२४ सप्टेंबर हा डॉक्टर एडवर्ड बाख यांचा जन्मदिवस येऊ घातलेला आहे. बाख आणि त्यानी शोधुन काढलेली फ्लॉवर रेमेडी ही उपचार पद्धती याचा माझ्यावर खुप प्रभाव पडला. त्याच्या वापराने मी स्वतःच्या आणि इतरांच्याही जीवनात थोडाफार आनंद निर्माण करु शकले. बाखचे विचार पोचवून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा लेखन प्रपंच.
फ्लॉवर रेमेडीची जन्मकथा सुरु होते बर्मिंगहॅम जवळच्या मोस्ले नावाच्या निसर्गरम्य खेड्यात. इथच फ्लॉवर रेमेडिचे जनक एडवर्ड बाख यांचा जन्म २४ सप्टेंबर १८८६ला झाला. लहानपणापासुनच निसर्गाच वेड होत.शाळेला सुटी पडली कि ते डोंगर दर्यातुन हिंडत. प्राणी,पक्षी, वृक्षवल्लरींचे तासनतास निरीक्षण करत.त्याना आपण बरे करत आहोत अशा स्वप्नरंजनात रमत. जिज्ञासु वृत्ती, विलक्षण एकाग्रतेने निरीक्षण करुन विषय समजुन घेणे, त्या विषयाच्या मुळाशी जाउन त्यावर विचार करणे हे पहिल्यापासुन त्यांचे स्वभाव विशेष होते.
डॉक्टर होण्याच्या इच्छेला मुरड घालुन त्याना वडिलांच्या ब्रास फाउंड्रीत काम करावे लागले. निसर्गा प्रमाणे माणसांवरही प्रेम करणारे बाख कामगारांच्या समस्या पाहुन व्यथित होत. मानसिक समस्यानी ग्रासलेल्या कामगारांवर उपचार केले जातात ते त्यांच्या शरीरावर,म्हणजे परीणामावर. आजाराचे मुळ कारण तसेच राहते. त्यामुळे आजार औषधोपचारानंतरहि पुन्हा पुन्हा उदभवतात. यावरुन प्रचलित उपचार पद्धतित त्रुटी आहेत असे त्याना वाटु लागले. त्यापद्धतीच्या मूळाशी जाउन अभ्यास केल्यासच त्रुटी लक्षात येतील असे त्यांच्या मनाने घेतले. वैद्यकीय शिक्षणासाठी ते लंडनमध्ये आले.
लंडनला आल्यावर निसर्गापासून दूर आलेल्या बाखना एकीकडे शहरातील गजबज,वाहनांची वर्दळ हे तापदायक वाटे तर दुसरीकडे विविध रोग्यांशी गप्पातुन मेंदुला भरपुर खुराकही मिळत असे. त्यामुळे प्रचलित उपचार पद्धतिच्या मर्यादाविषयिच्या त्यांच्या अनुमानाला दुजोराच मिळत गेला. जेवणाचे पैसे वाचवून ते भरपुर पुस्तके घेत व अभ्यासत. यातुन आधुनिक वैद्यक,व्याधीवर उपचार करते व्यक्तीवर नाही. हे त्यांचे गृहितक अधिकाधिक पक्के होत गेले. अल्पावधितच ते एम.बी.बी. एस. झाले.डी.पी एच.(Diploma in Public Health)ही पदवीही घेतली.
इतर विद्यार्थांपेक्षा ते वेगळे होते. रुग्णांना फक्त औषधे न देता त्यांच्याशी ते गप्पा मारत. त्यांच्या दु:खावर फुंकर घालत. रुग्णही त्यांच्यापाशी आपल्या व्यथावेदना मोकळ्या करत.
एकदा एक तीव्र दमा असलेली बाई उपचारासाठी आली. अतिशय घाबरलेली.तिच्या मुलाने नॉर्थै इंग्लंडमध्ये तीन महिन्यापुर्वी नोकरी धरली होती. गेल्यापासुन त्याची काहीच खबरबात नव्हती. तो आजारी तर नसेल ना? त्याला अॅक्सिडेंट तर झाला नसेल ना? त्याचे निधन झाले असेल का? अशा नाना शंकानी तिला घेरले होते. काही दिवसानी तिने मुलगा परत आल्याची आणि जवळच नोकरी धरल्याची बातमी दिली. मुलाची काळजी संपली आणि तिचा दमाही गायब झाला.
दुसरा एक रुग्ण पोटाच्या त्रासानी ग्रासला होता. अल्सरची शक्यता वाटत होती. त्याची नोकरी गेली होती. दोन लहान मुले,पत्नी नोकरी करु शकत नव्हती. त्याला पोखरणार्या काळजीनी अल्सरच दुखण बहाल केल होत. त्याला नोकरी लागली आणि त्याचा आल्सरही कमी झाला. आज आधुनिक वैद्यकानेही काळजीने आल्सर होउ शकतो हे मान्य केल आहे. पण त्याकाळी अस मानल जात नव्हत.
अशा विविध रुग्णाना हाताळताना त्याच्या पुर्वीच्या गृहितकावर शिक्कामोर्तबच झाल. काही निरिक्षणही त्यानी नोंदवली.
दु:ख हलक करण्यासाठी मानसिक अवस्था बदलण्यासाठी त्यावर फक्त फुंकर घालणे पुरेसे नाही. विशिष्ट रोगावरील विशिष्ट औषध सर्वानाच लागु पडत नाही. ज्या रुग्णांचा स्वभाव सारखा असतो त्याना ते लागु पडते,तिच तक्रार असणार्या पण वेगळ्या स्वभावाच्या लोकाना लागु पडत नाही.
या निरीक्षणाबरोबरच आजार बरा होण्यासाठी इंजक्शनद्वारे वेदना देणेही त्याना पसंत नव्हते. सोपी, वेदनारहित,व्याधीबरोबर व्यक्तिलाहि बरी करणारी उपचार पद्धती त्याना हवी होती.
पॅथॉलॉजिस्ट व जीवजंतु शास्त्रज्ञ म्हणुन युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधे त्यांची नोकरी चालुच होती. शिवाय स्वतःच्या लॅबोरेटरीत ते प्रयोग करत. जीवजंतुशास्त्रज्ञ म्हणुन ते नावारुपाला आले.१९१३ मध्ये नोकरी सोडुन त्यानी स्वतःचा दवाखाना सुरु केला. त्यांच्या नावलौकिकामुळे रुग्णांची गर्दी वाढत होती. प्रयोग शाळेतील काम दवाखाना आणि नविन उपचार पद्धतीचा सततचा ध्यास या सर्वाच्या अतिताणामुळे ते एकदा बेशुद्ध पडले. त्यांच्या मेंदुवर शस्त्रक्रिया करावी लागली. दुखणे जीवावरचे होते डॉक्टरनी २/३ महिने जगु शकाल अशी स्पष्ट कल्पना दिली होती. यामुळे न खचता ते इच्छित संशोधनासाठी कमी वेळ आहे म्हणुन झपाट्याने कामाला लागले. मृत्यू मात्र त्यांच्यापासुन दूर पळत होता. त्या नंतर ते १८ वर्षे जगले.
१९२८ मध्ये होमिओपाथीचे जनक हनिमान यांचे ऑरगॅन हे पुस्तक त्यांच्या वाचनात आले. बाखच्या विचाराशी त्यातील विचार जुळणारे होते. व्यक्तिच्या शरीराबरोबर मनाचाही त्यात विचार केला होता. हनिमनच्या विचारात अधिक संशोधनाने भर घालावी असे त्यानी ठरवले. त्यानुसार विविध रिसर्च जर्नलमधुन शोधनिबंध लिहिले. रॉयल लंडन होमिओपाथिक हॉस्पिटलच्या प्रयोग शाळेत काही दिवस कामहि केले. प्रती हनिमन म्हणुन ते ओळखले जाऊ लागले.
इतके करुन बाखची तगमग मात्र कमी होत नव्हती. होमिओपाथीतील हजारो औषधे,त्यांच्या क्षमता हे त्याना सर्व सामान्यांच्या दृष्टीने किचकट वाटु लागले. यापेक्षाही सोपी सर्वसामान्याना स्वतःच स्वतःला बरे करता येइल अशी सोपी उपचार पद्धती त्याना हवी होती. निसर्गातील चैतन्य शक्तीतून ती मिळतील असे त्याना वाटु लागले. निसर्ग त्याना खुणाऊ लागला. शेवटी हार्वे स्ट्रीटवरील खोर्यानी पैसे देणारा चालता दवाखाना सहकार्याला देउन वेल्सच्या जंगलात प्रयाण केले. बरोबर होती सहकरी नोरा विक्स(Nora Weeks).
दूर जंगलात कोणत्याही शहरी सुविधा नसताना राहणे शारीरिक मानसिक दृष्ट्या क्लेशकारक होते, नोराला माहित होते. नोरा व्यवसायाने रेडिओग्राफर होती. लंडन हॉस्पिटलमध्ये बाखच्या हाताखाली काम करत होती. बाखचा दृष्टिकोन, सत्यशोधनाचा ध्यास,त्यासाठी लागणारी असामान्य बुद्धीमत्ता,त्याला रुग्णाबद्दल वाटणारी आत्मियता,संवेदनशिलता, इप्सित साध्याकडे पोचण्यासाठी झोकुन देऊन काम करण्याची वृत्ती आणि आपले विचार प्रत्यक्षात आणण्याची कृतिशिलता या सर्वामुळे प्रभावित झालेली होती. त्यामुळे वेल्सच्या जंगलात संशोधनासाठी जाण्यास बाखनी निमंत्रित केल तेंव्हा ती लगेच सहकार्या साठी तयार झाली. बाखच्या सर्व संशोधनात ती त्याचा उजवा हात होती,सर्व संशोधन प्रक्रियेची साक्षीदार होती. देहभान ,भुक तहान विसरुन संशोधनात गुंतलेल्या डॉक्टरांची देखभाल तिने मनापासुन केली. बाखच्या कार्यात नोराच्या निष्ठेचा,आणि निरपेक्षपणे घेतलेल्या काळजीचा खुप मोठा वाटा आहे.
वेल्सच्या जंगलातील निसर्गाच्या सहवासात बाख यांच्या प्रतिभेला बहर आला. लहानपणापासुन निसर्गाच्या सहवासात राहिल्याने विविध वनस्पतींची त्याना ओळख होती. वनस्पतीची बीजे फुलात असतात त्यामुळे वनस्पतीचे सर्व गुण फुलात असले पाहिजेत अशी अटकळ बाखनी बांधली. त्यानुसार संशोधन सुरु केले. पहिले फुल सापडले इंपेशन्स,नंतर मिम्युलस्,त्यानंतर क्लेमॅटीस....
या फुलापासुन तयार केलेल्या औषधाचा त्यांच्या दवाखान्यातील रुग्णावर वापर सुरु केला. परिणाम आश्चर्यजनक होता. बाखचा हुरुप वाढला.आपल्याला हवी तशी औषधोपचाराची नविन सोपी पद्धत आपण शोधली आहे असे त्याच्या लक्षात आले. वेळ काळ ,तहान भूक कशाचीच तमा न बाळगता ते कामाला लागले. निसर्गाशी तदात्म्य पावले. त्यांची ज्ञानेंद्रिये अतीसंवेदनशिल बनली. इतकी की इतराना न दिसणार्या गोष्टी त्याना दिसु लागल्या. स्पर्श ज्ञान सुक्ष्म झाले. झाडांची स्पंदने त्याना जाणवू लागली. एखादे फुल तळहातावर,जिभेवर ठेवले तरी त्या फुलांचे गुणधर्म जाणवू लागले. शेवटी शेवटी आपल्या स्वतःच्या मनाची नकारात्मक संवेदना जागवून विविध फुले त्या अवस्थेत हाताळुन त्यानी स्वतःवर प्रयोग केले. औषधातील सुप्त गुणांचा शोध लावला. मनाच्या भीती, साशंकता, अनिश्चितता, एकटेपणा, उदासिनता, नैराश्य, अतिसंवेदनशिलता, इतरांची अवास्तव काळजी अशा सात नकारात्मक अवस्थांची ३८ औषधे शोधली. आणि त्याद्वारे उपचाराची सोपी पद्धतहि. शुद्ध पाणी,ऊन, फुललेली फुले आणि स्वच्छ् काचेचे भांडे एवड्याच साहित्याच्या आधारे हि तयार करता येणार होती. शेवटचे अडतिसावे औषध शोधल्यावर त्यानी जाहिर केले. सर्व नकारात्मक भावनावर औषधे शोधली आहेत. या औषधाच्या आधारे त्यानी हजारो व्यक्तींवर यशस्वी उपचार केले. पुस्तके लेख याद्वारे हि ज्ञान गंगा लोकांपर्यन्त पोचवली.
लंडनमधील मेडिकल असोशिएशनने हे सर्व गैर असल्याची अनेकवेळा ताकिद दिली. पण बाखने त्याकडे लक्ष दिले नाही. जंगलात राहुन त्यानी जे कष्ट घेतले त्याचा शरीरावर व्हायचा तोच परीणाम झाला. २७नोव्हेंबर १९३६ ला शांत झोपेत त्यांचे निधन झाले.
'Heal Thyself 'म्हणजे स्वतःच स्वतःला बरे करा या पुस्तकातुन त्यानी आपले फ्लॉवर रेमेडी विषयीचे विचार मांडले.त्यानुसार आजाराचे स्वरुप समजण्यासाठी काहि मुलभूत तत्वे पुढीलप्रमाणे :
१) व्यक्तीचा स्व म्हणजे फक्त बाह्य शरीर नाही तर आत्मा ही आहे. आणि हा स्व परमेश्वराचा एक अंश आहे. तो अमर आहे. शरीर हे फक्त साधन आहे. प्रवासात घोडा वापरतात.प्रवास संपला की त्याच काम संपत. तस शरीराच आहे.
२) निसर्ग पूर्णत्वाकडे जाणारा. आत्मा हा त्याचाच एक अंश आहे.
३) आत्म्याच निसर्गाशी संतुलन होत तेंव्हा आनंद मिळतो. चांगले आरोग्य मिळते. तुम्ही राजा असा रंक असा,गरीब असा वा श्रिमंत. जोपर्यंत तुम्ही आत्म्याच्या इशार्यानुसार चालता तोपर्यंत सर्व चांगले असते. तुमचा योग्य विकास होतो.
४) सर्व चराचर विश्वात एकत्व असते. वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या वाटल्या तरी त्या पुर्णाचा एक भाग असतात त्यामुळे स्वतःविषयी क्रिया किंवा दुसर्याविरुद्धच्या क्रियेचा परिणाम पुर्णाबाबत होतो त्यामुळे स्वत्;शी परात्मता निर्माण होणे आणि दुसर्याशी निर्दयपणे वागणे, यातुन संघर्ष निर्माण होतो आणि हा संघर्ष आजार निर्माण करतो. हि चूक सुधारली तर शांतता आणि आरोग्य लाभत.
५) आजाराच्या स्वरुपावरुन तो एकतेच्या विरोधात कोणत्या क्रियेने गेला हे समजु शकत. उदा.भीतीने आल्सर्, द्वेषाने थायमस ग्लँडवर परिणाम होतो; थायमस ग्लेंड नीट काम करत नसेल तर प्रतिकार शक्तीवर परिणाम होतो. अभिमान,उद्धटपणा,मनाचा ताठरपणा यांचा परीणाम शरीरात ताठरपणा र्निर्माण करणारे आजार होण्यात होतो.
६) आजार एका परीने फायद्याचा. कारण तो स्वकडे जाण्याचा मार्ग असतो.आपली चूक समजली तर आपण आजाराचा प्रतिकार करु शकतो. आजार टाळु शकतो.
७) चूक सुधारण्यासाठी त्या चूकीच्या विरुद्धचा गुण आत्मसात करावा. उदा.स्वप्रेम हे अनेक आजारांचे मुळ आहे. सर्वांवर प्रेम करणे हा त्याविरुद्धचा गुण आत्मसात करुन ती चूक सुधारावी. स्वतःच्या हिताबरोबर मानवतेच्या हितात ती चूक परिवर्तीत होऊन दु:खे कमी होतील.
आपले विचार लिखित स्वरुपात लोकांसमोर मांडुन झाल्यावर त्यांनी आपली सहकारी नोरावर सर्व जबाबदारी सोपवली. आणि या उपचार पद्धतीत अपेक्षित साधेपणाला - सोपेपणाला धक्का लागु देउ नये असे सांगितले. नोरानेही सहकारी व्हिक्टर बुलेन(Victor Bullen) यांच्या सहाय्याने वेळोवेळी येणार्या अमिषाला बळी न पडता बाखची अपेक्षा पूर्ण केली.
बा़खच हे काम दैवी वाटाव; संतत्व बहाल कराव अस होत. पण बाखला स्वतःलाच अशी व्यक्तिपुजा मान्य नव्हती.तो स्वतःला निसर्गाचा एक अंशच मानत होता. निसर्गाकडुन म्हणजे त्याच्या देवाकडुन त्याचा साधन म्हणुन वापर केला गेला अशीच त्याची भूमिका होती. आपल्यानंतर आपले स्तोम माजवू नये असे त्यानी निक्षून सांगितले. या त्याच्या अपेक्षेचा मान सहकार्यानीही राखला. आजही बाख सेंटर त्यानी घालुन दिलेल्या मार्गावर चालू आहे.
बाखचे विचार आणि त्यानी शोधलेली नविन उपचार पद्धती आज जगभर प्रचलित आहे. 'Medicine of the future' ही त्याची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली आहे.
संदर्भः
१)Heal Thyself- Edward Bach
2)The Bach Flower Remedies Step by Step - Judy Ramsell Howard
3)Question & Answer - John Ramsell
४)पुष्पज औषधी - आसावरी केळकर, डॉ.सचिन देशमुख
टीपः
मंगळवार २ ऑक्टोबर २०१२ पासुन ३ नोव्हेंबर २०१२ पर्यंत फ्लॉवर रेमेडी वर्ग सुरु करत आहे.
वेळ : दुपारी ४ ते ५.३०
स्थळ : सॅलेसबरी पार्क, पुणे.
मंगळवार आणि शनिवार असे हे वर्ग असतील.
नाममात्र शुल्क आकारण्यात येइल. बाखचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणे हा हेतू आहे.
इच्छूक असणार्यानी संपर्कातून ईमेल धाडावी.
छान लेख. गेली काही वर्षे या
छान लेख.
गेली काही वर्षे या उपचार पद्धतीबाबत खुप वाचतो आहे. अजून अनुभव घेतला नाही..
स्वभावावर औषध सापडले म्हणायचे, एकदाचे.
वा वा वा शोभनाताई - किती
वा वा वा शोभनाताई - किती सुरेख ओळख करुन दिलीत या बाखसाहेबांची व त्यांच्या कार्याची......
खूप आवडला हा लेख......
ह्या विषयावर लेखमाला होउन
ह्या विषयावर लेखमाला होउन जाउदे
अवलने ह्या विषयावर मागे
अवलने ह्या विषयावर मागे तिच्या अनुभवांवर आधारीत एक लेख लिहिला होता असे पुसटसे आठवतेय.
छान लेख मंगळवार २ ऑक्टोबर
छान लेख
मंगळवार २ ऑक्टोबर २०१२ पासुन ३ नोव्हेंबर २०१२ पर्यंत फ्लॉवर रेमेडी वर्ग सुरु करत आहे.
वेळ : दुपारी ४ ते ५.३०
मंगळवार आणि शनिवार असे हे वर्ग असतील.
स्थान >>>> ???????
स्थान कुठे ते सांगितलेच नाही.
स्थान कुठे ते सांगितलेच नाही.
धन्यवाद सर्वांना. अनुसया, बी
धन्यवाद सर्वांना.
अनुसया, बी दुरुस्ती केली. धन्यवाद
वा ! मी येणार शोभना
वा ! मी येणार शोभना
सुंदर परिचयात्मक लेख.
सुंदर परिचयात्मक लेख.
सुरेख लेख!
सुरेख लेख!
शोभनाताई खूप धन्यवाद या
शोभनाताई खूप धन्यवाद या माहितीबद्दल आणी मागील लेखात मला उत्तर दिल्याबद्दलही. या पुष्पौषधी मुळे खरच फरक पड्तो हे मला परदेशात माझ्या तेथील मैत्रीणींमुळे कळले.
मला आशा आहे की याची माहिती दूरवर पसरुन अनेकांना त्याचा फायदा होईल. तुमच्या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा.
व्वा!!फारच सुंदर ओळख करून
व्वा!!फारच सुंदर ओळख करून दिलीस ताई..
माझ्या वेळेचं गणित जमलं तर येईनच नक्की..
छान माहिती करून दिलीत
छान माहिती करून दिलीत शोभनाताई! अनेक डॉक्टरांकडून फ्लॉवर रेमेडीज मुळे त्यांना पेशंट्सच्या उपचारांत येणारे यश व पेशंटना जाणवणारा फरक याबद्दल ऐकले आहे. मी स्वतः काही काळ फ्लॉवर रेमेडीजचा अनुभव घेतला आहे. वडिलांकडूनही ऐकले आहे याबद्दल. बाखचे नाव घेतले की ते बाखला त्याच्या संशोधनाबद्दल साष्टांग नमस्कारच घालायला पाहिजेत असे सांगतात.
लेख वाचल्याबद्दल सर्वाना
लेख वाचल्याबद्दल सर्वाना धन्यवाद.याविषयावर आणखि लिहिण्यास हुरुप आला.
अरुंधति तुझ्या वडिलांच्या मताशी एकदम सहमत आहे.औषधाला आलेला गुण पाहता माझ्या तोंडुनही हेच उदगार अगदी रोज निघतात.निघतात.
लंडनमधील मेडिकल असोशिएशनने हे
लंडनमधील मेडिकल असोशिएशनने हे सर्व गैर असल्याची अनेकवेळा ताकिद दिली. पण बाखने त्याकडे लक्ष दिले नाही.
वावावा!
मस्त. खुप छान माहिती.
मस्त. खुप छान माहिती.
शोभनाताई, छान लेख आहे. ही
शोभनाताई, छान लेख आहे. ही औषधे सर्रास मिळतात का की कसे?
सुनिधी,भारतात हि
सुनिधी,भारतात हि होमिओपाथिच्या दुकानात मिळतात.अमेरीकेत नेमकी कुठे मिळतात मला माहित नाही पण ऑनलाइन मिळतात. माझी मुलगी मागवते.न्युयॉर्कला कोलंबिया युनिव्हर्सिटीजवळ एक दुकान आहे.तशिच इतरत्रही असतील.
गंभीर आजार असेल तर वैज्ञानीक
गंभीर आजार असेल तर वैज्ञानीक पद्धतीने सिद्ध झालेलीच औषधपद्धती वापराल अशी आशा आहे. शरीर आणि मन कनेक्टेड असतंच, त्यामुळे छोट्या-मोठ्या आजारांना कोणतेही नौषध वापरले तरी मनाला आणि त्यामुळे शरीराला आराम मिळु शकेल.
धन्यवाद ashing आधुनिक
धन्यवाद ashing आधुनिक वैद्यकाला हा पर्याय असा फ्लॉवर रेमेडी या उपचार पद्धतीचा अजिबात दावा नाही ही पुरक उपचार पद्धती आहे.शरीर आणि मन कनेक्टेड असत हे तुम्ही सांगितलच आहे.गंभीर आजारातहि रुग्णाची जगण्याची इछ्याच संपुस्टात आली तर औषधाचा उपयोग होण कठीण होत. गंभिर आजाराला स्विकारण, त्याबद्दलची हतबलता वैफल्य घालवण.रुग्ण डॉक्टरना आणि त्याच्या बरोबरीच्याना सहकार्य करेल या पातळिवर त्याची मनोवस्था आणण,वेदना असतील तर त्या सहन करण्याची ताकद वाढवण अशा बाबींसाठी फ्लॉवर रेमेडी गंभिर आजारातही उपयोगी आहे.तुमच्या प्रश्णामुळे माझ्या लेखातुन निसटलेला मुद्दा सांगता आला त्याबद्दल पुना: एकदा धन्यवाद.
शोभनाताई, या औषधांची नावं
शोभनाताई, या औषधांची नावं देता येतील ़की फक्त प्रीस्किप्शन लागतं?
शोभनाताई, या प्रकारच्या
शोभनाताई, या प्रकारच्या औषधाला कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत हे बरोबर ना? तसेच यांपासून कोणाला कधी इजा, हानी पोचल्याचेही ऐकिवात नाही. तुम्ही वर म्हटलंय तसे हे पूरक उपचार आहेत, ते प्रमुख उपचारांची जागा घेऊ शकत नाहीत हे ध्यानी ठेवणे महत्त्वाचे हेही पटलेच! जेव्हा आधुनिक वैद्यकशास्त्र ''अमक्या आजारावर आमच्यापाशी कायमस्वरूपी उपाय नाही'' असे म्हणते, किंवा एखाद्या रुग्णाला ''आम्ही तुम्हाला बरे करू शकत नाही, फार तर तुमच्या वेदना कमी करू शकतो'' असे सांगते तेव्हा पर्यायी उपचारपद्धतींकडे वळण्याशिवाय रुग्णालाही अन्य मार्ग दिसत नाही. आधुनिक वैद्यकशास्त्रात औषधयोजना करताना त्यात रुग्णाच्या मनस्थितीचा काहीच विचार केलेला दिसत नाही. त्यात फक्त शारीरिक पातळीवर उपचार होतात. मनावर उपचार करू शकणारे औषध मानसिक दिलासा देण्यात यशस्वी होते.
फ्लॉवर रेमेडीची काही औषधे मी
फ्लॉवर रेमेडीची काही औषधे मी वापरली आहेत आणि मला त्यांचा उत्तम असा रिझल्ट मिळाला आहे.
छान लेख. माझ्याकडे वॉलनट व
छान लेख. माझ्याकडे वॉलनट व रेस्क्यु रेमेडी आहे.. उपयोगी वाटतात!
सुनिधी , अॅमेझॉनवर तर आहेच. प्लस, नॅचरल फुड्स दुकान असेल गावात तर शोध.. होल फुड्स मध्ये मी होमिओपथिची पाहीली होती ओझरती.
छान माहिती. या औषधांचा कायम
छान माहिती.
या औषधांचा कायम चांगला अनुभव घेतलेला आहे.
छान माहिती
छान माहिती शोभनाताई.धन्यवाद!!
अमेरिकेत Vitamin Shoppe मध्ये होमियोपॅथी आणि फ्लॉवर रेमेडीची औषधे मिळतात.
मनी यासाठी प्रिस्क्रिप्शन
मनी यासाठी प्रिस्क्रिप्शन लागत नाही.पिन्गु ,बस्के, म्याउ,पुर्वा, माहितीबद्दल धन्यवाद.भारतातुन अमेरीकेत किंवा इतर देशात जाणार्याना आणि काही दिवसासाठी भारतात आल्यावर वालनट नक्कीच उपयोगी पडत.कारण वालनटला चेन मेकर आणि चेन ब्रेकर म्हटल जात. हवामान, खाण,माणस,कल्चर सर्वांशी अॅडजस्ट करायला ते उपयोगी आहे.प्रत्येक औषधावर स्वतंत्रपणे लिहिनच.
अरुंधती या औषधाना साइड इफेक्ट नाहीत हे बरोबर आहे.मला तरी आत्तापर्यंत असा एकही अनुभव आला नाही.गरोदरपणात आणि तान्ह्या बाळालाही देता येतात.
अरुंधती लिहितालिहिता
अरुंधती लिहितालिहिता नेहमिच्या सवयीप्रमाणे सेव्ह केल तर पोस्टच झाल.तु लिहिल्याप्रमाणे बरेचजण अॅलोपाथीचे उपचार संपल्यावर इतर काहितरि पहायचे म्हणुन फ्लॉवर्रेमेडिकडे येतात.आणि त्याना उपयोग होतॉ.बेडवेटिंग त्वचाविकार याबाबत असे काहि अनुभव आहेत.झोप न येणार्यानाहि चांगला अनुभव आहे.प्रत्येक उपचार पद्धतीची काही बलस्थान काही मर्यादा आहेत.कोणिच कोणताच अभिनिवेश न ठेवता गरजेनुसार एकमेकाचा आधार घेण चांगल नाही का?व्याधी बरी करण्यासाठी विविध पाथीचे लोक एकत्र येउन पुर्णोपचाराचा वापर करणे अनेकाना पटलेले आहे.यात फ्लॉवर रेमेडीचाहि समावेश करतायेइल.केला जात असेलही मला माहित नाही.
फ्लॉवर रेमिडीज च्या औषधांना
फ्लॉवर रेमिडीज च्या औषधांना क्लिनिकल ट्रायलचा सपोर्ट नाही. प्लासेबू इफेक्ट पेक्षा जास्त इफेक्ट नाही असे दिले आहे.
अमा, तसेच मला म्हणायचे होते.
अमा, तसेच मला म्हणायचे होते. होमिओपॅथी आणि बाख रेमेडीजसारख्या उपचार पद्धतींमधे वैयक्तीक लक्ष भरपुर दिले जाते त्यामुळे लोकांना (त्यांच्या मनाला) जास्त आधार वाटु शकतो. त्यामुळे जर व्याधी सायकॉलॉजीकल असेल तर आराम पडणाच्यी शक्यता असणार. पण त्यापेक्षा वेगळं (उदा. मधुमेह्, हृदयविकार, कर्करोग वगैरे) असेल तर ते रोग अशा पॅथीजनी बरे होण्याची शक्यता नाही. अशा वेळी अॅलोपॅथीकडे वळणेच उत्तम (ते तुमच्या छोट्या-छोट्या सिम्टम्स ची विचारपुस करत नसले तरी - तसे करणेही पुढे मागे येईल, पुर्ण जीन सिक्वेन्सींग बरोबर).
Pages