मायबोलीसाठी तुम्ही काय करू शकता?

Submitted by साजिरा on 25 July, 2011 - 01:45

वर्षाविहार(२४ जुलै २०११)- फार्मलाईफ इथे वविकरांसमोर व्यक्त केलेलं मनोगत

***

नमस्कार मित्रांनो.

इंटरनेटवर कधीतरी काहीतरी शोधता शोधता अचानक आपल्याला मायबोली.कॉम हा फोरम सापडतो. मग इथलं हितगुज, गुलमोहर, गप्पा आणि भांडणं वाचता वाचता आपणही इथं कधी लिहायला लागतो, तेच कळत नाही. आणखी थोडा काळ गेला, की एक दिवस कळतं- ही जागा आता आपल्या आयुष्यातली अविभाज्य घटक झाली आहे. मग इथे आल्याशिवाय आपला दिवस उगवला, मावळला- असं क्वचितच होतं. इथेच कधीतरी हरवलेलं मैत्र सापडतं, कधीतरी सोडून दिलेलं लिखाण पुन्हा आपलं बोट धरतं, जगण्याच्या रहाटगाडग्यात 'आपण भले की आपले भले' हा शिरस्ता स्वीकारलेल्या आपल्याला मुद्देसूद किंवा मुद्द्यांविनाच भांडण्याची ऊर्मी देते. रोजच्या कामातून वेळ काढून गणेशोत्सव, दिवाळी अंक आणि अनेक सामाजिक उपक्रमांत हिरीरीने भाग घेतला जातो. मते जुळलेल्या मायबोलीकरांना भेटण्यासाठी आवर्जून गेट-टुगेदर आयोजित केले जातात. वविसारख्या ठिकाणी गळाभेटी होतात.

हे सारं वातावरण आपल्याला आपल्या वाईट मनस्थितीत बळ देतं, आपल्या अनेक मानसिक गरजा भागवतं. पण आपल्याला नवे भान देणारा आणि रात्रंदिवस अव्याहत चालणारा हा मायबोलीचा गाडा कोण कसा कुणाच्या पैशाने चालवतो, याचा विचार आपण फारच क्वचित करतो. कुणीतरी अ‍ॅडमिन आहेत, कुणीतरी वेबमास्तर आहेत. शिवाय मदत समिती आहे, निरनिराळ्या कार्यक्रमांच्या उपक्रमांच्या संयोजन समित्या आहेत- एवढंच बहुधा आपल्याला माहिती असतं.

मायबोलीच्या प्रेमापोटी अनेक संयोजक मायबोलीसाठी स्वेच्छेने काम करत असले, तरी अनंत विषयांवरची हजारो पेजेस असलेल्या या फोरमच्या सर्व्हरचा, साईट मॅनेजमेंटचा खर्च असतो. तो खर्च मुख्यत्वे इथल्या खरेदी विभाग- ईकॉमर्स (ज्यात पुस्तके, सीडीज इत्यादी विकायला ठेवली जातात) आणि जाहिरातींतून भरून काढावा लागतो.
या विषयावर वविच्या निमित्ताने आपल्याशी हितगुज साधण्याची सूचना मायबोली प्रशासनाकडून आली, म्हणून हा प्रपंच. वविसंयोजकांनी मला ही संधी इथे दिली, त्याबद्दल आभार.

मायबोली सुरू झाली, त्यानंतर अनेक वर्षे संस्थापकांनी खिशातून पैसे टाकून तिला जगवली, वाढवली. गेल्या काही वर्षांपासून मायबोली स्वतःच्या पायांवर उभी असली, तरी इथले सभासद वाढत आहेत, त्याच प्रमाणात कंटेंटही वाढत आहे, शिवाय अनेक नव्या पद्धती-तंत्रज्ञान आत्मसात करून त्यांचा उपयोग, अवलंब इथे करावा लागतो आहे. काळासोबत जायचे असेल, तर 'कसातरी चरितार्थ चालवणे' याच्यापलीकडे जावे लागणार आहे, आणि ऑनलाईन जाहिरातींचे जगभरात वाढते प्रस्थ पाहिल्यावर यापुढे 'जाहिराती' हेच मायबोलीसाठी उत्पन्नाचे (आणि म्हणूनच प्रगतीचे) साधन बनणार आहे यात शंका नाही.

जाहिरातींसाठी स्वतःचे असे नेटवर्क मायबोलीने तयार केले आहे, त्यावर सतत कामही चालू आहे. ज्या मायबोलीने आपल्याला काहीतरी दिलेय, तिचे सभासद म्हणून आपणही याबाबतीत थोडेसे काहीतरी करू शकलो तर?

सर्वात आधी- 'छोट्या जाहिराती' विभाग. या वर्षापासूनच हा विभाग नव्या स्वरूपात मायबोलीवर आला आहे. खरे तर हा विभाग सध्या तरी मायबोलीसाठी उत्पन्नाचे साधन नाही. छोट्या जाहिरातींचेही दरपत्रक अर्थात आहेच, पण ते बाजूला ठेऊन यावर्षी तरी ही सेवा मायबोलीकरांसाठी मोफत देण्याचे मायबोलीने ठरवले आहे. मायबोलीचाच लॉगिन आयडी वापरून तुम्ही इथे स्वतःच्या जाहिराती टाकू शकता. त्यासाठी विषयानुसार इथे मालमत्ता, नोकरी, विवाह, आरोग्य, विज्ञान-तंत्रज्ञान-मशिनरी असे अनेक विभाग आहेत. एकाच वेळी अनेक विषयांवरच्या अनेक जाहिराती तुम्ही इथे एकाच वेळी टाकू शकता. या छोट्या जाहिराती वाचण्यातून, टाकण्यातून अर्थातच फायदा झाल्याचा अनेक मायबोलीकरांचा अनुभव आहे.

जाहिरातींचा दुसरा प्रकार म्हणजे- 'बॅनर अ‍ॅडव्हर्टाईझमेंट्स'. म्हणजे सर्वात वरती मायबोली लोगोच्या उजव्या बाजूला दिसणारे रूंद आयताकृती किंवा पानावरच्या मुख्य कंटेंटच्या उजव्या बाजूला, (उजव्या पेनमध्ये) साधारण चौकोनी आकारात दिसणारे अ‍ॅनिमेटेड किंवा स्थिर चित्र.

याठिकाणी आतापर्यंत गुगल अ‍ॅड्स कडून रूट होणार्‍या विविध ब्रँड्सच्या जाहिराती दिसत होत्या, त्यात भर म्हणून आता अनेक क्षेत्रांतल्या रिटेल आणि लोकल कंपन्यांच्या, छोट्या मोठ्या उद्योगांच्या जाहिराती दिसत आहेत. आपण अनेक बाफ जितक्या उत्सुकतेने चाळतो, तितक्या गांभीर्याने या जाहिराती बघितल्या, तर लक्षात येईल की एका क्लिकसरशी आपल्या अनेक गरजा भागण्याची इथे शक्यता आहे. नीट विचार केला, तर पुण्यामुंबईतल्या किंवा महाराष्ट्रातल्या छोट्या मोठ्या उद्योजकांच्या जाहिराती जितक्या जास्त वाढतील, तितकी त्या जाहिरातींची आपल्या दृष्टीने उपयोगिता वाढेल, मग त्या बघणार्‍यांची संख्या वाढेल, आणि ही संख्या वाढली- त्याच प्रमाणात हे जाहिरातदारही पुन्हा वाढतील- असे हे चक्र आहे. आपण, म्हणजे इथले सारे सभासद वाचक 'एक ग्राहक' या नात्याने सदैव चांगल्या वस्तू किंवा सेवांच्या शोधात असतो- हे लक्षात घेतले, तर समजायला सोपे होईल.

एक ग्राहक म्हणून या जाहिराती सजगपणे बघणे आहेच, पण त्याहीपुढे या सार्‍या चक्राला गती देण्यासाठी एक मायबोलीकर म्हणून आपण काय करू शकतो? आपल्या आजूबाजूला अनेक छोटे मोठे उद्योजक असतात, आणि एंड युजरपर्यंत पोचवणार्‍या परिणामकारक जाहिरात माध्यमाच्याही ते शोधात असतात. अशांना आपण मायबोलीची सर्वसाधारण माहिती देऊन इथल्या जाहिरातींचा पर्याय सुचवू शकतो. त्यांनी प्राथमिक तयारी दाखवली, तर त्यांची माहिती प्रशासनाला दिली तर इथला जाहिरात विभाग पुढचे काम करेल. एखाद्या उद्योजकाला अपील होईल, असे मायबोलीबद्दल नक्की काय सांगायचे आणि जाहिरातींचे रेट्स आणि इतर गोष्टींबद्दल काही माहिती हवी असेल, तर कृपया आम्हाला कळवा / विचारा.

उद्योजक मुलाखतीही आपण गेल्या काही दिवसांपासून सुरू केल्या आहेत (उद्योजक आपल्या भेटीला). मराठी उद्योजक या ग्रुपात असूनही त्या सार्वजनिक आहेत. आपल्याला त्या त्या उद्योजकाकडून जास्तीत जास्त आणि उपयुक्त माहिती मिळावी यासाठी 'जास्त इंटरअ‍ॅक्टिव्ह' असे त्यांचे स्वरूप ठेवले आहे. त्यांना प्रतिसादही चांगला मिळतो आहे. मायबोलीकरांनी उत्सुकतेने त्यांना पडणारे प्रश्न विचारले, आणि त्यांची उत्तरेही त्या त्या उद्योजकांनी दिली, हे आपण पाहिलेच आहे. आता अर्थातच यांतून मायबोलीला उत्पन्न मिळत नाही, या मुलाखतींचा आणि जाहिरातींचा थेट संबंधही नाही. कारण ज्यांची मुलाखत आहे, त्यांनी अजून जाहिराती दिल्या नाहीत, आणि ज्यांच्या जाहिराती आहेत/होत्या, त्यांनी मुलाखती दिल्या नाहीत, किंवा आपण घेतल्या नाहीत- अशीही उदाहरणे आहेत. पण इथे उद्योजकांना या फोरमबद्दल विश्वास वाटेल तसेच उद्योजक आणि आपण एंडयुजर मायबोलीकर- म्हणजे ग्राहक- या दोघांनाही 'विन-विन सिच्युएशन' वाटेल- असे वातावरण या मुलाखतींमधून निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. तुमच्याही आजूबाजूला एखाद्या मराठी उद्योजकाने कष्टाने उभ्या केलेल्या व्यवसायाची सक्सेसस्टोरी दिसत असेल, तर जरूर आम्हाला सांगा.

अपॉईंटमेंट्स, म्हणजे नोकरीविषयक जाहिरातींना इथे चांगला प्रतिसाद असतो. मायबोलीकरांपैकी अनेक जण आयटी आणि इतर सेक्टरमध्ये काम करतात. आपापल्या कंपनीतल्या एचआर विभागाला मायबोलीवरच्या जाहिरातींचा पर्याय तुम्ही सुचवू शकता.

जाहिरातींव्यतिरिक्त विचार केला, तर ई-कॉमर्सचाही अत्यंत परिणामकारक पद्धतीने उपयोग आपल्याला करून घेता येईल, आणि त्याद्वारे मायबोलीला मदतही करता येईल. तुम्ही आपापल्या एचआर सेक्शनला 'मायबोली गिफ्टकार्ड्स'बद्दलही सुचवू शकता. प्रत्येक कंपनीत जी एक 'इन्सेन्टिव्ह' सिस्टिम असते, त्याला इथल्या गिफ्टकार्ड्स किंवा गिफ्ट व्हौचर्स हा एक छान पर्याय ठरू शकतो, असे वाटते. यातून खरेदी विभागातल्या पुस्तके-सीडी व इतर काही गोष्टी आपल्याला देता, घेता येतील. व्यक्तिगतरीत्या भेटवस्तू देण्यासाठीही याचा छान उपयोग आपण करू शकतो.

मायबोलीने देणगी स्वरूपातली मदत मिळूनही आजवर घेतलेली नाही. उलट वेळोवेळी सामाजिक उपक्रमांना जागा आणि महत्व देऊन, तसेच मायबोली पुरस्कृत उपक्रमांतून अनेक सामाजिक संस्थांना आणि आर्थकदृष्ट्या दुर्बलांना मायबोलीकरांकडून मदत होईल, असे बघितले आहे. हे असेच चालू राहायचे असेल, तर मुळात मायबोली टिकायला हवी, वाढायला हवी, इतकेच नव्हे तर आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हायला हवी- इतकी जाणीव मायबोलीवर वावरताना सतत आपण ठेवली, तरी या प्रपंच चालवण्यातला खारीचा वाटा आपण स्वतः उचलण्यातले मोठे समाधान मिळेल, असं मला वाटतं.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही सुचवावेसे वाटते.

१) जाहीराती ह्या उजव्या बाजुला असुन चटकन नजरेत येत नाहीत. त्या ऐवजी त्या ज्या ठिकाणि लोक प्रतिसाद देतात त्या खिडकिच्या वरच्या भागात असाव्यात. जेणे करून प्रत्येक वेळेस पोस्ट करताना जाहिराती नजरे समोर रहातील.

२) त्याच प्रमाणे माय्बोलिवरुन जाहिरात बघितल्यास व त्याचे रुपांतर देवघेवीत झाल्यास त्या माय्बोलिकरास काही पोईंट्स द्यावेत व असे क्ष पोईंट्स झाल्यावर काहितरि गिफ्ट द्यावे. उदा माय्बोलिवर य पुस्तके घेतल्यास एखादे पुस्तक ग % सवलतीत वा मोफत... असे काही

३) त्याच प्रमाणे माय्बोलीच्या कुठल्याच भागाचा दिसणार्‍या जाहीरातीशी संबंध नाही. कदाचीत गुगलचे सोफ्ट्वेअर लिमिटेड युसेबल असेल पण प्रत्येक गृप त्यचा लोकेशन व कारण ह्याचा उपयोग करता येणार नाही का? उदाहरण म्हणजे गझलेच्या पृष्ठावर मायोब्ली वरून विकत घेता येतील असे गझल संग्रह दाखवले तर उपयोग होईल असे वाटते

मायबोलीवर प्रसिद्ध होणारं ( सिलेक्टेड ) लिखाण व्यवस्थित संपादित करुन लिखित पुस्तक स्वरुपात प्रकाशित करता येईल. आणि मायबोली हा एक प्रकाशन ब्रँड म्हणुन पुढे आणता येईल.
मलाही असच वाटत.

साजिराच्या सगळ्यात शेवटच्या पोस्ट्मधे, सगळ्यात महत्वाची गोष्ट राहिली आहे असे मला वाटते. नंबर ऑफ युजर्स ची संख्या.
मी नेहमीच मायबोली बद्दल बोलताना हा मुद्दा हाय्लाईट करत असते म्हणुन मी शोध्ले, तर दिसला नाही.

जाहिरात देताना, वर्तमानपत्राचे जसे सर्क्युलेशन चेक केले जाते, तसेच वेबसाईट्चे.

पुस्तक प्रकाशन ही अत्यन्त किचकट आणि घोळाची प्रक्रिया आहे. शिवाय त्यात मोठी भांडवली गुंतवणूक अपेक्षीत आहे. शिवाय्प्रताधिकाराचे मुद्दे आहेतच.याबाबत चिनूक्स जास्त लिहू शकेल.

चिन्मय आहे का? Proud

वा छान माहिती. बर्‍याच नव्या गोष्टी समजल्या.
आरती यांचं म्हणणं पटल. संख्याही महत्वाची आहे. हायलाईट झाली पाहिजे.

माय्बोलीच्या कुठल्याच भागाचा दिसणार्‍या जाहीरातीशी संबंध नाही. कदाचीत गुगलचे सोफ्ट्वेअर लिमिटेड युसेबल असेल पण प्रत्येक गृप त्यचा लोकेशन व कारण ह्याचा उपयोग करता येणार नाही का? उदाहरण म्हणजे गझलेच्या पृष्ठावर मायोब्ली वरून विकत घेता येतील असे गझल संग्रह दाखवले तर उपयोग होईल असे वाटते.

>> ह्याला अनुमोदन.. म्हणजे जाहिराती योग्य त्या टारगेट ऑडियन्सला दिसतील.

>मायबोलीच्या कुठल्याच भागाचा दिसणार्‍या जाहीरातीशी संबंध नाही.
नसेल पण मायबोलीकरांशी नक्की आहे. तुम्ही ज्या भौगोलिक भागातून मायबोली पाहता त्याच्याशी निगडीत जाहिराती दिसतात. अनेकदा त्या त्या देशातल्या प्रमुख भाषेतून दिसतात. गेला एक आठ्वडा सगळ्या अमेरिकेत मोठे सेल चालू असल्याने त्या जाहिराती दिसत आहेत.

गझलेच्या विभागात गझल संग्रहांच्या जाहिराती दिसत नाही याची २-३ कारणे आहेत.
१. गझल प्रकाशक (किंवा काही अपवाद वगळता बरेचसे प्रकाशक) अजून जाहिरात करत नाही. हळूहळू हे चित्र बदलत आहे ही स्वागतार्ह गोष्ट आहे. आता हळूहळू चित्रपट निर्माते जाहिरात करू लागले आहेत.
२. जाहिरातींची जागा मर्यादित असल्याने जो जाहिरातदार जास्त मूल्य द्यायला तयार आहे त्याच्या जाहिराती दिसतात. गझल वाचक जर सध्या गाडीच्या(कार) शोधात असेल तर कार विक्रेत्यांच्या जाहिराती दिसू शकतात.
३. या तंत्राबद्दल भारतीय जाहिरातदारांमधे अजून पुरेशी माहिती नाही. भारताबाहेर अगदी बारीक भागानुसार जाहिराती बदलत्या दिसतात. म्हणजे उदा: अगदी कर्वे पुतळ्याजवळ घर असेल तर एका दुकानदाराची पण पौड रोडवर घर असेल तर दुसर्‍या दुकानाची जाहिरात दिसू शकते.

आणि माझं सगळ्यात मोठं दु:खः
पुष्कळदा वेगवेगळ्या देशातून त्या त्या भाषेतल्या जाहिराती मायबोलीवर दिसतात. त्या वेगळ्या उठून दिसतात म्हणून त्यांना प्रतिसादही चांगला मिळतो. काही वर्षांपूर्वी एका जर्मन वकिलाने जर्मनीतल्या मराठी माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी, मायबोलीवर मराठीत जाहिरात केली होती. पण आपल्या महाराष्ट्रातल्या बहुसंख्य जाहिरातदारांना अजून मराठीत जाहिरात करावीशी वाटत नाही.

नसेल पण मायबोलीकरांशी नक्की आहे. तुम्ही ज्या भौगोलिक भागातून मायबोली पाहता त्याच्याशी निगडीत जाहिराती दिसतात. अनेकदा त्या त्या देशातल्या प्रमुख भाषेतून दिसतात.
>> अरे वा.. छान आहे मग..

या तंत्राबद्दल भारतीय जाहिरातदारांमधे अजून पुरेशी माहिती नाही.
>> पण जाहिराती मॅनेज करणे तुमच्या हातात नसते का? म्हणजे वजन कमी करण्याचा धागा उघडल्यावर सध्या वजन कमी करणार्‍या "डॉक्टर टी"ची मायबोलीवर दिसणारी जाहीरात आवर्जुन दिसेल अशी सोय?
माझ्या माहितीप्रमाणे गुगल अ‍ॅड्सवाले हे टेक्निक वापरतात. तुम्ही गुगलवर "वेट मॅनेजमेंट टिप्स" असा सर्च दिलात तर लगेच उजवीकडे वेट मॅनेजमेंटवाल्यांच्या जाहिराती दिसतात.

>पण जाहिराती मॅनेज करणे तुमच्या हातात नसते का?
नाही. एखादी जाहिरात चुकीची असली तर काढून टाकणे हे हातात असते पण कुठली जाहिरात कुणाला कुठे दिसावी हे करता येत नाही. माझ्या मते गुगललाही करणे सोपे नसावे (अशक्य नाही पण सोपे नाही)? आश्चर्य वाटले? का ते सांगतो.

१. पानावरच्या मजकूरावरून असणार्‍या जाहिराती. (विषयाशी संबंधित) ( Contextual)
२. पान पाहणार्‍या वाचकाच्या भौगोलिक प्रदेशानुसार असणार्‍या जाहिराती ( Geotargeted)
३. एखादी जाहिरात फक्त अमुक वेळाच दिसावी अशा जाहिराती ( Frequency capped)
३. पान वाचणार्‍या वाचकाने गुगलवर काही दिवसांपूर्वी केलेल्या शोधांच्या विषयानुसार जाहिराती (After search)
४. पान वाचणार्‍या वाचकाने काही दिवसांपूर्वी भेट दिलेल्या वेबसाईटच्या विषयानुसार जाहिराती (Retargeted)
५. मायबोली या वेबसाईटवर जाहिरात करायची आहे असे गुगलला सांगणार्‍या जाहिरातदारांच्या जाहिराती.(placement)
६. मायबोली या वेबसाईटवर जाहिरात करायची आहे असे थेट मायबोलीला सांगणार्‍या जाहिरातदारांच्या जाहिराती.(Sponsorship)
7.मायबोलीच्या स्वतःच्या उपक्रमांच्या जाहिराती (House )

या सगळ्या जाहिरातींचा सतत लिलाव चालू असतो, त्यातली जी लिलाव जिंकते ती जाहिरात तुम्हाला दिसते. फक्त जास्त पैसे देणार्‍या जाहिरातदाराची जाहिरात दिसते असे नाही. तर कुठल्या जाहिरातीला जास्त पाठींबा मिळतो आहे त्यावरही हे ठरते. उदा एखादी कमी पैसे मिळवून देणारी पण वाचकांना आवडलेली जाहिरात, ही जास्त पैसे देणार्‍या पण वाचकांना न आवडलेल्या जाहिरातीवर लिलाव जिंकू शकते.
मी एक पान ५:१२ ला पाहिले तर लिलाव जिंकणारी जाहिरात आणि तेच पान ५:१३ लिलाव जिंकणारी जाहिरात, ५:१२ लाच दुसर्‍या मायबोलीकरासाठी त्याच पानावर लिलाव जिंकणारी जाहिरात या तिन्ही वेगळ्या असू शकतात.

आभार वेबमास्तर.. ही माहिती माझ्यासाठी नवीन आहे.
मग सध्या छोट्या जाहिरातींच्या बाबतीत तरी हा प्रयोग करणे आपल्या हातात आहे का?

अजुन एक.. काही संकेतस्थळांवर टिचक्यांच्या संख्येवर (नंबर ऑफ क्लिक्स) संस्थळचालकांना पैसे मिळतात असे ऐकिवात आहे.

android \Windows phone app banavu shakato maayboli sathi. arthatach pahile maayboli site kasha kaam karate te maahitee karoon ghyayala lagel.

maayboli cloud var nasalyas ti cloud var nyayala madat karoo shakato, jyayoge maintenance kharcha kami hou shakel.(cost kami hoil hyachi gvahi nahi, pan abhyas karoon tharavataa yeil)

मी अंगोलात असतो आणि मला पोर्तुगीज भाषेतल्या जाहीराती इथे मायबोलीच्या पेजवर दिसत असतात.
पण असा ठोस नियम नाही, इंग्रजीमधल्याही दिसतात.

Pages