मला पोलिस पकडतो तेव्हा..... भाग २

Submitted by मोहना on 12 May, 2011 - 10:03

त्या दिवशीची ती सुप्रभातीची सफर माझ्यादॄष्टीने स्वर्गसुखाची झाली. कासवाने कवच टाकलं, आत्मविश्वसाने कळस गाठला. मला परवाना काही सरळ मिळाला नव्हता :-). त्याचं असं झालं, मी खूप सराव केला, परिक्षक कोणत्या मार्गावरुन नेतात तिथे तिथे जाऊन गाडी चालवली. पण दरवेळेस हात हलवत परत. तिसर्‍यावेळेला त्याच सदगृहस्थांना परत बघितल्यावर आधी लाच द्यायचा प्रयत्न करायचा ते नाही जमलं तर धमकी असा माझा बेत ठरला. पण मला बघितल्यावर तेच घाबरले.

"ही आपली शेवटची भेट ठरो." मला कसंनुसं हसायचं होतं पण त्यांची उडालेली भंबेरी बघून मला खो खो हसायला यायला लागलं.

"मॅम, आर यू ओके?" माझा मानसिक तोल ढळला असावं असं वाटलं बहुधा त्यांना. तरी बसले बिचारे बाजूला. मान हलवत मी गाडी आवारातून बाहेर काढली. जे काही करायला सांगितलं ते नीट केलं.

"लेफ्ट, लेफ्ट...." विचाराची साखळी त्यांच्या कर्कश्यं सूचनेने तुटली आणि मी गाडी धाडकन डावीकडे घातली.

"आय आस्कड यू टेक लेफ्ट टर्न."

"आय वॉज गोईंग टू"

"थॅक गॉड, अग महामाये, (एका विशिष्ट पद्धतीने मॅम म्हटलं की ते ’महामाये’ असतं) डावीकडे वळवताना गाडी डावीकडे वळण्याच्या लेनमध्ये न्यायची असते."

"ओऽऽऽ" एवढाच उद्गगार निघाला माझ्या तोंडून. अतिशय सुतकी चेहर्‍याने त्यांनी माझ्या हातात परवाना सुपुर्त केला. माझं चालनकौशल्यच इतकं की धमकी, लाच असे आपली पातळी खाली आणणारे प्रकार करावेच लागले नाहीत. त्या परवान्याची कुणालाच खात्री नसल्यामुळे माझी गती इतके दिवस कासवाची होती पण आता मात्र उठलं की चालवायची गाडी आणि घुसवायची कुठेही हे सत्र मी चालू केलं.

आजही तसचं झालं. बाहेर पडायचं म्हटल्यावर किल्ली घेण्यासाठी मी धावले. पण आज किल्ली नवर्‍याच्या हातात होती.

"फाटली वाटतं आता..., स्वत: शर्यतीत भाग घेतल्यासारखा चालवतो तेव्हा?" मी पुटपुटले.

"पुटपुटू नकोस" त्याने गाडीचं दार जोरात आपटलं. मी खुषीत ड्रायव्हरच्या बाजूची जागा अडवली. मुलगा चरफडत मागे बसला. बाजूलाच बसायचं म्हटल्यावर गप्पा मारायचे विषय सुचायला लागले. तितक्यात नवर्‍याने एम. एस.. सुब्बलक्ष्मी लावली.

"३० मिनिटं, १० सेंकद गेले आता." मुलाचा हिशोब. एरवी दोन मिनिटात करतो काम म्हणजे दोन तास प्रत्येक गोष्टीला पण इथे कसे मिनिटं, सेकदांचे हिशोब?

"असा काय काढते ती आवाज" मुलगी वैतागली.

"लोकांचे बोलायचे मार्ग बंद करुन टाकायचे हे लावून." मी ही टोमणा मारला.

मुंबईच्या लोकलमध्ये चढल्यासारखी आवाजांची गर्दी उडाली गाडीत. नवरा सुब्बलक्ष्मींबरोबर स्तोत्र म्हणायला लागला आणि सगळं शांत झालं. मुलाच्या कानात यंत्राद्ववारे गाणी शिरली. मुलीचं डोकं पुस्तकात गेलं. मी एकटीच निरुद्योगी. त्यात कुणी गाडी चालवायला बसलं की माझा जीव धोक्यात आहे ह्या कल्पनेने छाती धडधडते, कापरं भरतं. मी बसले होते तिथे नसलेला ब्रेक मी पायाने दाबायला लागले. तो दाबतानाच उजव्या हाताने वरची कडी घट्ट धरली. डाव्या हाताने खाली बस, खाली बस अशी आपण खुण करतो ना तशी खुण करत राहिले, म्हणजे तुझा वेग कमी कर अशा अर्थाने. काही परिणाम दिसेना.

"यापेक्षा मी चालवते गाडी" म्हटल्या म्हटल्या नवरोजींचा हात स्टेअरिंग व्हिलवर घट्ट दाबला गेलेला दिसला मला (बहुधा माझा हात पिरगळण्याची सुप्त इच्छा यावर भागवली त्याने) त्यामुळे पायाचा जोरही वाढला असावा. गाडीचा वेग अचानक नको तितका वाढला. माझ्या अंगविक्षेपानी तो हळूहळू भडकत चालला होताच. त्यात मी गाडी चालवते म्हणणं म्हणजे त्याच्या भिक्कार ड्रायव्हिंग्ला आणखीनच भिक्कार म्हटल्यासारखं झालं ना?

" अरे, अरे, घासटणार ती गाडी आपल्याला. तू लेनच्या बाहेर गेला आहेस." मी दोन्ही कानावर हात घेऊन किंचाळले, त्यामुळे मला सोडून सर्वाना प्रचंड दचकायला झालं.

"मॉम इज सच अ हॉरिबल पॅसेंजर" वर तोंड करुन मुलगा.

" शी ओनली नोज हाऊ टे येल अ‍ॅड स्क्रिम." बोलल्या आमच्या छोट्या मॅडम.

आता नवर्‍याचं ड्रायव्हिंग सुधारु की मुलांना सरळ करु?

एव्हांना नवर्‍याने वैतागून गाडी कासवासारखी चालवायला सुरुवात केली. गंडवलच मला बहुतेक. बर्फ डोक्यावर ठेवल्यावर क्षणात सगळं गार होतं तसं डोकं शांत झाल्यासारखं वाटलं मला ते. कारण थोड्यावेळाने वरच्याच प्रकाराची पुनरावॄत्ती. यावेळेस आधीच्या कृतीत भर म्हणून मी आणखी एक फासा टाकला.

" अरे, इथे पोलिस लपलेला असतो" असं बिनदिक्कत विधान करुन मोकळं व्हायचं हे अनुभवाने जमलेलं तंत्र वापरलं. हवा होता तसाच परिणाम झाला. कितीही माहित असलं बायको खोटं सांगतेय तरी प्रतिक्षिप्त क्रिया होवून आपोआप वेग कमी केला जातो, न जाणो खरचं लपलेला असला तर?

गाडीचा वेग कमी करता करता एकदम माझ्या नवर्‍याला पुढच्या कुठल्या तरी गाडीत त्याचा मित्र असल्याचा भास झाला. बिचार्‍याला माझ्यावरुन लक्ष उडवणं आवश्यक वाटत असावं. झालं, त्याची गाडी पुढे आमची गाडी त्याच्या मागावर. वेग वाढत गेला आणि एकदम आमच्या मागे दिवे फाकफुक (चमकायला) करायला लागले. मुलाने यंत्र काढलं. मुलीने पुस्तक बाजूला ठेवलं. मी अंग आक्रसून घेतलं.

"बाबा, तुला पकडायला आला."

आरशातून मागे बघत गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवत नवरा म्हणाला,

"आता हा विषय पुरे. यावर चर्चा नको."

विषय सुरुच झाला नव्हता मग आधीच चर्चा कशी बंद करायची? पण आत्ता काही बोलले असते तर त्याने मलाच पोलिसाच्या ताब्यात देवून टाकलं असतं. नवर्‍याच्या मागे पहिल्यांदा पोलिस लागला तेव्हा त्याला समजेचना आपण काय करायचं असतं ते. तो आपला पोलिसाला पुढे जायला द्यावं म्हणून आणखी जोरात चालवायला लागला. चकाकत्या दिव्यांबरोबर आवाजही सुरु केले मग पोलिसाने. शेवटी दोघंही थांबले.

"थांबवायची असते गाडी दिवे चमकताना दिसले की." पोलिस चांगलाच गोंधळला होता. नवर्‍याच्या डोळ्यासमोर दिव्यांऐवजी काजवे चमकले असावेत.

"घाबरायला झालं, म्हटलं रस्त्यात थांबवली तर ओरडाल म्हणून थांबवायची जागा शोधत होतो."

पोलिसाला पुढे संभाषण वाढवायचं सुचलच नाही. तो पहिला प्रसंग. त्यानंतर बरीच टीकीटं जमा झाली होती. हे कितवं ते मोजून त्याला सांगणार तर त्याने चर्चा नको म्हणून आधीच विषय पुरुन टाकायचा घाट घातला. मुकाट्याने आम्ही बाहेरचं दृश्य पहात राहिलो. तो आला कलिजा खलास झाला सारख्या नजरेने गाडीतले सगळे डोळे मागून येणार्‍या पोलिसाकडे लागलेले. तेवढ्यात मी नवर्‍याला म्हटलं.

"इतक्या वेळेला मी तुझ्याबरोबर नव्हते. पण मी असं ऐकलय की बायका रडायला लागल्या की पोलिसाचं धाडस होत नाही टिकिट द्यायचं."

"मग काय मी रडू म्हणतेस?"

तू रडायला लागलास तर दहा बारा टिकीटं एकाचवेळेला मिळवशील असं म्हणावसं वाटलं. पण ते मनात ठेवलं. आगीत तेल ओतून आत्तातरी चालणार नव्हतं.

"वेगात चालवतोय हे कळलच नाही असं म्हटलं की त्यांना दया येते असं ऐकलय. बघ सांगून."

तितक्यात पोलिसमहाशय आले.

"काय कसं काय? कुठे जाऊन आलात? बरे आहात ना?" ततपप करत नवर्‍याने उत्तरं दिली. गाडीतले आम्ही सगळे फार सज्जन असल्यासारखे मुग गिळून बसलो होतो. कशाला उगाच मधे पडा, नाही का? नवर्‍याने विचारलं नसतानाही वेगात चालवतोय हे कळलच नाही म्हणून सांगून टाकलं. आरशातून एक काम उरकल्यासारखं मागे नजर टाकली. माझ्याही डोळयात शाबासकी मावत नव्हती.

पोलिसाने ड्रायव्हिंग लायसन्स मागितलं, काहीतरी वाचलं आणि एकदम म्हणाला,

"वॉव, वुई आर मिटींग अगेन."

मला ओशाळल्यासारखं झालं. पुन्हा पुन्हा त्याच पोलिसाकडून टिकीटं की काय? एकाच माणसांकडून घ्यायची तरी कितीवेळा. संकोच वाटतो ना.

तेवढ्यात तो म्हणाला.

"मी आलो होतो तुमच्या घरी."

आता मात्र माझ्या अंगात उत्साह संचारला.

’अगबाई? हो का? केव्हा, आठवत नाही’ वगैरे म्हणावसं वाटत होतं पण हे सगळं मनात भाषांतरीत करुन इंग्लिशमध्ये तोडांवर येण्याआधी तोच म्हणाला

"तुमच्याकडे चोरी झाली तेव्हा."

जळल्लं मेलं ते लक्षण. तेव्हा आला होता होय. चोरी म्हणजे काय तर आमचा जुना पुराणा फ्रीज आम्ही गराजमध्ये ठेवला आहे. गराजचं दार सतत उघडं. फ्रिजमधले अमेरिकन पदार्थ गेले कधीतरी. मसाले तसेच. म्हणजे चोर अमेरिकनच. समोरचे, मागचे, येणारे जाणारे असे तर्क वितर्क करुन झाले. शेजारी पाजारी कोण कोण आपल्या डोळ्याला डोळा देत नाहीत याची यादी काढली. पण चोरी कधी झाली होती याचाच अंदाज नव्हता त्यामुळे पाच पंचवीस डॉलर्स साठी कुठे पोलिस तक्रार. चोराच्या मागे लागायचं नाही असं ठरवलं. पण आमच्या अमेरिकन शेजारीणीने भरीला घातलं आणि आम्ही तक्रार नोंदवली. पोलिस घरी आल्याचा काय तो आनंद. त्यानांही अशी गिर्‍हाइकं क्वचितच मिळत असावीत. आमच्याच घरात आमच्याच बोटांचे ठसे घेवून आम्ही चोर नाही असं स्वत:लाच शाबित केलं त्यांच्या मदतीने. पोलिसतपासणींचे फुकट धडे घेतले. त्यांना आभार म्हणून आपला भारतीय चहा पाजला. तो पिताना दोघांचेही चेहरे बघण्यालायक होते. पण प्यायले बिचारे. तो अन्याय विसरता आला नसावा बहुधा त्या पोलिसाला. म्हटलं हा दंड दुप्पट करतोय की काय वचपा म्हणून?

"मी टिकीट देत नाही. इशारा देवून सोडून देतो. पण सावकाश चालवा. चहा प्यायला येवू कधीतरी. " त्याने मागे बघून म्हटलं

’माझ्यासारखा चहा होतच नाही बाई कुणाचा’ मी आनंदाने चित्कारले. नवर्‍याला वाटलं, टीकीट टळल्याचा आनंद.

"आपण अगत्याने केलं ना त्याचं आपल्या घरी आले तेव्हा, म्हणून सुटलो."

मी अभिमानाने म्हटलं,

"कदाचित तू म्हटलस ना तुला वेगात जातोय ते कळलच नाही तेही कारण असेल." त्यातलं कुठलं खरं यावरुन घर येईपर्यत आमचं वाजलं. बायकोमुळे टिकीट मिळायचं वाचलं हे पचवणं जड असलं तरी कटु सत्य होतं. पण माझे माझ्या आयुष्यातले टिकीट मिळण्याचे दिवस पापाचे घडे भरत आल्यासारखे जवळ येत चालले होते याची मला तेव्हा तरी कल्पना नव्हती....

क्रमश:

गुलमोहर: 

मस्तच Happy

परदेशाची पार्श्वभूमी आहे हे सुरवातीला कुठेतरी नमुद व्हायला हव अस वाट्ट्य.

>>>> आरशातून एक काम उरकल्यासारखं मागे नजर टाकली. माझ्याही डोळयात शाबासकी मावत नव्हती <<<< मागे कुणाकडे नजर टाकली? मुलांकडे? तुम्ही तर शेजारी बसलात ना? तरीपण आरशातुन बघाव लागत? Wink