नाते समुद्राशी -भाग २
पप्पानी जेव्हा भारती जॉइन केली तेव्हा ती खूप लहान कंपनी होती. तेव्हा कंपनी टगच्याच ऑर्डर जास्त घ्यायची. भारतीला तेव्हा टगमास्टर म्हणत असत. तरीदेखील उत्कृष्ट कामामुळे कंपनीला मोठ्यामोठ्या ऑर्डरी मिळत गेल्या. या लेखामधे जहाजबांधणी यावर थोडेसे लिहिणार आहे. तांत्रिक बाबी कमीतकमी ठेवायचा मी प्रयत्न केला आहे. त्यातही मी इंजीनीअर नसल्याने जर काही तांत्रिक चुका आढळल्या तर जरूर सांगा.
जहाजाची बांधणी हा एक पूर्णपणे वेगळ्या अभ्यासाचाच विषय आहे. साधारणपणे जहाजांची गरज ही समुद्रमार्गाने प्रवास करणार्या आणि वाहतूक करणार्या कंपन्याना भासते. (काय तरी अभ्यासपूर्ण वाक्य आहे. यावर एजोटाझापा,)त्याशिवाय समुद्रामधे तेल खणून काढणार्या ऑइल रिगला देखील वेगवेगळ्या विशिष्ट प्रकारच्या जहाजाची गरज असते. सध्या जगातील सर्व महत्त्वाची वाहतूक ही समुद्रमार्गाने केली जाते. अन्नधान्ये, कापडे, कोळसा, मशिन्स, इंधने अशा अनेक जड वस्तूचे दळणवळण जलमार्गाने केले जाते. जलमार्गाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे जास्तीत जास्त अंतर कापता येऊ शकते. व हे मार्ग बांधण्यासाठी काहीही खर्च येत नाही.
सध्याचे जहाज हे अत्यंत मजबूत आणि टिकाऊ असते. गेल्या कित्येक शतकापासून चालू असलेल्या संशोधनाचा आणि विविध प्रयोगाचे हे फळ आहे. अर्थात, अजूनही असे संशोधन चालू आहेच. जहाज बांधणी उद्योगाला प्रत्येक देशाच्या सरकारकडून सहकार्य मिळते कारन हा परकीय चलनाचा उत्तम स्त्रोत आहे.
जहाज बांधताना "जहाजाने नक्की काय करायचे आहे?" हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा असतो. या जहाजाने काय काम करणे अपेक्षित आहे यावर त्या जहाजाचे स्वरूप ठरते. जहाजाची क्षमता कितीची हवी? ते कुठल्या भागामधून फिरणार आहे? कुठल्या बंदरामधे जाणे अपेक्षित आहे? आणि सर्वात महत्त्वाचे बांधण्यासाठी किती पैसा उपलब्ध आहे? यावर जहाजाचे प्राथमिक मॉडेल ठरते. या कंपन्या आपापाल्या गरजेनुसार जहाजाची स्पेसिफकेशन्स जहाज बांधणी करणार्या कारखान्याना देतात. यामधे काही स्पेसिफीकेशन्स ही जागतिक दृष्ट्या ठरवलेली आहेत. इंटरनॅशनल मारीटाईम ऑर्गनायझेशन तर्फे ही स्पेसिफिकेशन्स ठरवली जातात. त्याखेरीज आय आर एस, एल आर अशा वेगवेगळ्या क्लासिफिकेशन सोसायटी आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या नियमानुसारच जहाजाची बांधणी करावी लागते.
सर्वसाधारणपणे जहाज म्हटले की डोळ्यासमोर टायटॅनिक टाईप एखादे जहाज उभे राहते. ते क्रूझ शिप होते. मात्र गाड्यामधे जसे वेगवेगळे प्रकार असतात तसेच जहाजाचेदेखील टग, अँकर हँडलिंग, बल्क कॅरीयर, क्रूझ, ट्रान्सपोर्ट, प्लॅटफॉर्म सप्लाय व्हेसल असे वेगवेगळे प्रकार आहेत. त्या त्या प्रकारानुसार जहाजाची लांबी, रूंदी आणि इतर गोष्टी ठरतात.
जहाज बांधणीमधे डीझाईनचे काम नेव्हल आर्किटेक्ट करतात. म्हणजे ऑफिसमधे पीसीसमोर बसून ते जहाज, त्याची अंतर्गत रचना, त्यासाठीचे कॅल्क्युलेशन वगैरे सर्व बाबी ठरवतात. हे काम अत्यंत महत्वाचे शिवाय किचकट असते. पूर्णपणे लोखंडाने बांधलेले आणि जवळ जवळ तीन हजार टनाचे जहाज पाण्यावर तरंगण्यासाठी त्याची लांबी, रूंदी आणि इतर मोजमापे अत्यंत महत्त्वाची असतात. कारण एक किंवा दोन मिलीमीटरची चूक करोडोचे नुकसान करू शकते. अर्थात प्रॉडक्शनचे इंजीनीअर्स आणि कामगार हे डीझाईनवाल्याच्या अशा चुका मिळाल्या की त्या बरोबर सुधारत असतातच. तेवढे ते कामामधे माहिर झालेले असतात. जहाजाची प्रॉपल्शन सिस्टीम ही मरिन इंजीनीअर्स डीझाईन करतात.
त्यानंतर जहाज बांधणीचे काम शिपयार्डमधे चालू होते. शिपयार्ड हे समुद्राजवळ असावे लागतात, त्याशिवाय जिथून जहाज लाँच करणार तिथल्या चॅनलची खोली ही त्या जहाजाला अनुकूल असावी लागते. बहुतांशी जहाजे ही डीझेल इंजिन्सवर चालतात. पाण्यामधे जहाज हलवण्यासाठी प्रॉपेलर्स वापरलेले असतात. हे प्रोपेलर्स म्हणजे भलेमोठ्ठे पंखे असतात. हे प्रोपेलर्स टोकाला थोडेसे ट्विस्ट् केलेले असतात आणि खाली रूंद पात्यांचे असतात.
सर्वात आधी जहाजाचा सांगाडा उभारला जातो. त्याला "हल" म्हणतात. हलचे मुख्य काम लोखंडाच्या मोठ्यामोठ्या शीट्स मापाप्रमाणे कापून त्यांचे वेल्डिंग करून ढाचा तयार करणे. हे लोखंड माईल्ड स्टीलचे असते. आणि त्यामधेदेखील वेगवेगळे प्रकार असतात. लोखंडाची ही प्रत्येक फेम ठराविक आकारामधे कापलेली असते. त्या प्रत्येक फ्रेमवर हीट नंबर टाकलेला असतो. हा हीट नंबर या फ्रेमचा आयडींटिफिकेशन नंबर असतो. नंतर या फ्रेमची कसून टेस्ट केली जाते. कार्बन पार्टिकल्स, मरिन प्रॉपेर्टीज अशा वेगवेगळ्या टेस्टमधून ही फ्रेम पास केली जाते. प्रेशराईज्ड हवा त्यावरती ब्लास्ट करून सर्व गंज काढला जातो. नंतर त्यावर प्रायमर मारून रंग चढवला जातो. हलवरती रंगाचे एकूण सात थर चढवले जातात. जहाजाच्या एकूण वजनापैकी एक ते दीड टनाचा नुसता पेंटच असतो!! अर्थात हा रंग अत्यंत टिकाऊ वगैरे स्वरूपातला असतोच. पण तरीही दर पाच वर्षानी जहाज परत रंगवायला लागतेच.
आता एवढ्या मोठ्या जहाजामधे एखाद्याला अमुक ठिकाणी जाऊन काम कर हे कसे सांगणार? जहाजामधे काम करणारे सर्व जण एकाच देशाचे एकच भाषा बोलणारे असतील असे नाही. म्हणून प्रत्येक ठिकाण अचूकपणे सांगण्यासाठी बो, आफ्ट वगैरे शब्द जागतिक् स्तरावरती वापरतात. (खरंत सर्व नॉटिकल टर्म्स या प्रत्येक जहाजावरच्या कर्मचार्याला समजाव्या म्हणूनच वापरल्या जातात) जहाज जिथे सुरू होते त्या भागाला बो असे म्हणतात, (टायटॅनिकवर उभे राहून आय अॅम द किंग ऑफ द वर्ल्ड ओरडणारा जॅक आठवा.) सर्वात शेवटच्या भागाला आफ्ट म्हणतात. (आत्महत्या करायला निघालेली रोझ कुठून उडी मारणार होती ते आठवा!!). जहाजामधे बो कडे तोंड करून उभे राहिल्यास डावीकडे पोर्ट आणि उजवीकडे स्टारबोर्ड म्हणतात.
जहाज मोजताना ते उलटे मोजतात. म्हणजे सर्वात पाठीमागे जिथे स्टेअरिंग गीअर असते ती कायम फ्रेम नंबर झीरो असते. त्याच्या आधीच्या फ्रेम्स मायनसमधे मोजतात. नंतरच्या फ्रेम्स बो कडे मोजत येतात. त्यामुळे भल्या मोठ्या जहाजावर एखादे ठिकाण अचूकपणे सांगता येते.
(वरच्या चित्रामधे जहाजाचा बल्बस बो दिसत आहे. हा बो जास्तीत जास्त पाणी कापतो. परिणामी जहाजाची इन्धन क्षमता वाढते. लाल चौकोन केलेल्या भागाकडे दुर्लक्ष करा. )
जहाजाची बांधणी करताना सर्वात जास्त लक्ष हे सुरक्षिततेकडे द्यावे लागते. भर समुद्रामधे आजूबाजूला काहीही नसताना एखादे संकट ओढावले म्हणजे जहाजावरच्या माणसाची काय हालत होत असेल याचा आपण फक्त विचारच करू शकतो. यासाठी स्वत:च्या जहाजाची सुरक्षितता आणि समोरच्या संकटात सापडलेल्या जहाजाला मदत करण्यासाठीची आवश्यक प्रणाली या दोन्ही गोष्टी प्रत्येक जहाजासाठी आवश्यक असतात.
जहाज बांधताना ते कधीही डबल बॉटम ठेवून बांधावे लागते. यामुळे सर्वात खालच्या थराला(याला कील म्हणतात) जरी धक्का लागून पाणी आत आले तरी त्यामुळे लगेच जहाजामधे पाणी शिरत नाही. तसेच जहाजाच्या या खालच्या भागामधे इंजिन रूम, पंप रूम, बोथर्स्टर, स्टेअरिंग गीअर अशा अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असतात. या सर्व रूम्स एकमेकापासून वॉटर टाईट दरवाज्यानी वेगवेगळ्या केलेल्या असतात. हे दरवाजे लावून घेतले की या रूम्समधे पाण्याचा शिरकाव होऊच नये म्हणून ही सर्व व्यवस्था केलेली असते. या डबल बॉटमच्या मधे असणार्या टँकमधे पाणी, इंधन साठवलेले असते.
टायटॅनिकच्या अपघातानंतर जहाजावरती अतिआवश्यक केलेली गोष्ट म्हणजे लाईफ बोट्स, लाईफ जॅकेट्स आणि लाएफ राफ्ट्स. जहाजाची क्षमता जर पन्नास माणसांची असेल तर किमान दुप्पट क्षमतेमधे या सर्व वस्तू जहाजावरती असाव्याच लागतात. लाईफ बोट्समधे खारवलेले मांस, चॉकोलेट्स, पाणी अशा जीवनावश्यक वस्तू कायम ठेवाव्याच लागतात.
याखेरीज दुसर्या जहाजाला लागलेली आग विझवण्याकरता असणारी फायर फाईटिंग सिस्टीम सारखी प्रणाली प्रत्येक जहाजामधे असते. यामधे जहाज समुद्रातून पाणी ओढून घेऊन ते एका शक्तिशाली पंपाने समोरच्या जहाजावर फवार्यासारखे मारू शकते.
जहाजाच्या सुरक्षिततेसाठी वेगवेगळे नियम, रूल्स, कायदे कायम केले जात असतात. तरीही अपघात हे घडतातच. कित्येकदा हे अपघात तांत्रिक बाबीने न घडता माणसाच्या चुकीमुळे घडतात. सध्या संपर्कव्यवस्थेमधे झालेली क्रांती बघता जहाजाचे अपघात होत नसतील असे आपल्याला वाटते. पण नुकत्याच घडलेल्या इटलीमधील जहाज अपघाताने हा समज खोटा ठरवला आहे. मुंबई बंदरामधे झालेला एम एस चित्राचा अपघात देखील अशाच अतिआत्मविश्वासाने झाला होता.
आमचे पप्पा कायम म्हणतात, एक वेळ यंत्रावर विश्वास ठेवला तर तो कधी धोका देणार नाही. माणसावर विश्वास ठेवा अथवा ठेवू नका, तो धोका देणारच.
पुढच्या लेखामधे अशाच काही अपघाताविषयी लिहेन.
(No subject)
(No subject)
हा ही भाग छान आणि माहितीपुर्ण
हा ही भाग छान आणि माहितीपुर्ण झाला आहे
छान झाला आहे भाग. नवीन माहिती
छान झाला आहे भाग. नवीन माहिती मिळतेय. जहाज बांधणीमधला मुलींचा सहभाग किंवा करियर ऑप्शन्स यावर वाचायला आवडेल.
छान माहिती!
छान माहिती!
छानच ! महाराष्ट्राची एक सीमा
छानच ! महाराष्ट्राची एक सीमा समुद्रच असूनही जहाजांविषयींचं आपलं अज्ञान अगाधच म्हणायला हवं !म्हणून खास धन्यवाद.
एजोटाझापा = एकदम जोरदार
एजोटाझापा = एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत
बरोबर ओळखलंय ना मी? काढा पार्टी!
ता.क. : आजून पूर्ण लेख वाचायचाय!
आशूडी, त्यावर लिहायचा विचार
आशूडी, त्यावर लिहायचा विचार आहे. माझी एक मैत्रीण भारतीमधेच काम करत होती. तिच्याशी काँटॅक्ट झाला तर व्यवस्थित लिहिता येइल.
भाऊ, खुद्द रत्नागिरीत एवढी मोठी जहाजे बनत असून पण कित्येकाना माहित नाही. जहाज म्हणजे मच्छीमारीचे ट्रॉलर्स असे समजणारे भरपूर लोक आहेत.
गामा पैलवान, यापुढील लेख पार्टीमयच असेल.
नंदिनी, खूप माहितीपुर्ण लेख!.
नंदिनी, खूप माहितीपुर्ण लेख!.
<< जहाज बांधताना ते कधीही डबल
<< जहाज बांधताना ते कधीही डबल बॉटम ठेवून बांधावे लागते. >> मला आठवतं कीं ऑईल टँकर्स फुटून तेलगळतीमुळे पर्यावरणाला होणार्या गंभीर धोक्यामुळे नवीन जहाज बांधणीत ' डबल बॉटम'ची जागतिक सक्ती नजीकच्या भूतकाळातच करण्यात आली. सहज शक्य झालं तर ही माहिती देखील द्याल का ?
मस्त
मस्त
छान
छान
छान माहिती. पुढील भागांच्या
छान माहिती. पुढील भागांच्या प्रतिक्षेत ...
वा वा, दुसरा भाग आला.. जरा
वा वा, दुसरा भाग आला..
जरा छोटा झालाय पण मस्त आहे.
एकदम इंटरेस्टिंग झालाय भाग.
एकदम इंटरेस्टिंग झालाय भाग. मस्त
हा भाग सही आहे. बरीच माहीती
हा भाग सही आहे. बरीच माहीती मिळतेय.
जहाज बांधणीमधला मुलींचा सहभाग किंवा करियर ऑप्शन्स यावर वाचायला आवडेल. +१
छान माहिती
छान माहिती
नंदिनी... जहाज बांधणीची किचकट
नंदिनी... जहाज बांधणीची किचकट माहिती अत्यंत सोप्या भाषेत करून दिली आहेस. फार सुंदर
भाऊ, अधिक माहीती जाणकारांकडून
भाऊ, अधिक माहीती जाणकारांकडून घेते. पण तरी माझ्या मते डबल बॉटम हा सुरक्षिततेच्या दृष्टीने बांधला जातो. दोन बॉटमच्या मधे असणार्या टँकमधे पूर्वी इंधन साठवले जायचे. २००७ च्या नियमानुसार असे इंधन साठवता येत नाही. इंधनाचे टँक वेगळे बांधावे लागतात. इथे इंधन म्हणजे जहाज चालवण्यासाठी लागणारे इंधन. त्यामुळे प्रत्येक जहाजामधे हे ऑईल टँकर्स असतात.
तुम्ही जे ऑईल टँकर्स म्हणत आहात ते इंधन वाहून नेतात, त्यांचे ऑइल टँक कार्गोमधे बांधलेले असतात. ते प्रचंडच्याप्रचंड मोठे असतात. त्या प्रकारच्या जहाजासाठी काही खास नियम आहेत. त्यानुसारच ते बांधावे लागते.
नंदिनीजी, माझी 'अर्धवट'
नंदिनीजी, माझी 'अर्धवट' माहिती तत्परतेने पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद.
मस्त लिहीले आहे. मी पेंट
मस्त लिहीले आहे. मी पेंट कंपनीत काम करत होते तेव्हा त्यांची इंड. पेंट डिविजन होती व ती टुटिकोरीन मध्ये असले नेवल पेंट विकत असत. तेव्हा ट्रेनिंग मध्ये हे जहाज रंगवायची माहिती दिली होती.
तुझी शैली पण छान आहे. लाटांसारखे विनोद हलकेच येऊन हसवून जातात.
नंदिनी, लेख छान आहे. आवडला.
नंदिनी,
लेख छान आहे. आवडला. बो म्हणजे काय ते नीटसे कळले नाही. आकृती टाकली असती तर बरे झाले असतेसे वाटते. नाहीतर विकी आहेच!
आ.न.,
-गा.पै.
मस्त माहिती मिळत आहे.
मस्त माहिती मिळत आहे.
चांगले लेख आहेत दोन्ही. फारसं
चांगले लेख आहेत दोन्ही.
फारसं टेक्नीकल अवघड वाटलं नाही. सोप्या शब्दात मस्त.
छान लेख, नवीन माहिती
छान लेख, नवीन माहिती मिळाली..पुढच्या भागाची वाट बघतेय.
खुप मस्त माहितीपुर्ण लेख...या
खुप मस्त माहितीपुर्ण लेख...या विषयावर फारसा विचार करायची वेळ आजवर कधी आली नव्हती आणि तो इतका इंटरेस्टींग असेल असंही वाटलं नव्हतं
पुढचा भाग लवकर येऊदे प्लीज
गा.पै. तुमच्या माहिती खातर...
गा.पै. तुमच्या माहिती खातर... Lower Deck आकृतीच्या डावीकडील म्हणजेच जहाजाच्या पुढे दिसरणारा फुगीर भाग म्हणजे बल्बस बो.
विषयाला धरून पण सहज गंमत
विषयाला धरून पण सहज गंमत म्हणून -
मुंबईच्या गोदीचा एक छोटासा भाग जुनी जहाजं तोडण्यासाठी [ शिप-ब्रेकींग] राखीव ठेवलेला आहे. दारुखाना म्हणतात त्या भागाला. जहाज बांधणीची प्रक्रिया जर उलट्या दिशेने पहायची असेल तर
जरूर तिथं भेट द्यावी !!
[ 'शिप-ब्रेकींग' हा जगातला प्रचंड मोठा उद्योग आहे - वीज वा इंधन न वापरतां दर्जेदार तयार पोलाद मिळवंणारा ! इंग्लंडच्या मार्गारेट थॅचरने 'फॉकलंड' बेटाकडे आरमार पाठवायचं आत्यंतिक पाऊल उचललं होतं कारण तें बेट 'शिप-ब्रेकींग'चं जगातलं मोठं केंद्र आहे. महाराष्ट्राने यासाठीं आपल्या किनार्यावर सोई निर्माण केल्या नाहीत पण गुजराथने मात्र ' आलंग' नंतर इतर ठीकाणीही शिप-ब्रेकींगचीं केंद्र निर्माण केलीं. शिप-ब्रेकींग'मधे अर्थात किनार्यावर प्रदूषण होण्याचा ( जहाजांत सांठलेलं इंधन, तेल, रसायनं सांडल्यामुळें ) धोका असतोच. ]
खुपच छान अन वेगळी माहिती.
खुपच छान अन वेगळी माहिती. वाचतांना अजिबात क्लिष्टता जाणवली नाहि. माहितीपुर्ण लेख.
उत्तम माहीती ,
उत्तम माहीती ,
Pages