नाते समुद्राशी -भाग २
पप्पानी जेव्हा भारती जॉइन केली तेव्हा ती खूप लहान कंपनी होती. तेव्हा कंपनी टगच्याच ऑर्डर जास्त घ्यायची. भारतीला तेव्हा टगमास्टर म्हणत असत. तरीदेखील उत्कृष्ट कामामुळे कंपनीला मोठ्यामोठ्या ऑर्डरी मिळत गेल्या. या लेखामधे जहाजबांधणी यावर थोडेसे लिहिणार आहे. तांत्रिक बाबी कमीतकमी ठेवायचा मी प्रयत्न केला आहे. त्यातही मी इंजीनीअर नसल्याने जर काही तांत्रिक चुका आढळल्या तर जरूर सांगा.
जहाजाची बांधणी हा एक पूर्णपणे वेगळ्या अभ्यासाचाच विषय आहे. साधारणपणे जहाजांची गरज ही समुद्रमार्गाने प्रवास करणार्या आणि वाहतूक करणार्या कंपन्याना भासते. (काय तरी अभ्यासपूर्ण वाक्य आहे. यावर एजोटाझापा,)त्याशिवाय समुद्रामधे तेल खणून काढणार्या ऑइल रिगला देखील वेगवेगळ्या विशिष्ट प्रकारच्या जहाजाची गरज असते. सध्या जगातील सर्व महत्त्वाची वाहतूक ही समुद्रमार्गाने केली जाते. अन्नधान्ये, कापडे, कोळसा, मशिन्स, इंधने अशा अनेक जड वस्तूचे दळणवळण जलमार्गाने केले जाते. जलमार्गाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे जास्तीत जास्त अंतर कापता येऊ शकते. व हे मार्ग बांधण्यासाठी काहीही खर्च येत नाही.
सध्याचे जहाज हे अत्यंत मजबूत आणि टिकाऊ असते. गेल्या कित्येक शतकापासून चालू असलेल्या संशोधनाचा आणि विविध प्रयोगाचे हे फळ आहे. अर्थात, अजूनही असे संशोधन चालू आहेच. जहाज बांधणी उद्योगाला प्रत्येक देशाच्या सरकारकडून सहकार्य मिळते कारन हा परकीय चलनाचा उत्तम स्त्रोत आहे.
जहाज बांधताना "जहाजाने नक्की काय करायचे आहे?" हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा असतो. या जहाजाने काय काम करणे अपेक्षित आहे यावर त्या जहाजाचे स्वरूप ठरते. जहाजाची क्षमता कितीची हवी? ते कुठल्या भागामधून फिरणार आहे? कुठल्या बंदरामधे जाणे अपेक्षित आहे? आणि सर्वात महत्त्वाचे बांधण्यासाठी किती पैसा उपलब्ध आहे? यावर जहाजाचे प्राथमिक मॉडेल ठरते. या कंपन्या आपापाल्या गरजेनुसार जहाजाची स्पेसिफकेशन्स जहाज बांधणी करणार्या कारखान्याना देतात. यामधे काही स्पेसिफीकेशन्स ही जागतिक दृष्ट्या ठरवलेली आहेत. इंटरनॅशनल मारीटाईम ऑर्गनायझेशन तर्फे ही स्पेसिफिकेशन्स ठरवली जातात. त्याखेरीज आय आर एस, एल आर अशा वेगवेगळ्या क्लासिफिकेशन सोसायटी आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या नियमानुसारच जहाजाची बांधणी करावी लागते.
सर्वसाधारणपणे जहाज म्हटले की डोळ्यासमोर टायटॅनिक टाईप एखादे जहाज उभे राहते. ते क्रूझ शिप होते. मात्र गाड्यामधे जसे वेगवेगळे प्रकार असतात तसेच जहाजाचेदेखील टग, अँकर हँडलिंग, बल्क कॅरीयर, क्रूझ, ट्रान्सपोर्ट, प्लॅटफॉर्म सप्लाय व्हेसल असे वेगवेगळे प्रकार आहेत. त्या त्या प्रकारानुसार जहाजाची लांबी, रूंदी आणि इतर गोष्टी ठरतात.
जहाज बांधणीमधे डीझाईनचे काम नेव्हल आर्किटेक्ट करतात. म्हणजे ऑफिसमधे पीसीसमोर बसून ते जहाज, त्याची अंतर्गत रचना, त्यासाठीचे कॅल्क्युलेशन वगैरे सर्व बाबी ठरवतात. हे काम अत्यंत महत्वाचे शिवाय किचकट असते. पूर्णपणे लोखंडाने बांधलेले आणि जवळ जवळ तीन हजार टनाचे जहाज पाण्यावर तरंगण्यासाठी त्याची लांबी, रूंदी आणि इतर मोजमापे अत्यंत महत्त्वाची असतात. कारण एक किंवा दोन मिलीमीटरची चूक करोडोचे नुकसान करू शकते. अर्थात प्रॉडक्शनचे इंजीनीअर्स आणि कामगार हे डीझाईनवाल्याच्या अशा चुका मिळाल्या की त्या बरोबर सुधारत असतातच. तेवढे ते कामामधे माहिर झालेले असतात. जहाजाची प्रॉपल्शन सिस्टीम ही मरिन इंजीनीअर्स डीझाईन करतात.
त्यानंतर जहाज बांधणीचे काम शिपयार्डमधे चालू होते. शिपयार्ड हे समुद्राजवळ असावे लागतात, त्याशिवाय जिथून जहाज लाँच करणार तिथल्या चॅनलची खोली ही त्या जहाजाला अनुकूल असावी लागते. बहुतांशी जहाजे ही डीझेल इंजिन्सवर चालतात. पाण्यामधे जहाज हलवण्यासाठी प्रॉपेलर्स वापरलेले असतात. हे प्रोपेलर्स म्हणजे भलेमोठ्ठे पंखे असतात. हे प्रोपेलर्स टोकाला थोडेसे ट्विस्ट् केलेले असतात आणि खाली रूंद पात्यांचे असतात.
सर्वात आधी जहाजाचा सांगाडा उभारला जातो. त्याला "हल" म्हणतात. हलचे मुख्य काम लोखंडाच्या मोठ्यामोठ्या शीट्स मापाप्रमाणे कापून त्यांचे वेल्डिंग करून ढाचा तयार करणे. हे लोखंड माईल्ड स्टीलचे असते. आणि त्यामधेदेखील वेगवेगळे प्रकार असतात. लोखंडाची ही प्रत्येक फेम ठराविक आकारामधे कापलेली असते. त्या प्रत्येक फ्रेमवर हीट नंबर टाकलेला असतो. हा हीट नंबर या फ्रेमचा आयडींटिफिकेशन नंबर असतो. नंतर या फ्रेमची कसून टेस्ट केली जाते. कार्बन पार्टिकल्स, मरिन प्रॉपेर्टीज अशा वेगवेगळ्या टेस्टमधून ही फ्रेम पास केली जाते. प्रेशराईज्ड हवा त्यावरती ब्लास्ट करून सर्व गंज काढला जातो. नंतर त्यावर प्रायमर मारून रंग चढवला जातो. हलवरती रंगाचे एकूण सात थर चढवले जातात. जहाजाच्या एकूण वजनापैकी एक ते दीड टनाचा नुसता पेंटच असतो!! अर्थात हा रंग अत्यंत टिकाऊ वगैरे स्वरूपातला असतोच. पण तरीही दर पाच वर्षानी जहाज परत रंगवायला लागतेच.
आता एवढ्या मोठ्या जहाजामधे एखाद्याला अमुक ठिकाणी जाऊन काम कर हे कसे सांगणार? जहाजामधे काम करणारे सर्व जण एकाच देशाचे एकच भाषा बोलणारे असतील असे नाही. म्हणून प्रत्येक ठिकाण अचूकपणे सांगण्यासाठी बो, आफ्ट वगैरे शब्द जागतिक् स्तरावरती वापरतात. (खरंत सर्व नॉटिकल टर्म्स या प्रत्येक जहाजावरच्या कर्मचार्याला समजाव्या म्हणूनच वापरल्या जातात) जहाज जिथे सुरू होते त्या भागाला बो असे म्हणतात, (टायटॅनिकवर उभे राहून आय अॅम द किंग ऑफ द वर्ल्ड ओरडणारा जॅक आठवा.) सर्वात शेवटच्या भागाला आफ्ट म्हणतात. (आत्महत्या करायला निघालेली रोझ कुठून उडी मारणार होती ते आठवा!!). जहाजामधे बो कडे तोंड करून उभे राहिल्यास डावीकडे पोर्ट आणि उजवीकडे स्टारबोर्ड म्हणतात.
जहाज मोजताना ते उलटे मोजतात. म्हणजे सर्वात पाठीमागे जिथे स्टेअरिंग गीअर असते ती कायम फ्रेम नंबर झीरो असते. त्याच्या आधीच्या फ्रेम्स मायनसमधे मोजतात. नंतरच्या फ्रेम्स बो कडे मोजत येतात. त्यामुळे भल्या मोठ्या जहाजावर एखादे ठिकाण अचूकपणे सांगता येते.
(वरच्या चित्रामधे जहाजाचा बल्बस बो दिसत आहे. हा बो जास्तीत जास्त पाणी कापतो. परिणामी जहाजाची इन्धन क्षमता वाढते. लाल चौकोन केलेल्या भागाकडे दुर्लक्ष करा. )
जहाजाची बांधणी करताना सर्वात जास्त लक्ष हे सुरक्षिततेकडे द्यावे लागते. भर समुद्रामधे आजूबाजूला काहीही नसताना एखादे संकट ओढावले म्हणजे जहाजावरच्या माणसाची काय हालत होत असेल याचा आपण फक्त विचारच करू शकतो. यासाठी स्वत:च्या जहाजाची सुरक्षितता आणि समोरच्या संकटात सापडलेल्या जहाजाला मदत करण्यासाठीची आवश्यक प्रणाली या दोन्ही गोष्टी प्रत्येक जहाजासाठी आवश्यक असतात.
जहाज बांधताना ते कधीही डबल बॉटम ठेवून बांधावे लागते. यामुळे सर्वात खालच्या थराला(याला कील म्हणतात) जरी धक्का लागून पाणी आत आले तरी त्यामुळे लगेच जहाजामधे पाणी शिरत नाही. तसेच जहाजाच्या या खालच्या भागामधे इंजिन रूम, पंप रूम, बोथर्स्टर, स्टेअरिंग गीअर अशा अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असतात. या सर्व रूम्स एकमेकापासून वॉटर टाईट दरवाज्यानी वेगवेगळ्या केलेल्या असतात. हे दरवाजे लावून घेतले की या रूम्समधे पाण्याचा शिरकाव होऊच नये म्हणून ही सर्व व्यवस्था केलेली असते. या डबल बॉटमच्या मधे असणार्या टँकमधे पाणी, इंधन साठवलेले असते.
टायटॅनिकच्या अपघातानंतर जहाजावरती अतिआवश्यक केलेली गोष्ट म्हणजे लाईफ बोट्स, लाईफ जॅकेट्स आणि लाएफ राफ्ट्स. जहाजाची क्षमता जर पन्नास माणसांची असेल तर किमान दुप्पट क्षमतेमधे या सर्व वस्तू जहाजावरती असाव्याच लागतात. लाईफ बोट्समधे खारवलेले मांस, चॉकोलेट्स, पाणी अशा जीवनावश्यक वस्तू कायम ठेवाव्याच लागतात.
याखेरीज दुसर्या जहाजाला लागलेली आग विझवण्याकरता असणारी फायर फाईटिंग सिस्टीम सारखी प्रणाली प्रत्येक जहाजामधे असते. यामधे जहाज समुद्रातून पाणी ओढून घेऊन ते एका शक्तिशाली पंपाने समोरच्या जहाजावर फवार्यासारखे मारू शकते.
जहाजाच्या सुरक्षिततेसाठी वेगवेगळे नियम, रूल्स, कायदे कायम केले जात असतात. तरीही अपघात हे घडतातच. कित्येकदा हे अपघात तांत्रिक बाबीने न घडता माणसाच्या चुकीमुळे घडतात. सध्या संपर्कव्यवस्थेमधे झालेली क्रांती बघता जहाजाचे अपघात होत नसतील असे आपल्याला वाटते. पण नुकत्याच घडलेल्या इटलीमधील जहाज अपघाताने हा समज खोटा ठरवला आहे. मुंबई बंदरामधे झालेला एम एस चित्राचा अपघात देखील अशाच अतिआत्मविश्वासाने झाला होता.
आमचे पप्पा कायम म्हणतात, एक वेळ यंत्रावर विश्वास ठेवला तर तो कधी धोका देणार नाही. माणसावर विश्वास ठेवा अथवा ठेवू नका, तो धोका देणारच.
पुढच्या लेखामधे अशाच काही अपघाताविषयी लिहेन.
मस्त लिहीत आहेस ही मालिका.
मस्त लिहीत आहेस ही मालिका. अतिशय रोचक माहिती.
सर्व प्रतिसादकांना धन्यवाद.
सर्व प्रतिसादकांना धन्यवाद.
गामा पैलवान, लेखात जो फोटो दिलाय त्यामधे जहाजाचा पुढचा भाग दिसत आहे त्याला बो असे म्हणतात. त्याच फोटोत जिथे रोप दिसत आहे त्या भागाला बल्बस बो असे म्हणतात.
भाऊ, आलंग आणि दारूखान्याबद्दल लिहिणार आहे नंतर.
माझगाव डॉकबद्दल पण लिहेन.
महाराष्ट्रामधे शिप ब्रेकिंगचे केंद्र निर्माण करण्यामधे भरपूर अडचणी आहेत. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हे त्यातले एक प्रमुख कारण. इतर भौगोलिक अडचणी आहेतच. रेवस बंदर (हे एक नैसर्गिक बंदर आहे) भारतातील सर्वात मोठे बंदर करायची योजना होती. ती आता बहुतेक गुंडाळली आहे.
गुजरात सरकारने कुठल्या उद्योगधंद्यावर लक्ष केंद्रित करायचे हे पक्के ठरवलेले आहे आणि त्यानुसार ते त्यांची धोरणे ठरवतात. म्हणूनच भारतातले सर्वात मोठे प्रायव्हेट शिपयार्ड पिपावाव इथे बांधण्यात येत आहे. आणि त्यासाठी गुजरात सरकारने त्यांच्या बाजूने पूर्ण मदत केली आहे. कर्नाटक, तामिळनाडू या राज्यानी देखील जहाजबांधणी उद्योगाकडे लक्ष द्यायला सुरूवात केली आहे.
महाराष्ट्राबद्दल न लिहिलेलंच चांगलं!!!!!
छान रंजक माहिती. धन्यवाद
छान रंजक माहिती. धन्यवाद नंदिनी.
धन्यवाद इंद्रा.
<< भाऊ, आलंग आणि
<< भाऊ, आलंग आणि दारूखान्याबद्दल लिहिणार आहे नंतर. >> खरंच, या विषयाच्या सगळ्याच पैलूंचा चांगलाच अभ्यास दिसतोय तुमचा ! मी उगीचच मधे मधे लुडबुड करून लय बिघडवतोय तुमच्या छान विषय मांडणीची !
<< रेवस बंदर (हे एक नैसर्गिक बंदर आहे) भारतातील सर्वात मोठे बंदर करायची योजना होती. ती आता बहुतेक गुंडाळली आहे. >> तुमच्या रत्नागिरीच, दाभोळचंही तेंच झालंय !!!
भाऊ, माझा अभ्यास वगैरे काही
भाऊ, माझा अभ्यास वगैरे काही जास्त नाही आहे. पण घरामधले तीन तीन लोक या क्षेत्रात असल्याने बर्याच गोष्टी कानावर सतत पडत असतात. आणि तुम्हीपण छानच माहिती देत आहात की. लेखाची लय वगैरे काही बिघडत नाही. उलट तुम्ही असे काही विचारले की मला जास्त माहिती काढायचा हुरूप येतो. पण खूप किचकट तांत्रिक माहिती झाली की कुणी वाचणारच नाही, असे मला वाटतय.
रत्नागिरी आणि दाभोळ दोन्ही ठिकाणी भारतीची शिपयार्ड्स आहेत. रत्नागिरी तर काही वर्षापूर्वी महाराष्ट्रातले एकमेव प्रायव्हेट शिपयार्ड होते. राजापूर पण विकसित होत होते, पण मधेच माशी शिंकली. दाभोळला सध्या ऑईल रिग्ज बांधली जात आहेत. शिपयार्ड साठी आणि पोर्टसाठी भौगोलिक गरजा वेगळ्या असतात. त्याबद्दल पण लिहावेसे वाटत आहे.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
'
रेवस पोर्टला नैसर्गिक खोली जास्त आहे. अशी जास्त खोली असलेली नैसर्गिक बंदरामधे मोठ्या मदर शिप्स येऊ शकतात. सध्या भारतात असे एकही बंदर नाही. त्यामु़ळे हे बंदर विकसित झाल्यास महाराष्ट्राला याचा जास्त फायदा होऊ शकतो. पण तिथले राजकारण हे होऊ देत नाही.
मस्त लेख. आणि सविस्तर
मस्त लेख. आणि सविस्तर प्रतिक्रियादेखील आवडल्या.
माहितीपूर्ण लेख! सोप्या
माहितीपूर्ण लेख! सोप्या भाषेमुळे आवडला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त माहिती नंदिनी. मिमि. चा
मस्त माहिती नंदिनी. मिमि. चा फरक पडला की इतके नुकसान का होऊ शकते ह्याचे एखादे उदाहरण देशील का?
भाऊ, लिहा लिहा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद भाऊ आणि नंदिनी! जहाज
धन्यवाद भाऊ आणि नंदिनी!
जहाज मोडणीवरून आठवलं. इंजिनियरिंगला असताना आम्ही कार्यस्थळभेटीसाठी (works visit) मुंबई गोदीत गेलो होतो. जहाजबांधणी कशी चालते ते बघायला. एका जहाजावर चढलो तर काहीतरी वेगळंच वाटू लागलं. नंतर कळलं की ते तोडणीचं जहाज होतं! मार्गदर्शकाला जहाजातील काही गोष्टी बांधून झाल्यावर कश्या दिसतात ते अगोदरच दाखवायचं होतं. आयला, मग आम्हा मुलांना हे सांगायचं नाही का आधी? आम्ही समजून चाललो की जहाज बांधतांना भंगार दिसतं आणि नंतर रंगरंगोटी करून चकचकीत बनवतात!
![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
आ.न.,
-गा.पै.
इंद्रधनुष्य, आकृतीबद्दल आभारी
इंद्रधनुष्य, आकृतीबद्दल आभारी आहे. आता कळलं बो कश्याला म्हणतात ते. मराठीत पुढांग म्हणता येईल? की एखादी संज्ञा आगोदरपासून आहे त्यासाठी?
आणि बो ला पाण्याचा सगळा रोध का सहन करावा लागतो तेही कळलं. याकरिता अर्धवर्तुळाकार आकार योग्य पडतो का? की इतरही आकार उपलब्ध आहेत?
आ.न.,
-गा.पै.
नंदिनी, तांत्रिक माहिती
नंदिनी, तांत्रिक माहिती टाकलीत तरी चालेल. जमेल तेव्हढी समजावून घेऊ आम्ही. शिवाय भाऊ, इंद्रधनुष्य हेही आहेतंच!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आ.न.,
-गा.पै.
उत्तम माहिती देत आहेस.
उत्तम माहिती देत आहेस.
<< मराठीत पुढांग म्हणता येईल?
<< मराठीत पुढांग म्हणता येईल? >> मला वाटतं, मराठीत, निदान कोकणात तरी, या भागाला होडी/जहाजाची "नाळ" हा शब्द आहे. अर्थात, इथंही 'फायनल वर्ड' नंदिनीजींचाच !![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
भाऊ, सर्वात पहिले म्हणजे मला
भाऊ, सर्वात पहिले म्हणजे मला फक्त नंदिनी म्हणा, तेही अगं नंदिनी.
नाळ हा शब्द मला माहित नव्हता.
मी बहुतांशकरून बो किंवा फॉरवर्ड असेच म्हणताना ऐकले आहे आमच्या पप्पाना माहित असण्याची बिल्कुल खात्री नाही, त्यांचे मराठी अत्यंत बेभरवशाचे आहे. तरी खलाशी लोकाना विचारून बघेन. त्याना कदाचित माहीत असेल. )(किंवा नसेल सुद्धा, बहुतेक खलाशी हे विजापूरकडचे असतात. कानडी बोलणारे
) त्यांची स्वत:ची एक वेगळी परिभाषा असते.
सुनिधी, युट्युबवर व्हीडीओ आहेत तशा अपघाती लाँचिंगचे. पण तसे अपघात का घडले त्याची कारणे वेगळी असतील. पप्पाच्या करीअरमधे असा अपघात अजून तरी घडलेला नाही. टचवूड.
पण मिमिची चूक पण का त्रासदायक होऊ शकते हे सांगायचा प्रयत्न करते. समजा ए या पॉइंटला तीन पाईप्स एकत्र येणार आहेत आणी ते वेल्डिंगने एकत्र केले जातील. आता या तीन पाईप्सच्या मोजमापामधे जर चूक झाली (कारण डीझाईन करणारा वेगळा, पाईप कापणारा वेगळा, पाईप बसवणारा वेगळा आणि वेल्डिंग करणारा वेगळा) आणि ही चूक आधी लक्षात आली नाही, तर वेल्डरला ते पाईप्स वेल्ड करता येणार नाहीत. मग आधीचे पाईप उखडा, दुसरे बसवा, आणि वेल्डिंग करा. म्हणजे वेळेचं आणि पैशाचं नुकसान. बरं हे पाईप्स एका जहाजामधे कितीतरी किमी लांबीचे असतात. म्हणजे एक चूक आणि कितीतरी पाईप्सची बदलाबदली. म्हणून जहाज बांधायला घ्यायच्या आधी कितीतरी दिवस त्या डीझाईन्सचा स्टडी केला जातो. आणि प्रत्यक्ष काम करतानादेखील अशा चुका अथवा काही irregularity आढळल्यास ती ताबडतोब सुधारली जाते आणि मग पुढचे काम करतात.
गामा पैलवान, जहाज बांधताना पण ते भंगारच दिसते. नंतर सात वेळा रंग लावूलावून चकचकीत करतात
मोठ्या जहाजामधे तर रंगाचे काम कायम (सेलिंगला गेल्यावर) पण चालूच असते. केबिन क्रूमधे काही लोक फक्त पेंटिंगचेच काम करतात. पुढच्या लेखात असे काही जहाज अर्धवट बांधलेले फोटो टाकेन.
आणि सर्व प्रतिसादकाना धन्यवाद.
नंदिनी खुप मस्त मालिका सुरु
नंदिनी खुप मस्त मालिका सुरु केली आहेस. अजुन माहिती येउ देत. या क्षेत्रातले बरेच निरक्षर लोक आहेत / असणार कारण साधारण या गोष्टींशी लोकांचा संबंध येत नाही. म्हणुन तुझ्या लेखांची वाट पहाणे चालु आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
येउदेत अजुन.
<< मी बहुतांशकरून बो किंवा
<< मी बहुतांशकरून बो किंवा फॉरवर्ड असेच म्हणताना ऐकले आहे >> व्यापारी व लढाऊ जहाजं हा ब्रिटीशांच्या जीवनाचा, इतिहासाचा व साहित्याचा अविभाज्य भागच; त्यामुळे विविध प्रकारच्या जहाजांचीं,जहाजाच्या प्रत्येक भागाचीं, वेगवेगळ्या आकाराच्या/ जहाजाच्या विविध ठीकाणी लावायच्या शीडांची इ.इ. नांवांमुळे इंग्लीश भाषेत किती मोलाची भर पडली असावी याची कल्पना येते !
नंदिनी, मस्त मालिका आहे.
नंदिनी, मस्त मालिका आहे. अतिशय माहितीपूर्ण लेख आहेत, शिवाय तू लिहितेस म्हटल्यावर लिहिलेलं कितीही क्लिष्ट असलं तरी कळेलच, याची खात्री असते. पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इंग्लीश भाषेत किती मोलाची भर
इंग्लीश भाषेत किती मोलाची भर पडली असावी याची कल्पना येते !>> हो. ईंग्रजी भाषेतले कित्येक वाक्प्रचार या जार्गनमधूनच आले आहेत.
उदा. Laying the keel.
वा !! आवडलं ... पुढच्या कोकण
वा !! आवडलं ... पुढच्या कोकण ट्रिप मध्ये प्रत्यक्ष दाखवण्याची व्यवस्था करा. नाहितर मंगळुरास येतो..
मस्त लेखमाला सुरु आहे. आपण
मस्त लेखमाला सुरु आहे.
आपण मराठीत ते जहाज म्हणतो तर इंग्लिश मधे त्याचा स्त्री लिंगी उल्लेख केला जातो हे मला माहित नसल्याने एकदा मजा झाली. मी काम करतो त्या कंपनीचा टनावारी माल मोठ्या जहाजाने पाठवला जातो ( एकावेळी २०,००० २५,००० टन असा ) त्या कामाच्या काही भागाची जबाबदारी माझी होती. व बॉस नी एक दिवस बोलता बोलता विचारल व्हेन इज शी अरायव्हींग? माझ्या चेहर्यावर भल मोठ प्रश्नचिन्ह !! इथे केमिकल प्लाण्ट मधे कोण व्ही आय पी महिला येणार आहे का काय? असही वाटून गेल. मग बॉसनी जहाजाच नाव घेतल सायकेम लिलि !! तेव्हा माझ्या डोक्यात उजेड पडला. अनंत सामंतांची कादंबरी एम टी आयवा मारु आठवली अन लक्षात आल की हे जहाजाबद्दल बोलण सुरु आहे.
बाकी या जहाजांची नाव ही मस्त असतात ती ज्या प्रदेशा शी संबंधीत असतील त्याचा अंदाज येतो. चिनी कोरियन जपानी भारतीय युरोपीय नाव वेगळी लक्षात येतात. एक वेगळच जग आहे ते सार !!
लंपन, बंगळूरावरून मंगळूरास
लंपन, बंगळूरावरून मंगळूरास येणे सोप्पे पडेल. तर येणेचे करावे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी या जहाजांची नाव ही मस्त असतात ती ज्या प्रदेशा शी संबंधीत असतील त्याचा अंदाज येतो.>>> हो. कलकत्ता पोर्ट ट्रस्टची काही नावं खरंच खूप सुंदर होती. तरंगिणी, समुद्रलतिका, सिंधुलावण्या अशी काही नावे मला तर आवडली होती. आणि जहाजाचा उल्लेख देखील बर्याचदा द लेडी म्हणून केला जातो. ते ऐकायला जाम गंमत वाटते. द लेडी विल बी डिलेव्हर्ड नेक्स्ट मंथ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
<< एक वेगळच जग आहे ते सार !!
<< एक वेगळच जग आहे ते सार !! >> १००% सहमत.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
'पी अँड ओ' कंपनीच्या प्रचंड मोठ्या 'सुपर लक्झरी' जहाजांचीं नांवं इंग्लंडच्या राण्यांचींच असायचीं; त्यामुळे, << व्हेन इज शी अरायव्हींग? >> ऐवजी "व्हेन हर हायनेस इज अरायव्हींग ?", असंच विचारायची पाळी येत असावी !!!
"व्हेन हर हायनेस इज
"व्हेन हर हायनेस इज अरायव्हींग ?"
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
एनरॉन प्रकल्पाच्या नजीकच
एनरॉन प्रकल्पाच्या नजीकच असलेल्या वेलदूर किनार्यावर वाळूत शेवाळाची पुटं अंगावर चढवत एक जुनाट महाकाय लांकडी गलबत खिचपत पडलं होतं; एनरॉनचा एक ज्येष्ठ अमेरिकन इंजीनीअर त्या गलबताच्या प्रेमातच पडला व त्याने तें गलबत ' सी वर्दी' करून अमेरिकेला न्यायचं ठरवलं व त्यावर लाखो रुपये खर्च केले [ संपूर्ण कणा (keel) बदलणं, पाण्याच्या टांक्या बसवणं, नौकानयनासाठी आवश्यक सर्व नवीन व अत्याधुनिक उपकरणं आणणं इ.इ.]. बाहेरून साफसफाई करताना दडलेलं त्या गलबताचं नांव अचानक उघडकीस आलं - " पवनमित्र " ! त्याचा अर्थ समजावून घेतल्यावर तो इंजिनीअर इतका आनंदित झाला कीं गलबताचं नवीन नांव ठेवण्याचा बेत तर त्याने तात्काळ रद्द केलाच
पण तें नांव छापलेले [ "Pavan-mitra is coming"] टी-शर्ट त्याने खास बनवून घेतले व अमेरिकेतल्या आपल्या मित्राना व गलबताचं काम केलेल्या इथल्या प्रत्येकाला वांटले. !!
इति जहाजांचं नाममहात्म्य !
[ मी त्या गलबताचं नूतनीकरणाचं काम चालू असताना भारावून जाऊन दोनदां मुद्दाम गेलो होतों; तीव्र कुतूहल असूनही पुढे त्या योजेनेचं काय झालं हें मात्र नाही कळलं ! कुणा स्थानिक मायबोलीकरांकडून ही माहिती मिळाल्यास मनातली रुखरुख दूर होईल. ]
जहाजाची क्षमता जर पन्नास
जहाजाची क्षमता जर पन्नास माणसांची असेल तर किमान दुप्पट क्षमतेमधे या सर्व वस्तू जहाजावरती असाव्याच लागतात.
>>> थोडे वाढवतो पुढे.. हे अशासाठी की जर डावीकडे म्हणजे पोर्ट बाजूच्या लाईफ बोट्स, लाईफ जॅकेट्स आणि लाएफ राफ्ट्स काही कारणाने वापरता नाही आल्या तर उजवीकडे म्हणजे स्टारबोर्ड बाजूच्या लाईफ बोट्स, लाईफ जॅकेट्स आणि लाएफ राफ्ट्स वापरता याव्यात. म्हणजे आपत्ती कुठल्याही बाजूस आली असेल तर दुसऱ्या बाजूस पुरेशी साधने असतात.
बोथर्स्टर ... >>> ह्याचा अजून एक फायदा म्हणजे जहाज बोथर्स्टर वापरून स्टारबोर्ड किंवा पोर्ट अश्या दोन्ही बाजूला सरकू शकते.
डबल बॉटम ... आमच्या कंपनीची सर्व जहाजे डबल बॉटम आहेत... खासकरून आर्टिक महासागरात जिथे पाण्याखाली हिमनग असतात तिथे हे आवश्यकच..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच..
छानच..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भाऊ. दाभोळला गेले की चौकशी
भाऊ. दाभोळला गेले की चौकशी करेन या गलबताबद्दल. सतिशला विचारलं तर त्याला काही माहित नाही म्हणे. (तो आधी दाभोळला होता)
सेनापती, चांगली माहिती. धन्यवाद. अजून अशी माहिती देत जा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदम जबराट मालिका.. आणि खूप
एकदम जबराट मालिका.. आणि खूप माहितीपूर्ण!
खुपच छान महिति
खुपच छान महिति
Pages