सप्त शिवपदस्पर्श : भाग १ - पुरंदर - वज्रगड - सिंहगड ... !
सप्त शिवपदस्पर्श : भाग २ - राजगड ... !
सप्त शिवपदस्पर्श : भाग ३ - तोरणा ...
दिवस - ७
पहाटे-पहाटे चांगलीच लवकर जाग आली कारण समोरच्या विट्ठल मंदीरामध्ये भजन सुरु झाले. नंतर काही झोप लागेना म्हणुन लवकरचं आवरून घेतले आणि उजाड़ल्या-उजाड़ल्या निघायची तयारी केली. निघायच्या आधी पुन्हा त्या मुलाच्या घरी गेलो. त्याला धन्यवाद दिले. गावामधून बाहेर पडलो आणि नदी काठाला लागलो. लाल मातीची वाट आणि दोन्ही बाजूला हिरवेगार लूसलुशीत गवत; थोड खाली खळखळ वाहणारी नदी आणि आसपास छोटे-छोटे डोंगर. अजून काय वर्णन करू. काय मस्त वाटत होते. आम्ही अगदी रमत-गमत पुढे जात होतो. मध्येच थांबायचो आणि खाउगिरी करायचो. मजल दरमजल करत आम्ही पुढे जात होतो. "वाघ्या आता कुठे असेल रे?" अभिने मध्येच प्रश्न टाकला. काल बुधला माचीकडे जाताना आमच्या बरोबर न येता वाघ्या मंदिरापाशीच थांबला होता. आम्ही परत आलो तेंव्हा काही तो आम्हाला दिसला नाही. कुठे गेला कोणास ठावुक...
आता आसपास चरणारी गुरं आणि मध्येच येणारी हाकाटी ह्यावरुन आसपास कुठेतरी गाव किंवा वाडी आहे हे समजलो. थोड्यावेळाने उजव्या हाताला जवळच मोहरी गाव दिसू लागले. मोहरी गावाकडून येणारी वाट आमच्या वाटेबरोबर मिसळली. आता आम्ही रायलिंग पठारावर होतो. समोर दूरवर रायगड दिसू लागल होता. पण लिंगाणा पठाराला लागून थोडा खाली असल्याने अजून दिसत नव्हता.
जसे-जसे पुढे जात होतो तशी वाट एका डोंगरावर चढू लागली. १०-१५ मिं चढून वर गेलो तसे लक्ष्यात आले की आपण वाट चुकलो आहोत. तसेच डावीकड़े सरकलो आणि पुन्हा खाली पठारावर आलो. अर्धा तास झाला तरी बोराटयाच्या नाळेचे मुख काही सापडेना. अभि उजवीकड़े तर हर्षद डावीकड़े गेला. मी मध्ये दोघांनाही दिसेन अश्या एका जागी नकाशा बघत उभा राहिलो. इतक्यात मागुन 'श्री शिवप्रतिष्टान' वाल्यांचे आवाज येऊ लागले. बघतो तर काय सर्वात पुढे वाघ्या. हा पठ्या ह्या लोकांबरोबर इथपर्यंत आला. त्याला बघून आम्ही मात्र खुश झालो. मी, अभि आणि हर्षदला आता त्यांच्या बरोबर निघालो. दुपार होत आली होती. जेवण बनवणे तर दूरचं राहिले होते. खूप झाडी असल्याने बोराटयाच्या नाळेचे मुख काही दिसत नव्हते. 'श्री शिवप्रतिष्टान' मधल्या काही जणांनी पावसाळ्याआधी येउन मार्ग बघितला होता त्यामुळे त्यांना रस्ता सापडायला त्रास पडला नाही.
प्रथम दर्शनीच बोराटयाच्या नाळेचे ते प्रचंड रूप बघतच बसलो. उजव्या-डाव्या बाजूला रायलिंग पठाराचा अखंड प्रस्तर आणि त्या मधून थेट खाली दिसणारे कोकणतळ. नाळेमध्ये प्रवेश केला. आता खालपर्यंत मोठ्या दगडांमधून उतरायचे होते. कधी सरळ उतरत तर कधी डावी-उजवी कडे वजन सरकवत. कधी २ मोठ्या दगडांमधून घुसून पुढे सरकावे लागे तर कधी एखाद्या मोठ्या दगडावरुन खाली उतरावे लागे. आमची पूर्ण वेळ सर्कस सुरू होती. पाठीवरची बॅग सांभाळत आम्ही उतरत होतो. सर्वात पुढे अभि, मध्ये हर्षद आणि शेवटी मी. आमच्या पुढे मागे बाकीचे लोक होतेच. आम्हाला आश्चर्य वाटत होते ह्या 'श्री शिवप्रतिष्टान' वाल्यांचे. का विचारताय... त्यांच्या पायामध्ये चपला-बूट काही-काही नव्हते. अनवाणी पायाने ते ह्या दुर्गयात्रेला निघाले होते. वेग कमी असता तरी कठिण खाच-खळग्याँमधून त्यांचे पाय शिफातिने पावले टाकत पुढे सरकत होते.
वाघ्या सुद्धा आमच्या मागुन खाली उतरत होता. ट्रेक्सला आपण गेलो की गावातले कुत्रे आपल्या बरोबर येत असतात पण हा तर राजगड पासून आमच्या बरोबर होता. नाळेमध्ये प्रवेश करून २ तास झाले होते. उतार काही संपायचे नाव घेत नव्हता. मध्ये एके ठिकाणी मोठी झाडे होती. तिकडे जरा बसलो. चांगलीच भूक लागली होती. जवळ असलेल खायला काढले. खाउन आणि पाणी पिउन जरा फ्रेश झालो. बाकी सगळे आमच्या पुढे निघून गेले होते. आता आम्ही पुन्हा वेगात उतरायला लागलो. घळ मोठी होत जात होती. आधी असलेला तीव्र उतार आता कमी तीव्र झाला होता. थोड खालच्या बाजूला पुढे गेलेले लोक दिसू लागले. जसे त्यांच्या जवळ पोचु लागलो तसे कळले की ते एक-एक करून बोराटयाच्या नाळेबाहेर पडत आहेत.
रायलिंगाचे पठार संपले होते आणि आता उजव्या हाताला किल्ले लिंगाणा दिसू लागला होता. रायलिंगाचे पठार आणि किल्ले लिंगाणा यांच्यामध्ये असलेल्या जागेमधून बोराटयाच्या नाळेबाहेर पडायचा मार्ग आहे. हा १०-१५ फुटांचा पॅच रिस्की आहे. उजवीकडे रायलिंगच्या पठाराचा उभा कडा आणि डावीकड़े कोकणात पडणारी खोल दरी यांच्यामध्ये असलेल्या वीतभर वाटेवरुन पाय सरकवत-सरकवत पुढे जायचे. हाताने पकड़ घेता यावी म्हणुन काही ठिकाणी खोबण्या केलेल्या आहेत. आमच्या तिघांकड़े सुद्धा पाठीवर जड बैग होत्या. त्यामुळे सगळे वजन दरीच्या बाजूला पडत होते आणि हातावर जास्तच भर येत होता. बैग काढता सुद्धा येणार नव्हती. एक-एक पाउल काळजीपूर्वक टाकत आम्ही लिंगाण्याच्या बाजूला पोचलो. आता रायलिंगाचे पठार आणि किल्ले लिंगाणा यांच्यामध्ये असलेल्या घळीमधून खाली उतरु लागलो. ५ एक मिं. मध्ये डाव्याहाताला लिंगाणा संपला की ती घळ सोडून डावीकडे वळायचे होते. पण झाडी इतकी वाढली होती की वाट काही सापडेनाच. ह्या सगळ्यात जवळ-जवळ तास गेला. अखेर वाट सापडली. तरीपण झाडी इतकी होती की अगदी हळू-हळू पुढे सरकत होतो.
दुपारचे ४ वाजत होते. आणि आज रायगडला कुठल्याही परिस्थितीमध्ये पोचणे शक्य नव्हते. वाट उतरत-उतरत लिंगाण्याला वळसा घालत लिंगाणा माचीकडे पोचली. माचीवरच्या गावामध्ये फारसे कोणी नव्हते. तिकडे अजिबात न थांबता आम्ही पुढे निघालो. अंधार पडायच्या आधी रायगड नाही तर किमान काळ नदीकाठचे 'पाने गाव' गाठायचे होते. झटाझट उतरु लागलो. ५ वाजून गेले होते. दूरवर रायगडाच्या मागे सूर्य लपू लागल होता. अवघ्या ४०-४५ मिं मध्ये आम्ही नदीकाठी होतो. पलिकडे पाने गाव दिसत होते. अंधार पडायला अजून थोडावेळ होता म्हणुन नदीत मस्तपैकी भिजून घेतले. मी आणि हर्षद काही बाहेर यायचे नाव घेत नव्हतो. जसा अंधार पडायला लागला तसा अभि बोंबा मारायला लागला. आता आम्ही नदी पार करून गावाकडे निघालो.
नदीपार होताना एक धम्माल आली. त्या बाकीच्या लोकांमध्ये एकजण कारवार साइडचा होता. "मी ह्या रस्त्याने चाललो की हो." "मी खातोय. तुम्ही खाणार काय हो?" "थकलोय जरा बसतो की हो" अशी भाषा बोलायचा. नदी पार करताना त्याचा तोल गेला आणि आख्खा पाण्यात भिजला. अगदी बैग सकट. उठून उभा राहिला आणि बोलतो कसा,"आयला. पडलो की हो." आम्हाला इतक हसायला येत होत. हसत-हसतच गावात एंट्री मारली. राहण्यासाठी देऊळ शोधले. देवळासमोरच हात पंप होता. देवळामध्ये सामान टाकले आणि गावात कुठे दूध आणि सरपण मिळेल का ते बघायला मी आणि अभि निघालो. हर्षद बाकीची तयारी करायला लागला.
गावात एक लहान मुलगा भेटला. त्याला विचारले तर तो बोलला आमच्याकडे चला देतो तुम्हाला. तो आम्हाला त्याच्या घरी घेउन गेला. "थांबा हं एकडे" अस म्हणुन आत गेला. अवघ्या काही सेकंदामध्ये त्याची आई त्याला धरुन मारत-बदडत बाहेर घेउन आली. आम्हाला वाटले आपल्यामुळे त्याला उगाच फटके पडले. पण त्याची आई एकदम येउन आम्हाला बोलली. "माफ़ कर रे भाऊ. हा जाम खोड्या काढतो." मी म्हटले,"अहो पण आम्हाला फ़क्त ४-६ सुकी लाकड आणि थोडसं दूध हवे होते बास." त्यावर ती म्हणाली,"अस काय. मला वाटले ह्याने तुमची काही खोडी काढली की काय." आता माझ्या डोक्यात पूर्ण प्रकाश पडला. त्याचा झाला अस की हा गेला आत आणि आईला सांगितले की बाहेर २ माणसे आली आहेत. आईला वाटले पोराने केला दंगा परत. कारण हा त्या गावामधला 'चिखलू' निघाला. म्हणुन तर ती त्याला धरुन मारत-बदडत बाहेर घेउन आली. आम्ही आपले हसतोय पण तो पोरगा बिचारा रडायला लागला. त्याला म्हटले 'चल तूला गोळ्या देतो'. तेंव्हा कुठे त्याचा चेहरा हसला. आता आम्ही देवळामध्ये परत आलो आणि जेवण बनवले. झोपायच्या तयारीला लागलो. घरून निघून आठवड़ा झाला होता आणि ह्या ७ दिवसात आम्ही कोणीच घरी फ़ोन केला नव्हता. तरीसुद्धा आम्हाला कसलीच भ्रांत नव्हती. ह्या भटकंतीमध्ये आम्ही पूर्णपणे बुडून गेलो होतो. उदया होता दिवस आठवा आणि लक्ष्य होते स्वराज्याची सार्वभौम राजधानी. दुर्गराज रायगड ...
क्रमश:... सप्त शिवपदस्पर्श : भाग ५ - रायगड... !
*** ह्या भागातील तिसरे, चौथे आणि शेवटचे छायाचित्र आमच्या ट्रेकची नसून माझा मित्र 'किरण आणि मंदार ह्याच्या संग्रहातील आहेत. संदर्भ लागावा म्हणून येथे दिली आहेत.
सगळ्या गावांत असे ''चिखलू''
सगळ्या गावांत असे ''चिखलू'' असतातच...... हा भागही सुंदर वर्णीला आहे. प्रचि जरा मोठे हवे होते असं प्रकर्षाने वाटते आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
डॉक.. सुरवातीला
डॉक.. सुरवातीला सांगितल्याप्रमाणे ह्या ट्रेकची बहुतेक छायाचित्रे ८ वर्षे जुनी असून डिजिटल नाहीत. ती काही वर्षांपूर्वी प्रिंट वरून स्कॅन केलेली आहेत...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ओह... खरंच की.... मी हा
ओह... खरंच की.... मी हा संदर्भ विसरुनच गेलो होतो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त चाललाय ट्रेक.. चिखलू ..
मस्त चाललाय ट्रेक.. चिखलू .. सोगोड![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुमच्यामुळे आमच्याही ट्रेकचे
तुमच्यामुळे आमच्याही ट्रेकचे (घरबसल्या) सात दिवस झाले.
खूप छान लिहिताय तुम्ही.
शिवप्रतिष्ठानवाले सगळं दुर्गभ्रमण असं अनवाणी पायांनीच करतात का ?
आठव्या दिवसाचि आतुर्तेने वाट
आठव्या दिवसाचि आतुर्तेने वाट पाहतेय.
मस्त रे, बोऱ्याट्याच्या
मस्त रे, बोऱ्याट्याच्या नाळेचे अजून वर्णन पाहिजे होते.
तुझ्याबरोबर मी पण हा ट्रेक करतोय असे वाटतेय..
सही लिहीतोस तू
रुणुझुणू ...
रुणुझुणू ... शिवप्रतिष्ठानवाले सगळं दुर्गभ्रमण असं अनवाणी पायांनीच करतात बहुदा... दरवर्षी नेमाने ते राजगड ते रायगड हा ट्रेक करतातच. दिवसभर फक्त भट आणि चटणी खाऊन..
रात्री मात्र नीट जेवत.
आम्हाला लपून त्यांच्यापासून चूल बनवून जेवण बनवावे लागे कारण आम्हाला ते बनवून देताच नसत. आमच्यातच जेवा की.. असा सारखा आग्रह...
खूपच प्रेमळ लोक... अस्सल शिवसेवक...
******************************************************************************************************
आशुचँप ... अरे जितके आठवले तितके लिहिले...
८ वर्षे झाली जाऊन.. आता पुन्हा जायला हवे एकदा.. म्हणजे हा भाग पुन्हा 'बदलून' टाकता येईल... ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बढीया ! बोरट्याची नाळ आता
बढीया ! बोरट्याची नाळ आता जवळपास बंद झालीये असे ऐकलेय ! खरेय का..
नाही... कोण बोलले तुला??अशी
नाही... कोण बोलले तुला??अशी कशी बंद होईल???
अरे मी पण ऐकले... बंद झालीये
अरे मी पण ऐकले...
बंद झालीये म्हणजे वाटेत जी झुडपे आहेत तिथे मोठ्या प्रमाणावर मधमाशांची पोळी झाली आहेत. त्यामुळे तिकडून झुडपांना धक्का न लावता जाणे ही एक मोठी कसरत आहे. आणि त्या वाटेवर चुकून पोळे उठले तर मग दुर्घटना होण्याची शक्यता आहे म्हणून आता दुर्गयात्री त्या वाटेने न जाता सिंगापूरच्या नाळेने जातात.
होय... मागच्या वर्षी आम्ही
होय... मागच्या वर्षी आम्ही बोराट्याच्याच नाळेने हा ट्रेक करणार होतो... त्या मधमाश्या आडव्या आल्या... मी स्वतः त्यांच्या तावडीत सापडणार होतो...
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
तिथे खरंच आग्यामाशा लटकल्या होत्त्या...
आम्हाला सिंगापूरच्या नाळेने करावा लागला मग ट्रेक...
बोराट्याची नाळ राहिलीये उतरायची...
खरच मस्त वर्णन. इतकी वर्षं
खरच मस्त वर्णन. इतकी वर्षं झाली तरी आठवणी ताज्या आहेत.
मस्त रे ..एकदम भारी ..
मस्त रे ..एकदम भारी ..
मस्तच !!!!!
मस्तच !!!!!
हाही भाग अप्रतिम चिखलू >>>
हाही भाग अप्रतिम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चिखलू >>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बोराट्याची नाळ... हा भागही
बोराट्याची नाळ... हा भागही मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी पण ऐकले आहे की बोराट्याची
मी पण ऐकले आहे की बोराट्याची नाळ आता जवळपास बंद झाल्यात जमा आहे. कारण मागे १-२ वर्षांपुर्वी नाळेमध्ये दरड कोसळली आहे म्हणे त्यामुळे मार्ग अधीकच अवघड झालाय. मधमाशांची पोळी पण आहेतच.
जावून बघीतले पाहीजे एकदा.
रुणुझुणू ...
रुणुझुणू ... शिवप्रतिष्ठानवाले सगळं दुर्गभ्रमण असं अनवाणी पायांनीच करतात बहुदा... दरवर्षी नेमाने ते राजगड ते रायगड हा ट्रेक करतातच. दिवसभर फक्त भट आणि चटणी खाऊन.. रात्री मात्र नीट जेवत.
आम्हाला लपून त्यांच्यापासून चूल बनवून जेवण बनवावे लागे कारण आम्हाला ते बनवून देताच नसत. आमच्यातच जेवा की.. असा सारखा आग्रह... खूपच प्रेमळ लोक... अस्सल शिवसेवक... >>>>> कसली भन्नाट मंडळी आहेत ही सर्व ...
खूपच आवडले हे लेखनही ....