सध्या ऊन वाढायला लागलंय. गडमाथ्यांवरचे आणि आडवाटांवरचे पाणीसाठेही आटायला लागलेत. सकाळी दहा-अकराच्या उन्हात टेकडी जरी चढायची म्हटलं तर शरीर घामेजायला लागलंय आणि घसा कोरडा पडायला लागलाय. 'जलदुर्ग' हा अशा वातावरणात हौस भागवणारा पर्याय असू शकतो.
मला स्वतःला पाण्याची भयंकर भीती वाटते. कुठल्याही पाण्याच्या साठ्यामधल्या पाण्याबद्दल विश्वासच वाटत नाही. उलट काहीतरी गूढ, अविश्वासाची भावना वाटत असते. डोंगरदर्या कितीही गर्द, घनदाट, लांब-रूंद-ऊंच असल्या तरी त्यांच्याबद्दल कायम उत्सुकता, जवळीक वाटते. पाण्याच्या बाबतीत माझं तसं होत नाही. तात्पर्य, गिरीदुर्ग आणि भुईकोट किल्ल्यांपेक्षा जलदुर्गांचे आकर्षण त्यामुळे कमीच!
मुंबईत आल्यापासून बांद्र्याचा किल्ला सोडला तर जलदुर्ग सोडाच, पण पाण्याजवळचाही किल्ला पाहिला नव्हता. ही कसर गेल्या रविवारी अनपेक्षितपणे भरून निघाली. हा रविवार ट्रेकचाच असं ठरवून बसलो होतो, उपलब्ध पर्याय तपासून झाले होते. तेवढ्यात 'खांदेरी-उंदेरीला येणार का' अशी एका मैत्रिणीकडून विचारणा झाली. मी आधी 'नाही' म्हटलं, पण नंतर अचानक जेव्हा रोहनशी बोलताना कळलं, की खुद्द 'सेनापती'ही जातीने या मोहिमेत असणार आहेत, तेव्हा मात्र माझ्यासारख्या मावळ्याला 'हो'च म्हणावेसे वाटले!
मोहिमेत एकूण किती जण आहेत हे वडखळ नाक्याला नाष्ट्यासाठी थांबलो तेव्हाच समजले. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यापेक्षाही महत्त्वाचे वाटणारे, आवडणारे असे काही असू शकते हे मानणारे २१ जण रविवारी चार गाड्यांमधून (३ मुंबई, १ पुणे) निघाले होते. भल्या पहाटे साडेपाचला दादरला राजीवकाकांची वाट पाहत होतो, तेव्हा क्षणभर मागचा ट्रेकमय पावसाळा अचानकच डोळ्यासमोरून सरकून गेला. नाणेघाट, आजोबा, कोथळीगड, सरसगडसाठी स्टेशनला जाताना पावसात तुडवलेला तो दादरचा हमरस्ता, हिंदमाताच्या चौकात भरलेले गुडघाभर पाणी, लोकल पकडताना भेटलेला पाऊस... ट्रेकगणिक या सगळ्या अनुभवात भर पडत जाते आणि हे असेच्या असे आपण स्वतःला तरी पुन्हा सापडू का असं वाटून जीव हुरहुरतो. नवीन पावसाळा आणि नवीन ट्रेकमध्येही हे आठवत राहिल हे नक्की! असो. विषयांतर होत आले.
राजीवकाकांच्या गाडीतून जाताना पेणच्या पुढे एके ठिकाणी गाडी थांबवून सगळ्यांसाठी कलिंगडे घेतली. आठ वाजता वडखळ नाक्याला 'क्षुधा-शांती' केली. सवयीने मी आणि रोहनने ऑर्डर देताना फारसा विचार केलाच नाही. किल्ले भटकणे आणि मिसळ खाणे हे किती अतूट नाते आहे हे समस्त 'गडवाल्यांना' नक्की माहित असेल. वडखळ नाक्यावर पुण्याहून निघालेली गाडीही येऊन मिळाली आणि पुढे निघालो. अलिबाग रस्त्यावर कार्लेखिंड बस स्थानकासमोर (गोठेघर) थळ गावाचा फाटा आहे. त्या रस्त्याने गाव गाठले. 'थळ मच्छीमार सोसायटी'च्या कार्यालयापाशी उतरलो तेव्हा आसमंतामध्ये फक्त एकच वास भरून राहिला होता - माशांचा! ताबडतोब, उपस्थितांपैकी 'मासा'ळू तोंडे नॉन-व्हेज गप्पासाठी ('पदार्थी' अर्थाने) उघडली आणि शुद्ध शाकाहारी नाके बंद झाली! आम्हाला नेण्यासाठी ठरवलेली 'सी स्टार' काठालगत तयार होती. निघालो!
उंदेरीभोवती अनियमीत खडक असल्यामुळे बोट लावण्यासाठी दरवेळी जागा मिळतेच असे नाही. आमच्या कार्यक्रमामध्ये उंदेरी म्हणूनच हवामानावर अवलंबून होता. सुदैवाने बोटवाल्याला बोट उभी करण्यासाठी जागा सापडली आणि पहिल्यांदा उंदेरी बघायला निघालो.
आम्ही खडकांवर उतरल्यावर बोट पुन्हा थोडे अंतर मागे जाऊन समुद्रात उभी राहिली.
इतिहासकाळात अत्यंत घाईघाईत या किल्ल्याचे बांधकाम झाले आहे. किल्ला फिरता फिरता एके ठिकाणी बसून रोहनने किल्ल्याचा इतिहासही सांगितला. तिथेच ओळखपरेड झाली.
किल्ल्याचा दरवाजा -
गोड्या पाण्याचा साठा. हा सुमारे दोन वर्षे शे़कडो माणसांना पुरेल एवढा मोठा साठा आहे
दक्षिणेकडचा दरवाजा -
वरचाच दरवाजा, समुद्राच्या बाजूने -
उंदेरीमधून दिसणारा खांदेरी किल्ला-
पाऊण-एक तासात किल्ल्याला प्रदक्षिणा घालून माघारी फिरलो. आता पुढे होता - खांदेरी!
खांदेरीकडे जाताना फोटो काढायला मी मागे डायवरपाशी उभा होतो आणि बोटवाले बाबा 'बोट केवढ्याला घेतली, आज मॅचमुळे गर्दी कमी आहे, १५ मे ते १५ नोव्हेंबर सरकारी नियमानुसार बोट बंद करावी लागते, तेव्हा फक्त मासेमारी करतो' वगैरे माहिती स्वतःहून सांगायला लागले. मला अशा औटघटकेच्या गप्पा मारायला खूप मजा येते. कसलीही अपेक्षा, पूर्वग्रह न ठेवता खुलेपणाने चार घटका गप्पा माराव्यात आणि आपापल्या वाटेने निघावे! 'कुठेही संभाषणोत्सुक चेहरा दिसला की पहिला नमस्कार माझा घडे!' हे पुलंचं 'पूर्वरंग'मधलं वाक्य मनावर अगदी कोरलं गेलं आहे. असो. आज बहुधा सारखं विषयांतरच होतंय! मीही फोटो काढणे थोडावेळ थांबवून मग त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांचा नंबर घेऊन ठेवला. त्यांचं नाव उत्तम बुंदके. ते दोन मुलांसह पोटासाठी बोटीच्या फेर्या आणि मासेमारी करतात.
उंदेरीच्या तुलनेने खांदेरी हा अधिक वेळ घेऊन विचारपूर्वक बांधलेला किल्ला आहे. अर्थात किल्ला बांधत असताना शत्रूचे हल्ले सुरू होतेच. मुरूडजवळच्या जंजिर्याचा सिद्दी आणि मुंबईसारखे उदयाला येत असलेले बंदर यांमध्ये असल्यामुळे शिवकाळात शिवाजी राजांनी बांधलेल्या खांदेरी-उंदेरीचे स्थानमाहात्म्य मोठे होते. आरमाराकडे महारा़जांनी किती महत्त्व दिले होते हे सागरी दुर्गांची मुंबई ते गोवा किनारपट्टीलगतच्या किल्ल्यांची ही साखळी पाहिली की लक्षात येते.
खांदेरीला बोट उभी करण्यासाठी जेट्टी आहे. किल्ल्यामध्ये वेतोबाचे मंदिर आहे. कोळीलोकांनी दान केलेली प्रतिकात्मक आयुधे/साधने इथे टांगलेली दिसतात.
तटबंदीच्या काठाकाठाने किल्ल्याला फेरी मारली. मी पायातले बूट काढून टाकले आणि अनवाणी पायांनी त्या खडकांचा स्पर्श अनुभवत तटबंदीवरून चालू लागलो. गुळगुळीत, झुळूकगार दगडांवरून चालताना बाजूच्या समुद्रावरून येणारं वारं विलक्षण गारवा देत होतं. सूर्य माथ्यावर आला, तसे दगड तापायला लागले. मग पुन्हा बूट घातले.
एका बुरूजावर तीन तोफा आहेत.
(त्या 'संतोष'ला आम्ही मनातल्या मनात भरपूर शिव्या घालून घेतल्या, तुम्हीही घालून घ्या. फक्त कधी कुठल्याही गडावर जाल तेव्हा आपले असे 'ठसे' तिथे सोडून येऊ नका, हे कळकळीचे आवाहन!)
खांदेरी किल्ल्यामध्ये एक दीपगृह आहे. दीपगृहामध्ये वरपर्यंत जाता येते. बाजूलाच पवनचक्कीमार्फत निर्माण होणारी वीज दिव्याला पुरवली जाते.
वर जायचा जिना -
मी आयुष्यात दीपगृह हा प्रकार आतून पहिल्यांदाच पाहिला.
पूर्ण किल्ला भटकून झाला तेव्हा फक्त पावणेदोन वाजले होते. जेट्टीवर आलो तेव्हा ओहोटी लागली होती. तिथीवरून भरती-ओहोटीच्या वेळा कशा काढाव्यात हे ज्ञान मला सकाळीच (मिसळ खाताना) प्राप्त झाले असल्यामुळे मी ते लगेच इथे पडताळून पाहिले. (सुदैवाने) ते गणित बरोबर आले. थळ किनार्यापासून आत समुद्रात बोट थांबली आणि दगडी बांधावरून पसरून टाकलेल्या मासेमारीच्या जाळ्यांवरून चालत पुन्हा सोसायटीपाशी आलो.
डावीकडचा खांदेरी व उजवीकडचा उंदेरी -
गावात जेवणाची सोय आयत्यावेळी रद्द झाल्यामुळे मग अलिबागमध्ये 'रविवार पाळावा' असे ठरले. (आम्हा शाकाहार्यांना कोण विचारतंय?) अलिबागच्या 'सन्मान' मध्ये शिरलो तेव्हा चालू टीव्हीवर पाकिस्तानच्या बिनबाद दोनशे दहा झाल्याचे या डोळ्यांना पहावे लागले. एकूण चोवीस जणांच्या आहारविषयक चर्चा व एकंदर वागण्यावरून 'बांगलादेश आणि सोमालिया या देशातून चर्चेसाठी भारतात आलेली शिष्टमंडळे आज इथे जेवून गेली' अशी डायरी हॉटेलमालक लिहील अशी कॉमेंट कुणीतरी केली आणि आम्ही ती सार्थ करण्याचा पूर्ण प्रयत्न केला.
मग विशेष काही घडलेच नाही. जेवल्यानंतर इतकी झोप येत होती की दुसरं काही सुचतंच नव्हतं. 'ट्रेकपेक्षा असल्या सुखी ट्रिपमुळे अधिक दमायला होते' हा विचार उगाचच माझ्या मनात शिरून गेला. येताना 'चहासाठी कुठे थांबायचे' या गरजेवरून 'क्षणभर विश्रांती' कर्नाळ्याच्या नंतर आहे की आधी या विषयावर मी, अर्चना, राखी, आका आणि भारत मुंबईकर (हे नाव आहे, कुठलाही आयडी नाही) यांच्यात एक प्रासंगिक परिसंवाद घडला. मी तटस्थ होतो. (मला 'क्षणभर झोप' आणि चहा महत्त्वाचा होता!) वरील उरलेल्या चारपैकी कुणी (चुकून) हा लेख वाचलाच तर त्यांना मात्र हे आठवून ज्जाम हसू येईल एवढे नक्की! चहा झाल्यावर निघताना 'एक फोटो हो जाय'ची फर्माईश झाली. पुण्याची गाडी वडखळफाट्याने आधीच गेलेली असल्यामुळे त्यांच्याविना फोटो काढला. फोटो खुद्द सेनापतींनी काढल्यामुळे त्यांचे 'हँडसम' व्यक्तिमत्त्व या फोटोत उपलब्ध नाही!
राजीवकाकांनी दादरला सोडले तेव्हा साडेसात वाजले होते. यावेळी दोघे-तिघे सोडले तर अख्खा ग्रुप माझ्यासाठी नवीन होता. त्यामुळे दिवसाचा 'खेळ' थांबला तेव्हा 'धावसंख्या' जुने मित्रमैत्रीणी अधिक २० नवीन अशी झाली होती.
- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/03/blog-post_21.html)
मस्त.खुपच उपयुक्त माहिती आहे.
मस्त.खुपच उपयुक्त माहिती आहे. धन्यवाद
क्या बात है !!! मस्त
क्या बात है !!! मस्त नचिकेत्स.
रोहनने ही ऐतिहासिक माहिती आमच्याशीही शेअर करावी.
व्व्व्व्वा अप्रतिम
व्व्व्व्वा
अप्रतिम चित्रे
अप्रतिम माहिती
धन्यवाद, बसल्या जागी फिरवून आणल्याबद्दल
मस्त प्रचि आणि माहीती
मस्त प्रचि आणि माहीती
आया... मस्तच रे.. रविवार छान
आया... मस्तच रे.. रविवार छान गेला.. मुख्य म्हणजे ज्यांनी कोणी ही मोहीम आयोजित केली त्याला लाख-लाख धन्यवाद..
मला तर गेल्या १० वर्षापासून इथे जायचे होते..
आणि ह्या मोहिमेत असणारे जे माबोवर नाहीत त्यांना लिंक देतो.. वाचक म्हणून तरी वाचतील..
सह्ही.... ट्रेक कम ट्रीप...
सह्ही....
ट्रेक कम ट्रीप...
तो दीपगृहामधला जिना सहीए....
डॉक.. मी उंदेरी-खांदेरी यांचा
डॉक.. मी उंदेरी-खांदेरी यांचा इतिहास नक्की लिहिणार आहे...
सुहास बरोबर दुसऱ्या दिवशी बोलताना लक्ष्यात आले की शिवस्मारक बनवण्यासाठी खांदेरी ही उत्कृष्ट जागा आहे. मुळात भक्कम जलदुर्ग आहे आणि शिवरायांच्या भेटीने पावन झालेलाही आहेच. मुंबई पासून बोटीने फार लांबही नाही. मग उगाच समुद्रात भर घालून नावे बेट तयार करण्याऐवजी खांदेरी किंवा उंदेरी काय वाईट?
मस्त वर्णन, आणि छान
मस्त वर्णन, आणि छान प्रकाशचित्रे
>>फक्त कधी कुठल्याही गडावर जाल तेव्हा आपले असे 'ठसे' तिथे सोडून येऊ नका, हे कळकळीचे आवाहन!>>
१००% सहमत.
खांदेरीच्या दिपगृहात आतूनही फोटो काढायला परवानगी देतात का आता? पूर्वी आम्ही गेलो होतो तेंव्हां तर फोटो काढायला पूर्ण बंदी होती.
खांदेरीच्या दिपगृहात आतूनही
खांदेरीच्या दिपगृहात आतूनही फोटो काढायला परवानगी देतात का आता? पूर्वी आम्ही गेलो होतो तेंव्हां तर फोटो काढायला पूर्ण बंदी होती>>
एका कॅमे-यामागे २० रुपये मिळाले तर त्यांच्या "चपटीची" सोय होते.. मग गुपचुप परवानगी मिळते..:)
त्या परिसंवादात तु झोपला होतास... बरं झालं ..
आमच्याइथले कोळी नविन बोट
आमच्याइथले कोळी नविन बोट बनवली की खंदेरी उंदेरीला जाऊन जेवण, प्रसाद वगैरे करतात.
थळ आणि आसपासच्या गावात कोणीही
थळ आणि आसपासच्या गावात कोणीही नविन होडी अथवा लॉंच घेतली की आधी ती घेऊन खांदेरीच्या वेतोबाच्या दर्शनाला जायचे आणि कोंबड किंव्हा एकाद बकरु त्याला बळी देऊन त्याचा प्रसाद सर्वांनी एकत्र खायचा. तशी प्रथाच पडलीय आता तिथे.
आणि उंदेरी बद्दल तर बोलायलाच नको. आजकाल तो कोळी लोकांचा परमीट रुम, बीयरबार झालाय.
मस्त वर्णन आणि फोटो!
मस्त वर्णन आणि फोटो!
मस्तच ...फोटो अप्रतिम
मस्तच ...फोटो अप्रतिम
मस्त वॄतांत खांदेरीच्या
मस्त वॄतांत
खांदेरीच्या दिपगृहात आतूनही फोटो काढायला मिळाले हे छान झाले, पूर्वी आम्ही गेलो होतो तेंव्हां तर फोटो काढायला दिले नाहीत. पण तिकडे असणार्या माणसाने आम्हाला माहिती छान सांगितली होती.
आरंभ - फोटो प्रदर्शनाला येणार का?
नचिकेत, ट्रेकची वर्णने नेमकी
नचिकेत, ट्रेकची वर्णने नेमकी कशी असावीत- ह्याचा एक बेंचमार्क तू प्रस्थापित करतो आहेस माबोवर!
नेहमीसारखंच, वाचायला सुरू केलं की प्रवास सुरू झाल्याची नि लेख संपताना प्रवास संपल्याची जाणिव झालीच!
हे लिखाण फारंच आपुलकीने केल्यासारखं वाटलं, मलातरी
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यापेक्षाही महत्त्वाचे वाटणारे, आवडणारे असे काही असू शकते हे मानणारे २१ जण>> क्या बात!
असेच्या असे आपण स्वतःला तरी पुन्हा सापडू का असं वाटून जीव हुरहुरतो.>> वा, वा... असं काही अनुभवण्यासाठी तरी एखादा ट्रेक करावाच असं वाटतं!
औटघटकेच्या गप्पा>>
'ट्रेकपेक्षा असल्या सुखी ट्रिपमुळे अधिक दमायला होते' हा विचार उगाचच माझ्या मनात शिरून गेला. येताना 'चहासाठी कुठे थांबायचे' या गरजेवरून 'क्षणभर विश्रांती' कर्नाळ्याच्या नंतर आहे की आधी या विषयावर मी, अर्चना, राखी, आका आणि भारत मुंबईकर (हे नाव आहे, कुठलाही आयडी नाही) यांच्यात एक प्रासंगिक परिसंवाद घडला. मी तटस्थ होतो. (मला 'क्षणभर झोप' आणि चहा महत्त्वाचा होता!) >> संपूर्ण परिच्छेदच
धावसंख्या तर लै भारी!!!
आनंदयात्री ~ हे भगवान !
आनंदयात्री ~
हे भगवान ! तुम्ही 'सेनापती' या आयडी ला आजच्या आज जाब विचारा की, त्याने मला खांदेरी-उंदेरी नियोजनाबद्दल काहीच कसे सांगितले नाही. तुम्ही रविवारी इतक्या माबोकरांसमवेत ही सहल ठरविली आणि त्याच्या दोन दिवस अगोदर (म्हणजे शुक्रवारी) श्री. व सौ.सेनापती इकडे कोल्हापूर दर्शनासाठी आले आणि आम्ही तिघांनी दोन-तीन तास माझ्या घरी मनमुराद गप्पा मारल्या. तुम्हा सर्वांचे उल्लेख बोलण्यात येणे साहजिकच, पण पठ्ठ्याने रविवारच्या सहलीविषयी एक चकार शब्द तोंडातून काढला नाही. सांगितले असते तर एक कोल्हापूरकर तुमच्यासह सी-स्टार मध्ये बसला असता.
असो, असो. ठीक आहे. केव्हातरी बदला घेऊ. बाकी खांदेरी उंदेरीचे फोटो पाहून डोळे निवले असेच म्हणतो.
अशोक पाटील
नचीकेत मस्तच... आमचा गेल्या
नचीकेत मस्तच...
आमचा गेल्या होळीचा खांदेरी ट्रेक आठवला....ती सी-स्टार मस्तच आहे....
उत्तम आणी अविनाश बुंदकेंच्या घरी पाहूणचारही झोडून आलोय....
झकासच...
नचिकेत मस्त फोटू आणि वर्णन..
नचिकेत मस्त फोटू आणि वर्णन..
मस्तच ...फोटो अप्रतिम.आणी
मस्तच ...फोटो अप्रतिम.आणी वर्णन
मस्तच वॄतांत वैद्यां कडून
मस्तच वॄतांत
वैद्यां कडून सगळं कळलं होतच पण इथे वाचायला जाम मजा आली..
वरच्या फोटोत काळ्या वारली पेंटिंग च्या टी-शर्ट मधे आहे ते आम्चे मालक..
धन्यवाद दोस्तहो!! मुख्य
धन्यवाद दोस्तहो!!
मुख्य म्हणजे ज्यांनी कोणी ही मोहीम आयोजित केली त्याला लाख-लाख धन्यवाद..
हो ना! माझ्याकडूनही धन्यवाद!
खांदेरीच्या दिपगृहात आतूनही फोटो काढायला परवानगी देतात का आता?
२० रूपये भरून परवानगी आहे. अर्थात सगळेच फोटो टाकले नाहीयेत मी.
त्या परिसंवादात तु झोपला होतास... बरं झालं ..
आणि उंदेरी बद्दल तर बोलायलाच नको. आजकाल तो कोळी लोकांचा परमीट रुम, बीयरबार झालाय.
>> हो ना! चिक्कार बाटल्या सापडल्या तिथे..
आरंभ - फोटो प्रदर्शनाला येणार का?
>> यायची फार फार इच्छा आहे... पण नेमका शुक्र-रवि सुट्टी आणि शनि-वर्किंग आहे! आणि पुणे कॉलिंग... सो बघू...
बागेश्री,
अशोकजी, सर्वप्रथम तुमचा प्रतिसाद पाहून लई आनंद झाला हे सांगू दे!
तुम्ही 'सेनापती' या आयडी ला आजच्या आज जाब विचारा की,
>> जाब?? मेलोच की!
बाकी त्या दिवशी कोल्हापुरात तुमची व रोहनची भेट झाल्याचे रोहनकडून समजले. तुम्हाला चालणार असल्यास एकदा मलाही भेटायचं आहे तुम्हाला.
मनोज,
मस्त वर्णन. आमचापण दिवस
मस्त वर्णन. आमचापण दिवस सार्थकी लागला. त्या काळातल्या गड किल्ल्यांवरचे पाण्याचे नियोजन, आजही आपल्याला मार्गदर्शक ठरेल !
मस्त वर्णन आणि फोटो रे.
मस्त वर्णन आणि फोटो रे.
सेनापती सोबत मोहिमेत सहभागी व्हायला मिळणे ही भाग्याचीच गोष्ट.
आनंदयात्री ~ यू आर ऑल्वेज
आनंदयात्री ~
यू आर ऑल्वेज वेलकम.
धम्माल रे.... एकदम मस्त
धम्माल रे.... एकदम मस्त
तुमचा परिसंवाद कळला बरं आम्हा सगळ्यांना, त्यामुळे आम्ही देखील हसून घेतो
छान वर्णन आणि सगळी
छान वर्णन आणि सगळी प्रकाशचित्रे पण.:स्मित:
पूर्वी या किंल्यांवर जाण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट ची परवानगी लागत असे. ती त्यावर असणार्या दीपगृहा मुळे. आता प्रकार बंद झालाय का? फक्त थळच्या कोळ्यांना तिथे प्रवेश असे ते पण तिथे असलेल्या वेतोबाच्या मंदिरामुळे.
बाकी उंदेरी किल्याची अवस्था बघवत नाही.
>>आणि उंदेरी बद्दल तर बोलायलाच नको. आजकाल तो कोळी लोकांचा परमीट रुम, बीयरबार झालाय.<< +१
दिनेशदा, धन्यवाद! सुहास,
दिनेशदा, धन्यवाद!
सुहास,
वरच्या फोटोत काळ्या वारली पेंटिंग च्या टी-शर्ट मधे आहे ते आम्चे मालक..
ओह्ह!! अस्सं होय! अनिकेत वैद्य ना?
सेनापती सोबत मोहिमेत सहभागी व्हायला मिळणे ही भाग्याचीच गोष्ट.
>> पूर्वपुण्याईच की!
विजयजी, परवानगगी अजूनही लागते बहुतेक.. रोहन अधिक माहिती देऊ शकेल.
काय मस्त जगताय ,लेको ! आणि,
काय मस्त जगताय ,लेको ! आणि, इतराना जळवताय पण !
मजा येते हे पहायला, वाचायला ! मनःपूर्वक धन्यवाद .
नचिकेता मस्त झाली भटकंती
नचिकेता मस्त झाली भटकंती तुमची आणि वर्णनही छान केलेस.
फोटो पण तितकेच सुंदर ...
किल्ल्यामध्ये वेतोबाचे मंदिर आहे. <<< वेतोबाच्या (शिळा) बद्दल असेही सांगतात की दर वर्षी त्याचा आकार थोडा थोडा वाढतो आहे. कदाचीत त्यावर लावल्या जाणार्या शेंदुरामुळे असेल
तसेच हा खांदेरीवर पसरलेला वटावृक्ष --
मस्त प्रचि, वर्णन..
मस्त प्रचि, वर्णन..
Pages