आलू चला के

Submitted by मामी on 4 May, 2011 - 00:22

लागणारा वेळ:
२ मिनिटे (उकडलेले बटाटे हाताशी असतील तर)
५ मिनिटे (बटाटे मावेमध्ये उकडणार असाल तर)
१५ मिनिटे (बटाटे कुकरमध्ये उकडणार असाल तर)

लागणारे जिन्नस:
तेल, धणापूड, जीरापूड (भाजलेल्या जीर्‍यांची असेल तर उत्तम), तिखट, गरम मसाला*, मीठ, किंचित आमचूर (ऑप्शनल) ...... आणि अर्थात बटाटे.
*हा माझ्याकडे बेसिक गरम मसाला असतो तो वापरते. म्हणजे दालचिनी, लवंग, मिरे भाजून पूड करून ठेवलेला. पण बादशाहचा नबाबी मटण मसालाही छान लागतो. किंवा इतर कोणताही आपल्या आवडीनुसार गरम मसाला.

प्रमाणः दोन माणसांकरता
साधारण २-३ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे.
बाकी साहित्य अंदाजाने आणि चवीप्रमाणे.

क्रमवार पाककृती:
उकडलेल्या बटाट्याच्या बारीक फोडी करून घ्याव्यात किंवा हाताने साधारण कुस्करून घ्यावे. एखाद चमचा तेल कढईत घालून गरम झाल्यावर बटाटे टाकावेत. चांगले परतून घ्यावेत. एखाद मिनिटे परतल्यावर उर्वरीत जिन्नस (आधीच एकत्र करून ठेवलेले बरे) टाकून पुन्हा परतून एखाद मिनिटाकरता झाकून ठेवावे. सुकंसुकंच होतं ते तसंच करावं. पाणी घातलं तर चव जाते. गरमगरम चपाती, पराठ्याबरोबर खावे. एकदम झक्कास. मग मला दुवा द्यावी.

उत्तर प्रदेशात तसेही आलू भयंकर प्रिय. शिवाय मोठ्या कुटुंबात हे असले प्रकार बरेच उपयोगी पडत असणार. माझ्या साबा सांगतात की, एक बाई सबंधवेळ स्वयंपाकघरात रांधत असायची. रोट्या गरमगरम करून द्यायच्या. नाश्त्याला मग त्याचबरोबर त्याच तव्यावर आलू असे चलाके द्यायचे. हवं तर बरोबर वाटीभर साखर घातलेलं घट्ट गोड दही. की एक माणूस संपवला. दुसरा त्याचवेळी असेल तर उत्तम नाहीतर प्रत्येकाची नाश्त्याला येण्याची वेळ वेगळी असायची आणि प्रत्येकाला हे असं वेगवेगळं करून द्यायचं. खायचं काम नाही हे, खरं ना?

या प्रकाराला 'चला के' म्हणतात कारण 'चलाना' म्हणजे चालवणे म्हणजे कढईत परतणे. माझ्या साबा याला 'आलू फिराई' असेही म्हणतात. उदा. "आज बस आलू फिराई कर देते है|" असं. आता हे 'आलू फिराई' म्हणजे आलू कढईत फिरवणे की फ्रायचं फिराई झालंय ते माहीत नाही. सुरवातीला ही शंका विचारण्याकरता माझं हिंदीचं सगळं ज्ञान पणाला लावलं तरी ही माझी शंका त्यांच्यापर्यंत पोहोचेलच याची खात्री नव्हती म्हणून विचारलंच नाही. आता सवय झाली म्हणून विचारत नाही. एकूण काय, तो घोळ तसाच आहे. जाऊ द्या आपल्याला आलू चला के नाहीतर फिराई करून खाण्याशी मतलब!

आलू चलाइलेSSSSS ..... तवे पे पियाSSSSSSS

अधिक टिपा:
- हवी तर बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर वर पेरावी.
- यातच वाफवलेली मटार घातली तरी छान लागते.

माहितीचा स्रोत:
साबा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो हो अरुंधती, यात व्हेरीएशन्सना चिक्कार स्कोप आहे. कारण मूळ घटक जो बटाटा तो इतका व्हर्सटाईल आहे ना. शाकाहारात बटाटा तशी मांसाहारात अंडी व्हर्सटाईल असं मला वाटतं. कारण त्यांचे पण असंख्य प्रकार करता येतात - अगदी झटपट.

>>>तळलेला पराठा, सोबत दह्याची वाटी, मख्खन का गोला, लस्सीचा ग्ल>>><<
ह्म्म.. सकाळी व संध्याकाळी खो-खो खेळेन मग दुपारी हे सर्व खाईन. Happy

मामी, जबरीच कृती.
>>>तळलेला पराठा, सोबत दह्याची वाटी, मख्खन का गोला, लस्सीचा ग्ल>>><<
अल्पनाच्या सासरी दिवाळीला ट्रीप काढावी का? Happy

मसाला मला सोसेल तितकाच घातलाय. उरलेली कोथिंबीर चपातीच्या पिठात ढकललीय.
आणि वरतून ऑलिव्ह ऑईल घेतलेय.

दिनेशदा sssssss कधी येऊ तुमच्याकडे इतकं चांगलंचुंगलं खायला ?? एकदम तोंपासु फोटो.
मामी, कसले कसले भन्नाट धागे काढता हो तुम्ही ! मला आलु कुठल्याही रुपात प्रचंड आवडतो .
: वरच्या रेसिपीज वाचून लाळ गाळणारी बाहुली :

मामी, माझे असेच होते, माझ्यासमोर कुणी काही पदार्थ करत असेल, तर माझा हात त्यात जाणारच. साधनाकडे बटाटेवड्याचे गोळे करायला, नलिनीकडे भाज्या चिरायला हात पुढे झालाच.

कधीकाळी मामींची कॉमेंट्री आणि माझी पाककला, असा लाईव्ह शो करु या ! >> तुफान हाऊसफुल्ल होईल हा शो. माझं तिकीट आत्ताच बुक....:)

साधी सोपी रेसिपी. खुप भारी लिहीलय... आवडले..

दिनेश दा.. फोटो तोपासु... कोथिंबीर कणकेत घालुन चपात्यांची कल्पना आवडली...

आलु की तो चल पडी..............

साधी, सोपी आणि लज्जददार पाककृती.

दिनेशदा फोटो तोंपासु.

मी हा प्रकार बर्‍याचदा केला. इकडे लिहायचे विसरले.
मस्त आणि झटपट. कधी पोळीबरोबर, कधी पाव/ब्रेड बरोबर. ब्रेडमध्ये घालून सँडविच टोस्टसुद्धा छान झाले.

Pages