कोळिसरे-गणपतीपुळे-प्राचीन कोकण (भाग १)
रत्नागिरीच्या ट्रिपला गेलं की एकदा तरी गणपतीपुळे वगैरे फिरायची ट्रिप होतेच होते. पूर्वी कॉलेजचा अख्खा ग्रूप असे मिळून जायचो. आता एक गावात असेल तेव्हा दुसरा जगाच्या दुसर्या टोकाला. त्यामुळे गेल्या तीनचार वर्षात कुटुंबासोबतच फिरावं लागतय. त्यात कुटुंबसदस्य वाढत असल्याने बाईकऐवजी कारनेच फिरावे लागणे
मी, सतिश, सुनिधी आणि माझे आईवडिल असे सर्व़जण एका दिवसाच्या या ट्रिपसाठी निघालो. सोबत अर्थात वाहनचालक होताच. कोळिसरेपासून पुढे गणपतीपुळे करायचे आणि मग तिथून एक तर जयगड किल्ला-कर्हाटेश्वर असे जाणे अथवा गुहागर्-हेदवी वगैरे असे जायचे ठरवले होते. मात्र आम्हाला सुनिधीकृपेने घरातून निघतानाच उशीर झाला. म्हणजे तिने काही केले नाही, ती सर्वाच्या आधी उठून स्वतःचे सर्व आवरून घेऊन निवांत खेळत होती. पण त्या दिवशी रविवार असल्याने पप्पाच्या ऑफिसातले काही लोक बाळाला बघायला म्हणून सकुसप आले. आम्ही सकाळी आठला निघायचे ठरवले होते, थोडासा उशीर झालाच होता. साडेआठला मंडळ हजर. मग काय? नाश्ता गप्पाटप्पा वगैरे करून निघायला चांगले साडेदहा वाजले.
लग्नानंतर कोळिसरे हे एक ठिकाण जाण्यासाठी मस्ट झालेले आहे. काणे घराण्याचे कुलदैवत तर आहेच शिवाय अत्यंत शांत आणि गंभीर परिसर. जिथे गेल्यावर स्वतःलाच काही प्रश्न पडावेत आणि त्यांची उत्तरं पण स्वतःच्याच मनाच्या गाभार्यात शोधावीत अशा ठिकाणांपैकी हे एक.
या मंदिरावरती मंदार जोशी यानी आधीच एक लेख लिहिलेला आहे. त्यामुळे इथे फक्त काही फोटोच देत आहे.
रस्त्यावरून दिसणारे झाडामधे लपलेले मंदिर.
हे इथले मिनरल वॉटर. या पाण्याची चव अत्यंत वेगळी लागते आणि हे पाणी महिनोन्महिने तसेच ठेवून देखील याला वास वगैरे येत नाही.
हे जवळच असलेलं रत्नेश्वराचं मंदिर. हे मंदिर जास्त करून बंदच असलेलं पाहिलं आहे. आतमधे शंकराची एक पिंड वगळता काहीही नाही.
From Kolisare
रविवार असूनपण जास्त गर्दी नव्हती. तरी इथे आम्हाला पोचायला खूपच उशीर झाल्याने अभिषेक वगैरे करणे शक्य नव्हते. त्यामुळे दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघणार इतक्यात दोन तीन मंडळी देवीची एक सुंदर मूर्ती घेऊन आले.
हे लोक पुण्यावरून आले होते व या मूर्तीला सिद्ध करण्यासाठी येथे आणले होते, असे सांगितले. यामधे एक सदाशिव पेठेत राहणारा तरूण आणि एक भोरचा मध्यमवयीन माणूस होते. आईने इथे लगेच देवीची ओटी वगैरे भरून घेतली. मंदिरातल्या पु़जार्यानी मला पण एक ओटीचे ताट आणून दिलं. मग मीदेखील ओटी भरली. तरीदेखील अशा प्रकारे मूर्ती आणून सिद्ध करण्यासाठी लक्ष्मीकेशव हे देवीचे अथवा इतर तंत्रविद्येचे ठिकाण नसल्याने मला उत्सुकता लागली होती.
मग मी मात्र जरा पत्रकारिता दाखवून या व्यक्तीच्या वाहनचालकाकडून आणि त्यांच्या इतर संभाषणातून खरी माहिती समजून घेतली. एक किस्सा म्हणून इथे देत आहे.
जी तरूण व्यक्ती ही मूर्ती घेऊन आली होती, त्यांच्या घराण्यामधील कुणीतरी काही शतकांपूर्वी कोकणातल्या याच भागामधे एका ब्राह्मणाचा खून केलेला होता, म्हणे. (हे लोक पण ब्राह्मणच आहेत. पण द्रव्यलाभाने हा खून झाला असे सांगण्यात आले आहे.) आता त्या व्यक्तीला काही नुकसानीचे अथवा हानीचे झटके मिळाल्यानंतर कुणीतरी या कृत्याबद्दल माहिती काढून (कशी काढली ते मला माहित नाही.) पश्चाताप (की प्रायश्च्चित्त) घ्यावा लागेल असे सांगितले. म्हणून आता ही मूर्ती घेऊन कोकणातल्या बर्याच मंदिरामधे जाऊन हे लोक इथे आसपास असा खून झालेला अथवा अशी समाधी किंवा अशी काही लोककथा वगैरे आहे का? याची चौकशी करत होते. कोळिसरेमधे त्याना अपेक्षित ती माहिती मिळाली नाही. हे बोलणं चालू असतानाच सोबत आलेल्या व्यक्तीला खूप जोरात घाम आला व तो सारखा मानेला झटके देऊ लागला. त्याबरोबर आईने मला "याच्या अंगात येतय" असे सांगितले. मी याआधी हा प्रकार कधीच पाहिलेला नसल्याने तिथेच बसून पाहिलं, तर त्या व्यक्तीने मिनिटभर मानेला झटके दिले व नंतर लगेच सतिशला बोलावून "जे काय मनात धरून आला आहेस ते पूर्ण होइल" असे सांगितले. माझ्या पप्पांच्या डोक्यावर हात ठेवून "चिंता करू नकोस. सगळं पाण्यात जाईल" असे सांगितले.
हे ऐकून पप्पा भंजाळलेच. नंतर बहुतेक देवीने ऑइल रिग पाण्यात नीट उतरेल असा आशिर्वाद दिला असे समजून घेतले सतिशला तर मनात इच्छा वगैरे काहीच नव्हते त्यामुळे काय पूर्ण होइल असा प्रश्न पडलाच आहे. तर असो. जी काही श्रद्धा, अंधश्रद्धा असेल ती असो, मात्र या देवीची मूर्ती "भयंकर सुंदर" होती. ज्याने घडवली असेल त्याला सलाम.
नंतर ज्याने मूर्ती आणली होती त्याचे आडनाव समजल्यावर सतिशने त्यांचे मूळ गाव कुठे आहे वगैरे माहिती त्याना दिली. तिथेच जाऊन चौकशी करा असा सल्ला दिला.
हे सर्व झाल्यावर आम्ही बसून फराळ केला. तिथेच आम्हाला कंपनी म्हणून माकडे!!!सुनिधीने त्याना "च्याऊ" असे नामकरण दिले. सतिशने सोबत आणलेले उप्पीट लगेच जाऊन याना खायला दिले.
मी भरपूर फोटो काढत असल्याने "कशाचे पण काय फोटो काढतेस" असं ऐकून घ्यावं लागलं. त्यावर झब्बूच्या वेळेला लागतात असे फोटो असे उत्तर दिलं. नंतर झब्बू म्हणजे काय? याचं स्पष्टीकरण देत देत आम्ही गणपतीपुळ्याच्या वाटेला लागलो.
आकाश आणि समुद्र यामधे एक अंधुकशी सीमारेषा. बघा दिसतेय का?
कोळिसरेहून गणपतीपुळ्याला दोन तीन रस्त्याने जाता येतं, यापैकी आम्ही चाफामार्गे आलो.
गणपतीपुळ्याला पोचायच्या आधीच रस्त्यावर समुद्राबरोबर लपाछपी चालू होते. मधेच दिसतो, गाडी वळली की पुन्हा गायब.
गणपतीपुळे हे हल्ली एक पर्यटन स्थळ म्हणून फारच नावारूपाला आलय. पण त्या आधी हे एक शांत छोटंसं खेडं होतं. पूर्वीचं मंदिर म्हणजे एक कौलारू घरच होतं. पश्चिमेला मावळणार्या सूर्याचे किरण या मूर्तीवर पडत असत. आता मात्र इथे भव्य मंदिर उभारले आहे.
ही मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीची कमान.
या फोटोमधे डावीकडे जी पाखाडी दिसतेय ती गणपतीप्रदक्षिणेचा मार्ग आहे.
इथला गणपती जरी स्वयंभू असला तरी जिथे मंदिर बांधलेले आहे तिथे फक्त पूजा केली जाते. आणि या सर्व टेकडीलाच गणेश समजले जाते. त्यामूळे या संपूर्ण टेकडीलाच प्रदक्षिणा घातली जाते. साधारणपणे दीड किमीचा हा मार्ग आहे. पहिल्यान्दा गणपतीपुळ्याला जाणार्यानी अवश्य प्रदक्षिणा घालावी. नंतर मनातल्या मनात घातली तरी चालेल.
यानंतर पुन्हा एकदा पेटपूजा केली. इथे सुनिधीने ड्रॅगनसवारी केली.
गणपतीपुळे म्हटलं की डोळ्यासमोर गणपतीच्या आधी बीच उभा राहतो. अर्थात आम्हाला कुणालाच पाण्यात खेळायचं नसल्याने आम्ही बीचवर गेलोच नाही. बीच सुरक्षा केबिनच्या बाजूला उभे राहून फोटो काढले.
एक अत्यंत फुकटचा सल्ला देत आहे: जो बर्याचदा बाहेरून आलेल्या पर्यटकानी दुर्लक्षित केलेला असतो. गणपतीपुळ्याचा समुद्र हा अत्यंत धोकादायक आहे. आतापर्यंत कितीतरी पर्यटकाना त्याने गिळंकृत केलेले आहे. कृपया या बीचवर गेल्यास खोल पाण्यात उतरू नका. ज्याना पोहता येत नाही, त्यानी विशेष काळजी घ्या, आणि ज्याना पोहता येते त्यानी देखील. कारण समुद्रात पोहणे हे पूर्णपणे वेगळे असते. मंदिर प्रशासनाने अशा घटना घडू नयेत म्हणून ठिकठिकाणी बोर्ड लावलेले आहेत. शासनाने लाईफ गार्ड नेमलेले आहेत तरीदेखील आपण स्वतःच आपली काळजी घ्यावी.
एवढं सर्व फिरून होइस्तोवर दुपारचे तीन वाजले होते. आता जयगड अथवा हेदवी कुठेही गेलो असतो तरी परत यायला उशीर झाला असता. त्यामुळे मालगुंडला जाऊन घरी परत जाऊ या, असे सर्वानुमते ठरले.
तितक्यात सतिशला एक बोर्ड दिसला, मला म्हणे रिझॉर्ट्सचे नाव बघ काय ठेवलय? प्राचीन कोकण.
म्हटलं, ते रीझॉर्ट नाहिये संग्रहालय आहे. तू नाही का गेलास कधी? यावर अर्थातच नकारार्थी उत्तर आले. आश्चर्य म्हणजे पप्पा पण इथे कधी गेले नव्हते. मग इथेच जायचे असे ठरले.
गणपतीपुळ्यापासून अवघ्या एक किमीवर हे संग्रहालय वसवलेले आहे. ओपन एअर आहे आणि इथे गेल्या काही शतकांतील कोकणी जीवनशैलीची माहिती इथे देणात आलेली आहे. लाईफसाईझ मूर्तीमधून हा सर्व इतिहास आपल्या नजरेसमोर उभा राहतो. खास वैशिष्ट्य म्हणजे आसपासच्या गावातील मुलीना प्रशिक्षण देऊन इथे गाईड म्हणून रोजगार दिलेला आहे. याबद्दलची अधिक माहिती व प्रकाशचित्रे पुढील भागात.
क्रमश:
...
...
लेख आवडला. छान लिहिलायस.
लेख आवडला. छान लिहिलायस.
सुंदर... माझ्या आवडत्या
सुंदर...
माझ्या आवडत्या स्थळांपैकी एक.
२-३ वर्षे आधी गेलो होतो तेंव्हा इथे काम सुरू होते...
झब्बूच्या वेळेला लागतात असे
झब्बूच्या वेळेला लागतात असे फोटो असे उत्तर दिलं. >>
मस्त लेख.
छान
छान
रोहन, गणपतीपुळ्याचं म्हणताय
रोहन, गणपतीपुळ्याचं म्हणताय का? तिथे गेली दहा वर्षे काम चालूच आहे. आम्ही गेलेलो तेव्हा पण देवळातला रस्ता खोदून ठेवलेला.
कोळिसरे एक नितांतसुंदर, शांत
कोळिसरे एक नितांतसुंदर, शांत ठिकाण आहे. i simply love to go there...
त्यावर झब्बूच्या वेळेला लागतात असे फोटो असे उत्तर दिलं. >>
छान लिहीले आहे. फोटोज पण छान.
छान लिहीले आहे. फोटोज पण छान. ते प्राचीन कोकण पण मस्त आहे बघायला. आम्ही सुध्दा त्याचे फोटो काढले होते, मोबाइलच्या कॅमेर्यातून.. तुझा लेख अन फोटो पहायला जास्त मजा येईल.
>> पहिल्यान्दा गणपतीपुळ्याला
>> पहिल्यान्दा गणपतीपुळ्याला जाणार्यानी अवश्य प्रदक्षिणा घालावी. नंतर मनातल्या मनात घातली तरी चालेल.
असे का बरे? नेहमीच घालावी की!
नंदिनी... मी कोळिसरे बद्दल
नंदिनी... मी कोळिसरे बद्दल बोलतोय...
मग ठिक आहे. कारण तेव्हा मंदिर
मग ठिक आहे. कारण तेव्हा मंदिर जीर्णोद्धार चालू होता.
मस्त
मस्त
छान लिहिले आहेस .गणपती पुळे
छान लिहिले आहेस .गणपती पुळे चा ,बीच ,मंदिर सर्व काही मन प्रसन्न करून टाकणारे आहे.देवीची मूर्ती खूपच मोहक आहे.
छान लिहिलेय. मला तिथला
छान लिहिलेय. मला तिथला प्रदक्षिणा मार्ग खुप आवडतो.
छान लिहीलयस नंदिनी कोळीसरे,
छान लिहीलयस नंदिनी
कोळीसरे, माझ्या माहेरच कुलदैवत. तिथे जाऊन किमान १५ वर्ष तरी झाली असतिल पण तो परिसर, तिथला निसर्ग आणि त्या झर्याच्या पाण्याची चव अजुन लक्षात आहे
छान धन्स नंदिनी.
छान
धन्स नंदिनी.
मंदार जोशी, धन्यवाद. काल
मंदार जोशी, धन्यवाद.
काल पाऊलखुणामुळे लेख शोधता येइना. माझ्या लेखामधे या लेखाची लिंक दिलेली आहे.
लाजो, भारतात आलीस की आपण एक कोळिसरे गटग करू.
नंदिनी माझ्या पुढच्या
नंदिनी माझ्या पुढच्या ट्रीपसाठी अत्यंत उपयुक्त माहिती दिलीत, धन्यवाद!
ते बीचवरच्या सुरक्षेचं नक्की लक्षात ठेवेन. प्रचि फार फार सुंदर आहेत.
अगदी असं वाट्टंय की ते मला खुणावून म्हणतायेत की लओकर ये इथे, आम्ही वाट पाहतोय.
ते काहीतरी म्हणतात ना मालवणीत डॅश डॅश कोकण आपलाच असा!!
अगदी तसंच काहीतरी!
छान!
छान!
ते काहीतरी म्हणतात ना मालवणीत
ते काहीतरी म्हणतात ना मालवणीत डॅश डॅश कोकण आपलाच असा!>>> येवा, कोकण आपलाच आंसा.
कोळीसरे निव्वळ अप्रतिम
कोळीसरे निव्वळ अप्रतिम आहे.
मालगुंडला केशवसुतांचे स्मारकही पाहण्यासारखे आहे!
लाजो, भारतात आलीस की आपण एक
लाजो, भारतात आलीस की आपण एक कोळिसरे गटग करू... +१
रोहन + १
रोहन + १
कोळिसरे मंदिरातील लक्ष्मीकेशव
कोळिसरे मंदिरातील लक्ष्मीकेशव मूर्ती आणि माझ्या आजोळी म्हणजे अंकोला (जि.कारवार, कर्नाटक) येथे असलेल्या श्री सुंदर नारायण देवस्थान येथील नारायण मूर्ती यांत प्रचंड साम्य जाणवले. मंदार जोशी यांच्या लेखात लक्ष्मीकेशव मूर्तीचा इतिहास समजला. त्यामुळे हा झब्बू
श्री सुंदर नारायण देवस्थान, अंकोला
शेजारीच असलेले माझे 'आज्जीमने' म्हणजे आजीचे घर
श्री सुंदर नारायण
श्री सुंदर नारायणाची पूजा करताना अस्मादिक
ह्या देवळाबद्दलचा इतिहास तसा अज्ञातच म्हणता येईल. आजी-आजोबा-मामा आणि आई यांच्याकडून मिळालेली तुटपुंजी माहिती अशी की, कोण्या एका साधुला ही मूर्ती सापडली आणि त्याने प्रस्तुत देवळात त्याची प्रतिष्ठापना केली. एक छोटेखानी देऊळ बांधले. भिक्षा मागून रोज देवपूजा आणि सेवा करत राहिला. नंतर माझ्या आईच्या काकांनी देवळाचा कारभार चालवला. त्यांच्यानंतर माझ्या आजोबांनी आणि आता या दोघांच्या पश्चात माझा मामा देऊळ सांभाळतो.
मित साम्य आहे खरंच!
मित साम्य आहे खरंच!
नंदिनी, मस्त माहिती आणि फोटो.
नंदिनी, मस्त माहिती आणि फोटो.
नंदिनी, खूप छान लेख!
नंदिनी, खूप छान लेख!
सुरेख आहे लेख!
सुरेख आहे लेख!
वा मस्त फोटो आणि
वा मस्त फोटो आणि माहिती.
सुधीर
मस्त लिहिलयस .............
मस्त लिहिलयस .............
कोकणात अशा भरपूर जागा आहेत, जिथे परतपरत जावंस वाटतं. गणपतिपुळे, कोळिसरे ही ठिकाणं त्यापैकीच.
हीच लिस्ट पुढे वाढवायची झाल्यास, हेदवी, वेळणेश्वर, दिवे-आगार, नागाव इत्यादी इत्यादी ..........
Pages