आलू चला के

Submitted by मामी on 4 May, 2011 - 00:22

लागणारा वेळ:
२ मिनिटे (उकडलेले बटाटे हाताशी असतील तर)
५ मिनिटे (बटाटे मावेमध्ये उकडणार असाल तर)
१५ मिनिटे (बटाटे कुकरमध्ये उकडणार असाल तर)

लागणारे जिन्नस:
तेल, धणापूड, जीरापूड (भाजलेल्या जीर्‍यांची असेल तर उत्तम), तिखट, गरम मसाला*, मीठ, किंचित आमचूर (ऑप्शनल) ...... आणि अर्थात बटाटे.
*हा माझ्याकडे बेसिक गरम मसाला असतो तो वापरते. म्हणजे दालचिनी, लवंग, मिरे भाजून पूड करून ठेवलेला. पण बादशाहचा नबाबी मटण मसालाही छान लागतो. किंवा इतर कोणताही आपल्या आवडीनुसार गरम मसाला.

प्रमाणः दोन माणसांकरता
साधारण २-३ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे.
बाकी साहित्य अंदाजाने आणि चवीप्रमाणे.

क्रमवार पाककृती:
उकडलेल्या बटाट्याच्या बारीक फोडी करून घ्याव्यात किंवा हाताने साधारण कुस्करून घ्यावे. एखाद चमचा तेल कढईत घालून गरम झाल्यावर बटाटे टाकावेत. चांगले परतून घ्यावेत. एखाद मिनिटे परतल्यावर उर्वरीत जिन्नस (आधीच एकत्र करून ठेवलेले बरे) टाकून पुन्हा परतून एखाद मिनिटाकरता झाकून ठेवावे. सुकंसुकंच होतं ते तसंच करावं. पाणी घातलं तर चव जाते. गरमगरम चपाती, पराठ्याबरोबर खावे. एकदम झक्कास. मग मला दुवा द्यावी.

उत्तर प्रदेशात तसेही आलू भयंकर प्रिय. शिवाय मोठ्या कुटुंबात हे असले प्रकार बरेच उपयोगी पडत असणार. माझ्या साबा सांगतात की, एक बाई सबंधवेळ स्वयंपाकघरात रांधत असायची. रोट्या गरमगरम करून द्यायच्या. नाश्त्याला मग त्याचबरोबर त्याच तव्यावर आलू असे चलाके द्यायचे. हवं तर बरोबर वाटीभर साखर घातलेलं घट्ट गोड दही. की एक माणूस संपवला. दुसरा त्याचवेळी असेल तर उत्तम नाहीतर प्रत्येकाची नाश्त्याला येण्याची वेळ वेगळी असायची आणि प्रत्येकाला हे असं वेगवेगळं करून द्यायचं. खायचं काम नाही हे, खरं ना?

या प्रकाराला 'चला के' म्हणतात कारण 'चलाना' म्हणजे चालवणे म्हणजे कढईत परतणे. माझ्या साबा याला 'आलू फिराई' असेही म्हणतात. उदा. "आज बस आलू फिराई कर देते है|" असं. आता हे 'आलू फिराई' म्हणजे आलू कढईत फिरवणे की फ्रायचं फिराई झालंय ते माहीत नाही. सुरवातीला ही शंका विचारण्याकरता माझं हिंदीचं सगळं ज्ञान पणाला लावलं तरी ही माझी शंका त्यांच्यापर्यंत पोहोचेलच याची खात्री नव्हती म्हणून विचारलंच नाही. आता सवय झाली म्हणून विचारत नाही. एकूण काय, तो घोळ तसाच आहे. जाऊ द्या आपल्याला आलू चला के नाहीतर फिराई करून खाण्याशी मतलब!

आलू चलाइलेSSSSS ..... तवे पे पियाSSSSSSS

अधिक टिपा:
- हवी तर बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर वर पेरावी.
- यातच वाफवलेली मटार घातली तरी छान लागते.

माहितीचा स्रोत:
साबा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Proud मिनोती, कुत्र्यांसारखे बटाटे साखळीला बांधून नेताना डोळ्यापुढे आले ना? पहिल्यांदा मला असंच चित्र दिसायचं आणि जाम हसू यायचं.

आधी तर मला चरखा चला चला के आठवलं, म्हंटल असेल बुवा स्त्रीस्वातंत्र्याची पाककृती Wink

असो, एक एक माणूस संपवीत जावा.... Light 1

हवं तर बरोबर वाटीभर साखर घातलेलं घट्ट गोड दही. की एक माणूस संपवला. दुसरा त्याचवेळी असेल तर उत्तम नाहीतर<<< त्याला नंतर सम्पवा Lol

मामी चालु आलु मस्त वाटतायत, करुन पहाणार Happy

>>हवं तर बरोबर वाटीभर साखर घातलेलं घट्ट गोड दही. की एक माणूस संपवल>><<
आँ? हे आलू खाल्ले की एक माणूस संपतो? दुसर्‍याला संपवायला वेगळी कृती मग? का? का? Lol

आधी तर मला चरखा चला चला के आठवलं>> मला पण. आमच्या इथे आलू चाट म्हणून हे मिळत. त्यात मटार असतात. बरोबर असेच दही व चिंचेची चटणी. घरात बटाटे उकडून ठेवले तर कार्ट्यांना स्वतः बनवून घेता येइल की. व ब्रेड / पाव बरोबर खाता येइल.

<< दुसर्‍याला संपवायला वेगळी कृती मग? का? का? >>
प्रत्येक माणूस वेगळा असतो, मग त्याला संपवायला वेगवेगळ्या पाककृती नकोत ?

मस्तच पाकृ. मामी तुमची पा कृ लिहिण्याची स्टाईल भारीये एकदम. Happy
माझी एक दिल्लीची मैत्रिण करते अशी भाजी नेहमी. तिचं ह्यात एक व्हेरिएशन म्हन्जे ती तेलात थोडे ठेचलेले लसूण आणि आलं घालते आधी अन मग बटाटे. फार सही लागते पण ही भाजी.

कुत्र्यांसारखे बटाटे साखळीला बांधून नेताना डोळ्यापुढे आले ना? पहिल्यांदा मला असंच चित्र दिसायचं आणि जाम हसू यायचं.>>>> एकदम Happy

मस्त लागतो हा प्रकार.... ह्यात अजून काही व्हेरिएशन्स करता येतात.... कधी मॅगी मसाला घालायचा, कधी तेलाऐवजी लोणी/ तूप वापरायचं (कॅलरीजचा विचार नक्को!!!), कधी ओलं खोबरं/कढीपत्ता/ पुदिना पानं/ कोथिंबीर ह्यांपैकी जे हाताशी लागेल ते ढकलून द्यायचं भाजीत.... कधी कधी मी मॅगी टोमॅटो सूपची पावडर देखील वापरली आहे अशा भाजीत. टेस्टी आणि झटपट होणारा प्रकार! Happy

मस्त प्रकार, नाव तर खूपच छान. Happy

ते एक एक माणुस संपवावा आमच्या सासरी पण चालतं. आम्ही सगळे एकत्र जमलो दिवाळीला की १७-१८ जण असतोच घरातले आणि ३-४ काम करणारे. अश्यावेळी पराठे (आलु, गोबी आणि मुळा) करून ठेवलेले असतात कोरडे. चुलीशी एकजण बसलेली असते. आला माणुस की तळ पराठे असं चालु असतं. (हो तिथे पराठ्याला तेल न लावता सरळ तळतात्च तेला-तुपात). सोबत दह्याची वाटी, मख्खन का गोला, लस्सीचा ग्लास असं तयार असतं.

अल्पना, तळलेला पराठा, सोबत दह्याची वाटी, मख्खन का गोला, लस्सीचा ग्लास >>>>>> मी बहुतेक एकदाच जेवेन सकाळी आणि दिवसभर शतपावली .............

Pages