Submitted by वैजयन्ती on 9 May, 2011 - 02:45
मधंतरी माझ्याकडे काम करणार्या बाईच्या मुलीच्या शिक्षणासंबधी इथल्याच एका धाग्यावर मी माझ्या अडचणी विचारल्या होत्या. मला अगदी लगेच उत्तरे मिळाली, पण त्याचवेळी असंही लक्षात आलं की कितीतरी लोक इकडे आपला खारीचा वाटा उचलत आहेत. आपण आपले अनुभव / अडचणी आपण शेअर इकडे करुया का?
आपले बरे/वाईट दोन्ही अनुभव लिहूया.
ज्यांना शिकायचय त्यांचीच उदासीनता, त्यामुळे झालेला उत्साहभंग, ज्यावेळी यावर मात करता आली त्यावेळी कशी केली, घरातल्यांची मदत किंवा त्यांची होणारी चिड्चिड, त्यातून निघालेला किंवा न निघालेला मार्ग.. अश्या गोष्टी शेअर करता करता, आपल्याला उत्तरे सुद्धा मिळतील. कमीत कमी एकमेकांना आधार तरी होईल!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा! वैजयन्ती, नंदाच्या
वा! वैजयन्ती, नंदाच्या जिद्दीचं आणि तुम्ही तिला केलेल्या मदतीचं कौतुक करावं तितकं थोडं आहे.
वैयक्तिक रीत्या आपण काही न काही प्रकारे ज्या मुलामुलींना शिक्षणाचा खर्च परवडत नाही, घरची परिस्थिती कठीण आहे, अशांना मदत करू इच्छितोच....
हा आमचा एक अनुभव....
काही वर्षांपूर्वी 'सकाळ' दैनिकातील एका निवेदनाने माझे लक्ष वेधले. त्यात 'विद्यार्थी सहायक समिती' नामक पुण्यातील संस्थेने त्यांच्या संस्थेत वसतिगृहात राहणार्या विद्यार्थी - विद्यार्थिनींना त्यांच्या 'कमवा व शिका' योजने अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या कामासाठी बोलाविण्याचे नागरिकांना आवाहन केले होते. एका संस्थेच्या कामामुळे माझा आजवर फक्त विद्यार्थी सहायक समितीचा हॉल भाड्याने घेण्याइतपत त्यांच्याशी संपर्क आला होता, तसेच आईचे एक सहकारी कलीग प्राध्यापक त्यांच्या ट्रस्टवर आहेत एवढी माहिती होती. मग घरी माझा प्रस्ताव बोलून दाखवला. घरी आईला तिच्या हाताशी मदत करू शकणारे कोणीतरी हवेच होते. विद्यार्थी सहायक समितीत चौकशीसाठी फोन केल्यावर त्यांनी काही अटी सांगितल्या.
कामाची वेळ आठवड्यातून तीन दिवस प्रत्येकी दोन तास, व विद्यार्थिनीच्या अन् आमच्या सोयीप्रमाणे असेल.
प्रत्येक तासिकेचे ठराविक मूल्य असेल, जे त्या त्या प्रमाणे वेळेवर द्यावे लागेल.
कामाचे ठिकाण वसतिगृहापासून जास्तीत जास्त २ ते ३ किमी अंतरावर असावे.
विद्यार्थी मोलकरणीची कामे करणार नाहीत.
सुचवली गेलेली कामे साधारण अशी होती : लेखनिक, टंकलेखन, संगणकावर मदत, वृध्द व्यक्तींना पेपर/ पुस्तके वाचून दाखविणे, घरात मदत इत्यादी.
आम्ही आधीच स्पष्टपणे घरातील कामात मदत हवी आहे हे सांगितले. तसे काम मान्य असणार्या मुलींपैकी एक मुलगी आम्हाला भेटायला आली. तिने आमचे घर पाहिले, माणसे पाहिली, काम काय असेल ते विचारले. तिचे समाधान झाल्यावर तिने त्याप्रमाणे होकार कळविला.
इथे हे नमूद करू इच्छिते की ह्या संस्थेच्या वसतिगृहात ग्रामीण भागातून महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात आलेल्या व आर्थिक परिस्थिती नसलेल्या मुलामुलींना अगदी माफक शुल्कात राहण्याची व खाण्या-पिण्याची, अभ्यासिकेची इत्यादी सोय होते. संस्थेचे ठरलेले प्रायोजक/ स्पॉन्सर्स असतातच, जे ह्या मुलांच्या खर्चात हातभार लावतात. त्याशिवाय 'कमवा व शिका' योजने अंतर्गत मुलांना स्वावलंबनाचे व अर्थार्जनाचे धडे दिले जातात. त्यांनी मूळ अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता ही कामे संस्थेबाहेर जाऊन करायची असतात. शिवाय वसतिगृहातही त्यांनी काही कामे करायची असतात. पुण्याजवळच्या बर्याच खेड्यांतून, छोट्या छोट्या गावांतून ही मुलंमुली इथे शहरात शिकायला येतात. पण शहरातील खर्च त्यांना परवडत नाहीत. बरं, ह्या संस्थेत मेरिटवर व परिस्थितीनुसार प्रवेश दिला जातो. त्यांचे नियम वगैरेही आहेत.
असो. तर आमच्याकडे येणारी मुलगी कला शाखेत इयत्ता अकरावीला पुण्यातील एका उत्तम कॉलेजात शिकायला होती. कॉलेज सकाळी असे तेव्हा ती आमच्याकडे सायंकाळी यायची, जेव्हा कॉलेज दुपारी असे तेव्हा सकाळी. आमचे घर त्यांच्या वसतिगृहापासून जवळपास २ ते अडीच किमी लांब होते. मग तिला बसचा पास काढून दिला होता. नंतर तिने एक जुनी सायकल कमी किंमतीत विकत घेतली व सायकलनेच ये-जा करू लागली.
ही मुलगी हुशार, चुणचुणीत होती. एनसीसी, स्पोर्ट्स, कॉलेजातील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग, वसतिगृहातील वेगवेगळ्या उपक्रमांत भाग घेणे ह्याबरोबरच चांगले मार्क्सही मिळवत होती.
तिच्या घरची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की पुणे जिल्ह्यातील एका खेडेगावात तिचे घर. वडिलांची थोडीफार शेती होती. पण कोरडवाहू शेती जमीन, कर्ज, दुष्काळ इत्यादींमुळे दिवाळे निघाले. मग सारे कुटुंब मामाच्या गावी, मामाच्या घरी आले. मामाची आर्थिक स्थिती त्या मानाने बरी होती. पण ह्या दोन मुली व त्यांचा धाकटा भाऊ यांना मामावर भार होऊन राहायचे नव्हते. तशीही दहावीनंतर गावात शिकायची सोय नव्हतीच. मग तालुक्याला जाण्यापेक्षा या मुलीने शहरात येणे पसंत केले. दोन वर्षांनी आपल्या बहिणीलाही संस्थेच्या वसतिगृहात प्रवेश मिळवून दिला. बहीण नर्सिंग डिप्लोमाला गेली तर ह्या मुलीने पर्सोनेल मॅनेजमेन्ट मध्ये डिप्लोमा केला.
आणि कामाचा उरक दांडगा होता तिचा. सुरुवातील तिला नक्की काय काम सांगावे हा संभ्रम होता आम्हाला. पण तो प्रश्न तिनेच सोडविला. घरात त्या वेळी जे काम चालू असेल त्यात मदत करायची ती. आईला स्वयंपाकात मदत (भाजी निवडणे, साफ करणे, मिक्सरवर चटणी करणे इ.), पुस्तकांचे कप्पे - कपाट - शो केस इत्यादी आवरणे, बाजारातून वस्तू आणून देणे वगैरे वगैरे. संध्याकाळी घरातला केर काढायचा असे, की ही आल्या आल्या केर काढणार.... हौसेने ''आमच्या पध्दतीचा चहा'' करते म्हणून सर्वांसाठी चहा करणार, आल्यागेल्याला पाणी देणे, फोन घेणे ही कामे हौसेने करायची. तिला वॉशिंग मशीन कसे चालते ते बघायचे होते. तेही शिकली. बाहेरून सामान आणायचे असेल तर ''मी आणणार,'' म्हणून चक्क हट्टच करायची! मला मजाच वाटायची. पण तिला बाजारात जाऊन कोठे कोठे काय काय मिळते ते बघायचे, 'भाव' करायचा ह्या गोष्टींत खूप थ्रिल वाटायचे!!
तिला अभ्यासात माझ्या आईची मदतच होत होती. आई महाविद्यालयात प्राध्यापिका असल्यामुळे ती किंवा तिच्या सहकारी कलीग्ज ह्या मुलीला काही विषय समजला नाही, कळला नाही तर मदत करत. आई तिला मिळालेली वेगवेगळ्या प्रकाशनांची क्रमिक पुस्तके ह्या मुलीला वापरायला देत असे. निरनिराळे प्रश्नपत्रिका संच, नोट्स.... तिला आणखी एक समस्या यायची ती म्हणजे इंग्रजीची! खेड्यातील शाळेत इंग्रजीवर तितका जोर नसल्यामुळे तिचे इंग्रजी जरा कच्चे होते, आणि इंग्रजीतून बोलायची वेळ आली की एरवी मराठी वक्तृत्वात बक्षीसे मिळवणारी हीच मुलगी घाबरी व्हायची! मग तिला मी घरी इंग्रजीचे ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. वसतिगृहात रोज इंग्रजी वृत्तपत्र यायचे ते रूमवर नेऊन मोठ्याने त्यातील बातम्या वाचण्यास सांगितले. अवघड शब्द डिक्शनरी जवळ ठेवून त्यात पहायचे किंवा लिहून ठेवायचे वगैरे वगैरे. ती आमच्याकडे कामाला आली की मी तिच्याशी इंग्रजीतच बोलायचे. सुरुवातीला ती मराठीत उत्तरे द्यायची, पण मग हळूहळू तोडक्या मोडक्या इंग्रजीत उत्तरे देऊ लागली. भीड चेपू लागली. बारावीत ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. त्याच कॉलेजात बी. ए. शिकू लागली. ती कॉलेजच्या तिसर्या वर्षाला असताना आम्ही आमची राहती जागा बदलली. आताची जागा तिच्या वसतिगृहापासून बर्यापैकी लांब (जवळपास ४ किमी) अंतरावर होती. नियमांत तिने आमच्याकडे काम करणे बसत नव्हते व तिला ते झेपणारेही नव्हते. पण इतक्या वर्षांचा ऋणानुबंध म्हटल्यावर तिला व आम्हालाही ते अवघड जात होते. शेवटी मग तिने खास परवानगी काढली व आमच्याकडे शनि-रवि येऊ लागली. ते वर्ष तसेच गेले. तिसर्या वर्षाची परीक्षा देतानाच ती इतर काही कोर्सेसच्या प्रवेश परीक्षा इत्यादीची तयारी करत होती. होस्टेलच्या नियमांनुसार त्या वर्षी तिला उन्हाळी सुट्टीत होस्टेलवर राहता येणार नव्हते, कारण होस्टेलची जागा दुसर्या कोणत्या तरी कार्यक्रमासाठी आरक्षित झाली होती. तिला पुण्यात राहण्यावाचून पर्याय नव्हता, कारण तिचे क्लास, परीक्षा वगैरे तेव्हाच होते.
तिला आम्ही आमच्याकडेच राहायला ये म्हणून सुचविले. क्लासच्या फी वगैरे खर्च भागविण्यासाठी व वर्क एक्स्पिरियन्स दाखविण्यासाठी तिला रेग्युलर नोकरी करायची होती. तिची ती सोय व्हावी म्हणून माझ्या एका मित्राच्या आय आय टी एन्ट्रन्स क्लास मध्ये तिला अॅडमिन जॉब देण्यासाठी मित्राकडे शब्द टाकला. त्याने लगेच तिला नोकरीवर ठेवूनही घेतले. फक्त इंग्रजी सुधारण्यास सांगितले. कारण अजून बाईसाहेबांचे इंग्रजी उच्चार सुधारले नव्हते. सुदैवाने तिच्या ज्या स्पॉन्सर बाई आहेत त्यांच्या बंगल्यावरच तिची स्वतंत्रपणे राहण्याची सोय झाली. नंतर त्याच बाईंकडे राहून तिने तिचा डिप्लोमा पूर्ण केला. आता मात्र ती आमच्याकडे कामाला येणे बंद झाले. कधीतरी आमच्या घराच्या बाजूला आली की चक्कर मारायची... पण ते तेवढेच. ह्या भेटींमध्ये अभ्यासक्रम चांगला आहे पण तिला इंग्रजीमुळे थोडा टफ जातोय हे जाणवायचे. शिवाय जिथे तिने प्रवेश घेतला होता तिथे बर्याच मुली कॉन्व्हेंट मधून आलेल्या, फाडफाड इंग्रजी बोलणार्या, आणि पेमेंट सीटवाल्या.... त्यांना ती सुरुवातीला बिचकली, पण नंतर तिच्याच लक्षात आले की आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त चांगला विषय समजलाय.... फक्त तो मांडताना तारांबळ उडते आहे. आम्ही तिने सांगितलेल्या मजा मजा ऐकून जाम हसायचो. नंतर नंतर मात्र तिच्याशी संपर्क उरला नाही. असो. आज ती जिथे कोठे असेल तिथे आनंदात असेल, स्वतःच्या पायांवर उभी असेल, कमावत असेल हीच सदिच्छा आहे!
वा!! मस्त अनुभव अरुंधती. एकदम
वा!! मस्त अनुभव अरुंधती. एकदम छान वाटलं.
अरुंधती, वैजयंती ताई, खुप छान
अरुंधती, वैजयंती ताई,
खुप छान अनुभव आहेत तुमच्या दोघींचे. वाचताना खुप छान वाटल.
धन्यवाद अरुंधती. छान वाटले गं
धन्यवाद अरुंधती. छान वाटले गं वाचून.
बरं या धाग्यावर लिहीणार्या कोणालाही असे वाटले की पाहण्यातील एखादा/दी गरजू मुलगा/मुलगी आहे आणि शिक्षणासाठी मदत हवी आहे तर कृपया इथे लिहाल का?.
रैना, ही खरच चांगली कल्पना
रैना, ही खरच चांगली कल्पना आहे.
माझ्याच ओळखीचा एक मुलगा आहे. आत्ता C.E.T. दिली आहे. अतिशय गरजू आणि मेहेनती आहे. त्याचा result लागला की लिहिते. बाकी कुणाला अश्या गरजू व्यक्ती माहित असतील तर नक्की लिहा
तसच, कुणाला scholarships / loan scholarships बद्दल माहिती असेल, तरी लिहूया का?
पाहण्यातील एखादा/दी गरजू
पाहण्यातील एखादा/दी गरजू मुलगा/मुलगी आहे आणि शिक्षणासाठी मदत हवी आहे तर कृपया इथे लिहाल का?.>>
scholarships / loan scholarships >>
हे दोन्ही वेगळा पब्लिक धागा काढून लिहिले तर? म्हणजे मदतीसाठी जास्त ऑप्शन उपलब्ध होतील.
माझ्या नवर्याला
माझ्या नवर्याला 'microfinancing' मध्ये रस आहे. प्रपोजल पाहून/ मुलांच्या मुलाखती घेऊन आम्ही मदत करु शकतो.
वैजयन्ती ताई- कधीचे करायचे आहेच. आपण एका business plan वर निदान brain storming करायचे का?बर्याच कल्पना आहेत माझ्याकडे धूळ खात.
काही अटी
१. Pay it forward (तू लिहीलीस ती अट घालायची)
२. नीट अभ्यास अर्थातच करायला हवा
३. ५०% subsidy द्यायची, ५०% पैसे नोकरी मिळाल्यावर परत करायचे. तेच आपण दुसर्या मुलांना देऊ शकु.
सावली- लिहुयात की इथेच. नाहीतरी कोण येणार आहे वाचायला. आपणच ७-८ लोकं. हा धागा सार्वजनिकच आहे ऑलरेडी.
वैजयन्ती, खरेच खूपच
वैजयन्ती, खरेच खूपच कौतुकास्पद आहे !!
सोलापुरातले श्री. सुनीलकुमार
सोलापुरातले श्री. सुनीलकुमार लवटे अनेक अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करतात. एकदा नोकरी लागली की विद्यार्थ्याने पैसे परत न करता ते सगळे पैसे दुसर्या गरजू मुलाला द्यायची, अशी अट असते. त्यांच्याशी संपर्क साधल्यास ते मदत आणि मार्गदर्शन करू शकतील.
सकाळ ट्रस्ट, लोकबिरादरी प्रकल्प, सिंधुताई सपकाळांचे अनाथालय, नगर आणि पुणे जिल्ह्यातल्या वीटभट्टीशाळा यांनाही आर्थिक साहाय्य करू शकता.
वर सगळ्यांनी लिहिलेले अनुभव अतिशय स्पृहणीय आहे. सर्वांचं अभिनंदन आणि आभार.
सार्वजनिकच आहे ऑलरेडी.>> ओह
सार्वजनिकच आहे ऑलरेडी.>> ओह हो माझ्या लक्षातच आले नाही. इतके कमी रिप्लाय आहेत इथे त्यामुळे असेल.
या प्लॅन मधे मदत करायला मलाही आवडेल.
रैना,नक्की करूया brain
रैना,नक्की करूया brain storming.
माहितीबद्दल मनापासून धन्यवाद चिनूक्स.
सावली, छान वाटलं तुला पण सहभागी व्हायला आवडेल हे वाचून.
रैना, ७/८ तर ७/८, अजिबात नसण्यापेक्षा बरं की, आणि ज्याला मदत होईल, त्याला तर १००% होईल. म्हणून तर खारीचा वाटा म्हणते मी
रैना, सावली मलाही ह्या
रैना, सावली मलाही ह्या प्रकल्पात काम करायला आवडेल.
ग्रेट सावली/
ग्रेट सावली/ शैलजा/वैजयन्ती,
अजून (कोणा)कोणाला रस आहे? एक स्काईप कॉल सेटअप करते त्यानुसार. स्काईप आयडी काढुन ठेवा बायांनो.
चिनूक्स- धन्यवाद. कायदेशीर झेंगटींबद्दल मार्गदर्शन मिळाले तर हवेच आहे.
माझा आयडी आहे तुझ्याकडे.
माझा आयडी आहे तुझ्याकडे.
माझा स्काईप होता, पण हरवला
माझा स्काईप होता, पण हरवला आहे. पाहते. कधी कॉल सेटप करणार? आधी सांग, सद्ध्या अति बिझी आहे
स्काईप आय. डी. शोधून ठेवते.
स्काईप आय. डी. शोधून ठेवते. आणि केव्हा करूया?
धन्यवाद शैलजा.
तुम्ही सांगा लोक्स केव्हा
तुम्ही सांगा लोक्स केव्हा करुया.
शनवारी सकाळी ?
या शनिवार / रविवार बाहेर
या शनिवार / रविवार बाहेर चाललेय. तुम्ही round 1 करणार का?
मला इतर मधल्या वारी जमू शकेल किंवा पुढच्या वीक-एंडला शनि किंवा रवि जमेल. मला कल्पना आहे तुम्हाला तुमच्या व्यापातून इतर दिवस कठीण असतात याची.
हायला! हा धागा कसा काय
हायला! हा धागा कसा काय मिसला मी!
तुम्हा सर्वांचे खुप कौतुक वाटतंय!
रैना, मलाही सहभागी कर. स्काईप वर नाही यायला जमणार पण मेल्/फोन वर जमेल.
एक लहानशी रक्कम नक्की देइन!
इथे अशाच एका संस्थेची माहिती
इथे अशाच एका संस्थेची माहिती देऊन ठेवते, जी ग्रामीण भागातील गरीब मुलांमुलींना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण / मार्गदर्शन देते. अर्थातच त्यांच्या काही अटी, नियम वगैरे आहेत. पण त्यांचे कोर्सेस वगैरेंची माहिती मागे दै. सकाळात येत असे. त्यात निवासी कोर्सेस असत, सोय संस्थेतर्फे केली जात असे. अगदी शिवणकाम, ब्यूटी पार्लर वगैरे पासून ते शेळीपालन, दूध डेअरी व्यवसाय इत्यादी बरेच ट्रेनिंग कोर्सेस असत त्या संस्थेचे. पाच-सहा वर्षांपूर्वी पर्यंत माझा संपर्क होता त्यांच्याशी. सध्याचे माहित नाही. तरी, नक्कीच उपयोग होईल ह्या माहितीचा :
http://www.rudsetitraining.org/
Rural Development & Self Employment Training Institute
पुण्याजवळचे त्यांचे केंद्र :
Varale Road
Near Eagle Agro Farm
Talegaon - Dabhade
410507
Pune District
rudset2007@rediffmail.com
S. K. Peshkar (CB)
फोन : 02114 – 225504
09850180449.
वैजयंती, अरुंधती खूप छान
वैजयंती, अरुंधती खूप छान अनुभव!
माझे सासरे सोलापूरचे. पुढे नोकरीसाठी मुंबईला आले आणि बोरिवलीत स्थाईक झाले. त्यांचे मोठे बंधू मात्र सोलापूरलाच स्थाईक झाले. या मोठ्या काकांच्या मुलीचे लग्न ठरले मुंबईत. लग्न कार्यात मदत म्हणुन काकांनी वर्हाडाबरोबर एका ११-१२ वर्षाच्या चुणचुणीत मुलाला बरोबर आणले होते. त्याचे नाव हरी. भटक्या जमातीतल्या हरीने लग्नकार्यात बरीच मदत केली. माझ्या सासू-सासर्यांना हरीचे खूप कौतुक वाटले. लग्न व्यवस्थीत पार पडले. वर्हाड परत सोलापूरला निघाले. हरीला मात्र परत जायचे नव्हते. त्याने माझ्या सासर्यांना त्याला ठेऊन घ्यावे म्हणून विनंती केली. 'मी पडेल ते काम करायला तयार आहे. मला पगार नको फक्त शाळेत घाला आणि मॅट्रीक पर्यंत शिकवा.' असा प्रस्ताव मांडला. एकेकाळी रात्रशाळेत शिक्षकाचे काम केलेल्या माझ्या सासर्यांना त्याला 'नाही ' म्हणणे शक्यच नव्हते. स्वतःच्या ५ मुलांच्या संसारात त्यांनी हरीला सामावून घेतले. हरी खूप कष्टाळु होता. चटपटीतही होता. सकाळी लौकर उठुन सासूबाईंना मदत करुन शाळेला जायचे , संध्याकाळी थोडावेळ माझ्या नवर्याबरोबर खेळून सासूबाईंना संध्याकाळच्या स्वयंपाकात मदत करायची असे करत त्याचे शिक्षण सुरू झाले. थोडा मोठा झाल्यावर हरीने आसपासच्या लोकांची भाजी आणणे वगैरे किरकोळ कामे करायला सुरुवात केली. मॅट्रिक झाल्यावर हरीला आय टी आयच्या कोर्सला प्रवेश मिळाला. कष्टाळू हरीने मिळालेल्या संधीचे सोने केले. उत्तम गुण मिळवून कोर्स पूर्ण केल्यामुळे त्याला लवकरच बेस्ट मधे नोकरी मिळाली. यथावकाश लग्न झाले. बेस्ट मधल्या नोकरीतही त्याच्या कष्टाळू स्वभावाचे चीज झाले. हरीला गुणवंत कामगार म्हणून पुरस्कार मिळाला. हरीने नोकरी मिळाल्यावर आपल्या भावालाही मुंबईत आणून शिकवायचा/मार्गी लावायचा प्रयत्न केला पण त्याचा भाऊ उनाड असल्याने फारसे यश मिळाले नाही. आज हरी सुखात आहे. लहानपणी कळत-ऩकळत आपल्या वर्तनातून हरीने माझ्या नवर्यावर केलेले कष्टाचे संस्कार त्याला आजही साथ देतायत.
रैना, मलापण सहभागी व्हायला
रैना, मलापण सहभागी व्हायला आवडेल. जमेल ती मदत करेन.
वा स्वाती. असं काही वाचलं की
वा स्वाती. असं काही वाचलं की मस्त वाटतं एकदम.
रैना,वैजयंती , मला पण घ्या
रैना,वैजयंती , मला पण घ्या तुमच्यात. स्काईप वर मी नाहिये (एकदा टाकले तर माझा पीसी बंदच झाला चालायचा, मग काढुन टाकावे लागले) ... पण तुमची मीटिंग झाली की मला अपडेट्स द्या ईमेलने जमेल तसे. नाहीतर मी तुमच्यातल्या एकीला फोन करुन अपडेट्स घेत जाईन.
अरुंधती , अनुभव फार आवडला.
स्वाती, छान.
वैजयंती, आमच्याकडचा सेम
वैजयंती, आमच्याकडचा सेम अनुभव. बाईंच्या दोन्ही मुली हुशार. आमच्या घरी लेकीसारख्याच वाढल्या. पूतण्याला राखी बांधायच्या. घरून गोड करुन आणायच्या त्या दिवशी. आम्ही पुस्तके वगैरे मदत करतच होतो. अभ्यासाला आमच्या घरीच बसायच्या. पण १६ व्या वर्षी लग्न होऊन सासरी गेल्यासुद्धा.
मराठा समाजात तशी पुर्वी मुलींना शिकवण्याची पद्धत नव्हती. पण माझ्यावरुन प्रेरणा घेऊन, माझ्या बहुतेक मावसचुलत बहीणी पदवीधर झाल्या. त्यानंतरही शिकल्या. (तूमच्यापेक्षा जास्त शिकलेला मुलगा कुठून आणायचा, हा कळीचा मुद्दा होता तरीही.) हा पण त्यापैकी बहुतेक जणींनी नोकरी वगैरे केली नाही. मुलींना नोकरी करु द्यायची मानसिकता, अजून ग्रामीण भागात नाही. मुलीला नोकरी करु देणे हा वडीलांना कमीपणा वाटतो. आता पुढची पिढी शिकतेय. त्यांच्याकडून आशा आहे.
शनिवारचालेल. तुम्ही सगळ्या
शनिवारचालेल.
तुम्ही सगळ्या भारतात आहात का? मग जरा लवकर म्हण्जे नऊ ला चालेल का. इथे साडेबारा असणार तेव्हा. त्यानंतर बाहेर जायचे आहे.
मला पण आवडेल यात सहभागी
मला पण आवडेल यात सहभागी व्हायला. मी रैनाला स्काईप आयडी पठवून देते. त्यादिवशी जमले तर लॉगिन होईन अन्यथा तुम्ही सगळ्यांना इमेल कराल का?
माझ्या आईचा एक लहानसा अनुभव -
मी साधारण पहिली-दुसरीत असल्यापासून मम्मी शिकवण्या घेते. ज्यांना पैसे देऊन शिकायची ऐपत आहे त्यांना पैसे घेऊन शिकवायची जवळपासची बरीच मुले-मुली तिच्याकडे शिकवणीला येत असत. आम्ही गावाबाहेर रहायला गेल्यावर ते सगळे बंद पडले. मग काही दिवसांनी आमच्या मागच्या शेतात काम करणारे शिवामामा काहीतरी कामासाठी आमच्या घरी आलेले तेव्हा त्यांच्या मोठ्या मुलीच्या शाळेचा विषय निघाला. त्यातला सारांश हा की शाळेतल्या बाई शिकवतात ते तिला कळत नाही आणि मग ती रोज शाळेत जायला काचकुच करत असे. शिकवणी वगैरे लावायला पैसे नव्हते म्हणून घोडे आडकले होते. मग मम्मीने तिला शिकवायला सुरुवात केली. मी तिथे होते तोवर मी, कधी मधी माझा भाऊ तिला शिकवत असू. तिने पुढे बी. ए. केले मगच वडीलांनी तिचे लग्न करून दिले.
ही मुले जेव्हा दिवाळी-उन्हाळ्याच्या सुट्यांमधे आईवडीलांबरोबर मंगळवेढ्याला जात असे. तेव्हा एस. टी. स्टँडवर आईवडीलांना गाडी कुठे जाते हे विचारावे लागत नसे. ही मुलं गाड्यांच्या पाट्या वाचून नक्की कुठे जाणारे ते आईवडीलांना सांगत असत. त्या आईवडीलांच्या दृष्टीने तो सगळ्यात आनंदाचा भाग होता!!
पुढे तिची धाकटी बहीण पण आमच्याकडे येत असे. तिने कॉमर्स करून बरोबरीने माझ्या मम्मीकडून, वहिनीकडून भरतकामाचे शिक्षण घेतले. आता ती बी. कॉम लास्ट इयर ला आहे.
त्याचा भाऊ मात्र अती लाडाने ऑलमोस्ट वाया गेल्यात जमा आहे. तो देखील ४ थी पर्यंत मम्मीकडे शिकायला येत होता. पण बहिणींनी जसे नीट शिक्षण केले तसे याने केले नाही.
अशा अजुनही २-३ मुली मम्मीकडे शिकल्या. त्यांचे पुस्तकांचे-वह्यांचे-चित्रकलेच्या सामांनांचे खर्च मम्मी पप्पांनी केले.
अरे वा ! ग्रेट मिनोती, सावली,
अरे वा ! ग्रेट
मिनोती, सावली, वत्सला, रैना, वैजयन्ती, शैलजा, स्वाती२, सुनिधी
यापैकी फक्त मिनोती, सावली, शैलजा यांचे इमेल आयडी आहेत. बाकीच्यांनी मला प्लीज संपर्कातून मेल करणार का स्काईप आयडी आणि ईमेल आयडी.
मला चालेल शनिवारी सकाळी ९. पुढील चर्चा इमेलवर करुयात का वेळेची.
सुनिधी/वत्सला- स्काईप इन्स्टॉल करा ना प्लीज. काही प्रॉब्लेम येत नाही. आम्ही तिनेक महिने स्काईपकृपेने आरामात काम केले आहे हिदिअ चे.
बरं रैना. पुन्हा टाकुन पहाते.
बरं रैना. पुन्हा टाकुन पहाते. ईमेल पाठवलाय.
माझा स्काईप आयडी मिळतो का
माझा स्काईप आयडी मिळतो का पाहतेय, तोवर भेटलात तर इमेल टाका, काय झालं, ह्याचा गोषवारा.
सावली, तुझा राइटअप पण द्यायचा आहे, पण उद्या मी माझं मोठ्ठ काम संपवतेय, मग मला वेळ मिळेल व्यवस्थित, एकच दिवस थांब प्लीज. इतके दिवस थांबल्याबद्दलही धन्यवाद आणि रागावू नकोस
सापडला आयडी कधी करुयात स्काईप गटग, बोला
Pages