अवघी विठाई माझी (१३) - बटरनट
रुपडं तर थेट लाल भोपळ्याचे नाही का ? पण आकार आटोक्यातला. लाल भोपळ्याचा आकार आणि
त्याचे आतून पोकळ असणे, यामुळे तो चेष्टेचा विषय झाला आहे. कद्दूभरके अक्कल, वगैरे शब्द्प्रयोग त्यातूनच आले.
लाल भोपळा अनेक लहान मूलांना आवडत नाही. पण अनेक थोर लोकांची आवडती भाजी आहे ही. आशा भोसलेंनी लिहिलेल्या एका पाककृतीने केलेली भाजी तर मस्तच होते. साने गुरुजींनी पण ती भाजी आवडत असल्याचे लिहून ठेवले आहे.
माझ्या आजोळी, दिवाळीच्या आसपास कौलावर तयार झालेला भोपळा, आमच्यासाठी मे महिन्यापर्यंत जपून ठेवलेला असायचा. (खास घारग्यांसाठी) तो तसा सहज टिकतो. पण त्याचा मोठा आकार बघून तो अख्खा विकत घेणे आता शक्य नसते. आणि कापुन ठेवलेला असला, तर ताजेपणाबद्दल उगाचच शंका येत राहते. त्या मानाने बटरनट अगदी छोट्या छोट्या आकारात मिळतो.
वरचा भाग भरीव आणि आत छोटीच पोकळी असल्याने, आकाराच्या मानाने त्यात गरही भरपूर निघतो.
आपल्याकडे वरुन भडक केशरी असणारे छोटे भोपळे आता मिळायला लागले आहेत पण ते आतून फिक्कट रंगाचे असतात, व चवीला थोडे कमी असतात. बटरनट मात्र आतूनही छान केशरी असतो.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मधे याला पम्पकीन म्हणजे भोपळाच म्हणतात. हा रोष्ट करुन खाणे, हा सगळ्यात आवडता प्रकार. हा जितका जून तेवढा गोड असतो. त्यामूळे हाताला टणक लागणारा, आणि बाहेरुन गडद रंग असलेला बघुन घ्यावा.
या वरच्या डिशसाठी मी त्याचे तूकडे करुन त्यासोबत रंगीत सिमल्या मिरच्या, टोमॅटो, स्विटकॉर्न वगैरे घेऊन त्यावर ऑलिव्ह ऑईल टाकून ते ग्रील केले. वरून मीठ व मिरपूड टाकले. सोबत घेण्यासाठी खास सॉस करून घेतला. त्यासाठी दोन टेबलस्पून क्रंची पीनट बटर (त्याच्याजागी दाण्याचे कूट घेता येईल.) एक टेबलस्पून तेल, एक टिस्पून लाल तिखट, अर्धा टिस्पून साखर, अर्धा टिस्पून चिंचेचा कोळ, सगळे एकत्र करुन थोडे गरम केले.
पाश्चात्य पूस्तकात याचा उपयोग करुन सूप, पाय वगैरे अनेक प्रकार सूचवलेले असतात. याची चव इतर पदार्थात सहज मिसळून जाते. पण माझा आवडता प्रकार म्हणजे, भरीत.
या भरितासाठी, मी भोपळा कूकरमधे उकडून घेतला. (नॉन स्टिक राईसकूकरमधे हा उकडला, आणि सगळे पाणी आटू दिले तर मस्त खरपूस चव येते,) उकडल्यावर याला जरा पाणी सूटते, म्हणून मी चक्क्याप्रमाणे बांधून यातले बरेचसे पाणी काढून घेतले. मग त्यात मीठ, साखर, दाणे, कोथिंबीर घातली. वरुन हिंग जिर्याची फोडणी दिली, आणि फेटून घेतलेले दही ओतले.
लाल भोपळ्याच्या कूठल्याही पदार्थात, पर्याय म्हणून हा वापरता येईल. याची साल काढावी लागते (काहिजणांना सालीची अॅलर्जी असू शकते.) बिया पण खाता येतात, पण आपल्या लाल भोपळ्यापेक्षा बियात गर खूपच कमी असतो.
याचे शास्त्रीय नाव Cucurbita moschata. याचा वेल लाल भोपळ्याच्या वेलाप्रमाणेच असतो. यापासून क जीवनसत्व, मँगनीज, मेग्नेशियम, पोटॅशियम मिळते पण अ जीवनस्त्वाचा हा उत्तम स्त्रोत आहे.
खरे तर याला बटरनट स्क्वॅश म्हणायला पाहिजे, कारण बटरनट म्हणून आणखी एक झाड असते, आणि त्याच्या बियांना पण बटरनटच म्हणतात.
मस्त माहिती देताय. मला पण
मस्त माहिती देताय. मला पण आवडतो लाल भोपळा (पण म्हणजे मी थोर असेन काय?)
हो ग देवी. तू नी मी थोरच.
हो ग देवी. तू नी मी थोरच. माझीही आवडती भाजी. लहानपणी काविळ झाल्यावर डॉ. नीं फुलके आणि भोपळ्याची भाजी सारखी खायला सांगितली तेव्हापासून काहीही कष्ट न घेता आवडायला लागली बहुतेक
इथे याला बटरनट स्क्वॅशच
इथे याला बटरनट स्क्वॅशच म्हणतात. याचे सूप छान लागते. जुन्या माबोत मी टाकली होती. ऑलिव्ह ऑइल लावून ग्रिल करायचे मग व्हेजी स्टॉकबरोबर मिक्सरमधून काढून घेऊन मीठ, मीरपूड घालून उकळायचे.
इथे वेगमन्स सारख्या दुकानांत फ्रेश कट केलेला मिळतो.
इथे अजून काही रेसिपीज आहेत -
https://www.wegmans.com/webapp/wcs/stores/servlet/RecipesView
सायो, मला पण लहान पणी डॉ. नीं
सायो, मला पण लहान पणी डॉ. नीं फुलके भेटले असते तर किती बरं झालं असतं! मी ही जरा बटरनट सारख्या भाज्या खायला शिकलो असतो.
दिनेशदा, ह्या एरवी फारशा खास न दिसणार्या(डोळ्याला) अथवा न आवडणार्या भाज्यांचे तुम्ही जे काही बनवता ते फारच भारी दिसतं! छान वाटतेय ही सुद्धा रेसिपी.
याचे तुकडे मेथी कडिपत्ता
याचे तुकडे मेथी कडिपत्ता सुकीमिर्चीच्या फोडणीवर परतून त्यात दही घालून कोशींबीर करता येते. सांबारात, किंवा आमटीत पण मस्त लागतात याच्या चौकोनी फोडी.
दिनेशदा छान माहिती. काल बिग
दिनेशदा छान माहिती.
काल बिग बझार मध्ये लीक ही भाजी दिसली. मी ते छोटे कोबी (नाव विसरले) शोधत होते, पण दिसले नाहीत.
दिनेशदा मागील वर्षी
दिनेशदा मागील वर्षी लेकीकडे(युएसे) व परताना मैत्रिणीकडे (यूके) या बटरनटची दोन अगदी वेगवेगळ्या प्रकारे भाजी खाल्ली होती. मस्त होती. आवडली.
बाकी चालू दे. खूप छान लिहिताय.
अरे वा, अमि आपल्याकडे पण
अरे वा, अमि आपल्याकडे पण मिळायला लागल्या का या भाज्या.
वैद्यबुवा, अजून वेळ आहे. थोरपण हवे असेल तर सगळ्या भाज्या
खायला हव्यात. तशा या कृति नवीन नाहीत, फक्त थोडे सजवले
आहे इतकेच.
अरे वा! मस्त फोटोज आणि पाकृ!
अरे वा! मस्त फोटोज आणि पाकृ!
ह्या भाजीला आपल्याकडे पथ्यकर भाज्यांमध्ये गणले जाते. गवार - तांबडा भोपळा हे एक आवडते कॉम्बो. भरीत, घारगे, रायते, चटणी, सांबार, सूप....सगळीकडे वापरता येणारी ही भाजी!
वाह दिनेशदा, या भाजीला वेगळे
वाह दिनेशदा, या भाजीला वेगळे नाव असेल माहित नव्हतं.
<<साने गुरुजींनी पण ती भाजी आवडत असल्याचे लिहून ठेवले आहे.>> हो. शिवाय भोपळ्याच्या फुलांच्या भाजीचा सुध्दा त्यांनी उल्लेख केलेला आहे. विशेष करून कोकणात पावसाळ्यात इतर भाज्या मिळणं कठीण असतं, मग भोपळ्यावर भर असतो. भोपळ्याची फुलं कधीकधी दादर, सिटीलाईट ला दिसतात.
मी कधीपासुन घरच्या कुंडीत भोपळ्याचा वेल लावायचा अयशस्वी प्रयत्न करत आहे. फुलं येतात पण भोपळे धरत नाहीत. मला वाटतं की हि वेल जमिनीतच येऊ शकते. कित्येक झोपड्यांवर चढवलेली दिसते.
<<गवार - तांबडा भोपळा हे एक आवडते कॉम्बो. >> अनुमोदन. मी गवारीत नेहेमीच्या लाल भोपळ्याच्या केवळ साली घालते. साधारण शेंगांच्या आकाराच्या कापून टाकल्या की भाजी दिसते पण छान. या सालींची चटणी सुध्दा खमंग होते. साली बारिक चीरुन थोड्याशा तेलावर सुक्या होईपर्यंत परतून घ्यायच्या. तीळ भाजून घ्यायचे. गार झाल्यावर मिक्सर मधून काढताना तिखट, मीठ, लिंबू घालायचे.
दा, तुम्ही लिहिल्याप्र्माणे
दा, तुम्ही लिहिल्याप्र्माणे स्वीट कॉर्न्,टोमॅटो,शिमल्या मि.घालून लाभोची छान भाजीच करते! ही चाल्ये!
मालदीवला हे मिळायचे भरपूर..
मालदीवला हे मिळायचे भरपूर.. मी पुलाव करताना भातात घालत होतो. घडाभाजी ( उकडहंडी) करताना हे घालायचो..
दिनेशदाजी, (दाजी चा योग्य तो
दिनेशदाजी, (दाजी चा योग्य तो अर्थ
)
खुपच मस्त. नेह्मी ह्या भाजीकडे बाजारात न पाह्णारी मी (कारण अज्ञान) आता फोटु पाहुन भारावले आहे.
दिनेशदा, तुमचा बटरनट मस्त
दिनेशदा,

तुमचा बटरनट मस्त वाटला.
म्हणजे आपण जगात कुठेही गेलं तरी आपल्या इथल्यासारखा भोपळा आहेच..

पण हा भोपळा बहुतेक गोडच असतो का ?
घारग्या सोडुन दुसरा काही उपयोग करु शकतो, कृपया अधिक माहिती द्यावी.
छान माहिती.
छान माहिती.
पण हा भोपळा बहुतेक गोडच असतो
पण हा भोपळा बहुतेक गोडच असतो का ?
घारग्या सोडुन दुसरा काही उपयोग करु शकतो, कृपया अधिक माहिती द्यावी.>>>>
गोड असतो असं नाही भोपळ्याची भाजी करतो तशीच ह्याची भाजी होते.
बटरनट चं सुप ही मस्त लागतं.
बटरनट चं सुप ही मस्त लागतं.
बटरनट शिजवायची सोपी
बटरनट शिजवायची सोपी क्रुति:
बटरनट अर्ध कापुन मायक्रोवेव्ह मधे ५-१० मि शिजवायचे. मऊ झाले की चमच्याने गर काढुन तो वापरायचा. फोडी हव्या असतील तर थोडा कमी वेळ शिजवावे.