विश्वकरंडकः एका न बघणारीच्या चष्म्यातून...

Submitted by सानी on 2 May, 2011 - 09:53

तुम्ही हापूस आंबे खात नाही??? मग तुम्ही आजवर काय जगलात? ह्या प्रश्नाइतकाच जिव्हाळ्याचा प्रश्न तुम्ही मलाही नक्कीच विचारु शकाल... सारं जग क्रिकेटवर फिदा आणि तुला ते आवडत नाही? कसं शक्यय? तुझ्या जीवनाला काय अर्थ आहे??? पण नाही, लोकहो! मी एकटीच नाहीये क्रिकेट न आवडणारी. एकतर सारं जग क्रिकेटवर फिदा नाहीच. बरंचसं जग फुटबॉलवर फिदा आहे, टेनिसवर फिदा आहे आणि ज्यांना क्रिकेटमध्ये किती खेळाडू असतात हे ही माहिती नाही, असे प्रगत राष्ट्रातलेसुद्धा लोकही आहेत!!! दचकायला होतं ना? अहो खरंच! माझ्या एका युरोपियन मित्राने कधीही क्रिकेटचा 'क' पण पाहिला नव्हता...

पण ते जाऊ दे! मी ही उदाहरणे कशाला द्यावी? आणि ह्या लोकांशी स्वतःची तुलना कशाला करावी? मी इतकेच म्हणेन, की क्रिकेटसाठी वेड्या असलेल्या लोकांच्या एका देशात... आपल्या भारत देशात माझ्यासारखेपण काही काही 'ऑड' लोक असतात, ज्यांचे क्रिकेटवेडाने भारलेल्या काळात फार हाल होतात... जिकडे तिकडे क्रिकेटचे वारे वहात असतात आणि ते आम्हाला झोंबत असतात. तर अशा ह्या मायनॉरिटी ग्रुपमधल्या माझे आणि माझ्यासारख्या काहींचे क्रिकेट दरम्यानचे हे किस्से!

क्रिकेट ना आवडणार्‍या माझ्यासाठी एक भाग्याची गोष्ट म्हणजे ही नावड मला अनुवांशिकच लाभली आहे, असे म्हणायला हरकत नाही. माझ्या बाबांना एकेकाळी क्रिकेट आवडायचे, पण नंतर त्यातला रस निघून गेला. मग बाकीचे लोक क्रिकेट बघत असतांना प्रचंड कंटाळलेले माझे बाबा नेहमी भारताच्या विरुद्ध टिमची बाजू घेऊन क्रिकेट बघतात आणि त्यांच्या टिमचे खेळाडू जिंकल्यावर, त्यांनी चौकार, षटकार मारल्यावर टाळ्या वाजवणे, दाद देणे असे गंमतीशीर प्रकार करतात. मग जे क्रिकेटचे दर्दी आजूबाजूला बसून मॅच एन्जॉय करत असतात, ते माझ्या बाबांकडे रागाचे कटाक्ष टाकतात आणि आमचे प्रचंड मनोरंजन होते... ही नेहमीचीच परिस्थिती.

नाही म्हणायला, मला तो ही दिवस चांगलाच आठवतोय....... काही वर्षांपूर्वी ज्या दिवशी विश्वकरंडक सामन्याच्यावेळी भारत फायनलला येऊन हरला होता. ती मॅच मी अगदी सिरियसली पाहिली होती. अगदी रडलेही होते! अख्खेच्या अख्खे सामने पाहण्याचा संयम माझ्यात नाही. सेमी फायनल-फायनलला भारत आला असेल, तर मी अधूनमधून असे सामने पहाते. तर तो सामना आम्ही सर्वांनीच अगदी गांभीर्याने पाहिला होता.

आता भारतापासून दूर असल्यावर क्रिकेटच्या वेडाच्या लाटांपासून मी दूर असते. त्यात नवर्‍यालाही क्रिकेटमध्ये काडीमात्र रस नाही, हे माझे अजून एक मोठे भाग्य! Happy तेंव्हा क्रिकेटचे सामने बघण्याची जबरदस्ती माझ्यावर करणारे कोणीही नाही. पण झाले असे, की ह्या वर्षीच्या विश्वकरंडकाच्यावेळी आमच्या मित्र-मैत्रिणींनी उपान्त्यफेरीचा भारत-पाकिस्तान सामना एकत्र पाहण्याचे ठरवले आणि भारत जिंकला, तर अंतिम फेरी पण एकत्रच पाहू हे ही एकमताने ठरले... मग काय? मला आणि नवर्‍याला गेट-टुगेदर तर हवे पण सामना मात्र नको! अशी मानसिकता... तशाच मानसिकतेतून एकत्र भेटायचे ठरले. माझी मैत्रिण 'बटाटेवडे करु या' म्हणाली. तिच्याच घरी भेटायचे ठरले होते. मी म्हणाले, 'मला सामन्यात रस नाही... तू कामात वेळ ना घालवता तोच बघत बस, मी घरून भाजी बनवून आणते. वडे तेवढे तुझ्या घरी आल्यानंतर तळू.' ती आनंदाने तयार झाली. तेवढेच मला आणि नवर्‍याला जरा उशीरा जायला निमित्त मिळाले.

तरीही, ज्यावेळेला आम्ही पोहोचलो, त्यावेळेला शेवटच्या २० ओव्हर्स बाकी होत्याच... माझे बाबा क्रिकेटचे सामने बघतांना काय मजेशीर प्रकार करतात, याचे किस्से मी नवर्‍याला अजिबात सांगितलेले नसूनही त्याने अगदी त्यांच्याचसारखे कसे काय केले? ही माझ्यासाठी मोठीच आश्चर्याची बाब होती!!! क्रिकेटची नावड असणारे सगळेच असेच वागत असतील का? असा प्रश्न त्यावेळी मला पडला... पण तिथे कंटाळलेल्या मला माझ्या नवर्‍याचे मजेशीर वागणे हाच एक विरंगुळा होता... पाकिस्तानच्या बाजूने टाळया वाजवणार्‍या त्याला फार मोठ्या रोषाला तोंड द्यावे लागले होते!!! पण माझी भक्कम साथ असल्याने, तो घाबरुन गेला नाही Lol
अर्थातच, भारत जिंकल्यावर आम्ही सर्वांनी मनापासून तो आनंद गरमगरम बटाटेवडे खात साजरा केला, हे वेगळे सांगायची गरज नाहीच...

अंतिम सामना आमच्याच घरी पहायचे ठरले. म्हणजे मग गेट-टुगेदर तर होईल आणि आम्ही कंटाळणारपण नाही असा दुहेरी आनंदाचा भाग होता. मॅचचा ब्रेकनंतरचा भाग आमच्याघरी पहायचे ठरले. मी आणि नवर्‍याने सगळा वेळ सगळ्यांसाठी स्वयंपाक करत घालवायचे ठरवले... नवर्‍याच्या गंमतीशीर कॉमेंट्स सहन करण्याची शक्ती आमच्या मित्र-मैत्रिणींमध्ये नव्हती, त्यामुळे त्यांनी आनंदाने आम्हाला स्वयंपाकघरात ढकलले! भारताची बॅटिंग सुरु झालेली होती आणि आम्ही संध्याकाळचा चहा घेत होतो. तेंडूलकर बॅटिंग करत होता. नवरा उगीचच म्हणाला, मला वाटतंय, आता तेंडुलकर आऊट होणार! सगळे त्याच्यावर प्रचंड चिडले... मुख्य म्हणजे, त्यात मी ही होते... मी सांगितले ना, उपान्त्य आणि अंतिम सामन्यांच्यावेळी मी थोडीफार सिरियस असते. तर झाले असे, की बोलाफुलाची गाठ म्हणा की कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली म्हणा.... पण तेंडूलकर खर्र्च्च्च्च्च आऊट झाला!!!! झालं... घरातलं वातावरण एकदम टेन्स झालं. मग मी नवर्‍याला खेचूनच स्वयंपाकघरात घेऊन गेले. त्याला ह्यापुढे एकही कॉमेन्ट करायची नाही, अशी ताकिदच दिली सगळ्यांनी. जी त्याने पाळली. न पाळून सांगतो कुणाला? ह्यावेळी माझीपण साथ नव्हतीच ना!

गंमत म्हणजे, आमचा एक श्रीलंकन तमिळ मित्र पण मॅच पहायला आला होता. आता ह्याच्यासमोर आपण भारत जिंकला तर आनंद किंवा हरला, तर दु:ख कसं व्यक्त करायचं ? हा आम्हाला प्रश्नच पडला होता. जो मी झटक्यात निकालात काढला. त्याला म्हणाले, " श्रीलंकेत तमिळ आणि सिंहाली यांच्या प्रश्नाच्यावेळी आम्ही तुम्हा तमिळीयन्सची बाजू घेऊ, तू ह्या सामन्यात भारताकडून रहा!" त्याला माझं डील चक्क आवडलं!!!

तर अशाप्रकारे आम्ही भारत-श्रीलंका यांच्या दरम्यानचा अंतिम सामना कुठलेही विघ्न न आणता सर्वांना पाहू दिला आणि भारत जिंकल्यावर तो आनंदही मिळून साजरा केला!!!!!!!!!!!!!! Happy

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जिकडे तिकडे क्रिकेटचे वारे वहात असतात >आणि ते आम्हाला झोंबत असतात.>> Biggrin

मग मी नवर्‍याला खेचूनच स्वयंपाकघरात घेऊन गेले. >> बिच्चारा Biggrin

छानय छानय..

हो ना दिनेशदा!!! सही! Proud माझे बाबा तर सतत मॅच बघतांना फिक्सिंग वगैरे विषयांवर चर्चा करतात... फार मज्जा येते त्यांच्याबरोबर मॅच पहायला... आता नवरा पण त्याच टिम मध्ये! सही ना? खुब जमेगा रंग, जब मिल बैठेंगे ३ यार... बाबा, त्यांचा जावई आणि क्रिकेटप्रेमी... Lol

जिकडे तिकडे क्रिकेटचे वारे वहात असतात >आणि ते आम्हाला झोंबत असतात.>> Lol

मग मी नवर्‍याला खेचूनच स्वयंपाकघरात घेऊन गेले. >> Biggrin बिच्चारा

छानय छानय..

सानी, सेम पिंच Happy
अपवाद फक्त भारत पाक सामन्याचा Wink आणि सुदैवाने नवरादेखील माझ्यासारखाच आहे. नाहितर वर्षातील ११ महिने तरी भांडण्यात गेले असते.

चातक, तुला दोनदा धन्स रे! Lol

आणि नवरा कसला बिचारा? त्याच्यासोबर मॅच बघणारे बिचारे!!!! Biggrin

भान, अगं आता ही विश्वकरंडक संपली आणि आयपीएल सुरु झाली... खरंच, दोघांपैकी एकालाच आवड म्हटले, की काय परिस्थिती होत असेल, याची कल्पनाच न केलेली बरी!!! Happy

सानी

या वेळी तुला माझ्याकडून लाडूचं ताट. माझ्याच विचारांना वाट करून दिलीस.
इडन गार्डन वर दारूण पराभव झाल्यावर रडलेला विनोद कांबळी, फायनलला जाऊन शर्मनाक पराभव स्विकारणारी टीम इंडिया आणि यावेळी कसलाच उत्साह नसताना, बुकींचे एसेम्स येऊन पडत असताना आणि त्याबरहुकूम घडत असताना कोण इंटरेस्ट घेणारै ?

हसन तिलकरत्ने श्रीलंकेच्या खेळाडूंची नावे उघड करणार आहे. मॅच फिक्स होती हा त्याचा आरोप आहे. बेटिंगच्या वर्तुळातून श्रीलंकेच्या प्रमुख खेळाडूंना ३० - ३० कोट रू दिले अशी चर्चा आहे. नक्की माहीत नाही. यावर चर्चा करायचीही नाही.. पण डब्ल्यूडब्ल्यूएफ याचसाठी तर पहात नाही.

चातक, तुला दोनदा धन्स रे!>> सानी

आता हा प्रतिसाद पकडुन 'चार' झाले निट चेक कर.

आणि ३ रा प्रतिसाद शोधुन चारदा धन्स रे म्हण. Happy

सानी, मस्त आर्टिकल! क्रिकेट न आवडणारे असतात खरच अनेक! ते लोकं वरवर आनंदी चेहरे करून टीव्हीसमोर बसतात, पण त्यांच्या मनात फार हिंसक विचार असतात असे वाटते. टीव्ही फोडावा, लाईट जावेत वगैरे स्वरुपाचे! अर्थात, तुम्ही दोघांनी किचनमध्ये मोर्चा वळवल्यामुळे तुम्हाला तसे काही वाटलेले नसणार. पण मला स्वतःला टेनिस आणि फुटबॉल चालू असले की अगदी असेच वाटते. की लोक हे कसे काय पाहात असतील? दिड दिड तास धावाधाव करून एखाददुसरा गोल होतो आणि त्याचाच जल्लोष करतात बिचारे. क्रिकेट म्हणजे कस, बावीस विकेट्स, सहाशे सातशे रन्स, तीस एक चौकार, पाचसात षटकार आणि थर्ड अंपायर! नाट्यमयतेचा कळस! विकेट जाण्याचेच तेरा प्रकार आहेत. त्यामुळे क्रिकेट अधिक मनोरंजक वाटते मला तरी!

लेख खूप आवडला.

(अवांतर - एक सांगू का? तुम्हालाच असे नाही, तर आणखीनही काही जणांचे लेख वाचले व त्यावरून वाटले म्हणून लिहीत आहे. मूळ लेखात स्मायलींचा भरणा नसावा असे आपले मला वाटते. गैरसमज नसावा.)

धन्यवाद व शुभेच्छा !

-'बेफिकीर'!

सानी Proud फायनल बघितलीत तर शेवटी....नाविलाजाणे का होईना.... Lol
क्रिकेट न आवडणार्‍यांचा तिव्र कड्क णिशेद.

धन्यवाद बेफिकीरजी... लेखात स्मायलीजचा भरणा नसावा, याची कल्पना नव्हती. पण ते बरोबर आहे. आपण विनोदी लिहिलेय, हे आपल्या शब्दांमधून समजेलच ना? त्यासाठी एक्ट्रॉ स्मायलीज कशाला हव्यात? संपादित करते आहे... Happy

विनोदी लेखन प्रकाराचा माझा हा पहिला प्रयत्न आहे. अशाच प्रामाणिक प्रतिक्रियांची अपेक्षा आहे.

सानी आम्ही दोघेही नवरा बायको क्रिकेट वेडे आहोत त्यामुळे नो पिंच :स्मितः
जिकडे तिकडे क्रिकेटचे वारे वहात असतात >आणि ते आम्हाला झोंबत असतात Biggrin
मग मी नवर्‍याला खेचूनच स्वयंपाकघरात घेऊन गेले. Biggrin

करोडो टक्के अनुमोदन सानी, मी पण तुमच्या गटात आहे.
खरेतर वेळेचा, पैशाचा आणि मानसिकतेचा प्रचंड अपव्यय आहे हा. खेळाला खेळापुरते महत्व असावे.
विश्वचषक अंतिम सामन्याच्या दिवशी आमच्या कंपनी मधे सर्वात वरच्या मजल्यावर मोठ्ठा पडदा लावून त्यावर सामना पहाण्याची सोय केली होती.
मला आमच्या प्रोजेक्ट टीम मधल्या काही जणांना थांबवून काम करून घ्यायचे होते,
ते ३/४ जण कुरकुरत होते, मग शेवटच्या ३/४ ओव्हर्स पहाण्याची सवलत दिली,
मला पण त्यांच्या बरोबर जाऊन सामना पहात बसावे लागले.
भारताने विश्वचषक जिंकल याचा आनंद झाला नाही असे नाही,
पण आपल्याकडे लोक त्या क्रिकेटपायी फारच मॅडचॅप सारखा वेळ घालवतात.

साने,
आमचंही असंच आहे अगदी! अपवाद फक्त भारत पाक, भारत ऑस्ट्रेलिया किंवा भारत अगदीच यावेळेसारखा फायनलमध्ये असला तर थोडेफार बघायचे! नवरा तर तेव्हढेही बघत नाही!
यावेळी फायनल बघायला एका मित्राकडे जमलो होतो. त्या माहोलाची मज्जा मात्र घेतली! नवर्‍याने आधीच सांगुन टाकले की त्याने अशा मॅचेस बघितल्या तर भारत हारतोच! त्यामुळे त्याला कुणी टीव्ही समोर फिरकु देइनात आणि त्यालाही बरेच झाले. मस्तपैकी एका खोलीत जाऊन सर्फिंग करत बसला बिचारा (???)!!
तो आसपास आला तरी त्याला लोकं हकलुन देत होते Biggrin यावेळी तो यायला आणि सचिन आउट व्हायला एकच गाठ पडली! त्यामुळे मित्रांचा अगदी ठाम विश्वास बसला!
काही वर्षांपुर्वी त्याचे आणि माझे आईवडिल एकत्र ईथे फिरायला आले होते. त्यांना एम सी जी वर भारत ऑस्ट्रेलियाच्या एका सामन्याला (बॉक्सिंग डे बहुदा) घेऊन गेलो होतो. जवळ्जवळ २० जणांचा ग्रुप होता. आम्ही दोघे मात्र तिवल्याबावल्या करत होतो तिथे. मैदानावर काही घडले की ईतरांबरोबर आरडाओरडा करायचो आणि रीप्ले बघायचो (किंवा नाही बघायचो).
तिथला माहोल मात्र आम्ही पुरेपुर एंजॉय केला होता! आपल्या टीमची देहबोली अगदीच सुमार होती हे मात्र प्रकर्षाने जाणवले. आपले सगळेच खेळाडु प्रक्षकांकडे बघुन थोडासाच आणि हळुच हात हलवायचे. स्मितहास्य तर सोडाच! आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडु मात्र मस्त हात हलवुन /हसुन प्रतिसाद देत होते! तेव्हा टीम इंडियाची कीवच वाटली आम्हाला!
तो सामना भारत हारला हे सांगणे न लगे!

महेश,

आपला प्रतिसाद अंशतः पटला नाही.

१. मानसिकतेचा अपव्यय म्हणजे काय असते?

२. जीवनात आनंद व करमणुक यांचे स्थान माणसासाठी सर्वात महत्वाचे असते. ही बाब दुर्दैवी आहे की काय यावर चर्चा होऊ शकेल. पण कुणालाही पहिल्यांदा स्वतःचे मन रमणे / न रमणे हे महत्वाचे असते. त्यातूनच अशा क्रीडाप्रकारांवरील अतिरिक्त प्रेम जन्माला येते. खेळ हा खेळ म्हणून बघणे हे आयडियल स्टेटमेन्ट वाटते.

महेश, वत्सला, धन्स Happy
बेफिकीरजी, इतर खेळांच्या मानाने क्रिकेट खरंच फारच लांबलेला गेम आहे, असे वाटते मला पण... पूर्ण दिवसभर हा गेम चालतो... आणि असे कितीतरी सामने लागोपाठ म्हटल्यावर वेळेचा अपव्यय होतो, असे माझेही मत आहेच....

वत्सला,

तो आसपास आला तरी त्याला लोकं हकलुन देत होते Biggrin यावेळी तो यायला आणि सचिन आउट व्हायला एकच गाठ पडली! त्यामुळे मित्रांचा अगदी ठाम विश्वास बसला!>>> Rofl बिच्चारा!!!

१. क्रिकेटच्या अतिरेकी प्रेमामुळे माणसांची चांगली मानसिकता कमी होऊन "खेळासाठी कामाकडे दुर्लक्ष होणे", "हा खेळ न आवडणार्‍यांवर टिका करणे", इ. गुण(?) दिसून येतात.

२. क्रिकेट हे आनंद आणि करमणूकीपुरते राहिले नसून त्याचा खुप मोठा व्यापार झाला आहे.

सानी.. मस्त लेख लिहिलायस.. Rofl
ऐ पण आमच्याकडे आम्ही दोघंही किर्केट व्येडे आहोत अगदी.. त्यामुळे ओवर संपला किंवा खेळाडू आऊट झाला तरच मधल्या वेळात पटापट खायप्यायचे सामान रिप्लेस करतो..
आधी विश्वचषक स्पर्धा आणी आता आय पी एल......... विचार्रू नकोस ..

बरं झालं सांगितलंस वर्षू.... तुझ्याकडे यायचा प्लॅन करतांना विश्वचषक आणि आय पी एल च्या डेट्स टाळूनच येईन म्हणते... Proud

१. क्रिकेटच्या अतिरेकी प्रेमामुळे माणसांची चांगली मानसिकता कमी होऊन "खेळासाठी कामाकडे दुर्लक्ष होणे", "हा खेळ न आवडणार्‍यांवर टिका करणे", इ. गुण(?) दिसून येतात.

२. क्रिकेट हे आनंद आणि करमणूकीपुरते राहिले नसून त्याचा खुप मोठा व्यापार झाला आहे.>>>

ओके! सहमत आहे.

वर्षू नील,

मला वाटते आय पी एल ला क्रिकेट रसिकांनी तितका प्रतिसाद देऊच नये. त्यापेक्षा टी ट्वेन्टी या अधिकृत अंतर्देशीय स्पर्धेला द्यावा. परवा शेन वॉर्नच्या एका बॉलवर षटकार मारला म्हणून फलंदाज पाहिला तर अ‍ॅडम गिलख्रिस्ट! Happy

बेफिकीरजी, बरोबर आहे.... आणि नुकतेच विश्वकरंडक संपले, आणि लगेचच,, काहीही गॅप न ठेवता आय पी एल आले, हे पण जरा खटकलेच... आय पी एल ची संकल्पना तर मुळीच पटत नाही... विश्वचषकात देशाविषयीच्या भावनेने सगळा देश एकत्र तरी असतो...

बेफिकिरजी मीच टाकल्या होत्या माझ्या लेखा मध्ये स्माईली... यापुढे नाही टाकणार,..>>>

स्मिता, भुंग्यानेही वृत्तांतात टाकल्या.

सानी, सहमत आहे.

मला वाटते आय पी एल ला क्रिकेट रसिकांनी तितका प्रतिसाद देऊच नये. त्यापेक्षा टी ट्वेन्टी या अधिकृत अंतर्देशीय स्पर्धेला द्यावा. >> भुषणराव, हे अगदी माझ्या मनातलं. Happy

Pages