सप्त शिवपदस्पर्श : भाग ५ - रायगड... !

Submitted by सेनापती... on 19 December, 2010 - 21:39

सप्त शिवपदस्पर्श : भाग १ - पुरंदर - वज्रगड - सिंहगड ... !
सप्त शिवपदस्पर्श : भाग २ - राजगड ... !
सप्त शिवपदस्पर्श : भाग ३ - तोरणा ...
सप्त शिवपदस्पर्श : भाग ४ - बोराट्याची नाळ ... !

दिवस ८ -

खरतर कालरात्रीच रायगड गाठायचा होता. मात्र बोराटयाच्या नाळेबाहेर पडेपर्यंत खुपच उशीर झाल्याने पाने गावत मुक्काम करावा लागला होता. आज मात्र सकाळी-सकाळीचं चहा-नाश्ता घेउन आम्ही आमचा मुक्काम हलवला आणि आमच्या मोहिमेचा शेवटचा शिवपदस्पर्श अनुभवण्यासाठी रायगडाकड़े कूच केले.


रायगडाचा विस्तार - डावीकडे भवानी कडा तर उजवी कडे टकमक टोक...

गावामधून बाहेर पडलो. थोडसं मोकळ माळरान आणि डाव्याबाजूला नदीकाठी सगळी शेती होती. काळ नदी पाने गावाला वळसा मारत रायगडाकड़े सरकते. काल गावात यायला जशी नदी पार करावी लागली होती तशी आता पुन्हा पार करून रायगडाजवळ सरकायचे होते. नदीला पाणी तसे कमीच होते. आरामात पार करून गेलो. समोर रायगडाचा अखंड भवानी कडा दिसत होता. उजव्या हाताला दूरवर टकमक टोक दिसू लागले होते. त्या दिशेने जात चित्त दरवाजा गाठायचा असल्याने आता वाट चूकायचा प्रश्न नव्हता. गावापासून निघून तास होउन गेला होता आणि उजव्या बाजूला थोड खाली छत्री निजामपुर गाव दिसू लागले होते. डाव्या बाजूला पूर्ण जंगल होते. त्यात शिरून वाट शोधत-शोधत जाण्यापेक्षा आम्ही थोड लांबून वाट काढत-काढत जात होतो. या ठिकाणी आता एक धरण होत आहे. काळ नदीचे पात्र आता रुंद होइल आणि ह्या मार्गाने रायगड पुन्हा गाठता येइल का प्रश्नच आहे. आसपासच्या भागातल्या लोकांसाठी ही चांगली गोष्ट असली तरी ट्रेकर्सना आता वेगळा मार्ग शोधावा लागेल हे नक्की.(सध्या येथे काय परिस्थिती आहे कोणी सांगू शकेल का?) मजल-दरमजल करत आम्ही आता रायगडवाडीला पोचलो होतो. मागे दुरवर लिंगाणा आणि रायलिंगाचे पठार अजूनही दिसत होते.

रायगडवाडी मध्ये पोचलो तेंव्हा ११ वाजत आले होते. जरा दम घेतला आणि थेट चित्त दरवाजा गाठला. चित्तदरवाजापासून आम्ही रायगड चढायला सुरवात केली.

******************************************************************************************
किल्ले रायगड ... स्वराज्याची दूसरी राजधानी ... अनेक आनंदाचे आणि वाईट प्रसंग ज्याने पाहिले असा मात्तबर गड ... त्याने पाहिला भव्य राजाभिषेक सोहळा आपल्या शिवाजी राजाला छत्रपति होतानाचा ... पाहिले शंभूराजांना युवराज होताना ... मासाहेब जिजाऊँचे दू:खद निधन सुद्धा पाहिले ... शिवरायांचा दक्षिण दिग्विजय पाहिला ... रामराजांचे लग्न पाहिले ... शिवरायांच्या अकाली निधनाचा कडवट घास सुद्धा पचवला त्याने ... त्याने पाहिले शंभूराजांचे वेडे धावत येणे ... अश्या अनेक घटनांचा साक्षीदार असलेला किल्ले रायगड ...
******************************************************************************************

चित्तदरवाजावरुन वर चढून गेलो की लगेच लागतो तो खूबलढा बुरुज. आता इकडून वाट चढायची थांबते आणि कड्याखालून डाव्या बाजूने पुढे जात राहते. पहिल्या चढावर लागलेला दम इकडे २ क्षण थांबून घालवावा. आता वाट डावीकड़े वळत पुढे जात राहते. ह्याच्या अगदी बरोबर वरती आहे हिरकणी बुरुज. पुढच्या चढाच्या पायऱ्या सुरु व्हायच्या आधी उजव्या हाताला झाडाखाली एक पाण्याचा झरा आहे. थोड़े पुढे सरकले की ज्या पायऱ्या सुरु होतात त्या गडावरच्या होळीच्या माळा पर्यंत संपत नाहीत. पायऱ्या चढत अजून थोड़े वर सरकलो की आपल्याला वरच्या बाजूला २ महाकाय बुरुज दिसू लागतात.

त्या २ बुरुजांमध्ये लपलेला गडाचा दरवाजा मात्र अगदी शेवटपर्यंत कुठूनसुद्धा दिसत नाही अशी गोमुखी प्रवेशरचना केलेली आहे. रामचन्द्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात किल्ल्यांच्या रचनेवर लिहिल आहे, "दरवाजे बांधावे ते खालील मारा चुकवून, पुढे बुरुज देउन. येतिजाती मार्ग बुरुजांचे आहारी पडोन दरवाजे बांधावे." कधी उजवीकड़े तर कधी डावीकड़े वळणाऱ्या पायऱ्या चढत-चढत आपण महादरवाजाच्या अगदी खालच्या टप्यामध्ये पोचतो. गडाचे 'श्रीगोंदे टोक' ते 'टक-मक टोक' अशी पूर्ण तटबंदी आणि त्या मधोमध २ तगडया बुरुजांच्या मागे लपलेला महादरवाजा असे दृश्य आपल्याला दिसत असते. आता कधी एकदा आपण स्वतःला त्या दृश्यामध्ये विलीन करतोय असे आपल्याला वाटत राहते.

शिवरायांनी निर्मिलेल्या किल्ल्यांचे एक वैशिष्ट्य मुख्य प्रवेशद्वाराशी येणारी वाट. ती नेहमी डोंगर उजवीकड़े ठेवून वर चढ़ते. कारण द्वाराशी होणारी हातघाईची लढाई भाले, ढाल-तलवार व फारतर धनुष्य-बाण याने होत असे; त्यात जास्त प्रमाणात उजवे असलेल्या लोकांच्या डाव्या हातात ढाल असे व उजव्या हातात फ़क्त तलवार घेउन उजव्या बाजूने होणारा मारा टाळण्यासाठी अधिक प्रयास करावा लागे. म्हणजेच वाट नियोजनपूर्व आखली तर शत्रूला अधिक त्रासदायक ठरू शकते. पुढे दोन बुरुजांच्या कवेने चिंचोळ्या वाटेने आत गेले की दरवाजा समोर येत असे. ह्या ठिकाणी लढाईला फार जागा नसे व शत्रुवर वरुन चारही बाजूने तूटून पड़ता येत असे. जरी कोणी यातूनही आत शिरलाच, तरी पुढचा मार्ग सुकर नसे कारण महादरवाज्यातून आत शिरले की वाट ९० ते १८० अंशात डावीकड़े वळत असते. तिथून वाचून पुढे जाणे अगदीच अशक्य. शिवाय किल्ल्याचे १/३ चढण चढणे बाकी असते ते वेगळेच.(संदर्भ - अथातो दुर्गजिज्ञासा - प्र.के.घाणेकर.)

हूश्श्श् करत आपण अखेर २ बुरुजांमध्ये पोचतो आणि समोरचा महादरवाजा बघून थक्क होतो. दरवाजा भले नक्षिदार नसेल पण आहे जबरदस्त भक्कम. बांधकाम बघून असे वाटते की आत्ताच काही दिवसांपूर्वी बनवलेला आहे की काय. अगदी बरोबर दरवाजामध्ये थंड वाऱ्याचे झुळुक येत राहतात. शिवरायांनी निर्मिलेल्या किल्ल्यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे रायगड़, प्रतापगड़, राजगड़ यांचे महादरवाजे किल्ल्यांच्या एकुण उंचीच्या २/३ उंचीवर आहेत. दरवाजा पडला तरी पुढच्या चढाईवर किल्ला लढवायला पुरेशी जागा उपलब्ध होई. सिंहगड़, पन्हाळा या त्या आधीच्या किल्ल्यांमध्ये तशी रचना नाही.

हे दुर्गबांधणीचे शास्त्र बघत महादरवाजामधून प्रवेश केला की उजव्या बाजूला देवडया दिसतात. देवडया म्हणजे द्वाररक्षकांना बसण्यासाठी कायम स्वरूपी बांधलेली जागा. पुढे गेलो की पुढची वाट ९० ते १८० अंशात डावीकड़े वळते. अजून थोड़े पुढे गेलो की लगेच डावीकड़े महादरवाजाच्या वर जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. तिकडून खालचे अप्रतिम दृश्य दिसते. आता पुन्हा मागे खाली येउन पुढची वाट धरली की पुन्हा वळणा-वळणाचा चढता रस्ता लागतो. वाट पुढे जाउन परत उजवीकड़े आणि परत डावीकड़े वळते. त्या मध्ये पुन्हा बुरुज आहेत. त्याच्यावरचे बांधकाम पडले असले तरी त्याच्या पायावरुन सहज अंदाज बांधता येतो. येथून पुढे काही अंतर वाट सपाट आहे आणि मग तिसरा आणि शेवटचा चढ. तो पार करताना अक्षरश: दम निघतो. महत्प्रयासाने महादरवाजा जिंकल्यानंतर शत्रूला चढताना अधिक बिकट व्हावे अशी ही बांधणी आहे. ह्या चढत्या मार्गावरुन महादरवाजाचे सुंदर दृश्य दिसते.

सर्व पायऱ्या चढून गेलो की लागतो हत्ती तलाव आणि त्या मागे जे दिसते ते मन मुग्ध करणारे असते. गंगासागर जलाशयाच्या पार्श्वभूमीवर असलेली राजवाडयाची प्रशत्र भिंत आणि अष्टकोनी स्तंभ. ती पाहत आम्ही जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेत पोचलो. आजचा मुक्काम इकडेच होता. सरपण जमा केले आणि जेवणाच्या तयारीला लागलो. तितक्यात कळले की सुरेश वाडकर गडावर आहेत. (गायक नव्हे बर का.. 'रायगड किले अभ्यासक सुरेश वाडकर' ज्यांनी रायगड त्यावेळी ५०० पेक्षा जास्त वेळा पाहिला होता. आता बहुदा १००० पूर्ण केले असतील त्यांनी.) जेवण आवरून गड बघायला निघालो.

आधी आम्ही होळीच्या माळावर पोचलो. छत्रपति शिवरायांचा सिंहासनाधिष्टित पुतळा रायगडावर १९७४ साली राजाभिषेकाची ३०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल येथे बसवला गेला. खर तर तो बसवायचा होता सिंहासनाच्या जागीच, पण पूरातत्वखात्याचे काही नियम आडवे आणले गेले. आप्पा उर्फ़ गो. नी. दांडेकरांच्या 'दुर्गभ्रमणगाथा' पुस्तकामध्ये त्याबद्दल मस्त माहिती दिली आहे. आज दुर्दैव असे की ऊन-वारा-पावसामध्ये हा पुतळा उघड्यावर आहे. या भारतभूमीला ४०० वर्षांनंतर सिंहासन देणारा हा छत्रपति आज स्वता:च्या राजधानीमध्ये छत्राशिवाय गेली ३५ वर्षे बसला आहे. हा आपला करंटेपणा की उदासीनता ??? मनातल्या मनात राजांची क्षमा मागत मुजरा केला आणि मागे वळून चालू लागलो.

होळीच्या माळावर उजव्या बाजूला गडाची देवता शिर्काईचे मंदिर आहे. देवीची मूर्ती दशभुजा असून आजही दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला गडावर देवीचा उत्सव भरतो. अंबारखाना म्हणुन ओळखली जाणारी वास्तु आज पूरातत्वखात्याचे कार्यालय म्हणुन बंद केली गेली आहे. पुतळ्यासमोरून एक प्रशस्त्र रस्ता गडाच्या दुसर्‍या बाजूस जातो. ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन ओळीत एकामेकांना जोडून एकुण ४३ बांधकामे आहेत. एका बाजूला २३ तर दुसऱ्या बाजूला २४. ह्याला आत्तापर्यंत 'रायगडावरील बाजारपेठ' असे म्हटले गेले आहे. त्यात आहेत एकुण ४७ दुकाने. जुन्या पुस्तकांमध्ये असे म्हटले आहे की, 'घोडयावरुन उतरायला लागू नये म्हणून दुकानांची जोते उंच ठेवले गेले आहेत.' पण ते संयुक्तिक वाटत नाही. कारण राजधानीच्या गडावर हवी कशाला धान्य आणि सामान्य बाजारपेठ ??? खाली पाचाडला आहे की बाजारपेठ. त्यासाठी खास गडावर श्रम करून यायची काय गरज आहे? शिवाय गडावर येणाऱ्या माणसांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार तो वेगळाच. ही सलग असलेली ४७ बांधकामे 'नगरपेठ' म्हणता येतील.

स्वराज्याचे सुभेदार, तेथील महत्त्वाचे अधिकारी, लष्करी अधिकारी, सरनौबत - सरदार, वकील, इतर राजांचे दूत आणि असे इतर विशिष्ट व्यक्तिं ज्यांचे गडावर तात्पुरते वास्तव्य असते अश्या व्यक्तिंसाठी राखीव घरे त्यावेळी बांधली गेली असावीत. (संदर्भ - अथातो दुर्गजिज्ञासा - प्र.के.घाणेकर.) प्रत्येक घर ३ भागात विभागले आहे. पायऱ्या चढून गेले की छोटी ओसरी, मग मधला बैठकीचा भाग, आणि मागे विश्रांतीची खोली. दोन्ही बाजुस १५ व्या घरानंतर पाण्याच्या निचऱ्यासाठी मोकळी जागा सोडली आहे. गडावर पडणाऱ्या पावसाचा पूर्ण अंदाज घेउनच हे बांधकाम केले असल्याने जोत्यांच्या उंचीचा संबंध घोडयावरुन खरेदी असा लावला गेला आहे.

डाव्या बाजुच्या ९व्या आणि १०व्या घराच्या मधल्या भिंतीवर मात्र शेषनागाचे दगडी शिल्प आहे. ह्या बाबतीत १-२ ऐतिहासिक घटना आहेत. पण नेमक प्रयोजन अजून सुद्धा कळत नाही आहे. आता आम्ही नगरपेठेच्या उजव्या बाजूला चालू लागलो. समोर दिसत होता श्री जगादिश्वर मंदिराचा कळस. उजव्या बाजूला खाली दूरवर १२ टाकी आणि वाघ दरवाजाकड़े जायचा मार्ग आहे.

श्री जगादिश्वर मंदिराच्या दरवाजामधून प्रवेश करते झालो. मंदिराचे प्रांगण प्रशत्र आहे. डाव्या-उजव्या बाजूला थोडी वर सपाटी असून बसायला जागा बनवली आहे. मुख्यप्रवेशद्वार अर्थात उजव्या दिशेने आहे. दारासमोर सुबक कोरीव नंदी असून आतमध्ये एक हनुमानाची मूर्ती आहे. मंदिर आतूनसुद्धा प्रशत्र आहे. आम्ही सर्वजण काही वेळ आतमध्ये विसावलो आणि मंदिर समोरील पूर्वेकडच्या बाजूला असणाऱ्या भागाकडे निघालो.

मंदिरामधून समाधीकड़े जाताना एक पायरी उतरून आपण खाली उतरतो त्या पायरीवर लिहिले आहे. 'सेवेचे ठाई तत्पर.. हीरोजी इंदळकर..' ज्याने बांधला रायगड तो हा हीरोजी. खासा गड बघून राजे खुश झाले तेंव्हा त्यांनी हिरोजीला विचारले,''बोल तूला काय इनाम हवे?'' हीरोजी म्हणाले, ''काही नको स्वामी. मंदिरामधून तुमचा उजवा पाय बाहेर पडेल त्या पायरीवर माझे नाव लिहावे.''

'श्री शिवछत्रपतींची समाधी' अष्टकोनी समाधी १९२४-२५ साली बांधली गेली आहे. १९७४ मध्ये छत्रपति शिवरायांचा सिंहासनाधिष्टित पुतळा रायगडावर बसवला तेंव्हा समाधीवर जलाभिषेकाचा कार्यक्रम केला गेला. अनेक शिवप्रेमी आणि दुर्ग प्रेमींनी ३०० वेगवेगळ्या किल्ल्यांमधून पाणी आणून समाधीवर आणि सिंहासनाच्या जागी पुन्हा अभिषेक केला होता. त्याची सुद्धा गोष्ट 'दुर्गभ्रमणगाथा' मध्ये आवर्जुन वाचावी अशी आहे. आम्ही राजांच्या समाधीला मनोमन वंदन केले. राजे म्हणजे खरेखुरे दुर्गस्वामी. त्यांचा जन्म दुर्गावर झाला. आयुष्यामधील ७/८ आयुष्य त्यांनी दुर्गांवर व्यतीत केले आणि अखेर त्यांची जीवनयात्रा दुर्गावरतीच समाप्त झाली.

**********************************************************************************************************
डग्लस म्हणतो,"शिवाजीचे वास्तव्य डोंगरी मुलुखातच होते व त्याचे सामर्थ्य डोंगरी प्रदेशाच्या भरवश्यावरच होते. तो ख़राखुरा दुर्गस्वामी होता. त्याचा जन्म दुर्गात झाला. त्याला जे वैभव प्राप्त झाले ते दुर्गांच्यामुळे आणि त्याच्या दुर्गांना जे सामर्थ्य प्राप्त झाले तेही त्याच्याच प्रयत्नाने झाले. त्याचे दुर्ग म्हणजे भारतातील त्याच्या शत्रूंना धाक होता. त्याच्या राष्ट्राची ती संवर्धनभूमी होती. त्याच्या विजयाचा तो पाया होता. त्याच्या वाढत्या महत्वाकांक्षेचा तो जिना होता. दुर्ग हेच त्याचे निवासस्थान व तेच त्याच्या आनंदाचे निधान होते. कित्येक दुर्ग त्याने स्वतः बांधले आणि जे आधी बांधलेले होते, त्यासर्वांना त्याने बळकटी आणली."
**********************************************************************************************************

समाधी परिसर अत्यंत पवित्र आणि प्रसन्न आहे. उजव्या बाजुच्या भिंतीवर हीरोजी इंदळकर यांचा शिलालेख आहे. त्यात त्यांनी रायगडावर कोणकोणते बांधकाम राजांच्या सांगण्यावरुन केले ते लिहिले आहे. त्यासमोर प्रशत्र देवडया आहेत. आम्ही काहीवेळ तेथे विसावलो. समाधी समोरून पायऱ्या इतरून पुढे गेलो की डाव्या बाजूला घोड़पागेच्या खुणा दिसतात.

बरेच ठिकाणी राहत्या वाड्यांचे जोते दिसतात. ह्या ठिकाणी गडावरील राखीव फौज आणि राजांची खाजगीची फौज (अंदाजे २०००) राहती असायची. अजून पुढे गेलो की ह्या भागामधील 'काळा हौद' नावाचा तलाव आहे. इतरस्त्र सपाटी असल्याने बरीच विखुरलेली बांधकामे या भागात आहेत. टोकाला गेलो की लागतो 'भवानी कडा' आणि त्याखाली असलेली गुहा. राजे ह्या ठिकाणी येउन चिंतन करायचे असे म्हटले जाते. आम्ही आता पुन्हा मागे फिरलो आणि सूर्यास्त पाहण्यासाठी गडाचा कडेलोट उर्फ़ टकमक बघायला लावणारा ८०० फुट टकमक कडा बघायला गेलो. तिकडे जाताना आधी गडावरील २ दारूकोठारे लागतात. उद्वस्त छप्पर आणि आत माजलेले झाडीचे रान अशी सध्या त्यांची अवस्था आहे. पुढे जाउन थोडसं उतरलं की टकमककड़े जाता येते. सांभाळून जावे आणि कडयावरुन विहंगम दृष्य पाहून परत यावे.

सूर्यास्त होत आला होता. आणि आज आम्ही अर्धा गड पाहिला होता. 'आता बाकी उदया रे' अस म्हणुन आम्ही परत धर्मशाळेत पोचलो. संध्याकाळचे जेवण बनवताना सुरेश वाडकरांबरोबर इतिहासावर खुप गप्पा मारल्या आणि त्यांचे रायगडाचे अतिशय सुंदर असे फोटो पाहिले. सकाळी सूर्योदय बघायला पुन्हा होळीच्या माळावर जायचे होते त्यामुळे लवकरच आडवे झालो.

दिवस ९ -

आज पहाटे-पहाटे वाघ्याच्या भूंकण्याने जाग आली. पहाटेचे ६ सुद्धा वाजले नव्हते. पण त्याने आम्हाला शेवटी उठवलेच. का भुंकत होता ते काही शेवटपर्यंत कळले नाही. आम्ही उठून आवरून घेतले आणि सूर्योदय बघायला होळीच्या माळावर पोचलो.

आजचा सूर्योदय आम्ही राजांच्या साक्षीने बघत होतो. गडावर थोडीफार गर्दी होती. आज आमच्या ट्रेकचा शेवटचा दिवस होता. गेल्या ९ दिवसांची भटकंती आज संपणार होती. कसले फटाफाट दिवस गेले. ही भ्रमंती संपूच नये असे वाटत होते. आम्ही झट-झट आवरून घेतले आणि उर्वरित गड बघायला निघालो. आम्ही आता जाणार होतो राजदरबार आणि राजनिवासस्थान पाहण्यासाठी. पण त्याआधी डावीकडे खालच्या बाजूला उतरुन कृशावर्त तलावाकडे गेलो. त्याच्या डाव्या बाजूला बरीच पडकी घरे आहेत. दररोज राजदरबार किंवा आसपास ज्यांचे काम असायचे त्यांची घरे ह्या भागात असावीत. अशीच घरे गडाच्या खालच्या दक्षिण भागात सुद्धा आहेत. ते पाहून आम्ही पुन्हा वरती आलो आणि राजदरबाराच्या मुख्य प्रवेशद्वारामधून प्रवेश करते झालो.

ह्या वास्तुला 'नगारखाना' असे म्हटले जाते. ही वास्तु २ मजली उंच असून ह्यावरती सुद्धा जाता येते. गडावरील ही सर्वात उंच जागा आहे. आम्ही डाव्याबाजूला असणाऱ्या पायऱ्या चढून वर गेलो. संपूर्ण गडाचे इकडून सुंदर दृश्य दिसते. ते बघून पुन्हा खाली उतरून आलो. (आता येथून वर जायचा रस्ता बंद केलेला आहे. कोणालाही नगारखान्याच्या वर जाऊ देत नाहीत).

नगारखान्यामधून प्रवेश करताना समोर जे दिसते तो आहे आपला सन्मान.. आपला अभिमान.. अष्टकोन असलेली मेघडवरी सिंहसनाच्या ठिकाणी विराजमान आहे. ह्याच ठिकाणी ६ जून १६७४ रोजी घडला राजांचा राजाभिषेक.

हा सोहळा त्याआधी बरेच दिवस सुरू होता. अनेक रिती आणि संस्कार मे महिन्यापासून ह्या ठिकाणी सुरू होत्या. अखेर ६ जून रोजी राजे चक्रवर्ती सम्राट झाले. 'मराठा राजा छत्रपती जाहला'. राजदरबारामधून प्रवेश करते झालो की उजव्या बाजूला एक मोठा दगड मध्येच आहे. हा खरेतर सहज काढता आला असता मात्र तो तसाच ठेवला आहे. ह्याचे नेमके प्रयोजन कळत नाही मात्र राजे पहिल्यांदा गडावर आले (मे १६५६) तेंव्हा त्यांनी ह्या ठिकाणाहून गड न्याहाळला आणि राजधानीसाठी जागा नक्की केली असे म्हणतात. शिवाय ह्या जागेपासून इशान्य दिशेला आहे श्री जगदिश्वराचे मंदिर जे वास्तुशात्राला अनुसरून आहे. राजदरबारामध्ये उजव्या आणि डाव्या बाजूला बसण्यासाठी बरीच जागा आहे. मागच्या बाजुस जाण्यासाठी डावी कडून मार्ग आहे.

मागच्या भागात गेलो की ३ भले मोठे चौथरे दिसतात. ह्यातील पहिला आहे कामकाजाचा आणि मसलतीचा. दूसरा आणि तिसरा आहे राजांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे निवासस्थान. उजव्या बाजुस आहे देवघर आणि त्या पुढे आहे स्वयंपाकघर. येथे मध्येच एक गुप्त खोली आहे. ८-१० पायऱ्या उतरून गेलो की एक २० x २० फुट असे तळघर आहे. हा खलबतखाना किंवा मोठी तिजोरी असावी. त्या पलिकडे खालच्या बाजूला आहेत एकुण ३ अष्टकोनी स्तंभ.

आधी किती मजली होते ते माहीत नाही पण सध्या ते २ मजली उरले आहेत. एक तर पुर्णपणे नष्ट होत आला आहे. प्रत्येक स्तंभाकडून खाली जाणाऱ्या पायऱ्या आहेत. ज्या बाहेरच्या बाजूस म्हणजे गंगासागर तलावाकड़े निघतात. ह्या तलावामध्ये राजाभिषेकाच्या वेळी सर्व महत्वाच्या नद्यांचे पाणी आणून मिसळले गेले होते. राजांच्या निवासस्थानाच्या उजव्या बाजुस त्यांचे न्हाणीघर आहे. पलीकडच्या बाजूला निघालो की एक सलग मार्गिका आहे. जिच्या उजव्या बाजूला आहे पालखीचा दरवाजा आणि डावीकड़े आहे मेणा दरवाजा. ह्या मर्गिकेपलिकडे आहेत ६ मोठ्या खोल्या. ह्यातील ४ एकमेकांशी जोड़लेल्या आहेत. तर इतर २ एकमेकांशी. ह्याला 'राणीवसा'(?) असे म्हटले जाते. पण ते संयुक्तिक वाटत नाही कारण मधली मार्गिका. राजे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये पहारे आणि इतर लोकांचे राहणे हवे कशाला? शिवाय ह्यातील प्रत्येक खोलीला फ़क्त शौचकूप आहे. न्हाणीघर नाही. काही मध्ये तर ४-६ शौचकूप आहेत. आम्ही पुन्हा मागे येउन स्तंभाकडून खाली जाणाऱ्या पायऱ्या उतरुन गंगासागर तलावाकडे गेलो आणि तिकडून पुन्हा पालखीचा दरवाजा चढून वर आलो. मार्गिका पार कडून मेणा दरवाजा उतरून पलीकडच्या बाजूला आलो. ह्या ठिकाणी आता महाराष्ट्र पर्यटनाची निवासस्थाने झाली आहेत.

राजदरबार आणि राजनिवासस्थान बघून आम्ही परत धर्मशाळेत पोचलो. दुपारचे जेवण बनवून आता गड सोडायचा होता. परतीची तयारी करू लागलो. भांडी लख्ख घासली. बॅग्स व्यवस्थित पॅक केल्या आणि पाठीवर मारल्या. १ वाजत आला होता. आता वेगाने गड उतरु लागलो. आल्या मार्गाने महादरवाजा पार केला आणि दणादण उतरत थेट चित्त दरवाजा गाठला. वाघ्या आमच्या मागे होताच. आता आमचे लक्ष्य होते पाचाडला असणारी मासाहेब जिजामातांची समाधी. खाली उतरलो आणि डांबरी रस्त्याने चालत २ की. मी. दूर असणाऱ्या समाधीपाशी पोचलो.

समाधीचे दर्शन घेतले आणि मागे फिरून पुन्हा पाचाडला आलो. आता आम्हाला महाड गाठायचे होते. गाड़ीची वाट बघत आम्ही उभे होतो. इतक्यात अभिने प्रश्न केला,"अरे वाघ्याच काय?" हर्षद बोलला,"त्याच काय?" "अरे गेले ७ दिवस हा आपल्या बरोबर आहे. रस्ते काय शोधून दिले आहेत. जीव गुंतलाय ह्याच्यात माझा. ह्याला असे कसे सोडून जायचे?" अभि बोलला. मी म्हणालो,"अरे पण त्याला घेउन कसे जाणार आपण ट्रेन मधून?" हे सगळ बोलणे होत असताना वाघ्या आमच्या बाजूलाच उभा होता. आमच्याकड़े टकमक बघत होता. इतक्यात एक जीप आली. आम्ही आमच्या बॅग्स वरती टाकल्या आणि गाडीत बसलो. अभ्या बोलला,"घेऊ का रे ह्याला बरोबर?" मी म्हटले,"अभि चल. त्याला दुसरे ट्रेकर्स भेटतील, तो जाईल दुसऱ्या वाटेने परत. त्याची काळजी नको करूस." अभि गाड़ीमध्ये बसला. गाड़ी सुरु झाली आणि महाडच्या दिशेने निघाली. वाघ्या तिथल्यातिथे दूर जाणाऱ्या गाड़ीकड़े बघत उभा होता.

त्याची भाषा कळत नसली तरी त्याचे डोळे आम्हाला सगळ काही सांगून गेले. आम्ही त्याला टाकुन परतीच्या वाटेवर निघालो ह्याबद्दल माहीत नाही का पण आम्हाला खुपच अपराधीपणाची भावना येत होती. आमची गाडी दिशेनासी होईपर्यंत तो जागचा हलला नाही. त्याची ती स्तब्ध मूर्ति आम्हाला आजही तितकीच लक्ष्यात आहे. गाडीने महाडला आणि तिकडून माणगावला पोचलो. आता ट्रेनने परतीचा प्रवास सुरु झाला. एक अविस्मरणीय अशी दुर्गभ्रमंती पूर्ण करून आम्ही कृतकृत्य झालो होतो.

'सप्त शिवपदस्पर्श' ह्या ९ दिवसांच्या ट्रेकमध्ये अनेक अनुभव आले. त्याबद्दल मी सारांश भागात लिहणार आहे... सप्त शिवपदस्पर्श : भाग ६ - सारांश... !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोहन.. तुझं आणी तुझ्या मित्रांच खूप कौतुक वाटलं Happy
तुमच्या डोळ्यांनी आम्ही सर्व भरभरून पाहिलं,वाचलं..
किल्ल्यांचं वर्णन वाचून आश्चर्य चकित व्ह्यायला होतय..
आता दुसरे अनुभव ही लिही(च) Happy

रोहन, परत कधी दर्शन घडेल कुणास ठाऊक ? अशा लेखाने मात्र जिवंत दर्शन घडत राहते. मि तर महाराजांचा पुतळा तिथे बसवायच्या आधी तिथे गेलो होतो. बहुतेक १९७१ साली असेन.

धन्यवाद रोहित आणि वर्षू नील ..

दिनेशदा.. तो काळ तर अजूनच मस्त... तेंव्हाचे काही फोटो आहेत का तुझ्याकडे??? बघायला आवडेल.. सर्व किती वेगळे असेल नाही... Happy

'पक्का भटक्या' .. खरोखर .. शब्दच नाहीयेत रे.. सह्याद्रिला तू घातलेली साद अप्रतिम आहे. असाच भटकत रहा. अन अशीच वर्णने आम्हाला वाचायला मिळू देत.

सारांश सुद्धा सहील लिहिला आहेस.

रोहन,

माझ्या पंढरीचे दर्शन करुन दिल्याबद्दल धन्यवाद....

मी २७ नोव्हेंबरला रायगडावर होतो तेव्हा वाडकर सरांची भेट झाली. ती त्यांची ७३५ वी फेरी होती. १००८ फेर्‍या करण्याचा त्यांचा संकल्य आहे.

एकदा तुझ्याबरोबर रायगड वारी कारायला आवडेल.

मागल्या खेपेला आम्ही मांणगांव मार्गे पाचाडच्या वाड्यात पोहचलो आणि मासाहेबांचा पुतळा चोरीला गेलेला बघुन धक्काच बसला Sad

सप्त शिवपदस्पर्श वाचून धन्य जाहलो.

सप्त शिवपदस्पर्श वाचून खरच धन्य झाल्यासारखे वाटले.... रायगड दर्शन तर अप्रतिम.... पण़ खरच वाघ्याचा निरोप मनाला हुरहूर लावून गेला...

रायगड - नावातच कसले सामर्थ्य आहे याच्या .....

पण, महाराजांच्या समाधी दर्शनाने अगदी व्याकुळ होतं मन ....

वाघ्या तिथल्यातिथे दूर जाणाऱ्या गाड़ीकड़े बघत उभा होता. >>>> कसा पहात असेल हे तुझ्या लिखाणातून जाणवतंय अग्दी .....

एक अमानिक हुरहुर लाउन गेली ही लेखमाला ......

या अप्रतिम लेखमालेकरता मनापासून धन्यवाद.