साक्षर भारत आणि आपला खारीचा वाटा (सार्वजनिक धागा)

Submitted by वैजयन्ती on 9 May, 2011 - 02:45

मधंतरी माझ्याकडे काम करणार्‍या बाईच्या मुलीच्या शिक्षणासंबधी इथल्याच एका धाग्यावर मी माझ्या अडचणी विचारल्या होत्या. मला अगदी लगेच उत्तरे मिळाली, पण त्याचवेळी असंही लक्षात आलं की कितीतरी लोक इकडे आपला खारीचा वाटा उचलत आहेत. आपण आपले अनुभव / अडचणी आपण शेअर इकडे करुया का?
आपले बरे/वाईट दोन्ही अनुभव लिहूया.
ज्यांना शिकायचय त्यांचीच उदासीनता, त्यामुळे झालेला उत्साहभंग, ज्यावेळी यावर मात करता आली त्यावेळी कशी केली, घरातल्यांची मदत किंवा त्यांची होणारी चिड्चिड, त्यातून निघालेला किंवा न निघालेला मार्ग.. अश्या गोष्टी शेअर करता करता, आपल्याला उत्तरे सुद्धा मिळतील. कमीत कमी एकमेकांना आधार तरी होईल!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडील कामवाल्या बाईंना गेल्या ३-४ वर्षांमध्ये आर्थिक दृष्ट्या मदत करणे, अडीअडचणीला त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या व्यवहाराच्या - आर्थिक घडामोडींमध्ये त्यांना वेळोवेळी सल्ला देणे - सावधान करणे हे चालूच असते. तसेच त्यांच्या मुलींच्या शिक्षण-खर्चासाठी मदत करणार्‍या संस्थेशी त्यांचा संपर्क करवून दिला आहे. आमच्या बाईंचे शिक्षण तिसरी - चौथी पर्यंत झाले आहे. मराठी अक्षरे वाचतात, पण जोडाक्षरे वाचताना अजूनही अडखळतात. तरी त्यांना स्वामी समर्थांची पोथी वाचण्याच्या निमित्ताने हळूहळू जोडाक्षरे वाचता येऊ लागली आहेत. इंग्रजीतील काही शब्द आमच्या तोंडून ऐकून ऐकून त्यांनाही अर्थासह माहित झाले आहेत. माझ्या आईने तंबी दिल्यापासून त्या आपला पगार बँकेत भरतात, घरी दारुड्या नवर्‍याच्या हाती पडू देत नाहीत. त्यांना बचतगटांत सामील होऊन अतिरिक्त उत्पन्न रोजची कामे उरकल्यानंतरही मिळवता येईल हे सांगितलेय. अद्याप त्यांना ते सोयीचे वाटत नाही. काही नाही तर रद्दीच्या वर्तमानपत्रांच्या कागदी पिशव्या बनवून त्या विकणे हा उद्योग त्या व त्यांची मुले सायंकाळी घरबसल्या करू शकतात. पण.... सध्या तरी त्यांना ते पचनी पडले नाहीए.

मला त्यांच्याबाबत एकच गोष्ट जरा खटकते. त्यांच्या दारुड्या व बिनकामाच्या नवर्‍याची दारू सोडविण्यासाठी त्या अजिबात तयार नाहीत. म्हणतात, काय करायचेय त्यांची दारू सोडवून? आणि ती सुटणार तरी का? त्यामुळे त्या फ्रंटवर त्यांच्याशी बोलून सध्या तरी उपयोग नाही. पदरच्या तीन पोरांचा योगक्षेम, त्यांचे शिक्षण व कुटुंबाचा उदरनिर्वाह एवढीच त्यांची सध्याची अपेक्षा आहे. राहते घर नगरसेवकाच्या कृपेने स्वस्त घर योजनेत त्यांना ५००० रूपये भरून मिळालेय, पण ते स्वतःच्या नावावर करून घ्या असे सांगितले तरी नगरसेवक व वकिलाच्या बोलण्याला भरीस पडून ते त्यांनी नवर्‍याच्या नावावर केलेय. आता त्यांना धास्ती ही आहे की नवरा ते घर परस्पर फुकून तर टाकणार नाही ना? दारूच्या नशेत लुबाडला तर जाणार नाही ना? आता पश्चात बुध्दीने त्यांचे ते घर स्वतःच्या नावावर करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

रैना, अरुंधती, बरं झालं ग आपापले अनुभव लिहिलेत ते. माझे अनुभव लिहायचे आहेत, पण सध्या थोडी घाईच आहे. शनिवार / रविवारी लिहिन.
रैना, आपण अनुभव शेअर करतोय ना? मग धन्यवाद कशाला?

दरवर्षी 'सकाळ फाऊंडेशन' ला $१००० पाठवून काही मुलांच्या कॉलेजच्या फिया भरतो. अनुभव चांगला आहे. बहुतेक मुलांचे एकादे पत्र तरी येतं.
. त्यातला एक मुलगा आता M.Sc. करतोय, आणि चेहरापुस्तकावर भेटतो.
. मध्यंतरी एका माझी मदत मिळालेल्या, कॉलेजला जाणार्‍या गरीब मुलीने तिच्या मैत्रिणीकडून पत्र मला पाठवले होते. त्यांच्या घरची परीस्थीती वाईट आहे. आणि अजून बरेच काही. तेव्हा तिच्या नावावर पैसे पाठवा वगैरे. फोन नंबरही दिला होता. पण फोन केल्यावर कुणीतरी मोठ्या माणसाने उचलला आणि त्याचं बोलणं 'संशय घेणारं' वाटलं (आपल्या मुलीला कोणी माहीत नसलेल्या माणसाने फोन केला तर कुणाही बापाला राग येऊ शकेल). मग मी फक्त शुभेच्छा सांगून फोन ठेवला. पुढे त्या कुटूंबाची माहीती कळू शकली नाही.
'सकाळ फाऊंडेशन' कधी कधी मेल टाकून माहीती देतं आणि अजून पैसे मागतं. पण Reply mail त्यांच्या संगणकावरून बर्‍याच वेळा Reject होतो (Mail box full) त्याअर्थी अजून त्यांना System कळली नसावी किंवा बेपरवाही असेल.

. जवळच्या एका नातेवाईक मुलीला (तिचे वडील वारल्याने) मी दरमहा १००० रुपये (+ कॉलेज फी) असं देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी भारतात माझ्या विश्वासातल्या एका बहीणीकडे मी ठराविक रक्कम ठेवलेली आहे. सगळ्या पार्ट्यांना (म्हणजे मी, माझी बहीण, ती मुलगी , तिची आई) यांना नीट माहीती ही देऊन ठेवलीय. पण 'मी पैसे मागायला जाणार नाही', 'तुम्ही आमच्या नावावर एक खातं उघडून त्यात पैसे टाका व आम्ही घेऊ' असं काम असल्याने हल्ली पैसे ती घेत नाही.

दुसरा एक विचार मनात येतो. की ही मुलं (मुलगे आणि मुली) इतक्या गरीबीत वाढतात की फिया भरायला, खायला - प्यायला पैसे नाहीत पण या सगळ्यांकडे मोबाईल फोन असतात हे कसं?
वरच्या प्रत्येक केसमधे मी या लोकांना मोबाईल नंबर असल्याचं पाहिलं आहे..

>>सगळ्यांकडे मोबाईल फोन असतात

फियांच्या आकड्यापेक्षा मोबाईल स्वस्त असल्याने.

बाकी रुणुझुणूशी सहमत.

मी aasha Seattle च EOTO चा वापर करतो. मला अजूनतरी अतिशय चांगला अनुभव आहे. नियमित updates मिळतात.

५ वर्षांपुर्वी माझ्या आईने आमच्या घरी कामाला असलेल्या ३ मुलांना (२ मुली आणी १ मुलगा) स्वता:च्या शाळेत भरती करुन घेतले.. वह्या पुस्तक आणी शाळेची फीस सुध्दा भरली आणी वरतुन घरी ते येत असताना त्यांना शिकवण्याचे पण काम सुरु होते...
पण त्या कामाला येणार्या काकुंची बुध्दी कुठून फिरली देव जाणे..
त्यातल्या एका मुली चे लग्न लावुन दिले (वय वर्ष १२).. विरोध करुन ऊपयोग नाही झाला..
दुसर्या मुलीला(वय १०) सोबत कामाला घेतले Sad
आता शॉट असा की ह्या दोन्ही मुली तश्या हुशार होत्या.. आणी त्यांचा मुलगा अजिबात पुस्तक वाचत नव्हता की शाळेत येत नव्हता तर ह्यांचा कहर म्हणजे की त्यांनेच शाळेत जावे..
आता सद्य परिस्थीती अशी की दोन्ही मुलींचे लग्न झाले आणी तो त्यांचा रत्न आजुन ही काहीच करत नाही
Sad ...

अरे व्वा! बर्‍याच लोकांनी लिहिले की अनुभव.
सहज एक मनात आलेली गोष्ट लिहू का? मी कोणाच्याही शिक्षणाचा खर्च केला तर खूप वेळा त्या व्यक्तीला तुला शक्य होईल ते तू पण कर असे सांगते. म्हणजे वेळ दे / पैसे दे / समुपदेशन कर असे. त्याचा खूप चांगला फ़ायदा होतो असे मला वाटते. माझे वडील याला "दिव्याने दिवा लावायचा" असे म्हणायचे. Happy
बाकी अरुंधती, हे बिनकामाचे नवरे आणि त्यांची दारू हा खरच राग आणणारा प्रकार आहे. आईने एकदा गावातल्या बायकांना घेवून गावातली दारू गाळण्याची मडकी फोडून टाकण्याचा उद्योग वयाच्या ७५ व्या वर्षी केला होता. वर पोलिसांना म्हणे तुमच्याकडून नाही होणार ही कामं म्हणून म्हातार्‍यांना करावी लागतात.
परदेसाई, सकाळ फ़ाउंडेशनला कसा संपर्क करायचा? मोबाईलबद्दल खर आहे. माझ्या बाईचे, तिच्या मुलीचे आणि ड्रायवरचेसुद्धा मोबाईल बिल खूपवेळा आमच्या बिलांपेक्षा जास्त असते. आता ड्रायवरला lifetime incoming free असलेला मोबाईल दिलाय आणि बाकीची तुझी बिले तूच भर असे सांगितलेय, तर अगदी साधा handset दिल्याबद्दल तो नाराज!
असो. विषयांतराबद्दल क्षमस्व. वरच्यापैकी काही अस्थानी वाटत असेल तर सांगा, काढून टाकीन.

मला आलेल्या या बाबतीतल्या काही अनुभवांचा माझ्यावर आजसुद्धा खूप प्रभाव आहे. जमेल तसा एक एक लिहिते.
मी बर्‍यापैकी लहान होते तेव्हापासूनच्या गोष्टींनी सुरुवात करते. आमच्या घरी, नोकरी करणारे आई वडील, आम्ही तीन भावंडे, नोकरीसाठी म्हणून मुंबईत आलेला एखादा काका / चुलत भाऊ, ज्यांच्याकडे शिक्षणाची काही सोय नाही अशी आमच्या बरोबरीची २/३ लांबची चुलत भावंडे असायचीच, पण दोघी आत्या कोकणात् महिलाश्रम चालवायच्या. त्या महिलाश्रमातून कोणीतरी नर्सिंग / टीचर्स डिप्लोमा वगैरे काहीतरी शिकायला आलेल्या असत. आजोबांच्या छात्रालयातला एखादा होतकरू मुलगा असायचा. बरं, यांच्यापैकी कुणाकडे घरी खर्चाला देण्यासारखे पैसे खरच नसायचे. त्यामुळे जवळजवळ ४० एक वर्षांपूर्वी आईवडील दोघेही चांगल्यापैकी नोकरी करत असूने सुद्धा थोडीफ़ार आर्थिक चणचण कायम असायची. घरी शिक्षणासाठी म्हणून् आलेले बहुतेक जण त्यांचे काम झाले की आम्हाला विसरून जायचे. काही अनुभव तर हात दाखवून अवलक्षण असे म्हणावे लागतील. त्यांच्याबद्दल पण पुढे लिहिणार आहे.
मी थोडी मोठी झाल्यावर, म्हणजे १२/१४ वर्षांच्य, आपल्यालाच सगळं कळतं अस वाटण्याच्या वयात मला आई वडीलांचा जरा रागच यायचा. हे म्हणजे आंधळं दळतय आणि.... अस वाटायचं. अश्याच एका कडू अनुभवात आईला मी चिडून "कशासाठी करतेस तू हे इतकं? सगळे गैरफ़ायदा घेताहेत तुमचा" अस म्हणाले. त्यावर् तिने दिलेले उत्तर आज मला शेअर करायचय.
ती म्हणाली " त्यांना भले समजत नसेल, पण आपल्याला समजतय ना? म्हणून आपण करायच. आपली गरज म्हणून. खरं सांगायचं तर, आपण आयुष्यात जे जे आपली गरज म्हणून करू तेव्हढंच काम आपण उत्तम करतो आणि फ़क्त त्यातूनच आपल्याला पूर्ण समधान मिळतं. एकदा आपण आपल्या कृतीचे बरे वाईट परीणाम पूर्णपणे स्वीकरले की दुसर्‍याकडून अपेक्षा आणि अपेक्षाभंग अस दोन्ही टळतं"
त्यावेळी काही ते मला फ़ारसं पटलं नव्हतं, पण माझ्यावरं वेळ आली तेव्हा ते आपोआप आठवलं आणि माझ्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरं पण आईच्या या सल्ल्यामुळे सोपी झाली Happy
यातले काही अनुभव खोलात जाऊन लिहायचा विचार आहे.

सकाळ फ़ाउंडेशनला कसा संपर्क करायचा? << मी अमेरिकेतून Maharashtra Foundation तर्फे त्यांना देणगी देतो. त्यांची Site (http://www.sakaal.in/contact.htm) आहे. त्यावर contact information आहे...

मॄदुला... उत्तर आवडले (हा हा) पण पटले नाही. वर्षाच्या फी पेक्षा एका वेळच्या रिक्षाला पैसे कमी लागतात. म्हणुन पोटाची काळजी न करता रिक्षाने फिरावे का? Happy

आपण आपल्या कृतीचे बरे वाईट परीणाम पूर्णपणे स्वीकरले की दुसर्‍याकडून अपेक्षा आणि अपेक्षाभंग अस दोन्ही टळतं >>> आवडलं. माझे वडिल म्हणायचे 'अपेक्षा ठेऊ नये.. अपेक्षाभंगाचं दुख: नशीबी येतं

वाचते आहे.
वैजयन्तीताई- तुमच्या आईंचे म्हणणे अतिशय योग्य वाटते.

आमच्याकडचा हालहवाल.
लग्न ठरल्यामुळे अभ्यास तहकुब. Sad पुन्हा ती आयुष्यात कधी पुस्तक हातात धरू शकेल असे वाटत नाही.
जाताना आठवणीने सगळे कागदं/ पुस्तकं/वह्या घेउन गेली आहे, पण ते नुसतेच भावूक होऊन बहुतेक. तिच्या आणि माझ्याही डोळ्यात पाणी आले. असो.

आता क्र २
सुरु केला आहे अभ्यास. पिकअप चांगला वाटतो आहे. नववीत शिक्षण सोडले आहे. इंग्रजी आणि गणिताची भयानक भिती आहे. (गणिताची तशी तर मलाच अ‍ॅलर्जी आहे. पण आता अंगावर पडल्यामुळे भिऊन जाऊ कुठे? :फिदी:) सापशिडीसारखी गत असते कायम. २ घरं पुढे, ४ घरं मागे. साम, दाम, दंड सर्व वापरावे लागते.
आधीच्या अनुभवामुळे मीही बर्‍यापैकी शिकवू शकते आहे. पाहुयात.
सध्या माझे 'इंग्रजी भाषा अतिशय सोपी आहे' हे बीजभाषण मध्यरात्रीच्या झोपेतून उठुन तयार असते.

नवर्‍याचे आणि माझे या मुद्यावरून वाजते मधून मधून. त्याच्यामते ज्याव्यक्तीला आपणहून वाटते, तिलाच शिकवावे अन्यथा आटापिटा करु नये. माझ्यामते, असे सोडुन देऊन चालत नाही. प्रयत्न केलाच पाहिजे.

आता कळीचा मुद्दा,
इकडे दिवसाचे तास पुरत नाहीत (कधीतरी यम आला तरी त्यालासुद्धा 'वेळ नाही, २ महिन्यांनी या' असे सांगावे लागेल) अशी परिस्थिती असताना हे सगळे (धंदे) आपण का करतो?
manufacturing defect आहे. इलाज नाही. Proud
तरी ,
कधीतरी त्या व्यक्तीला लिहीतावाचता यायला लागते थोडे, थोडे हिशोब समजतात. कधीतरी प्रश्न येतो वर्तमानपत्र वाचून.. 'ताई याचा अर्थ काय'.. ते लक्षात ठेवून इतर सर्व विसरायचे. पुन्हा एकवार प्रयत्न करायचा.

इकडे दिवसाचे तास पुरत नाहीत (कधीतरी यम आला तरी त्यालासुद्धा 'वेळ नाही, २ महिन्यांनी या' असे सांगावे लागेल) अशी परिस्थिती असताना हे सगळे (धंदे) आपण का करतो?
manufacturing defect आहे. इलाज नाही. >> अगदी अगदी!!

आमच्या मातोश्रींचे ज्ञानदानाचे उद्योग लिहीन कधीतरी!

आठवणीने माहिती दिल्याबद्दल धन्यवाद परदेसाई

रैना, लग्न ठरल्यामुळे तिच्या शिक्षणात खंड पडेल बहुदा, पण आत तिला शिक्षणाचं महत्त्व तर कळलय. आपल्या मुलाबाळांना शिक्वेल ती. तोच फायदा म्हणायचा. उशीरा उगवणारं झाड!

बाकी मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टबद्दल अगदी अगदी!! नाही केलं तर चैन पडणार नाही म्हणून करतो झालं! आणि विद्यार्थ्याने आपणहून शंका विचारली, एखादी गोष्ट करून दाखवलीकी वा वा वा वा!

आम्च्याकडे या मुद्यावरून नाही वाजत कधी, पण नवर्‍याच्या ऑडिट करण्याच्या हौशीवरून हमखास. "इतकं पूर्ण करणार होतीस ना? जास्त वेळ देत जा तू ही नी तिला पण सांग...." आता तिला काय सांगू? कप्पाळ? ती मागे लागून लागून तेव्हढाच वेळ देतेय!
गंमत म्हणजे, आमचं ऐकून ऐकून, बाईला English बोललेलं बर्‍यापैकी कळायला लागलय. अधून मधून प्रयोग पण करून बघते ती Happy

मिनोती, नक्की लिही ग.

हा माझा आणखी एक अनुभव. दहा/बारा वर्षांपूर्वींचा. आमच्याकडे कामाला असणार्‍या बाईंची मुलगी आठवीत गेली आणि बाईंनी मदतीला दोन हात म्हणून तिची शाळाच बंद केली. सहज चौकशी केली तर सातवीत ८७% मार्क होते. गीताबाई तिला पुढे शिकू द्यायला तयार नव्हत्या. "तिचा बाप कायम दारू पिऊन पडलेला असतो, मी किती पुरणार्? पाठची ३ भावंडे आहेत. शाळेत हुषार असून काय फ़ायदा? चार घरी कामं केली तर थोडा पैसा तरी मिळेल." या त्यांच्या आर्ग्युमेंट वर माझ्याकडे उत्तरच नव्हतं. बनगरवाडी मधला "शाळेत धाडू? अन् त्यांच्या पोटाला गा?" हा प्रश्ण आणि त्यातली विवशता हा पोटात खड्डा पाडणारा अनुभव आहे
मग मीच आमच्याकडे कामाला पाठवा म्हणून सांगितले. दिवसभर राहील आणि मी सांगेन ते हाताखाली काम करेल असे ठरवले. मी तिची शाळा परत चालू केली. घरीकाही काम खरं म्हणजे नव्हतंच. सकाळी येऊन थोडा अभ्यास, नाश्ता जेवण करून शाळेत जायची. नंदा नुसतीच हुषार नाही तर समजुतदारसुद्धा होती. आपण अभ्यास केला, शिकवलेलेले नीट समजून घेतले की मावशी खूष असते हे बरोबर ओळखून ती अभ्यास तर करायचीच खूप, पण आपण होऊन माझ्या हातातली कामं पण ऒढून घेऊन करायची. एव्हढ्याश्या वयातील तिची समज मला नेहेमीच खूप अस्वस्थ करत आलेली आहे. सहज कधी टीव्ही लावला, नंदा अभ्यास करत असेल तर मान सुद्धा वर करून् पहात नसे!
२ वर्ष् मस्त गेली. नंदा दहावी झाली. ८५% मार्क मिळवून. तिला पुढे शिकायचं तर मलाच पुढचा खर्च करणे भाग होते. आम्ही रिसेशनच्या चपेट्यात चांगलेच सापडले होतो, घरात आर्थिक अडचणी, दोन्ही मुलींचे शिक्षण व होस्टेलचे खर्च आणि त्यात ही जबाबदारी घ्यावी का असा कचखाऊ विचार मनात आला. यावेळी मुली आणि नवरा अगदी ठामपणे नंदाच्या पाठीशी उभे राहीले. "आपली असती तर केलाच असता ना खर्च? गरज लागली तर पैसे उभे करू आणि फेडू." या त्यांच्या आश्वासनामुळे नंदाने I.T. मधे ठाण्याहून इंजिनीअरिंग डिप्लोमा केला. त्यानंतर एका pharma कं. मध्ये I.T. Dept मध्ये नोकरी मिळाली. नंतर आम्ही पण अंबरनाथ सोडले आणि संपर्क थोडा कमी झाला.
गेल्या आठ/दहा महिन्यातील बातमी म्हणजे, आता पाठच्या भावंडाच्या शिक्षणाचा खर्च तर तिने उचललाच आहे. पण पाठचा भाऊ आत्ताच् इंग्रजी विषय घेऊन् B.A. झाला, त्याला घेऊन coaching classes काढले आहेत आणि ते चालताहेत पण छान्! त्यांच्या क्लासमध्ये पण नंदा प्रत्येक इयत्तेमधल्या एका मुलीला मोफ़त शिकवते, मी तिला जी अट घातली होती तीच घालून... पैसे कमवायला लागेपर्यंत मन लावून अभ्यास करायचा आणि नंतर एका तरी मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायची. ऐकून मला काय मस्त वाटलंय म्हणून् सांगू!!

वैजयंती... वा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

बाकी सर्वांचे अनुभव सुध्धा खुप आवडले...

वैजयंती, मस्त! Happy त्यावेळी तुम्ही सर्वांनी नेटाने तिला शिकवलेत, त्याची फळं आज दिसत आहेत. मनापासून अभिनंदन Happy

अरे! इतक्या पोस्ट्स!
तुमच्या सगळ्यांच्या कौतुकामुळे छान वाटलं. निराली,मा़झी आणि गीताबाईंची गाठ नाही ग. शैलजा, नंदाला शिकायची खूपच हौस होती आणि जिद्द पण. म्हणूनच जमलं ग.

अरे अरे! एकदम प्रेरणादायी वगैरे वाचून अगदी माझ्या डोक्यामागे halo आलाय असे वाटायला लागलय मला. मुलींनो, खरोखरच मला बरं वाटतं म्हणून करते मी. १२/१४ च्या वयात नसला पटला तरी आईचा वर दिलेला सल्ला मला नंतर मनापासून पटलाय.
नंदाचं कौतुक योग्य आहे, पण हे प्रेरणादायी वगैरे वाचून खरच फार फार अस्वस्थ वाटतय मला. माझ्या आजी आजोबांनी, आई वडीलांनी या बाबतीत खूपच केलय, अगदी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून. मी माझं करीअर, संसार, हौस, मौज सगळं सांभाळून जमेल तेव्हढच करतेय.
अश्विनी (अ.मा), मेलची वाट पहाते. आनंदीसाठी जून मध्ये कदाचित येणार आहे हैदराबादला.

>> नंदा प्रत्येक इयत्तेमधल्या एका मुलीला मोफ़त शिकवते,
वै. काकू जबरीच!
तुमचे, मुलींचे, सगळ्यांचेच खूप कौतुक वाटले. Happy

Pages