सप्त शिवपदस्पर्श : भाग १ - पुरंदर - वज्रगड - सिंहगड ... !
सप्त शिवपदस्पर्श : भाग २ - राजगड ... !
दिवस - ५
आज होता ट्रेकचा पाचवा दिवस. गेल्या ४ दिवसात ४ किल्ले सर करत आता आम्ही निघालो होतो 'किल्ले तोरणा' कड़े. सकाळी झटपट आवरून निघालो. संजीवनी माचीवरच्या अळू दरवाजामधून निघून थेट तोरणा गाठता येतो पण आम्हाला राजगडाच्या राजमार्गाने उतरायचे होते. त्यामुळे आम्ही पाली दरवाजा गाठला.
शिवरायनिर्मित दुर्गरचनेप्रमाणे ह्या महादरवाज्यामध्ये बाहेरच्या बाजूने प्रवेश केल्या-केल्या वाट बरेचदा पूर्ण डावीकड़े वळते. (उदा. रायगड, सुधागड, राजगड) आता आम्ही आतून बाहेर जात होतो त्यामुळे वाट उजवीकड़े वळली. इकडे समोर देवडया आहेत. तर अलिकड़े उजव्या हाताला महादरवाजावर असणाऱ्या बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे इकडे खालचा आणि वरचा असे २ मुख्य दरवाजे आहेत. वरच्या दरवाज्याच्या बुरुजावरुन खालचा दरवाजा आणि त्यापुढचा मार्ग पूर्णपणे टप्यात येइल अशी दुर्गरचना येथे आहे. आम्ही वरच्या दरवाजामधून बाहेर पडलो. हा राजमार्ग असल्याने ३ मि. म्हणजेच पालखी येइल इतका रुंद आहे. ५० एक पायऱ्या उतरलो की मार्ग आता उजवीकड़े वळतो आणि पुढे जाउन डावीकड़े वळसा घेउन अजून खाली उतरतो. आता इकडे आहे खालचा दरवाजा. ह्यावरचा बुरुज मात्र ढासळला आहे. ह्या दरवाजामधून बाहेर पडलो की आपण राजगडाच्या तटबंदीच्या बाहेर असतो. आता वाट उजवी-डावी करत-करत खाली उतरु लागते. नोंद करण्यासारखी गोष्ट म्हणजे हा पूर्ण मार्ग खालच्या दरवाजाच्यावर असणाऱ्या बुरुजाच्या टप्यात आहे. शिवाय बाले किल्ल्यावर असणाऱ्या उत्तरेकडच्या बुरुजावरुन सुद्धा ह्या मार्गावर थेट मारा करता येइल अशी ही वाट आहे. हा गडावर यायचा सर्वात सोपा मार्ग असल्याने ह्याला दुहेरी संरक्षण दिले गेले आहे.
आम्ही तासाभरात खालच्या माळरानावर होतो. इकडे थोडी सपाटी आहे. बहुदा आता इथपर्यंत गाड़ी रस्ता होतो आहे. इकडून आपण थेट खाली उतरलो की 'वाजेघर' गाव आहे. (संस्कृतमध्ये वाजिन म्हणजे घोड़ा (याशिवाय 'वाजिन' चे अजून काही समानअर्थी शब्द म्हणजे - शुर, धाडसी, योद्धा) शिवरायांचे घोडदळ ज्याठिकाणी असायचे तो भाग म्हणजे 'वाजिनघर' उर्फ़ 'वाजेघर'.)
आम्ही गावात न शिरता समोर दिसणाऱ्या ब्राह्मणखिंडीकड़े निघालो. वाटेमध्ये छोटे-छोटे पाडे आणि वाड्या लागत होत्या. त्यांच्याआधी आणि नंतर शेतीच शेती होती. मार्ग सपाट असल्याने भरभर पावले उचलत आम्ही खिंडीकड़े निघालो होतो. त्यात सुद्धा आमच्या गप्पा सुरूच होत्या. खास करून त्यात काल रात्रीचा जेवणाचा किस्सा अजूनसुद्धा चघळला जात होता. १० वाजून गेले होते. मध्येच खिंडी अलीकडे एके ठिकाणी काहीवेळ विश्रांतीकरता थांबलो. मागे वळून राजगडाकडे पाहिले तर डावीकडे पद्मावती माची, मध्ये बालेकिल्ला तर उजवीकड़े संजीवनी माची असे राजगडाचे सुंदर दृश्य दिसत होते. आता लक्ष्य होते तोरणा किल्ल्याचा पायथा, म्हणजेच वेल्हा. निघालो तसे काही वेळातच खिंड लागली. २० मिं. खिंडीमध्ये पोचलो. इकडे परत जरा दम घेतला. वेल्हा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने ह्या वाटेवर तशी वर्दळ असते. त्यामुळे वाट चूकायचा सुद्धा काही फारसा प्रश्न नसतो. शिवाय आपण कुठे डोंगराच्या कोपऱ्यात नसून बऱ्यापैकी सपाटीला असतो. थोडावेळ विश्रांती घेउन आम्ही पुढे निघालो आणि खिंड उतरून तासाभरात वेल्ह्याला पोचलो. दुपारचे १ वाजत आले होते आणि गावात बरीच वर्दळ होती. आज लंच बनवायचा नव्हता म्हणुन आम्ही 'होटेल तोरणा विहार' मध्ये गेलो आणि जेवणाची आर्डर दिली. जेवण झाले तेंव्हा दुपारचे २ होउन गेले होते आणि आम्ही आता दुपारच्या रणरणत्या उन्हामध्ये किल्ले तोरणा चढणार होतो.
हॉटेलच्या समोर आणि उजव्या हाताला मामलेदार कचेरी आणि इतर सरकारी कार्यालये आहेत. तिकडेच उजव्या हाताने गावाबाहेर पडायचे आणि तोरण्याकड़े निघायचे. काहीवेळ वाट सपाटीवरुन जाते आणि मग डोंगर चढणीला लागते. एकामागुन एक टप्याटप्याने चढत जाणाऱ्या डोंगररांगा बघून कळते की ह्याला राजांनी 'प्रचंडगड' नाव का ठेवले असेल ते. खरचं कसला प्रचंड आहे हा किल्ला. आम्ही आता पहिल्या टप्याच्या चढणीला लागलो. ह्या टप्यामध्ये एक अशी सलग वाट नाही कारण एकतर ह्याभागात प्रचंड झाडे तोडली गेली आहेत. दुसरे असे की वरुन वाहून येणाऱ्या पाण्यामुळे नविन मार्ग बनले आहेत. शिवाय गुरांमुळे बनलेल्या वाटा वेगळ्याच. इकडे वाट शोधत वर जाण्यात बराच वेळ लागला. वरच्या सपाटीला पोचलो आणि कारवीच रान सुरु झाल.
गावापासून निघून तास होउन गेला होता. आता सपाटी संपली आणि दुसऱ्या टप्याचा चढ सुरु झाला. ह्या चढावर पुरता दम निघाला. ३०-४० मिं. नंतर जेंव्हा चढ संपला तेंव्हा पाय पूर्ण भरून आले होते. घसा सुकला होता आणि ह्रुदयाचे ठोके गळ्याखाली जाणवत होते. खांदयावरची बैग उतरवली आणि तसाच खाली बसलो. अभि आणि हर्षदची काही वेगळी अवस्था नव्हती. आता मी हृदयाचे ठोके मोजले तर ते १०० च्या आसपास भरले. म्हणजे अजून जरा वाढले असते तर तोरण्यावर पोचायच्या ऐवजी डायरेक्ट वरतीच पोचलो असतो. आमच्यापैकी कोणीच काही बोलत नव्हतो. १५ मिं. तिकडेच बसून होतो. पाणी प्यालो आणि ताजे-तवाने झालो. ४:३० होउन गेले होते. अजून दिड-दोन तासामध्ये वर पोचून राहायची जागा, पिण्याचे पाणी आणि सरपण म्हणजे सुकी लाकडे जमवायची होती. आता वेळ दडवण्यात अर्थ नव्हता. झटझट पुढे निघालो. तिसऱ्या टप्याचा चढ सुरु झाला. आता हा पार करेपर्यंत थांबायचे नाही असे ठरवुनच निघालो होतो. ५:३० च्या दरम्यान अगदी वरच्या सपाटीला लागलो. हूश्श्श्श... एक मोठा दम टाकला. आता ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत समोर अखंड तोरणा पसरला होता.
पश्चिमेकड़े सूर्य मावळतीला सरकला होता आणि अजून सुद्धा गडाच्या दरवाजाचा पत्ता नव्हता. तोरण्याचा बिनीचा दरवाजा असा बांधला आहे की शेवटपर्यंत काही दिसत नाही. दिसतोय कसला अंदाज सुद्धा करता येत नाही की तो कुठे असेल. २-५ मिं. दम घेतला आणि सुसाट उजव्या बाजूने निघालो. आता वाट कडयाखालून पुढे सरकत होती. उजव्या हाताला खोल दरी तर डाव्या बाजूला उभा प्रस्तर. मध्येच एखादा झाडीचा टप्पा लागायचा. आमच सगळ लक्ष्य कडयाकडे होत. कधी तो दरवाजा दिसतोय अस झाल होत. अखेर काही वेळाने वाट डावीकडे वर सरकली आणि वरच्या टोकाला गडाचा दरवाजा दिसू लागला. ६ वाजून गेले होते आणि आम्ही कसेबसे गडामध्ये प्रवेश करत होतो. उभ्या खोदीव पायर्यांचा टप्पा पार केला आणि दरवाजामध्ये पोचलो. मी जाउन सर्वात वरच्या पायरीवर बसलो आणि सूर्यास्त बघायला लागलो. मागून अभी आणि हर्षद आले. काहीवेळाने आमच्या तिघांच्याही लक्ष्यात आल की अंधार पडत आला आहे. सूर्यास्त बघण्यात आम्ही इतके हरवून गेलो की आत जाउन राहायची जागा शोधायची आहे, पाणी शोधायचे आहे हे विसरूनच गेलो. उठलो आणि आतमध्ये शिरलो. आतमध्ये सर्वत्र रान मजले होते. उजव्या-डाव्या बाजूला तटबंदी दिसत होती. थोड पुढे डाव्या हाताला गडाची देवता तोरणजाईचे मंदिर दिसले. मंदिराची अवस्था बिकट होती. ह्याच ठिकाणी राजांना गुप्तधनाचा लाभ झाल्याचे जाणकार मानतात. ह्याच धनामधून राजांनी साकारला राजगड. लगेच पुढे थोडा चढ असून वर गेल्यावर मेंगजाईचे मंदिर आहे. मंदिरामध्ये पोहचेपर्यंत पूर्ण अंधार झाला होता. राहायची जागा तर लगेच सापडली होती. बघतो तर काय आतमध्ये डाव्याबाजूला खुप सारे सरपण पडले होते. आधी जे कोणी येथे राहून गेले असतील त्यांनी जमवून ठेवले असेल. त्यांना मनातल्या मनात धन्यवाद दिले. आता राहिला प्रश्न पाण्याचा. अभिने जवळचा नकाशा काढला आणि गडावर टाक्या कुठे-कुठे आहेत ते बघायला सुरवात केली. तोपर्यंत मी दोर आणि मोठ्या तोंडाची एक बाटली घेतली. आता आम्ही नकाशावर जवळच्या २ जागा नक्की केल्या आणि पाणी शोधायला निघालो. एव्हाना अंधार पडला होता.
मंदिरापासून थोड़े पुढे गेलो की एक वाट उजवीकड़े वळते जी पुढे बुधला माचीकड़े जाते. इकडे डाव्या बाजूला पाण्याची २ टाकं आहेत. बघतो तर त्यावर एक झाड़ पूर्ण वाकले होते. टॉर्च मारून पाहिले तर पाणी थोड़े खाली होते. मी बाटली घेउन पूर्ण आत वाकलो आणि पाण्यापर्यंत पोचलो. आता आम्ही सगळ्या बाटल्या भरून घेतल्या. जेवण बनवायला आणि प्यायला पुरेस पाणी मिळाल्याने सकाळपर्यंत काही चिंता नव्हती. आम्ही मंदिरामध्ये पोचलो आणि जेवणाच्या तयारीला लागलो. कालचा हर्षदचा अनुभव बघता अभि त्याला बोलला,"थांब. आज मी बनवतो जेवण." जेवण बनवून खाल्ले आणि आवरून घेतले. राजगडाच्या पायथ्यापासून आमच्या सोबत असणारा वाघ्या कुत्रा फारतर वाजेघरनंतर आम्हाला सोडून परत जाइल असे वाटले होते पण हा पठ्या आमच्यासोबत तोरणापर्यंत सुद्धा आला.
तोरणा किल्ल्याबद्दल बरेच समज-गैरसमज आहेत. त्यात सर्वात महत्वाचा म्हणजे स्वराज्याचे तोरण हा किल्ला जिंकून लावले म्हणुन याचे नाव तोरणा आहे हा गैरसमज. पण सध्या जो समज तोरण्याबाबतीत ट्रेकर्समध्ये आहे तो म्हणजे येथे चकवा मारतो किंवा गडावर किल्लेदाराचे भूत दिसते. ह्यामुळे गडावर कोणी फारसे रहत नाही. गडावरील एकमेव राहण्याची जागा असलेल्या मेंगजाईच्या मंदिराचे छप्पर अर्धे उडून गेले आहे.(हल्लीच ते नीट केले आहे असे ऐकले आहे.) २००२ साली देवीच्या मूर्तीवरती छप्पर आहे तर पुढच्या भागावर नाही अशी परिस्थिती होती. त्यामुळे रात्रभर पत्रे वाजत होते. मंदिराला २ दरवाजे असून एक समोर तर एक डाव्या बाजूला आहे. डाव्या बाजूचा दरवाजा आतून बंद होता तर समोरचा दरवाजा आम्ही आतून बंद करून घेतला होता. वाघ्या मंदिरामध्ये एका कोपऱ्यात झोपला होता. त्यारात्री आम्ही झोपी गेलो तेंव्हा आम्हाला एक विचित्र अनुभव आला.
***रात्री मध्येच अभिजित आणिआणि हर्षद दोघांना सुद्धा एकसारखे स्वप्न पडले. दोघांनाही स्वप्नामध्ये मंदिरामध्ये आमच्या भोवती सगळीकड़े सापच साप फिरत आहेत असे दिसत होते. आत साप आणि मंदिराच्या बाहेर सुद्धा सगळीकड़े सापच साप. छप्पराचे पत्रे प्रचंड जोरात वाजत होते. आता दोघांनाही कोणीतरी दार वाजवतय असे वाटले. त्या आवाजाने त्यांचे स्वप्न तुटले आणि दोघांनाही खरोखर जाग आली. अभि दरवाजा उघडून बघतो तर काय बाहेर कोणीच नाही. किर्र्र्रररर अंधारामध्ये काय दिसणार होते. तितक्यात हर्षदने उजेड पडावा म्हणुन तेलाचा टेंभा मोठा केला होता. दोघांनाही पडलेले स्वप्न एकच होते असे जेंव्हा त्यांना कळले तेंव्हा दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला. इतका वेळ मी मात्र गाढ झोपेत होतो. दोघांनी मला उठवायचे कष्ट घेतले नाहीत. अभिने पूर्ण देवळामध्ये टॉर्च मारून साप वगैरे नाही ना अशी खात्री करून घेतली. कोपऱ्यात झोपलेला वाघ्या मात्र आता जागेवर नव्हता. नेमका काय सुरु आहे तेच त्या दोघांना कळेना. दोघेपण चुपचाप झोपून गेले. (अर्थात हे सगळ मला सकाळी उठल्यावर कळले.)
आता माझी पाळी होती. काही वेळाने मला सुद्धा हेच स्वप्न पडले आणि ह्यापुढे जाउन तर एक सापाने माझ्या उजव्या पायाच्या अंगठ्याला दंश केला असे स्वप्नामध्ये जाणवले. अंगठ्यावर दंश बसल्याच्या खऱ्याखुऱ्या जाणिवेने मी खाडकन जागा झालो. डोक्याखालची टॉर्च घेतली आणि पायावर लाइट मारला. सर्पदंशाचे २ दात कुठे दिसतात का ते बघायला लागलो. पूर्ण पाय तपासला. अगदी डावापाय सुद्धा तपासला. कुठेच काही नाही. आता मी मंदिरामध्ये टॉर्च फिरवली. बघतो तर काय माझ्यासमोरच्या भिंतीला एक पांधऱ्या रंगाची कुत्री बसली होती आणि ती माझ्याकडेच बघत होती. मी टॉर्च मारल्या-मारल्या तिचे डोळे असे काही चमकले की मी टॉर्च लगेच बंद केली. त्या कुट्ट अंधारामध्ये सुद्धा तिचा पांढरा रंग सपशेल उठून दिसत होता. मी अभि आणि हर्षदला उठवायच्या फंदात पडलो नाही. मी सुद्धा चुपचाप झोपी गेलो. सकाळी जेंव्हा आम्ही उठलो तेंव्हा माझी स्टोरी ऐकून हर्षद आणि अभिजित एकमेकांकड़े तोंड आ वासून बघत होते. आता त्यांनी मला त्यांची स्टोरी सांगितली. आता तोंड आ वासायची वेळ माझी होती. मी सुद्धा त्यांच्याकड़े बघतच बसलो. सूर्योंदय कधीच झाला होता. आम्ही उठून बाहेर आलो आणि बघतो तर काय वाघ्या आणि त्याच्या बाजूला ती पांढरी कुत्री ऊन खात पडले होते. हा वाघ्या रात्रभर कुठे गेला होता काय माहीत...
आम्ही आता नाश्त्याच्या तयारीला लागलो. कारण फटाफट किल्ला बघून आम्हाला गड सोडायचा होता. नाश्ता बनवून, खाउन मी भांडी घासायला गेलो तर समोरून ते 'श्री शिवप्रतिष्ठान' वाले येत होते. त्यांना नमस्कार केला आणि काल राहिलात कुठे असे विचारले. कळले की राजगड आणि तोरणाला जोड़णाऱ्या डोंगर रांगेवर एका वाडीत त्यांनी मुक्काम केला होता. जेंव्हा मी त्याला आम्ही इकडेच देवळामध्ये राहिलो असे सांगीतले तेंव्हा तो ओरडलाच. "काय्य्य... इकडे राहिलात??? काही दिसल का तुम्हाला???" मी त्याला आमची रात्रीची स्टोरी सांगीतली. आता आ वासायची पाळी त्यांची होती. आम्हाला आलेला अनुभव हा भन्नाट, विचित्र आणि मती गुंग करणारा होता. (तुम्हाला कोणाला असा काही अनुभव असेल तर तो जरूर कळवावा.) असो... त्यावर जास्त उहापोह करत न बसता आम्ही आवरून गडफेरीला निघालो. आज तोरण्यावरील शिवपदस्पर्श अनुभवायचा होता ...
दिवस - ६
६ व्या दिवशी सकाळी तोरण्यावरील गडफेरीला निघालो. तोरण्याला २ माच्या आहेत. झुंझार माची आणि बुधला माची. आम्ही आधी झुंझार माचीकड़े निघालो. मंदिरापासून डाव्याबाजूला काही अंतर गेलो की तटबंदी आणि टोकाला बुरुज लागतो. ह्या बुरुजावरुन खालच्या माचीवर उतरायची वाट मोडली आहे. त्या ऐवजी थोड़े मागे डाव्याहाताला खाली उतरण्यासाठी एक लोखंडी शिडी लावली होती. त्यावरून खाली उतरलो आणि माचीकड़े वळालो.
माचीची लांबी तशी फार नाही पण तिला भक्कम तटबंदी आहे. टोकाला एक मजबूत असा बुरुज आहे. तिकडून परत आलो आणि शिडी चढून पुन्हा मंदिरात परतलो. आता सामान बांधले आणि बुधला माचीकड़े निघालो. कारण त्याच बाजूने गडाच्या दुसऱ्या दरवाज्याने आम्ही गड सोडणार होतो. मंदिरापासून आता पुढे निघालो आणि उजव्या वाटेने बुधला माचीकड़े कूच केले. झुंझार माचीवर सुद्धा आमच्या बरोबर आलेला वाघ्या ह्यावेळी मात्र आमच्या बरोबर बोलवून सुद्धा आला नाही. वाट आता निमुळती होत गेली आणि मध्ये-मध्ये तर मोठ्या-मोठ्या दगडांवरुन जात होती. गडाचा हा भाग एकदमच निमुळता आहे. थोड पुढे गेल्यावर अध्ये-मध्ये काही पाण्याच्या टाक्या लागल्या. आता समोर बुधला दिसत होता.
पण तिकडे जाण्याआधी डाव्याबाजूला खाली असणाऱ्या बुरुजाकडे सरकलो. राजगडाच्या अळू दरवाजावरुन येणारी वाट इकडून तोरणा गडावर येते. खालच्या गावामधून एक म्हातारी डोक्यावर दही आणि ताकाचा हंडा घेउन गडावर आली होती. सकाळी-सकाळी तिने बहुदा ३०-४० जणांना गडावर येताना पाहिले असावे. आम्हाला पाहताच बोलली,"भवानी कर की रे भाऊ." मी आणि हर्षदने एक-एक ग्लास घेतला. छान होत की ताक. आम्ही तिला बोललो 'आजे..मंदिराकडे जा लवकर. तिकडे बरेच जण आहेत पण ते गड सोडणार आहेत आत्ता. लवकर गेलीस तर कमाई होइल तुझी.' ती बाई घाईने मंदिराकडे निघाली. आम्ही बुरुजाकडे निघालो. मी सर्वात पुढे होतो. अभि मध्ये तर हर्षद मागे होता. वाटेवर बरच गवत होते. तितक्यात त्या बाईचा आवाज आला. "आरं.. आरं.. पोरगा पडला की." मला काही कळेना. मी मागे वळून पाहील तर हर्षद गवतात लोळत बोंब ठोकुन हसत होता. आणि अभि त्याच्याकडे बघत उभा होता. हर्षद आता जरा शांत झाला आणि मला नेमक काय घडल ते सांगितले. त्या गवतावरुन अभि सरकून असा काही पडला की त्याने ह्या ट्रेकमधले सर्वात जास्त रन केले. म्हणजे डायरेक्ट होमरन मारली असच म्हणान. आता मला मागे टाकुन लीड वर अभि होता. पण हे इतक्या वेगात घडल की मी मागे वळून बघेपर्यंत तो उठून उभा सुद्धा होता.
आम्ही खालच्या बुरुजापर्यंत गेलो आणि काहीवेळात चढून वर आलो. आता मोर्चा वळवला बुधला माचीकडे. ह्या बाजूला अस काही रान माजले होते की नेमकी वाट सापडेना. जसे आणि जितके जमेल तितके पुढे जात होतो. बुधल्यावरती चढता येते का ते माहीत नव्हते त्यामुळे जेंव्हा वाट सापडेनाच तेंव्हा मागे फिरलो आणि दरवाजाकडे निघालो. दरवाज्यामागच्या उंचवटयावरुन खालची बरीच वाट दिसत होती. पण पुढे मातीचा घसारा आणि वाट मोडल्यासारखी वाटत होती. हर्षद खाली जाउन बघून आला आणि बोलला की बहुदा आल्या मार्गाने आपल्याला परत जावे लागणार. आम्ही पुन्हा मंदिराकडे निघालो. आता वेळेचे गणित पूर्णपणे विस्कटणार होते.
आल्या मार्गाने परत फिरलो आणि मंदिरामध्ये पोचलो. 'श्री शिवप्रतिष्टान' च्या लोकांनी गड सोडला होता. ती ताकवाली म्हातारी बाई भेटली मध्ये. आता आम्ही आल्यावाटेने गड उतरु लागलो. बिनीचा दरवाजा उतरून खाली आलो आणि कडयाखालचा टप्पा पार करून डोंगर रांगेवरुन उतरायला लागलो. चढ़ताना जितका दम निघाला होता तितका आता उतरताना पायावर जोर पडत होता. आमचा उतरायचा वेग भलताच वाढला होता. कुठेही न थांबता आम्ही खालच्या टप्यावर येउन पोचलो. दुरवर खाली वेल्हा दिसत होते. झपाझप एकामागुन एक टप्पे पार करत खाली उतरत वेल्हा गाठले. आज काहीही करून बोराटयाच्या नाळेच्या जास्तीत-जास्त जवळ सरकायचे होते. गावात पोचलो तेंव्हा ३ वाजत आले होते. आता इकडून नदीच्या मार्गाने हरपुडला कसे जायचे ते एका माणसाला विचारले. तो बोलला,"आत्ता गेलात तर जाम उशीर होइल. त्यापेक्षा ४ वाजताची कोलंबीला जाणारी एस.टी. पकडा आणि मग तिकडून पुढे जा." आम्हाला हा पर्याय पटला. आम्ही अजून १-२ लोकांकडून एस.टी. ची खात्री करून घेतली आणि मग तासभर तिकडेच एका देवळामध्ये थांबलो. ४ वाजताची एस.टी. आली. ही गाड़ी निवासी एस.टी.असून पुण्याहून वेल्हामार्गे कोलंबीला जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा वेल्हामार्गे पुण्याला परतते असे कळले. त्या गाडीत आम्हाला एक मुलगा भेटला. नाव आठवत नाही आता त्या पोराचे. तो कोलंबीला म्हणजेच त्याच्या गावाला जात होता. कामाला होता तो नवी मुंबईच्या APMC बाजारात. तास-दिडतासाच्या त्या प्रवासात त्याच्याशी मस्त गप्पा झाल्या. शेतीची महत्त्वाची कामे झाली की आसपासच्या गावामधले लोक अधिक उत्पन्न मिळावे म्हणुन इतर कामासाठी पुणे, सातारा आणि अगदी मुंबई - नवी मुंबईपर्यंत जातात हे त्याच्याकडून कळले. संध्याकाळी ६ च्या आसपास गावात पोचलो.
मागे एकदम दूरवर तोरणा आणि त्याची बुधला माची दिसत होती. मुंबईचा कोणी आपल्या गावात आला आहे म्हणुन तो भलताच खुश होता. कारण ह्या वाकड्या मार्गाने कोणी ट्रेकर जात नाही. 'तुम्ही आज आमच्याघरीच राहायचे, आमच्याकडेच जेवायचे' असे आम्हाला सांगुन तो मोकळा झाला होता. आम्ही म्हटले "बाबा रे, कशाला तुम्हाला त्रास. आमच्याकड़े जेवणाचे सगळे सामान आहे. तू बास आम्हाला गावामधले देउळ दाखव आणि पाणी कुठे मिळेल ते सांग." तरीपण आम्हाला घेउन आधी तो स्वतःच्या घरी गेला. आईशी ओळख करून दिली. मी पहिल्या क्षणामध्येच त्याचे घर न्याहाळले. बाहेर छोटीशी पडवी. आत गेल्या-गेल्या डाव्या बाजूला गुरांचा गोठा होता. त्यात २ बैल, एक गाय आणि तिच्याजवळ तिच वासरू होत. समोर घरामध्ये आई काहीस काम करत बसली होती. योगायोगाने त्याच्या घरासमोर आणि उजव्याबाजूला अशी २ मंदिरे होती. मी लगेच त्याला म्हटले,"हे बघ. आम्ही इकडे समोरच राहतो. अगदी काही लागल तर घेऊ की मागुन." तो ठीक आहे म्हणुन आत घरात गेला आणि आम्ही आमचा मोर्चा मंदिराकड़े वळवला. आमचे सामान टाकुन बसणार तितक्यात तो एक मोठा पाण्याचा हंडा आणि काही सरपण घेउन आला आणि बोलला,"जेवणाचे सामान आहे बोलताय. पण जेवण कशावर बनवणार?? हे घ्या सरपण" आम्ही सगळेच हसलो. काहीवेळाने जरा फ्रेश झालो आणि निवांतपणे बसलो. ७ वाजून गेले तसे मी रात्रीच्या जेवणाची तयारी करायला लागलो तितक्यात तो मुलगा चहा घेउन परत आला आणि आमच्याशी गप्पा मारायला लागला. इकडून उदया आम्ही कुठे जाणार आहोत ते त्याला सांगितले. पुढचा मार्ग नीट विचारून घेतला. माझ्या मनात विचार येत होते. 'असेल पैशाची गरीबी थोडी पण मनाची श्रीमंती आपल्यापेक्षा कैक पटीने जास्त आहे.' गेल्या इतक्या वर्षात मी गावातल्या लोकांचा पाहूणचार पहिला आहे, अनुभवला आहे आणि भरून पावलो आहे. वेळ कसा गेला कळलेच नाही. बऱ्याच उशिरा झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी पहाटे बोराट्याची नाळ गाठायची होती...
अप्रतिम मित्रा!! तुमच्या
अप्रतिम मित्रा!!
तुमच्या रुपाने मला स्वतः सप्त शिवपदस्पर्श झाल्यासारखे वाटते आहे.
तुमच्या पुढील प्रत्येक मोहीमेला माझ्या शुभेच्छा!!
तुमच्या रुपाने मला स्वतः सप्त
तुमच्या रुपाने मला स्वतः सप्त शिवपदस्पर्श झाल्यासारखे वाटते आहे. << अगदी अगदी खरं ! रोहन .. ग्रेट लिहिलं रे !
तुझ्या प्रत्येक दुर्गभ्रमण मोहीमेस तुला अनेक अनेक शुभेच्छा.
रोहन्..आता आमची आ वासण्याची
रोहन्..आता आमची आ वासण्याची पाळी.. सरसरून काटा आला अंगावर ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आम्ही ही तुझ्या दुर्गभ्रमण मोहिम मधे सामिल झालोत आता
कितीदा वाचलं तरी समाधानच होत नाही.. तू सरळ पुस्तकच लिही बरं म्हंजे ते आमच्या संग्रही राहील कायम
तुला वाचून काटा आला... आमची
तुला वाचून काटा आला... आमची तेंव्हा काय अवस्था असेल विचार कर...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हम्म.. तोरणाला रात्र काढावी
हम्म.. तोरणाला रात्र काढावी म्हणतोय
मस्त वर्णन
काढायची आहेच... राजगड -
काढायची आहेच...
राजगड - तोरणा ट्रेक सध्या लिस्टमध्ये खूपच वरती आहे.. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रोहन. पण तू दुसर्या
रोहन.
पण तू दुसर्या मित्रांना जागे न करता चूपचाप झोपून गेलास.. दुसरा कुणी (म्हंजे मीच
)असता तर त्याने बोंबलून उरले सुरले पत्र्याचे छत खाली आणले असते ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तसे कोणी केले असते (अभि किंवा
तसे कोणी केले असते (अभि किंवा हर्षद) तरी मला आधीच सर्व स्टोरी कळली असती आणि मला हे असले स्वप्न पडले देखील नसते..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण काय करणार... जे व्हायचे ते होते. तेंव्हा नसते झाले तर आज तुम्हाला हा किस्सा वाचायला कसा मिळाला असता...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
तू सरळ पुस्तकच लिही बरं
तू सरळ पुस्तकच लिही बरं म्हंजे ते आमच्या संग्रही राहील कायम>>>>>
अनुमोदन.... रोहन्,हे पुस्तकाचं मनावर घेच मित्रा.......
खूप छान वर्णन.... शुभेच्छा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप छान वर्णन.... शुभेच्छा.
खूप छान वर्णन.... शुभेच्छा.
छान ओघवते वर्णन आहे. आपणच
छान ओघवते वर्णन आहे. आपणच त्या मोहिमेत आहोत असे वाटत राहते.
मस्त लिहिले आहे. तोरण्यावर जे
मस्त लिहिले आहे. तोरण्यावर जे भूत आहे ते 'ब्रह्मसमंध' या प्रकारातले आहे आणि त्याचे आडनाव दिवेकर आहे असे बर्याचदा संदर्भ मिळाले आहेत, अगदी गोनिदांच्या लेखनात सुद्धा.
मी , कूल आणि केदारने (परांजपे) एकदा तोरण्याचा रात्री ट्रेक केला होता आणि वर देवळातच झोपलो होतो. रात्री दिवेकरांना खूप हाकाही मारल्या मोठमोठ्याने, पण आम्हाला काही दर्शन दिले नाही त्यांनी.
देवळाचे पत्रे मात्र वार्यामुळे वेगवेगळे आवाज करत असतात. आपटल्याचे, घासल्याचे, हेलकावे खाल्याचे..
जी.एस. आम्ही तोरणाला गेलो ती
जी.एस. आम्ही तोरणाला गेलो ती आमची पहिलीच वेळ होती आणि मला तेंव्हा 'दिवेकर' बद्दल काहीच ठावूक नव्हते. गडावरच ते समजले.
पुढे अप्पांचे लिखाण देखील वाचले. मात्र नंतर गडावर राहण्याचा योग आलेला नाही. बघुया कधी जातोय...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तेंव्हा देवळाचे पत्रे पण काय वाजायचे.. बापरे!!! (आता संपूर्ण छप्पर आहे असे ऐकून आहे.) लगेच झोप लागेल तर शपथ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाप्रे...देवळातला अनुभव किती
बाप्रे...देवळातला अनुभव किती भयानक !
बापरे! रोहन, काय लिहिता हो
बापरे! रोहन, काय लिहिता हो तुम्हि? वाचतना सरसरुन काटा आला अंगावर. एवढं धाडस तुम्हि लोक कसं काय करता कोण जाणे. रच्याकने, तुम्हि हे घरच्यांना वाचायला देत नसाल.
लिखाण अतिशय सुंदर!!!!!! पुस्तक लिहाच व माझ्यासाठी एक कॉपी आधिच बाजूला ठेवा.......
सुंदर!!!
सुंदर!!!
अप्रतिम रे गड्या..तुमचा अनुभव
अप्रतिम रे गड्या..तुमचा अनुभव लय भारी...खरच रोहन ...एक पुस्तक काढच..म्हणजे आमच्या सारख्या भटक्यांना उपयोगी होईल.
हम्म.. तोरणाला रात्र काढावी म्हणतोय >> यो कधी जायच बोल...
आयला.. पुस्तकाची मागणी वाढते
आयला.. पुस्तकाची मागणी वाढते आहे..
पूर्व प्रकाशन सवलत पण जाहीर करायला हवी आता...
ती पण मायबोली खरेदी वरून... हा हा ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हम्म.. तोरणाला रात्र काढावी
हम्म.. तोरणाला रात्र काढावी म्हणतोय >> यो कधी जायच बोल... >>> नेकी और पुछपुछ...
रोहन रात्रीचा थरार अंगावर काटा आणणारा...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गडावरील देऊळ असो किंवा गुहा असो... ती ठिकाणे उंचावर असल्याने वार्याच्या मार्यात येतात आणि रात्रभर चित्रविचित्र आवाज ऐकवितात
बाकी वर्णन अगदी अप्रतिम!
मस्त वर्णन , तुझ्या प्रत्येक
मस्त वर्णन , तुझ्या प्रत्येक दुर्गभ्रमण मोहीमेस तुला अनेक अनेक शुभेच्छा.
सुंदर तुमच्या रुपाने मला
सुंदर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुमच्या रुपाने मला स्वतः सप्त शिवपदस्पर्श झाल्यासारखे वाटते आहे.>>>>>अगदी अगदी
खुप मस्त वर्णन जुन्या आठवणी
खुप मस्त वर्णन जुन्या आठवणी परत
एकदा जाग्या झाल्या ...
<< तोरण्यावर जे भूत आहे ते 'ब्रह्मसमंध' या प्रकारातले आहे आणि त्याचे आडनाव दिवेकर आहे असे बर्याचदा संदर्भ मिळाले आहेत, अगदी गोनिदांच्या लेखनात सुद्धा.
>> जीएस बरिच महिती आहे बहुतेक या विषयावर...
अजुन कांही माहिती असेल तर शेयर करा...
जाणुन घेण्याची उत्सुकता लागली आहे
आम्ही या गोष्टी एकुन वेळा अमवस्या ला तोरणा मुक्कामी गेलो होतो... पण कांहीच अनुभवले नाही.
आता कसे तोरणावर चाललो आहे न म्हणता जरा
दिवेकारांना भेटुन येतो असे म्हाणयचे...
तोरण्यावर जे भूत आहे ते
तोरण्यावर जे भूत आहे ते 'ब्रह्मसमंध' या प्रकारातले आहे आणि त्याचे आडनाव दिवेकर आहे असे बर्याचदा संदर्भ मिळाले आहेत, अगदी गोनिदांच्या लेखनात सुद्धा. >>>> हे अगदी थरारकच ...