्षणाचे प्रमाण तसे कमी प्रमाणातच राहते. मात्र महाजन यांनी धाडसाने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. गावतांड्यावरील एकमेव उच्चशिक्षित म्हणून श्रीराम यांच्याकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टिकोनही बदलला. त्यामुळेच शेती किंवा तत्सम व्यवसायात रमण्याऐवजी आपल्या मुलाने शासकीय नोकरी करावी अशी अपेक्षा त्याचे कुटुंबीय करू लागले. त्यादृष्टीने नोकरीसाठी अर्ज भरण्याच्या माध्यमातून प्रयत्नही सुरू झाले. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे नोकरी मिळवण्याचा हेतू साध्य होऊ शकला नाही. व्यवसाय सुरू करावा तर कुटुंबीयांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय नसताना हे धाडस कशाच्या बळावर करावे असा प्रश्नु उपस्थित होत होता. कारण महाजन कुटुंबीयांकडे वडिलोपार्जित अवघी एक एकर शेती होती. त्यातील पिकाची उत्पादकता व उत्पन्नाच्या बळावर कुटुंबाची गुजराण शक्यत नसल्याच्या जाणिवेतून पाच भावंडांपैकी चौघे मजुरी काम करत. परिणामी, श्रीराम यांनादेखील इतरांकडे मजुरी कामास जावे लागले. सर्व जण राबत असतानाच दोन वेळच्या जेवणाव्यतिरिक्त इतर दैनंदिन कामासाठी लागणाऱ्या पैशाची नेहमीच चणचण भासू लागली. या आर्थिक कुंचबणेवर मात कशी करावी या विवंचनेत हे कुटुंबीय होते.
...आणि पर्याय सापडला
विदर्भात सर्वदूर मजुरांच्या उपलब्धतेच्या प्रश्ना निर्माण झाला होता. शेतमजुरांना वाढती मागणी असल्याच्या संधीचा फायदा घेत शेतीकामासाठी मजूर पुरविण्याच्या कामात श्रीराम यांनी नशीब आजमावले. त्यातून मिळालेल्या उत्पन्नाचा विनियोग त्यांनी शेळीपालन व्यवसायासाठी करावयाचे ठरवले. सन 2011 वर्षाच्या अखेरीस त्यांनी हा निर्णय प्रत्यक्षात आणला. सुरवातीला अवघ्या सहा शेळ्यांची वाशीम बाजारपेठेतून प्रत्येकी तीस हजार रुपयांना खरेदी केली. सहा शेळ्यांच्या जोडीला पाच हजार रुपयांच्या बोकडाची खरेदीही वाशीम जिल्ह्यातील मालेगाव बाजारपेठेतून केली. या शेळ्यांच्या माध्यमातून पहिल्याच वर्षीच्या वेतातून प्रत्येकी दोन याप्रमाणे बारा पिल्ले मिळाली. त्यातील पाच नर (बोकड) असल्याने सहा महिन्याच्या वाढीनंतर वाशीम बाजारात त्यांची विक्री प्रति नग 25 हजार रुपये याप्रमाणे केली.
...आणि हुरूप वाढला
बोकडांच्या विक्रीतून चांगला पैसा मिळाल्याने याच व्यवसायात सातत्य ठेवण्याचा निर्णय घेतला. आता महाजन यांच्याकडे पाच शेळ्या आणि सात पिल्ले होती. त्यातील तीन शेळ्यांनी प्रत्येकी तीन तर नऊ शेळ्यांनी दोन-दोन पिल्ले दिली. याप्रमाणे शेळ्यांच्या प्रत्येक वेतातून मिळणाऱ्या बोकडांच्या विक्रीस सुरवात केली. प्रत्येकी 2500 रुपये याप्रमाणे 35 बोकड महाजन यांनी आजवर विकले आहेत. त्यातून सरासरी 87 हजार 500 रुपयांचे अर्थार्जन झाले आहे. त्यातून चारा, शेळ्यांवरील आरोग्यविषयक व इतर खर्च वार्षिक सरासरी 37 हजार रुपये अपेक्षित धरता साडे 50 हजार रुपयांचा फायदा या व्यवसायातून मिळाला. आजमितीस त्यांच्याकडे शेळ्या व पिल्ले यांची संख्या 25 वर पोचली असून, इतक्याक अल्पसंख्येतील पशुधनही आपल्याला चांगले उत्पन्न मिळवून देईल असा त्यांना विश्वाअस आहे. त्यामुळे याच व्यवसायात अधिक पाय रोवण्याचा त्यांचा मानस आहे. शेळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी करडा कृषी विज्ञान केंद्राच्या पशुविज्ञान शाखेचे कार्यक्रम साहायक डॉ. डी. एल. रामटेके यांचे मार्गदर्शन त्यांना मिळते. दुधाळ जनावरांच्या शेतीशाळेसाठी डॉ. रामटेके वडप गावी आले होते. या शेतीशाळेला महाजन उपस्थित होते. यातूनच या दोघांचे ऋणानुबंध जुळले आणि पुढील काळात ते अधिक घट्ट झाले.
शेळ्या वाचल्याचे समाधान
महाजन यांनी मुक्तब शेळीपालनावर भर दिला आहे. त्यामुळे गोठा बांधण्याकामीच्या खर्चात बचत झाली आहे. जनावराचे आरोग्य जपण्यासाठी वेळोवेळी लसीकरण करण्यावर त्यांचा भर असतो. सुरवातीला लसीकरणाविषयी माहिती नसल्याने एकदा त्यांच्याकडील शेळ्यांना रोगाने ग्रासले. शेळ्या दगावण्याची भीती असताना पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने उपचार केले. त्यासाठी तब्बल पाच हजार रुपयांचा खर्च झाला. मात्र वेळेत शेळ्या वाचून पुढील आर्थिक नुकसान टळले याचे समाधान मोठे होते, असे महाजन सांगतात. जनावरांचे आरोग्य ही जोखीम वगळता हा व्यवसाय फायदेशीर असल्यामुळे शेतकऱ्यांनी तो केला पाहिजे, असे त्यांचे शेतकऱ्यांना सांगणे आहे.
केवळ एक एकर शेतीत सोयाबीन, गहू यासारखी पिके घेऊन किफायतशीर शेती साधली जाणे अवघड होते. मात्र श्रीराम यांनी शेळीपालनातून शेतीला आकार देण्याचा प्रयत्न केला आहे. नोकरी मिळाली नाही, सैन्य भरतीतूनही श्रीराम डावलले गेले. मात्र हताश न होता शेळीपालनासारख्या व्यवसायातूनच नोकरीएवढा किंवा त्यापेक्षा अधिक पैसा मिळवीत नोकरीच्या मागे असलेल्या युवकांसमोर निश्चिततच नवा आशावाद निर्माण केला आहे.
सर्पदंशानंतरही 'ती' वाचली,
सर्पदंशानंतरही 'ती' वाचली, 'मैत्री'च्या औषधाने!
रमेश दीक्षित - सकाळ वृत्तसेवा
Friday, February 08, 2013 AT 01:45 AM (IST)
Tags: yavatmal, monkey, snake, vidarbha
माकडीवर केला माकडानेच उपचार; सिरसगाव शेतशिवारातील सत्य घटना
सिरसगाव-पांढरी (जि. यवतमाळ)- "ती' धरतीवर कोसळून मृत्यूच्या शेवटच्या घटका मोजत होती. आप्तेष्ट येत होते. अचानक काय बरे झाले? सारेच अवाक्! इतक्यात वैद्यराज आले. पायापासून डोक्यापर्यंत त्यांनी तिचे नाकाद्वारे व हाताने रोगपरीक्षण केले. पायाला जखम दिसताच अतिशय वेगाने वनाकडे धाव घेऊन केवळ 10 मिनिटांत "संजीवनी' आणून तिच्या जखमेवर चोळली; अन् ती पंधरा मिनिटांत मृतप्राय स्थितीतून खाडकन् उठून बसली.
ही पुराणातली किंवा चित्रपटातील कथा नाही; तर सिरसगाव-पांढरी शेतशिवारात घडलेली एक सत्य घटना आहे. फक्त ही कथा माणसांची नव्हे, तर माकडांची!
सिरसगाव येथून 1 किलोमीटर अंतरावर संत चिंतामणी टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ माकडांच्या कळपातील एका मादीला विषारी सापाने दंश केला. हे कळपातील इतर माकडांना समजताच सर्वच त्या ठिकाणी जमा झाले. व्याधिग्रस्त मादीला दिलासा देत असतानाच "मुखिया' माकड त्या ठिकाणी आले. मादीचे नाक व हाताने परीक्षण करीत असता त्याला त्या मादीच्या पायाला गंभीर जखम झाल्याचे दिसले. त्याने लगेच वनाकडे धाव घेऊन झाडपत्तीचे औषध आणले. त्या मादीच्या पायावरील जखमेस 10 ते 12 मिनिटे चोळले अन् काय आश्चर्य! ती मृतप्राय स्थितीतील मादी खाडकन् उठून बसली! हे दृश्य अनेकांनी बघितले. सत्ता, अधिकार, संपत्ती, स्वार्थापायी माणूस प्रेम, सद्भावना, दया विसरला; मात्र प्राणिमात्रांमध्ये आजही या भावना कायम असल्याचे या घटनेने सिद्ध केले. तर, अनेकांना रामायणातील हनुमानाने लक्ष्मणासाठी वनौषधींचा पर्वत आणल्याचे उदाहरण आठवले.
संकटकाळी धावण्याचा दिला संदेश
सर्पदंश झालेल्या माकडीसाठी दुसऱ्या एका माकडाने तातडीने वनौषधी आणली; अन् त्या उपचाराने माकडी बरी होऊन टणा टणा उड्या मारत जंगलात पसारही झाली. अपघात किंवा कोणत्याही संकटाच्या वेळी एकमेकांच्या मदतीला धावून जावे, असा संदेश देणारी ही घटना सिरसगाववासी ग्रामस्थांनी प्रत्यक्षात अनुभवली.
शोभा१२४, अरे वा! वेगळीच
शोभा१२४, अरे वा! वेगळीच चांगली बातमी....
चैत्राली - लिहायचे राहून गेले; पण मी देखील सकाळमधली ती बातमी वाचल्याचे आठवते आहे आणि सर्व नाही तरी प्रयोगशील छायाचित्रकारांसाठी तरी नक्कीच चांगली बातमी आहे.
व्वा...शोभे! एकदम आगळी वेगळी
व्वा...शोभे! एकदम आगळी वेगळी बातमी!
धन्यवाद शोभा..... एरव्ही ही
धन्यवाद शोभा.....
एरव्ही ही बातमी 'अशीच एक जरासी हटके....' म्हणून पूर्णपणे वाचलीही गेली नसती. पण या धाग्यावर ती आली म्हणून सविस्तर वाचल्यावर त्यातील आगळेपण प्रकर्षाने जाणवले.
तो प्रसंग पाहाणार्यापैकी कुणाकडे तरी कॅमेरा हवा होता असे राहून राहून वाटत आहे. "सोनी" आयोजित जागतिक वार्षिक फोटो स्पर्धा गटातील कित्येक फोटो मी पाहिले आहे, त्यातील विषयांचे वैविध्य पाहिल्यावर हा 'द्रोणागिरी वनौषधी' फोटो...मिळाला असता तर.... टॉपर्समध्ये आला असता.
अशोक पाटील
वा शोभा ! चांगली बातमी आहे.
वा शोभा ! चांगली बातमी आहे. मी सकाळी गडबडीत (नेहमीप्रमाणेच ) शिर्षक वाचले. आता इथे सगळी बातमी वाचली.
दादाश्री | 29 January, 2013 -
दादाश्री | 29 January, 2013 - 07:56
मला आलेला सुखद अनुभव ..
मी नेहमीच हिंदु , मराठी , महाराष्ट्रीयन, या बद्दल आग्रही अन मुस्लीम इ. विषयी खुनशी होतो.
>>
दादाश्री ही घटना मी मागेही लिहिली होती, पण परत स्मरण झाले.
माझी आई रस्त्यात जाताना पडली. डोक्याला खोक पडुन खुप रक्त वाहु लागले. नेमका त्याच दिवशी रिक्षाचा संप! रस्त्यात पण कोणी थांबेना एवढ्यात एक मुस्लिम गृहस्थ पांढरी सलवार कमीज आणि डोक्यावर टोपी, लांब दाढी, स्कुटर चालवताना थांबले आणि आईला घेउन पटकन दवाखान्यात गेले. दवाखान्यात उपचार झाल्यावर पण आईला बरे वाटत नव्हते आणि घर पण लांब होते, एवढ्यात हेच गृहस्थ परत स्कुटरवरुन आले आणि आईला म्हणाले की त्यांच्या लक्षात आले की आज रिक्षाचा संप. ते परत आईला घेउन घरी आले.
आपल्याला माणसांचे वेष, धर्म यावरुन अनेकदा पुर्वग्रह असतात पण आयुष्यात असे अनुभवच आपल्याला
यापलिकडे पाहण्यास मदत करतात.
आपल्याला माणसांचे वेष, धर्म
आपल्याला माणसांचे वेष, धर्म यावरुन अनेकदा पुर्वग्रह असतात पण आयुष्यात असे अनुभवच आपल्याला
यापलिकडे पाहण्यास मदत करतात. >> +१
धन्यवाद ! इथे लिहिल्या बद्दल निलुताई ....
शोभा , खरच काय मस्त अनुभव
शोभा , खरच काय मस्त अनुभव आहे .......
नीलीमा - दादाश्री ,
नीलीमा - दादाश्री , आप्ल्याशी मि १००% सहमत आहे......पुर्वग्रह दुषीत हे सन्कल्पना नष्ट केली पहिजे मह्न्जे सगले नितळ होयिल ...स्वच्छ.........
ऑस्ट्रेलियातील प्रशिक्षणासाठी
ऑस्ट्रेलियातील प्रशिक्षणासाठी पुण्याच्या सिद्धीची निवड
मुंबई- कुमार गटातील राज्य, राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या पुण्याच्या सिद्धी हिरे हिची ऑस्ट्रेलियातील प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.
कोच स्पोर्टसच्या सहकार्याने संपूर्ण भारतात घेण्यात आलेल्या "स्पीडस्टार' गुणवत्ता शोधमोहिमेअंतर्गत सिद्धी हिची निवड करण्यात आली. या योजनेतून 12, 14 आणि 16 अशा तीन वयोगटांतील प्रत्येकी एका मुलामुलीची निवड ऑस्ट्रेलियातील आठवड्याच्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. लंडन ऑलिंपिक विजेत्या शॅली पिअर्सन हिचे प्रशिक्षक शेरॉन हॅन्नन या सहा खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत. संपूर्ण भारतात ही गुणवत्ता शोधमोहीम राबविण्यात आली. त्यातून भारताची "स्प्रिंट क्वीन' पी. टी. उषा हिने मुंबईत के. जे. सोमय्या क्रीडा संकुलात झालेल्या अंतिम चाचणीतून या सहा खेळाडूंची निवड केली.
निवड झालेले खेळाडू ः
12 वर्षांखालील मुले ः निलेख बात्रे (मुंबई 13.31 सेकंद), मुली ः शबनम नाईक (दिल्ली, 14.04 सेकंद), 14 वर्षांखालील मुले ः पी. सिवा (हैदराबाद, 11.72 सेकंद), मुली ः सिद्धी हिरे (पुणे, 13.01 सेकंद), 16 वर्षांखालील ः मुले ः एम. एस. अरुण (चेन्नई, 11.14 सेकंद), मुली ः अनिता दास (कोलकता, 12.79 सेकंद)
क्रिकेट शिवाय इतर खेळांना असे प्रोत्साहन मिळाले की बरे वाटते.
नमस्कार मायबोलिकर, मी तसा
नमस्कार मायबोलिकर,
मी तसा माबोवर नविनच; पण धागा वाचून प्रेरणा मिळाली म्हणून लिहिण्याचा प्रयत्न करतोय.
मी आणि माझे काही मित्र जेमतेम बारावी न॑तरच आपापल्या व्यवसायाला लागलो. मात्र आमच्यातीलच
एक मित्र खुप मेहनती व हुशार होता. घरची परिस्थिती ठिक नसल्याने नववीला असतानाच मेडिकलमध्ये कामाला लागला. आम्ही बारावी पर्य॑त सोबत शिकलो. त्यान॑तर तो एकटा वगळता सर्वजण व्यवसायाला लागलो. त्याला मेडिकलच॑ शिक्षण घ्यायच॑ होत॑ पण आर्थिक परिस्थिती वाईट होती. त्याची शिकण्याची जिद्द पाहून आम्ही सर्व मित्रा॑नी त्याच्या दोन वर्षाच्या शिक्षणाचा खर्च उचलला. आज तोच मित्र एका नामा॑कित औषध क॑पनीचा एम. आर. (क्षमस्व : पर्यायी शब्द माहित नाही, कॄपया सुचवा) म्हणून तिन जिल्ह्या॑मध्ये काम करतोय आणि आम्ही सर्व मित्र आयुष्याच्या सुरवातीलाच काहीतरी चा॑गल॑ केल्याच्या समाधानाने पुढील वाटचाल करतोय.
'मानवता हाच खरा धर्म.'
हा अनुभव मी आधी पण लिहिला
हा अनुभव मी आधी पण लिहिला होता. तरीपण या बाफ वर असावा म्हणून लिहितोय.
मी गणपतीपुळ्याला काहि दिवस एका लेखनाच्या प्रकल्पासाठी राहिलो होतो. असेच एका सकाळी मालगुंडला गेलो होतो. लेखन करता करता कागद संपले, असे लक्षात आले. कुठे मिळाले तर घ्यायचे होते.
मालगुंड हे तसे निवांत गाव. दुकाने दिसत नव्हती. तेवढ्यात ५/६ मुलींचा एक घोळका, रमतगमत रस्त्यावरुन जाताना दिसला. शाळेच्या गणवेषात होत्या. पाचवी ते सातवीतल्या असाव्यात. कागद कुठे मिळतील, हे विचारण्यासाठी मी त्यांच्याजवळ गेलो. त्यातल्या एका मुलीने कसले कागद हवेत ( मला लाईनवाले फुलस्केप हवे होते.) ते विचारले आणि दुकानाचा ठावठिकाणा नीट सांगितला. मी आभार मानून निघालो.
तिने सांगितलेल्या दुकानात कागद मिळाले. परत जाताना तोच घोळका रस्त्यावर दिसला. मी मुद्दाम हॉर्न द्यायला सांगितला आणि गाडी हळू चालवायला सांगितली. गाडी जवळ आल्यावर त्याच मुलीने हात करुन गाडी थांबवायला लावली.
आणि मला विचारले, " काका, मिळाले ना कागद ?". मी हसून हो म्हणाल्यावर टाटा करुन निघूनही गेली.
मी काही बोलूच शकलो नाही.
आज दहा वर्षे झाली, मी तिचा चेहरा आजही विसरलेलो नाही. चार शब्दात बरेच काही शिकवले तिने मला.
नमस्कार, मी पहिल्यादा
नमस्कार,
मी पहिल्यादा मायबोलीच्या एखाद्या धाग्याला प्रतिक्रिया देत आहे. मी मिडिया क्षेत्रात असल्यामुळे चांगली ( याअर्थाने कि सकारत्मक )बातमी असली तरी तिला किती जागा मिळते. पहिल्या पानावर का नसते अश्या अनेक प्रश्नाची उत्तरे माहिती असून फार काही करता येत नाही. काम करताना काही नक्की चांगल्या बातम्या द्यायच्या प्रयत्न तेवढा करत असते.एखादी सकारात्मक बातमी लावण्यासाठी वरिष्ठच्या किती प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतात. त्याच वेळी एखादी खून ची बातमी किवा आता रोजच होत असलेले बलात्कार असो या बातम्या लगेच लागतात याविषयी प्रतिकिया न दिलेली बरी
माझे अनेक मित्र काही सामाजिक संस्थामध्ये काम करतात त्यातील अनेकजण समाज कल्याणसाठी नवीन नवीन प्रयोग करत असतात.मी मीडियात असून हि त्यांना योग्य प्रसिद्धी बोला किवा त्यांचे काम जगासमोर आणू शकत नाही. या धाग्यामुळे काहीना तरी नक्की न्याय देता येईल. अशी आशा आहे, यासाठी मी मायबोलीची खूप आभारी आहे.
एक चांगली बातमी
पुण्यात लीला पूनावाला आणि फिरोज पूनावाला हे लीला पूनावाला फौंडेशनच्या माध्यमातून मागील काही वर्षापासून मुलीच्या शिक्षणासाठी कार्य करत आहेत. सातवी इयत्ता पासून पदव्यूत्तर शिक्षणापर्यंत फौंडेशन गरजू आणि हुशार मुलीना शिष्यवृत्ती देत आहे. या उपक्रम अंतर्गत पुण्याजवळील गावडे वाडी या गावातील शाळेत फौंडेशनच्या वतीने फाइव स्टार शैचालाय बांधण्यात आले आहे. अनेक गावात शाळेत शैचालय नाही यामुळे मुलीना शाळा सोडावी लागते. यावर उपाय म्हणून फौंडेशनने मुलीसाठी खास सोय केली आहे. त्याच बरोबर लहान मुलाला खेळायला झोके, घसरगुंडी अश्या सुविधा मिळाव्या यासाठी शाळेला या वस्तू दिल्या आहेत. तसेच आजच्या काळाची गरज संगणकही दिले आहेत.
या सगळ्या वस्तू आणि सुविधा पाहून सगळी बच्चे कंपनी जाम खुश आहे. तशाच काही मुलीना बारावी पर्यंतच शिक्षणचा खर्च फौंडेशनच्या वतीने केला जाणार असल्यामुळे शाळेत उपस्थिती आणि पटसंख्या वाढली आहे.
या सोबत काही फोटो जोडले आहे या वरून तुम्हाला कल्पना येईल कि एखाद्या खेडेगावात फाइव स्टार शैचालाय कसे आहे.याचे त्या शाळकरी मुलांना किती अप्रू असेल .
..
पुनावाला फौंडेशनने हे चांगले
पुनावाला फौंडेशनने हे चांगले केले आहे असे पुर्णपणे म्हणता येत नाही दुर्दैवाने.
कारण हे असे करणे किती ठिकाणी शक्य आहे ? एखाद्याच ठिकाणी अगदी पंचतारांकित सुविधा देण्यापेक्षा अनेक ठिकाणी किमान चांगल्या सुविधा उपलब्ध करणे जास्त योग्य वाटत नाही का ?
महेश >> किमान चांगल्या सुविधा
महेश >> किमान चांगल्या सुविधा शासनाने पुरवायला हव्यात , <<<<पुनावाला फौंडेशनने हे चांगले केले आहे असे पुर्णपणे म्हणता येत नाही दुर्दैवाने.>>>> तुम्ही कधी शाळेतल्या सु.ल.भ. चा अनुभव घेतलाय का? मी अश्या कित्येक शाळा पाहिल्या जिथे मुली शैचालयात जाउच शकत नाहीत अन गेल्या तर भयानक वास्तवाला त्यांना सामोर जाव लागत जे या धाग्यावर लिहिण्याचा अन इथ चर्चा करण्याचा विषय नाही , माझ ठाम मत महिला वर्गाला उत्तम प्रसाधन ग्रुह हवीत नाहीतर किमान चांगली पाडली तरी चालतील
<<<अनेक गावात शाळेत शैचालय नाही यामुळे मुलीना शाळा सोडावी लागते. यावर उपाम्हणून फौंडेशनने मुलीसाठी खास सोय केली आहे.>>>>>
prayaga - खूप चांगली बातमी.
prayaga - खूप चांगली बातमी.
मी एमबीए करत असताना माझ्या बॅचला व मागेपुढे लीला-फेलोज होत्या. त्या सर्व मुलींकडून लीलामॅम बद्दल खूपच चांगले ऐकायला मिळाले. त्यांना स्वतःला अतिशय प्रतिकूल / विपरीत परिस्थितीमधे आपले शिक्षण पुरे करावे लागले होते. (माझ्या आठवणी/ माहिती प्रमाणे त्यांना पाकीस्तानातून निर्वासित म्हणून भारतात यावे लागले होते, व छावणीत राहून त्यांनी आपले शिक्षण पुर्ण केले, त्या सीओएपी, पुणे च्या पहिल्या स्त्री-स्नातक). विशेष उल्लेखनीय व महत्वाची गोष्ट म्हणजे हे फौंडेशन त्यांनी स्वतःच्या वैयक्तीक मिळकतीमधून स्थापन केलेले आहे व त्यामार्फत सर्व समाजातील होतकरू मुलींना आपले शिक्षण पुर्ण करण्यास मदत दिली जाते. लीलापुनावाला फौंडेशन बाबत अधिक माहीती या दुव्यावर मिळू शकते.
http://www.lilapoonawallafoundation.
यशाच्या कमानीवर केली ऋणांची
यशाच्या कमानीवर केली ऋणांची उतराई
कोल्हापूर - आयुष्यात उभे राहायचे असेल तर प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष ठरलेला असतो. संघर्षानंतर यश मिळते. ज्या समाजाने आपल्याला साथ दिली त्याची आठवण प्रत्येकाला राहिलच, असे नाही. पण, याला अपवाद ठरत राजारामपुरीतील सागर विरभद्र मुडलगे याने समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, रोजगार, नोकरीसंबंधी मार्गदर्शन करणारी स्वतंत्र वेबसाईट सुरू केली आहे.
सागर मुडलगे हा वडार समाजातील, तसेच घरात प्रचंड गरिबी. शिक्षण घेण्याऐवजी हातात घण घेऊन दगड फोडण्याचा पारंपरिक व्यवसाय करण्याची वेळ आली असती. पण, जिद्दीने शिक्षणाकडे लक्ष देऊन त्याने वेगळ्या वाटेने जाण्याचा निर्णय घेतला. नानासाहेब गद्रे हायस्कूलमधून तो 77 टक्के गुण मिळवून तो दहावी झाला. त्यानंतर विवेकानंद महाविद्यालयात प्रवेश घेऊन बारावीच्या परीक्षेत 81 टक्के गुण मिळवले. ग्रुपची टक्केवारी 90 टक्के इतकी होती. वेळ मिळेल तेव्हा कुटुंबाला हातभार लागावा, यासाठी छोटी-मोठी कामे केली. बारावी झाल्यावर भारती विद्यापीठात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम शाखेत प्रवेश मिळवला. प्रवेश सहजासहजी मिळाला नाही; पण अनेकांनी हात दिला. याच काळात वडील आजारी पडल्याने चार-पाच वर्षे उत्पन्न काहीच नाही पण, खर्च होत होता. पुस्तके मिळवणे कठीण झाले. या वेळी धावून आले ते कलाकल्पनाचे संजीव चिपळूणकर. त्यांनी लागणारी पुस्तके निरपेक्षपणे उपलब्ध करून दिली. याशिवाय सागरने कधी किराणा दुकानात तर कधी जिममध्ये क्लार्कची नोकरी केली. बगीचामध्ये काम केले. सॉफ्टवेअर इंजिनिअर झाल्यावरही नोकरी लागेपर्यंतच्या सहा महिन्यांच्या काळात एका महाविद्यालयात तासिका तत्त्वावर काम केले. मध्यस्थ संस्थेच्या माध्यमातून काम मिळाल्याने त्याचा मोबदलाही त्या संस्थेने दिला नाही.
आता सागरची निवड पुण्याच्या कॉग्नीझंट या सॉफ्टवेअर कंपनीत झाली आहे. केलेल्या कष्टाचे फळ त्याला मिळाले आहे. वर्षाला सात लाख रुपयांचे पॅकेज त्याला मिळाले आहे. एकाचवेळी दोन ठिकाणी निवड झाली पण, त्याने कॉग्नीझंटला प्राधान्य दिले आहे. नोकरीला हजर होतानाही त्याच्याकडे जायला पैसे नव्हते. पुन्हा चिपळूणकर यांनी हातभार लावला. आता तो कामावर रुजू झाला आहे.
ज्या परिस्थितीला तोंड देत आपण गेलो, ती लक्षात ठेवून त्याने वडार समाजातील गोरगरीब, संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व्हावे, यासाठी "वडेर असोसिएशन डॉट कॉम' ही स्वतंत्र वेबसाईट तयार केली आहे. त्यामध्ये शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या संधी, मिळणाऱ्या शिष्यवृत्ती, तसेच नोकरीच्या संधी, जॉब फेअर याबाबतची अद्ययावत माहिती उपलब्ध करून दिली आहे. त्याचा निश्चितच लाभ होणार आहे.
भरपूर टॅलेंट
आपल्याकडील मुलांमध्ये भरपूर टॅलेंट आहे. त्यांची काम करण्याची तयारीही आहे. योग्य मार्गदर्शन आणि मदत मिळत नसल्याने अनेकजण अडखळत आहेत. त्यांना मदत व्हावी व आपल्या वाट्याला आलेला संघर्ष त्यांच्याबाबतीत थोडा तरी सुसह्य व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. ग्रामीण भागातील वडार समाजातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचाही त्याचा मानस आहे.
@दादाश्री : मला काय म्हणायचे
@दादाश्री :
मला काय म्हणायचे ते कदाचित तुम्ही वेगळ्या अर्थाने घेतलेत असे दिसते.
माझे म्हणणे शौचालयाची सोय न करता इतर सोयी कराव्यात असे नव्हते.
तर "पंचतारांकित" पेक्षा किमान चांगल्या दर्जाच्या शौचालयाची सोय असावी आणि ती देखील अनेक शाळांमधे.
म्हणजे थोडक्यात काय तर "पंचतारांकित" चा खर्च विभागला गेला तर अनेक शाळांना लाभ होऊ शकेल.
वरच्या फोटोंमधे नक्की काय
वरच्या फोटोंमधे नक्की काय पंचतारांकित आहे? वॉशरूम्समधे किमान एवढ्या तरी सोयी असणे अशी अपेक्षा "पंचतारांकित" ठरते का?
सकाळ मधील एक बातमी
सकाळ मधील एक बातमी
"तिरुवल्लूवर'च्या मुलींनी बांधले विजयाचे तोरण : फुटबॉल संघात अठरापैकी पंधरा जणी अनाथ; मरियाप्पन यांनी घेतले दत्तक.
त्सुनामीच्या विध्वंसात होत्याचे नव्हते झाले. मात्र, त्यांच्या पंखात बळ भरण्यासाठी एस. मरियाप्पन पुढे आले आणि तिरुव्हल्लूव्हर विद्यापीठाचा फुटबॉल संघ तयार झाला. या संघात अठरा पैकी पंधरा मुली अनाथ आहेत. मरियाप्पन यांनी या मुलींना दत्तक घेतले. आज मुलींच्या पायातील जादू इतकी कामी आली, की अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदाला त्यांनी गवसणी घातली.
तमिळनाडूतील तिरुव्हल्लूव्हर विद्यापीठाचा संघ. विद्यापीठांतर्गत 125 महाविद्यालये येतात. मात्र, कुड्डुलोर येथील सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या तब्बल अठरा पैकी पंधरा खेळाडू विद्यापीठाच्या संघात. अंतिम सामन्यात मणिपूर विद्यापीठाला 3-1 असे नमवून या संघाने विजेतेपद मिळविल्यानंतर मुलींचा आनंद गगनात मावेना.
मरियाप्पन यांनी "सकाळ'शी बोलताना मुलींचा कष्टमय जीवनपट उलगडून दाखविला. 2006 च्या त्सुनामीच्या दणक्याने या मुली भयभीत झाल्या होत्या. समुद्रकिनारीच त्यांचे घर असल्याने घरादारासह सर्वकाही उद्ध्वस्त झाले. राज्य सरकारने वसतिगृहात ठेवून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न केला. मात्र, मुलींना आपले आई-वडील जिवंत आहेत की नाहीत, याची कल्पना नव्हती. त्यांना इतका जबरदस्त मानसिक धक्का बसला, की शासकीय वसतिगृहात असूनही या मुली धक्क्यातून सावरू शकत नव्हत्या. सेंट जोसेफ महाविद्यालयाचा प्रशिक्षक म्हणून मुलींना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. त्यांना मानसिक आधाराची गरज होती. "इंदिरा गांधी ऍकॅडमी फॉर स्पोर्टस अँड एज्युकेशन'च्या माध्यमातून फुटबॉलचे धडे देण्यास सुरवात केली.
खेळाची आवड जोपासत पंधरा अनाथ मुलींचा बाप होण्याचे भाग्य मला लाभले. ऍकॅडमीत 40 अनाथ मुलींचे संगोपन माझे कुुटुंब करते. - एस. मरियाप्पन, प्रशिक्षक
हर्पेन आणि दादाश्री
हर्पेन आणि दादाश्री धन्यवाद...
आणि महेश, तुझे मत मांडले यासाठी धन्यवाद .पण मी तुझ्यामताशी पूर्णपणे सहमत नाही. शैचालाय बंधणे हे काम सरकारच आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्व मुलांना देणे बंधनकारक आहे तरी आपल्याकडे काही शाळाना छत नाही तर काहीना चार बंधिस्त भिंती नाही, शिक्षक नाही, मग अश्या वेळी अन्य सुविधा तर खूप दूर आहेत. लीला पूनावाला फौंडेशन हि छोटी संस्था आहे. अनेक ठिकाणी या सुविधा देणे त्याची अमलबजावणी करणे याला खूप मनुष्यबळ आणि पैसे लागणार तेव्हा आपल्याला जमेल तेवढे च करताना उत्तम करणे यावर भर देत हे काम केलेले आहे.
हर्पेन आपण जी लीला मॉम विषयी माहिती दिली याबदल खूप आभारी आहे. लीला मॉम विषयी बोलाल तेवढे कमी आहे. त्यांचे कार्य खूप महान आहे. त्याच बरोबर तुम्ही जी फौंडेशनच्या माहिती साठी दुवा (लिंक ) यासाठीही खूप धन्यवाद ...
बातमी चांगलीच आहे..... पण
बातमी चांगलीच आहे..... पण काहीशी 'हटके'..... एवढ्यासाठी हटके की ही एका 'कैद्या' विषयी आहे....ज्याला फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन अॅक्टचे उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारकडून दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर त्यांना जानेवारी २००५ ते डिसेंबर २०११ या सहा वर्षाच्या काळासाठी तुरुंगवास भोगावा लागला होता.
' शिक्षा ' या शब्दाचा अर्थ 'यातना' असा न घेता ' शिक्षण ' असा घेतला तर आयुष्य बदलू शकते हे पेशाने डॉक्टर असणा-या ५७ वर्षीय भानू पटेल यांनी सिद्ध केलंय. आयुष्यातील एका अपराधाची शिक्षा भोगत असताना डॉ. पटेल यांनी तुरुंगातूनच तब्बल ३१ पदव्या मिळवल्या आहेत.
माणूस हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो असे म्हटले जाते. पण हे विद्यार्थीपण त्याने प्रयत्नपूर्वक जपावे लागते. या सा-या सुवचनांना डॉ. पटेल पुरेपूर जागले. आपल्या एका चुकीची शिक्षा म्हणून ते तुरुंगात पोहचले. पण या कारावासाचा खेद करता, त्यांनी आपले सगळे लक्ष अभ्यासावर दिले. तुरुंगातच अभ्यास करताना त्यांनी ३१ अभ्यासक्रमांच्या पदव्या मिळवल्या. त्यांच्या या अनोख्या जिद्दीमुळे ते ' तुरुंगात असताना सर्वात जास्त शिक्षण घेतलेला मनुष्य ' या अनोख्या विक्रमाचे मानकरी झाले आहेत.
पटेल यांना ' युनिक वर्ल्ड रेकॉर्ड्स ' आणि ' एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स ' या दोन संस्थांनी त्यांना विक्रमाचे प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. तसेच २०१३ च्या ' लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स ' च्या २०१३मधील आवृत्तीमध्येही त्यांचे नाव छापून येणार आहे.
पटेल यांनी आपल्या प्रवासाबद्दल बोलताना माझी शैक्षणिक पात्रता पाहून माझी ड्यूटी तुरुंगाच्या दवाखान्यात मदतनीस म्हणून लावण्यात आली होती. नंतर मला जेव्हा साबरमतीच्या तुरुंगात पाठवण्यात आले तेव्हा ग्रंथालयात मदतनीस म्हणून काम देण्यात आले होते. त्यादरम्यानच मला तुरुंग अधिका-यांनी मुक्त विद्यापीठाबद्दल माहिती दिली. माझे इंग्रजी चांगले असल्याने मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठात (बीएओयू) प्रवेश मिळ्याने मी पुन्हा कधी मागे वळून पाहिले नाही, असे सांगताना पटेल यांचा आत्मविश्वास दिसून येतो.
बीएओयूत प्रवेश मिळाल्यानंतर पुढील सहा वर्षात पटेल यांनी एम.एससी., बी.कॉम., एम. कॉम. च्या पदव्यांसहीत अनेक डिप्लोमा कोर्सेसचा अभ्यासक्रमही पुर्ण केला. त्यांची शैक्षणिक पात्रता पाहून तुरुंगवास संपल्यानंतर त्यांना याच विद्यापीठाने "काउन्सिलेट" पदावर नेमले. २०१२मध्ये असे पहिल्यांदाच झाले असेल जेव्हा एखाद्या व्यक्तीने तुरुंगात राहून विद्यापीठातील तज्ञाची भूमिका बजावली आहे.
सध्या बीएओयू मार्फत गुजरातमधील २६ केंद्रांमध्ये चालवण्यात येणा-या सर्व कोर्सेसचे समन्वय अधिकारी पदाची जबाबदारी पटेल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नेटची परीक्षा दिल्यानंतर ते विद्यापीठामध्ये शिक्षक म्हणूनही काम करु शकतील.
[हर्पेन..... का कोण जाणे मला डॉ.पटेल यांनी तुरुंगात शिक्षा भोगत असताना केलेली ही 'अनोखी कमाई' शुभ वर्तमान धाग्यासाठी योग्य आहे असे वाटल्याने इथे सविस्तर माहिती दिली आहे. तुम्हास तसेच अन्य सदस्यांना एखाद्या कैद्याविषयी इथे लिहिणे योग्य वाटत नसेल तर हा प्रतिसाद डीलेट केला तरी हरकत नाही.]
अशोक पाटील
अशोक. - 'Every saint has a
अशोक. - 'Every saint has a past and every sinner has a future' ह्या वाक्याची आठवण करून देणारी पोस्ट आहे आपली.
मला तरी ही पोस्ट ठीक वाटते आहे.
त्रिपुरामध्ये नुकत्याच
त्रिपुरामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी ९३ टक्के इतके विक्रमी मतदान नोंदविले गेले. यापूर्वीचा विक्रमही त्रिपुराचाच २००८ च्या विधानसभा निवडणुकीतील ९१.२२ टक्के मतदानाचा होता.
ओके अॅन्ड थॅन्क्स
ओके अॅन्ड थॅन्क्स हर्पेन..... तुमचे मत हे इथे सहभाग देणार्या अन्य सदस्यांचेही असू शकेल असेच गृहित धरीत आहे. [इंग्रजी कोटेशनही छानच आहे.]
@ भरत मयेकर ~ तुमचे विशेष आभार अशासाठी की 'मतदान करणे' ही बाब 'शुभ वर्तमान' सदरासाठीही येऊ शकते हे तुम्ही मानल्यामुळे. अशी जागृती सर्वत्र होणे खूप खूप गरजेचे आहे. अन्यथा मला कित्येक सुशिक्षित लोक {स्त्रियांही आहेत त्यात} माहीत आहेत की मतदानाला चला असे म्हटल्यावर जे अगदी गवारीची शेंग मोडल्यागत सहज बोलून जातात, 'ख्खाय फरक पडतोय पाटीलसर....आम्ही मतदान केलं नाही तरी...?"....आणि मारुतीचा दरवाजा उघडून बायकोला घेऊन मतदानाची सुट्टी पन्हाळ्यावर हिंडण्यात आणि खाण्यात घालवितात.....परत दुसर्या दिवशी हीच मंडळी आपापल्या कार्यालयात 'सरकार किती निष्क्रिय आहे....देशाचे भवितव्य कसे काळवंडलेले आहे..." अशी तावातावात दुसर्याच्या चहावर गप्पा हाणीत बसलेली असतात.
"९३ टक्के..." अशी आकडेवारी महाराष्ट्रात जर दिसली तर किती आनंद होईल !!
अशोक पाटील
अशोक., >> तुमचे विशेष आभार
अशोक.,
>> तुमचे विशेष आभार अशासाठी की 'मतदान करणे' ही बाब 'शुभ वर्तमान' सदरासाठीही येऊ शकते हे
>> तुम्ही मानल्यामुळे.
माझेही याच कारणानिमित्त आभार.
आ.न.,
-गा.पै.
http://zeenews.india.com/mara
http://zeenews.india.com/marathi/news/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%...
येत्या सहा महिन्यात सरकारी बँका सुमारे ५६,५०० जणांना नोकरी देणार असल्याचे गुड न्यूज समोर आली आहे. गेल्या दहा वर्षातील ही सरकारी बँकांमध्ये सर्वात मोठी नोकर भरती असल्याचे म्हटले जात आहे.
रिझर्व बँकेने नवे बँकिंग लायसन्स दिल्यानंतर बँकांमध्ये स्पर्धा वाढली असून त्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात नोकर भरती करण्यात येणार आहे.
देशातील सर्वात मोठ्या १२ हून अधिक बँकांना सुमारे ३० टक्के भरती करणार आहेत. यामुळे बँकिंग क्षेत्रातील बिझनेस इन्व्हायरमेंटर अधिक चांगले होणार असल्याचे मत बहुतांशी बँकांनी केले आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने दिलेल्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडियाला वगळता २० सरकारी बँका २२,४१५ अधिकारी आणि ३२,४३५६ क्लार्कची भरती करणार आहे. बँकांचे विस्तारीकरण आणि निवृत्ती झालेल्यांच्या जागेवर ही भरती करण्यात येणार आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडिया १५०० अधिकाऱ्यांची भरती करणार आहे.
भरत मयेकर - इतक्या संख्येने
भरत मयेकर - इतक्या संख्येने मतदान करायला बाहेर पडणारी माणसे हा त्यांचा लोकशाहीवरचा विश्वासच दर्शवतात; हे खरोखर शुभ वर्तमान आहे. ही बातमी वाचताना नजरेतून निसटली होती. चांगले वाटले वाचून!
"९३ टक्के..." अशी आकडेवारी महाराष्ट्रात जर दिसली तर किती आनंद होईल !!>> अगदी अगदी!
हो ना अशोक, मतदानाला आपण
हो ना अशोक, मतदानाला आपण "हक्क" मानतो, "कर्तव्य" नाही.
Pages