(दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवला हे कळल्यावर मला सुचलेलं काही .....)
पुलंच्या उद्यानात फिरायला गेलो
तर भेटले तिथे दादोजी !
मी म्हणालो,
“दादोजी, अहो, काय झाले ?
हे काय तुमच्या नशिबी आले ?
अर्धी बाही वर करून
वर्षानुवर्षं पाहिले होते
पुस्तकात,
शिल्प म्हणून पाहिले होते
एकदाच ओझरते
लाल महालात,
आणखी कोठे कोठे
तुमची चित्रेच होती पाहिली ..
अहो, त्या काळी तुमच्या,
तुमचे फोटो कुठे होते ?
एक पुतळा उभा केला
त्याला म्हटले दादोजी
पण कल्पनेतले
दादोजी अगदी
तुमच्यासारखेच होते !
अलिकडे, माणसे बोलू लागली,
वाद-विवाद चर्चांमधे
तुम्हाला ओढू लागली,
खरं सांगतो दादोजी,
तुम्हाला होती एक
ब्राह्मण जात
ती तेव्हा आम्हाला कळली ...
आमच्यासाठी तुम्ही
शूर मर्द मराठी मावळा !
महाराजांच्या स्वराज्यातला
नव्हेत डोमकावळा !
तुमचा वेष लढवय्याचा,
ढाल-तलवारीचा ..
बाजीप्रभूंसारखी
तुमची शेंडी नव्हती दिसत,
किंवा त्यात नव्हते जानवे
गागाभट्टाच्या चित्रासारखे,
पुढेपुढे मिरवत !
आमची होती बडबड गाणी
खोट्या घोड्यांवरची ..
शहाजीचा शिवाजी,
शिवाजीचा संभाजी ...
मधेच अचानक
या सगळ्यात
कुठून उपटलात दादोजी ?”
सुस्कार्याने हसत हलके
दादोजी मग म्हणाले ..
“आम्ही कुठले मधे यायला ?
आम्ही आमचे काम केले.
आमचे आमचे जीवन होते
कर्तव्याने निभावून नेले ..
आमच्यानंतर कोणी कोणी
कुठे कुठे काय लिहिले
कुठे कोणी काय भकले,
मार्ग काय कळायला ?
आम्ही कोणीच ओलांडली
नव्हती आमची रेखा !
नव्हत्या आम्हाला अडवत
आमच्या जानव्याच्याही रेघा !
शेंडीपेक्षा आमचा जोर
मनगटातच जास्त होता
खांदा आमचा कोणाच्याही
खांद्यापासून हटत नव्हता ..
अरे, जातीपाती पाहून शत्रू
आम्हाला मते थोडीच देणार होता ?
दादोजीला माहित नाही
पुढे कोण काय म्हणते,
इतकेच होते मह्त्वाचे
महाराज समोर घडत होते
डोळ्यांमधे माऊलीच्या
स्वराज्याचे स्वप्न होते !”
मी म्हटले,“दादोजी,
आता इथेच का मुक्काम ?
कसा आणि किती दिवस ..?”
तर मधेच अडवत दादोजी
पाठ फिरवून चालू लागले,
पुतळा म्हणून ते थिजता-थिजता
शब्द माझ्या कानी आले,
“रामराज्याचा आदर्श बेटा,
ध्यानात कायम असू दे,
धोब्यासाठी राणीसुद्धा
रानावनात हिंडते,
आम्ही साधे नोकरदार
आमची काय कथा ?
नको पुरवू पाठपुरावा
वेळ घालवू वृथा !
आमच्यासाठी नको
करायला कोणीच मिरासदारी !
नको कुठलीच दादागिरी ..
अरे, बिन-संकल्पी भंपक राजे
खूप माजले राज्यात,
अश्या महालात
राहणे नको
उद्यानाची सावली बरी !
लोकापवादाच्या
नजरांपेक्षा
दुपारीची
उन्हे बरी,
डोमकावळ्यांच्या
थुंकीपेक्षा
चिमण्या-कावळ्यांची
विष्टा बरी !”
प्रदीप वैद्य
छान आहे कविता. खरे आहे. याआधी
छान आहे कविता.
खरे आहे. याआधी दादोजी कोंडदेव ब्राह्मण होते का आणखी काही होते हे हा वाद उफाळेपर्यंत मला माहितही नव्हते. तशी गरजही भासली नव्हती.
वैद्य, बर्याच दिवसांनी?
वैद्य, बर्याच दिवसांनी?
>>खरे आहे. याआधी दादोजी
>>खरे आहे. याआधी दादोजी कोंडदेव ब्राह्मण होते का आणखी काही होते हे हा वाद उफाळेपर्यंत मला माहितही नव्हते. तशी गरजही भासली नव्हती.<< खरयं एकदम.
सुंदर कविता. खूप आवडली.
सुंदर कविता. खूप आवडली. दादोजी हे ब्राह्मण होते हे अगदी अलिकडेच समजलं. त्यांची किंवा कोणत्याही थोर व्यक्तीची जात कोणती होती हे समजण्याची कधी आवश्यकताच भासली नाही.
धोब्यासाठी राणीसुद्धा
धोब्यासाठी राणीसुद्धा रानावनात हिंडते...
कविता वाचून गेले २-३ दिवस उद्विग्न असलेले मन जरा शांत झाले... धन्यवाद...
अप्रतिम.
अप्रतिम.
एकदम अप्रतिम. !मोठ्यामाणसा
एकदम अप्रतिम. !मोठ्यामाणसा विषयी आदर असतो.
जातीपातीच्या पुढे असतात ही माणसे
सुंदर कविता !! खूपच
सुंदर कविता !! खूपच भावली..
>>>कविता वाचून गेले २-३ दिवस उद्विग्न असलेले मन जरा शांत झाले
अगदी अगदी... सेम पिंच
झक्कास कविता! [जाताजाता,
झक्कास कविता!
[जाताजाता, माहिती म्हणून सान्गतो, शेन्डी ठेवणे हा प्रत्येक हिन्दूचा अधिकार आहे, केवळ ब्राह्मणान्चा नाही, हां, हल्ली इकडील महाराश्ट्रदेशीचे "सुशिक्षित" वा "अशिक्षित" कुणीच ठेवत नाहीत तो भाग विरळा, पण सहज त्या युपीबिहार्यान्कडे बघा, तुम्हाला बारीकशी तरी शेन्डी दिसेलच! ]
दादोजी कोंडदेव ब्राह्मण होते
दादोजी कोंडदेव ब्राह्मण होते हे मला तरी लहानपणापासून माहीत होते कारण घरात असलेले आर एस एस चे वातावरण असावे! हा वादही मला आधीपासून ज्ञात होता.
पण तो अशा पातळीला पोचेल हे वाटले नव्हते. दादोजी कोंडदेवांचे अस्तित्व व महत्व नाकारण्यात अर्थच नाही.
कवितेतील भावना स्पष्टपणे व तीव्रपणे पोचल्या.
दादोजींचा पुतळा कचर्याच्या गाडीतून नेण्यात आला. मग ते जर असे असते तर महाराजांनीच त्यांना हाकलून दिले असते ना!
ब्राह्मणांना तलवारबाजीत फारशी दिलचस्पी नसते, ते प्रवृत्तीने सहसा मुजोर, आक्रमक व अरेरावी करणारे नसतात या गोष्टीचा बर्यापैकी फायदा घेतला गेलेला आहे असे वाटते.
कोंडदेव की जिजाउ, रामदास की तुका, अशावरून आज रक्त सांडतो अम्ही
बायका धुणी धुतात, पोरटी जुगार खेळतात, हे अम्हास बेमिसाल वाटते...
असो, कविता, चर्चा व वादावादी करून हे उपद्व्याप थांबतील असे नाहीच! आगे आगे देखिये होता है क्या - इतकेच मनात आले.
-'बेफिकीर'!
अ प्र ति म..!
अ प्र ति म..!
ब्राह्मणांना तलवारबाजीत फारशी
ब्राह्मणांना तलवारबाजीत फारशी दिलचस्पी नसते.. हे मात्र १७ व्या शतकापासून बदललेले आहे बर का...
८ पैकी ६ अष्टप्रधानांना युद्ध - युद्धादि प्रसंगाला गरजेनुसार जाणे हे त्याच्या पदाच्या जबाबदारीमध्ये समाविष्ट होते.
त्यातून फ़क्त पंडितराव आणि न्यायाधीश यांना वगळण्यात आले होते.
ओके. पेशवेही होतेच आणि!
ओके.
पेशवेही होतेच आणि! मान्य आहे.
(पण मला असे म्हणायचे होते की सामान्यतः तशी प्रवृत्ती नसते ब्राह्मणांची! )
वैद्यसाहेब, मुजरा स्विकारा
वैद्यसाहेब, मुजरा स्विकारा
बरोबर बेफिकिर, सामान्यतः तशी
बरोबर बेफिकिर, सामान्यतः तशी प्रवृत्ती, वा शक्यतो "हातघाईस" येण्याची वृत्ती नसते, अन तुम्ही म्हणता तस म्हणूनच इतरान्चे फावते.
अर्थात, वृत्ती असली, वा आहे ते सूप्त क्षात्रतेज "कुणाविरुद्ध" जागृत करायचे व कुणाविरुद्ध कदापीही नाही याचे भान ब्राह्मण समाजाने कायमच ठेवले आहे, ठेवेलही.
एकदम बढिया गड्या
एकदम बढिया गड्या
उत्तम कविता, आवडली.
उत्तम कविता, आवडली.
आवडली कविता. भावनाही थेट
आवडली कविता. भावनाही थेट पोहोचल्या.
खरंतर मायबोली या ठिकाणाचा
खरंतर मायबोली या ठिकाणाचा कंटाळा आला होता म्हणून इथे काही लिहिलं नव्हतं, भरतजी, पण हे काहीतरी असं मनात आलं की ते जास्त लोकांपर्यंत पोहोचणं महत्वाचं वाटलं .. म्हणून इथे लिहिलं .. असो ..'बेफिकीर साहेब' मी जन्माने ब्राह्मण असलो तरीही ब्राह्मण्याचा अभिमान वगैरे अजिबातच नाही, पण अन्य काही जणांनी इथे नमूद केल्याप्रमाणे, मला एखादी व्यक्ती कर्तृत्वाने थोर असण्याचाच अभिमान पुरेसा वाटतो .. तसा तो दादोजींविषयी होता आणि तितकंच पुरेसं होतं .. पण कोणाकडेही ठोस असा पुरावा नसताना आपण कोणीही या राजकारणात कोणत्याही बाजूने बोलणं मूर्खपणाचं ठरेल .. हा मूर्खपणा (खरंतर, धूर्तपणा) राजकारणी करत आहेत .. मला वाटतं की भावनिक पातळीवरची माझी कुतरओढ नमूद करणे हा माझा कविता सुचण्या-लिहिण्या मागचा उद्देश असावा .. आणि ही प्रतिक्रिया ही तुम्हा कोणाचं मत खोडण्याचा नव्हे तर माझ्या भूमिकेचा उहापोह करण्यासाठी आहे.
लिंबूटिंबू .. इथे शेंडी हा अधिकार म्हणून नाही तर प्रतिक म्हणून वापरलेला प्रकार .. सर्व ब्राह्मणेतर हिंदूच्या हक्कांची जाणीव अबाधित ठेवूनच !
असो .. या माझ्या लेखनाने इतक्या जणांच्या आत काहीतरी छेडलं गेलं हे पाहून बरं वाटलं .. बाकी .. दादोजींना महालात ठेवणारे नि तिथून बाहेर काढणारे लोकशाही व्यवस्थेत तरी ''आपणच'' असतो ह्याचा मला तरी विसर पडलेला नाही ...
तरी .. सर्वांचे आभार .. आणि नव्या इंग्रजी वर्षाच्या शुभेच्छा !
कविता आवडली. नविन वर्षाच्या
कविता आवडली.
नविन वर्षाच्या समस्त माबोकरांना शुभेच्छा.
नुतन वर्षाभिनंदन.
येत्या वर्षी तुमच्यावर अशीच
येत्या वर्षी तुमच्यावर अशीच कविता बाजीप्रभुंवर लिहायची वेळ येणार नाही , अशी आशा बाळगुया.
मला वाटतं नाहीच येणार तशी वेळ
मला वाटतं नाहीच येणार तशी वेळ विप्रा ... मला आता अलिकडे इतिहासामधे काहीही रस वाटेनासा होऊ लागला आहेच ..ज्याने त्याने आपल्याला सोयीच्या दिशेने आणिस्वतःचं उदात्तीकरण करत कोणताही इतिहास रंगवायचा आणि आत्ता (वर्तमानात) अत्यंत भंपकगिरी करत सुटायचं हा आपल्या आजूबाजूला बोकाळलेला मंत्र मला इतिहासापासून दूर दूरच नेत चालला आहे ..
मला वाटतं की भावनिक पातळीवरची
मला वाटतं की भावनिक पातळीवरची माझी कुतरओढ नमूद करणे हा माझा कविता सुचण्या-लिहिण्या मागचा उद्देश असावा ..
हीच तर कविता. व्यक्त व्हायला कवितेसारखी जिवाभावाची मैत्रीण नाही दुसरी..
वैद्य, अप्रतिम कविता. अगदी
वैद्य, अप्रतिम कविता. अगदी सत्य आणि यथार्थ कविता. फार आवडली. ' शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव नाहीत' असले असत्य शोध लावत बसण्यापेक्षा, समाजासाठी करण्यासारखी अनेक कामे आहेत. ती कामे या लोकांनी केली तर काही तरी सत्कृत्य तरी होईल. उगीचच सगळीकडे अशांतता निर्माण करायची. रिकामपणाचे उद्योग.
अप्रतिम... अगदी पोहचल्या
अप्रतिम... अगदी पोहचल्या तुमच्या भावना. आणि पटल्याही
समाजासाठी करायची कामे न
समाजासाठी करायची कामे न करण्यावरून समाजाचं लक्ष उडावं म्हणून धर्म, जात या अफूचा वापर राजकारणी सातत्याने करत आले आहेत .. आणि म्हणूनच तर यांच्या या जनतेसाठीच्या राजकीय भूलभुलैयांच्या मार्गाने न जाणारे आणि केवळ स्वतःच्या कर्तव्यावर आणि कर्तृत्वावर पुढे पुढे दौड करणारे शिवाजी सारखे राजे आणि त्यांचे शिलेदार हे महान ठरवले जातात ..
ह्म्म .. जातीचे राज्कारण
ह्म्म .. जातीचे राज्कारण आताच्या युगात करून काय मिळवणार आहेत कुणास ठावे...
अप्रतिम कवीता!!! झाला तो
अप्रतिम कवीता!!!
झाला तो प्रकार वाईटच आहे. भावनेचा आधार घेऊन माणसे खर्ची घालणारे राज्यकर्ते पुन्हा एकदा उधडे झाले. दंगलीचे प्लॅनिंग निलम गोर्हे आणि नार्वेकराने केले होते ही बातमी ऐकली तेव्हा तर पाकिस्तानी दहशतवाद्यांपेक्षा देशातल्या राजकीय गुंडांचाच धोका अधिक असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. दोघांचाही निषेध!!!
उत्तम . या निमित्ताने का
उत्तम .
या निमित्ताने का होईना दादोजींबद्द्ल लोकांना माहिती होते आहे हे ही नसे थोडके.
आणि समंजस लोक विचार करुनच याचा विचार करतिल यात शंका नाही.
ह.बा., निलम गोर्हे आणि
ह.बा., निलम गोर्हे आणि नार्वेकरांचा मला काहीही विशेष पुळका वगैरे नाही .. नक्कीच नाही .. पण मग इतर सर्व संघटनांनी आजवर केलेली अशी हिंसक आंदोलनं ही अत्यंत उत्स्फूर्त होती आणि या दोघांनीच काय तो ''दहशतवाद्यांपेक्षा भयानक म्हणता तो कट'' केला या भ्रमात किंवा बाळबोध (साहजिक असो, अज्ञानातून असो किंवा जाणून बूजून पांघरलेल्या अश्या कोणत्याही प्रकारतून हे असेल) ही सूट इतर राजकारण्यांनाही देता येणं मला कठीण वाटतं .. आत्ता त्रास हाच आहे की कोणाच्याच निष्ठा आणि प्रामाणिकपणाविषयी खात्रीशीर रित्या काहीच बोलता येत नाही ... त्यामुळे कविता करून भावना व्यक्त करण्यापलिकडे (मतदानानंतर ...) मला तरी फारशी वाट दिसत नाही .. पण परिस्थितीकडे मात्र आपण फक्त नीट पाहू लागणं फार गरजेचं वाटतं ..
Pages