विंदांचे देणे...

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

Winda.JPG
ज्ञानपीठ पुरस्कार विभूषित गोविंद विनायक करंदीकर (ऑगस्ट २३, १९१८ - मार्च १४, २०१०)

जीवित-वृक्ष नसे वठलेला
अश्रुंचे जोवर ओलेपण,
तीच निराशा, तिला भितो मी,
तिथे कोरडे हास्य करी मन.

एखादा लेखक वाचल्यानंतर आपल्या जगण्याचं झाड फोफावतं, खुरटतं, उन्मळतं, न भूतो न भविष्यति असं बहरतं, वठतं की वठूनही पुन्हा एका आग्रही हट्टानं त्याला पालवी फुटते, यावर त्या लेखकाची आयुष्यरेषा ठरत असते. म्हणून ऑरकुटवर, फेसबुकवर, ट्विटरवर, अनेक मराठी ब्लॉगांवर, ई-सकाळपासून ई-संध्यानंदपर्यंत सर्व मराठी वृत्तपत्रामधून “विंदा गेले! विंदा गेले!! विंदा गेले!!!” ही बातमी वाचून क्षणभर मला दचकायला झाले. विंदांची आणि आपली ओळख केवळ त्यांच्या पुस्तकांमधूनच. प्रत्यक्षात कधी छोटेखानी भेट झाली नाही, आवडलेल्या कवितांवर अभिप्राय म्हणून त्यांना कधी दोन ओळी लिहिल्या नाहीत की फोनवर त्यांच्याशी कधी बोलणे झाले नाही. विंदा पूर्वी भेटले ते - घेता, माझ्या मना बन दगड, तेच ते तेच ते, धोंड्या न्हावी, दाताकडून दाताकडे, साठीचा गझल, रक्तसमिधा, झपताल - या त्यांच्या जीवनदृष्टींनी रसरसलेल्या कवितांमधून आणि या नंतर भेटत राहतील तेही त्यांच्या कवितामधूनच.

"देणार्याने देत जावे - घेणार्याने घेत जावे , घेता घेता एक दिवस - देणार्याचे हात घ्यावे" अशी विंदांची एक कविता आहे. ती अमलात आणत त्यांनी प्रत्येक पुरस्काराची रक्कम शांतपणे, गाजावाजा न करता सामाजिक कामांना देऊन टाकली. विद्यार्थ्यांना शरीरशास्त्र शिकवायला मृतदेहांची गरज भासते म्हणून कृतार्थ जीवनाची अखेर झाल्यानंतर सामाजिक बांधिलकीला महत्त्व देणार्या विंदांनी मरणोत्तर देहदान केले. विंदांच्या पत्नी सुमाताईंनी देखील मरणोत्तर देहदान केले होते. आपल्या कवितेशी विंदांचा केवढा हा प्रामाणिकपणा!

विंदांचा "स्वेदगंगा' हा पहिला काव्यसंग्रह १९४९ साली प्रसिद्ध झाला. तेव्हां दुसर्या महायुद्धानंतरच्या पडझडीतून जग नुकतेच सावरू लागले होते. या नव्या यंत्रयुगाची उभारणी अवतीभवती घडत असताना विंदांना त्यात स्वेदगंगेचा साक्षात्कार झाला. "स्वेदाची ही अखंड गंगा, देश धर्म रक्ताचे सारे, फोडित धरणे नि बंधारे, भिजवीत माती काळी गोरी, पहा धावते अखिल जगावर" अशा शब्दांमधून नव्या जगाची ही उभारणी चालली असल्याचे त्यांनी आपल्या संवेदनशील मनाने टिपले. नव्या युगाच्या या श्रमिक संस्कृतीविषयी त्यांच्या मनात आत्यंतिक प्रेम आणि जिव्हाळा होता. "तीच गाणी, तेच तराणे, तेच मूर्ख, तेच शहाणे' म्हणत त्यांनी नव्याने उदयास येत असलेल्या मध्यमवर्गीय जीवनाच्या सपकतेवर प्रहार केले. अत्यंत प्रासादिक शैलीतून समाजातील शोषितांचे अंतरंग त्यांनी प्रभावीपणे मांडले. अवतीभवतीचे दाहक वास्तव पाहून बसलेले हादरे त्यांच्या "माझ्या मना बन दगड' सारख्या कवितेमधून व्यक्त झाले. "रडणार्या रडशील किती, झुरणार्या झुरशील किती, पिचणार्या पिचशील किती, ऐकू नको हा टाहो, माझ्या मना दगड हो" असे आपल्या मनाला समजावणारे विंदा याच कवितेत बरंच सांगून गेले. ‘रक्तसमाधी’ मधून येणारा लैंगिक अनुभव जेवढा नितळ तेवढाच ‘धोंडय़ा न्हावी’ कवितेतून येणारा सामाजिक अनुभव प्रांजळ! ‘धोंडय़ा न्हावी-/ महिन्यांतून कधी तरि। हळूच येतो अमुच्या मागिलदारी। आणिक नंतर। खोपटिच्या माघारी जाऊन करितो अद्भुत काही। जे न कुणीही आम्हा पाहू देई।’ करंदीकरांच्या बालपणातील ही आठवण. विधवा झालेल्या स्त्रीच्या केशवपनासारख्या अत्यंत विकृत अशा रूढीचा हा संदर्भ. करंदीकरांच्या मनात खोलवर रुतलेल्या वेदनेने घेतलेलं हे रूप धोंडय़ा न्हावी या शब्दचित्रातून भेटतं.

पहिल्यांदाच मी जेव्हां सिंगापुरात आलो त्यावेळी रॅफल्सच्या 'लौ-पा-सात' फूडकोर्टात कुठे शाकाहारी अन्न मिळते का म्हणून शोधत होतो पण कुठे मिळेना. माझा एक मित्र इथे येऊन तो कसा मांसाहारी झाला याचे मिश्किल वर्णन करत होता. ते ऐकून मला तिथे विंदा आठवले - "विठ्ठला विठ्ठला, आम्ही अन्नभक्त, आम्हां देवरक्त वर्ज्य नाही”. सकाळ होते आणि दिवस सुरु होतो. घरी परतताना मन मोकळे करायला विंदांच्या ओळी ओठावर येतात- "चिवचिवणारी वाट असावी - दमछाटीची यावी घाटी, घाटीनंतर गडग्यापाशी - पार असावा बसण्यासाठी". नंतर तरीही 'आयुष्य तेच आहे, अन् हाच पेच आहे' असा प्रश्न कैकदा पडतोच. दैनंदिन जीवन तेच असते. गजर वाजून सकाळ होते. साडेआठचे ऑफीस असते. SBS, MRT ची वाट असते. रोज तसलेच मेल, तीच ती कामं. तशीच गात्रं; थकलेली रात्र. दिवस संपतो. वर्ष संपतात. तेव्हांही विंदाच भेटतात- "सकाळपासून रात्रीपर्यंत, तेच ते तेच ते, माकडछाप दंतमंजन, तोच चहा, तेच रंजन”. मध्यंतरी शिल्पा शेट्टी आणि रिचर्ड गिअर यांच्यावरून आपल्याकडे जे रामायण चाललं होतं, त्यावर रास्त प्रतिक्रिया वाटाव्या अशा विंदांच्याच ओळी माझ्याकडे होत्या- "तुझिया ओठांवरचा मोहर मम ओठांवर गळला गं, अन् आत्म्याच्या देव्हार्यातुन गंध मधुर दरवळला गं - चार दिशांच्या चार पाकळ्या चार दिशांना वळल्या ग, विश्वफुलातिल पिवळे केसर, खुणा तयाच्या कळल्या गं". त्यांची 'झपताल' वाचताना गृहिणी डोळ्यासमोर उभी राहते - "ओचे बांधून पहाट उठते, तेव्हांपासून झपाझपा वावरत असतेस".

विंदा करंदीकरांच्या बालकविता ‘अजबखाना’ संग्रहात मी शाळेत असताना वाचल्यात. वाचकाने लहान मूल होऊन त्या वाचाव्यात, आणि प्रौढ होऊन पुन्हा वाचाव्यात. विंदांच्या बालकविता काही वेगळ्याच आहेत. "पंढरपूरच्या वेशीपाशी, आहे एक शाळा - सगळी मुले गोरी, एक मात्र काळा - दंगा करतो फार, खोड्या करण्यात अट्टल - मारायचे कसे? मास्तर म्हणतात, असायचा तो विठ्ठल". ही बालकविता वाचताना गम्मत वाटते ती त्यातील लहान मुलाची तर एकीकडे मास्तरांची भोळीभाबडी मनोवृत्ती देखील दिसून येते. त्यांची आणखीन एक बालकविता - "एक परी, फूलवेडी - फुलासारखी, नेसते साडी- फुलामधून, येते जाते - फुलासारखीच, छत्री घेते- बिचारीला नाही मूल - पाळण्यामध्ये, ठेवते फूल." खूप लहानपणी ही कविता मला परीची वाटली होती. आता याच कवितेतून करुण रस झिरपतो तो यातील शेवटच्या कडव्यात. कवितेचा चक्क अर्थच बदलतो. अगदी साध्यासुध्या 'बिचार्या' शब्दाने काळजात धस्स होते. विंदांच्या कवितेने लहानांपासून ते प्रौढांपर्यंत प्रत्येकालाच काही ना काही तरी दिले आहे….खरे आहे ना?

या जगाचा निरोप घेताना त्यांचे वय ९१ होते. पत्नी सुमाताईंच्या साथीने एक समृद्ध सांस्कृतिक आयुष्य जगलेल्या आणि "बरगड्यांच्या तुरुंगातून, मी हृदयाला मुक्त केले, जिथे जिथे धमनी आहे, तिथे माझे रक्त गेले, सगळे मिळून सगळ्यांसाठी मरण्यातही मौज आहे, सगळे मिळून सगळ्यांसाठी जगण्यातही मौज आहे" अशी जीवनदृष्टी बाळगलेल्या विंदांनी आता या जगाचा निरोप घेतला आहे. मृत्युपूर्वी स्वतःच्या देहदानाची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली असल्याने ते अजरामर झाले आहेत. मराठी कवितेचे हे आनंदवन सदैव बहरलेलेच राहील.

-बी

विषय: 
प्रकार: 

लेख अत्यंत सुंदर आहे.

(रंगीबेरंगीवर मी प्रतिसाद देऊ शकतो की नाही हे माहीत नसताना दिलेला आहे याबद्दल क्षमस्व!)

-'बेफिकीर'!

प्रचंड सुंदर! थेट आतून आणि निखळ प्रामाणिक. विंदांचा मृत्यूलेख न करता 'माझ्या रोजच्या जगण्यातले विंदा' हा तुझा सूर मोहवून गेला.:)

बी, गेल्या काही दिवसां पासून तू उलघडत चालला आहेस, इतका की पानं संपण्याची हुरहुर आत्ता पासुनच.... पानं पानं भरत जा.. मित्रा...!!!

सर्वांचे खूप खूप आभार. मला कळेचना की १३ ला लिहिलेला या लेखाला एकही अभिप्राय का नाही मिळत. आज पहातो तर १७ अभिप्राय. माहित नाही असे का झाले असावे?

लेख खूप आवडला.
पण त्यातुलनेने वर उल्लेख केलेल्या कवितेच्या ओळी तितक्याशा भावल्या नाहीत.
वर उल्लेखीत कवितेतील ओळीबद्दल मला बरेचशे उलगडे व्हायचे आहेत.
पण येथे सहज जरी विचारायला गेलो तरी उत्तर मिळण्यापेक्षा हाणामारीच व्हायची भिती आहे.
त्यामुळे या सुंदर धाग्याचा नूरही पालटू शकतो.
त्यामुळे यथावकाश मी त्यासाठी वेगळा धागा काढेन.