आमचा एंजल

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

५-६ दिवसांपूर्वी लेकाच्या शाळेतून डायरीवर नोट आली, २४ तारखेला मुलांना सांताक्लॉज, एंजल, फेयरी यापैकी एका वेशभुषेमध्ये पाठवावे.
तर आज एंजलच्या वेशभुषेत आयाम शाळेत गेला होता. त्यासगळ्याची ही कृती.

सर्वात आधी २२ तारखेला पुपुवर चर्चा सुरु केली. बरेच वेगवेगळे सल्ले मिळाले. त्यातला रैनाने सुचवलेला रिसायकल कपड्यातून सरळ सोप्पा सांताक्लॉज बनवण्याचा पर्याय सगळ्यात सोप्पा वाटला. तरीही त्याकडे दूर्लक्ष केलं. नीरजा, प्राची आनि इतरांनी एंजल बनण्यासाठी काय काय साहित्य लागेल हे सांगितल्यावर घरात असलेल्या साहित्य शोधून ठेवलं. नसणार्‍या वस्तूंसाठी पर्यायी काय वापरता येईल याचा अंदाज घेतला.

नीरजाने सांगितलेले साहित्य : पांढरा सॅटीनचा डगला, पोटावर बांधायला सोनेरी दोरी, चंदेरी रंगाचे किंवा पांढर्‍या पिसांचे पंख, डोक्यावर फुलांची रिथ (हा काय प्रकार आहे हे माहित नसल्याले सरळ गुगलबाबाला शरण जावून फोटो बघून घेतले. ), हवे असल्यास हातात हार्प

सांगितलेल्या साहित्यापैकी कोणतेच साहित्य घरात असण्याची शक्यता नव्हती म्हणून पर्यायी साहित्यासाठी घरातले सगळ्यांचे पांढरे कपडे काढून ठेवले.
थंडी असल्याने पोराला डगल्याच्या आत घालायला पांढरे गरम कपडे सगळ्यात पहिल्यांदा सापडले.

सॅटिनचा डगला मिळणं अवघड आहे हे लक्षात आल्यावर स्वतःचे पांढरे टॉप पोराला घालून बघितला. पण त्याला अंगात नीट बसणार्‍या आपल्या टॉपवर बरेच डाग आहेत हे लक्षात आलं की परत दुसरे कपडे शोधायला सुरवात केली . हे शोधताना नवर्‍याचा एक पूर्ण बाह्यांचा पांढरा टी शर्ट मिळाला, ज्याच्या बाह्या लहान केल्यास चांगला डगला होवू शकतो असं वाटलं. स्वतःच्या शिवण कौशल्यावर पूर्ण विश्वास असल्याने, बाह्या लहान करण्याचे काम कामवालीला सांगितलं.

संध्याकाळी नवरा घरी आल्यावर त्याला हे सगळं दाखवल्यावर त्याने त्याच्याकडे एक अर्ध्या बाह्यांचा (मीच आणलेला) पांढरा टी शर्ट आहे, तो शोध असं सांगितलं. मग परत शोधाशोध सुरु. उन्हाळ्याचे कपडे ब्यागांमध्ये भरून ठेवल्यामूळे सगळ्या ब्यागा काढून तो हवा असलेला पांढरा टी शर्ट शोधला. नशिबाने तो अगदी स्वच्छ होता.

दुसर्‍या दिवशी २३ तारखेला दूपारी बाजारात इतर सामान आणायला गेले. एंजलसाठी पंख तयारच मिळतिल असं वाटलं होतं. पण बाजारात फक्त आणि फक्त सँटाचे ड्रेसच होते. त्यातलाच एक विकत घ्यायचा मोह होत होता. पण एंजलच बनवायचय असं ठरवल्यामूळे पंख बनवण्यासाठी थर्माकोलचं एक शीट आणि २ चंदेरी रंगाचे कागद एवढच सामान घेवून घरी आले.

संध्याकाळी नवरा आल्यावर बाकीचं काम करु आणि गरज पडल्यास अजून एक चक्कर बाजारात मारू असा विचार केला होता. पण अचानक दूपारी नवर्‍याचे २-३ मित्र रात्री जेवायला येणार असल्याचे कळाले. संध्याकाळचा सगळा वेळ पाहूणे, स्वैपाक, गप्पा-टप्पा असा गेला.

पाहूणेमंडळी गेल्यावर रात्री १० वाजता नवर्‍याने काय करायचंय असं विचारल्यावर त्याला अंदाजे प्लान सांगितला. डोक्यावर ठेवायला रीथ कसं बनवावं याचा अजूनही अंदाज आला नव्हता.
मूळात आयुष्यात आम्ही दोघांनीही थर्माकोल या प्रकाराला कधीही हात लावला नव्हता. थर्माकोल कसा कापतात, कश्याने चिटकवतात याचा काहीही अंदाज नसताना मी थर्माकोलचे पंख बनवायचे कसे काय ठरवले कोण जाणे ?

शेवटी माझ्या कापणे चिटकवणे इ च्या क्षमतेचा नवर्‍याला पूर्ण अंदाज असल्याने त्याने, स्वतःच कागदावर दोन पंख कापले. ते पंख थर्माकोलच्या शीटवर ठेवून सुरीने थर्माकोलचे पंख कापले. पंखांवर चंदेरी कागद चिटकवताना माझ्या लक्षात आले, की मी कागद एकाच बाजूने पंखांना पुरेल इतका आणलाय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरात असलेल्या फेव्हिकॉलच्या तिन्ही ट्युब रिकाम्या आहेत. मग त्या रिकाम्या ट्युब दाबून दाबून जितका फेव्हिकॉल निघेल तितक्यानेच कागद एकाच बाजूने पंखांवर चिटकवला.

मी हे चिटकवण्याचं काम करेपर्यंत नवर्‍याने घरातल्या दोन डब्ब्यांची झाकणं घेवून ती थर्माकोलवर दाबून एक गोल रींग तयार केली होती. पण त्या रींगवर चिटकवायला पुरेसा चंदेरी कागद आणि फेव्हिकॉल नव्हता. मग घरात पूर्वी कृष्ण बनवताना आणलेल्यापैकी उरलेल्या सोनेरी लेसचे दोन तुकडे केले. एक तुकडा पोटावर बांधायला ठेवला. तर दूसर्‍याचे अजून लहान लहान तुकडे करून ते तुकडे फेव्हिकॉल आणि स्टेपलर अश्या दोन्हींच्या सहाय्याने झिरमिळ्यांसारखे रिंगवर लावले.

हार्प बनवण्यासाठी मात्र आम्हा दोघांकडे सामान आणि पेशन्स दोन्ही उरलं नव्हतं. तरीपण उगिचच थर्माकोलवर एक "डी" आकार कापून नवर्‍याने त्याला स्केचपेनने रंगवले.

एव्हाना रात्रीचे ११.३० झाले होते. ते पंख एकमेकांना कसे चिटकवायचे आणि नंतर आयामच्या खांद्यावर कसे चढवायचे हे काही मला समजत नव्हते. मग नवर्‍यानेच टुथपिक्सनी ते दोन्ही पंख एकमेकांना चिटकवले. माझ्याकडच्या एकमेव फाटलेल्या पांढर्‍या स्टोलनी ते पंख आयामच्या खांद्यावर बांधता येतिल हे लक्षात आल्यावरच एंजल बनवण्याची तयारी संपली.
हे एंजलची तयरी करतानाचे फोटो.

step 1.JPG
हा तयारीच्या आधी
step 2.JPG
टि शर्ट घातल्यावर
step3.JPG
शर्टवर सोनेरी लेस बांधून
angel.JPG
आणि हे आमचं फायनल प्रॉडक्ट.

(एंजलसाठी रात्री पंख बनवण्याचं काम चालू असताना अचानकच आमच्या लेकराने मै कल सँटाक्लॉज बनूंगा असं डिक्लेअर करून आमच्या मेहनतीवर पाणी फिरवायचा प्रयत्न केला होता)

आत्ताच आयाम शाळेतून आलाय. मुझे प्राइज मिला सांगत. त्याला पहिलं बक्षिस मिळालं म्हणे. Happy

प्रकार: 

अगं कित्ती गोड दिसतोय एंजल! अभिनंदन अल्पना!!
किती ऑर्गनाइज्ड आहात तुम्ही ! किती छान प्लॅनिंग करून तयारी करून वर पहिला नंबर!

सगळ्यांना खूप धन्यवाद. Happy
आज शाळेत सगळ्या मुली पर्‍या होत्या आणि मुलं सँटा. मुलांमध्ये सँटा नसलेले दोघंच होते. आयाम एंजल आणि अजून एक समोर रहाणारा छोटा सरदार परी झाला होता.

ए कसला गोडुला आहे हा एंजल! आयामचं आणि त्याला एंजल बनविण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या तुमचं अभिनंदन! Happy

Pages