आता बास्स..!

Submitted by मी मुक्ता.. on 17 March, 2011 - 10:53

आपल्या भिंगाच्या चष्म्यातून,
तुझी ती अतिचिकित्सक नजर माझ्यावर खिळवत तू म्हणालास,
लिखाणात आता तोचतोचपणा यायला लागलाय...
मग म्हटलं आता पुरेच झालं नाहीतरी..
माझ्याकडे काही गुलजा़रसारखा चिरतरुण चंद्र नाही
किंवा साहिरसारखी चिरंजिवी वेदना पण नाही..
सतत तिच चुकार-मुकार किरणं..
फुलांचे रंग..
पौर्णिमेचा समुद्र..
श्रावणातला पाऊस...
स्वप्नांचे प्रदेश वगैरे...
मग बाहेर काही भेटतय का ते बघावं म्हटलं..
बाहेर पडतच होते,
तर सगळ्यात आधी ऋतूच रुसले..
आतले सगळेच फुरंगटुन बसले..
त्यांची समजुन घालणं तसं अवघडच..
कारण ग्रीष्माचा दाह, शिशिराची वेदना, वर्षेची उत्कटता..
सगळं एकाच वेळी कसं बाजुला सारायचं..?
पुढे जावं तर स्वप्नं होती..
चांगली क्षितिजापर्यंत पसरलेली...
कित्येक तपं मनात मुरल्यावर,
आता कुठे अंकुरु लागलेली..
सूरांकडे तरी किती कानाडोळा करावा...
कितीही दाट असलं धुकं तरी,
कानात घुमत रहातातच की कायम..
ह्म्म...
मनाच्या कुठल्यातरी कोपर्‍यातून
माझा चंद्र बघत होता हे सगळं..
इतकी युगं सोबत काढल्यामुळे,
आपण फक्त शांतपणे वाट बघायची असते हे समजलेलं त्याला
अनुभवातुन..
त्याच्या पौर्णिमेची मात्र अमावस्या झाली माझ्या या फसलेल्या प्रयत्नात..
तो म्हणालाच शेवटी न रहावुन,
"बाई गं.. पुरे आता..!
किती त्रागा करशील..?"
मीही सुखावले..
स्वतःल सोडून बाहेर पडणं कदाचित जमणारच नाही आपल्याला..
मग पुन्हा तिच चुकार-मुकार किरणं..
फुलांचे रंग..
पौर्णिमेचा समुद्र..
श्रावणातला पाऊस...
स्वप्नांचे प्रदेश वगैरे...
जाऊ दे...
आपण आपले असेच बरे...
तुझे प्रश्न तुझ्याजवळ...
शेवटी माझ्या चंद्रालातरी कोण आहे म्हणा माझ्याशिवाय...!

गुलमोहर: 

<<त्याच्या पौर्णिमेची मात्र अमावस्या झाली माझ्या या फसलेल्या प्रयत्नात.>>
<<आपण आपले असेच बरे...
तुझे प्रश्न तुझ्याजवळ...
शेवटी माझ्या चंद्रालातरी कोण आहे म्हणा माझ्याशिवाय...!>>
फारच सुंदर..........कशाकशाला दाद देऊ?
पु.ले.शु.

आवडली. मस्त थॉट अन एक्स्प्रेशनही जमलय !!!
अवांतर : मेरे अश्कोंको तू कहातक गिनेगा हमदम
चश्म-ए-पुरआब को सीधेसे समंदर लिख दे !!!!

मुक्ता -मस्त भन्नाट !!
आपल्या भिंगाच्या चष्म्यातून,
तुझी ती अतिचिकित्सक नजर माझ्यावर खिळवत तू म्हणालास,
लिखाणात आता तोचतोचपणा यायला लागलाय...
मग म्हटलं आता पुरेच झालं नाहीतरी.

"तुझे प्रश्न तुझ्याजवळ...
शेवटी माझ्या चंद्रालातरी कोण आहे म्हणा माझ्याशिवाय...!"

...... छान

अनिल.. ओके.. मला वाटलं मला म्हणालात की काय..? Happy

धनेष, अमित, UlhasBhide, आशूडी, शोभा.. खूप खूप आभार.. धन्यवाद.. Happy

Pages