सप्त शिवपदस्पर्श : भाग १ - पुरंदर - वज्रगड - सिंहगड ... !

Submitted by सेनापती... on 16 December, 2010 - 07:05

२००२ सालचा ट्रेक आहे हा. तब्बल ८ वर्षांपूर्वीचा. त्यावेळी आमच्याकडे रोल भरायचा अवघा एक कॅमेरा होता. सोबत अजून एक रोल घेतला होता. तेंव्हा ट्रेकच्या १० दिवसात ७२ ह्या अंदाजाने आम्ही दररोज अवघे ७ - ८ फोटो काढाचे असे ठरवून होतो. तेंव्हा ह्या ट्रेकचे सुद्धा जास्त फोटो नाहीत माझ्याकडे नाहीत हे सांगायला नको. जे आहेत ते सुद्धा जुने आहेत. फोटोंचा दर्जा चांगला नसेल पण असे फोटो बघायला देखील मज्जा येते.
गेल्या ८ वर्षात मी सिंहगड, राजगड आणि रायगड ह्या गडांवर अनेकदा गेलो तेंव्हाचे काही फोटो लिखाणासोबत देणार आहे. Happy

सदर ट्रेकच्या १० दिवसाचे वर्णन एकूण ५-६ भागात लिहायचा मानस आहे.
*********************************************************************************************************************

२००२ सालची गोष्ट... मी आणि हर्षद त्यावेळी कॉलेजला शिकत होतो. अभिजित नुकताच कॉलेजमधून डिग्री घेऊन बाहेर पडला होता. दिवाळीमध्ये एक भन्नाट ट्रेक करायचा असे आमच्या तिघांच्या डोक्यात होते. पहिल्या २ दिवसांसाठी राहूल सुद्धा आमच्या सोबत येणार होता. आम्ही 'सांगाती सह्याद्री'चा घेऊन ट्रेक प्लान करायला बसलो. अखेर ठरले की 'सिंहगड ते रायगड' असा ट्रेक करायचा. शिवाय सासवड जवळ असलेले 'पुरंदर आणि वज्रगड' हे सुद्धा करायचे. आम्हाला वेळेचा काही प्रश्न नव्हता म्हणुन १० दिवसांचा मोठा प्लान आखला.

पुरंदर ---> वज्रगड ---> सिंहगड ---> राजगड ---> तोरणा ---> लिंगाणा ---> रायगड ... !

हे सातही किल्ले 'शिवपदस्पर्शाने पावन' झालेले असे आहेत. प्रत्येक किल्ल्यावर जास्तीत जास्त वेळ घालवायचा आणि राजगड, तोरणा, रायगड सारख्या किल्ल्यांवर रहायचे असे ठरले होते. पहिले ५ दिवस पुरेल इतके सामान पाठीवर मारले आणि बाकीची सगळी तयारी करून दिवाळीनंतर लगेच आम्ही ठाण्यावरुन रात्रीच्या गाड़ीने पहाटे-पहाटे पुण्याला पोचलो.

दिवस १ :

सकाळी सासवाडला जाणारी एस.टी. पकडली आणि दिवेघाट मार्गे सासवाडला पोचलो. तिकडून पुढे नारायणपुरला जाणारी एस.टी. पकडून पुरंदरच्या पायथ्याला असणाऱ्या नारायणपुरला पोचलो. डाव्या हाताला नारायणेश्वराचे अतिशय सुरेख आणि प्रशत्र असे दत्त मंदिर आहे.

देवाचे दर्शन घेतले आणि मग तिकडे बाहेर असलेल्या हॉटेलमध्ये नाश्ता उरकला. झणझणीत मिसळपाव. पुरंदरच्या अगदी माथ्यापर्यंत गाड़ी रस्ता जातो कारण हा किल्ला भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे. मध्यंतरी येथे National Cadet Corps (N.C.C.) म्हणजेच 'राष्ट्रीय छात्र सेना' यांचे कॅम्प घेतले जायचे. आपण मात्र डाव्या हाताने कच्या रस्त्याने डोंगर चढणीला लागायचे. थोडी दमछाक होते पण जास्तीतजास्त २ तास पुरतात किल्ल्यावर पोचायला. आपण थेट पोचतो ते गडाच्या दरवाज्याकड़े. आता ह्याला 'मुरारगेट' असे म्हटले जाते. थोडेसे अजून पुढे गेलो की राजाळे आणि पद्मावती असे तलाव आहेत. शिवाय मुरारबाजींचा दोन हातात दोन तलवारी घेतलेला पूर्णाकृती पुतळा सुद्धा आहे. गडाच्या ह्या किल्लेदाराने १६६५ मध्ये हा किल्ला लढवताना आपल्या प्राणांची आहुती दिली होती. १६६५ चा इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह आपल्या सर्वांना ठावूक आहेच. जिवाची बाजी लावणाऱ्या ह्या विराला मनापासून मुजरा केला आणि पुढे सरकलो.

इकडून पुढे गेलो की गडाच्या माथ्यावर असलेल्या राजगाड़ी टेकडीकड़े जाता येते. माथ्यावर पुरंदरेश्वराचे मंदिर आहे. ३०-४० मिं. मध्ये आरामात वर पोचता येते. ह्याच ठिकाणी १४ मे १६५७ साली शंभूराजांचा जन्म झाला. आसमंतामधला प्रदेश पाहून आम्ही बाजुच्या केदारेश्वर टेकडीकड़े गेलो. तिच्या माथ्यावर केदारेश्वराचे मंदिर आहे.

तिकडून पुन्हा खाली उतरून आलो. गडावर सर्वत्र लष्कराने बांधकामे केलेली आहेत. पुरंदर गडाला उत्तरेकड़े 'शेंदरी बुरुज' थोड़े पश्चिमेकड़े 'हत्ती बुरुज', पश्चिमेकड़े म्हणजेच कोकणाच्या दिशेने 'कोकणी बुरुज', आणि दक्षिणेला 'फत्ते बुरुज' आहे. एक गडफेरी करून आम्ही वज्रगडाकड़े निघालो आणि काही वेळातच महादरवाज्यामधून प्रवेश करते झालो. वज्रगड हा पुरंदरचा जोड़किल्ला. १६६५ मध्ये दिलेरखानाने आधी वज्रगड जिंकला तेंव्हा कुठे त्याला पुरंदरचा खालचा भाग घेता आला.

वज्रगडावर एक मारुती मंदिर आणि एक पाण्याचा तलाव आहे. त्याशिवाय मोठ्या-मोठ्या दगडांच्या शिळा आहेत. त्यांच्या सावलीमध्ये आम्ही थोड़े विसावलो. दुपार झाली होती. जेवण बनवायला वेळ नव्हता त्यामुळे थोडेसे जवळचे खाल्ले आणि परतीच्या मार्गाला लागलो. संध्याकाळी ५ च्या सुमारास खाली गावात आलो आणि गाड़ी पकडून पुन्हा पुण्याच्या मार्गाला लागलो. आज रात्री आम्हाला निवाऱ्यासाठी सिंहगडाचा पायथा गाठायचा होता. मिळेल ते वाहन पकडून आम्ही सिंहगडाच्या पायथ्याला असलेल्या आतकरवाडीला पोचलो. रात्रीचे ७ वाजून गेले होते आणि आता रहायचे कुठे असा प्रश्न होता. पण वाडी किंवा गावामध्ये मारुती मंदिर असतेच त्यामुळे तो प्रश्नही मिटला. देवळासमोरच्या हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर देऊन मोकळे झालो त्यादिवसासाठी पथारी पसरली. उद्या उठून सिंहगड सर करायचा होता. अजुन एक शिवपदस्पर्श अनुभवायचा होता.....

दिवस २ :

काल पहिल्या दिवशी पुरंदर आणि वज्रगड फत्ते झाला होता. आज सिंहगड सर करून राजगडाच्या जास्तीतजास्त जवळ सरकायचे होते. त्यामुळे पहाटेच उठलो, फटाफाट आवरा-आवरी केली आणि समोरच्या हॉटेलमध्ये नाश्ता करून सिंहगड चढायला लागलो. आसपासच्या भागामधले बरेच लोक सकाळी-सकाळी व्यायाम म्हणुन गड चढायला येतात. त्यामुळे वाटेवर वर्दळ होती शिवाय त्यामुळे वाट खुपच रुंद झाली आहे. आधीसारखी छोटी आणि सुंदर राहिलेली नाही. त्या थोड्या-थोडक्या गर्दीमधून वाट काढत वरती डोणजे दरवाज्यापर्यंत पोचलो. वरपर्यंत गाड़ी जात असल्याने आता किल्ल्यावर खुपच गर्दी असते. लोकांसाठी सिंहगड आता ऐतिहासीक कमी आणि पर्यटनस्थळ जास्त आहे. आम्ही चौघे राहिलेल्या पायऱ्या चढून दरवाजे पार करून गडामध्ये प्रवेश करते झालो.

याठिकाणी लगेच उजव्या हाताला दारूकोठार आहे तर थोड वर उजव्या हाताला घोड्यांची पागा आहे. त्याच्या थोड पुढे गणेशटाके आहे. डाव्या हाताला आणखी काही पाण्याची टाकं दिसतात. पण सगळ्या टाक्यांमधलं पाणी पिण्यालायक राहिलेला नाही. गडावर आता खुप दुकाने झाली आहेत त्यामुळे खायचा तसा प्रश्न नसतो. सिंहगडची कांदाभजी आणि ताक एकदम मस्त लागते पण आम्ही आधी गडफेरी पूर्ण करणार होतो. ते जास्त महत्त्वाचे होते. दुकानांच्या डाव्याबाजूला थोडी मोकळी जागा आहे तेथून राजगड आणि तोरणा यांचे सुरेख दृश्य दिसते. गडाच्या मध्यभागी एक उंचवटा आहे. त्याच्या आधीच उजव्या हाताने पुढे गेलो की लागतो टिळक बंगला. त्याच वाटेने पुढे जात रहायचे म्हणजे आपण पोचतो छत्रपति राजाराम महाराजांच्या समाधीपाशी.

घुमटीच्या आकाराच्या ह्या वास्तुचे प्रवेशद्वार एकदम लहान आहे. अगदी वाकूनच आत जावे लागते. समाधीचे दर्शन घेउन आम्ही चौघे पुढे निघालो आणि तिथून गडाच्या पश्चिम कड्याकड़े गेलो आणि तिकडून तानाजी कड्यापर्यंत पोचलो. दिनांक ५ फेब. १६७०. तानाजी मालुसरे आपल्या सोबत मोजके मावळे घेऊन ह्याच कड्यावरुन चढून गडावर आले आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्न केले. हातघाईच्या लढाईमध्ये जबर जखमी होउन ते मृत्यू पावले. मात्र त्यांच्यामागुन शेलारमामा यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. त्याक्षणाची राजे राजगडावरुन आतूरतेने वाट बघत होते. तो इशारा बघताच राजे कदाचित मनातल्या मनात म्हणाले सुद्धा असतील,'तानाजीने आधी कोंढाण्याचे लग्न लावलेच.' पण तेंव्हा राजांना माहीत कुठे होते की कोंढाण्याचे लग्न लावता-लावता त्यांचा बालसखा तानाजी आपला मुलगा रायबाचे लग्न न लावताच दूर निघून गेला होता... दुसऱ्या दिवशी राजे सिंहगडावर पोचले तेंव्हा त्यांना ही बातमी मिळाली. अत्यंत दुख्खी अश्या राजांनी आपल्या तानाजीचे शव त्यांच्या उमरठ (पोलादपुर जवळ) या गावी पाठवले. ज्यामार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता मढेघाट या नावाने ओळखला जातो.

तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा विरगळ स्थापन केला गेला आहे. शिवाय एक सुंदर स्मारक सुद्धा उभे केले गेले आहे. स्मारकामध्ये असलेला त्यांचा भरदार मिशांचा अर्धाकृती पुतळ्यासमोर उभे राहिल्यावर ऊर अभिमानाने भरून येतो. 'मुजरा सुभेदार' असे म्हणुन आम्ही पुन्हा मागे यायला निघालो. स्मारकाच्या उजव्याबाजूला गडाचा देव म्हणजेच 'कोंढाणेश्वर मंदिर' आहे तर डाव्या बाजूला 'अमृतेश्वर भैरव' आहे. तिकडे दर्शन घेतले आणि पुन्हा दुकानांच्या दिशेने निघालो. दुपार होत आली होती आणि आता जेवण बनवायला हवे होते. पहिल्या दिवशी आम्ही बाहेरच खाल्ले होते. आजपासून मात्र आम्ही जेवण बनवून खाणार होतो. झटपट-फटाफट होइल अशी खिचडी बनवली. सोबत पापड़ आणि लोणचे. एका दुकान मधून कांदाभाजी आणि दही घेतले. खाउन तृप्त झालो आणि मग देवटाक्याकड़े निघालो.

सिंहगडावरील देवटाके म्हणजे निर्मळ पाण्याचा आस्वाद. अहाहा... गडावर आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी ह्याची चव घेउन पहावी. तिकडून आम्ही पुढे निघालो आणि कल्याण दरवाजा डावीकड़े ठेवून पुढे गडाच्या दक्षिण भागात मध्यभागी असलेल्या टेहाळणी बुरुजाकड़े गेलो. तर एकदम दक्षिण टोकाला आहे तो झुंझार बुरुज. आता इथून राहुल मागे फिरून मुंबईला जाणार होता. तर आम्ही कल्याण दरवजा मधून राजगडाकड़े कुच करणार होतो.

कल्याण दरवाजामधून खाली उतरलो आणि राहुलला हात करत कड्याखालून जाणाऱ्या वाटेने झुंझार बुरुजाच्या दिशेने निघालो. कल्याण गावापासून गडावर यायची ही दूसरी वाट. वाट आधी डोंगराच्या एका धारेवरुन सरळ जात रहते. दोन्ही बाजूला काही शे फुट दरी आणि मध्ये दोन्ही बाजूला उतरती अवघी ३-४ मी. ची सपाटी. पूर्ण मार्गावर एक सुद्धा झाड़ नाही. आम्ही सिंहगडावरुन निघालो तेंव्हा दुपारचे २ वाजले होते. त्यामुळे उन्हाचा त्रास जाणवत होता. एके ठिकाणी जेमतेम डोक्याला सावली मिळेल इतकीच झाडी होती. तिकडे ५-१० मिं. आराम केला आणि पुढे निघालो. आता समोर २ रस्ते लागले. एक समोरच्या टेकाडावर चढत होता तर दूसरा उजव्या बाजूला थोडा खाली उतरत होता. पाहिले तर वर जाणाऱ्या वाटेवर काही दगड टाकले होते. आम्हाला असे वाटले की खरी वाट उजव्या बाजूने आहे त्यामुळे आम्ही उजवीकडच्या वाटेने निघणार तितक्यात दुरून एकदम एक आवाज आला. "तिकड..तिकड.. त्या वाटेला. साखर गावाला जायचय ना" आम्ही ऐकताच बसलो. आधी तो आवाज कूठुन येतोय काही कळेना. अखेर एकदम खालच्या शेतामधुन एक शेतकरी आम्हाला आवाज देत होता तो दिसला. त्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे वरच्या वाटेवर निघालो.

थोड चढून गेल्यावर पुन्हा सपाटी लागली. आता पुढे जाउन पुन्हा एक छोटीशी टेकडी लागली. तिच्या उजव्या-डाव्या बाजूला जाणाऱ्या २ वाटा होत्या. ह्यावेळी मात्र उजवीकड़े वळायचे नक्की माहीत होते. अत्यंत दाट अश्या कारवीच्या झाडीमधून वाट काढत पुढे सरकत होतो. एक-एक पाउल उचलायला बराच वेळ जात होता. अखेर त्या टेकडीला वळसा घालून पलीकडे पोचलो. आणि पाहतो तर काय... खाली उतरणाऱ्या २ लांबचलांब डोंगरधारा दिसत होत्या. एक उजवीकड़े तर दूसरी डावीकड़े. त्यांच्यामागे दुरवर समोर राजगड आणि तोरणा उभे होते. दोन्ही डोंगरधारांच्या सुरवातीला एक-एक झाड़ आहे आणि त्यावर अगदी गंजलेल्या अश्या पाट्या आहेत. एकावर राजगड असे लिहून बाण काढला आहे तर दुसऱ्यावर तोरणा असे लिहून बाण काढला आहे. आम्ही राजगड लिहिलेल्या धारेवरुन खाली उतरायला लागलो. उंच वाढलेल्या गवतामधून उतरणारी वाट फारशी दिसतच नव्हती. ५ वाजत आले होते आणि वाट काही उतरायची संपत नव्हती. अंधार पडायच्या आधी आम्हाला साखर गाव गाठायचे होते. एका मागुन एक डोंगर उतरत आम्ही कुठेही न थांबता थोड्या सपाटीला आलो. २-३ घरं दिसली पण ती रिकामी होती. सोबतचे पाणी संपत आले होते आणि अपेक्षेपेक्षा वाट जास्त वेळ घेत होती.

पुढे वाट उतरु लागलो. ६ वाजून गेले तेंव्हा एका ठिकाणी दूरवर एक घर दिसले. तिकडे पाणी आणि गाव अजून किती लांब आहे ह्याची माहिती मिळेल म्हणुन हर्षद गेला. मी आणि अभि वाटेवर बसून होतो. त्या घरात सुद्धा कोणीच नव्हते असे कळले. "बघू.. होइल ते होइल" अस म्हणुन जरा निवांतपणे बसलो. जवळचे उरलेले पाणी प्यालो आणि सोबत असलेली पार्ले-जीची बिस्किटे खाल्ली. तितक्यात मागुन एक माणूस आला. त्याला गावाची माहिती विचारली तर तो नेमका साखर गावचा निघाला. बरे झाले. आता आम्ही त्याच्या सोबतच निघालो. काही वेळातच त्याने आम्हाला गावात पोचवले आणि एका देवळामध्ये राहू शकता असे सांगितले. गावात पोहचेपर्यंत पूर्ण अंधार झाला होता. देवळामध्ये गेलो आणि निवांतपणे पथारी पसरली. काहीवेळाने समोरच्या घरामधून काही पैसे देउन स्टोव्ह आणि रॉकेल घेतले आणि जेवण बनवायला लागलो. रात्री जेवण झाल्यानंतर देवळामागे असलेल्या विहिरीवरती आंघोळ केली. दिवसभर चांगलाच ट्रेक झाला होता त्यामुळे झोप येत होती. आता 'गडांचा राजा आणि राजांचा गड' अश्या राजगडाचे वेध लागले होते. उदया सकाळी लक्ष्य होते 'स्वराज्याची पाहिली राजधानी - राजगड...'

क्रमश:.. सप्त शिवपदस्पर्श : भाग २ - राजगड ... !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !
"श्रीमान योगी" वाचायलाच हवं पुन्हा. हे असं गड-किल्ल्यांचं वर्णन वाचलं की शाळा-कॉलेजच्या दिवसातलं ते राजांसाठी वेडं होणं आठवतं !
लवकर येऊ द्या पुढचे भाग.

भटक्या मस्त वर्णन रे.. ऐतिहासिक स्थळांना भेट देतांना रोमांच येतात ना..
पुढच्या भागांची वाट पाहणे सुरू..

हा माझा ड्रीम ट्रेक आहे!!! कधी योग येइल काय माहीत.. >>> :यो(गा)च्या प्रतिक्षेत असलेला बाहुला:

रोहन मस्तच वर्णन... आम्ही अप्पां सोबत २००७ मधे पुरंदर-वज्रगड आणि सिंहगड असा ट्रेक केला आहे... सगळ्या आठवणी जाग्या झाल्या... Happy

भन्नाटच सफर केलेली दिस्त्ये! झकास, लई खास!
(२००२ मधे मी बोम्बलत काय करत होतो बरे? दुस्रे काय, नोकरी एके नोकरी! Proud असो)

आधी सगळी लेखमाला एका झपाट्यात वाचून काढली - सर्व वर्णन अप्रतिम .

मानलं बुवा तुम्हा सगळ्यांना - काय काय अनुभवलंत या दुर्गसफरीत .......

'मुजरा सुभेदार'

नरवीर तानाजी मालुसरे यांनी घरातील मुलाचे लग्न बाजूला ठेऊन कोंढाणा काबिज करण्यासाठी "स्वराज्य निष्ठा" दाखविली. कोंढाणा घेताना त्यांना माघ वद्य नवमीला वीरमरण आले. म्हणून हा दिवस बलिदान दिवस म्हणून ओळखला जातो.

यंदा माघ वद्य नवमी शुक्रवारी (13 फेब्रुवारी) असल्याने नरवीर मालुसरे यांची 345 वी पुण्यतिथीचा कार्यक्रम होणार आहे.

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5410159873590551851&Se...पुणे&NewsDate=20150212&Provider=राजेंद्रकृष्ण कापसे - सकाळ वृत्तसेवा&NewsTitle=नरवीर तानाजी मालुसरे यांची उद्या पुण्यतिथी