विश्वकरंडकः एका न बघणारीच्या चष्म्यातून...

Submitted by सानी on 2 May, 2011 - 09:53

तुम्ही हापूस आंबे खात नाही??? मग तुम्ही आजवर काय जगलात? ह्या प्रश्नाइतकाच जिव्हाळ्याचा प्रश्न तुम्ही मलाही नक्कीच विचारु शकाल... सारं जग क्रिकेटवर फिदा आणि तुला ते आवडत नाही? कसं शक्यय? तुझ्या जीवनाला काय अर्थ आहे??? पण नाही, लोकहो! मी एकटीच नाहीये क्रिकेट न आवडणारी. एकतर सारं जग क्रिकेटवर फिदा नाहीच. बरंचसं जग फुटबॉलवर फिदा आहे, टेनिसवर फिदा आहे आणि ज्यांना क्रिकेटमध्ये किती खेळाडू असतात हे ही माहिती नाही, असे प्रगत राष्ट्रातलेसुद्धा लोकही आहेत!!! दचकायला होतं ना? अहो खरंच! माझ्या एका युरोपियन मित्राने कधीही क्रिकेटचा 'क' पण पाहिला नव्हता...

पण ते जाऊ दे! मी ही उदाहरणे कशाला द्यावी? आणि ह्या लोकांशी स्वतःची तुलना कशाला करावी? मी इतकेच म्हणेन, की क्रिकेटसाठी वेड्या असलेल्या लोकांच्या एका देशात... आपल्या भारत देशात माझ्यासारखेपण काही काही 'ऑड' लोक असतात, ज्यांचे क्रिकेटवेडाने भारलेल्या काळात फार हाल होतात... जिकडे तिकडे क्रिकेटचे वारे वहात असतात आणि ते आम्हाला झोंबत असतात. तर अशा ह्या मायनॉरिटी ग्रुपमधल्या माझे आणि माझ्यासारख्या काहींचे क्रिकेट दरम्यानचे हे किस्से!

क्रिकेट ना आवडणार्‍या माझ्यासाठी एक भाग्याची गोष्ट म्हणजे ही नावड मला अनुवांशिकच लाभली आहे, असे म्हणायला हरकत नाही. माझ्या बाबांना एकेकाळी क्रिकेट आवडायचे, पण नंतर त्यातला रस निघून गेला. मग बाकीचे लोक क्रिकेट बघत असतांना प्रचंड कंटाळलेले माझे बाबा नेहमी भारताच्या विरुद्ध टिमची बाजू घेऊन क्रिकेट बघतात आणि त्यांच्या टिमचे खेळाडू जिंकल्यावर, त्यांनी चौकार, षटकार मारल्यावर टाळ्या वाजवणे, दाद देणे असे गंमतीशीर प्रकार करतात. मग जे क्रिकेटचे दर्दी आजूबाजूला बसून मॅच एन्जॉय करत असतात, ते माझ्या बाबांकडे रागाचे कटाक्ष टाकतात आणि आमचे प्रचंड मनोरंजन होते... ही नेहमीचीच परिस्थिती.

नाही म्हणायला, मला तो ही दिवस चांगलाच आठवतोय....... काही वर्षांपूर्वी ज्या दिवशी विश्वकरंडक सामन्याच्यावेळी भारत फायनलला येऊन हरला होता. ती मॅच मी अगदी सिरियसली पाहिली होती. अगदी रडलेही होते! अख्खेच्या अख्खे सामने पाहण्याचा संयम माझ्यात नाही. सेमी फायनल-फायनलला भारत आला असेल, तर मी अधूनमधून असे सामने पहाते. तर तो सामना आम्ही सर्वांनीच अगदी गांभीर्याने पाहिला होता.

आता भारतापासून दूर असल्यावर क्रिकेटच्या वेडाच्या लाटांपासून मी दूर असते. त्यात नवर्‍यालाही क्रिकेटमध्ये काडीमात्र रस नाही, हे माझे अजून एक मोठे भाग्य! Happy तेंव्हा क्रिकेटचे सामने बघण्याची जबरदस्ती माझ्यावर करणारे कोणीही नाही. पण झाले असे, की ह्या वर्षीच्या विश्वकरंडकाच्यावेळी आमच्या मित्र-मैत्रिणींनी उपान्त्यफेरीचा भारत-पाकिस्तान सामना एकत्र पाहण्याचे ठरवले आणि भारत जिंकला, तर अंतिम फेरी पण एकत्रच पाहू हे ही एकमताने ठरले... मग काय? मला आणि नवर्‍याला गेट-टुगेदर तर हवे पण सामना मात्र नको! अशी मानसिकता... तशाच मानसिकतेतून एकत्र भेटायचे ठरले. माझी मैत्रिण 'बटाटेवडे करु या' म्हणाली. तिच्याच घरी भेटायचे ठरले होते. मी म्हणाले, 'मला सामन्यात रस नाही... तू कामात वेळ ना घालवता तोच बघत बस, मी घरून भाजी बनवून आणते. वडे तेवढे तुझ्या घरी आल्यानंतर तळू.' ती आनंदाने तयार झाली. तेवढेच मला आणि नवर्‍याला जरा उशीरा जायला निमित्त मिळाले.

तरीही, ज्यावेळेला आम्ही पोहोचलो, त्यावेळेला शेवटच्या २० ओव्हर्स बाकी होत्याच... माझे बाबा क्रिकेटचे सामने बघतांना काय मजेशीर प्रकार करतात, याचे किस्से मी नवर्‍याला अजिबात सांगितलेले नसूनही त्याने अगदी त्यांच्याचसारखे कसे काय केले? ही माझ्यासाठी मोठीच आश्चर्याची बाब होती!!! क्रिकेटची नावड असणारे सगळेच असेच वागत असतील का? असा प्रश्न त्यावेळी मला पडला... पण तिथे कंटाळलेल्या मला माझ्या नवर्‍याचे मजेशीर वागणे हाच एक विरंगुळा होता... पाकिस्तानच्या बाजूने टाळया वाजवणार्‍या त्याला फार मोठ्या रोषाला तोंड द्यावे लागले होते!!! पण माझी भक्कम साथ असल्याने, तो घाबरुन गेला नाही Lol
अर्थातच, भारत जिंकल्यावर आम्ही सर्वांनी मनापासून तो आनंद गरमगरम बटाटेवडे खात साजरा केला, हे वेगळे सांगायची गरज नाहीच...

अंतिम सामना आमच्याच घरी पहायचे ठरले. म्हणजे मग गेट-टुगेदर तर होईल आणि आम्ही कंटाळणारपण नाही असा दुहेरी आनंदाचा भाग होता. मॅचचा ब्रेकनंतरचा भाग आमच्याघरी पहायचे ठरले. मी आणि नवर्‍याने सगळा वेळ सगळ्यांसाठी स्वयंपाक करत घालवायचे ठरवले... नवर्‍याच्या गंमतीशीर कॉमेंट्स सहन करण्याची शक्ती आमच्या मित्र-मैत्रिणींमध्ये नव्हती, त्यामुळे त्यांनी आनंदाने आम्हाला स्वयंपाकघरात ढकलले! भारताची बॅटिंग सुरु झालेली होती आणि आम्ही संध्याकाळचा चहा घेत होतो. तेंडूलकर बॅटिंग करत होता. नवरा उगीचच म्हणाला, मला वाटतंय, आता तेंडुलकर आऊट होणार! सगळे त्याच्यावर प्रचंड चिडले... मुख्य म्हणजे, त्यात मी ही होते... मी सांगितले ना, उपान्त्य आणि अंतिम सामन्यांच्यावेळी मी थोडीफार सिरियस असते. तर झाले असे, की बोलाफुलाची गाठ म्हणा की कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली म्हणा.... पण तेंडूलकर खर्र्च्च्च्च्च आऊट झाला!!!! झालं... घरातलं वातावरण एकदम टेन्स झालं. मग मी नवर्‍याला खेचूनच स्वयंपाकघरात घेऊन गेले. त्याला ह्यापुढे एकही कॉमेन्ट करायची नाही, अशी ताकिदच दिली सगळ्यांनी. जी त्याने पाळली. न पाळून सांगतो कुणाला? ह्यावेळी माझीपण साथ नव्हतीच ना!

गंमत म्हणजे, आमचा एक श्रीलंकन तमिळ मित्र पण मॅच पहायला आला होता. आता ह्याच्यासमोर आपण भारत जिंकला तर आनंद किंवा हरला, तर दु:ख कसं व्यक्त करायचं ? हा आम्हाला प्रश्नच पडला होता. जो मी झटक्यात निकालात काढला. त्याला म्हणाले, " श्रीलंकेत तमिळ आणि सिंहाली यांच्या प्रश्नाच्यावेळी आम्ही तुम्हा तमिळीयन्सची बाजू घेऊ, तू ह्या सामन्यात भारताकडून रहा!" त्याला माझं डील चक्क आवडलं!!!

तर अशाप्रकारे आम्ही भारत-श्रीलंका यांच्या दरम्यानचा अंतिम सामना कुठलेही विघ्न न आणता सर्वांना पाहू दिला आणि भारत जिंकल्यावर तो आनंदही मिळून साजरा केला!!!!!!!!!!!!!! Happy

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सानी मस्तच लिहिलंयस! आणि आपण एकाच बोटीत सेलत आहोत. ( सेलिंग इन द सेम बोट)
मी कधीच क्रीकेट पहात नाही. हो आता अगदीच भारत पाक मॅच आहे आणि आपण जिंकतोय तर पहाते आपली कशीबशी.

सहीय.... ९९ च्या वल्डकप पर्यंत मी दुसर्या गटात होतो काहीही झा लं तरी मॅच चुकवायची नाही ... दुसर्या दिवशी फायनल सेमचा पेपर असतानादेखिल रात्री मॅच पहायचो.... पण का कोणजाने क्रोनियेची न्युज वाचल्यापासुन मॅच बघायचा इंटरेस्टच गेला आणि खुप खुप वेळ वाया जातो याचा साक्षात्कार ( ?) झाला.... गेल्या १० वर्षात या वेळ्ची सेमी फायनल आणि फायनल बघितली... ते पण फक्त माहोल एन्जोय करण्यासाठी..... तसापण बेटींगचा धंदा क्रिकेटपेक्षा मोठा झालाय... Happy

माझे वडील केव्हापासुन क्रिकेटचे चाहते झाले माहीत नाही पण ते भारताचे सामने आवर्जुन पाहतात, स्कोर दिसत नसला तरीही जवळ जाऊन जाऊन पाहतात.
आई त्याच्या विरुध्द पण तिने फायनल पाहीली आणि वडील रागवत असताना सुध्दा मल्हारला माझ्या मुलाला घरातील लाटने व कुकरचे भांडे वाजवायला पोत्साहन दिले.

पण का कोणजाने क्रोनियेची न्युज वाचल्यापासुन मॅच बघायचा इंटरेस्टच गेला>>> सेम हिअर! खरे तर अझर आणि जडेजा यांचे प्रकरण ऐकल्यापासून तर पूर्णच गेला होता. विश्वचषकाने कसाबसा पुन्हा निर्माण झाला. हॅन्सी क्रोनिए या अत्यंत हॅन्डसम खेळाडूला नंतर दक्षिण आफ्रिकावाल्यांनी ' विमान अपघात असे भासवून' ठार मारले. देशाची मानहानि केल्याबद्दल! शॉन पोलॉकला काही कर्णधारगिरी जमत नव्हती, तरीही क्रोनिएला आणले तर नाहीच, उलट अद्दल घडवली. आपल्याकडे अजून हैदराबादला जीम चालते अझरची! क्रीम ऑफ सोसायटी पब्लिक तेथे येते.

वडील रागवत असताना सुध्दा मल्हारला माझ्या मुलाला घरातील लाटने व कुकरचे भांडे वाजवायला पोत्साहन दिले.>>>

Lol

धन्स पाटीलसाहेब, मुकु Happy

आई त्याच्या विरुध्द पण तिने फायनल पाहीली आणि वडील रागवत असताना सुध्दा मल्हारला माझ्या मुलाला घरातील लाटने व कुकरचे भांडे वाजवायला पोत्साहन दिले.>>> हे शाब्बास!!!! Biggrin याला म्हणतात गेम स्पिरिट Happy

माझे जवळपास सर्वच मित्र क्रि.प्रे. आहेत. त्यामुळे आमचा ग्रूप जमला की त्यांच्या धो धो गप्पा चालतात आणि मी त्यात सामिल होऊ शकत नसल्याने गर्दीत असूनही "रंग माझा वेगळा" असे होते.
पण इकडे चक्क बेफिकीर आणि अजुनही काही जण चटकन "सहमत आहे" म्हणाले.
दुनिया मे ऐसा भी हो सकता है ? सहीच !

सानी, मस्त लिहिलेय........

आमच्या एरियातल्या बुकींनी दिलेल्या घटनाक्रमानुसार घडायला लागल्यावर खरं तर मला पण खात्री झाली की हे सर्व फिक्स आहे....... पण देशप्रेम का काय ते स्वस्थ बसू देईना...... Proud

जीव लावून तरीही मॅच बघितली सगळ्या ग्रूपने मिळून........ जिंकल्याचं सेलिब्रेशन रस्त्यावर गाडी काढून मस्त टपावर बसून केलं....... तो माहौलच वेगळा होता पण....... पाकिस्तानवरचा विजय आणि फायनल...... त्या क्षणी बुकींनी सांगितलेले सर्व क्षणभर का होईना विसरायला झालं....

म्हणतात ना, विजय हा शेवटी विजय असतो, मग तो कसल्याही बळावर मिळवा.

युध्दात, खेळात आणि प्रेमात सगळेच क्षम्य असतं Proud

सानी

आताशा माझेही क्रिकेटवरचे प्रेम मॅच फिक्सीग मुळे कमी झालेत, IPL तर बघतच नाही, बघितलेच तर सारखे ललीत मोदी, शशी थरुर, शरद पवार दिसतात.
शेवटी आग असेल तरच धुर निघतो ना?

बेफिकिरजी.. मी सर्व मॅचेस बेफिकिर होऊन पाहात असते आणी मॅच फिक्सिंग,बेटिंग इ.गोष्टींची अजिबात फिकिर करत न्हाई.. Proud
हा खेळ मनापासून आवडतो त्यामुळे कुणीका षटकार मारो,कठीण कॅच झेलो, उत्तम बॉलिंग करो..त्या प्रत्येकाला (त्याच्या नॅशनॅलिटी ला महत्व न देता..) मनमुराद दाद देते.
टी ट्वेंटी तर खूप आवडता..
मुकु. तुमच्या आईच्या गेम स्पिरिट ला सलाम.. मॅच जिंकल्यावर (पाक्-भारत) ओरडून घसा दुखला आणी टाळ्या वाजवून हाताला झिणझिण्या आल्यावत्या Lol

मुकु. तुमच्या आईच्या गेम स्पिरिट ला सलाम..
होन तो लहान त्याला काय समजणार विशेष. बाहेर जोरजोरात फ्टाके फुटत होते, यालाही जोश आला.
आणि हो त्या नंतर काही दिवसानी तेच भांडे मी पाहीले आणि बाबाला विचारले बाबा भांड्यावालीने एवढे कसे आपटले हे. अगदी जागो जागी फोड आल्या सारखे झालं होतं. तर बाबा म्हणाले तुझ्या पोराचा प्रताप तो.

तर बाबा म्हणाले तुझ्या पोराचा प्रताप तो.>>>>
आई गं Rofl धन्य धन्य झाले!!!!! Biggrin

हा खेळ मनापासून आवडतो त्यामुळे कुणीका षटकार मारो,कठीण कॅच झेलो, उत्तम बॉलिंग करो..त्या प्रत्येकाला (त्याच्या नॅशनॅलिटी ला महत्व न देता..) मनमुराद दाद देते.>>> वर्षू, तुझ्या हेल्दी स्पिरिटला माझा सलाम!!! Happy

धन्स भुंग्या Happy
राजे, तुमचा प्रतिसाद वाचायचा चुकून राहून गेला... मॅच फिक्सिंग मुळे खेळातली मजा पार उडून जाते, हेच खरे... बर्‍याच लोकांनी त्यामुळेच हा खेळ पाहणे थांबवलेय...

>>> २. क्रिकेट हे आनंद आणि करमणूकीपुरते राहिले नसून त्याचा खुप मोठा व्यापार झाला आहे.

ज्यांना व्यापार करायचा आहे त्यांना तो करू देत. त्यांना आपण थांबवू शकत नाही. मात्र आमच्यासारख्यांना जोपर्यंत क्रिकेटमुळे आनंद मिळत राहील, तोपर्यंत आम्ही ते एन्जॉय करू.

पण मास्तुरे,

एका गटाचे म्हणणे असे आहे की मुळात प्रेक्षकांना खूप मजा यावी व स्पेशली 'जे जिंकावेत असे बहुसंख्य प्रेक्षकांना वाटत आहे ते जिंकावेत' याच साठी फिक्सिंगवाले कार्यरत असतात. मग हे ऐकले की खोटेच वाटायला लागते.

>>> एका गटाचे म्हणणे असे आहे की मुळात प्रेक्षकांना खूप मजा यावी व स्पेशली 'जे जिंकावेत असे बहुसंख्य प्रेक्षकांना वाटत आहे ते जिंकावेत' याच साठी फिक्सिंगवाले कार्यरत असतात.

फिक्सिंग हे व्यक्तिगत पातळीवर शक्य आहे. म्हणजे एखादा खेळाडू ठरवून वाईट खेळू शकेल किंवा आलेले झेल सोडू शकेल. पण एखाद्याच्या व्यक्तिगत खेळामुळे संपूर्ण सामन्याचा निकाल फिरविता येणे जवळपास अशक्यच वाटते. त्यासाठी दोन्ही संघातील सर्व २२ खेळाडूंचा सहभाग हवा. फिक्सिंग घडवून आणणारे ते प्रेक्षकांना मजा यावी म्हणून करत नसावेत. ते सामन्यावर झालेल्या बेटिंगवर ठरवत असणार.

२०११ च्या स्पर्धेतला कोणताही सामना फिक्स होता असे मला वाटत नाही. पाकड्यांनी सचिनचे ठरवून झेल सोडले असे काही जणांचे मत आहे. पाकिस्तानचे खराब क्षेत्ररक्षण जगप्रसिध्द आहे. त्यामुळे त्यांनी झेल सोडल्याचे कोणाला फारसे आश्चर्य वाटलेले नाही. जर ठरवून झेल सोडले असते तर वेगवेगळे ४ खेळाडू यात सहभागी होते असे म्हणले पाहिजे. जर तो सामना पाकड्यांना मुद्दामहून हरायचा होता तर वहाब रियाझला ५ बळी घेण्याची गरज नव्हती. उलट वेडीवाकडी गोलंदाजी करून भारताला त्याने भारताला ३५० च्या पुढे जाऊन द्यायला पाहिजे होते.

श्रीलंकेने सुध्दा अंतिम सामना ठरवून हरला अशी एक अफवा आहे. ते खरे वाटत नाही. हरायचेच होते तर २७४ धावा करण्याऐवजी ते २०० धावांच्या आतच बाद झाले असते आणि महिला जयवर्धने, संगक्कारा, थिसारा परेरा, कुलसेकरा, दिलशान इं. नी चांगली फलंदाजी केली नसती. भारताने फिक्सिंगमुळे तो किंवा स्पर्धेतले इतर काही सामने जिंकले असे म्हणणे हा चांगला खेळ केलेल्या भारतीय खेळांडूवर अन्याय आहे.

फिक्सिंगमध्ये काही खेळाडू व्यक्तिगत पातळीवर सहभागी असल्याचे यापूर्वी काही वेळा उघडकीला आले आहे. परंतु संघातले सर्व ११ खेळाडू त्याच्यात सहभागी असणे अशक्य वाटते.

मास्तुरे,

आपला प्रतिसाद खूपच 'आवडायला हवा' असा आहे मात्र मला अनेक वाक्यांमध्ये घोळ जाणवले व हे मत आपल्या बाबत वैयक्तीक मत नसून एक फक्त मत आहे.

'कोणते घोळ'?

ते भारतातील ४ मे रोजी दुपारच्या आत लिहीन.

-'बेफिकीर'!

सानी छान लिहिलंयस. मी आणि नवरा दोघेही क्रिकेटवेडे नाही.
त्यांनी(क्रिकेटर्सनी) खेळून पैसे कमावायचे आणि आपण नुस्तं बघत बसून दिवस वाया घालवायचा. नाही पटत.
हां आता अगदी भारत पाक मॅच आहे आणि आपण जिंकतोय मग ठीके.
आणि हो आयपीएल तर नाहीच पटत.

ओह माझा प्र्.सा. आलाय. मला वाटलं की इथे माबोवर काहीतरी गडबड होत होती तर मला वाटलं सेव्ह नाही झाला. पण वर दिसला..हा टायपल्यानंतर. असो

कितीही काहीही म्हटले तरी क्रिकेटचा राग येणार्यांनाही क्रिकेट कळत असतेच आणि मोजक्या का होईना म्याचेस बघितल्या जातातच!

युरोपिय देशांत क्लब फ़ूटबॉलमध्येही निष्ठेने सामने बघणारे असतातच की! इतकेच नाही तर सपोर्टरांची हाणामारीही होते. तशी खेळाडूंची झोम्बाझोम्बी तर बर्‍याचदा होतच असते.

आयपीएलच्या बाबतीत बोलायचे तर मला काही मनापासून तो प्रकार आवडत नाही पण चुरस यायला सुरवात झाली की त्यात वेळ जातोच.

खरी मजा टेस्ट क्रिकेट पाहतांना येते हे मात्र खरे!

>>क्रिकेटचा राग येणार्‍यांनाही क्रिकेट कळत असतेच
मला फक्त ओव्हर आणि रन एवढेच कळते. अर्थात रन बरोबरच चौकार, षटकार, धावचित, पायचित, झेल, त्रिफळाबाद हे पण कळते. पण हे अगदीच मुलभूत ज्ञान असावे.
बाकी नो बॉल, वाईड, स्लिप, सिली पॉईन्ट हे सगळे शब्द बाऊन्सर जातात.

Pages