मैं तवायफ़ हूँ, मुजरा करुँगी

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

नगरवधू, देवदासी, तवायफ़ - काल आणि संस्कृती कोणतीही असो; वेगवेगळ्या नावानी या स्त्रिया समाजाचे (म्हणजे मुख्यतः पुरुषांचे) रंजन करत आल्या. या सगळ्या स्त्रियांचं खरं काम खरोखरच रंजन करणे इतकेच अपेक्षित होते, कारण या सगळ्या चित्रकला, नृत्य, गायन, काव्य, संभाषण या आणि अशा कलांचा अभ्यास असलेल्या. तेच त्यांचं उपजिविकेचं साधन. पण दुर्दैवाने त्यांचं नाव मात्र निगडित झालं ते समाजाने आणि परिस्थितीने त्यांच्यावर लादलेल्या दुसऱ्याच एका गोष्टीशी! त्यांच्यातले हे गुण जणू समाधान करायला अपुरे पडल्यासारखे त्यांच्यावर भलतेच काम लादले गेले आणि नगरवधू, देवदासी, तवायफ़ हे सगळे शब्द वेश्याव्यवसायाशी जोडले गेले. साधारणपणे चित्रपट हे सामाजिक जीवनाचा आरसा असतात, त्यामुळे हिंदी चित्रपटातली 'तवायफ़' ही नृत्य-गान (क्वचित काव्य) निपुण असली तरी मुख्यतः आपल्यासमोर येते वेश्येच्या स्वरुपातच. काही अपवाद वगळता हिंदी चित्रपट गाण्यांशिवाय पुढे सरकतच नाही आणि कधी कधी ते शब्द या तवायफ़ची कैफियत आपल्यापर्यंत पोहोचवतात. अश्याच काही मुजरा नृत्य-गीतांची ही आठवण...

अगर दिलवर की रुसवाई हमें मंजूर हो जाए (खिलौना) - चित्रपटाची श्रेयनामावली पूर्ण होता-होताच हा मुजरा सुरू होतो. नायिका चाँद तिच्या कोठ्यावर जमलेल्या मैफिलीत नाचते-गाते आहे. मैफिलीत चित्रपटाचा खलनायक बिहारीही बसलेला. विशेष म्हणजे चाँदची भूमिका तवायफ़ या संकल्पनेशी अगदी मिळती-जुळती - नृत्य आणि गायन एवढंच तिच्या चाहत्यांना तिच्याकडून मिळतं. पण तरी ती समाजाला जणू व्यवस्थित अोळखत असल्यासारखी, म्हटलं तर नुसताच मुजरा, म्हटलं तर बिहारीला (शत्रुघ्न सिन्हाचा हा अगदी सुरुवातीच्या काळातील चित्रपट, जेव्हा त्याच्या वाट्याला जास्त करुन खलनायकाच्या भुमिकाच येत असत; त्याचं व्यक्तिमत्वही या भुमिकांना साजेसं होतं.) उद्देशून अश्या तऱ्हेने हा मुजरा लिहिला गेला आहे. वानगीदाखल हे शेवटचं कडवं बघा -

तेरे रंगीन होठों को कँवल कहने से ड़रते है
तेरी इस बेरुखी पे हम गज़ल कहने से ड़रते है
कहीं ऐसा न हो तू अौर ही मगरूर हो जाए

चाँदच्या भूमिकेतील मुमताज़ने मुजऱ्याच्या सगळ्या अदा छान दाखवल्या आहेत. आनंद बक्षी अत्यंत हरहुन्नरी गीतकार. भले त्यांना साहिर, कैफ़ी आज़मी, शैलेंद्रसारख्या हळव्या कवीचा दर्जा मिळाला नसेल पण चित्रपटासाठी गीतं लिहिण्याची कला निश्चितच त्यांच्याकडे होती आणि खिलौना सारखं जोरकस कथानक असेल तर चित्रपटाच्या कथेत त्यांची गीतं अशी काही सामावून जात की जणू ती पटकथेचाच भाग असावीत. तीच गोष्ट संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांची. बाकी गायिकेबद्दल काही लिहा-बोलायचं कोणाकडेच शिल्लक नाही. मागे एका लेखात लिहीलं होतं की लता आपलं सगळं आयुष्य जणू गाण्यांमधुन जगली पण मुजरा हा समाजातील काही दुर्दैवी स्त्रियांच्या नशीबाचा भोग. त्यामुळे त्यातलं आवाहन, गायकी, वेदना आपल्या आवाजात पकडणं ही तर सर्वसामान्य अनुभवाच्या पलिकडची गोष्ट. लताच्या गळ्याला काहीच अशक्य नाही हे माझं मत या अश्याच गाण्यांनी बनलं आणि पक्कं झालं!

साक़िया आज हमें नींद नहीं आएगी (साहिब, बीबी अौर ग़ुलाम) - गुरु दत्त या अतिशय मनस्वी चित्रपटकाराने जे काळाच्या कितीतरी पुढे असलेले अनेक अनमोल हिरे रसिकांसमोर मांडले त्यातला एक - साहिब, बीबी अौर ग़ुलाम. नाईलाजाने नायक बनलेला हा कलाकार पडद्यावर मात्र इतक्या प्रभावीपणे वावरला की त्या भूमिका साकारायला काही कारणाने का असेना पण त्याला मनाजोगता दुसरा नट मिळाला नाही हे प्रेक्षक म्हणून आपल्या पथ्यावरच पडलं. त्यामुळेच प्यासा, कागज़ के फूल, साहिब बीबी अौर ग़ुलाम, चौदहवी का चाँद अश्या हळव्या, मनस्वी भूमिकांमधला गुरु दत्त जसा आपल्याला पहायला मिळाला, तसाच आर पार, मि. अँड मिसेस ५५, बाज़, 12 O'clock यासारख्या कमर्शियल चित्रपटातही तो तितक्याच सहजतेने वावरला.

साहिब, बीबी अौर ग़ुलाम हा चित्रपट अनेक अर्थांनी गाजला; अगणित पारितोषिकं मिळवून गेला. त्यातल्या मोहिनी सिंदुराचा उपयोग होत असेल नाही तर नसेल, पण प्रेक्षकांवर मात्र जादू, भूल जी १९६२ साली पहिल्यांदा पडद्यावर पडली त्यातून चित्रपट पाहणारा कधीच बाहेर येत नाही. खेड्यातून पहिल्यांदाच शहरात आलेला भूतनाथ जसं भारावून जाऊन वावरतो, तीच भुरळ आपल्यावरही पडते. ही जादू नक्की कशाची? बिमल मित्रांच्या कथेची? अब्रार अल्वींच्या दिग्दर्शनाची? हेमंत कुमार च्या संगीताची? व्हि. के. मूर्तींच्या छायाचित्रणाची? बिरेन नाग यांच्या कलादिग्दर्शनाची? की तवायफ़ म्हणून चौधरींच्या वाड्यावर मुजरे सादर करणाऱ्या मिनू मुमताज़ पासून धुमाळ, सप्रु, वहीदा रहमान, नासिर हुसेन या मधल्या फळीच्या कलाकारांद्वारे रहमान (साहिब), मीना कुमारी (बीबी) आणि ग़ुलाम (स्वतः गुरु दत्त) इथपर्यंत प्रत्येकाच्या कमाल अभिनयाची? खरं तर या सगळ्यांचीच! काळाची पावलं न अोळखता आपल्या श्रीमंतीच्या, मदिरेच्या आणि मैफिलींच्या धुंदीत हरवलेलं आणि वाताहात झालेलं जमीनदाराचे कुटुंब, त्यातले पुरुषांचे आणि स्त्रियांचे वेगळे विश्व, आपल्याच नवऱ्याच्या सहवासासाठी तडफडणारी, त्यासाठी काहीही करायला तयार असलेली हतबल छोटी बहू - अापल्यासाख्या सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी हे जग अद्भुत वाटण्याइतकं अपरिचित पण त्यातल्या पात्रांची मानसिकता मात्र आपण कायम आपल्या अवती-भोवती पाहतो, कधी अनुभवतोही... मला स्वतःला विशेष भावतं ते पडद्यावर चित्रित केलेलं भूतनाथ (गुरु दत्त) आणि छोटी बहू (मीना कुमारी) यांच्यातलं नातं - चित्रपटभर हे नातं मैत्री आणि आकर्षण यांच्यातल्या सीमारेषा धुसर करत राहतं. या नात्याची ही दोलायमान स्थिती महाभारतापासून आजवर तशीच आहे.

मिनू मुमताज ही अतिशय कुशल नृत्यांगना. त्यामुळे हा मुजरा आशाच्या आवाजाने जितका आपल्यापर्यंत पोहोचतो, तितकाच नृत्यामुळेही. आशा नुसत्या आपल्या आवाजाच्या करामतीवर पूर्ण मुजरा आपल्या डोळ्यांसमोर उभा करते. सगळ्या ताना, हरकती, मुरक्या, गाणं म्हणण्याची अदाच सांगते हा मुजरा आहे...

एक तू है पिया, जिस पे दिल आ गया (प्राण जाये पर वचन ना जाये) - डाकू हा चित्रपटाचा हिरो असलेल्या चित्रपटांची लाटच एकदा येऊन गेली. अर्थात हिंदी चित्रपटाचा नायक म्हटल्यावर काहीतरी अन्यायाचा बदला घेण्यासाठी किंवा आजुबाजुच्या लोकांचे हाल न पाहवून रॉबिन हूडगिरी करणारे डाकूच सहसा बघायला मिळतात. साहजिकच, दुष्ट किंवा समाजावर अन्याय कराणारे श्रीमंत लोकच अश्या डाकूंचे शत्रू असतात. त्यातलाच 'प्राण जाये पर वचन ना जाये' असा जणू 'रघुकुल रीती सदा चली आयी' हे कलीयुगातही कसे पाळले जाते हे दाखवणारा हा चित्रपट. याचा नायक राजा ठाकूर एक डाकूगिरी सोडली तर सद्गुणांचा पुतळाच! अगदी तत्त्वनिष्ठ, चुकूनही गरिबांना न लुटणारा, उलट त्यांना मदत करणारा, स्त्रीला मान देणारा, मुख्य म्हणजे एकदा शब्द दिला की तो पाळण्यासाठी अगदी आपल्या जीवाचीही पर्वा न करणारा. सुनील दत्तच्या अभिनयाबद्दल बरीच वेगवेगळी मतं आहेत, पण या अश्या रांगड्या भूमिकेला साजेसं व्यक्तिमत्त्व त्याच्याकडे नक्कीच होतं आणि या भूमिकेच्या संदर्भात तो अभिनयाची मागणीही छान निभावतो (अश्याच प्रकारची भूमिका असलेला पण माझा स्वतःचा जास्त आवडीचा चित्रपट म्हणजे 'मुझे जीने दो'); तसंच हळव्या प्रेमिकाचं कामही (उदाहरणार्थ सुजाता, छाया, साधना, गुमराह, आज अौर कल, असे कितीक!) तो पडद्यावर चांगलं साकारतो.

चित्रपटात तो धनराज सेठना त्यांची लहानपणी हरवलेली मुलगी शोधुन आणण्याचं वचन देतो. एकदा असाच एका कोठ्यावर तो जनिया या कोठेवालीचं नाच-गाणं पहायला तो जातो, ती म्हणजे 'खुबसूरत' कायापालट होण्याआधीची रेखा (हा चित्रट १९७४ सालचा), जी लहानपणी दुरावलेली धनराज सेठची मुलगी शीतल. तो हा मुजरा. रेखानी शास्त्रोक्तपणे नृत्याचं शिक्षण न घेताही चित्रपटातील नृत्यं सादर करण्याचं कौशल्य तिच्याकडे नक्कीच होतं. तसं या नृत्यात विशेष असं काही नाही, पण चित्रपटसंगीतात इतिहास घडवणाऱ्या आशा भोसले आणि अो. पी. नय्यर या जोडीने एकत्र काम केलेला हा शेवटचा चित्रपट. चित्रपटासाठी फक्त एकच पार्श्वगायक - आशा भोसले.

अब आगे तेरी मर्ज़ी (देवदास - १९५५) - शरत् चंद्र चट्टोपाध्यायांच्या 'देवदास' कादंबरीवर आधारीत अनेक भाषांत अनेक चित्रपट निघाले. जुन्या पिढीसाठी सैगल यांनी साकार केलेला देवदास हाच पडद्यावरचा 'खरा' देवदास. पण मला मात्र १९५५ साली बिमल रॉय यांचा परीस स्पर्श लाभलेला देवदास हा या चित्रपटाशी संबंधित सर्वांसाठी सर्वोच्च बिंदू वाटतो. दिलीप कुमारचा देवदास, सुचित्रा सेनची पार्वती आणि वैजयंतीमालाची चंद्रमुखी यांच्या अभिनयाने चित्रपट एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. मोतीलाल सारख्या कसलेल्या कलाकाराने देवदासचा मित्र चुन्नीलाल पडद्यावर जिवंत केला. खरं तर मुख्य तीन कलाकार इतके दमदार असल्यावर चुन्नीलाल लक्षात राहणं कठीण; पण मोतीलालनी त्या पात्रालाही आपल्या अभिनयाने अविस्मरणीय केलं. Under-stated acting आणि ट्रॅजेडी हे दोन्ही दिलीप कुमारचे ट्रेडमार्क आणि त्यामुळे देवदासचं पात्र अगदी सहज मेलोड्रॅमॅटिक होऊ शकलं असतं पण तसं ते झालं नाही त्याचं श्रेय दिलीप कुमारच्या संयत अभिनयाचं जितकं आहे तितकंच बिमल रॉय यांच्या दिग्दर्शनाचं आणि पारो आणि चंद्रमुखीच्या अभिनयाच्या साथीचंही. चित्रपटात चंद्रमुखीचे दोन मुजरे आहेत - 'अो आनेवाले रुक जा कोई दम' आणि 'अब आगे तेरी मर्जी'. साहिरच्या लेखणीतून उतरलेली गीतं आणि सचिन देव बर्मन यांच्यासारख्या 'दादा' संगीतकाराचं संगीत, दोन्ही मुजऱ्यांना स्वर लताचा. या मुजऱ्यात मात्र तवायफ़ची वेदना, समाजावर अासूड, वगैरे काही नाही - सरळसोट कोठ्यावरचा मुजरा. वैजयंतीमाला निष्णात भरतनाट्यम् नर्तकी असुनही कथकवर आधारीत मुजरा पाहताना हे जाणवतंही नाही की ही तिची नृत्यशैली नाही. जेमतेम एकोणीस वर्षाची असेल वैजयंतीमाला देवदास बनला तेव्हा. पण इतक्या लहान वयातही नृत्यकौशल्य आणि अभिनय या दोन्हीत ती किती पारंगत होती ते बघून थक्क व्हायला होतं. कोठ्यावरची तवायफ़ ते देवदासवरच्या प्रेमाखातर तो पैसा, लोकप्रियता, कला - सगळं, सगळं सोडून देणारी चंद्रमुखी हा प्रवास फारच लोभस आणि त्याचवेळी स्त्रीच्या मनःशक्तीचा दर्शक आहे. चंद्रमुखी हे मीरेचंच एक रुप मला वाटतं ते यामुळेच. (वैजयंतीमालाने तवायफ़ची भुमिका केलेला आणखी एक चित्रपट आणि त्यातील मुजरा आठवतो - चित्रपट होता साधना. 'कहो जी तुम क्या क्या खरीदोगे' चित्रपटाच्या सुरुवातीलाच असलेला हा मुजरा सुरु होतो तो वैजयंतीमालाच्या एका छोट्या कथकच्या तोड्याने आणि परत तसंच अचंबित व्हायला होतं, जसं 'अब आगे तेरी मर्जी' पाहताना होतं तसं. केवळ हा एकच मुजरा कुणी पाहिला तर वैजयंतीमालाची नृत्यशैली कथक नसून भरतनाट्यम् आहे यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. एकूणच वैजयंतीमालाने आपल्या नृत्य आणि आभिनयाच्या जोरावर आणि हिंदी भाषेवरच्या प्रभुत्वामुळे इतर नृत्यकुशल दाक्षिणात्य अभिनेत्रीसांठी हिंदी चित्रपटात प्रवेश करणं सुकर केलं.)

काहे छेड़ छेड़ मोहे गरवा लगाये (देवदास) - १९५५ सालच्या देवदासची जबरदस्त पंखा असल्यावर २००२ साली बनलेला हा भव्य-दिव्य देवदास पचनी पडणं महाकठीण. त्यातून चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच त्याच्याबद्दल इतकं वाचलं-ऐकलं होतं की असं वाटलं शरत् चंद्रांचा आणि बिमल रॉय यांचा आत्मा तळमळत असेल. हे तर नक्की ठरवलं होतं की कोणी एक लाख रुपये दिले तरी हा चित्रपट पहायचा नाही. (आता मला चित्रपट बघायला एक लाख रुपये कोण आणि का देईल, हा भाग अलाहिदा.) त्यामुळे कधी काही लिहिताना या देवदासबद्दल काही लिहिन असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण लेख लिहायला घेतल्यावर आणि माझ्या आवडत्या देवदास मधल्या मुजऱ्याबद्दल लिहिताना आठवलं की चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तो पाहिलेल्या कुणाकडूनतरी त्यातल्या माधुरी दीक्षितच्या नृत्याची तारीफ ऐकली होती. YouTube च्या कृपेने आता ती नृत्यं पाहण्यासाठी आख्खा चित्रपट सहन करण्याची गरज पडली नाही. त्यामुळे धीर करुन ती नृत्यं तेवढी पाहिली आणि पहिल्यांदा असं झालं असेल की मोठ्या अपेक्षेनी काही पहायला जावं आणि अपेक्षाभंग होऊ नये - नव्हे, अपेक्षेपेक्षाही जास्त वरचढ असे मुजरे पहायला मिळाले. 'ये किसने हम पर हरा रंग डाला, मार डाला' आणि 'काहे छेड़ छेड़ मोहे गरवा लगाये' - दोन्हीमध्ये माधुरी अप्रतिम नाचली आहे आणि कसलेली कथक नृत्यांगना असल्याचा पूर्ण उपयोग करून घेणारं नृत्यदिग्दर्शन आहे. मुळात आजकालच्या चित्रपटात मुजरा हा प्रकार जवळपास नसतोच. (नंतर आलेल्या मंगल पांडे मध्ये राणी मुखर्जीने एक मुजरा केला आहे आणि अलिकडच्या एजंट विनोद मध्ये करीनाने, जो मुजरा सोडून सगळं काही आहे; मला तर आपण मुजरा पाहतोय की कॅबेरे हे कळंतच नव्हतं - माधुरीच्या नृत्याची सर त्यातल्या एकालाही नाही हे सांगायला नकोच.)

'मार डाला' पेक्षाही मला स्वतःला 'काहे छेड़ छेड़' जास्त आवडला. मुळात पं. बिरजू महाराजांनी या मुजऱ्याचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे ही एकच गोष्टही पुरेशी व्हावी पण माधुरीने त्याला पूर्ण न्याय दिलाय हे ही तितकंच सत्य. कथक आणि मुजरा - एका शैलीतून दुसऱ्यात इतक्या लीलया माधुरी जाते की डोळे तिच्यावरुन हलतंच नाहीत. आणि जेव्हा वाचलं की या गाण्यातील तिचा वेष तीस - होय, ३० किलो वजनाचा होता तेव्हा तर मी अक्षरशः थक्क झाले! इतके वजनदार कपडे घालून पं. बिरजू महाराजांनी दिग्दर्शन केलेला मुजरा सादर करणं ही गोष्ट कल्पनेच्याही पलिकडची आहे! पण माधुरीचं कौशल्य इतकं आहे की ती वेशभूषा घालून ती इतक्या सहजपणे आणि तरीही ग्रेसफुली वावरू आणि नाचू शकते! गाण्याची सुरुवात स्वतः पं. बिरजू महाराज चीज गाऊन करतात (पडद्यावर चुन्नीलालच्या भुमिकेतील जॅकी श्रॉफ ते गातो आहे हे विसरायचं... आणि त्याच्या बाजूला देवदासचे कपडे घातलेला शाहरुख खान - तो तर अज्जिबात पहायचा नाही. सुदैवाने माधुरीचा मुजरा तशी वेळच येऊ देत नाही!) बाकीचे गाणे गायले आहे कविता कृष्णमूर्तीने आणि चीजेच्या उरलेल्या अोळी स्वतः माधुरीने. इस्माईल दरबारचं संगीत आणि चाल, मुजरा आणि कथक दोन्हीचं भान ठेवून आहे. नवोदित गीतकार नस्रत बदरनी हे गीत लिहिलं आहे.

रात भी है कुछ भीगी भीगी (मुझे जीने दो) - हा सुनील दत्तचा आणखी एक डाकूपट - फक्त इथे त्याच्या साथीला वहीदा रहमान सारखी भरतनाट्यम् मध्ये पारंगत आणि अभिजात सौंदर्य आणि अभिनयाची देणगी लाभलेली नायिका आहे. एका जमीनदाराच्या घरच्या लग्नाच्या ठिकाणी डाका घालायला आपली टोळी घेऊन सुनील दत्त येतो आणि जमीनदाराकडून पैसे आणि सोनं-नाणं वसूल करतो. तिथे आलेल्या पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी वहीदा रहमानचा मुजरा ठेवलेला - 'रात भी है कुछ भीगी भीगी'. चित्रपटाचं संगीत हिंदी चित्रपटातील अतिशय चोखंदळ आणि अविट गोडीचं संगीत देणाऱ्या जयदेव यांचं आहे. साहिरच्या या गीताला स्वरसाज लताचा. गाण्याचं चित्रीकरण कलात्मकरीत्या केलंय - वहीदाचं नृत्य सुरु असलेला प्लॅटफॉर्म अारशाचा आहे. परत चाललेल्या सुनील दत्तची नजर नाचणाऱ्या वहीदावर पडते आणि पहिल्या नजरेतच तो घायाळ होतो आणि मुजरा संपता संपता तिला पळवून नेतो.

१९६३ सालचा हा चित्रपट बऱ्याच दृष्टीनी महत्त्वाचा आहे. चित्रपटाची निर्मिती जेव्हा झाली तेव्हा चंबळच्या खोऱ्यात डाकुंचं साम्राज्य होतं आणि तरी बरचसं चित्रीकरण चंबळमध्येच करण्यात आलं - मध्य प्रदेश पोलीस दलाच्या संरक्षणाखाली. नंतरच्या काळात शरणागती पत्करून जीवनाचा मार्ग बदलणाऱ्या कित्येक दरोडेखोरांच्या मते सुनील दत्तने इतर डाकुपटांच्या तुलनेत या चित्रपटात त्यांचं जीवन खूपच प्रमाणिकपणे आणि अचूकपणे दाखवलं आहे. सुनील दत्तने आपल्या चित्रपट कारकिर्दीमधील हा मैलाचा दगड म्हणण्याइतका या चित्रपटामधला ठाकूर जर्नैल सिंग आपल्या अभिनयाने अक्षरशः जिवंत केला आहे. १९६४ च्या कान चित्रपट महोत्सवासाठी या चित्रपटाची निवड झाली होती.

शराफ़त छोड़ दी मैने (शराफ़त) - हिंदी चित्रपटात जे अनेक 'फॉर्म्युले'' प्रेक्षकांची सहानुभूती मिळवण्यासाठी हमखास वापरले जातात त्यातला एक म्हणजे नायक किंवा नायिकेच्या आई-वडिलांचे 'देवळातले लग्न' आणि मग आईने नायकाला किंवा नायिकेला अपार कष्ट करून लहानाचे मोठे करणे. साहजिकच आपले वडिल कोण हे त्यांना माहित नसणे... हाताशी हेमा मािलनी सारखी नृत्यांगना असेल तर ती आई तवायफ़ असणं आणि नाईलाजाने नायिकेला तोच पेशा पत्करावा लागणं हे गोष्टीत सहज गोवता येतं. इथे आई जिवंत असेपर्यंत हेमा मालिनी सर्वसामान्य मुलीचं आयुष्य जगत असते - अगदी मॅट्रीक पास! पण आईच्या मृत्यूनंतर मात्र तिच्या मानलेल्या बहिणीने आपल्या या भाचीला मैफिलीत नाचायला भाग पाडलं - वडिलांचा पत्ता देण्याची लालूच दाखवत. प्रोफेसर असलेला धर्मेंद्र आपले विद्यार्थी तिच्या कोठ्यावर जाणं बंद व्हावं म्हणून तिला शिकवायला कबूल होतो. आणि त्याच्या निर्मळ मनावर आणि उत्तम आचार-विचारांवर ती लुब्ध होते. अचानक तिला त्याचं लग्न आधीच ठरलेलं असल्याचं कळतं आणि त्या रागात ती परत आपल्या कोठ्याचे बंद केलेले दरवाजे उघडते.

शरीफ़ों का ज़माने में अजी बस हाल वो देखा
कि शराफ़त छोड़ दी मैने
मुहोब्बत करनेवालों का यहाँ अंजाम वो देखा
कि मुहोब्बत छोड़ दी मैने

छुड़ाके हाथ अपनों का चली आयी मैं गैरों में
पहन ली घुँगरूँ की फ़िर वही जंज़ीर पैरों में
मैं गाऊँगी, मैं नाचूँगी, इशारों पे सितमगारों के
बगावत छोड़ दी मैने

पुन्हा एकदा लता - लक्ष्मीकांत, प्यारेलाल - आनंद बक्षी यांनी चित्रपटाच्या कथेशी संपूर्णपणे जोडलेलं पण तरी मनाविरुद्ध हा पेशा पत्करणाऱ्या प्रत्येक स्त्रीचं दुःख अत्यंत समर्थपणे आपल्यासमोर आणलं आहे. आयुष्यभर भरतनाट्यम् ची उपासना करणाऱ्या हेमा मालिनीसाठी अशी नृत्यं सादर करणं हा हातचा मळ वाटावा इतक्या सहजतेने ती नाचते - तिच्यासाठी जरी पूर्णपणे वेगळी नृत्यशैली असली तरी आपल्याला मात्र ते अजिबात जाणवत नाही यातच तिचं कौशल्य दिसुन येतं.

निकले थे कहाँ जाने के लिये (बहु बेग़म) - ६० च्या दशकात मुस्लीम वातावरणावर आधारीत बरेच चित्रपट आले. त्यातलाच एक, १९६७ चा 'बहु बेग़म'. मीना कुमारी, अशोक कुमार, प्रदीप कुमार, जॉनी वॉकर, सप्रु, नाझ, ललिता पवार अशी मोठी कलाकारांची यादी, रोशनचं संगीत, साहिर लुधियानवींची गाणी - चित्रपट गाजला नसता तरच नवल! चित्रपटातील गाणी आजही आवडीने ऐकली जातात. लखनवी नवाबी वातावरण, त्यामुळे उर्दू भाषेचा उपजतच गोड लहजा असलेले संवाद, ते पेलायला मीना कुमारी आणि अशोक कुमार सारखे कसलेले कलाकार यामुळे चित्रपट खरं तर मोहक व्हायला हवा, पण त्या वातावरणात प्रेमात पडण्याची आणि त्यासाठी काहीही करण्याची तयारी असलेली नायिका असल्यामुळे चित्रपटाचा मूड सतत नागमोडी वळणं घेत आपल्याला खिळवुन ठेवतो. वडिलांनी आपल्या मर्जीविरुद्ध लग्न ठरवल्यावर लग्नाच्या दिवशी लग्नमंडपातून पळून जाण्याचं धाडस नायिका झीनत दाखवते, पण प्रदीप कुमार न भेटल्यामुळे झीनत वडिलांच्या घरी परत येते तर ते तिला घराबाहेर काढतात. अशोक कुमारला सगळं सांगायला म्हणून त्याच्याकडे येते तर अजुन लग्नघरचे पाहुणे घरात, त्यामुळे तिला त्याच्याशीही बोलायची संधी मिळत नाही. शेवटी ती तिकडून बाहेर पडते आणि हा सगळा ताण असह्य होऊन रस्त्यातच शुद्ध हरपून पडते. थोड्या वेळात रस्त्याने जाणारी एक घोडागाडी तिला मध्येच पडलेली पाहून थांबते - ती अशोक कुमारच्या लग्नात मुजरा सादर करुन परत जाणारी हेलन आणि ललिता पवार यांची गाडी. अर्ध्या रात्री तरुण मुलगी रस्त्यात बेशुद्ध पडलेली पाहून ललिता पवार तिला आपल्या कोठ्यावर घेऊन येते. ती शुद्धीवर आल्यावर तिला तिच्या घरी पोहोचवायची तयारीही दाखवते, पण सगळ्या जगाने ठोकरलेल्या झीनतला कुठे जावं तेच कळत नाही. आपल्याच कर्माला दोष देत बसलेली मीना कुमारी आणि बाहेर कोठ्यावर हेलनचा मुजरा. असा एकही नृत्य प्रकार नसेल जो हेलनने समर्थपणे सादर केला नाही. जास्त करुन पाश्चात्य धर्तीची नृत्यं जरी तिने केली असली तरी हा मुजरा तिने अश्या नजाकतीने पेश केलाय की जणू मुजऱ्यासाठीच ती प्रसिद्ध असावी. साहिरचे शब्द, रोशनचं संगीत, आशाचा आवाज आणि हेलनचा मुजरा मिळुन जणू मुजरा कसा असावा याचा वस्तुपाठच आपल्यासमोर येतो. गाण्याचे शब्द मीना कुमारीची चित्रपटामधली हताश अवस्था वर्णन करतात, तसेच कुठल्याही तवायफ़चा दर्दही! शेवटच्या अोळीत जणू आख्ख्या गाण्याचं सार आणि तवायफ़ म्हणून जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा मूक आक्रोश आहे 'खामोश हैं लब अौर दुनिया को अश्क़ों की जुबाँ मालूम नहीं'

निकले थे कहाँ जाने के लिये, पहुँचे हैं कहाँ मालूम नहीं
अब अपने भटकते कदमों को, मंज़िल का निशाँ मालूम नहीं

हम ने भी कभी इस गुलशन में एक ख्वाब-ए-बहार देखा था
कब फूल झड़े, कब गर्द उड़ी, कब आयी ख़िज़ां मालूम नहीं

दिल शोला-ए-ग़म से खाक हुआ, या आग लगीं अरमानों में
क्या चीज़ जली, क्यों सीने से उठता धुआँ मालूम नहीं

बरबाद वफ़ा का अफ़साना हम किस से कहें अौर कैसे कहें
खामोश हैं लब अौर दुनिया को अश्क़ों की जुबाँ मालूम नहीं

है ये मुजरे की रात आखरी (युद्ध - १९८५) - तवायफ़ असली तरी तिचं मन एका स्त्रीचंच असतं आणि एखाद्या सर्वसामान्य स्त्रीप्रमाणे लग्न करुन हे कोठ्यावरचं आयुष्य मागे टाकून एक पत्नी, आई होण्याचं स्वप्न तिच्याही मनात असतंच. फार कमी वेळा हे स्वप्न पूर्ण होणं तिच्या आयुष्यात येतं - खऱ्या जगातच नाही, तर चित्रपटाच्या मायावी जगातही! १९८५ सालच्या 'युद्ध' चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भुमिकेत होते हेमा मालिनी आणि शत्रुघ्न सिन्हा. चित्रपटाच्या सुरुवातीच्याच काही मिनिटांत हेमा मालिनीचा हा मुजरा आहे - है ये मुजरे की रात आखरी. कारण अशक्य असं स्वप्न पूर्ण होणार असतं - दुसऱ्या दिवशी तिचा आशिक शत्रुघ्न सिन्हा तिच्याशी निक़ाह करणार असतो, त्यामुळे हा शेवटचा मुजरा करताना तिच्या चेहऱ्यावर तर आनंद अोसंडून वहातच असतो, पण विशेष म्हणजे या मुजऱ्याचं नृत्यदिग्दर्शन करतानाही प्रसंगाचं भान ठेवल्यासारखं वाटतं कारण हा खरं तर मुजरा न वाटता ती आपला आनंद जगाबरोबर वाटण्यासाठी नाचते आहे असंच वाटतं. गीतकार आनंद बक्षींनी हा सगळा मूड अगदी नेमका पकडला आहे. (संगीतकार - कल्याणजी, आनंदजी आणि गायिका - लता)

मेरा मसीहा, मेरा ग़म-दुसार मिल गया
इस दिल का, दर्द-ए-दिल का खरीदार मिल गया
महरबानों, कदरदानों, कर लो मुलाक़ात आखरी
है ये मुजरे की रात आखरी

हुस्न पर्दे से बाहर नहीं आयेगा
अब ये ज़ुल्फ़ों का बादल नहीं छायेगा
ना गिरेगी फ़िर ये बिजली
है ये मुजरे की रात आखरी

आज बाँधें हैं घुँगरूँ कसम के लिये
सिर्फ़ नाचूँगी अब मैं बलम के लिये
गा रही हूँ, जा रही हूँ
थाम के मैं हाथ आखरी

एक तवायफ़ यहाँ रहती थी, मर गयी
सब गुनाहों की किमत अदा कर गयी
मरते-मरते उस के लब पे
आयी थी ये बात आखरी
है ये मुजरे की रात आखरी

मला पहिलं आणि तिसरं कडवं फार आवडतं! पहिल्या कडव्यात पुढच्या आयुष्याचं स्वप्न आहे आणि तिसऱ्या कडव्यात तवायफ़ म्हणून आत्तापर्यंत जगलेल्या आयुष्याचं सगळं दुःख चार अोळींत सामावलं आहे. बाकी चित्रपट टिपीकल मसाला चित्रपट आहे, म्हणजे खलनायकाने दोन जुळ्या बाळांना पळवणं, त्यातला एक त्याच्या तावडीतून सुटणं, तो वकील आणि जुळा भाऊ खलनायकाने लहानाचा मोठा केल्याने वाईट मार्गाला लागणं - थोडक्यात बाकी चित्रपटात सांगण्यासारखं असं काही नाही. दुर्दैवाने हेमा मालिनीच्या या तवायफ़चं लग्न करुन सर्वसामान्य आयुष्य जगण्याचं स्वप्नंही पूर्ण होत नाहीच.

मैं तवायफ़ हूँ, मुजरा करुँगी (मेहबूबा) - पुनर्जन्म हा चित्रपट निर्मात्यांचा आणखी एक आवडता विषय, कारण त्यामुळे चित्रपटातील कुठल्याही गोष्टीला काही कारण देण्याचं बंधन पाळण्याची जबाबदारीही रहात नाही. १९७६ सालच्या 'मेहबूबा' मध्ये पावसात गाडी बंद पडल्यामुळे एका डाकबंगल्याच्या आश्रयाला राजेश खन्ना आणि त्याचा सहाय्यक असरानी येतात. रात्री कुठून तरी गाण्याचे सूर ऐकू येऊन राजेश खन्नाला जाग येते (लताच्या आवाजातील 'मेरे नैना सावन-भादो') आणि त्या सुरांचा वेध घेत घेत तो एका राजवाड्यात जाऊन पोहोचतो (इथे म्हैसूरचा राजवाडा वापरला आहे; मुळात तो राजवाडा अप्रतिम सुंदर आहे आणि अजुन तसा राहता असल्याने - राजघराण्याच्या आजच्या वंशजांच्या ताब्यात राजवाड्याचा काही भाग अाहे आणि तो त्यांच्या निवासाचा भाग असल्यामुळे पाहता येत नाही - सुस्थितीत आहे.) तिथे त्याला गतजन्मी त्या संस्थानची राजनर्तकी असलेल्या रत्नाचा आत्मा येऊन त्याला त्याच्या आधीच्या जन्माची आठवण करुन देतो की तो त्या संस्थानचा राजगायक प्रकाश असतो. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडून लग्न करायचं ठरवतात. ती आपण एका तवायफ़ची मुलगी असल्याचं सांगते. पण त्याला त्याने काही फरक पडत नाही, पण गावातल्या शिवमंदिरात त्याला भेटायला म्हणून गेली असता रत्नाला प्रकाशची पत्नी भेटते, जी त्या लहानपणच्या लग्नावर श्रद्धा ठेवून प्रकाशची वाट पहात आयुष्य काढत असते. ते पाहिल्यावर रत्ना प्रकाशशी लग्न करायला नकार देते. तिने असे झिडकारल्यावर मात्र तो ही चिडून लहानपणी झालेल्या लग्नाच्या गौना समारंभासाठी रत्नालाच मुजरा करायला बोलावतो. रत्नाही ते मान्य करते आणि राजनर्तकी असुनही राजगायकाच्या लग्नसमारंभात एक मुजरा सादर करते 'मैं तवायफ़ हूँ, मुजरा करूँगी'.

संगीतकार राहुल देव बर्मननी संगीताचे अनेक प्रयोग केले - शास्त्रीय संगीतापासून पूर्णपणे पाश्चात्य रचना केल्या, 'मेरा कुछ सामान' सारख्या नुसतं वाचलं तर पत्र वाटावं अश्या रचनेसाठी अशक्य चाल बांधली, उडत्या चालीची, गंभीर भाव असलेली, एकच गाणं दोन गायकांनी सादर केलेली, सगळ्या-सगळ्या प्रकारची गाणी रसिकांना दिली. 'अमर प्रेम' मध्ये बैठकीची लावणी असावी तश्या धर्तीचे चित्रीकरण केलेले 'रैना बीती जाये' ही अजोड रचना दिली आणि इथे 'मेहबूबा' मध्ये मुजराही...

आप के शहर में आई हूँ शौक़ से
आप के ज़ौक़ से फ़िर भी ड़रती हूँ मैं
अपना दिल तोड़कर, दिल्लगी छोड़कर
एक ताज़ा ग़ज़ल पेश करती हूँ मैं
के जश्न-ए-शादी है, रात आधी है
खुशनसीबों को शब मुबारक हो
मैं पशेमाँ हूँ, कुछ परेशाँ हूँ
मेरे अश्क़ों को आप मत देखो
जान-ए-महबूबी दर्द में डूबी
चीज़ गाऊँगी, मुस्कुराऊँगी
ग़म सही दिल में, फ़िर भी महफ़िल में
क्या किसी से मैं शिकवा करूँगी
मैं तवायफ़ हूँ, मुजरा करूँगी

एकूण काय, तवायफ़ आपल्या नृत्यकैशल्याच्या बळावर राजनर्तकीचं पद मिळवू शकते पण पत्नी होण्याचं कुठल्याही सामान्य स्त्रीचं सहजसाध्य स्वप्न तिच्यासाठी मात्र कायम स्वप्नच राहतं. खरं तर नृत्य, गायन, चित्रकला, काव्य, संभाषणचातुर्य या एकेक कलेच्या साधनेसाठी जन्म अपुरा पडावा! पण या सगळ्या कला समाजाच्या सर्व थरांतील जनतेचं मनोरंजन करण्याइतपत अंगी बाणवणाऱ्या या कलाकार स्त्रिया त्याच समाजाची वेगळीच गरज भागवण्यासाठी आपल्या स्वप्नांची चिता रचून रोज त्यावर सती जातात.

(मुजऱ्यांवर लिहिलेल्या एवढ्या मोठ्या लेखात पाकीज़ा आणि उमराव जानचा साधा उल्लेखही कसा नाही असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे, पण त्या दोन चित्रपटांतील मुजऱ्यांना न्याय द्यायला एक वेगळा लेख हवा.)

प्रकार: 

फारच वाचनीय लेख आहे हे दिसत आहे. शांतपणे वाचतो>>>>+१

सध्या फक्त एक नजर फिरवली. पण उमराव जान चे एकही गाणं दिसलं नाही. Sad

जिप्सी, तळटीपेत लिहीले आहे तसे, पाकीजा आणि उमराव जान मधली जवळपास सगळी गाणी या लेखात घ्यायला हवीत, पण वेगळा लेख लिहीण्याइतकं सामर्थ्य त्यांच्यात आहे. केवळ लिहायचं म्हणून इथे लिहीलं असतं तर पूर्ण न्याय देता आला नसता. लिहीन त्यावर परत नक्की.

मस्त आढावा घेतला आहे...
'साकिया आज मुझे नींद नहीं आयेगी' हे त्या काळाच्या मानाने खूपच वेगळ्या धाटणीचं गाणं आहे. पूर्ण गाण्यात मुख्य नर्तकी आणि तिच्या सख्या हॉलभर नाचतात परंतु प्रकाशयोजना अशी आहे की फक्त मुख्य नर्तकीचाच चेहरा दिसतो आणि एक्स्ट्रॉजच्या चेहर्‍यावर (चेहरे ओळखू नयेत इतपत) सतत सावली आहे.. मी कित्येकदा कधी कुणाचा चेहरा चुकून दिसतो की काय म्हणून हे गाणं यूट्यूबवर पुन्हा पुन्हा पाह्यलं आहे. Happy

सुरेख लेख प्रिया Happy खिलौना आणि मुझे जीने दो मधली गाणी ऑल टाईम फेव्हरीट Happy
काल फक्त नजर फिरवली होती, आज तळटिप पाहिली. Happy
लेख वाचताना "सलाम-ए-इश्क मेरी जान (मुकद्दर का सिकंदर)", "रहते थे कभी जिनके दिलमे (ममता)", "हम है मता ए कुचाओ बाजार कि तरह (दस्तक)" ही आणि अजुन बरीच गाणी आठवली

मला आवडलेलं मुजरा गीत

१. जब जब तुम्हे भुलाया --- जहां आरा --- परत मीनु मुमताज आणि कोवळी अरुणा इराणी, फार सुरेख शब्द रचना. खास करुन

जैसे के लाश अपनी, खुद ही कोई उठाये....
२. सलमे इश्क मेरी जां --- मुकद्दर का सिकंदर ---- रेखा + अमिताभ... अजुन काही पाहिजे. बहुतेक पुरुषाच्या आवाजातला पहिला मुजरा असेल

३. जब प्यार किया तो डरना क्या -- मुगले आझम -- मधुबाला, कलर गाणे-- ठोकळा दिलीप कुमार--- आणि महाकाय अकबर.....

बाकी पाकिजा आणि उमराओ जान (जुना) ह्या बद्दल +१

यातला एकही पिक्चर मी पाहिला नाहीये नविन देवदास सोडून त्यामुळे काही बोलताच येत नाही
पण माधुरी बद्दल लिहिलेल्या प्रत्येक वाक्याला जोरदार अनुमोदन Happy

'मार डाला' पेक्षाही मला स्वतःला 'काहे छेड़ छेड़' जास्त आवडला. >>>>> +१११११

सुंदर लिखाण प्रिया. प्रत्येक परिच्छेदाबरोबर त्या त्या गाण्याची लिंक दिलीत तर ज्यांना ती माहीत नाहीत (असे लोक कमी असतील,पण असतील..) ते ऐकतील,इतर पुनःप्रत्ययाचा किंवा नवप्रत्ययाचा आनंद घेतील असे वाटले.

तवायफ /कोठी पार्श्वभूमीची अवीट गोडीची 'ये इश्क इश्क हैं इश्क इश्क' आणि 'रेहते थे कभी जिनके दिलमे' (ममता- सुचित्रा सेनचा अफाट डबल रोल ) बहुधा नृत्यगीते नाहीत म्हणून तुम्ही घेतली नाहीत ,पण आठवल्याशिवाय राहिली नाहीत..

खरोखरच ६० च्या दशकातील व त्या आधीलही व्यावसायिक आणि अभिजातही चित्रपट अगदी देवदासपासून ..प्यासा पर्यंत - या दुर्दैवी स्त्रियांच्या उदात्तीकृत व ग्लॅमरस चित्रणाच्या मोहातून सुटले नाहीत.

लेख आवडलाच, (आता हे वेगळं लिहायला हवे का !)

जिप्स्या, ममता मधेच, चाहे तो मेरा जिया लैले, हा सुचित्रा सेनचाच मुजरा आहे. लताचाच आवाज आहे. गाणे सुंदर आहे पण नाच तितकासा खास नाही. (हे गाणे अजून असावे, चित्रपटात !)

संघर्ष, मधे वैजयंतीमालाने, तस्वीरे मुहोब्बत जिसमे थी, हा मुजरा पण छान सादर केलाय. आशाचा आवाज आहे.
गंगा जमना मधे पण हेलनने सादर केलेला एक छान मुजरा आहे. आवाज आशाचाच आहे.

लताच्याच आवाजात, बाजूबंद खुल खुल जाय, या पारंपारीक ठुमरीवर सादर झालेला बैठकीचा मुजरा यू ट्यूबवर आहे. अभिनेत्रीचे नाव माहीत नाही, पण बलराज सहानी आहे त्या गाण्यात.

सबंध मधल्या, अकेली हू मै पिया आओ, या आशाच्या अप्रतिम गाण्यावर (संगीत ओ पी) चांगला मुजरा आहे. या गाण्याची चाल खुपच अनवट आहे. उस्ताद अमिर खाँ साहेबांना यात १६ राग आढळले होते.

आणखी एका मुजर्‍याचे फक्त शब्द आठवताहेत, बाकी काहीच आठवत नाही

भरोसा जिसपे करना था, उसीने हमको लूटा है
कहातक नाम गिनवाये, सभीने हमको लूटा है

चालीवरून मुजरा असावा असे वाटतेय. आवाजही लताचाच असावा.

सुरेख आणि माहितीपूर्ण लेखन ! मीसुद्धा 'उमराव जान' कधी येणार याची वाट पाहत होतो. Happy
पुढील लेखाची प्रतिक्षा आहे.

दिनेशदा , भरोसा कर लिया जिसपर ... हा मुजरा 'प्रभात' नावाच्या बी आर इशारा या फॅडिस्ट निर्मात्या दिग्दरशकाच्या चित्रपटातला आहे. हा चित्रपट बी आणि सी दर्जाच्या मधला होता. या चित्रपटाचा नायक चक्क खलनायक 'रुपेशकुमार' होता. (रुपेशकुमार कोण हे विचारणारांसाठी : हा सीता और गीता मध्ये हन्टरने हेमामालिनीला मारणारा व्हिलन. राजेश खन्ना वाडिया कॉलेजला असताना त्याचा रूममेट. हा पुणेकरच होता आणि पुण्यातच वारलाही.)रुपेशकुमारचा हा नायक म्हणून एकमेव चित्रपट असावा. 'प्रभात' चे संगीतकार होते चक्क मदनमोहन. यात जया कौशल्या नावाची नवीनच नायिका होती तिचा बहुधा हा एकमेव चित्रपट असावा. अत्यंत सामान्य चित्रपटातले हे गाणे केवळ मदनमोहन मुळे मेमोरेबल झाले. तसाच दुसरा फडतूस चित्रपट म्हनजे 'चौकीदार' संजीवकुमार्-योगीता बाली च्या या फालतू चित्रपटास म.मो. यांचेच संगीत होते. ममो च्या शेवटच्या चित्रपटापैकी हा एक. यातला 'थोडासा इंतजार कीजीये' हा फिका फिका मुजराही ममो चा दर्जा दाखवून देतो....

प्रिया....

पहिला पॅराग्राफ वाचल्यानंतर लागलीच लक्षात आले होते की, हा नितांत सुंदर माहितीपूर्ण लेख असा घाईत वाचणे म्हणजे लेखिकेने त्यासाठी घेतलेल्या कष्टाचे चीज होऊ शकत नाही, त्यामुळे नंतर अगदी तासाच्यावर शांतपणे वेळ बाजूला काढला आणि आता पूर्ण लेख वाचून झाल्यामुळे म्हणू शकतो की अत्यंत प्रभावी लेखन झाले आहे या विषयावर.....[जरी मी 'तवायफ = वेश्याव्यवसाय' म्हणण्यास धजावत नसलो तरी].

"तवायफ" या संकल्पनेला अगदी मुघल काळापासून त्या काळातील राज्यकर्त्यांनी एक मनोरंजनात्मक दर्जा दिला होता आणि त्यांची योग्य ती काळजी जशी घेतली जात असे तद्वतच त्याना अगदी दुय्यम का असेना काहीसा चांगला सामाजिक दर्जाही दिला जात असे.... जो वेश्येला मिळेलच असे नाही. 'वसंतसेना' ही नगरवधू होती....लेखाच्या भाषेत तिचीही भूमिका 'तवायफ' समच होती, पण ती 'वेश्या' नक्कीच नव्हती.

लखनौच्या जलपरी आणि लाहोरच्या अनारकली लेनमध्ये तवायफीचा व्यवसाय करणार्‍यांच्या अगदी इस्टेटी म्हणाव्यात अशा मजल्यांच्या इमारती आणि जमीनजुमले ब्रिटिश इंडियाच्या दप्तरी नोंदविले गेले होते, म्हणजे त्याना राजाश्रय तसेच लोकाश्रयही उदारपणे उपलब्ध असल्याने त्या वेश्याव्यवसायाकडे वळत (च) असतील असे नव्हते.... मात्र आपल्याकडील देवदासी आणि खंडोबाच्या मुरळी यांच्या नशिबी तो भोग जरूर आल्याची उदाहरणे आहेत. त्याला कारण म्हणजे तवायफ तरुणीला शृंगाररसयुक्त नृत्ये आणि गाण्याने यजमानाचे मन रिझविण्याची जी कला प्राप्त असते ते देवदासी आणि मुरळ्यांना नाही.

हे जरूर आहे की, आपल्या जवळ असलेल्या कलेला आपल्या तारुण्याची जोड आहे म्हणून 'दिलफेक देवदास' कोठीवर येत असतात याची रोखठोक जाणीव तवायफला असते म्हणून ती तिशी उलटायच्या आतच तिच्या भोवती रुंजी घालणार्‍या अनेक भ्रमरापैकी आर्थिक सबल असलेल्या एकाची जोडीदार (म्हणजेच रखेल या नात्याने) म्हणून निवड करते.....दिल्ली, लखनौ, कलकत्ता, लाहोर, पेशावर आदी नवाबी थाटाच्या शहरात हा प्रघात राजरोस चालत असल्याने कायद्याने लग्नगाठ बांधलेल्या स्त्रियाही आपल्या नवर्‍याच्या या जादाच्या पदराला नाईलाजाने का होईना मान्यता देत असतात.

चित्रपटांतील मुजर्‍याची जी प्रभावी उदाहरणे तुम्ही दिली आहेत त्यातील प्रथम क्रमांक अर्थातच मी 'मुझे जीने दो' मधील वहिदाच्या अदाकारीला देईन. 'खिलौना' मधील मुमताजचा तो मुजरा प्रसादच्या टीमने हकनाक टायटलमध्ये वाया घालविला आहे. पडद्यापेक्षा लताच्या आवाजात ते मुजरा गाणे आजही फार भावते.

या निमित्ताने (तुम्ही दिलेल्या छान उदाहरणाव्यतिरिक्त) माझ्या नजरेसमोर येत असलेली मुजर्‍याची दोन उदाहरणे म्हणजे :

१. "अदालत" (१९५८) मधील 'उनको ये शिकायत है की हम कुछ नही कहते.." लता, राजेन्द्र कृष्ण आणि मदन मोहन यांचे एक लखलखीत मुजरा गाणे. पडद्यावर नर्गिस आहे, पण नृत्य तिच्या साथीदार करीत आहेत.
२. "छोटे नवाब" (१९६२) मधील 'चुरा के दिल बन रहे है भोले, जैसे कुछ जानते नही..." राहुल देव बर्मन यांचा पहिला स्वतंत्र चित्रपट. पडद्यावर अमिता....मात्र बुरख्यात राहून गाणे सादर करते....नृत्य साथीदार.

असो. एका सुंदर लेखाबद्दल प्रिया यांचे अभिनंदन.

अशोक पाटील

'खिलौना' मधील मुमताजचा तो मुजरा प्रसादच्या टीमने हकनाक टायटलमध्ये वाया घालविला आहे.
>>>
१०० % सहमत. ब्लॅकने तिकीटे काढून उशीरा आलेल्या लोकांना ते गाणे पाहायलाही मिळत नसे. Happy

मस्त लेख. विसरलेली काही मुजरा-गीतं परत आठवली. 'रात भी है कुछ्' ला माझा पण पहिला क्रमांक. मला आवडणारं अजून एक (या यादी व्यतिरिक्त) म्हणजे चौदहवी का चांद मधलं "दिल की कहानी रंग लाई है, अल्लाह दुहाई है, दुहाई है" Happy

>>त्याला कारण म्हणजे तवायफ तरुणीला शृंगाररसयुक्त नृत्ये आणि गाण्याने यजमानाचे मन रिझविण्याची जी कला प्राप्त असते ते देवदासी आणि मुरळ्यांना नाही<<<
पाटील, भारतातील बहुतेक शास्त्रीय नृत्यांचा उगम देवदासींच्या नृत्यात आहे ना? अशी प्राचीन कला अवगत असलेल्या आणि शिवाय देवाच्या पायी वाहिल्या असलेल्या या मुलींना वेश्येचा दर्जा कसा काय प्राप्त झाला? जरा अवांतर आहे, पण तुमच्याकडे अजून लिहीण्यासारखे असल्यास प्रकाश टाकाल का?

@ बाळू जोशी.....

सही आठवण....मी दुजोरा देतो, कारण मी स्वतः ब्लॅकने तिकिट काढून 'खिलौना' पाहिला होता कोल्हापूरातील प्रभाट टॉकिजमध्ये....आणि ते गाणे नव्हेच तर, संजीवकुमारचा बाप मुमताजबद्दल तिच्या मौसीशी आर्थिक व्यवहार करीत आहे, त्या प्रसंगी अंधारात ठेचकाळत खुर्चीवर टेकलो होतो, त्याची आठवण झाली. 'रीरन' ला खिलौना कधी आलाच नसल्याने मला मग पुढे कित्येक वर्षानी (नोकरीच्या काळात) 'मुमताझ स्पेशल' नामक एक व्हीडीओ कॅसेट मिळाली, त्यात तिच्यावर चित्रीत झालेली जी काही गाणी होती त्यामध्ये हे मुजरा गाणे पाहायला मिळाले.

@ सप्रि....

जरूर. नंतर सविस्तर लिहितो, इथेच [जर विषयांतर होणार नसेल तर].

@अशोकजी , खिलोना लागला तेव्हा आम्ही चित्रपट पहाण्याच्या लीगमध्ये नव्हतो. मात्र रि-रनला दोन तीन वेळा पाहिला. तेव्हा आम्ही एकच चित्रपट ३-३ वेळाही पहात असू कारण बाहेर दुसरे काही माध्यम नव्हते हे तुम्हालाही आठवत असेलच Happy

अगदी अगदी श्री.जोशी.....बाहेर दुसरे काही मनोरंजनाचे माध्यम नव्हते. माझ्या शालेय हायस्कूल जीवनात तरी रेडिओही महाग होता आमच्यासाठी. लक्ष्मीपुरी या गल्लीत फक्त डॉ.पद्माकर भद्रे यांच्याकडे फोन (तोही बिगर डायलचा....रीसिव्हर उचलला की पलिकडून ऑपरेटर पृच्छा करायचा..."नंबर सांगा", मग इकडून तीन आकडी नंबर सांगितला की, मग अर्धा तास गुटर्रघू, खळ्लखट्याक, चिरपिर...असे लिहिताही येऊ शकणार नाहीत असे आवाज आल्यावर कनेक्शन लागायचे....); तर 'हॉटेल समाधान' वाल्याकडे भला मोठा जर्मन मेकचा एक रेडिओ. या रेडिओवर बुधवारी रात्रा ८ ची "बिनाका गीतमाला' ऐकण्यासाठी आम्ही पोरे संध्याकाळी ७ वाजल्यापासून आपापल्या जागा पकडून बसत असू.

चित्रपटांची मात्र तशी बर्‍यापैकी चैन होती. लक्ष्मीपुरीमध्ये ज्या भागात आम्ही राहात होतो तिथे तब्बल ९ चित्रपटगृहे होते....(कोल्हापुरी भाषेत "टाक्या") आणि कुणाची ना कुणा डोअरकीपरशी ओळख असायचीच. चित्रपट पाहणे भरपूर झाले त्यामुळे.

अजित रागिणीचा 'शिकारी' नावाचा एक पोशाखी चित्रपट आम्ही पाचवेळा पाहिला. कारण ? आवडला म्हणून नव्हे तर शाहू टॉकिजचा थर्डचा डोअरकीपर आमच्या गल्लीतील....त्याला विचारून खुर्चीवर न बसता बाजूला उभे राहून चकटफू पाहायला मिळाला म्हणून.

दिनेशदा , भरोसा कर लिया जिसपर ... हा मुजरा 'प्रभात' नावाच्या बी आर इशारा या फॅडिस्ट निर्मात्या दिग्दरशकाच्या चित्रपटातला आहे
>>>काय शिंचा दुर्दैवी योगायोग ! कालच मी हे पोस्ट टाकले अन आजच या विस्मृतीत गेलेल्या दिग्दर्शकाचे निधनही झाले. बाबू राम (बी आर) इशारा निर्माते नव्हते . ३४ चित्रपटाचे दिग्दर्शक होते . परवीन बाबी आणि बप्पी लाहिरी यांनादेखील चित्रपट क्षेत्रातील पहिली संधी ईशारा यांनीच दिली होती.तसेच अनेक नवीन कलाकारांना त्यावेळी आपल्या चित्रपटातून संधी दिली होती. त्यात डॅनी, राकेश पांडे, जया भादूरी, अमिताभ बच्चन, रिना रॉय, शत्रुघ्न सिन्हा, राज किरन अश्या अनेक कलाकारांचा समावेश होता.
सपन जगमोहन ही स.गीतकारांची जोडीने इशारा यांच्या चित्रपटाना नेहमी संस्मरणीय संगीत दिले.

बी.आर.इशारा...नो मोअर.

~ खरंच विचित्र योगायोग म्हणावा लागेल हा.

'चेतना' मुळे ते आम्हास अगदी सुपरिचित होऊन गेले होते, एका रात्रीतच. रेहाना सुलतानचा अल्पसा का होईना पण सिनेप्रवास याच चित्रपटापासून त्यानी चालू केला अन् तिला प्रसिद्धीही भरपूर मिळाली, ती अगदी 'दस्तक' पर्यंत ठिकठाक चालली होती.

रेहानाशीच बाबूराम इशारा विवाहबद्ध झाले होते.